डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

"थांबा! तुम्हाला तुमची चूक कळलीय. तुम्ही जर आईकडे, मोकळेपणाने चूक कबूल केलीत, तर आई नक्कीच तुमच्यावर रागावणार नाही." ती मुलं गप्पच होती. माझं म्हणणं त्यांना पटलं होतं, पण...

प्रिय मुलांनो,

अनेक आशीर्वाद.

कालच मी, एका मुलांच्या नाटकाला गेलो होतो. नाटक मुलांचे असल्याने पालक आणि मुलं ह्यांची गडबड धांदल सुरू होती. नाटक सुरू व्हायला तसा थोडा वेळ होता. मी ह्या गडबडीपासून थोडा लांब उभा होतो. शांतपणे सारं पाहत होतो.

इतक्यात दोन मुलं लगबगीने आली. ही मुलं, इतर मुलांपेक्षा कंबरेच्यावर थोडी जाड वाटत होती. मी नीट निरखून पाहिलं. त्या दोघांनी शर्टावर शर्ट घातला होता. म्हणजे पांढऱ्या शर्टावर जाड निळा शर्ट, तिकिटाला रांग होती. ही मुले रांगेत उभं न राहता कुणाला तरी शोधत होती. त्यांची नजर भिरभिरत होती. बहुधा तिकिटं घेऊन त्यांचे आईबाबा किंवा बहीण-भाऊ आले नसावेत. नक्कीच ते त्यांची वाट पाहत होते. त्यातला एक मुलगा तर खूपच भ्यायल्यासारखा दिसत होता. अधूनमधून खिशातला रूमाल काढून तो कपाळावरचा घाम पुसत होता.

क्षणभर मला असंही वाटलं, की एखादवेळेस त्यांच्याकडे तिकिटासाठी पुरेसे पैसे नसतील आणि बहुधा म्हणूनच ते कुणाची तरी वाट पाहत असतील.

मी त्या मुलांजवळ गेलो. त्यांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणालो, "काऽऽय? कुणाची वाट पाहाताय? तिकिटं हवीत का? मी मदत करू?"

माझे बोलणं ऐकण्याआधीच, माझा आवाज ऐकून ती दोघं एकदम दचकली. त्यांनी संशयानेच माझ्याकडे पाहिलं. त्यांनी झटक्यात, माझा खांद्यावरचा हात झटकला आणि ती गर्दीत मिसळून गेली.

तोपर्यंत नाटकाची दुसरी घंटा वाजली. मी काही त्या मुलांना पुन्हा शोधण्याचा प्रयत्न केला नाही. मुलांच्या, पालकांच्या गर्दीतून वाट काढत, मी कशीबशी माझी खुर्ची शोधली. माझ्या बाजूच्या चार-पाच खुर्च्या रिकाम्याच होत्या. अजून खूप मुलं लाह्या, चणे-दाणे, गोळ्या, पेप्सिकोला अशी कुमक खरेदी करून मगच हॉलमध्ये प्रवेश करत होती. काही खादाडखाऊ मुलं तर नाटक सुरू होण्याआधीच वेफर्सचे बकाणे भरत होती. हे सर्व लांबूनच पाहताना, मला मोठी गंमत वाटत होती. इतक्यात तिसरी घंटा झाली, हळूहळू प्रकाश मंद होत गेला आणि गुडूप अंधार झाला. सगळ्यांच्या नजरा बंद पडद्याकडे होत्या. माझ्या बाजूच्या खुर्च्यांवर, तेव्हा थोडासा किलबिलाट झाला. नाटक सुरू झालं. नाटक विनोदी होतं. सगळी मुलं खळखळून हसत होती. भित्रा राक्षस स्टेजवर येताच मुलं टाळ्या वाजवत होती. पण माझ्या बाजूच्या खुर्च्या एकदम शांत! मला वाटलं, इतकी धमाल सुरू आहे, आणि ही मुलं झोपली की काय?

मी अंधारात डोळे मोठे करून, माझ्या बाजूच्या मुलांकडे पाहिले. आणि काय चमत्कार, 'तीच’ ती! शर्टावर शर्ट घातलेली मुलं माझ्या बाजूला, हिरमुसल्या तोंडाने बसली होती. जणू काही त्यांना स्टेजवरचं नाटक दिसतंच नव्हतं. ती ह्या नाटकाला आलीच नव्हती.

सगळी मुलं आता, हसत खिदळत होती, आरडा-ओरडा करत होती, टाळ्या वाजवत होती, खूप खूप आनंदित झाली होती. पण माझ्या बाजूची ती दोन मुलं मात्र, गुळाच्या ढेपेसारखी ढिम्म बसून होती. ती हसत नव्हती. टाळ्या वाजवत नव्हती, आनंदी तर अजिबात दिसत नव्हती. हे पाहून, मुलांनो, मी अस्वस्थ झालो. माझं नाटकावरचं लक्ष उडालं. त्या दोन मुलांच्या काळजीने मी बेजार झालो. मी नाटक जरी पाहत होतो तरी त्या मुलांचाच विचार मनात करत होतो.

थोड्याच वेळात नाटकाचा पहिला अंक संपला. आईस्क्रीम, बटाटेवडे, शेंगा, चणे-दाणे, चॉकलेट इत्यादी घेण्यासाठी मुलांची धावपळ सुरू झाली. नाटक मजेशीर असल्याने, मुलेही खूश दिसत होती.

ती दोन मुलं खुर्चीला चिकटल्यासारखी बसून होती. मी त्यांना बळेबळेच बाहेर नेलं. मी त्यांना म्हणालो, "चला, आपण आता टॉपपैकी आईसक्रीम खाऊ" पण हे ऐकल्यावर त्यांचं तोंड आणखीनच कडवट झालं.

मी त्यांना प्रेमाने जवळ घेऊन विचारलं, का ? तुम्ही असे नाराज का आहात? काय झालं? तुमचं काय बिनसलंय? मला सांगा. मी तुम्हाला नक्की मदत करीन. माझ्यावर विश्वास ठेवा. बाकीची मुलं मजा करत असताना, तुम्ही गप्प राहणं, मला पाहवत नाही. अरे सांगा नं, काय झालं काय? आँ? मला नाही सांगणार?”

मघाशी कपाळावरचा घाम पुसणारा मुलगा रडवेल्या सुरात म्हणाला, "सर.... सर... आम्ही किनई... सर... तर.. पण.... आम्ही ना..." तो बोलताना हुंदके देऊ लागला. मी त्याला जवळ घेत, त्याची पाठ थोपटत म्हणालो, "बोल… बोल.. मोकळेपणाने सांग... मला समजतंय सारं, मी काही रागावणार नाही तुझ्यावर...”

आता त्याची भीती कमी झाली. तो म्हणाला, “सर, आम्ही आईला न सांगताच नाटकाला आलोय. पण सर, आता आम्हाला आईची खूप खूप आठवण येतेय. आम्ही आईला फसवून आलो ह्याची आम्हाला लाज वाटतेय. सर, आमचं चुकलं."

“आणि काय रे? हा शर्टावर शर्ट कशाला?”

"आम्ही शाळेत जातो सांगून शाळेचा शर्ट घातला. आईला समजू नये म्हणून! आणि इथे आल्यावर शर्टावर शर्ट घातला, इकडे कुणाला कळू नये म्हणून!! पण सर, तुम्ही मात्र नेमकं ओळखलंत हं!!!" तो दुसरा मुलगा लाजतच म्हणाला.

"सर आम्ही घरी जातो. आम्हाला इथे थांबायला पण लाज वाटते. प्लीज सर..."

"थांबा! तुम्हाला तुमची चूक कळलीय. तुम्ही जर आईकडे, मोकळेपणाने चूक कबूल केलीत, तर आई नक्कीच तुमच्यावर रागावणार नाही." ती मुलं गप्पच होती. माझं म्हणणं त्यांना पटलं होतं, पण...

मी म्हणालो, "मी फोन करून तुमच्या आईला सांगू का? पण तुम्ही नाटक सोडून जाऊ नका, प्लीज!" मी त्या मुलांकडून त्यांच्या घरचा फोन घेतला. त्यांच्या आईला फोन केला. सारी हकीकत सांगितली. आई, म्हणाली, 'कम्माल आहे. त्यांनी जर सांगितलं असतं, नाटकाला जायचंय तर, मीसुद्धा आले असते. ही मुलं म्हणजे अगदी ग्रेटच आहेत!”
 मग मुलं प्रथम रडत रडत आईशी बोलली आणि नंतर हसत हसत त्यांनी आईचं बोलणं ऐकलं. इतक्यात नाटकाची घंटा वाजली. आम्ही तिघं धावतच आत पळालो.

नाटक पाहताना आता आम्ही सारेच हसत खिदळत होतो. टाळ्या वाजवत होतो.

नाटक तर छान होतंच, पण...

त्याहीपेक्षा मला दोन हसरे मित्र मिळाले म्हणून मी खुशीत होतो. मी हळूच मान वळवून माझ्या मित्रांकडे पाहिलं तर... आँ...! काय चमत्कार!!

त्या दोघांनी ते 'निळे शर्ट' गुंडाळून ठेवून ते बिनधास्तपणे पांढरा शर्ट घालून नाटक पाहत होते. आता त्यांना कुणाची भीती नव्हती!

ते आता निर्भय झाले होते.

होय!

ते माझेच शूर मित्र होते...

अगदी तुमच्यासारखे... हो ना ?

कळावे,
घरच्या सर्वांना नमस्कार.

तुमचा,
राजीवदादा

 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके