डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मन आणि मित्र यांच्या रेट्याने नाटकं लिहिली

साहित्य : रा. शं. दातार नाट्य पुरस्कार । राजकुमार तांगडे

खरं तर नाटकानं प्रबोधन, क्रांती होईल का? याचं उत्तर काळावर सोडावं. कारण कालपरत्वे हत्यारं बदलतात. हात तेच राहतात. हे आम्ही हत्यारच म्हणून घेतलंय. आम्ही कुणाचं मनोरंजन करण्यासाठी जन्मलो नाही; पण आमच्या कामातून कुणाचं मनोरंजन होत असेल, तर तिला आमची हरकत नाहीच. आम्ही कुणा व्यक्तीसाठी, गटासाठी नाही; तर समाजासाठी हे करतो. तेव्हा नाटक पाहायला बसलेल्या व्यक्तीने ‘पंखा हा मला हवा द्यायसाठीच जन्माला घातलाय.’ तसाच कलाकार- असं समजून आमचं अस्तित्व वस्तूच्या रूपात मोजू नये, एवढीच अपेक्षा. यापेक्षा अजून काय हवं असतं एका कलाकाराला नवं नाटक करण्याची ऊर्जा मिळण्यासाठी?

एका मुलाखतीत मला प्रश्न विचारला- तू शाळेच्या अभ्यासाची पुस्तकं वाचायची सोडून लिहू का लागला? मी खरं सांगू? मला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहिण्यापेक्षा पडलेल्या प्रश्नंची उत्तरं शोधण्याची ओढ आजतागायत आहे.

खरं तर चाकोरीबद्ध जगणाऱ्यांना फारसे प्रश्न पडत नाहीत. पडले तरी त्यांच्यातून थोडीशी वेगळी किंवा वाकडी वाट काढली तरी स्वत:च जगणं बऱ्यापैकी सुकर होतं. मला तस जगायचं नसावं/नव्हतं/नाही. म्हणूनच की काय, मला एकट्यानं सगळ्या गोष्टी करायचं धाडस होतं. पण मी ‘जेवण’ मात्र एकटा करूच शकत नाही. माझ पोटच भरत नाही. एकटा जेवताना कायम अस्वस्थ असतो. हीच वृत्ती, सवय, प्रेरणा मला समूहाबरोबर जगण्यास भाग पाडत होती/आहे. म्हणूनच मी नाटक निवडलं. समुद्रानं, समुद्रासाठी केलेली ती कलाकृती. खरं तर आपण कळपानं राहणारी माणसं. जातीचे कळप, धर्मांचे कळप, वर्गांचे कळप, लिंगांचे कळप, अवस्थांचे कळप, वयाचे कळप, वृत्तीचे कळप... या असंख्य कळपांचा मिळून बनला एक समाज. आणि हा समाज इथल्या कळपांचे आणि त्यांच्या संस्कृतीचे परस्पर विरुद्ध असलेल्या तोंडाने जे प्रश्न तयार झालेत, असे असंख्य प्रश्न पोटात घेऊन आज दिवस काढतोय... त्यांतल्या एका एका प्रश्नांसाठी महापुरुषांनी आयुष्य खर्ची घातलं आणि आपण त्यांचं नाव घेऊन नवे प्रश्न उभे करणार असू, तर काय उपयोग, खरं तर आपण त्यांचे वारस असू, तर आपणही आपल्या परीनं एका-एका प्रश्नाला भिडलं पाहिजे. आपल्या जीवा परीनं. त्याचाच भाग म्हणून आम्ही हुंडाबळीवरचा विषय घेऊन वीस वर्षांपूर्वी ‘बहीण माझी प्रीतीची’ हे नाटक केलं आणि हुंडा न घेण्याचा संकल्पही बालवयात केला. कुठल्याही महाभयंकर रोगापेक्षा, युद्धापेक्षा जास्त हानी हुंड्यानं झाली/होतेय.

त्यानंतरचं ‘काय दिलं स्वातंत्र्याने?’ शेतकरी आत्महत्येवरचं, ऊस प्रश्नावरचं हे नाटक आम्ही 2000 मध्ये सादर केलं, तेही पोलीस संरक्षणात. ज्या वयात पोलीसमामा व बागुलबुवाची भीती बंद होते, त्याच वयात आप्तांचीच भीती वाटू लागली. त्याच वयात- ज्यात फक्त खेळायचं असतं. नाटकाच्या माध्यमातून का होईना, सिस्टीमशी टक्कर खेळत होतो. आमच्या आयुष्यात खेळणं फक्त पाळण्यातच. त्यातलाही अर्धा काळ माईनं रानातल्या झाडाला बांधलेल्या घट्ट झोळणीत. त्यातले आम्ही उच्चभ्रू म्हणून किमान आम्हाला वर फांदीवरचे पक्षी, फळं, पाला तरी दिसायचा; पण जे पालावर जन्मले, त्यांच्या तर झोळणीला झाडसुद्धा नाही. दारोदार फिरणाऱ्या माईच्या पाठीवर बांधलेल्या गच्च झोळणीत तर खेळताही येत नाही. आमची ‘पिंटी’ ही एकांकिका अशाच मुलीचं प्रतिनिधित्व करणारी. तिचे आम्ही शंभरएक प्रयोग केले शाळा-शाळांत. गावातल्या शाळेत शिक्षक नसल्यानं तिथं रिकामं बसून तरी काय करायचं, म्हणून वसुंधरा ही सात वर्षांची मुलगी आमच्या नाटकात काम करायची. तिला घेऊन संभाजी तांगडे किंवा मी ते प्रयोग करत फिरायचो. शाळाबाह्य मुलींचं कारण सांगत-सांगत... आपलं दुखलं तर आपण ओवा खायचा असतो, एवढं दिवसागणिक दिवस गेल्यानं कळू लागलं. शिवाय, आम्ही विज्ञाननिष्ठ विचाराचे निपजल्यानं आपलं दु:ख कमी करण्यासाठी, जगातलं पाप कमी करण्यासाठी कुणी देव जन्म घेईल याच्यावर आमचा विश्वास नव्हता. दुसऱ्यानं कुणी येऊन आमचा ‘तारणहार’ बनावं, एवढं उपकाराचं ओझं आमच्या ताठ मानेला पेललं नाही/नसावं. म्हणून आम्ही स्वत:चे प्रश्न स्वत:च सोडवायला निघालो.

‘आकडा’ या एकांकिकेतून शेतकऱ्यांना जबरदस्त शॉक देणाऱ्या या समस्येचा ढिंडोरा आम्ही जगभर केला. संभाजी तांगडेनं दिग्दर्शित केलेल्या या नाटीकेला नंदू माधवासारख्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक भान/जाण असलेल्या माणसाशी आमची गाठ पडली. त्यांनी अगदी बोटाला धरूनच आम्हाला मुख्य प्रवाहात आणलं. गाव सोडून 2003 मध्ये पहिल्यांदाच आम्ही बाहेर पडलो. जिथं वेगवेगळ्या वाटा फुटतात तिथं दिशादर्शक बाण, किलोमीटरचे दगड नसतील, तर वाटसरू भरकटण्याची शक्यता असते. वाट चुकण्याची शक्यता असते. खास करून चौकात. अशाच ठिकाणी त्यांची भेट झाली. माणसे मिळत गेली ठिकठिकाणी. अशाच एका वाटेवर एका व्रतस्थाची भेट झाली. समाजाला शहाणपण यावं म्हणून वेड्यासारखं काम करणारे ‘अतुल पेठे’. मकरंद साठे सरांच्या पटकथेचं त्यांनी नाट्यरूपांतर केलं, त्यात मला सहभागी करून घेऊन. खारीचा वाटा दिला. ते नाटकंही खूप गाजलं. आम्ही खऱ्या अर्थाने मुख्य प्रवाहात आलो. तिथं मात्र आम्हाला कुणी ग्रामीणच्या वर्तुळात न ढकलता मुख्य प्रवाहात सामील करून घेतलं. तिथंच आमच्या ‘रंगमळा’ या टीमचं बारस पेठे गुरुजींनीच केलं. ‘दलपतसिंग’ आमच्यासाठी ट्रेनिंग स्कूल होतं. मेहनत, शिस्त, निष्ठा, समर्पण कशाला म्हणायचं! त्या नाटकाच्या भक्कम पायाभरणीनं पुढचं ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला‘ हे नाटक उभं राहिलं.

या सगळ्या कामातून आम्हाला आणि समाजाला एक विश्वास मिळाला होता एकमेकांप्रति. ‘साधना’सारख्या समाजाला फुलासारखं वाहिलेल्या साप्ताहिकानं दलपतसिंग विशेषांकाच्या रूपानं घरा-घरांत पोहोचवला होता... आम्ही जोपर्यंत गावात नाटकं करत होतो, तेव्हा संभा (संभाजी तांगडे) औरंगाबादला कॉलेजला, पण चित्त गावात. मी पार्टटाईम म्हशी, शेळ्यांबरोबरच शेतकरी संघटना आणि नाटकं. तो नेहमी म्हणायचा- आपण ज्या पद्धतीची नाटकं करतो, ती शहरात नाहीत... तिथल्या नाटकांशी कधी आमची स्पर्धा नव्हती, ना त्यांचा हेवा. त्यानं शहर जवळून अनुभवलं होतं. म्हणूनच की काय, तो सुट्टीत आला की म्हणायचा- राजा, आपण ना, पुस्तकातली माणसं आहोत. मी पुस्तकं वाचलेली नसल्यानं मला त्यातली माणसं पण माहीत नव्हती. मला हळूहळू कळलं. वाचल्यानं पुस्तकांच्या पानावर येत नाही, तर जगल्यावर माणूस पुस्तकांच्या पानावर येतो.. त्याचं नेहमी असायचं- शिवाजीमहाराजांवर आपण काही तरी करू. एखादी घटना मनाला अस्वस्थ करणारी घडली की, संभाचं शिव-चरित्र सुरू व्हायचं... आता शिवाजीमहाराज असते तर महाराजांच्या काळात बहिर्जी नाईकांना एक आणि महाराजांना एक मोबाईल असता. महाराजांना एक हेलिकॉप्टर असतं. तू महाराजांवर लिही.

मी जेवढी नाटकं लिहिली, ती मन आणि मित्र यांच्या रेट्यानंच. अशात प. महाराष्ट्रातील दंगलीची बातमी आली. ज्या महाराजांनी मृत्यूनंतर वैर संपतं, म्हणून खानाची कबर बांधली; त्यांच्याच नावावरून दंगल? तीही पोस्टर बाजीमुळे? ह्यात कावा, डाव, कपट, पशुत्व दिसलं आणि भारतीय एकात्मतेची हत्या दिसली. ज्या महाराजांना एक-एक किल्ला मिळवायला जिवाचं रान करावं लागलं, त्यांचं नाव घेऊन भल्या-भल्यांचे बालेकिल्ले जमीनदोस्त झाले. एक पोस्टर विधानसभेचे निकाल फिरवू शकते, एवढी त्या नावाची ताकद दिसली. ती जर आपण विधायक कार्यासाठी वापरली तर काहीही होऊ शकतं, हे पण कळलं. आता ती खदखद सुरू झाली होती. त्याच काळात रंगमळा आणि विद्रोही जलसा यांना जोडणारा दुवा- आमच्याच जालन्याचा थिएटर ॲकॅडमीचा पास कैलास वाघमारे- आकडाच्या शोमध्ये भेटला. त्यानं समीक्षा लिहिली. तो आमचा चटकन मित्र झाला. (समीक्षा चांगली लिहिली) आणि आमची लोकशाहीर संभाजी भगतसरांसोबत रास जुळली. आम्हाला जे करायचे होते, ते त्यांच्याही मनात खूप पूर्वीपासून होतं. हा समान धागा. सरांच्या संकल्पनेत जलसा करायचा होता, कैलासला नाटक हवं होतं. संकल्पना ऐकल्यानंतर तिच्यात ‘दम’ वाटला. बस, जीव ओतला की नाटक तयार होणार असा विश्वास होता.

सर आणि संभाजी तांगडे, कैलास चर्चेला होतेच. विचार आणि तत्त्वज्ञानाचं सर म्हणजे भांडार... आणि जगण्याचं तत्त्वज्ञान शब्दांत पकडायची मला खोड. मी लिहिलय की सरांना ऐकवायचो ते सूचना करायचे. नुसत्या फोनवरील चर्चेत मी साडेतीन तासांचं नाटक लिहिलं. अजून गाणी येणं बाकी होतं. संभा आणि कैलासला आम्ही ते बसवण्यास भाग पाडलं. दोन हजार तीनपासून आमच्यावर घारीसारखं लक्ष ठेवून असलेले नंदूदादा वेळोवेळी विचारत होते. त्यांनी मुंबईत या नाटकाचं वाचन ठेवलं. पुष्पा भावे, शफाअत खान, परेश मोकाशी, युवराज मोहिते या मंडळींचं मार्गदर्शन मिळालं. चर्चेत एक झालं यात तीन नाटकं आहेत; त्यातलं फक्त एकच करा.
संभा आणि कैलासनं हे शिवधनुष्य नंदूदादाच्या हाती दिलं आणि नवा डाव सुरू झाला. एक-एक प्रसंग चार-चार वेळा लिहिला. इतिहासाची एक बाजू तर सर्वज्ञात पण दुसरी बाजू कॉ. गोविंद पानसरे, शरद पाटील, चंद्रशेखर शिखरे, श्रीमंत कोकाटे, अशोक राणा यांच्या पुस्तकांतून सापडत होती. शीर्षकात सरांचं योगदान, त्याला मोहल्ला जोडून नंदूदादानं अधिकच टोकदार केलं. गाणी आणि सुंदर चालीनं उंची कैकपट वाढली. सरांची गाणी मोजक्या शब्दांत खूप काही अभंगासारखं सांगून गेली. गोंधळ्याचं स्वर्गगीत नव्हतं तोपर्यंत नाटक अपूर्ण वाटत होतं, ते पहिल्याच गाण्यानं पूर्ण झालं. नंदू माधव सरांनी त्यात अधिक टोकदारपणा आणला. विजयअण्णा बोराडे, चंद्रशेखर शिखरे, अर्जुनभाऊ खोतकर यांनी तालमीत निवास-भोजन मदतीसाठी माणसं अशी तीस, वीस, दहा दिवसांची जिम्मेदारी घेतली. केशव गोरे स्मारक ट्रस्टनं मुंबईत एक महिना निवासाची व्यवस्था केली. जशी स्वराज्य उभारणीत मावळ्यांची धडपड होती, तशीच या नाटकात काम करणाऱ्या मुलांची. अठरापगड जातींची मुलं तीन वर्षं हा किल्ला लढवताहेत. ज्यांनी वैयक्तिक आयुष्य जगणंच सोडून दिलं- समाजाला या नाटकाची गरज म्हणून, तसं हे नाटक अनेक अंगांनी जातं. म्हणून एकदम अंगावर आल्यागत होतं. धार्मिक, जातीय, पक्षीय, संघटनात्मक, सामाजिक, वांशिक असा पसारा घेऊन चालतं.

आम्ही या नाटकात कुणालाच सोडलं नाही. काही लोकांना हे नाटक ठरावीक जातीला लक्ष्य केल्यागत वाटतं. तसं होणं साहजिक आहे. कारण प्रत्येक जण येताना आपला एक चष्मा घेऊन येतो. दुर्दैवाने आपल्या प्रत्येकाला जात आहे. वरून जरी काढली, तरी ती अजून आतून निघतच नसल्यानं तो चष्मा असणारच. पण आज पुरोगामी महाराष्ट्रात त्या चष्म्याचा पॉइंट कमी होताना दिसतोय... कारण तिशीच्या आतल्या तरुणांनी हे नाटक फार स्वीकारलं... हेही सांगितलं- हे नाटक मी दोनदा, चारदा, सत्तावीस वेळा पाहिलं... आम्हाला मात्र पहिल्याच भेटीत माणूस चांगला की वाईट, सांगायची घाई होते. कालचं मत आज बदलण्याचीही शक्यता असते, एवढी जाण ही नवी पिढी देते. हे आमच्या नाटकाचं यश वाटतं. खरं तर नाटकानं प्रबोधन, क्रांती होईल का? याचं उत्तर काळावर सोडावं. कारण कालपरत्वे हत्यारं बदलतात. हात तेच राहतात. हे आम्ही हत्यारच म्हणून घेतलंय. आम्ही कुणाचं मनोरंजन करण्यासाठी जन्मलो नाही; पण आमच्या कामातून कुणाचं मनोरंजन होत असेल, तर तिला आमची हरकत नाहीच. आम्ही कुणा व्यक्तीसाठी, गटासाठी नाही; तर समाजासाठी हे करतो. तेव्हा नाटक पाहायला बसलेल्या व्यक्तीने ‘पंखा हा मला हवा द्यायसाठीच जन्माला घातलाय.’ तसाच कलाकार- असं समजून आमचं अस्तित्व वस्तूच्या रूपात मोजू नये, एवढीच अपेक्षा. यापेक्षा अजून काय हवं असतं एका कलाकाराला नवं नाटक करण्याची ऊर्जा मिळण्यासाठी? तुम्ही आम्हाला तुमचा अविभाज्य भाग समजता, हे या सन्मानावरून आम्हाला कळून चुकलं.

Tags: शेतकरी संघटना आकडा शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला कैलास वाघमारे शिवाजी महाराज संभाजी भगत नाटक राजकुमार तांगडे Shetkri Sanghatana Akada Shivaji Underground In Bhimnagar Mohalla Kailas Waghmare Shivaji Maharaj Sambhaji Bhagat Natak Rajkumar Tangade weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

राजकुमार तांगडे
rajkumar.tangade@gmail.com

अभिनेता, दिग्दर्शक, लेखक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके