डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

ही मुलं अशी का वागतात?
जिवावर उदार का होतात?
आपल्या आई-वडिलांना आपलं असं वागणं, समजलं तर...?

प्रिय मुलांनो,

अनेक आशीर्वाद.

आज तुम्हाला पत्र लिहिताना, माझं मन भरून आलंय. खूप वेगळा प्रसंग, तुम्हाला सांगणार आहे. आणि हे पत्र वाचल्यानंतर, मला तुमची थोडी मदत हवी आहे.

रविवारची सकाळ. मी घाईघाईत रेल्वेस्टेशनवर आलो. स्टेशनात खूप गर्दी. गाड्यांचा गोंधळ होता. फलाट माणसांनी खचाखच भरला होता. इतक्यात गाडी आली. माणसं दारातून बाहेर उतू जात होती. गाडीत चढणं शक्यच नव्हतं. आणि मला मुंबईला जाणं तर आवश्यकच होतं. काय करावं? मला समजेना.

माझ्या बाजूला एक कॉलेजचा मुलगा उभा होता. त्याने निळ्या रंगाचा रेघारेघांचा शर्ट आणि काळी पँट घातली होती. पाठीवर पुस्तकांची पिशवी होती. तशाच रंगाचा शर्ट घातलेला पण पांढरी पँट घातलेला आणखी एक मुलगा तिथे आला. दोघांनी एकमेकांना टाळी दिली. 

आणि काय होतंय हे समजायच्या आतच, ती दोघं पटकन गाडीच्या खिडकीवर चढली. एक पाय खिडकीवर ठेवून ती चटकन गाडीच्या टपावर बसली. आणि गाडी सुरू झाली.

गाडी सुरू होताच, त्यातल्या एका मुलाने खिशातून फणी काढली आणि तो ऐटीत केस विंचरू लागला! 'काय पण मूर्ख मुलगा आहे', असा बहुधा मनात विचार करत, फलाटावरची माणसं, त्या दोघांकडे पाहात होती. 

तर,

'काय पण बावळट माणसं आहेत, साधी गाडी पकडता येत नाही', असा बहुधा मनात विचार करत, ती दोघं आमच्याकडे पाहात होती.

गाडी लांब निघून गेली, तरी माझ्या डोक्यात त्या मुलांचे विचार होते.

ही मुलं अशी का वागतात?

जिवावर उदार का होतात?

आपल्या आई-वडिलांना आपलं असं वागणं, समजलं तर...?

ती हा वेडेपणा करत आहेत, हे त्यांना माहीत आहे का?

आपली एखादी लहानशी चूक झाली तर त्याने आपल्याला जन्माचं अपंगत्व येईल, हे त्यांना नक्कीच माहीत असणार!

काय बरं कारण असेल, ह्या त्यांच्या वागण्याचं? 

मी फार बेचैन झालो होतो.

ह्या विचारात किती वेळ गेला कुणास ठाऊक!

इतक्यात आणखी एक गाडी आली. गर्दीमुळे मी आपोआप गाडीत ढकलला गेलो. प्रत्येक स्टेशनवर गर्दी

वाढतच होती. 

मी कसाबसा स्टेशनवर उतरलो.

घामाने भिजलो होतो. कपडे चुरगळले होते. केस विस्कटले होते. तहान लागली होती. मी चहा घ्यायला निघालो.

कैंटीनच्या बाजूला मोठा घोळका उभा होता. सगळी माणसं वाकून वाकून पहात होती. बऱ्यापैकी गर्दी होती. 

गर्दी पाहिल्यावर मी दोन पावलं दूरच गेलो.

पण का कुणास ठाऊक, क्षणभर मनात विचार आला,

'जरा, सहज डोकावून तर पाहू. एखादवेळेस 'तो' तर नसेल?'

मी गर्दीत डोकावलो. आणि, माझा अंदाज खरा ठरला! निळ्या रंगाचा, रेघारेघांचा शर्ट घातलेला मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. मी एकदम पुढे झालो, म्हणालो, "दुसरा मुलगा कुठाय? कुठे गेला तो?" एकदम गर्दी बाजूला झाली. माझ्याकडे पाहू लागली. त्या पडलेल्या मुलाने डोळे उघडले, तो अस्पष्टपणे काहीतरी पुटपुटला. इतक्यात कुणीतरी पाणी आणलं. त्याला कुणीतरी आधार देऊन बाकावर बसवलं, त्याचं डोकं फुटलं होतं! त्यातून रक्त भळभळत होतं !!

कँटीनमधून हळद आणली. दोघा-तिघांनी आपापले रुमाल दिले. ते एकत्र करून डोक्यावर घट्ट बांधले.कॅटीनवाला चहा घेऊन आला, तेव्हा तो जखमी मुलगा खूप ओशाळला होता. 

कैंटीनवाल्याच्या नजरेला नजर देण्याची हिंमत त्या 'शूर मुलात' नव्हती. खाली मान घालून त्याने चहाचा कप घेतला. निमूटपणे चहा पिऊन कप रिकामा केला. त्याचे डोळे पाणावले होते. मी हा प्रकार बारकाईने पाहात होतो. त्याने डोळे टिपले.

मी त्याच्या जवळ गेलो, म्हणालो, 'चल, आपण दोघे तुझ्या घरी जाऊ. मला तुझ्याशी मैत्री करायला आवडेल.'

तो कसनुसा हसला. मी त्याला आधार देत उठवलं. त्याने अवघडून माझ्या खांद्यावर हात ठेवला. तो मला म्हणाला.... मुलांनो, तो मला काय म्हणाला असेल? सांगाल तुम्ही? मी त्या मुलाला काय विचारलं असेल? ओळखाल तुम्ही?

आणि, तो मुलगा, म्हणजे, परेश वाघमारे, पुन्हा रेल्वेच्या टपावरून प्रवास करील, असं वाटतं तुम्हांला? मी तुमच्या मित्र पत्राची वाट पाहतोय.

कळावे.

घरच्यांना नमस्कार सांगा.

तुमचा,
राजीवदादा

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके