देवा-धर्माच्या नावावर पैसा खर्च करण्याचे काहीच वाटत नाही. आपापल्या धार्मिक रूढी-परंपरेनुसार प्रत्येक व्यक्ती श्रद्धा जोपासत असते. श्रद्धा ही फार मोठी इबादत आहे. मानसिक सुख-समाधानाचे ते जीवनसत्त्व आहे, जे बाजारात किंवा मेडिकलमध्ये कोठेच विकत मिळत नाही. मात्र आपल्या श्रद्धेचे कोणी धार्मिक भांडवल करून समाजात अंधश्रद्धा पसरवीत असेल तर या गैरप्रकाराला वेळीच आळा घातला पाहिजे. कारण समाजात वाढत चाललेली अंधश्रद्धा ही मानवनिर्मित समस्या आहे. जगातील कोणतीही मानवनिर्मित समस्या कायद्याने किंवा शिक्षणाने सुटणारी नाही. त्यासाठी गरज आहे ती वैज्ञानिक दृष्टिकोनाची आणि सकारात्मक विचारशैलीची. समाजाला विकासाच्या प्रवाहात आणणे; समाजाची या गैरप्रकारातून मुक्तता करणे यासाठी प्रबोधन इबादतीपेक्षा कमी नाही.
समाजातील उपेक्षित घटकांकरिता कामे करीत असताना आमच्या मायभगिनी अनेक किस्से सांगतात. या महिन्यात मला दोन किस्से अनुभवायला मिळाले. पहिला किस्सा अपत्यप्रेमाचा....
समाजात एक बोंब उठवली गेली, ज्यांना केवळ एकच मुलगा आहे, त्यांच्याकरिता येणारे 2008 साल अतिशय वाईट आहे. यावर उपाय म्हणून सात घरचे सात रुपये जमा करायचे आणि त्याच्या काचेच्या बांगड्या मातेने हातात घालायच्या. फक्त त्या बांगड्यांचा रंग लाल किंवा हिरवा असावा. या अंधश्रद्धेतून आलेल्या विचाराचा परिणाम असा झाला : गोर-गरीब, श्रीमंत, निरक्षर, साक्षर अशा सर्वच मातांनी-ज्यांना एकच मुलगा आहे अशांनी हा प्रयोग केला. वैज्ञानिक भाषेत जरी आपण प्रयोग शब्द वापरत असलो तरी अंधश्रद्धेच्या व्यासपीठावर याला ठुमका म्हणतात.
आपल्याला सहज असा प्रश्न पडतो; श्रीमंतांच्या बंगल्यात ही गोष्ट पोहोचली कशी? तर कामवालीच्या माध्यमातून. अपत्यप्रेमापोटी घरातील मंडळी असा विचार करतात की सात घराचे सात रुपये मागून बांगड्या घालण्याने फायदा जरी झाला नाही, तरी नुकसान मात्र काहीच होणार नाही आणि अंधश्रद्धेची ही जाहिरात फेस टू फेस अॅन्ड माऊथ टू माऊथ या प्रकारात मोडते. याचे समीकरण अगदी साधे आहे. सात घरचे सात रुपये जेव्हा महिला मागायला जाते, म्हणजे प्रत्येक घरचा एक रुपया तेव्हा त्या एक रुपयाची देवाण-घेवाण करताना लाल-हिरव्या बांगड्यांची जाहिरात सहज नि फुकटात होते. माझ्यासारखी चिकित्सक बाई अनेक प्रश्न विचारते, ‘त्या एकुलत्या एका बाळाला जन्मदात्री नसेल तर? किंवा जेथे एकटा मुलगा नाही; मात्र एकटी मुलगीच आहे, तेथेदेखील 2008 वर्ष बाळासाठी धोक्याचे आहे काय?’ या प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे नसते.
यामागील वास्तव असे आहे, की सगळीकडेच फॅशनच्या बांगड्या घालण्याचे फॅड आलेले आहे. त्यामुळे प्लेन लाल-हिरव्या बांगड्या तशाच दुकानदाराकडे पडून आहेत. खूप दिवस पडून असलेल्या साड्यांचा जसा सेल लावला जातो; तसा लाल-हिरव्या बांगड्याचा या अफवेमुळे चांगलाच सेल होत आहे. कारण ही अफवा नातेवाईकांच्या माध्यमातून एका राज्यातून, दुसऱ्या राज्यात रातोरात पोहोचली आहे. कारण ज्यांना केवळ एकच मुलगा आहे, अशा दांपत्यांची संख्या भारतात करोडोंच्या वरती आहे.
हा अंधश्रद्धेचा विचार मांडणारे हेदेखील भान विसरतात, की आपण कुणासोबत नि कुणाशी बोलत आहोत, माझा नेहमी संपर्क मीडियाशी येतो. ती वृत्तपत्रे असोत अथवा केबल वाहिन्या. या अंधश्रद्धेच्या विचाराचे प्रचारकर्ते मला म्हणाले, ‘पेपरामंधी बी ही बातमी आली नि रजियाबाई टीव्हीमंधी बी दाखवलं.’ मी त्यांना म्हणाले, ‘कोणत्या पेपरात आले ते मला आणून दाखवा.’ अजूनपर्यंत या आशयाची बातमी मला कोणीच आणून दिली नाही. मात्र प्रचार इतका उघडपणे नि सफाईदारपणे केला जातो की, आता हिरव्या प्लेन बांगड्या संपून गेल्या आहेत. जाहिरात मात्र तशीच चालू आहे.
दुसरी एक अंधश्रद्धा म्हणजे बकरी ईदला विकल्या गेलेल्या साडेपाच कोटींच्या बकऱ्याची. बकरी ईद आली, की भारतात सर्वांत जास्त बकरे कुर्बानीकरिता विकले जातात. बकरे विकत घेणारे जरी मुस्लिम असले तरी त्यांना भरमसाठ पैशात विकणारे जास्त प्रमाणात हिंदू असतात. त्यांना मुस्लिमांची धार्मिक मानसिकता माहीत असते त्यामुळे ते कुर्बानीला विकल्या जाणाऱ्या बोकडाच्या अंगावर कधी ‘अल्लाह’, तर कधी ‘महंमद’ तर कधी ‘पैगंबर’ असे कोरीव स्वरूपात उर्दू, अरबीत लिहितात. माणसांच्या अंगावर ज्याप्रमाणे गोंदले जाते, अगदी त्याचप्रमाणे जनावरांच्या कातडीवर केस सरकुन लिहिले जाते.
मुळातच उर्दू, अरबी भाषा ही कमी जागेत मावणारी आणि नक्षीदार आहे. आपण रांगोळी काढतो; त्याचप्रमाणे आडव्या-उभ्या रेषेत ही भाषा लिहिली जाते. शब्दाचा खूप पसारा यात नसतो. या बकरी ईदला मुंबईच्या महंमद फहीम यांनी आपला बकरा 5 कोटी 51 लाख रुपयांना 786 रुपये देऊन विकत आणला. याचे खास वैशिष्ट्य म्हणजे बकऱ्याच्या अंगावर ‘प्रेषित’ हा शब्द कोरल्याची श्रद्धा फहीम यांच्या मनात आहे; तसेच त्याच्या कानाच्या खालच्या बाजूस ‘मक्का’ कोरलेले आहे, असे त्यांना वाटते. हा प्रकार श्रद्धेचा की अंधश्रद्धेचा, हा भाग सोडला तर बकरी ईदनिमित्ताने होणाऱ्या बकऱ्याच्या खरेदी-विक्री व्यवसायाला काही खास जनावरे लोक आपल्या हाताने धार्मिक आशयाचे वाक्य लिहून आणतात.दोन पैसे जास्त भेटावेत म्हणून ‘आयात’ आणि पैगंबराचा वापर चालू आहे. मात्र कोणीही या गैरप्रकाराकडे चिकित्सक दृष्टीने बघायला तयार नाही. जर हे सगळे अंगावरचे लिखाण सत्य आणि कुदरती असते तर त्याचा फार मोठा बागुलबुवा झाला असता. बकरी ईद आली रे आली की, अशी जनावरे फार मोठ्या प्रमाणात बाजारात येतात. एका रात्रीतून तर हे बकऱ्याच्या अंगावर कोरले जात नसेल? विकल्या जाणाऱ्या बकऱ्याचे वय हे 3 ते 5 वर्षांचे असते. पाच वर्षांत कोणतीही बातमी या बकऱ्यांसदर्भात कोठेच बघायला किंवा वाचायला मिळत नाही. मात्र गोवंडीच्या साडेपाच कोटींचा बकरा या बातमीने मीडियाचे संपूर्ण चॅनेल्स कव्हर केले होते. बऱ्याच वृत्तपत्राची ती हेडलाईन राहिली आहे.
देवा-धर्माच्या नावावर पैसा खर्च करण्याचे काहीच वाटत नाही. आपापल्या धार्मिक रूढी-परंपरेनुसार प्रत्येक व्यक्ती श्रद्धा जोपासत असते. श्रद्धा ही फार मोठी इबादत आहे. मानसिक सुख-समाधानाचे ते जीवनसत्त्व आहे, जे बाजारात किंवा मेडिकलमध्ये कोठेच विकत मिळत नाही. मात्र आपल्या श्रद्धेचे कोणी धार्मिक भांडवल करून समाजात अंधश्रद्धा पसरवीत असेल तर या गैरप्रकाराला वेळीच आळा घातला पाहिजे. कारण समाजात वाढत चाललेली अंधश्रद्धा ही मानवनिर्मित समस्या आहे. जगातील कोणतीही मानवनिर्मित समस्या कायद्याने किंवा शिक्षणाने सुटणारी नाही. त्यासाठी गरज आहे ती वैज्ञानिक दृष्टिकोनाची आणि सकारात्मक विचारशैलीची. समाजाला विकासाच्या प्रवाहात आणणे; समाजाची या गैरप्रकारातून मुक्तता करणे यासाठी प्रबोधन इबादतीपेक्षा कमी नाही.
Tags: वैज्ञानिक दृष्टिकोन अंधश्रद्धा धर्म इबादत प्रबोधन मुस्लिम रजिया सुलताना weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
प्रतिक्रिया द्या