डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

ही आहे, बरोबर एक आठवड्यापूर्वीची गोष्ट. मी वर्गात गेलो तर, (ठरवल्याप्रमाणे) सगळी मुले म्हणाली, “आज काहीतरी वेगळं करू या.” मी म्हणालो, "ठीकाय. चला आपण ठरवू या, काय वेगळे करू या?”

प्रिय मुलांनो,

अनेक आशीर्वाद.

ही आहे, बरोबर एक आठवड्यापूर्वीची गोष्ट. मी वर्गात गेलो तर, (ठरवल्याप्रमाणे) सगळी मुले म्हणाली, “आज काहीतरी वेगळं करू या.” मी म्हणालो, "ठीकाय. चला आपण ठरवू या, काय वेगळे करू या?”

मुलांनी पुढील गोष्टी सुचवल्या.

० गणिताचे खेळ खेळू या.
भाषेचे खेळ खेळू या.

০ विज्ञानाचे प्रयोग करू या.
भटकायला जाऊ या.
गप्पा मारू या.
० चित्र काढू या.

मग, सगळ्यांच्या मते, 'भटकायला जाऊ या' असं ठरलं. वर्गातल्या मुलांचे चार गट केले. प्रत्येक गटाने, एकेका विषयावर, व्यवस्थित माहिती मिळवायची असं ठरलं.
आम्ही सर्वजण नदीकडे जाऊ लागलो.

वाटेत एसटीच्या विनंती थांब्याजवळ दोन माणसं बसली होती. बारीक केस, आकडेबाज मिशा, कपाळावर टिळा, चपटे कान आणि तब्येतीने आडदांड, त्यांतल्या एकाच्या पुढयात मोठा ढोल होता आणि दुसऱ्याच्या हातात, ढोल बडवायच्या छोट्या पण मजबूत काठ्या. हे दोघेजण नक्कीच आमच्या गावातले नव्हते.

गट एकचा, गटनायक शिवाजी म्हणाला, “सर, आम्ही या दोघांशी गप्पा मारतो. नवीन माहिती टिपून घेतो.” गट एक, ढोलवाले काकांकडे रवाना झाला.

एस.टी. कधी येणार, या चिंतेत असणाऱ्या त्या ढोलवाले काकांना, अचानक मुलांचा गराडा पडल्याने, क्षणभर काका भांबावून गेले. पण नंतर त्यांचे मुलांशी सूर जुळले. एक गट ढोलवाले काकांशी गप्पा मारत थांबला. आम्ही पुढे निघालो.

पुढच्याच वळणावर, आम्हाला भेटल्या गावाच्या सरपंच, मीनाताई. शाळा सोडून भटकणारी मुलं पाहिल्यावर त्या तिथेच थांबल्या. अचानक शाळा का सुटली? त्या विचारात पडल्या.

गट क्रमांक दोनची गटनायिका आशाने, मीनाताईंना आमचा कार्यक्रम सांगितला. आशा, मीनाताईशी बोलत असतानाच गट क्रमांक चारची गटनायिका शिल्पा म्हणाली, “मीनाताई, तुम्हाला थोडासा वेळ आहे का? आम्हाला तुमच्याशी गप्पा मारायच्या आहेत. सरपंच म्हणून तुम्ही काय-काय काम करता? ग्रामपंचायतीमध्ये आणखी कोणकोण असतं? तुम्हाला कोण मदत करतं? आमच्या शाळेची गावाला काय मदत होऊ शकते?...”

शिल्पाला थोपवत आणि तिला खांद्यावर थोपटत मीनाताई म्हणाल्या, “अगं हो, हां... सगळं सांगीन, पण मला बोलू दिलंस तरच ना? चला घराकडे, मग निवांत बोलू.” आम्ही पुलाच्या बाजूने नदीजवळ उतरू लागलो. नदीला फारसं पाणी नव्हतं. सकाळचे अकरा वाजले होते. लांबवर नदीच्या पात्रात एक ऑटो रिक्षा आणि एक टेम्पो उभे होते. गटनायिका आशा आणि गटनायक गणेश म्हणाले, आम्ही तिथेच जातो. इतक्यात आम्हाला खिशाला पितळी बिल्ला लावलेले, रिक्षावालेकाकाच भेटले. आमचा प्लॅन ऐकून ते म्हणाले, “माझी रिक्षा चालते पेट्रोलवर पण तो टॅम्पो चालतो डिझेलवर. मग दोघांत फरक आहे की नाही?” आम्ही मान डोलवली.

ते म्हणाले, “चालवताना माझ्या हातांत असतं हँडल आणि त्यांच्या हातांत असतं चाक! मग दोघात फरक आहे की नाही?” आम्ही मान डोलावली. आशा चटकन म्हणाली, “पण काका, रिक्षा आणि टेम्पोचा ब्रेक लावतात पायाने. मग दोघांत फरक आहे की नाही?”

आता रिक्षावाले काकांनी मान डोलावली आणि हसत हसत मान डोलवत ते म्हणाले, “चला तर, आमच्या गाडीजवळ. सगळ्या गमतीजमती तुम्हाला नीट दाखवतो. पण दोन्ही ठिकाणी मुख्य फरक कुठला, ते तुम्हीच ओळखायचं! कपाळावर आठ्या घालत मोहन म्हणाला, “पण ते कसं काय?”

रिक्षावाले काका खळखळून हसत म्हणाले, “कसं म्हणजे? मला हजार प्रश्न विचारून! काऽय?” गट दोन आणि तीनने; रिक्षा आणि टेम्पोला वेढाच घातला आणि प्रश्नांच्या तोफा सुरू झाल्या.

दोन-तीन तासांत आमच्याकडे भरपूर माहिती गोळा झाली. प्रत्येक गटाने सविस्तर चर्चा करून माहिती व्यवस्थित लिहून काढली. वर्गात मोठ्याने वाचून दाखविली. शंका असणाऱ्या मुलांनी प्रश्न विचारले. मुलांनीच त्यांना उत्तरं दिली. मुले आनंदाने घरी गेली.

तुम्हाला काय वाटतं? असं काही वेगळं करताना, आमची मुलं काही शिकली? की नुसतीच भटकली? मला कळवाल? मी तुमच्या ‘शिकाऊ पत्रांची’ वाट पाहतोय.
कळावे.

घरच्या सर्वांना नमस्कार.

तुमचा,
राजीवदादा 

'बालसाधनाची' सर्व चित्रे : गिरीष सहस्रबुद्धे

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके