डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

‘परमेश्वराला रिटायर करा’ची कूळकथा आणि उत्तरकथा (उत्तरार्ध)

मग मी त्याला दुसरं द्यायला सांगितलं. ते होतं,  ‘अंधश्रद्धा व बुवाबाजी यांचा पंचनामा’. हाच 'Gods, demons and Spirits'  या पुस्तकाचा अनुवाद होता. आणि त्याला डॉक्टरांची प्रस्तावना होती. मला खूप आनंद झाला. मी त्याला ताबडतोब त्याची झेरॉक्स करायला सांगितली. मूळ पुस्तकाला डॉक्टरांनी लिहिलेली प्रस्तावना तशी सविस्तर म्हणजे जवळपास छापील साडेनऊ पानांची आहे. ओळींमधे सांगायचं तर 309 ओळींची ही प्रस्तावना आहे. त्यातील जेमतेम 23 ओळी ‘म.टा.’नं संपादित केल्या. म्हणजे जेमतेम 10-12 टक्के मजकूर कमी केला. पण मूळ प्रस्तावना मिळाली आणि आता तिचा डॉक्टरांच्या लेखसंग्रहात समावेश होणार, याचा मला खूप आनंद झाला.
 

या लेखाचा पूर्वार्ध वाचण्यासाठी येथे क्लिक करा. 

4.

डॉक्टरांचा प्रस्तावना-लेख प्रकाशित झाल्यानंतर आणि नंतर त्यांचे दाभोलकरांसोबतचे ‘विवेक जागराचा वाद-संवाद’ कार्यक्रम सुरू झाल्यानंतर त्यांना महाराष्ट्रातल्या काही दिवाळी अंकांच्या संपादकांकडून लेखनासाठी विचारणा होऊ लागली. त्यामुळं त्या माध्यमातूनही डॉक्टरांनी आपली भूमिका तितक्याच स्पष्टपणे मांडल्याचं दिसतं. त्यानंतर लिहिलेल्या जवळपास प्रत्येक वैचारिक लेखात आणि मुलाखतीमधेही डॉक्टरांनी पुन्हा पुन्हा परमेश्वराला रिटायर करण्याच्या गरजेवर आणि बुद्धिप्रामाण्यवादाच्या आवश्यकतेवर भर दिल्याचं दिसतं.

‘सत्याग्रही विचारधारा’च्या 1993च्या दिवाळी अंकात त्यांनी ‘माझी गाफील पिढी’ असा लेख लिहिला आहे. त्यात ते म्हणतात की, मानवी दु:ख दैवजात आहे आणि माणूस पराधीन आहे, हे दैववादाचं तत्त्वज्ञान सामाजिकदृष्ट्या अत्यंत घातक आहे. त्यामुळं समाजाची प्रगतीच होणं शक्य नाही. दैववादातून हताशपणा जन्माला येतो. या समाजाच्या बहुसंख्य समस्यांचं मूळ मला भाबडेपणा, देवभोळेपणा, दैववाद, अंधश्रद्धा, धर्मांधता यांत दिसतं. म्हणून मी निरीश्वरवादाचा पुरस्कर्ता आहे. ईश्वरवादाची जळमटं डोक्यातून काढून टाकून त्या जागी स्वच्छपणे निखळ बुद्धिप्रामाण्यवादाची स्थापना केली, तर ते योग्य दिशेनं टाकलेलं पहिलं पाऊल ठरेल. परंपराग्रस्त झालेल्या, रूढीच्या विळख्यात जखडलेल्या आणि कर्मकांडात अडकलेल्या या समाजाची सोडवणूक करायची असेल, तर ईश्वराची कल्पना त्याच्या डोक्यातून काढून टाकली पाहिजे; तेव्हाच त्याची हतबलता, हताश मनोवृत्ती आणि अकार्यक्षमता यांतून सुटका होईल, म्हणून बुद्धिप्रामाण्यवादाचा हिरीरीने प्रचार केला पाहिजे.

त्याच वर्षी त्यांनी ‘अबकडई’च्या दिवाळी अंकात ‘माझं बुद्धिप्रामाण्य’ हा लेख लिहिला आहे. त्यातही त्यांनी म्हटलं आहे की, ईश्वर ही संकल्पना आपणच निर्माण केली आहे. समजा, एखादं मूल निर्जन बेटावर वाढलं तर त्याच्या डोक्यात ईश्वर ही संकल्पना येईल का? नक्कीच नाही. परमेश्वराची भाविकपणे पूजा करणारी माणसं मला माहीत आहेत. त्यांचा आदर मी करतो. माझी आई गोंधळली होती. तिला वाटायचं, ही एक प्रचंड शक्ती आहे मला तसे परमेश्वराचे काही अनुभव आले नाहीत आणि त्यामुळे मी ‘ईश्वर आहे’ असं म्हणण्याचं धाडस केलं नाही.

त्यानंतर दोन वर्षांनी त्यांनी ‘सत्याग्रही विचारधारा’च्या दिवाळी अंकात ‘विवेकवाद हीच खरी नैतिकता’ हा लेख लिहिला आहे. त्यात त्यांनी शेवटी लिहिलंय की, परमेश्वर हा अनुभूतीशिवाय तुम्हांला कळणार नाही, असं म्हणून विवेकवादाच्या तावडीतून आस्तिकवादी आपली सुटका करून घेतात. आस्तिकवाद्यांचा आज सर्वत्र प्रभाव दिसत असला तरी त्यांचा अस्त अटळ आहे. विज्ञानाचा सूर्य कोणाला झाकता येणार नाही.

त्याच वर्षी म्हणजे 1995च्या दै. ‘लोकसत्ता’च्या दिवाळी अंकातल्या ‘विवेकवादी व्हा!’ या त्यांच्या लेखाची सुरुवातच आहे-  ‘परमेश्वराला रिटायर करा’. हा लेख मी प्रस्तावना म्हणून लिहिला होता. त्याची मांडणी त्या स्वरूपात झाली. तर ते शेवटी म्हणतात- परमेश्वर या कल्पनेवर श्रद्धा असेल, पण ती आंधळी आहे. जे मला व्हेरीफाय करता येते त्याच्यावर माझा विश्वास आहे.

त्यानंतर आठ वर्षांनी डॉक्टरांचा ‘मी परमेश्वर का नाकारतो?’ हा लेख दै. ‘लोकसत्ता’च्या ‘लोकरंग’ (16 फेब्रुवारी 2003) या रविवार पुरवणीत प्रकाशित झाला. त्याच्या इंट्रोमध्ये म्हटलं आहे-  ‘परमेश्वराला रिटायर करा’ असं आवाहन डॉ. श्रीराम लागू यांनी केलं आणि वाद सुरू झाला, त्याला आता बराच काळ लोटला आहे. आता तर वाढत्या अनिश्चिततेच्या, असुरक्षिततेच्या वातावरणात परमेश्वर या संकल्पनेचा आधार घेणाऱ्यांची गरज वाढते आहे, असं दिवसेंदिवस देवळांसमोर वाढणाऱ्या रांगांमधून जाणवत आहे. अशा परिस्थितीत परमेश्वर नाकारणारा बुद्धिप्रामाण्यवाद काय तर्क मांडतो?

डॉक्टर या लेखाच्या सुरुवातीलाच म्हणतात - परमेश्वर म्हणजे एक अतिमानवी अशी शक्ती आहे. तिनं विश्वाची केवळ निर्मितीच केलेली नाही, तर विश्वाची नियंत्रण करणारी ती शक्ती आहे आणि त्या शक्तीला मी शरण गेले पाहिजे. त्या शक्तीचा जर कोप झाला तर माझ्यावर दुर्दैवाचा प्रसंग कोसळेल आणि ती शक्ती जर प्रसन्न झाली तर माझ्या आयुष्याचं कल्याण होईल, ही परमेश्वराविषयी जी संकल्पना आहे, अशा परमेश्वराशी माझं भांडण आहे.

मात्र या लेखात फारसं नवीन काही नाही. वरच्या चार लेखांतीलच काही मुद्दे घेऊन हा लेख लिहिला आहे. प्रत्यक्षात तो डॉक्टरांनी लिहिलेला नाही, तर सांगितलेला लेख आहे आणि त्याचं शब्दांकन सतेज पोटे यांनी केलंय.

2007  मध्ये ग्रंथालीनं ‘लोकोत्तर : गाडगेबाबा - जीवन आणि कार्य’  हे प्रा. द. ता. भोसले यांचं पुस्तक प्रकाशित केलं. या पुस्तकाला डॉक्टरांची छोटीशी प्रस्तावना आहे. त्यात त्यांनी लिहिलंय की, गाडगेबाबांनी समर्पित भावनेनं केलेलं सेवाकार्य खरोखर अपवादात्मक म्हणावं लागेल. त्यांनी आपल्या कार्यातून आणि उपदेशातून कर्मकांडांनी माखलेल्या पूजेचा अर्थ पार बदलून टाकला. त्यांनी देवाविषयीची कल्पना पार बदलून टाकली. देव मूर्तीत नसतो, मंदिरात नसतो, तो तीर्थाटनात भेटत नसतो. तो उपासनेत नसतो, तो गोरगरीब जनतेच्या रूपानं तुमच्या समोर उभा असतो. त्याची केलेली सेवा हीच खरी ईश्वरपूजा होय, हा विचार त्यांनी जनसामान्यांत रुजवला.

त्याच वर्षी 30 मार्च  रोजी पुण्यातल्या ‘अक्षर मानव’ या संस्थेनं विजय तेंडुलकर आणि डॉ. श्रीराम लागू यांच्या  जाहीर मुलाखतीचा कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित केला होता. त्यांच्याशी संवाद साधला संपादक निखिल वागळे यांनी. त्यात एका प्रश्नाला उत्तर देताना डॉक्टर म्हणाले, ‘‘ईश्वर हीच मुळी कल्पना आहे, ती वस्तुस्थिती नाही.’’ वैयक्तिक आयुष्यात अकाली मृत्यूचा अनुभव घेतल्यानंतर आयुष्याकडं बघण्याची दृष्टी वेगळी होते का, या पुढच्या प्रश्नावर डॉक्टरांनी सांगितलं की, मुंबईच्या लोकलमधून प्रवास करत असताना बाहेरून आलेला दगड डोक्याला लागून माझ्या मुलाचं निधन झालं. यात दोष कुणाचा? कुणाला शिक्षा करणार? मी एवढाच विचार केला, अरेच्चा! इतका नेम धरून फक्त परमेश्वरच मारू शकतो. तेव्हा असेल बाबा तो! त्याशिवाय इतकं निष्ठुर कोणी असू शकत नाही. पण याच्या पलीकडं मला माझ्या जीवनात विचलित झाल्याचं आठवत नाही.

2007चा ‘पुण्यभूषण’ पुरस्कार डॉक्टरांना जाहीर झाला होता. त्याच्या कार्यक्रमात मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी त्यांना विचारलं की, जब्बार पटेल यांच्या एका नाटकात तुम्ही विठ्ठलासमोर उभं राहता- असा एक प्रसंग आहे. तुम्ही तिथं स्क्रिप्टची गरज असलेले अभिनेते म्हणून उभे होतात की, भक्त म्हणून? त्यावर डॉक्टर तत्परतेनं म्हणाले होते - ‘‘मी तिथं पांडुरंग नावाच्या एका दगडी मूर्तीसमोर उभा होतो.’’

28 नोव्हेंबर 2009 रोजी ‘आयबीएन-लोकमत’ या वृत्तवाहिनीवर संपादक निखिल वागळे यांनी ‘ग्रेट भेट’ या कार्यक्रमात डॉक्टरांची मुलाखत घेतली. त्यातही त्यांनी ‘परमेश्वराला रिटायर करा’ या भूमिकेवर आपण आजही ठाम असल्याचं सांगितलं. 16 नोव्हेंबर 2018 रोजी डॉक्टरांचा 91वा वाढदिवस होता. त्या निमित्तानं पुण्याच्या दै. ‘लोकमत’नं त्यांची मुलाखत घेतली होती. त्या बातमीतही त्यांनी ‘परमेश्वराला रिटायर करा’ या माझ्या विधानावर मी आजही ठाम आहे. ते विधान मागं घेण्याचं काहीच कारण नाही,’ असंच नि:संदिग्धपणे सांगितलं होतं.

अंनिसच्या 2014-15च्या पुण्यातील रौप्य वर्षपूर्तीच्या कार्यक्रमातही डॉक्टरांनी ‘‘परमेश्वराला रिटायर केल्याशिवाय अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम पूर्ण होणार नाही,’’ असं म्हटलं होतं.

17 डिसेंबर 2019 रोजी डॉक्टरांचं पुण्यात वयाच्या 92व्या वर्षी निधन झालं. दुसऱ्या दिवशी त्याविषयीच्या बातम्या महाराष्ट्रातील प्रसार माध्यमांमधे प्रकाशित झाल्या. त्यातल्या बहुतेकांनी ‘परमेश्वराला रिटायर करा’ या डॉक्टरांच्या विधानाचा उल्लेख या ना त्या प्रकारे केला होता.

5.

1991 मधे घेतलेल्या भूमिकेचा डॉक्टर

2014-15पर्यंत वेळ आणि संधी मिळेल तेव्हा प्रचार-प्रसार करत राहिले. त्यामुळं असा प्रश्न पडतो की, इतका काळ हे चालू राहिलं तर ज्या प्रस्तावना-लेखापासून हे सगळं सुरू झालं, त्या डॉ. कोवूर यांच्या अनुवादित पुस्तकाला याचा काही फायदा झाला का? त्याच्या चार-सहा आवृत्त्या या काळात सहज खपल्या असतील. पण तसं काहीच घडलं नसल्याचं दिसतं. या पुस्तकाची पहिली आवृत्ती संपायलाही बराच काळ लागला. त्याविषयी मनोविकास प्रकाशनाचे अरविंद पाटकर सांगतात की, त्या वेळी अनेक दुकानदार या विषयांवरील पुस्तकांची विक्री करण्यास उत्सुक नसत. पण तेव्हा अंनिसची चळवळ जोरात सुरू होती. त्यामुळं चळवळ आणि चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या जिवावरच ही पुस्तकं विकली जात असत.

दुसरी गोष्ट अशी की, डॉक्टरांनी व दाभोलकरांनी कार्यक्रम केले असले तरी ते देव, श्रद्धा-अंधश्रद्धा आणि बुद्धिप्रामाण्यवाद यांच्याविषयीचे वाद-प्रतिवादाचे होते. त्यांचा फोकस कोवूर यांचं पुस्तक किंवा डॉक्टरांची प्रस्तावना हा नव्हता. त्यामुळं अनेकदा या कार्यक्रमांत त्या पुस्तकाचा उल्लेख डॉक्टर व दाभोलकर यांच्याकडून केला गेला नाही.

या सगळ्यांमुळं ते पुस्तक जे बाजूला पडलं ते पडलंच. तरी कोवूर यांच्या या अनुवादित पुस्तकाची अंनिसच्या कार्यकर्त्यांमुळे पहिली आवृत्ती लवकर संपली असं म्हणता येईल. पण ती बहुधा रडतखडतच संपली असावी, कारण ती लवकर संपली असती तर त्याची दुसरी आवृत्ती नक्कीच प्रकाशित झाली असती. पण तसं काही झालं नाही. पहिल्या आवृत्तीनंतर हे पुस्तक बाजारातून नाहीसं झालं. हळूहळू ते लोकांच्या विस्मरणातूनही गेलं आणि डॉक्टरांचं ‘परमेश्वराला रिटायर करा’ हे विधानच तेवढं स्मरणात राहिलं.

त्यानंतर 2009 मधे जेव्हा पॉप्युलर प्रकाशनानं डॉक्टरांच्या निवडक लेख व मुलाखतींचं पुस्तक करत असल्याचं जाहीर केलं, तेव्हा या कथेचा उपसंहार घडून आला.

तर त्याचं असं झालं...

2009 मधे पॉप्युलर प्रकाशनाच्या ‘प्रिय रसिक’ या मासिक गृहपत्रिकेत डॉ. लागूंच्या निवडक लेख व मुलाखतींचा संग्रह आम्ही प्रकाशित करत आहोत. कुणाकडे त्यांचे लेख वा मुलाखती असतील तर संपर्क साधावा, असं निवेदन सलग दोन-तीन महिने प्रकाशित होत होतं. ते मी वाचत होतो. त्या काळी मी अनेक मराठी लेखक-अभ्यासकांची पुस्तकं, त्यांचे वेगवेगळ्या नियतकालिकांत प्रकाशित झालेले लेख, मुलाखती यांचा संग्रह करत होतो. डॉ. लागूंची तोवर ‘वाचिक अभिनय’ (1998) आणि ‘लमाण’ (2004) ही दोनच पुस्तकं प्रकाशित झालेली होती. पहिलं नावाप्रमाणे अभिनयाविषयी होतं, तर दुसरं आत्मचरित्र. त्याआधी त्यांनी उगो बेट्टी या इटालिअन नाटककाराच्या 'The Queen and the Rebels'  या नाटकाचा ‘एक होती राणी’ (1964) या नावानं केलेला अनुवाद प्रकाशित झाला होता, पण तो ‘आउट ऑफ प्रिंट’ होता. डिसेंबर 2002 मधे डॉक्टरांच्या पंचाहत्तरीनिमित्त ‘आम्हांला भेटलेले डॉ. श्रीराम लागू’ हा विविध मान्यवरांनी त्यांच्याविषयी लिहिलेल्या लेखांचा संग्रह प्रकाशित झाला होता. तो वाचून तर त्यांच्याबद्दलची उत्सुकता आणखीनच वाढली होती. त्यामुळं मी डॉक्टरांचे मिळतील ते लेख, मुलाखती जमवत होतो. एकंदर 30-35 लेख-मुलाखती मी मिळवल्या होत्या. म्हणून ‘प्रिय रसिक’मधलं आवाहन दोन-तीन वेळा वाचल्यानंतर मला असं वाटलं की, पॉप्युलर त्यांचं पुस्तक काढतच आहे, तर आपल्याकडील लेख-मुलाखती दिल्या तर त्यांचा त्या संग्रहात समावेश होईल. न जाणो त्यांना त्यातला एखादा लेख वा मुलाखत मिळालीही नसेल.

मी माझ्याकडच्या सर्व लेख-मुलाखतींच्या झेरॉक्स काढल्या आणि 17 मार्च 2009 रोजी पॉप्युलरच्या अस्मिता मोहिते यांना फोन करून त्यांच्या ऑफिसमधे भेटायला गेलो. माझ्याकडं असलेल्या दहा लेख-मुलाखतींच्या झेरॉक्स प्रती त्यांना दिल्या. पण त्यातल्या काही लेख व मुलाखती त्यांच्याकडेही होत्या. मात्र डॉक्टरांचा ‘विवेकवाद हीच खरी नैतिकता’ (‘सत्याग्रही विचारधारा’, दिवाळी 1995) हा लेख आणि अणुबॉम्बच्या पन्नाशीच्या निमित्तानं त्यांनी ऑर्थर कोत्स्लरच्या 'Janus : A Summing Up' (1978) या पुस्तकाच्या प्रास्ताविकाचा ‘नवे कॅलेंडर’ (‘सत्याग्रही विचारधारा’, दिवाळी 1996) या नावानं केलेला अनुवाद, याची त्यांना काहीच माहिती व कल्पना नव्हती. त्यांचं लेख जमवण्याचं काम चालूच होतं, पण डॉक्टरांच्या या लेखाबाबतचे उल्लेख त्यांनी तोवर कुणाकडून ऐकलेलेही नव्हते. त्यामुळं अर्थातच मलाही बरं वाटलं. आपली धडपड अगदीच वाया गेली नाही, याचं समाधान वाटलं. मोहिते मॅडमनी मला त्या सगळ्या झेरॉक्सचे पैसेही देऊ केले, पण मी इतक्या आनंदात आणि उत्साहात होतो की, मी ते घेतले नाहीत. उलट मीच त्यांना विचारलं की, अजून कुठले लेख वा मुलाखती तुम्हांला मिळालेल्या नसतील तर मला सांगा, मी प्रयत्न करून पाहतो. बोलता बोलता ‘परमेश्वराला रिटायर करा’ या लेखाचा विषय निघाला. त्यांनी ‘म.टा.’ची झेरॉक्स प्रत दाखवली. मूळ लेख मोहिते यांना मिळत नव्हता. डॉक्टरांकडं आणि अशोक जैन यांच्याकडेही त्याची मूळ प्रत नाहीये, असं त्यांनी सांगितलं. त्यावर ‘प्रयत्न करून पाहतो’ असं मी त्यांना सांगितलं.

खरं तर तो लेख मलाही कितीतरी दिवसांपासून वाचायचा होता. त्यामुळं त्याची उत्सुकता होतीच. आता ते शोधायचं निमित्त मिळालंय तर ‘पाहू प्रयत्न करून’ म्हणून मी कामाला लागलो. मात्र तेव्हा मला डॉ. अब्राहम कोवूर यांच्याबद्दल काहीही माहीत नव्हतं. त्यांचं नावही मी कधी ऐकलं नव्हतं. माझा अंनिसशी काही संबंध नव्हता. पण डॉ.लागूंची प्रस्तावना वाचल्यावर असं वाटलं की, या पुस्तकाचा मराठी अनुवाद अंनिसशी संबंधित एखाद्या कार्यकर्त्यानं केला असावा. तेव्हा माझा मित्र विनोद शिरसाठ ‘साधना’ साप्ताहिकाचा युवा संपादक म्हणून काम करत होता आणि अंनिसचे डॉ. नरेंद्र दाभोलकर ‘साधना’चे संपादक होते. त्यामुळं मी विनोदशी बोलायचं ठरवलं. तो म्हणाला, ‘‘अंनिसच्या जुन्या कार्यकर्त्यांना विचारलं पाहिजे. त्यांच्यापैकीच कुणी सांगू शकलं तर सांगू शकेल.’’ त्यानं काही व्यक्तींची नावं व नंबरही दिले. मी त्यांच्याशी बोललो, पण कुणालाच त्या पुस्तकाबाबत काही माहिती नव्हती.

गंमत पहा, एवढा गाजलेला लेख, त्याचं निमित्त साधून नंतर डॉक्टरांनी दाभोलकरांसोबत महाराष्ट्रभर कार्यक्रम केले. त्यानंतरच्या आपल्या लेख-मुलाखतींमधून त्या लेखाचा या ना त्या प्रकारे उल्लेखही केला होता, पण तरीही ती प्रस्तावना नेमकी कुठल्या पुस्तकात आहे किंवा त्या पुस्तकाचं नाव काय आहे, याची फारशी कुणाला माहितीही नव्हती. शेवटचं नाव होतं, सांगलीच्या डॉ. प्रदीप पाटील यांचं. ‘लास्ट ट्राय’ म्हणून त्यांना फोन केला. ते म्हणाले, ‘‘ते डॉ. अब्राहम कोवूर यांचं पुस्तक आहे. त्याची प्रत आहे माझ्याकडे. आता मी क्लिनिकमध्ये आहे. घरी गेल्यावर पुस्तक पाहून तुम्हांला त्याचं नाव सांगतो.’’ मी एकदम खूश झालो. संध्याकाळी पाटलांना परत फोन केला. तेव्हा ते म्हणाले, ‘‘मी खूप शोधलं, पण पुस्तक काही मिळत नाहीये. माझ्याकडं ते नक्की होतं, पण कुणीतरी घेऊन गेलंय बहुधा.’’

माझी निराशा झाली. इतकी फोनाफोनी करून हाताशी काय लागलं तर फक्त डॉ. कोवूर यांच्या पुस्तकाची माहिती. अर्थात ती मला आधीपासूनच होती. आता पुस्तक कसं शोधायचं? बराच विचार केल्यावर मला मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची आठवण झाली. तिथल्या संदर्भ विभागात नाममात्र शुल्क भरून तुम्हांला हवं ते पुस्तक तिथं बसून वाचता येतं. शिवाय सबंध पुस्तक किंवा त्यातील काही भाग, नियतकालिकातील लेख यांच्या झेरॉक्सही सशुल्क मिळतात. तिथं तसा मी बऱ्याचदा जात असल्यानं ओळखी झाल्या होत्या. दुसऱ्या दिवशी मी तिथं गेलो आणि काउंटरवरल्या मुलाला डॉ. अब्राहम कोवूर यांची पुस्तकं मागितली. त्यानं नेमकं नाव विचारलं, पण ते माझ्याकडं नव्हतं. मग मी त्याला सांगितलं, ‘‘कोवूर यांची जेवढी पुस्तकं असतील तेवढी दे’’. पण एकाच वेळी एकच पुस्तक घेता येत होतं. त्यामुळे त्यानं पहिल्यांदा ‘बुवा-मांत्रिकांचा अस्त’ हे पुस्तक आणून दिलं. त्यात डॉक्टरांची प्रस्तावना नव्हती. मग मी त्याला दुसरं द्यायला सांगितलं. ते होतं,  ‘अंधश्रद्धा व बुवाबाजी यांचा पंचनामा’. हाच 'Gods, demons and Spirits'  या पुस्तकाचा अनुवाद होता. आणि त्याला डॉक्टरांची प्रस्तावना होती. मला खूप आनंद झाला. मी त्याला ताबडतोब त्याची झेरॉक्स करायला सांगितली.

मूळ पुस्तकाला डॉक्टरांनी लिहिलेली प्रस्तावना तशी सविस्तर म्हणजे जवळपास छापील साडेनऊ पानांची आहे. ओळींमधे सांगायचं तर 309 ओळींची ही प्रस्तावना आहे. त्यातील जेमतेम 23 ओळी ‘म.टा.’नं संपादित केल्या. म्हणजे जेमतेम 10-12 टक्के मजकूर कमी केला. पण मूळ प्रस्तावना मिळाली आणि आता तिचा डॉक्टरांच्या लेखसंग्रहात समावेश होणार, याचा मला खूप आनंद झाला. दुसऱ्या दिवशी पॉप्युलरमधे जाऊन अस्मिता मोहिते यांना ती देऊन आलो.

इतके दिवस आपण ज्या लेखाचं नुसतं नाव ऐकून होतो, तो अखेर आपल्याला मिळाला, याचा मला इतका आनंद झाला होता की, विचारू नये. पुस्तकात अनुवादक प्रा. सी. भा. दातार यांचा पत्ताही होता  ‘14/321, विजयनगर सोसायटी, स्वामी नित्यानंद मार्ग, अंधेरी (पूर्व), मुंबई-400069.’ तो मी लिहून घेतला. पण तो पॉप्युलरला देण्याऐवजी उत्साहाच्या भरात मीच त्यांना पत्र लिहून कळवलं की, पॉप्युलर प्रकाशन डॉक्टरांच्या लेख-मुलाखतींचा एक संग्रह प्रकाशित करत आहे. त्यात तुमच्या अनुवादाला डॉक्टरांनी लिहिलेली प्रस्तावना घेतली जाणार आहे. हे दातार कोण हेही मला माहीत नव्हतं. आणि ही नसती उठाठेव करायचीही मला काहीच गरज नव्हती. पण मी भानावरच नव्हतो. त्यांना पत्र लिहून मोकळा झालो. पंधरा-वीस दिवसांनी दातारांचं मला पत्र आलं-

श्री. राम जगताप यांना स.न.वि.वि.,

आपलं पत्र पोचलं. सध्या काही काळासाठी आमचं निवासस्थान बदललं असल्यामुळं आपलं पत्र मिळायला थोडा विलंब झाला. आपण डॉ. श्रीराम लागू यांची माझ्या पुस्तकास असलेली प्रस्तावना त्यांच्या निवडक लेखांच्या संग्रहात समाविष्ट करण्यासाठी माझी परवानगी मागितली आहे. एवढे सौजन्य आपण दाखवल्यानंतर मी तशी औपचारिक परवानगी देणं हे क्रमप्राप्तच आहे. अट किंवा अपेक्षा- 1. हे श्रीराम लागूंचं विचारधन पॉप्युलर प्रकाशन पुस्तकरूपानं प्रकाशित करेल, तेव्हा त्याची एक प्रत मला पाठवावी. 2. या प्रस्तावनेच्या आरंभी ती माझ्या ‘अंधश्रद्धा व बुवाबाजी यांचा पंचनामा’ या पुस्तकास प्रस्तावना म्हणून लिहिली गेली आहे, असा उल्लेख असावा.

पत्र पोचल्याचं पत्रानं, फोननं किंवा ई-मेलनं कळवावं.

उत्साहाच्या भरात नीट खुलासा केला गेलेला नसल्यामुळे हा संग्रह जणू मीच संपादित करतो आहे, असा दातारांचा गैरसमज झाला होता. त्या पत्रात त्यांनी त्यांचा नवा पत्ता, फोन नंबर आणि ई-मेल आयडीही दिला होता. त्यामुळं खरं तर मी तातडीनं त्यांचा गैरसमज दूर करायला हवा होता. आणि ही बाब लगोलग अस्मिता मोहिते यांच्या कानांवर घालून त्यांच्याकडं दातारांचं पत्र सुपूर्द करायला हवं होतं. पण माझी मती कुठं शेण खायला गेली होती, कुणास ठाउक! मी काहीच केलं नाही, म्हणजे मला यापैकी काहीच सुचलं नाही. ते पत्र मी तसंच माझ्याकडं ठेवून दिलं.

6.

त्यानंतर चार वर्षांनी म्हणजे 2013मधे डॉक्टरांचा हा लेखसंग्रह ‘रूपवेध’ या नावानं पॉप्युलरनं प्रकाशित केल्याची बातमी वाचली आणि मला मधल्या काळात घडलेला सगळा प्रकार आठवला. पुस्तकाच्या दुकानात जाऊन मी तो संग्रह लगोलग विकत घेतला. त्यात मी दिलेल्यापैकी ‘सत्याग्रही विचारधारा’मधला एक लेख, ऑर्थर कोत्स्लरचा अनुवाद आणि ‘ही’ गाजलेली प्रस्तावना, अशा तिन्हींचाही समावेश करण्यात आला होता. शिवाय 2007 मधे निखिल वागळे यांनी घेतलेल्या डॉक्टर व तेंडुलकरांच्या जाहीर मुलाखतीचं मी केलेलं शब्दांकनही होतं. ‘रूपवेध’मधले इतर काही लेख व मुलाखतीही इतर कुणी कुणी मिळवून दिल्या होत्या. पण त्यापैकी कुणाचाही नामाल्लेख नव्हता.

ते पाहून मला वाईट वाटलं. क्षणभर रागही आला. तेव्हा मी दै. ‘लोकसत्ता’मधे होतो. वरिष्ठांकडं ‘रूपवेध’ची प्रत घेऊन गेलो आणि सगळा प्रकार त्यांच्या कानांवर घालून याविषयी एक लेख लिहिण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी सगळं ऐकून घेतलं, माझा राग व्यक्त होऊ दिला आणि मग शांतपणे विचारलं, ‘‘या पुस्तकात तुझं नाव यावं यासाठी तू हा सगळा खटाटोप केला होतास का? समजा केला असशील तर तसं तू पॉप्युलरला स्पष्टपणे सांगितलं होतंस का?’’ या दोन्हींची उत्तरं ‘नाही’ अशीच होती. मी डॉक्टरांचे लेख व मुलाखती माझ्या हौसेपोटीच जमवल्या होत्या आणि त्यांची गाजलेली, वादग्रस्त ठरलेली प्रस्तावनाही त्या हौसेपोटीच शोधली होती. मग त्यांनी सांगितलं, ‘‘तसं असेल तर तू हा लेख लिहू नकोस.’’

डॉक्टरांच्या दुसऱ्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं हे सगळं सांगण्यामागं दोन हेतू आहेत. पहिला, गेल्या 50-60 वर्षांत महाराष्ट्रात गाजलेल्या लेखांची कुणीही यादी करायची ठरवली, तर त्यात डॉक्टरांची ही प्रस्तावना नक्की येईल, इतकी ती महत्त्वाची आहे.

आणि दुसरा, डॉक्टरांनी एकदा घेतलेल्या भूमिकेपासून नंतरच्या काळात कितीही जहरी टीका, शिव्याशाप, धमक्या आल्या, अगदी धक्काबुक्की झाली तरी माघार घेतली नाही. उलट शेवटपर्यंत ते आपल्या भूमिकेचा हिरीरीनं प्रचार-प्रसार करत राहिले. समाजाला विचारप्रवृत्त करण्याचं काम हे सुळावरच्या पोळीसारखं असतं. त्याची जाणीव ठेवूनच ते निष्ठेनं, प्राणपणानं करत राहावं लागतं. डॉक्टरांनी शेवटपर्यंत तेच केलं. डॉक्टरांचा बुद्धिप्रामाण्यवाद शेवटपर्यंत अबाधित, लखलखीत राहिला. त्यांच्या तरुण मुलाचं अपघाती निधन झाल्यानंतरही तो विचलित झाला नाही किंवा वार्धक्यामुळंही त्यांची भूमिका कधी डळमळीत झाली नाही. डॉक्टरांची ही बुद्धिनिष्ठा आणि बुद्धिवाद स्पृहणीय, अनुकरणीय आणि प्रशंसनीय म्हणावा असाच आहे. नटानं कसं असावं, याचा दाखला देण्यासाठी डॉक्टर नेहमी 'An actor should be athlete philosopher' या प्लेटोच्या विधानाचा उल्लेख करत. प्रत्यक्षात महाराष्ट्रातल्या कलावंतांपैकी ते डॉक्टरांनाच सर्वाधिक लागू पडतं. ते खऱ्या अर्थानं 'Athlete philosopher' होते. किंबहुना असंही म्हणता येईल की, Athlete philosopher कसा असावा, तर तो डॉक्टरांसारखा!    

(डॉ. श्रीराम लागू यांचा दुसरा स्मृतिदिन गेल्या आठवड्यात येऊन गेला, त्या निमित्ताने हा लेख प्रसिद्ध केला आहे.)

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके