डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

तुमच्या मूर्तीला म्हणजे तुम्ही ज्यांना अपार मानता अशा कुणालाही असं टारगेट केल्याची कल्पना करा. नागडं-उघडं केल्याची कल्पना करा. रक्त खवळेल ना? मध्यंतरी नेहरू-आंबेडकर व्यंगचित्रावरून वादंग उठलंच होतं. पण त्या व्यंगचित्रात टवाळी नव्हतीच. (अर्थात हेही फक्त एका वाचकाचं, माझं मत झालं!) ‘शार्ली’वाल्या व्यंगचित्रांमध्ये विखारही आहे. विखारी लिहिण्याचा हक्कही विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्यात अनुस्यूत असायला हवा ना? प्रश्न अधिक बिकट होतो त्याने.  

महात्मा फुले यांच्या ‘गुलामगिरी’ (1873) या पुस्तकाचं पुनर्वाचन करत होतो. या पुस्तकाचा आशय व शैलीबद्दल मनात विचार सुरू असतानाच ‘शार्ली हेब्दो’मधल्या पैगंबरांवरील व्यंगचित्रामुळे हिंसा घडली. हिंसेच्या आधी अर्थातच अनेकांची मनं त्या व्यंगचित्रामुळे दुखावली.

‘विचार व अभिव्यक्तिस्वातंत्र्य’ हे एक निरपवाद, चिरंतन मूल्य आहे, असं मी मानतो. त्यावर कुठलाही अंकुश असता कामा नये. वयाने प्रौढ माणसांकडे संपूर्ण निर्णयस्वातंत्र्य आहे. मी वर्तमानकाळ वापरतो आहे, पण मी आता थोडा बावचळलो आहे. मला कुणाच्या भावना दुखावल्या जायला नको आहेत का? असं न करता कुठलंही लेखन करताच येणार नाही- किंबहुना, करण्यात अर्थच नाही, असं म्हणता येईल. मी जे आणि ज्या तऱ्हेने व्यक्त करेन, त्याच्याशी माझी निष्ठा मात्र असायला हवी.

मग मी का कचरतो आहे? हिंसा कुठल्याही परिस्थितीत निंद्य, असंही मी मानतो. जर एखाद्याने काही तरी अभिव्यक्त केल्याने मानवसमूहांमध्ये सांधलेच न जाणारे तट पडणार असतील आणि भयानक हिंसा-कदाचित ते अखेरचं तिसरं महायुद्ध- घडणार असेल, तर? हा ‘तर’ घाबरवतो.

परत ‘गुलामगिरी’कडे येतो. पुराणांमधून उभ्या राहणाऱ्या ब्राह्मणवादावर त्यात जबरदस्त प्रहार आहे आणि शैलीही जहाल आहे. फुल्यांनी एक समांतर अब्राह्मणी पुराणेतिहास रचला आहे. पण ही पूर्णपणे तात्त्विक अंगाने जाणारी धर्मचिकित्सा नव्हे. ते उपरोध, उपहास, खिल्ली, टिंगल अशी सर्व आयुधं वापरतात. त्यांच्या अभिव्यक्तीमधला बिनबोटचेपेपणा तर अफलातून वाटतो. मला फुले यांचं ‘गुलामगिरी’ लिहिण्याचं स्वातंत्र्य तर अर्थातच मान्य आहे. पण याचं कारण मला फुल्यांचा ब्राह्मण-पुरोहितविरोध पूर्णपणे पटतो, हे तर नाही ना?

आपल्याला न पटणारं, कदाचित आपल्या भावना दुखावणारं असं काही अभिव्यक्त करण्याचं स्वातंत्र्य दुसऱ्यांना देता यायला नको का? ‘गुलामगिरी’ आणि ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या दोन तऱ्हेचे आविष्कार आज आपल्या समाजात ‘मुक्त’ आहेत. मुरुगन यांच्याबद्दलही निदान हळहळ व्यक्त होते आहे. पण ‘शार्ली हेब्दो’च्या बाबतीत निःसंदिग्ध अशी भूमिका मराठी लेखक का घेत नाही आहेत? (मी एक मराठी लेखक आहे.)

या बाबतीत स्वनियंत्रण, न्याय्य असणं, सदसद्‌विवेकबुद्धी, अभिरुची इत्यादींचा उल्लेख होतो आहे. जर विचार व अभिव्यक्तिस्वातंत्र्य हे मूल्य विनाअट नसेल, तर त्याला काहीही अर्थ उरत नाही. कारण मग या मर्यादा, रेषा इत्यादी ठरवायचं कुणी? याचे निकष काय नि नियम कोणते? त्या-त्या वेळी परिस्थिती अभ्यासून निर्णय घ्यायचा, तर मग न्यायाधीश कोण? जो-तो तर न्यायाधीश होऊ शकत नाही? सत्ताधारी तर नाहीच होऊ शकत. गंमत अशी की- नेमकी व निश्चित, इंटरप्रीट करावी न लागणारी वस्तुनिष्ठ नियमावली नसेल, तर खरोखरीचा न्यायाधीशही या बाबतीत न्यायाधीश होऊ नाही शकत.

‘शार्ली हेब्दो’ची शैली व्यंगचित्रांची अर्थात एका परीच्या विनोदाची आहे. निर्विष विनोदाची आपल्याकडे मोठी ख्याती आहे, पण विनोद पूर्णपणे निर्विष होऊ शकतो का? आणि झालाच तर त्याचा परिणाम तो काय? आणि हो, त्यात मग विनोद तरी काय? त्यात, व्यंगचित्रामध्ये टीका काहीशी अनुस्यूतच असते ना? झोंबावं, पण फार नाही; वार करावा, पण कंबरेखालचा नाही; विडंबन करावं, पण विटंबना नाही. हे खरं. पण या सीमारेषा (बहुतेक सीमारेषांप्रमाणे) पुसटच नाहीत काय? तमाशाला सोवळं करण्यात काय अर्थ आहे बरं?

‘या’ परिस्थितीत अभिव्यक्तिस्वातंत्र्याला होकार, ‘त्या’ परिस्थितीत नकार म्हणजे काय? त्यात पुन्हा हिंदूंना एक नियम, मुस्लिमांना वेगळा, ख्रिश्चनांना तिसरा- असंही उपयोगाचं नाही. गटानुसार, मतप्रणालीनुसार, श्रद्धांनुसार विचार व अभिव्यक्तिस्वातंत्र्याबद्दलचे निर्णय घेऊन कामाचं नाही. काय, करायचं काय?

या सगळ्यामध्ये त्या व्यंगचित्रांचा आशय-विचार होतो का? ज्यांचा आहे, त्यांचा फक्त या शैलीला विरोध आहे का? हा आशय ‘सभ्यपणे’ वगैरे मांडलेला विरोधकांना चालणार आहे का? (इथे एक जटिल तात्त्विक मुद्दा उपस्थित होतो. रूपातूनच शेवटी आशय व्यक्त होत असेल; तर त्या रूपशैलीतच आशय आहे, असं म्हटलं पाहिजे.) ‘शार्ली हेब्दो’मधल्या सर्व व्यंगचित्रांमागे एक धर्मविरोधी, किंबहुना कुठल्याही एस्टॅब्लिशमेंटच्या विरोधात भूमिका जाणवते. इस्लामच्या बाबतीत कुठलीही धर्मचिकित्सा कुणी व कशी करावी, हाही प्रश्न उद्‌भवतो.

‘शार्ली हेब्दो’वाले जे करत आहेत, ते जाणीवपूर्वक करत आहेत (यात जाणून-बुजूनही आलं). त्यांना इस्लामच्या विरोधात भूमिका घ्यायचीच आहे, ते ‘सर्वधर्मसमभाव’ असा ‘सेक्युलर’चा अर्थ लावत नसावेत. ते त्यांच्या भूमिकेकरता मरायलाही तयार आहेत, हे उघड आहे. हा त्यांचा जिहाद आहे का? पण, आपण काय करायचं?

देव ही संकल्पना मला पोकळ, अर्थरहित वाटते. त्यामुळे मी कुठलाही धर्म मानण्याचा प्रश्नच उद्‌भवत नाही. पण इतरांना देव मानण्याचा व धर्म पाळण्याचा अधिकार आहे, त्यांना विचार व अभिव्यक्तिस्वातंत्र्य (कुणाहीप्रमाणे) आहे. याला माझ्या कुठल्या कृतीने बाधा पोचते का, हाही अवघड प्रश्न आहे.

त्यात करायची ठरवली तरी कुठलीही धर्मचिकित्सा सोपी नाही. भाषेपासून समस्या सुरू होतात. मी ‘पवित्र कुर्‌आन’ वाचलं, मराठी व इंग्रजी भाषांतरात. हे ‘मान्य’ नाही. ते उर्दू वा फार्सीत वाचूनही भागत नाही. अरबीतच वाचायला हवं. त्यात पुन्हा नुक्ताचीनीचा अत्यंत किचकट प्रकार आहे. पुन्हा बायबलच्या हर्मेन्युटिक्सप्रमाणे अर्थ लावण्याच्या, इंटरप्रिटेशनच्या समस्या आहेतच. या वाङ्‌मयाकडे धर्मग्रंथ म्हणून पाहायचं, इतिहास म्हणून पाहायचं, मिथकं म्हणून पाहायचं की अन्य कुठल्या तऱ्हेने पाहायचं, हे ठरवणंही मुश्कील आहे. धर्मचिकित्सेला एक गांभीर्य हवं, अशीही भूमिका घेतली जाऊ शकते. आणि कार्टून (वा विनोद) पुरेसे गंभीर असूच शकत नाही, अशीही.

विचार व अभिव्यक्तिस्वातंत्र्य यामध्ये आशय व शैली दोन्ही अभिप्रेत आहे आणि कुठल्याही व्यंगचित्राला रूप/ आशय असतो, खरं तर रूपाशय असतो. हा ‘आशय चालेल, पण ही तऱ्हा नको’ असं आहे का? (पुन्हा, असं संभवतं का, हा निराळाच मुद्दा झाला.)

जे बेलाशक, निर्भीडपणे आपलं म्हणणं मांडतात; उदाहरणार्थ- फुले, टिळक, गांधी, आंबेडकर; ते स्वतः परिणामांना तयार असतात, असं दिसतं. त्यांना मरू न देणं हे समाजाचं कर्तव्य आहे; पण ते मरायला तयार असतात, हेही महत्त्वाचं. (ही उदाहरणं समाजकारणातली, राजकारणातली झाली. कलेबाबतही हे सर्व मुद्दे खरे ठरतील ना?)

गणपती उत्सवावर मध्यंतरी कुणी काही म्हटलं, तर खूप हिंदू चिडले. (ते स्वाभाविक आहेच.) किती मुस्लिम चिडले? पण या ‘शार्ली’ प्रश्नावर हे हिंदू चिडले नाहीत का? हुसेनांनी हिंदू देवतांची नग्न चित्रं काढणं बरोबर नाही, असं कुठल्या मुस्लिमांनी म्हटलं का? का नाही; मला ठाऊक नाही. म्हणजे हे सगळं त्या-त्या गटापुरतंच म्हणायचं की काय? गटागटाची एक परंपरा असते आणि तिचा आदर केला पाहिजे, असं म्हणता येईल. म्हणजे हिंदू-भारतीय(!) कलापरंपरेत नग्न देवतांची चित्रं चालतात; मग ती कुणीही काढली तरी चालतील, मुस्लिमानेही. तसंच जर मुस्लिम कलापरंपरेत (इथे देशाचा उल्लेख नाही) जर अल्लाह व पैगंबराचं चित्र वर्ज्य असेल, तर ते कुणीही काढलं तरी चालणार नाही- ख्रिश्चनानेही.

हुसेन यांना नग्न देवता चितारण्याचा अधिकार एक कलावंत म्हणून आहे खरा, पण एक मुस्लिम म्हणून तो नसावा बहुतेक. कारण इस्लाम परंपरेत मूर्ती करणंच निषिद्ध आहे. असो. त्यांनी इंदिराबाईंचं दुर्गेच्या रूपातलं चित्रही काढलं होतं. पण माझं या चित्रांबद्दलचं काहीही मत असलं तरी हुसेन यांना त्यांना काय हवं ते काढण्याचं स्वातंत्र्य आहे, असंच मी मानलं. नग्न देवतांच्या शिल्पांचा इतिहास आहे; पण हा कदाचित फारच वेगळा मुद्दा होईल, किंवा नाहीही. 

इथे आणखीन एक गोष्ट आहे. जर अशी परंपराच नाही, तर मी चित्र काढून खाली नाव दिल्याने तो आयकॉन इतका लवकर स्थापित कसा होतो? (चित्रामुळे की भाषेमुळे, हा एक उपमुद्दा.) आणि परंपरा नसलेली मूर्ती कुणी नव्याने स्वतःच निर्माण केली, तरी त्याची विटंबना होऊ शकते काय? त्या चित्रात ‘दैवी’ वा ‘धार्मिक’ असं काही सूचित करण्याचा प्रयत्न आहे काय? (उदाहरणार्थ- रविवर्मा यांच्या नऊवारीतली लक्ष्मीसुद्धा ‘दैवी’ वाटते.) शार्लीवाल्यांनी विडंबन/विटंबना करण्यासाठीच मूर्ती निर्माण केलेली आहे. तिची पूजा तत्त्वतःच असंभव आहे. हा आयकॉनोग्राफीचा अभ्यासकांचा मुद्दा आहे. पण त्यातला ‘अभिव्यक्तिस्वातंत्र्या’शी निगडित भाग पाहू.

अफगाणिस्तानातल्या बुद्धमूर्ती फोडणं निषेधार्ह; त्याचं एक कारण की, त्या सुंदर होत्या (अर्थातच हे व्यक्तिनिष्ठ आहे). पण दुसरं असंही आहे की, त्यामुळे बौद्धधर्मीयांना दुःख झालं. (म्हणून इतरांना पुन्हा झालंच.) जर शार्लीवाल्यांनी पैगंबरांची प्रतिमा निर्माण केली नसती आणि ती आधीपासूनच असती, तर तिची ‘करून टाकणं’ एकदम तडक निषेधार्ह झालं असतं.

मग आता ती त्यांनी नव्याने निर्माण केली आणि त्यांनीच विटंबवली, तरी ते निषेधार्हच नव्हे काय? बरं, त्यात ‘मूर्तिभंजकता’ इस्लाममध्ये चालते; एवढंच नाही, तर तशी कृती पवित्रही मानली जाते. (हे बरोबर आहे ना?) मग जर इतर धर्मांतल्या मूर्तीचं भंजन चालतं, तर मग इस्लामी परंपरेमध्ये नसलेल्याच मूर्तीचं निर्माण करून तिचं भंजन/विटंबन केलं तर ते चूक ठरेल काय? म्हणजे आधी मूर्तिनिर्माण चूक नि मग भंजन/ विटंबनही चूक.

अशा वेळी हे चूक आहे, असं मुस्लिम म्हणू शकतील का? हे चिडू शकतील, त्यांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतील; पण ते एक मुस्लिम म्हणून मूर्तीच्या भंजनाबद्दल वा विटंबनाबद्दल आक्षेप घेऊ शकतील का? तो बिगर- मुस्लिमांना, किंबहुना निधर्मीयांनाच घेता येईल. पण मुद्दा हा की, तो त्यांनी घ्यावा का? मग पुन्हा, शार्लीवाल्यांच्या वा एकूणच विचार व अभिव्यक्तिस्वातंत्र्याचं काय?

एखादा विचार, कृती, अभिव्यक्ती ‘मानवजातीच्या हिताची नाही वा शोषणाला खतपाणी घालणारी आहे’ म्हणून निर्बंध आणणं तत्त्वतः मान्य करावंसं वाटेल; पण त्यालाही काहीएक अर्थ नाही. कारण परत, हे ठरवणार कोण? ‘आपलं ते खरं’ असा जो-तो गट मानतच आला आहे, असं इतिहास सांगतो ना? शोषक-शोषितदेखील नेमकेपणाने आयडेंटिफाय करणं-ठरवणं अवघड नव्हे काय? रशिया, अमेरिका, भारत अशा सर्वच देशांत सर्वच काळांत हे ठरवणं अवघड; ठरवून टाकणं तर अशक्यच.

म्हणजे, या व्यंगचित्रांच्या आशयाकडे वळलं तरीही प्रश्नचिन्हं मिटणार नाहीत. तो आशय बरोबर, पण शैली चूक- असं कशावरून म्हणणार, हे एक; आणि दुसरं म्हणजे, आशय बरोबर की चूक हे कोण व कसं ठरवणार? आणि पुन्हा आशय बरोबर असला, तर कुठलीही शैली चालेलच. गुंता गच्च आहे. विचार व अभिव्यक्तिस्वातंत्र्य विनाअट पुकारलं नाही, तर तो सुटणं अवघड. आणि पुकारलं, तरी हा वसा न टाकणंही अवघड.

आपण स्वतः न्यायाधीश तर अजिबात होऊ शकत नाही, कारण आपलंच चूक असण्याची शक्यता खूपच आहे. शिवाय असा अधिकार स्वतःला बहाल करणं, हे अरेरावीचं आहे. (तो अधिकार असलाच, तर पुन्हा सगळ्यांनाच असायला हवा.) ‘मरायला तयार असणं’ या तत्त्वाचा विपर्यास अगदीच होऊ शकतो. तो काही निकष म्हणून मी सुचवत नाही. पण मी एखाद्याची आय-माय काढणार आणि त्याने मात्र माझ्या थोबाडीत लगावायची नाही, हे कसं व्हावं? ‘मला हे म्हटलंच पाहिजे आणि असंच म्हटलं पाहिजे’, ही निकड महत्त्वाची नाही काय? आपल्या लिखाणावर मरणाची निष्ठा हवी, असा याचा रूपकात्म अर्थ घ्यावा. निदान निकराच्या प्रश्नांबाबत. पण म्हणजे, पुन्हा कुठल्या?

प्रश्न ‘मी’- म्हणजे लेखकाने काही म्हणण्याचा नाहीच. मी जबाबदारीने लिहितो, असं लेखक मानत असावा; ते रोचक/महत्त्वाचं वाटतं की नाही, हे वाचक ठरवेल. लेखक-वाचक या संज्ञांमध्ये सर्व कला निर्माण करणारे व तिचा अनुभव घेणारे गृहीत आहेत. प्रश्न दुसऱ्याने काही(ही) म्हटलं तर मला चालणार आहे का, असा आहे. ‘चालणार आहे का?’ म्हणजे ‘पटणार आहे का?’ असा अजिबात नाही. तो-तो लेखक ‘माझ्या’सारख्या जबाबदारीने लिहीत नसेल, असं समजण्याचा मला अधिकार नाही.

विचार व अभिव्यक्तिस्वातंत्र्य निरपवाद हवं. आणि हे मरण्याचं म्हटलं तरी लेखकाचं खरं आणि कलाआयुष्य जपणं ही केवळ त्या-त्या लेखकाची नाही; तर आपल्यासारख्या सर्व लेखक-वाचकांची, समाजाची जबाबदारी आहे. त्याबरोबरच कोणत्याही परिस्थितीत हिंसादेखील  निरपवादपणे निंद्यच. विचार व अभिव्यक्तिस्वातंत्र्य जपण्याने हिंसेला खतपाणी मिळणार असेल तर काय, हा प्रश्न मग येतो. हीच खरी शृंगापत्ती नव्हे काय?

विनोदाचंही पाहायला हवं. विनोद हिंसक होऊ शकतो. बहुतेकदा होतोही. शिवाय त्यात इतरांना मूर्ख ठरवण्याचा एक पवित्रा असतो. बहुतेकदा ‘लाफिंग ॲट’ होतं, ‘लाफिंग विथ’ नाही. कलेमध्ये इतर तऱ्हेचे धोकेही असतात. विदारक दर्शन कधी कधी आत्मकरुणा गोंजारवणारं ठरू शकतं आणि उपयोजित संगीत गुंगवणारं ठरू शकतं. अशा सर्व धोक्यांचा सामना लेखक-वाचकाला करावाच लागतो. तेव्हा प्रश्न फक्त विनोदाचा नाही.

असं पाहा... तुमच्या मूर्तीला, म्हणजे तुम्ही ज्यांना अपार मानता अशा कुणालाही- असं टार्गेट केल्याची कल्पना करा. नागडं-उघडं केल्याची कल्पना करा. रक्त खवळेल ना? मध्यंतरी नेहरू-आंबेडकर व्यंगचित्रावरून वादंग उठलंच होतं. पण त्या व्यंगचित्रात टवाळी नव्हतीच. (अर्थात हेही फक्त एका वाचकाचं, माझं मत झालं!) ‘शार्ली’वाल्या व्यंगचित्रांमध्ये विखारही आहे. विखारी लिहिण्याचा हक्कही विचार व अभिव्यक्तिस्वातंत्र्यात अनुस्यूत असायला हवा ना? प्रश्न अधिक बिकट होतो त्याने.

आपण ‘न वाचता’, ‘न बघता’ याबाबत भूमिका घेऊ शकतो का? नेहमी म्हटलं जातं त्याच्या उलट मला म्हणायचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ- ‘पीके’ बघा, मग टीका करा- असं म्हटलं जातं. पण पेरुमल मुरुगन यांची ‘मधोरूबगन’ न वाचताही त्यांना ती लिहून छापण्याचा हक्क आहे, असं मानायला नको का?

आनंद यादव यांच्या ‘संतसूर्य तुकाराम’वर कुणी फार काही प्रखरपणे बोललं नाही. त्यांची गत मुरुगनांसारखीच झाली. यात वारकरी मताचा आदर राखला गेला. एका गटाची दहशत बसली की, लेखक-वाचकांनी लढा देण्याइतपत हे लिखाण उच्च दर्जाचं आणि म्हणून महत्त्वाचं मानलं नाही? म्हणजे यात कलात्मक मूल्य इत्यादी आलं. उदाहरणार्थ- तेंडुलकरांच्या ‘सखाराम बाइंडर’, ‘गिधाडे’, ‘घाशीराम कोतवाल’च्या बाबतीत नाटकवाल्यांनी सेन्सॉरशी लढे दिले; पण त्या कलाकृती चांगल्या कलाकृती होत्या, असाही त्यांचा दावा होता. पण विचार व अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा चांगल्या नसलेल्या कलाकृतीच्या लेखकाचाही हक्क नाही काय?

अश्लीलता (व्हल्गॅरिटी), बीभत्सपणा (ऑब्‌सीनिटी), अभिरुची (टेऽस्ट) या गोष्टी संस्कृतिसापेक्ष, स्थल-कालनिष्ठ तर असतातच. ‘एआयबी’वरही वादंग सुरू आहे. ‘काय फरक पडतो’, ‘आवडत नसेल तर पाहू नका’, ‘हे मित्र-मैत्रिणींसमोर चालेल, पण आया-बहिणींसमोर नको’, ‘कुठे काय झालं?’ अशा असंख्य प्रतिक्रिया येत आहेत. त्यानंतर बीबीसीच्या वृत्तचित्राचा प्रश्न!

करमणूक आणि कला (अशा दोन गोष्टी मानल्या तरी) पेक्षाही धर्म व राजकारण (अशा दोन गोष्टी मानल्या तरी) यातले प्रश्न अधिक झोंबणारे होतात, असं (मला) वाटतं. राजकीय मतस्वातंत्र्याचा प्रश्न आहेच आहे. कम्युनिस्ट राजवटीमध्ये राजकीय मतस्वातंत्र्य नाही, पण लोकशाही देशांमध्ये मात्र कम्युनिस्ट चळवळीतले लोक हे स्वातंत्र्य पुकारताना दिसतात. लोकशाही हे स्वातंत्र्य कबूलच करते, पण इथे एक विरोधाभास आहे. सर्वांना सारखा न्याय हवा आणि तो न्याय असेल तर तो सर्वत्र हवा. 

मुरुगनांनी आत्महत्येची घोषणा करून सर्व लेखक- वाचकांची पूर्ण गोची केली आहे. आता काय करायचं काय? उत्तर देण्यापेक्षा प्रश्न नीट मांडणं महत्त्वाचं मानलं जातं. पण इथे उत्तर दिलंच पाहिजे. पण ते देऊन टाकता येणार नाही. चर्चा हवी. सामाईक निर्णय घेता येईल का? निदान कलावंतांनी एकत्र यायला हवं, निःसंदिग्धपणे बोलायला हवं. पण कुठे आणि कसं एकत्र यायचं?

आता अश्लीलतेचं, हिंसेचं वा शिव्यांचं पुराणमतवाद्यांनाही काही वाटत नाही, असं म्हणेपर्यंत पेहेलानी आले! राजकीय आणि धार्मिक बाबीत मात्र सर्वच सामाजिक गट संवेदनशील, सावध व दक्षही असतात. आता एकविसाव्या शतकामध्ये या बाबतीतच मुस्कटदाबी अधिक होताना दिसते.

या टिपणाचा शेवट कसा करावा? असो वा लेखनसीमा म्हणून चालणार नाही. या बाबतीत भारतीय संविधानातल्या संबंधित कलमांचीही चर्चा व्हायला हवी. पण एक भूमिकाही घोषित करायला हवी. मी विचार व अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या बाजूने आहे. विज्ञानात काही मांडताना ‘all other things remaining constant’ असे शब्द योजतात. मेख तिथेच आहे.

Tags: राजीव नाईक कलावंत लेखक अभिव्यक्तिस्वातंत्र्य विचार शार्ली हेब्दो राजीव नाईक शार्लीचं काय करायचं? rajiv naik raj writer Artist Freedom of expression Thought Charlie Hebdo Rajiv Naik Charliech kay karaych? weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

राजीव नाईक
rnaik35@gmail.com

  लेखक, नाटककार आणि कथाकार
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके