डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

दत्तू आणि 10 रुपयांची नोट

मी दत्तोबाला म्हणालो, “दत्तोबा, माझे पैसे मला मिळाले. पैशापेक्षा तुझा प्रामाणिकपणा मला अधिक महत्त्वाचा वाटतो रे! आता माझे ऐक…” असं म्हणत मी त्याचा हात सोडला. त्याला पॉलीश केल्याचे पैसे देण्यासाठी डाव्या खिशात हात घातला, त्याबरोबर तो पळाला. धूम धावत सुटला.

प्रिय मुलांनो,

अनेक आशीर्वाद.

आज मी तुम्हाला हे पत्र लिहीत असताना खूप अस्वस्थ आहे, बेचैन आहे. खरं तर मी आनंदी असायला हवं होतं, कारण मी तुम्हाला माझ्या नवीन मित्राची खरी खरी गोष्ट सांगणार आहे आणि ही गोष्ट वाचून तुम्ही मला पत्रही पाठवणार आहात. कारण ही गोष्ट, नेहमीसारखी नाही.

रविवार दुपारची वेळ. गाड्यांना विशेष गर्दी नव्हती. मी पेपर वाचत, गाडीत बसलो होतो. इतक्यात "साऽऽब बूट पालीऽऽस, 'ओss साऽऽऽब" असा आवाज ऐकला. आवाज ओळखीचा वाटला, म्हणून मी चमकून बघितलं, चुरगळलेले पण स्वच्छ कपडे घातलेला, अस्ताव्यस्त केसांचा टोप घालावा तसे केस, मळका चेहरा, जागरणामुळे किंवा रडल्यामुळे सुजलेले डोळे आणि उजव्या हाताच्या करंगळीजवळ लोंबणारं सहावं बोट. हातात गुंडाळलेली मळकट पिशवी घेऊन तो माझ्याकडे पाहात पुन्हा म्हणाला, "साऽऽब पॉलीऽस?" त्याला कुठंतरी पाहिलंय? मला आठवेना. मी आठवण्याचा प्रयत्न करू लागलो. त्याचा तो विचित्र चिरका आवाज, पोक काढून उभं राहण्याची पद्धत आणि ते उजव्या हाताचं सहावं बोट...? कधी बरं, मी ह्याला भेटलोय? कधी, कुठे ऐकला ह्याचा आवाज? मला काही केल्या आठवेना. उगाच वेळ काढण्यासाठी मी त्याला पॉलीश करायला सांगितलं.

त्याने मन लावून पॉलीश करून, चपला चकचकीत केल्या. मी त्याला पैसे देणार तोच, तो म्हणाला, "भाऊ, पैसे नका देऊ." हे ऐकताच मला आनंद झाला, कारण मी साब चा 'भाऊ' झाला होतो. आणि आश्चर्य वाटलं की, ह्याला माझ्याकडून पैसे का नकोत?

इतक्यात, मला आठवलं की, हा मुलगा पूर्वी गाडीत शेंगदाणे विकत असे. होय नक्कीच. तोच तो! मी त्याला म्हणालो, “ओळखलं तुला तू पूर्वी शेंगदाणे विकायचास ना? काऽय?" हे ऐकल्यावर मात्र तो मुलगा कसनुसा हसला. पॉलीशचं सामान पिशवीत भरत आणि हात पिशवीला पुसत तो म्हणाला, "म्हंजे, तुम्ही नक्कीच ओळखलं मला! माझं नाव दत्तू." तो पुन्हा दीनवाणा हसला.

मी दत्तूच्या खांद्यावर हात ठेवत म्हणालो, “दत्तू मी तुझा आवाज ओळखला पण तुला नीटसं ओळखलं नाही. आणि तू इतकं काम केलंस तरी मी तुला पैसे का द्यायचे नाहीत? हे पण मला कळलं नाही. मला जरा नीट सांग सारं." आम्ही दोघंजणं, मधल्याच कुठल्या तरी स्टेशनला उतरलो. एका बाकावर निवांत बसलो. दत्तू बोलू लागला.

"भाऊ त्या दिवशी संध्याकाळी तुम्ही मला मदत केलीत म्हणून बरं... नाहीतर...!"

(मी दत्तूला कुठली मदत केल्याचं, मला तरी आठवत नव्हतं. पण आधी दत्तूला बोलू द्यावं आणि मग त्याला सांगावं, असं मी ठरवलं. मी दत्तूचं बोलणं शांतपणे ऐकू लागलो.)

त्या दिवशी संध्याकाळी, गाड्यांचे गोंधळ होते. स्टेशनवर प्रचंड गर्दी होती. मी शेंगदाण्याच्या पुड्या विकत होतो. तुम्ही खूप वेळा माझ्याकडून दाणे घेत असत. म्हणून मी आशेने तुमच्याजवळ आलो. पण तुम्ही मानेनेच नाही म्हणून सांगितलं. मला वाईट वाटलं.

मी भांडूपला झोपडपट्टीत राहतो. माझी लहान बहीण आजारी होती. तिला औषध देण्यासाठी मला पैशाची गरज होती. लवकरात लवकर पुड्या विकून मला डॉक्टरकडे जायचं होतं. मी तुमच्या आजूबाजूलाच घोटाळत होतो. मला वाटलं, तुम्हाला माझी दया येईल किंवा तिथेच जवळ पाहून तुम्ही माझ्याकडून दाणे घ्याल. पण छे! तो दिवसच इतका विचित्र होता की, माझ्याकडच्या दाण्याच्या पुडया संपतच नव्हत्या. इतक्यात, घाम पुसण्यासाठी तुम्ही खिशातून रुमाल काढलात आणि त्याचवेळी... तुमच्या खिशातून एक चुरगळलेली दहा रुपयाची नोट खाली पडली. पण ते तुम्हांला कळलं नाही व इतरही कुणाचं लक्ष नव्हतं. मी काहीतरी बहाणा करून, खाली वाकलो, आणि झटकन् ती नोट उचलून खिशात कोंबली.

मी ती नोट, तुम्हांला द्यायला हवी होती... पण... पण तेव्हा मला हवे होते पैसे! मी शेंगदाणे विकले जायची वाट पाहात बसलो नाही. मी तेच ‘पैसे’ घेऊन डॉक्टरकडे गेलो. औषध घेऊन घरी गेलो. वेळेवर औषध मिळाल्याने, माझी बहीण बरी झाली.

"भाऊ, भाऊ मी चोरी नाही केली हो! मी चोर नाही!! तेव्हापासून मी तुम्हांला शोधत होतो. पण..."

मी दत्तूला थोपटत म्हटलं, "अरे तू वेडा का खुळा? माझ्या मनातसुद्धा आलं नाही की, तू चोर आहेस! अरे, तू जर चोर असतास तर तू माझं तोंड चुकवलं असतंस पण तू मोठ्या मनाने माझ्याजवळ आलास, ह्यातच सारं आलं... ते जाऊ दे. दत्तोबा, तू पूर्वीसारखे शेंगदाणे का विकत नाहीस? बूट पॉलीश करून जास्त पैसे मिळतात का?

"नाही... अजिबात नाही!" दत्तू पुन्हा बोलू लागला. “शेंगदाणे खाणारे जास्त आहेत पण पॉलीश करून घेणारे कमी आहेत." आँ! मग... तू..." मी पुढे बोलूच शकलो नाही. त्याने उजव्या हाताने माझा डाव हात धरला. त्याच्या त्या सहाव्या निर्जीव बोटाचा थंड स्पर्श मला झाला. तो ओशाळवाणं हसत बोलू लागला, “मी शेंगदाणे विकू लागलो की, 'ती दहा रुपयाची नोट' मला डोळ्यांसमोर दिसायची. मला कससंच वाटायचं. माझा हिशोबात गोंधळ व्हायचा. आपलं काहीतरी चुकतंय, असंही वाटायचं. भाऊ , तुम्हांला भेटून, तुमची माफी मागावी आणि मगच शेंगदाणे विकावेत असं मी ठरवलं. भाऊ... भाऊ... तुमचे पैसे मी तुम्हांला आठ दिवसांत परत करीन पण... पण.... मला माफ करा भाऊ.. खरंच खरंच मी चोर नाही हो...!"

दत्तोबा हमसाहमसी रडू लागला. मी त्याचा हात घट्ट धरून ठेवला. तो रडताना थरथरत होता.

(मुलांनो, अगदी खरं सांगतो, दत्तोबाचा काहीतरी घोटाळा झाला होता. मी रुमाल उजव्या खिशात ठेवतो. पण त्या खिशात कधीच पैसे ठेवत नाही. पण हे जर का मी दत्तोबाला सांगितलं असतं तर, तो पुन्हा स्वतःला अपराधी समजत, कमी पैसे मिळत असून बूटपॉलीश करत राहिला असता. म्हणून मी त्याला काही बोललो नाही.) (आणि मुलांनो, तुम्हांलाही जर का हा सहा बोटवाला दत्तोबा दिसला तर तुम्हीही त्याला काही सांगू नका.)

मी दत्तोबाला म्हणालो, “दत्तोबा, माझे पैसे मला मिळाले. पैशापेक्षा तुझा प्रामाणिकपणा मला अधिक महत्त्वाचा वाटतो रे! आता माझे ऐक…” असं म्हणत मी त्याचा हात सोडला. त्याला पॉलीश केल्याचे पैसे देण्यासाठी डाव्या खिशात हात घातला, त्याबरोबर तो पळाला. धूम धावत सुटला.

लांबूनच ओरडून म्हणाला, “आठ दिवसांनी भेटतो भाऊ.” आणि तो दिसेनासा झाला.

दत्तोबा मला आठ दिवसांनी भेटेल. मी त्याला काय सांगू? त्याची समजूत कशी काढू? मुलांनो मला मदत कराल?
मी तुमच्या पत्राची वाट पाहतोय.

कळावे,
घरच्या सर्वांना नमस्कार.

तुमचा,
राजीवदादा

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके