डिजिटल अर्काईव्ह

बायका - कालच्या आणि आजच्या

फुले-कर्वे इत्यादीची एकंदर स्त्री-शिक्षणा विषयीची तळमळ पाहिल्यानंतर त्यांच्या मूलभूत ध्येयाची कोणती पूर्तता दिसते? प्रतिष्ठेच्याच दास्याचा दुसरा एक परिणाम दिसून येतो तो शिक्षणाच्या क्षेत्रात कोणी एक मुलगी अमक्या एकाची मुलगी आहे, किंवा कोणी एक मुलगा अमक्या एकाचा मुलगा आहे या दडपणाखाली त्यांनी काय शिकावे हे निश्चित केले जाते.

स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्त्रियांवरती होणारे अन्याय पाहून महात्मा फुले, महर्षी कर्वे आदी प्रभृतीनी स्त्रीशिक्षणासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. आपली आयुष्ये त्यासाठी व्यतीत केली. त्यांच्या या त्यागाला खरोखरच काही फळ आले आहे का? स्त्री खऱ्याखुऱ्या अर्थाने दास्यमुक्त झाली आहे का? जुनी परंपरागत चालत आलेली दास्ये तिने निःसंशय धुडकावून लावली आहेत; परंतु आज अनेक नवनवीन दास्ये तिने स्वतः होऊन आपल्या वर ओढवून घेतलेली दिसतात. त्यातले सर्वात मोठे दास्य म्हणजे प्रतिष्ठेचे!

पूर्वी स्त्रिया जेव्हा अशिक्षित होत्या तेव्हा जात-पात, विटाळ-चांडाळ इत्यादी गोष्टी त्यांच्या विचारकक्षेत येत असत. त्यानुसार त्या मैत्री करत असत. आज जातीय तेढ जरी कमी झाली असली तरी वर्गीय तेढ वाढली आहे. आज कुठलीही महिला मंडळे पाहिली तरी प्रामुख्याने सर्व महिला एकाच वर्गाच्या आढळतात. त्यांतील सर्वांची सांपत्तिक स्थिती सारखी असल्यामुळे स्वाभाविकच मत्सर हेवेदावे यांसारख्या गोष्टी तेथे सुरु होतात आणि यामुळे अर्थातच कुठलेही विधायक कार्य घडण्याऐवजी तो सर्व वेळ नुसताच चकाट्या पिटण्यात जाऊ लागतो. कित्येक वेळा मंडळात नाव असणे ही एक फॅशन होऊन बसते, आणि मग कित्येक बायका आपली लहान मुले 'आया' वर सोपवून मंडळात आपली हजेरी लावतात. ज्यांना हे परवडत नसेल त्यांना हे कारण सांगून मंडळात न जाण्यात कमीपणा वाटतो. मग त्या मुलांना आपल्या सोयीनुसार सवयी लावतात. शाळांमध्ये अडकवतात; आणि मंडळाच्या सदस्य होतात अगदी कनिष्ठ वर्गातल्या स्त्रियांना कामामुळे मुलांकडे लक्ष द्यायला वेळ होत नाही; तर उच्चवर्गीय स्त्रियांना प्रतिष्ठेमुळे मुलांकडे लक्ष द्यायला वेळ होत नाही. त्यांना मुलगा आजारी आहे यापेक्षा 'बालगंधर्व' मध्ये एखाद्या नाटकाचा पहिला प्रयोग आहे याचे महत्त्व जास्त असते. कारण लहान मुले दाई किंवा घरातल्या इतर कोणावर सोपवणे शक्य असते, पण तो 'पहिला शो' पुन्हा येणार नसतो! अशा प्रकारे ती स्त्री प्रतिष्ठेच्या खोट्या कल्पनेत गुरफटली जाते, आणि परिणाम... सर्वांना विदितच आहेत.

क्लबमधील जीवन

याहीपेक्षा एखाद्या लायन्स, रोटरी, फॉइल यांसारख्या क्लबमध्ये नाव असणे ही एक अत्यंत प्रतिष्ठेची गोष्ट समजली जाते. साधारणपणे क्लब्जमध्ये जमणारी मंडळी ही उच्च वर्गीय आणि थोडीफार उच्च-मध्यम वर्गीय. त्यामुळे इथे जमणाऱ्या स्त्रिया म्हणजे निरनिराळ्या उंची, तलम वस्त्रांनी वेढलेल्या, उच्चशिक्षाविभूषित विदूषी! पण यांच्या गप्पांचे विषय कोणते असतात? नेहमीचेच. एकमेकीच्या वस्त्रप्रावरणाची स्तुती आणि आपापल्या नवऱ्याच्या सामाजिक स्थानांबद्दलचे शेरे कौतुकोद्गार! या कौतुकामध्ये मुख्यतः समावेश असतो त्यांच्या त्या सामाजातील स्थानाचा, आणि त्यामुळे स्वतःला प्राप्त होणाऱ्या प्रतिष्ठेचा. नवऱ्याच्या स्वभावाचा किवा एखाद्या गुणाचा उल्लेख इतक्या प्रकर्षाने येत नाही. एखाद्या स्त्रीचा नवरा 'क्लास वन्' ऑफिसर झाला की ती 'क्लास टू' ऑफिसरच्या बायकोला कमी दर्जाची समजते. अर्थात पुरुषही या प्रतिष्ठेच्या कल्पनांचे गुलाम असतातच. त्यांच्यातही वर्गीय तेढ असतेच. पण स्त्री व पुरुष यांच्यातील दास्यात फरक एवढाच की, स्त्री ही पर्यायाने नवऱ्याच्याच प्रतिष्ठेच्या छायेत वावरत असते. त्याची प्रतिष्ठा हीच तिची प्रतिष्ठा असते, तिची मूळ पात्रता कोणतीही असली तरी आणि म्हणूनच स्त्री या प्रतिष्ठेच्या भ्रामक कल्पनांना चिकटून राहिली की जास्त हास्यास्पद होते.

फुले-कर्वे इत्यादीची एकंदर स्त्री-शिक्षणा विषयीची तळमळ पाहिल्यानंतर त्यांच्या मूलभूत ध्येयाची कोणती पूर्तता दिसते? प्रतिष्ठेच्याच दास्याचा दुसरा एक परिणाम दिसून येतो तो शिक्षणाच्या क्षेत्रात कोणी एक मुलगी अमक्या एकाची मुलगी आहे, किंवा कोणी एक मुलगा अमक्या एकाचा मुलगा आहे या दडपणाखाली त्यांनी काय शिकावे हे निश्चित केले जाते. मुलांच्या बाबतीत ती कित्येकदा मनात नसतानाही अभ्यासक्रम पूरा करतात; नंतरच्या आयुष्यातही कित्येकदा यशस्वी होतात; पण मुली मात्र बरेच वेळा प्रतिष्ठेपायी घेतलेले शिक्षण नावामागे पदवी जोडण्यापुरतेच उपयोगात आणतात.

माझे स्वतःचे उदाहरण

या बाबतीत माझे स्वतःचेच उदाहरण घेता येईल. मी आज मराठी हा विषय घेऊन प्रथम श्रेणीत बी. ए. उत्तीर्ण झाले. युनिव्हर्सिटीत मराठी या विषयात दुसरी आले, माझ्या कॉलेजात पहिली आले. पण हे सगळे कशासाठी? मी विशेष काय मिळवले? आता मी एम. ए. होईन. पुढे Ph. D. करीन, पण त्यानंतर मी काय करणार? या प्रश्नाचे उत्तर आज माझ्याजवळ नाही. एका मुलाच्या बरोबरीने, सामाजिक क्षेत्रातला कुठलाही भार पेलण्यास समर्थ असलेल्या माझ्यासारख्या मुलीची जर ही स्थिती असेल, तर सर्वसामान्य मुलगी कितपत स्वतःचे निर्णय अगदी समर्थपणे घेऊ शकेल? प्रत्येक वेळी जीवनात पुढे येणाऱ्या साथीदाराला ती मते कितपत पटतील यावर या गोष्टी अवलंबून असतात. ती सर्व मते धुडकावून लावून स्वतः समर्थ असणारी स्त्रो एखादीच! आणि तीच दास्यमुक्त! मात्र या विवेचनाचा अर्थ असा नव्हे, की सर्वच स्त्रिया संसाराला नवऱ्याच्या बरोबरीने हातभार लावताना दिसतात. परंतु तरीही जर नवरा त्या स्त्रीपेक्षा कमी मिळवणारा असेल तर त्यांचा संसार सहसा सुखाचा झालेला दिसत नाही. अशा प्रकारे बहुतेक प्रत्येक वेळी स्त्रीला तडजोड करावी लागते. पड खावी लागते. ती संपूर्णतया दास्यमुक्त होऊ शकत नाही.

खरोखर पुरुषांनी स्त्रियांना खऱ्या अर्थाने दास्यमुक्त केले आहे काय? आज जवळ जवळ सर्व पुरुष अशा कल्पनेत दंग दिसतात की, आपण स्त्रीला संपूर्णतया मुक्त केले आहे; असे असताना मग हा स्त्री-स्वातंत्र्याचा प्रश्न उद्भवतोच कुठे? वरवर पाहता पुरुषाने स्त्रीला पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे; ती त्याच्या बरोबरीने नोकरी करते; पण दोघंही नोकरी करून घरी आल्यावर मात्र दमलेला पुरुष पाय पसरून विश्रांती घेतो, आणि दमलेली स्त्री घरकामाला जुंपून घेते. या कर्तव्यात ती अपुरी पडली की समाज निदेसाठी सज्ज असतोच. तसेच नवऱ्याला त्या स्त्रीने नोकरी केलेली चालते, पण ती जर बरोबरच्या एखादा मित्रमैत्रिणीबरोबर दोन तास हॉटेलात बसली, किंवा कामाव्यतिरिक्त एखाद्या ऑफिसच्या कार्यक्रमात पिकनिकमध्ये जरा अधिक मोकळेपणानं वागली की लगेच तो आपलं वर्चस्व अप्रत्यक्षरीत्या गाजवायला सुरवात करतो. तो स्वतः "मी तुला असे करू देणार नाही" असे स्पष्ट न सांगता इतर अनेक मागांनी नवरेशाही गाजवू लागतो. यामुळे स्त्री वरवर स्वतंत्र दिसली तरी आतून तिच्या मुक्तीच्या वाटा रोधलेल्याच राहतात. पुरुषांच्या दास्यमुक्तीच्या विरोधापेक्षा कित्येकदा 'जातीला जात वैरी' या न्यायानुसार मुक्त होऊ पाहणाऱ्या स्त्रीच्या मार्गात स्त्रियाच जास्त आडव्या आलेल्या दिसतात. आजपर्यंतच्या स्त्री-स्वातंत्र्याच्या सर्व चळवळीचा इतिहास पाहिला तर प्रत्येक वेळी स्त्रीला विरोध करणारी ही स्त्रीच. अगदी नुकतंच पडलेलं अॅडेलिन केलेडीच उदाहरण घेता येईल. एवढा मोठा राष्ट्रमाता होण्याचा, सर्व जगाचे आदराचे आणि प्रेमाचे स्थान बनण्याचा मान झिडकारून आपल्या मनाप्रमाणे आयुष्य जगण्याचा वेगळाच मार्ग तिने स्वीकारा. तो मार्ग बरोबर होता की चुकीचा, त्याचं मूल्य काय होतं वगैरे प्रश्न बाजूला सोडले तरी व्यक्तिस्वातंत्र्य म्हणून तिला योग्य न्याय मिळायला हवा; पण तिला विरोध करणारा सर्वात मोठा वर्ग स्त्रियांचा होता.

याहीपेक्षा सर्वांत भयंकर गोष्ट आहे ती म्हणजे स्त्रीला आपण दास्यात आहोत हीच कल्पना नसते. इतके दिवस अस्पृश्यांना आपल्यावर अन्याय केला जात आहे याची कल्पना नव्हती. तीच स्थिती आज स्त्रीची आहे त्यामुळेच हरिभाऊ आपट्यांच्या काळातील यमू ही निदान परंपरागत हडींच्या बंधनात बांधली गेलेली होती, ते पारतंत्र्य तिच्यावर लावले गेलेले होते म्हणून तिच्याविषयी अपार अनुकंपा वाटते. फुले, कर्वे आदी महात्म्यांना तिच्याविषयी कळवळा वाटला. तिच्या मुक्तीसाठी आपलं आयुष्य खर्ची घालावंसं वाटलं; पण आजच्या स्त्रीची अवस्था ही त्याहूनही वाईट आहे. तिचं पारतंत्र्य हे तिने स्वतःच आपल्यावर लावून घेतलेलं आहे. यामुळे ती इतरांनी सहानुभूतीही घालवून बसली आहे. वरवर स्वतंत्र दिसली तरीही अन्तर्यामी ती यामु इतकीच बद्ध आहे, आणि म्हणूनच स्त्रीच्या दास्यमुक्तीचा प्रश्न अधिक बिकट झाला आहे. यापुढे स्त्रीदास्यमुक्तीसाठी पुरुष हे सहभागी होणार नाहीत. स्त्रीने स्त्रीचा उद्धार करायला हवा. यासाठी आपण आपली मानवी सर्जनशीलता वाढवायला हवा. आपल्या समाजाच्या सर्व प्रश्नांची जाणीव करून घेऊन आपल्या शिक्षणाचा उपयोग त्यांच्या निराकरणाकरिता करायला हवा. पुरुषाशी निकोप मैत्री करून त्यांच्याबरोबरीने सामाजिक प्रश्नांची उकल केली पाहिजे. हे एक मानसिक स्वरूपाचे कार्य आहे. मनातल्या परंपरा, रुढी यांना थोडा फार धक्का देऊन आपण स्त्रियांनीच आपली मुक्तता करून घेतली पाहिजे. भोगदासी यापेक्षा काही वेगळं स्थान आपल्यालाही आहे हे आपणच सिद्ध केल पाहिजे; आणि तरच आपण स्त्रिया खऱ्या अर्थाने दास्यमुक्त होऊ.

Tags: दास्यमुक्ती विशेषांक 1970 बालगंधर्व स्त्रीमुक्ती महर्षी कर्वे महात्मा ज्योतिबा फुले Dasyamukti Special Issue 1970 Balgandharva Women's Mukti Maharshi Karve Mahatma Jyotiba Phule weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी

साधना प्रकाशनाची पुस्तके