डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

साधनाच्या सर्व स्तरांतील वाचकांच्या आग्रही मागणीने या वर्षी दर महिन्यातून दोन वेळा, दोन पाने ‘बालसाधना' सुरू करीत आहोत.

प्रिय मुलांनो,
अनेक आशीर्वाद.
      आपण आता नियमित भेटणार आहोत. एकमेकांशी गप्पा मारणार आहोत. आणि गप्पा म्हणजे, मी बोलत रहायचं अन् तुम्ही फक्त ऐकत रहायचं असं अजिबात नव्हे! गप्पा म्हणजे दोघांनी बोलायचं, दोघांनी ऐकायचं, आलटून-पालटून! गप्पा मारायच्या बिनधास्तपणे, निवांतपणे, सुशेगाद, मस्त आरामात. पण… ‘टाइमपास’ करण्यासाठी मात्र आपण गप्पा मारणार नाही. आपण जे पहातो, वाचतो, ऐकतो, अनुभवतो. जे सांगावंसं वाटतं, ते जाणून घ्यावंसं वाटतं आणि जे कळतंय पण कळत नाही; असं वाटतं- अशा आणि अशा प्रकारच्या गोष्टींवर आपण गप्पा मारणार आहोत.

 गप्पांचाच विषय निघाला म्हणून अगदी चार-पाच दिवसांपूर्वीच घडलेली गोष्ट सांगतो. सोलापूरहून मुंबईला चाललो होतो. पहाटे पावणेपाच वाजता एस.टी. पुण्याला थांबली. मस्त गारेगार थंडी. आम्ही पाच-सहा माणसंच खाली उतरलो होतो. दोन्ही हात पॅन्टीच्या खिशात घालून आणि अंग आखडून आम्ही इकडे-तिकडे पहात होतो. सगळ्यांना हवा होता गरमागरम चहा. एका चहाच्या टपरीला नुकतीच जाग येत होती. मालक उठला होता. पाणी भरत होता. आम्ही सगळे यंत्रवत सरकत टपरीजवळ नकळत सगळे गेलो अन् एकदम म्हणालो, ‘‘चहा.’’ तो मालक आमच्यावर खेकसून म्हणाला, ‘‘थांबा, अजून पूजा झाली नाय. आनी सगळे कशाला ओरडताय् ‘चहा...चहा?" तो आमच्यावर चांगलाच डाफरला. सकाळी सकाळी वाद नको म्हणून आम्ही गप्प बसलो. (खरं कारण, चहा हवा होता म्हणून गप्प बसलो.) मालकराव आमच्याकडे पहात, रागाने डोळे फिरवत काहीतरी पुटपुटत होता. ‘‘चक्रमच दिसतोय!" असं मनात म्हणत आम्ही चार पावलं मागे सरकलो, आमच्यातल्या एकाने ग्लासमर पाणी घेतलं. तोंडात खुळखुळवलं आणि आता तो चूळ टाकणार… इतक्यात मालकराव पुन्हा तडतडले, ‘‘ओ सायेब, हितं पानी टाकू नका. दिसत नाय? लहान पोर झोपलंय हितं? कमाल हाय तुमची.’’ आम्ही सगळ्यांनी दचकून, अंधारात डोळे फाडून पाहिले खरंच की! काळंकिट्ट गोणपाट पांघरून एक मुलगा झोपला होता. मालकराव त्या मुलाजवळ गेले. अतिशय प्रेमळपणे म्हणाले, ‘‘उठ बाळ. पाच वाजायला आले. एव्हढा च्या झाला की तुझं आंघुळीचं पाणी ठिवतो.’’ मुलगा टुणकन उठला. गोणपाटाची घडी करून त्याने टपरीच्या टपावर ठेवली. मला गंमत वाटली. आमच्यावर डाफरणारा, खेकसणारा हा मालकराव, त्या मुलाशी मात्र अगदी प्रेमाने बोलत होता!! शक्यतो असं होत नाही. 

'खेकसू’ माणसं सगळ्यांवरच खेकसत असतात. कोण असेल हा मुलगा? मालकराव इतके प्रेमाने का वागतात? हा त्यांचाच मुलगा असेल का ? हा शाळेत जात असेल का? असे वेगवेगळे प्रश्न माझ्या डोक्यात फिरू लागले. या प्रश्नांची उत्तरं तर शोधलीच पाहिजेत. यावर उपाय एकच! मालकरावांच्या नकळत या मुलाशी गप्पा मारणं. त्या मुलाचे कपड़े चांगले-बिंगले होते. निळी टेरीलिनची पेंट आणि पिवळा शर्ट. लग्ना-बिग्नाला जाताना घालतात ना, तसे चांगले कपडे होते त्याचे. पण खूप दिवसांत न धुतल्याने मळलेले. बारीक कापलेले केस. तरतरीत नाक.  बोलके पण कायरेबावरे डोळे. मी जवळ गेलो. त्याच्या खांद्यावर हात ठेवला... भूत पाहिल्यासारखा तो दचकला! संशयाने माझ्याकडे पाहू लागला. त्याच्या शरीरातील भीतीची थरथर मला जाणवली. ‘‘काय नाव तुझं?’’ असं मी विचारलं. पण त्याच्या तोंडून शब्दच फुटेना. नुकताच झोपून उठलाय. थंडीने गारठला असेल, अजून झोपेत असेल म्हणून चटकन बोलत नसेल असं आधी मला वाटलं. पण कारण वेगळंच होतं. इतक्यात मालकराव खेकसले, ‘‘सायेव च्या.’’  

इथं चहा मिळतो असं कळल्यावर ड्रायव्हर आणि प्रवासी सगळेच चहा प्यायला आले. तो मुलगा तोंड धुवायला सार्वजनिक नळाकडे निघाला आणि मला पाहताच तो थबकला. मी मोकळेपणाने हसलो. तो कसनुसा हसला! त्याच्या पाठोपाठ मी. प्रथम तो माझ्याशी अजिबात बोलायला तयार नव्हता. पण मी बोलू लागलो आणि तो नकळत गप्पांत अडकलाच. त्याचे नाव, दीपक चुंबळे. वय वर्षे अकरा. घरची परिस्थिती बरी आहे. चांगली शेती आहे. मला एक लहान बहीण आणि एक मोठा भाऊ, मी त्याला दादा म्हणतो. माझी, दादासोबत रोज भांडणं व्हायची. त्या भांडणांचा आईला खूप त्रास व्हायचा. पण त्यामुळे आमची भांडणं काही कमी झाली नाहीत. आठ दिवस झाले. मामाच्या गावाला जात असताना, खिडकीत कुणी बसायचं यावरून आम्हां दोघांत खूप भांडण झालं. मी त्याचा शर्ट ओढला, तो फाटला! आईने आम्हां दोघांना धपाटे दिले आणि म्हणाली, ‘‘चालता हो!" मी रागाच्या भरात चालता झालो आणि इकडे आलो. आज वाईट वाटतं. आईची आठवण येते. घराची आठवण येते. शाळेची, शाळेतल्या मित्रांची आठवण येते. पण.... पण... मला घरी परत जायला भीती वाटते. लाज वाटते. मी परत गेलो तर बाबा मला बेदम मारतील. आणि... सगळे मित्र, आजूबाजूचे मला हसतील, चिडवतील. आणि इथं राहिलं तर मला आईची, घराची, शाळेची आठवण येते हो! मी काय करू काका? मला काहीच कळत नाही हो!! दीपकला पुढे बोलताही येईना. तो हूंदके देऊ लागला. मी त्याला हलकेच थोपटलं. 

प्रिय मुलांनो, मला तुमची मदत हवी आहे. समजा, तुमचाच एखादा मित्र घर सोडून पळून गेला. त्याला त्याची चूक समजली आणि तो परत आला, तर तुम्ही त्याला चिडवाल? हसाल? का त्याला समजून घ्याल? त्याच्याशी दोस्ती कराल ? मी पुढच्या आठवड्यात, दीपकच्या वडिलांना भेटणार आहे. मी दीपकच्या वडिलांना काय सांगू? त्याच्या दादाला काय सांगू? मला मदत कराल? मी तुमच्या ‘मित्र पत्रां’ची वाट पहातो आहे. 
कळावे,
घरच्या सर्वांना नमस्कार सांगा.

तुमचा, राजीवदादा.
 

Tags: समजलेली चूक घरातून पळालेला मुलगा राजीवदादा गप्पाटप्पा misunderstanding a boy away from home rajeevdada chating weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके