डिजिटल अर्काईव्ह

मधु दंडवते हे निर्विवादपणे देशाला लाभलेले आत्तापर्यंतचे सर्वोत्तम रेल्वेमंत्री होते. भारताचं व भारतीयांचं हित होण्याच्या दृष्टीने मोजक्याच केंद्रीय मंत्र्यांचा इतका परिवर्तनकारी प्रभाव पडला असेल. 1947 ते 1950 या काळात गृहमंत्री राहिलेले वल्लभभाई पटेल, 1964 ते 1967 या काळात कृषिमंत्री राहिलेले सी. सुब्रमण्यम, आणि 1991 ते 1996 या काळात अर्थमंत्री राहिलेले मनमोहन सिंग, यांचा सदर यादीत समावेश होईल. जनता दल सरकारमध्ये मधु दंडवते अर्थमंत्री होते. त्यादरम्यान, 1990 मध्ये अर्थसंकल्प मांडताना त्यांनी केलेल्या भाषणात पर्यावरणविषयक आव्हानाकडे विशेष लक्ष दिलं होतं. 

भारतीय समाजवादी परंपरा आता मृतप्राय झालेली आहे, पण एके काळी या परंपरेचा देशातील राजकारणावर व समाजावर सखोल आणि बहुतेकदा कौतुकास्पद प्रभाव पडत असे. पण, आज खूपच कमी लोकांना समाजवादी परंपरेतील गतकालीन ऊर्जेविषयी व उत्साहाविषयी माहीत असतं. काँग्रेस, कम्युनिस्ट, प्रादेशिक पक्ष, आंबेडकरवादी, आणि (विशेषतः अलीकडच्या वर्षांत) जनसंघ व भाजप- या सर्वांचे आपापले समर्थक व बखरकार आहेत आणि त्यांनी आपापल्या विचारसरणीय वंशावळीचा माग काढून प्रमुख नेत्यांची चरित्रं लिहिली आहेत, काही वेळा गौरवगाथाही लिहिल्या आहेत. परंतु, भारतीय इतिहासकारांनी बहुतांशाने काणाडोळा केलेल्या भारतीय समाजवादी नेत्यांबाबत मात्र अशी पुस्तकं फारशी आल्याचं दिसत नाही.

समाजवाद्यांची आठवण ठेवण्यासाठी ही उत्तम वेळ आहे, कारण समाजवादी परंपरेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या श्रेष्ठ नेत्यांपैकी एक असणारे मधु दंडवते यांचं जन्मशताब्दी वर्ष या महिन्यात संपतं आहे. दंडवते यांचा जन्म 21 जानेवारी 1924 रोजी झाला. विद्यार्थिदशेत मुंबईला असताना त्यांना काँग्रेस समाजवादी पक्षाच्या तत्त्वांमधून, आणि या पक्षाचे नेते जयप्रकाश नारायण, राममनोहर लोहिया व युसुफ मेहेरअली यांच्याकडून प्रेरणा मिळाली.

मुख्य प्रवाही काँग्रेस पक्ष आर्थिक न्यायाच्या व स्त्रीहक्काच्या प्रश्नांवर खूप जास्त रूढिवादी आहे, असं काँग्रेस समाजवादी पक्षाचं मत होतं. त्याचप्रमाणे सोव्हिएत संघाच्या प्रभावाखाली असणाऱ्या भारतीय कम्युनिस्ट पक्षापासूनही समाजवादी पक्षाने अंतर राखलं होतं. 1942च्या 'चले जाव' आंदोलनावेळी समाजवादी / कम्युनिस्ट यांच्यातील भेद ठळकपणे समोर आले. समाजवाद्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला, तर कम्युनिस्टांनी त्याला विरोध केला.

विचारसरणीय पातळीवर कम्युनिस्टांशी समाजवाद्यांचे तीन मुद्यांवर मूलगामी मतभेद होते. एक, कम्युनिस्ट हे स्टॅलिन व रशिया यांचे भक्त होते; तर समाजवादी हे स्टॅलिनला हुकूमशहा व रशियाला हुकूमशाही राज्य मानत होते (आणि ते योग्य होतं). दोन, कम्युनिस्ट लोक हिंसाचाराच्या भूमिकेचे प्रशंसक होते, तर समाजवादी लोक राजकीय वाद सोडवण्यासाठी अहिंसेला पसंती देत होते. तीन, कम्युनिस्टांचा आर्थिक व राजकीय सत्तेच्या केंद्रीकरणावर विश्वास होता, तर समाजवाद्यांनी या दोन्ही अवकाशांमध्ये विकेंद्रीकरणाचा कैवार घेतला होता. स्वतःला कम्युनिस्टांपासून वेगळं मानणाऱ्या समाजवाद्यांना महात्मा गांधींनी प्रेरणा दिली होती. मधु दंडवते यांनी 'मार्क्स अँड गांधी' या पुस्तकात लिहिल्यानुसार, "गांधी हे मानवी जीवनाचा आदर राखत होते आणि त्या आधारावर त्यांनी हिंसक पद्धतींना विरोध केला. व्यवस्थेच्या चुकांसाठी त्या व्यवस्थेचे अवयव म्हणून कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना शिक्षा होऊ नये किंवा त्यांचा नाश होऊ नये, असा गांधींचा आग्रह होता... हिंसक क्रांत्यांमध्ये व्यापक लोकसमूहांचा खरा सहभाग नसतो; केवळ अल्पसंख्य मंडळी क्रांतीमध्ये सहभागी होतात आणि त्याहून अल्प संख्येने मंडळींकडे सत्ता राखली जाते, त्यामुळे लोकांच्या नावावर हुकूमशाही प्रस्थापित होते", हे गांधी अनुभवातून शिकले होते.

त्याच पुस्तकात दंडवते पुढे म्हणतात, "बळजबरीला आणि राज्यसंस्थेचं किंवा तंत्रज्ञानाचं उपांग होण्यासाठी माणसाला वावनसेल अशा प्रामाणिक अहिंसक लोकशाही समाजाच्या निर्मितीच्या इच्छेमधून गांधींचा राजकीय व आर्थिक दृष्टिकोन घडला होता. या कारणामुळे त्यांना साम्यवादाची फारशी भुरळ पडली नाही साम्यवादाने उत्पादनासाठी भांडवलशाहीचं तंत्रज्ञान उसनं घेतलेलं होतं, पण केवळ उत्पादनसंबंध बदलण्यासाठी त्यांची खटपट होती".

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस समाजवाद्यांनी मुख्य काँग्रेसमधून बाहेर पडत स्वतःचा वेगळा पक्ष स्थापन केला. यानंतरच्या वर्षांमध्ये त्यांच्यात अनेकदा फूट पडली आणि एकीकरणही झालं. फूट पडलेली असो वा एकजूट झालेली असो, सत्तेत असोत वा सत्तेबाहेर असोत, केंद्रात असोत वा राज्यांत असोत, समाजवाद्यांनी 1950 ते 1970 या दशकांतील राजकीय वादविवादांमध्ये भरीव योगदान दिलं. लोहिया व जयप्रकाश यांसारख्या त्यांच्या नेत्यांना भारतभरात ओळखलं जात होतं व त्यांच्याबद्दल आदराची भावना होती.

लिंगभावात्मक समतेबद्दल कट्टर बांधिलकी, हे या पक्षाचं एक लक्षणीय वैशिष्ट्य होतं. काँग्रेस, जनसंघ व अगदी कम्युनिस्टांशीही तुलना करता समाजवाद्यांमध्ये महिला नेत्यांची अधिक ठळक उपस्थिती दिसते. कमलादेवी चट्टोपाध्याय, मृणाल गोरे व मधु दंडवते यांची पत्नी प्रमिला दंडवते, ही यांपैकी काही उदाहरणं. सांस्कृतिक अवकाशात, विशेषतः नाट्य व संगीत क्षेत्रांमध्ये, तसंच नागरी अधिकार व पर्यावरणवादी चळवळींमध्येही समाजवादी अतिशय सक्रिय होते.

जयप्रकाश नारायण हे मधु दंडवते यांचे आरंभिक काळातील आदर्श होते, आणि त्यांच्याप्रमाणे दंडवत्यांच्या व्यक्तिमत्त्वातही नैतिक व शारीरिक धाडस होतं. लोहियांप्रमाणे ते विद्वान होते. ना.ग. गोरे, एस. एम. जोशी व साने गुरुजी (हे सर्वही दंडवत्यांचे आदर्श होते), यांच्याप्रमाणे दंडवत्यांनी महाराष्ट्रप्रेमाची आणि भारतप्रेमाची सहजपणे सांगड घातली होती. परंतु, इतर समकालीन समाजवाद्यांमध्येही दंडवते एका कारणामुळे विशेष महत्त्वाचे ठरत होते. त्यांनी लाखो भारतीयांच्या जीवनात सुधारणा करण्यासाठी साहाय्य करून व्यावहारिक पातळीवरचा टिकाऊ वारसा मागे ठेवला.

पहिल्या जनता सरकारमध्ये केंद्रीय रेल्वेमंत्री असताना त्यांनी केलेल्या कामातून हे घडलं होतं. दोन वर्षांच्या अल्प कार्यकाळात दंडवत्यांनी मूलगामी प्रभाव टाकला. त्यांनी राज्यसंस्था व रेल्वे कामगार संघटना (1974च्या संपानंतर आणि इंदिरा गांधी यांच्या सरकारने केलेल्या दडपशाहीनंतर ही संघटना कमकुवत झाली होती) यांच्यातील विश्वास पुनर्स्थापित केला, संगणकीकरणाची प्रक्रिया सुरू केली आणि बहुधा सर्वांत महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्या वर्गाच्या रेल्वेडब्यांमध्ये कडक लाकडी पट्ट्यांवर मऊ गादीसारखे कुशन जोडून त्यांचा दर्जा सुधारला. त्यांच्या या तिसऱ्या कर्तबगारीमुळे अब्जावधी लोकांचा रेल्वेप्रवास अधिक सुखकर झाला.

अशी अधिक सुरक्षित व सुखकर आसनव्यवस्था असलेली पहिली ट्रेन 26 डिसेंबर 1977 रोजी सुरू झाली. ती मुंबई व कलकत्ता यांदरम्यानचं अंतर कापत असे. रेल्वे बोर्डाला या ट्रेनला 'ईस्टर्न एक्स्प्रेस' असं नाव द्यायची इच्छा होती. पण रेल्वेमंत्री म्हणून दंडवत्यांनी 'गीतांजली एक्स्प्रेस' हे सर्जनशील नाव वापरत या ट्रेनमध्ये रवींद्रनाथ टागोरांचं पोर्ट्रेट लावलं.

मधु दंडवते हे निर्विवादपणे देशाला लाभलेले आत्तापर्यंतचे सर्वोत्तम रेल्वेमंत्री होते. भारताचंव भारतीयांचं हित होण्याच्या दृष्टीने मोजक्याच केंद्रीय मंत्र्यांचा इतका परिवर्तनकारी प्रभाव पडला असेल. 1947 ते 1950 या काळात गृहमंत्री राहिलेले वल्लभभाई पटेल, 1964 ते 1967 या काळात कृषिमंत्री राहिलेले सी. सुब्रमण्यम, आणि 1991 ते 1996 या काळात अर्थमंत्री राहिलेले मनमोहन सिंग, यांचा सदर यादीत समावेश होईल. नंतरच्या  जनता दल सरकारमध्ये मधु दंडवते अर्थमंत्री होते. त्यादरम्यान, 1990 मध्ये अर्थसंकल्प मांडताना त्यांनी केलेल्या भाषणात पर्यावरणविषयक आव्हानाकडे विशेष लक्ष दिलं होतं. 'आपल्या पर्यावरणासमोरच्या धोक्याकडे आता दुर्लक्ष करता येणार नाही. मातीची झीज, क्षारयुक्तता, वृक्षाच्छादनात झालेली घट, इत्यादींमुळे सुमारे 13 कोटी 90 लाख हेक्टर जमिनीची गुणवत्ता खालावल्याचा अंदाज आहे. विविध कारणांमुळे आपल्या वनांवर दबाव येतो आहे. नागरी भागांमध्ये औद्योगिक वाहतुकीमुळे व इतर स्रोतांमुळे मोठ्या प्रमाणात हवा व पाणी यांचं प्रदूषण होतं आहे. निरोगी पर्यावरण हा जीवनमानाचा भाग आहे आणि उत्पादक पर्यावरण हा विकासाचा पाया आहे. ग्रामविकास व विकेंद्रीकरण यांवर आपण भर दिला तर पर्यावरणविषयक आस्थांचा समावेश विकासाच्या रचनेमध्ये करून घेता येणं शक्य होईल,' असं ते म्हणाले होते. दुर्दैवाने, नंतरच्या सरकारांनी या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केलं. या सरकारांना अनियंत्रित भांडवलशाहीची आणि महाप्रकल्पांची भुरळ पडल्यामुळे आपल्या पर्यावरणाचा विध्वंस झाला. परिणामी, वर्तमानातील व भविष्यातील पिढ्यांना हवा व पाणी प्रदूषणाची धोकादायक पातळी भोगावी लागणार आहे, जलस्रोत रोडावत आहेत, जंगलांचा -हास होतो आहे, माती विषारी होते आहे.

शेवटी दंडवतेंचं आणखी एक अवतरण देतो तेही सध्याच्या काळाला लागू पडणारं आहे. त्यांनी स्वतःच्या आत्मकथनाला ('जीवनाशी संवाद' मराठी अनुवाद) 'जीवनाशी संवाद') लिहिलेल्या प्रस्तावनेमध्ये – 1 जुलै 2005 रोजी, म्हणजे ते ऐंशीच्या घरात असताना लिहिलं होतं : "1984 मधील शीखविरोधी दंगली, बाबरी मशिदीचा विध्वंस आणि अलीकडे सांप्रदायिक जाळपोळीदरम्यान गुजरातमध्ये झालेल्या दंगली, हत्याकांड व लूटमार, यातून धर्मनिरपेक्षतेला मोठा धक्का बसला आहे. भारताच्या स्वातंत्र्यचळवळीदरम्यान अत्यंत काळजीपूर्वक धार्मिक सहिष्णुतेच्या प्रेरणेची जोपासना करण्यात आली होती; आता ही प्रेरणा ढासळून पडली आहे. पण, याच ढासळलेल्या ढिगाऱ्यातून भविष्यात सौहार्दपूर्ण भारताची इमारत उभी राहील. भावोद्रेक क्षणिक असतात, तर सहानुभूती अधिक टिकाऊ असते".

आता आपल्या राजकारणामध्ये हिंदुत्वाला इतकं प्रभुत्व प्राप्त झालेलं आहे की, सहानुभूती व सहभाव यांची कड घेणाऱ्यांना दंडवत्यांच्या आशावादाचं समर्थन करण्यासाठी अभूतपूर्व कष्ट करावे लागणार आहेत.

काँग्रेस, कम्युनिस्ट व हिंदुत्ववादी यांच्या तुलनेत समाजवाद्यांकडे अभ्यासकांचं दुर्लक्ष झालं, या निरीक्षणाने मी माझ्या लेखाची सुरुवात केली. समाजवाद्यांचा अलीकडचा इतिहास तितकासा उदात्त राहिलेला नाही, किंबहुना स्वघोषित समाजवाद्यांच्या एका गटाने हिंदुत्वाला अधिमान्यता मिळवून दिली आणि दुसऱ्या एका गटाने पित्याकडून पुत्राकडे हस्तांतरित होणारे घराणेशाहीचे पक्ष स्थापन केले, हे यामागचं कारण असू शकतं. तरीही, स्वातंत्र्य मिळण्याआधीचं एक दशक आणि स्वातंत्र्यानंतर किमान तीन दशकं समाजवाद्यांनी वैचारिक कल्पकता व वैयक्तिक धाडस दाखवणारा राजकीय प्रवाह सुरू ठेवला होता.

भारतीय समाजवादाचा उदय कसा झाला, त्यांना प्रगल्भता कशी प्राप्त झाली, त्यांनी वैचारिक व सार्वजनिक जीवनात बहुस्तरीय योगदान कसं दिलं, आणि शेवटी उतरती कळा लागून त्यांचा हास कसा झाला, याचा काटेकोर इतिहास अजून लिहिला गेलेला नाही. पण, किमान चरित्रात्मक अभ्यासांच्या बाबतीत काही आश्वासक चिन्हं दिसत आहे. राहुल रामागुंडम यांनी 2022मध्ये जॉर्ज फर्नांडिस यांच्या चढउतारांनी भरलेल्या आयुष्यावर चांगलं संशोधन करून एक पुस्तक प्रकाशित केलं. निको स्लेट यांनी कमलादेवी चट्टोपाध्याय यांचं लक्षवेधी चरित्र लिहिलं आहे, त्याचं हस्तलिखित माझ्याकडे वाचनासाठी आलं असून या वर्षात हे पुस्तक प्रकाशित होईल. अक्षय मुकुल जयप्रकाश नारायण यांच्याविषयी सखोल संशोधनात गढले असून त्यातून निश्चितपणे एक भरीव चरित्रग्रंथ सिद्ध होईल. या आश्वासक खुणांच्या पावलांवर पाऊल ठेवून आणखी कोणा बुद्धिमान व मेहनती अभ्यासकाला मधु दंडवते, किंवा कदाचित मधु व प्रमिला दंडवते यांच्या एकत्रित चरित्रावर काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, अशी मला आशा वाटते.

(अनुवाद - प्रभाकर पानवलकर) 

 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

रामचंद्र गुहा,  बंगळुरू, कर्नाटक ( 283 लेख )

भारतीय इतिहासकार व लेखक. समकालीन सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक विषयांवर तसेच पर्यावरणावर आणि क्रिकेटच्या इतिहासावर लेखन. 




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी