डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

‘परमेश्वराला रिटायर करा’ची कूळकथा आणि उत्तरकथा (पूर्वार्ध)

डॉक्टरांचा ‘परमेश्वराला रिटायर करा’ हा लेख 24 नोव्हेंबर 1991 रोजी दै. ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ‘मैफल’ या रविवार पुरवणीत ‘कव्हर स्टोरी’ म्हणून प्रकाशित झाला. आणि तेव्हापासून हे विधान एखाद्या ‘मोस्ट कोटेबल कोट’सारखं त्यांच्या नावाशी निगडित झालं. आजही अनेक वेळा त्याचा दाखला दिला जातो.पण मुळात गोष्ट अशी आहे की, हे विधान डॉक्टरांचं नव्हतंच. त्यांनी ते केलेलं नव्हतं. त्यांनी जो लेख ‘म.टा.’मधे लिहिला, त्याचं शीर्षक त्यांनी दिलेलं नव्हतं. किंबहुना त्या लेखातही या विधानाचा कुठंही उल्लेख नव्हता. (पण त्यांची तीच भूमिका होती!) मुळात तो लेखच नव्हता. तो त्यांनी एका पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेचा संपादित अंश होता. त्याला शीर्षक देताना ‘म.टा.’च्या ‘मैफल’ पुरवणीचे तत्कालीन संपादक अशोक जैन यांनी ते शीर्षक दिलं होतं. 

1.

आज रंगकर्मी, सिनेअभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचा दुसरा स्मृतिदिन. मराठी नाटक, मराठी व हिंदी सिनेमा यांतील डॉक्टरांच्या योगदानाविषयी त्यांच्या हयातीत आणि निधनानंतरही बरंच लिहिलं गेलं आहे. ‘आम्हांला भेटलेले डॉ. श्रीराम लागू’ (2002) या त्यांच्या पंचाहत्तरीनिमित्त प्रकाशित झालेल्या ग्रंथातून आणि ‘लमाण’ (2004) या त्यांच्या आत्मचरित्रातून त्याविषयीचे तपशील आजही जाणून घेता येतात. त्याचबरोबर डॉक्टरांनी महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रातही मोलाचं कृतिशील योगदान दिलं आहे. ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ या डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या संस्थेमधे सुरुवातीपासूनच ते सक्रियपणे सहभागी होते. अंनिसच्या कामासाठी त्यांनी महिन्यातले दोन दिवस कित्येक वर्षं राखीव ठेवलेले असायचे.

पण त्याचबरोबर डॉक्टरांनी महाराष्ट्राच्या वैचारिक विश्वातही उलथापालथ घडवून आणण्याचा प्रयत्न जवळपास 30 वर्षं सातत्यानं केलेला दिसतो. तो म्हणजे त्यांनी ‘परमेश्वराला रिटायर करा’ अशी थेट, स्पष्ट, प्रवाहाविरुद्ध जाणारी नि:संदिग्ध भूमिका घेतली आणि पुढं आयुष्यभर त्याचा पाठपुरावा केला. देव-धर्म या मुळात अतिशय संवेदनशील आणि स्वभावत:च स्फोटक संकल्पना आहेत. देव-धर्माविषयीच्या अंधश्रद्धेनं माणसांची मनं पिढ्यान्‌पिढ्या इतकी भारून टाकली गेली आहेत की, डॉक्टरांची खणखणीत, सणसणीत आणि दणदणीत भूमिका महाराष्ट्राच्या पचनी पडणं शक्यच नव्हतं.

डॉक्टरांची भूमिका अतिशय धाडसी होती. त्यामुळं तिचा उपसर्ग होणं क्रमप्राप्तच होतं. तो डॉक्टरांना झालाही. पण कुठल्याही धर्मांध शक्तींपुढं झुकण्याचा डॉक्टरांचा स्वभावच नव्हता. नटानं 'Athlete philosopher'  असलं पाहिजे, असं सांगणाऱ्या त्यांच्या भूमिकेशी ते सुसंगतच होतं. बुद्धिप्रामाण्यवादातून एकदा विचारपूर्वक स्वीकारलेल्या भूमिकेपासून डॉक्टर कधीही विचलित झाले नाहीत. सिने-नाट्य कलावंत म्हणून त्यांना जी समाजमान्यता मिळाली होती, तिचा वापर त्यांनी आपली भूमिका समाजासमोर मांडण्यासाठी केला. त्यासाठी लोकापवादाचा विचार केला नाही. त्यांच्यासारख्या कलावंतानं देवासारख्या अतिशय संवेदनशील विषयावर समाजाशी भांडण उभं केलं होतं. 

डॉक्टरांची ही भूमिका हा त्यांच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा ‘टर्निंग पॉइंट’ आहे. त्याची सुरुवात, त्यानंतर त्याचे त्यांच्यावर, अंनिसवर आणि महाराष्ट्रीय समाजमनावर झालेले परिणाम, याचा मागोवा घेण्यासाठी हा लेखनप्रपंच.

डॉक्टरांचा ‘परमेश्वराला रिटायर करा’ हा लेख 24 नोव्हेंबर 1991 रोजी दै. ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ‘मैफल’ या रविवार पुरवणीत ‘कव्हर स्टोरी’ म्हणून प्रकाशित झाला. आणि तेव्हापासून हे विधान एखाद्या ‘मोस्ट कोटेबल कोट’सारखं त्यांच्या नावाशी निगडित झालं. आजही अनेक वेळा त्याचा दाखला दिला जातो.

पण मुळात गोष्ट अशी आहे की, हे विधान डॉक्टरांचं नव्हतंच. त्यांनी ते केलेलं नव्हतं. त्यांनी जो लेख ‘म.टा.’मधेे लिहिला, त्याचं शीर्षक त्यांनी दिलेलं नव्हतं. किंबहुना त्या लेखातही या विधानाचा कुठंही उल्लेख नव्हता. (पण त्यांची तीच भूमिका होती!) मुळात तो लेखच नव्हता. तो त्यांनी एका पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेचा संपादित अंश होता. त्याला शीर्षक देताना ‘म.टा.’च्या ‘मैफल’ पुरवणीचे तत्कालीन संपादक अशोक जैन यांनी ते शीर्षक दिलं होतं.

त्याचा खुलासा जैनांनी नंतरच्या काळात दोन वेळा केला. 2002 मधे डॉक्टरांच्या पंचाहत्तरीनिमित्त ‘आम्हांला भेटलेले डॉ. श्रीराम लागू’ हे प्राध्यापक व नाट्यसमीक्षक पुष्पा भावे यांनी संपादित केलेलं पुस्तक रोहन प्रकाशनाकडून प्रकाशित झालं. त्यात जैनांचा एक लेख आहे. त्यात त्यांनी म्हटलंय की, स्वत:चा किंवा स्वत:वरचा लेख वगैरे छापा, असं सांगणाऱ्या महाभागांपैकी डॉक्टर नव्हते. पण एकदाच त्यांनी ‘माझा एक लेख छापशील का?’ अशी विनंती केली. त्याचा किस्सा मोठा रंजक आहे. नरेंद्र दाभोलकर प्रभृतींसमवेत अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम डॉक्टर हिरीररीनं करत असतात हे सर्वश्रुत आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य करणाऱ्यांचे अहर्णव असलेले डॉ. भोईर यांनी इंग्रजीत लिहिलेल्या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला होता. त्याला प्रस्तावना लिहिण्याची प्रकाशकाची विनंती डॉक्टरांनी मान्य करून प्रस्तावना लिहून दिली होती. या प्रस्तावनेत आपली भूमिका, विचार आपण ठामपणं मांडले असून त्या प्रस्तावनेचा काही भाग लेखरूपानं ‘महाराष्ट्र टाइम्स’मधे प्रसिद्ध झाला, तर जास्तीतजास्त लोकांपर्यंत तो पोचेल, असं डॉक्टरांना वाटत होतं व ते रास्तच होतं. पुस्तक परीक्षणाच्या पानावर आगामी पुस्तकातील एखादं प्रकरण, प्रस्तावना छापण्याची प्रथा आहे. मी ‘पाहतो’ असं म्हटलं. त्यांनी प्रस्तावनेच्या हस्तलिखिताची झेरॉक्स पाठवून दिली. त्या प्रस्तावनेतील विचारांची मांडणी सुस्पष्ट, सुबोध, तर्कसंगत होती. ती वाचून मी अत्यंत प्रभावित झालो. पण ती छापायची तर एक अडचण होती. पुस्तक प्रकाशित होण्याआधी वा त्या सुमारास प्रस्तावना वा त्यातील काही भाग प्रकाशित करण्याची रीत आहे. पुस्तक प्रकाशित झालं आहे किंवा नाही, याचा डॉक्टरांना काहीच थांगपत्ता नव्हता. तीन-चार महिन्यांपूर्वी प्रकाशक त्यांच्याकडून प्रस्तावना घेऊन गेले होते हे खरे, पण नंतर त्यांनी काही संपर्क साधला नव्हता वा प्रकाशित पुस्तकही अजून आणून दिलं नव्हतं. कामाच्या गडबडीत डॉक्टरांना त्या पुस्तकाचं वा प्रकाशकाचं नावही स्मरत नव्हतं. त्यामुळं पुस्तक प्रकाशित झालं आहे की नाही, याचा सुगावा लागणं सोपं नव्हतं, पण प्रस्तावना तर अप्रतिम होती. ‘परमेश्वर या संकल्पनेला रिटायर करावं’ असंच डॉक्टरांनी त्यात सुचवलं होतं. तसंच, ‘त्याऐवजी विज्ञानाच्याही अति आहारी जाऊन त्याचाही परमेश्वर बनवू नका’, असंही त्यांनी सुचवलं होतं. समजा- पुस्तक प्रकाशित झालं असेल तरीही प्रस्तावना छापायचीच, असा निर्णय मी घेतला. तिच्यातील आवश्यक वाटला तो भाग निवडला व त्याला ठसठशीत मथळा दिला, ‘परमेश्वराला रिटायर करा’.

तो लेख प्रसिद्ध होताच एकच खळबळ उडाली. वृत्तपत्रांतून व जाहीर सभांतून त्यावर वादविवाद घडू लागले. मराठी विज्ञान परिषदेनं ‘विज्ञान पत्रिका’ या आपल्या नियतकालिकात हा लेख पुनर्मुद्रित केला. गंमत म्हणजे त्याखाली ‘महाराष्ट्र टाइम्सवरून’ असं त्यांनी नमूद केलं होते. खरं तर मूळ पुस्तकाच्या प्रस्तावनेतून असं म्हणायला हवं होतं. पण मूळ पुस्तक राहिलं बाजूलाच, ‘महाराष्ट्र टाइम्स’मधे लेख प्रसिद्ध झाला व त्याचा काहीसा धक्का देणारा मथळा, यामुळे तो लाखो वाचकांपर्यंत पोचला व गाजला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रचारसभांत अनेक श्रोते डॉक्टरांना या लेखाबद्दल जाब विचारत, तेव्हा ‘‘हा सारा आमच्या अशोक जैनचा फाजीलपणा,’’ असं डॉक्टर मिस्किलपणानं उत्तर देत असत. ‘‘खरं तर मी काहीच केलं नव्हतं. लेखाला नाव देणं (वा ठेवणं) हे संपादकाचं कर्तव्य असतं, ते मी बजावलं इतकंच.’’

18 जून 2012 रोजी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला 50 वर्षं पूर्ण झाली. त्या निमित्तानं 17 जूनच्या ‘संवाद’ या रविवार पुरवणीत जैन यांनी ‘मैफली’चे प्रसन्न पर्व!’ या नावानं एक लेख लिहून त्यांच्या काळातील पुरवणी संपादनाच्या काही आठवणींना उजाळा दिला आहे. त्यात ते म्हणतात की,‐नावं ठेवण्यात मी पटाईत - म्हणजे लेखांची शीर्षकं वगैरे (उगीच गैरसमज नको). प्रख्यात अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांनी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे एक प्रणेते डॉ. कोवूर यांच्या इंग्रजी पुस्तकाच्या मराठी अनुवादास एक प्रस्तावना लिहिली होती. ती प्रस्तावना मराठी वाचकांपर्यंत पोचावी अशी त्यांची इच्छा होती. पण मराठी अनुवाद कोणी केला, पुस्तक प्रसिद्ध झालं की, नाही हे त्यांना काहीच ठाऊक नव्हतं. आगामी पुस्तकाचा काही भाग अथवा त्याची प्रस्तावना छापण्याची पद्धत आहे. पण त्यांना तर काहीच माहीत नव्हतं. प्रस्तावना तर फारच प्रभावी होती. ‘परमेश्वराला रिटायर करा!’ असं शीर्षक देऊन ती छापली गेली. खरं तर सबंध लेखात परमेश्वराला रिटायर करावं, असं एकही वाक्य नव्हतं. पण लेखाचा मध्यवर्ती आशय हाच होता. देवाची कर्मकांडे करत बसू नका, विज्ञानवादी व्हा, पण विज्ञानाचेदेखील स्तोम माजवू नका, त्याचा देव करू नका, असं त्यांनी म्हटलेलं होतं. तो लेख मी दिलेल्या शीर्षकासह अत्यंत गाजला. लागूंविरुद्ध टीकेचं मोहोळच उठलं. अजूनही या लेखाचा कुठं न कुठं उल्लेख होतोच.

जैनांच्या पहिल्या खुलाशात डॉ. भोईर हे नाव चुकून लिहिलं गेलं असावं किंवा ती मुद्रितशोधनातली चूक असावी. ‘डॉक्टरांना त्या पुस्तकाचं वा प्रकाशकाचं नावही स्मरत नव्हतं’ या विधानाचा अर्थ असा की, त्या पुस्तकाचं मराठी नाव त्यांना आठवत नव्हतं. कारण त्यांनी जो डॉक्टरांच्या प्रस्तावनेचा संपादित अंश ‘म.टा.’मधे छापला, त्याच्या शेवटी ‘डॉ.अब्राहम कोवूर यांच्या "Gods, demons and Spirits' या पुस्तकाचा प्रा. सी. भा. दातार यांनी मराठीत अनुवाद केला असून तो लौकरच प्रसिद्ध होत आहे. त्या पुस्तकाला डॉ. श्रीराम लागू यांनी लिहिलेल्या चिकित्सक प्रस्तावनेतील हा काही भाग’ अशी संपादकीय टीप आहे. अर्थात या दोन्ही चुका त्यांनी दुसऱ्या खुलाशात दुरुस्त केल्या आहेत.

डॉक्टरांनी ही प्रस्तावना ‘म.टा.’कडं दिली, तेव्हा त्यांच्या हाताशी पुस्तकाची प्रत नव्हती. हा लेख प्रसिद्ध झाल्यावर तरी अनुवादक वा प्रकाशकांनी पुस्तकाच्या प्रती डॉक्टरांना दिल्या असाव्यात, असं गृहीत धरलं, तरी 2003-06 दरम्यान पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमातही डॉक्टरांनी ‘हे पुस्तक प्रकाशित झालं की नाही, मला आजही माहीत नाही. लेखक वा प्रकाशकांनी त्याची प्रत मला दिली नाही’, असं जाहीरपणं सांगितलं होतं. प्रत्यक्षात हा अनुवाद मनोविकास प्रकाशनाच्या अरविंद पाटकर यांनी प्रकाशित केला होता. या बाबत त्यांच्याशी मागच्या महिन्यात बोललो, तेव्हा त्यांनी सांगितलं की, तेव्हा डॉक्टर मुंबईत, वांद्रा इथं राहत असत. अनुवादक व मी आम्ही त्यांच्या घरी जाऊन त्यांना पुस्तकाच्या दोन प्रती दिल्या होत्या. म्हणजे इथं काहीतरी समजुतीचा घोटाळा झालेला दिसतो. त्यांनी खरोखरच प्रती दिल्या असतील, तर त्या डॉक्टरांच्या घरून गहाळ झाल्या असाव्यात. कारण या अनुवादावर पुस्तक प्रकाशनाची तारीख आहे 15 जून 1990. अनेकदा पुस्तकावर ते कधीपर्यंत छापून येईल याचा साधारण अंदाज घेऊन तारीख टाकली जाते, पण ऐन वेळी काही तांत्रिक वा इतर अपरिहार्य कारणांमुळं पुस्तक छपाईला उशीर होतो. त्यामुळं पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर जवळपास दीड वर्षानं त्याची प्रस्तावना ‘म.टा.’मधेे छापून आली, असं गृहीत धरण्याचं काही कारण नाही. कदाचित पुस्तक वेळेत छापून आलं असावं आणि त्याच्या डॉक्टरांना दिलेल्या प्रती गहाळ झाल्या असाव्यात. पण त्यांना पुस्तकाचं वा प्रकाशकाचं नाव आठवत नसल्यानं त्यांनी प्रस्तावनेची हस्तलिखित प्रतच ‘म.टा.’ला पाठवली असावी.

2.

डॉक्टर तसे लहानपणापासूनच बुद्धिप्रामाण्यवादी आणि नास्तिक होते. पुढच्या आयुष्यात त्यांच्यावर बर्ट्रांड रसेल यांच्या विचारांचा खूपच प्रभाव पडला. रसेल यांच्या ‘मॅरेज अँड मॉरल्स’ या पुस्तकानं आपण आतून हलून गेलो, असं त्यांनी अनेक वेळा जाहीरपणे सांगितलंही होतं. पण नाटक-सिनेमा या क्षेत्रात कार्यरत असल्यानं श्रद्धा-अंधश्रद्धा, देव-धर्म, कर्मकांड वगैरे गोष्टींबाबतची आपली मतं समाजासमोर जाहीरपणे मांडण्याची फारशी संधी त्यांना मिळत नव्हती. ‘सामाजिक कृतज्ञता निधी’ (1987) या उपक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टरांनी काम सुरू केल्यानंतर आणि डॉ. नरेंद्र दाभोलकरांशी संपर्क आल्यानंतर त्यांच्या मनातील विचारांनी उसळी घेतली. त्याचं पहिलं प्रतिबिंब 1989मधेे प्रकाशित झालेल्या ‘तिमिरभेद’ या पुस्तकातल्या डॉक्टरांच्या मुलाखतीत दिसतं.

अंधश्रद्धांना तर्कसंगत उत्तरं देणारं हे पुस्तक डॉ. अंजली सोमण यांनी संपादित (आणि मनोविकास प्रकाशनानं प्रकाशित) केलं आहे. त्यासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर व कृष्णराव लंके यांनी डॉक्टरांची ‘मी बुद्धिप्रामाण्यवादी कसा झालो?’ या विषयावर एक छोटीशी मुलाखत घेतली. त्यात त्यांनी रोखठोक व तर्कसंगत मतं मांडली आहेत. केवळ तेवढंच नाही तर ते दाभोलकरांना म्हणाले की, सवड मिळाली तर महाराष्ट्रभर ही मतं जाहीरपणं मांडण्याची माझी इच्छा आहे. त्यानंतर भरपूर शिव्या खाण्याची तयारी मी अर्थातच ठेवली आहे.

त्या वेळी डॉक्टर अंनिसच्या कार्यक्रमांमधे सहभागी होऊ लागले होते. त्यांच्या या सक्रियतेमुळं डॉ. अब्राहम कोवूर यांच्या मराठीत अनुवादित होत असलेल्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिणार का, म्हणून अनुवादक व प्रकाशक यांच्याकडून त्यांना विचारणा झाली असावी. बुद्धिवादाचे प्रखर वक्ते व प्रचारक डॉ. कोवूर यांच्या कामाबाबत डॉक्टरांना माहिती असल्यानं त्यांनी लगेच होकार दिला आणि तत्परतेनं प्रस्तावनाही लिहून दिली. 

तेव्हा मनोविकास प्रकाशन ही संस्था फार नियमितपणं पुस्तक प्रकाशित करत नव्हती. त्यांची काही पुस्तकं प्रकाशित झालेली असली तरी तिचं फारसं नाव झालेलं नव्हतं. त्यामुळंच खरं तर ते डॉक्टरांच्या फार लक्षात राहिलं नसावं. पण छापील पुस्तकाबाबत नंतर त्यांना काहीच समजलं नाही आणि प्रस्तावनेचा विषय तर महत्त्वाचा होता. तो शक्य तितक्या लवकर लोकांसमोर यावा, असं डॉक्टरांना वाटल्यामुळं त्यांनी ती प्रस्तावना छापण्याबाबत ‘म.टा.’च्या अशोक जैन यांच्याकडं विचारणा केली.

त्याचे परिणाम काय होणार, याची डॉक्टरांना आधीपासूनच कल्पना होती. किंबहुना त्यावर चर्चा-वादविवाद व्हावेत, असंच त्यांना वाटतं होतं. आणि त्यांच्या अपेक्षेनुसारच घडलं. त्यात ती कव्हर स्टोरी म्हणून छापताना तिला जे शीर्षक दिलं गेलं, त्यात चुकीचं काही नसलं, किंबहुना डॉक्टरांच्या म्हणण्याचाच तो सारांश असला, तरी ते केवळ शीर्षक म्हणून जरा लाउड, प्रक्षोभक झालं होतं. त्यामुळे अपेक्षेनुसार त्यावरून गदारोळ माजला. महाराष्ट्रात मोठीच खळबळ उडाली. त्यातही नाटक-सिनेमांतून मराठी माणसांना माहीत असलेल्या एका अभिनेत्यानं असं म्हणावं, हाही तसा धक्काच होता. त्यामुळं त्यावर हिरीररीनं चर्चा होऊ लागली. अनेक वाचकांनी त्या लेखावरच्या आपल्या प्रतिक्रिया ‘म.टा.’ला पाठवल्या. त्या 151 प्रतिक्रियांमधल्या निवडक प्रतिक्रिया ‘म.टा.’नं 9 फेब्रुवारी 1992 रोजी ‘परमेश्वराला रिटायर करा : ईश्वरी वादंग, काही प्रतिक्रिया’ या नावानं छापल्या.

डॉक्टर हे काही वादग्रस्त विधानं करणारे कलावंत नव्हते. पण तरीही त्यांनी अतिशय समतोल आणि बुद्धिवादी दृष्टिकोनातून लिहिलेल्या या लेखावरही उलटसुलट, बऱ्याचशा टोकाच्या प्रतिक्रिया वाचकांनी कळवल्या होत्या. काहींनी डॉक्टरांवर वैयक्तिक आरोप करायलाही मागंपुढं पाहिलं नाही.

लोकांच्या श्रद्धा वा भावनेविरोधात भूमिका घेतल्यानंतर त्यावर येणाऱ्या प्रतिक्रियांमधेे समतोल फारच कमी असतात. इथं तर डॉक्टरांनी हा प्रकार दुसऱ्यांदा केला होता. सत्तरच्या दशकात पुणेकरांना घाबरून सोडलेल्या, खळबळजनक आणि गाजलेल्या जोशी-अभ्यंकर हत्याकांडातील पाच तरुणांना 28 सप्टेंबर 1978 रोजी सत्र न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली. त्यावर या तरुणांनी उच्च न्यायालयाकडं अपील केलं, तेही फेटाळलं गेलं. नंतर या तरुणांनी राष्ट्रपतींकडं दयेचा अर्ज केला. अर्थात तोही नंतर फेटाळला गेला. (अखेर या पाचही तरुणांना 25 ऑक्टोबर 1983 रोजी फाशी दिली गेली.) पण या सगळ्यांत पाचेक वर्षांचा काळ गेला. या दिरंगाईमुळं जनमत प्रक्षुब्ध होत चाललं होतं. त्याविषयीच्या उलटसुलट चर्चा प्रसार माध्यमांमधून होत होत्या. पुणेकरांचा तर धीरच सुटत चालला होता. याच काळात डॉक्टरांनी ‘या लेकरांना क्षमा करा’ या आशयाचं पत्र ‘म.टा.’कडं पाठवलं होतं. ते छापून आल्यावर आगीत तेल ओतल्यासारखंच झालं. खरं तर डॉक्टरांचा विरोध फक्त फाशी देण्याला होता. आणि या मुलांना आतापर्यंत तुरुंगात राहिल्यामुळं पुरेशी शिक्षा मिळाली आहे, आता त्यांना मोठ्या मनानं माफ करावं, निदान फाशी देऊ नये, असं डॉक्टरांचं म्हणणं होतं. पण प्रक्षुब्ध झालेली मनं डॉक्टरांचं पत्र वाचून अजूनच भडकली. त्यानंतर पुढच्या तीन-चार दिवसांत शंभरपेक्षा जास्त पत्रं म.टा.मधून प्रकाशित झाली. बहुतेकांनी डॉक्टरांचं म्हणणं समजून न घेताच त्यांच्यावर खरपूस टीका केली होती. अनेकांनी त्यांच्यावर वैयक्तिक आरोपही केले होते. ती सगळी पत्रं वाचून डॉक्टरांनी त्यांना सविस्तर उत्तर देत आपली भूमिका अजून स्पष्ट करून सांगायची, असं ठरवलं होतं. पण शेवटच्या दिवशी म.टा.नं ‘हा वाद आम्ही यापुढे संपवलेला आहे’ अशी संपादकीय टीप टाकून एकतर्फीच संपवला. मग डॉक्टरांनीही तो विषय तिथंच सोडून दिला.

आताही काहीसा तसाच प्रकार झाला होता. मात्र अशा प्रकारच्या प्रतिक्रियांची त्यांना आधीपासूनच कल्पना होती.

3.

या लेखावर महाराष्ट्रात वादंग माजलं असलं. त्यावर वाचकांच्या भरपूर प्रतिक्रिया ‘म.टा.’कडं आल्या. त्यातल्या न छापल्या गेलेल्या प्रतिक्रियांची संख्या छापलेल्यांपैकी नक्कीच मोठी असणार. पण समाजमनाच्या दृष्टीनं संवेदनशील विषयावर जेव्हा तर्कसुसंगत पद्धतीनं प्रहार केला जातो, तेव्हा जी खळबळ माजते, त्याचे काही कवडसेच प्रसार माध्यमांतून प्रतिबिंबित होतात. त्यामुळं या लेखावर महाराष्ट्रात खाजगी व जाहीर स्वरूपात मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली. हळूहळू ती थंडावत गेली. दरम्यानच्या काळात डॉक्टरांचा अंनिसच्या कार्यक्रमांतला सक्रिय सहभाग बराच सातत्यपूर्ण झालेला होता. साधारणपणे 1993 मधील गोष्ट. सोलापुरातल्या एका संस्थेनं देव आणि धर्म या विषयांवर एक परिसंवाद ठेवला होता. त्यात डॉक्टर व दाभोलकर यांचा समावेश होता. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा खूप प्रतिसाद मिळाला. पण परिसंवादात एकूण चार वक्ते होते. प्रत्येकाला पंधरा मिनिटं दिलेली होती. हा वेळ तसा अपुरा होता. त्यामुळं लोकांना आवडलेली ही चर्चा केवळ वेळेअभावी नीट होऊ शकली नाही, हे डॉक्टर व दाभोलकर यांना जाणवलं. म्हणून मग दाभोलकरांनी डॉक्टरांना विनंती केली की, या विषयावर जाहीर वादसंवादाचा कार्यक्रम आपण दोघं मिळून करू या. त्यासाठी तुम्ही मला दोन महिन्यांतून एक दिवस द्या. डॉक्टरांनी ते लगेच मान्य करून एका महिन्यातलेच दोन रविवार देण्याचे मान्य केलं. तोवर सिनेमातील कामं डॉक्टरांनी बरीचशी कमी करत आणली होती. त्यामुळं आपली बुद्धिप्रामाण्यवादाविषयीची भूमिका समाजासमोर जाहीरपणे मांडण्याची ही संधी त्यांना हवीच होती.

मग दाभोलकरांनी कार्यक्रमाची आखणी केली. त्याला नाव दिलं- ‘विवेक जागराचा वाद-संवाद’.

1993 ते 1997 या पाच वर्षांच्या काळात महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी (खासकरून जिल्हे व तालुके) या कार्यक्रमाचे शंभरावर प्रयोग डॉक्टर व दाभोलकरांनी केले. ज्या ठिकाणी हा कार्यक्रम ठरत असे, तेथील अंनिसचे कार्यकर्ते याची पुढीलप्रमाणे जाहिरात करत.

विवेक जागराचा एक वाद-संवाद

सहभाग :

सिनेनाट्य क्षेत्रातील नामवंत बुद्धिवादी कलावंत

- डॉ. श्रीराम लागू

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे प्रवक्ते 

- डॉ. नरेंद्र दाभोलकर

परमेश्वराचे अस्तित्व हीच आद्य अंधश्रद्धा

परमेश्वराला रिटायर करा

परमेश्वराधिष्ठित धर्माची गरजच काय? हवा आहे मानवधर्म

प्रत्येक श्रद्धा ही अंधश्रद्धाच असते

- डॉ. श्रीराम लागू

श्रद्धा व अंधश्रद्धा यांत फरक आहे

देवधर्माच्या बाबतीत आम्ही तटस्थ आहोत

खरा प्रश्न आहे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कृतीचा

- डॉ. नरेंद्र दाभोलकर

देवाचे अस्तित्व, धर्माचे प्रयोजन, श्रद्धा-अंधश्रद्धा, धर्मांधता, धर्मनिरपेक्षता, अंधश्रद्धा निर्मूलन या बहुचर्चित विषयावरील जुगलबंदी

आपले प्रश्न पुढील पत्त्यावर पाठवावेत

---

सर्वांना हार्दिक निमंत्रण.

हा कार्यक्रम ज्या ठिकाणी होत असे, तेथील स्थानिक वर्तमानपत्रांना दाभोलकर कधीकधी डॉक्टरांचा प्रस्तावना-लेख पुनर्मुद्रित करण्यासाठी देत. काही वेळा तो छापलाही जात असे. तेव्हा त्यावरही चर्चा होत असे आणि कार्यक्रमाला प्रसिद्धीही.

या कार्यक्रमात डॉक्टर ‘देव हीच मूळ अंधश्रद्धा आहे आणि ती नष्ट केली तर बाकीच्या सर्व अंधश्रद्धा आपोआप नष्ट होतील,’ अशी मांडणी करायचे; तर डॉ. नरेंद्र दाभोळकर ‘अंनिस’ची देव आणि धर्म या बाबतची तटस्थ भूमिका मांडायचे. त्याचा सारांश असा असे की, अंनिसचा देव-धर्माला विरोध नाही. देव आणि धर्म मानणं वा न मानणं हा प्रत्येक व्यक्तीचा घटनात्मक अधिकार आहे. मात्र आपल्या देवा-धर्माच्या संकल्पनेची आपण तटस्थपणे चिकित्सा केली पाहिजे आणि देवा-धर्माच्या नावावर होणाऱ्या शोषणाच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे.

या कार्यक्रमात डॉक्टर अंनिसवरही टीका करायचे. म्हणायचे, ‘‘तुम्ही फक्त वरवरची मलमपट्टी करत आहात, झाडाच्या फांद्या तोडून उपयोग नाही. त्याच्या मुळावरच घाव घातला पाहिजे.’’ डॉक्टर ही भूमिका अंनिसच्या व्यासपीठावरूनच मांडायचे. त्यामुळं पुरोगामी विचारांच्या लोकांचं बळ मिळू लागलं आणि ते अंनिसच्या कामाकडं सहानुभूतीनं पाहू लागले. त्याचा चळवळ वाढवण्यासाठी अंनिसला फायदाच झाला. अर्थात काही धर्मांध संस्था-संघटनांचे प्रतिनिधी या कार्यक्रमात येऊन डॉक्टरांशी वाद घालायचे. त्यातून काही वेळेला संघर्षाचेही प्रसंगही उद्‌भवायचे.

एका कार्यक्रमात तर त्यांच्यावर शारीरिक हल्लाही करण्यात आला. दाभोलकरांना मारहाणही करण्यात आली आणि डॉक्टरांनी जे म्हटलं नाही त्यावरून बराच गदारोळही माजवण्याचा प्रयत्न केला गेला. पण दोघांनी त्याच ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन ‘‘हल्लेबिल्ले झाले, म्हणून आमचे कार्यक्रम बंद होतील, अशा भ्रमात तुम्ही राहू नका. हे कार्यक्रम आम्ही करणारच!’’ असं ठणकावून सांगितलं.

त्यानंतर चार महिन्यांनी कळवणचा कार्यक्रम होऊ देणार नाही, अशी धमकी देण्यात आली. त्याला न घाबरता डॉक्टर व दाभोलकर यांनी तो करायचाच असं ठरवलं. त्यामुळे अंनिस कार्यकर्त्यांनाही उत्साह येऊन त्यांनीही जोरदार तयारी करून तो कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला.

नांदेडच्या कार्यक्रमाला तर शिवसेनेनं होऊ देणार नाही, असा दम दिला होता. त्यामुळं कार्यक्रमाच्या आधी तेथील डीवायएसपीनं येऊन दाभोलकरांना ‘‘देवा-धर्माबद्दल काही बोलू नका, फक्त अंधश्रद्धेबद्दलच बोला,’’ असं सांगितलं. तोवर त्याला डॉक्टरही तिथं आहेत, याची कल्पना नव्हती. त्यांना पाहताच तो वरमला. डॉक्टरांनी त्याला बाणेदारपणे सांगितलं की, ‘‘काय बोलायचं, हे मला चांगलं कळतं आणि काय करायचं ते तुम्हांला!’’

यातून 1996-97मधे औरंगाबादच्या एका कार्यक्रमात डॉक्टरांना धक्काबुक्की करण्यात आली, त्यांच्या तोंडाला काळं फासण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि शिवीगाळही केली गेली. मात्र अशा प्रत्येक प्रसंगाला डॉक्टर अतिशय संयमानं आणि शांतपणे सामोरं जात.

अंनिसच्या इतरही कार्यक्रमांत डॉक्टर सहभागी होत. अंनिसतर्फे सत्यशोधकी लग्नसोहळे आयोजित केले जात. त्यालाही डॉक्टर जात. एकदा तर अंनिसच्या शनी शिंगणापूरच्या सत्याग्रहातही ते सहभागी झाले होते. तिथं सर्वांना अटक करून नगरच्या तुरुंगात टाकलं. पण डॉ. लागूंना अटक केलीय हे कळल्यावर जेलरच्याच बायकोनं त्यांना आपल्या घरी नाष्ट्‌याला बोलवायचा नवऱ्याकडं हट्ट धरला. जेलरचंही या स्त्रीहट्टापुढं काही चाललं नाही.

या सर्व कार्यक्रमांना दाभोलकर डॉक्टरांच्याच कारनं जात असत. अंनिसच्या स्थानिक शाखा त्यांना जमेल तसं मानधन, म्हणजे पेट्रोलचा खर्चही त्यांना देणं शक्य होत नसे. डॉक्टर मात्र कार्यकर्त्यांनी दिलेलं पाकिट उघडून न पाहता खिशात ठेवून देत.

हे सगळं दाभोलकरांनी त्यांच्या ‘लढे अंधश्रद्धेचे’ (साधना प्रकाशन, पुणे, 1999) या पुस्तकातल्या ‘वाद-संवाद : विवेक जागराचा’ या लेखात सविस्तरपणं लिहिलं आहे.

अंनिसचे सांगलीचे कार्यकर्ते डॉ. प्रदीप पाटील यांनीही अशीच एक आठवण त्यांच्या एका लेखात सांगितली आहे. सांगलीच्या कार्यक्रमानंतर डॉक्टरांना लगेच मुंबईला परतायचं होतं. त्यामुळं ते रेल्वे स्टेशनवर आले, तेव्हा 15-20 जणांचं टोळकं ‘जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणा देत आणि डॉक्टरांना शिव्या देत तिथं हजर झालं. त्यांनी डॉक्टरांना शिव्या द्यायला सुरुवात केली. पण डॉक्टर शांत होते. ते जराही घाबरले नाहीत. त्यांच्यातला एक जण ओरडला, ‘‘ए, लागू, चल ‘जय श्रीराम’ म्हण.’’ डॉक्टरांनी मुठी आवळून, हात वर करून घोषणा दिली, ‘जय श्रीराम लागू’. ते टोळकं हातघाईवर आलं. त्यातल्या एकानं डॉक्टरांना धक्काबुक्की केली. तेवढ्यात तिथं आर.आर. पाटील आले. त्यांच्या सोबत पोलिसांचा ताफा होता. डॉक्टरांना पाहून ते त्यांच्याकडं आले, तसं ते टोळकं पसार झालं. आणि पुढचा प्रसंग टळला. जातानाही ते घोषणा देत, ओरडतच गेले. डॉक्टर मात्र शांत होते. डॉक्टरांना सोडायला आलेल्या पण या प्रसंगानं बावरून गेलेल्या प्रदीप पाटील यांना डॉक्टर म्हणाले, ‘‘प्रदीप, धर्मांधांना आयुष्यात कधीही भीक घालायची नाही, हे लक्षात ठेव. समाजसुधारणा ही रोज विस्तवावर चालूनच करावी लागते’’.

या लेखाचा उत्तरार्ध वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


Comments

  1. Ani- 10 Jan 2022

    I personally think that Doctor Lagu might have been closely reading and been influenced by the German philosopher Nitze who said God is dead. Its nothing much. It is just the way to express the same thing in another language.

    save

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके