डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

रायमानेसरांना इतिहासाचे भान होते, म्हणूनच त्यांनी बाबासाहेबांसोबतच्या कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेऊन बाबासाहेबांच्या जास्तीत जास्त आठवणी लिहून घेण्याचे ऐतिहासिक कार्य केलेले आहे. साधनाचे संपादक असताना यदुनाथ थत्ते यांनी गावोगावी समाजात ‘अज्ञात आधारस्तंभ’ ठरावेत असे युवक घडवले. रायमानेसर हे त्यांपैकीच एक. या अज्ञात आधारस्तंभाने मिलिंदमध्ये इतिहास घडवला. ते केवळ दलित साहित्याच्या शिल्पकारांपैकीच एक नाहीत, तर 1963 ते 1995 पर्यंत मिलिंदमध्ये विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्या त्यांनी  घडवल्या. मीही त्यापैकीच एक. आज त्यांच्या जाण्यानं मीच नाही, तर ‘मिलिंदायन’ पोरकं झालेलं आहे.

दि. 6 डिसेंबर या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी दलित साहित्याचे एक शिल्पकार आणि औरंगाबाद येथील मिलिंद कला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य ल.बा. रायमाने यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 85 वर्षे होते. त्यांच्या निधनामुळे अनेकांचा अज्ञात आधारस्तंभ कोसळला. प्रखर बुद्धिवाद, चारित्र्यसंपन्नता, परिवर्तनवादी निष्ठा, साधी राहणी आणि सात्त्विक स्वभाव हे सर्व गुण त्यांनी शेवटपर्यंत केवळ अबाधितच ठेवले नाहीत, तर त्यावर ते अढळ राहिले. याचाच परिपाक म्हणून मृत्यूच्या दोन दिवस आधी अनेक दिवसांचा त्यांचा ध्यास असलेल्या बौद्ध धम्माचा त्यांनी रुग्णालयात भन्ते सत्यपाल यांच्या मदतीने विधिवत्‌ स्वीकार केला. तसेच मृत्यूनंतर कुठलेही विधी न करता केवळ सामूहिक बुद्धवंदना व्हावी, असा त्यांचा आग्रह होता. त्यानुसारच त्यांच्या मृत्यूनंतर सामूहिक बुद्धवंदना घेऊन मृतदेह महात्मा गांधी मिशनच्या रुग्णालयाला दान करण्यात आला.

अशा या ध्येयासक्ताचा जन्म कर्नाटकातील अंकलीचा. तिसरीत असतानाच स्वातंत्र्य चळवळीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा राष्ट्र सेवादलाशी संबंध आला. सेवादलाची शिबिरे, मेळावे यामुळे त्यांच्यातील देशभक्तीची भावना प्रखर होत गेली. त्यातूनच त्यांना साने गुरुजी, वि. स. खांडेकर यांच्या साहित्याची ओढ वाटू लागली.

हडपसर येथे 1954 ला झालेल्या राष्ट्र सेवादलाच्या मेळाव्यात ते उपस्थित राहिले. याच प्रेरणेने गावातील भूदान चळवळ, शिवजयंती, बाबासाहेब आंबेडकर जयंती यामध्ये ते सहभागी झाले. एम.ए. करण्यासाठी त्यांनी साधना प्रकाशनाने प्रसिद्ध केलेले काशीनाथ पोतदार यांनी लिहिलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मराठीतील चरित्र कानडीत भाषांतरित केले. शिष्यवृत्तीच्या पैशांतून छापून घेऊन ते वाटले. प्रा.रा.ग. जाधव म्हणतात, ‘त्यांच्या जीवनाचा एक काठ साने गुरुजींचा होता तर दुसरा डॉ.आंबेडकरांचा होता’ याची ती सुरुवात होती. म्हणून  तर ते 6 डिसेंबर 1956 ला बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणाच्या महासागरात सहभागी झाले होते.

बाबासाहेबांनी 1963 मध्ये स्थापन केलेल्या मिलिंद कला महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून सर रुजू झाले आणि त्यांच्या आयुष्यातील वेगळ्या पर्वाला सुरुवात झाली. जगणं, खाणं, कपडे अशी सगळ्यांचीच वानवा असलेले दलित विद्यार्थी मिलिंदमध्ये राज्यभराच्या गावकुसाबाहेरून नवी स्वप्नं घेऊन येत होते. सरांच्या संवेदनशील मनाला या खदखदणाऱ्या ज्वालामुखींना व्यासपीठ देण्याची गरज वाटली. अंमळनेरला असताना साने गुरुजी ‘छात्रालय दैनिक’ हे हस्तलिखित चालवायचे, याची सरांना कल्पना होती. त्यांनी त्याच धर्तीवर मिलिंद हस्तलिखित पाक्षिक सुरू केले. दलित पँथरची स्थापना नंतरची असली, तरी दलित तरुणांमधील आक्रमकता त्या काळात मिलिंदमध्ये दिसायला लागली होती. या पार्श्वभूमीवर प्रा.अविनाश डोळस म्हणतात तसा, ‘इतरांना हा उपक्रम बाळबोध वाटत होता.’

मात्र या उपक्रमाची उपयुक्तता आणि दाहकता मिलिंदमध्ये प्राचार्य म्हणून नव्याने आलेले डॉ.म.ना. वानखडे यांनी ओळखली. अमेरिकेतून आलेले असल्याने तेथील ब्लॅक लिटरेचरशी त्यांची ओळख झालेली होती. नंतर प्राचार्य म.भि. चिटणीस, प्रा.रा. ग. जाधव यांनीही याला पाठबळ दिलं. नंतर हाच बाळबोध वाटणारा उपक्रम दलित साहित्याच्या निर्मितीचा प्रेरणास्रोत ठरला.

यातच डॉ.वानखडे यांनी बाबासाहेबांच्या विचारांचा आणि चळवळीचा वेध घेऊन समाजात सुरू असलेल्या मूल्यसंघर्षाला अभिव्यक्ती मिळवून देण्यासाठी वैचारिक व वाङ्‌मयीन उपक्रमांना योग्य दिशा दाखवली. त्यासाठी हस्तलिखिताशिवाय मिलिंद जर्नल, मिलिंद मॅगझिन, मिलिंद साहित्य परिषद, अस्मिता त्रैमासिक (याचेच पुढे अस्मितादर्श झाले) यांसारखे उपक्रम सुरू केले. या सर्व उपक्रमांत रायमाने सरांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती.

या सर्व उपक्रमांना राज्यभर नेण्यात आणि अधिक गती देण्यात साधना साप्ताहिकाने ऐतिहासिक भूमिका बजावलेली आहे. डॉ.अनिल अवचट साधनाचे कार्यकारी संपादक असताना त्यांनी मिलिंद मॅगझिनमधील गावकुसाबाहेरील जातीयतेचे दाहक अनुभव असलेल्या  निवडक अनुभवांवर आधारित साधनाचा 15 ऑगस्ट 1972 चा विशेषांक काढला होता. या अंकाचा फायदा असा झाला की- त्यातील सर्जकता, दाहकता, अस्सलता याचा परिचय राज्यभर झाला. महाराष्ट्र टाइम्सने याची दखल घेऊन अग्रलेख लिहिला. या अग्रलेखात ‘आज ज्यांना गावकुसाबाहेर ठेवले जात आहे, ते उद्या गावाचे कूस मोडून टाकतील- नव्हे, गावकूससुद्धा उद्‌ध्वस्त करतील’ असा इशारा दिला होता.

डॉ.वानखडे आणि प्रा.रा.ग. जाधव त्याच काळात वेगवेगळ्या कारणांनी मिलिंदमधून गेल्यानंतरही रायमानेसरांनी स्वत: पुढाकार घेऊन ही परंपरा संवर्धित केली. केवळ सांस्कृतिक आघाडीवरच ते कार्यरत नव्हते, तर मिलिंदमध्ये येणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांचे ते आई झाले होते. कुठल्याही प्रकारची वाच्यता न करता त्यांना ते मदत करत.

एकीकडे बाबासाहेबांशी नातं सांगत असताना त्यांनी आपल्या समाजवादी निष्ठा कधी लपवल्या नाहीत. त्यांच्या बंगल्याचं नाव ‘शोध’. या शोधचा मुहूर्त यदुनाथ थत्ते यांच्या हस्ते दारात डॉ.अशोक बेलखोडे यांनी भारत जोडो यात्रेतील विविध ठिकाणांहून आणलेली माती शिंपडून केला. त्यांचा मुलगा डॉ.क्रांती याच्या आंतरजातीय विवाहातही यदुनाथ थत्ते यांची मोलाची भूमिका होती.

रायमानेसरांनी जेवढं लेखन केलं, ते केवळ मिलिंद मॅगझिन आणि साधनासाठीच केलेलं आहे. साधनाच्या अंकात 70 च्या दशकात स्पृश्यास्पृश्यांची दास्ये (स्वातंत्र्यदिन विशेषांक), अस्पृश्यांनी समाजपरिवर्तनात सहभागी व्हावे (21 नोव्हेंबर 1970), रूढींच्या निर्मूलनाचे नवे जग (15 ऑगस्ट 1972) असे अनेक लेख प्रसिद्ध झालेले आहेत.

रायमानेसरांना इतिहासाचे भान होते, म्हणूनच त्यांनी बाबासाहेबांसोबतच्या कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेऊन बाबासाहेबांच्या जास्तीत जास्त आठवणी लिहून घेण्याचे ऐतिहासिक कार्य केलेले आहे. साधनाचे संपादक असताना यदुनाथ थत्ते यांनी गावोगावी समाजात ‘अज्ञात आधारस्तंभ’ ठरावेत असे युवक घडवले. रायमानेसर हे त्यांपैकीच एक. या अज्ञात आधारस्तंभाने मिलिंदमध्ये इतिहास घडवला. ते केवळ दलित साहित्याच्या शिल्पकारांपैकीच एक नाहीत, तर 1963 ते 1995 पर्यंत मिलिंदमध्ये विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्या त्यांनी घडवल्या. मीही त्यापैकीच एक. आज त्यांच्या जाण्यानं मीच नाही, तर ‘मिलिंदायन’ पोरकं झालेलं आहे.

Tags: स्मृतीलेख प्रा.रा. ग. जाधव प्राचार्य म.भि. चिटणीस यदुनाथ थत्ते ल. बा. रायमाने मिलिंदायन weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके