डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

चमत्कार नंबर शेवटचा! सर्व पालक म्हणू लागले, “व्वा! व्वा व्वा!! मुलांनी काय हुबेहूब चित्रं काढली आहेत! कम्माल आहे! आम्हांला आधी कसं नाही ओळखता आलं? खरंच, मुलांना ओळखण्यात आमची जरा चूकच झाली आणि...”

प्रिय मुलांनो,

अनेक आशीर्वाद.

चांगलं चित्र काढणं किंवा हुबेहूब चित्र काढणं, तसं कठीणच असतं. म्हणजे जसं पाहून लिहिता येतं, तसं पाहून चित्र काही काढता येत नाही. आणि जसं पाहिलं तसं चित्र तर नाहीच नाही! असं मला वाटायचं. पण आमच्या वर्गात आणि आमच्या शाळेत अशा काही घटना घडल्या; चमत्कार झाले, की मला माझं मत बदलावंच लागलं.

त्या चित्र चमत्कारांची, चमत्कारिक गोष्टच तुम्हांला सांगतो. एकदा आम्ही वर्गात, एकमेकांची चित्र काढण्याचा कार्यक्रम केला.

म्हणजे अशोकने काढायचं शिल्पाचं चित्र; आणि शिल्पाने काढायचं अशोकचं चित्र. शिल्पा चित्र काढेल तेव्हा अशोकने पुतळ्यासारखं बसून राहायचं. अशोकच्या नाकावर माशी बसली तर ती शिल्पानेच उडवायची. आणि अशोकला जर तहान लागली तर शिल्पानेच... पाणी आणून द्यायचं. अशा प्रकारे दोन-तीन दिवसांत वर्गातील सर्व सत्तावीस 'पुतळ्यां'ची चित्रं काढून झाली. आणि शनिवारी शाळा सुटल्यावर, आम्ही शाळेत चित्रप्रदर्शन भरवलं, त्याचं नाव होतं, ‘आमचा वर्ग.’ आमचा वर्ग' प्रदर्शन पाहण्यासाठी सर्व पालकांना आमंत्रित केलं होतं. प्रदर्शनात ज्यांची चित्रं टांगली आहेत आणि ज्यांनी चित्र काढली आहेत, असे सत्तावीस सजीव पुतळे इकडे-तिकडे वावरत होते.

प्रदर्शन तसं विनोदीच होतं. पण पालकांनी धमालच केली. काही पालकांनी माझ्याकडे तक्रारी केल्या की, “आमच्या मुलाचं चित्र तर कुठेच दिसत नाही.”

काही पालक कटकट करत म्हणाले, “हे काय? ही कुठल्या वर्गातली मुलं? चुकून दुसऱ्या वर्गातील चित्रं तर इथे नाही ना आणली?” एक हुशार पालक म्हणाले, “व्वा! काय सुंदर चित्रं आहेत! चित्र काढायला, तुम्ही तर नाही ना मदत केली?”

मी सर्व पालकांना हात जोडून म्हणालो, “हे पाहा, वर्गातील मुलांनी, एकमेकांची काढलेली ही चित्रं आहेत! या चित्रातील चुका शोधण्यासाठी काही तुम्हाला बोलावलेलं नाही. मुलांचे कौतुक करण्यासाठी, त्यांच्या चित्रांतील वेगळेपणा जाणून घेण्यासाठी, तुम्हांला इथं आमंत्रित केलं आहे.”

आणि पहिला चमत्कार झाला!
काही पालक म्हणाले, “चला आपण शोधू या चित्रातला आणि वर्गातला मुलगा! जो जास्ती शोधेल त्याला बक्षीस.” आता पालक, मुलांचे चेहरे आणि चित्र जरा बारकाईने पाहू लागले. काहीजण, चित्राच्या बाजूला मुलांना उभे करून, आळीपाळीने कधी चित्रांकडे तर कधी मुलांकडे पाहू लागले.

मुलं मात्र खुसूखुसू हसत होती. कारण भलत्याच चित्राच्या बाजूला भलत्याच मुलाला उभं करून, पालकांचे बारीक निरीक्षण सुरू होतं.

काही पालक हात वर करून उगाचंच ओरडत होते, “मिळाला.... मिळाला चित्रातला मुलगा मिळाला... तो पाहा... तो दाराजवळचा मुलगा आणि हे त्याचं चित्र.... वॉव! काय हुबेहूब काढलंय!... अगदी डोळे बंद करूनसुद्धा ओळखता येईल!!!”

एका खाष्ट पालकाने तर महागंमतच केली. मला तक्रारीच्या सुरात म्हणाले, “काय हो एकाच मुलाची दोन दोन चित्रं कशी काय?” मी फक्त भुवया उंचावल्या, त्यावर ते श्रीयुत खाष्ट म्हणाले, “त्या... त्या खिडकीजवळच्या मुलाची दोन-दोन चित्रं आहेत...”

त्यावर करवादून बाजूचे पालक म्हणाले, “अहो तोंड सांभाळून बोला. तो माझाच मुलगा आहे आणि त्याचं फक्त एकच चित्र आहे!”

कुठल्या मुलाचं कुठलं चित्र? याबाबत आता मस्तच गोंधळ सुरू झाला. आणि चमत्कार नंबर दोन झाला! सगळी मुलं आपापल्या चित्राच्या बाजूला जाऊन उभी राहिली.

चमत्कार नंबर शेवटचा! सर्व पालक म्हणू लागले, “व्वा! व्वा व्वा!! मुलांनी काय हुबेहूब चित्रं काढली आहेत! कम्माल आहे! आम्हांला आधी कसं नाही ओळखता आलं? खरंच, मुलांना ओळखण्यात आमची जरा चूकच झाली आणि...”

चमत्कार नंबर सर्वांत शेवटचा!!
पालक उत्स्फूर्तपणे म्हणाले, “आमची पण चित्रं काढतील का, हे महान चित्रकार?”
आणि थोड्याच वेळात... पालकांचे पुतळे झाले...
महान चित्रकार चित्र काढू लागले!! आता, आमच्या शाळेत, पुढचं प्रदर्शन कुठचं असेल आणि त्याचं नाव काय असेल, हे तुम्ही ओळखलंच असेल. आणि हे असं प्रदर्शन, तुम्ही कुठे-कुठे भरवू शकाल? हे मला कळवू शकाल? मी तुमच्या ‘प्रदर्शन पत्रांची’ वाट पाहतो आहे.

कळावे,
घरच्या सर्वांना नमस्कार.

तुमचा,
राजीवदादा

Tags: साहित्य बालवाङ्मय बालसाहित्य राजीव तांबे बाल साधना baalsadhana weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके