डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

‘अंतर्नाद’च्या संपादकाचे अंतरंग

‘जेआरडी टाटा’, ‘बाजारू संस्कृतीच्या विळख्यात’, ‘सलाम इंडिया टुडे’, ‘एक छोटुकले मोठे मासिक’, ‘असाही एक भारत भाग्य-विधाता’ आणि ‘सामाजिककार्य’ हे या पुस्तकातले उत्तम लेख. ‘जेआरडी टाटा’ हा लेख आर.एम. लाला यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा केवळ परिचय आहे, पण त्याची मांडणी मात्र चांगल्या ललित लेखाची आहे. ‘इंडिया टुडे’ या प्रसिद्ध (पाक्षिक आणि नंतर साप्ताहिक झालेल्या) नियतकालिकाविषयीचा लेखही असाच रंजक आहे. ‘एक छोटुकले मोठे मासिक’ हा ‘रिडर्स डायजेस्ट’ आणि त्याचे संस्थापक-संपादक डेविट वॉलास यांच्याविषयीचा लेख ‘रिडर्स’च्या वाचकांचे आणि त्याच्याविषयी आकर्षण असणाऱ्यांचे कुतूहल शमवणारा आहे. (दुर्दैवाची गोष्ट एवढीच, गेल्या काही महिन्यांपासून जगभर आलेल्या मंदीने हे मासिक बंद करण्याची वेळ त्याच्या चालकावर आलेली आहे.) ‘असाही एक भारत भाग्य-विधाता’ हा लेख सर ऑर्थर थॉमस कॉटन या ब्रिटिश माणसाने भारतात पाणीप्रश्नाविषयी केवढे अवाढव्य काम केले आहे याची ओळख करून देणारा आहे. आपल्याला एल्फिन्स्टन, जॉन विल्सन, रुड्यार्ड किपलिंग, मोल्सवर्थ, मेजर कँडी, विल्यम कॅरे असे अनेक ब्रिटिश अधिकारी माहित असतात, त्यांनी केलेले कामही बऱ्यापैकी माहीत असते. थॉमस कॉटन हा त्यांच्याच पंक्तीतला पण तुलनेने अपरिचित. ‘सामाजिक कार्या’विषयीच्या लेखाची मांडणीही चांगली झाली आहे; पण त्यातून कार्यकारणभाव समजण्यापलीकडे ठोस काही हाती लागत नाही.

भानू काळे हे गेली पंधरा वर्षे ‘अंतर्नाद’ या वाङ्‌मयीन मासिकाचे संपादक आहेत आणि मालकही! त्यांच्या ‘उच्चभ्रू कलिंगड’, ‘कॉम्रेड’ आणि ‘तिसरी चांदणी’ या तीन कादंबऱ्या पंचवीस वर्षांपूर्वी प्रकाशित झाल्या आहेत. तीन वर्षांपूर्वी ‘बदलता भारत’ हे ‘अंतर्नाद’मधील त्यांच्या लेखमालेचे पुस्तक प्रकाशित झाले आहे. आता त्यांचे ‘अंतरीचे धावे...’ हे ललित लेखनाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे. या पुस्तकात एकूण 32 लेख आहेत आणि सर्व लेख ‘अंतर्नाद’मधून पूर्वप्रकाशित झालेले आहेत. त्यात काही संपादकीय आहेत तर काही प्रासंगिक लेख. ‘अंतर्नाद’मधील अनेक संपादकीय चांगले ललित लेख झालेले आहेत.

‘अंतर्नाद’चे संपादक म्हणून त्यांची भूमिका, दृष्टिकोन आणि उलगाउलग करायला लावणाऱ्या समस्या- प्रश्न या पुस्तकात आल्या आहेत. त्यामुळे हे पुस्तक ‘बदलता भारत’च्याही आधी यायला हवे होते. ‘अंतर्नाद’ आणि ‘भानू काळे’ या दोहोंनाही समजून घेणे या पुस्तकामुळे सोपे जाणार आहे.

भावलेले विषय, मान्यवरांच्या भेटी-गाठी, प्रवासात आलेले अनुभव यावर भानू काळेंनी लिहिले आहे. शिवाय चौफेर प्रवास आणि उत्तम वाचन या गोष्टी ललित लेखनासाठी आवश्यक असतात, त्या त्यांच्याकडे आहेत. त्यांनी अनेक लेखांत वापरलेली अवतरणे (मराठी आणि इंग्रजीतील) आणि दिलेले संदर्भ यातून ते जाणवत राहते. प्रत्येक विषयाच्या अनेक बाजू समजून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो, त्यामुळे काही लेखांना ललित वैचारिक असे स्वरूप आले आहे.

लेखन करताना भानू काळे अनेकदा सावध भूमिका घेऊन लिहितात. प्रत्येक विषय अगदी तोलून-मापून घेतल्यासारखा, पण ही त्यांची मर्यादा नसून सामर्थ्य आहे. त्यामुळे शब्दांचा सोस वा उधळमाधळ त्यांच्या कुठल्याही लेखात सहसा दिसत नाही. योग्य अवतरणे आणि संदर्भांची जोड देऊन ते लेख सजवतात. त्यामुळे या पुस्तकातला जवळपास प्रत्येक लेख वाचनीय झाला आहे.

‘जेआरडी टाटा’, ‘बाजारू संस्कृतीच्या विळख्यात’, ‘सलाम इंडिया टुडे’, ‘एक छोटुकले मोठे मासिक’, ‘असाही एक भारत भाग्य-विधाता’ आणि ‘सामाजिककार्य’ हे या पुस्तकातले उत्तम लेख. ‘जेआरडी टाटा’ हा लेख आर.एम. लाला यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा केवळ परिचय आहे, पण त्याची मांडणी मात्र चांगल्या ललित लेखाची आहे. ‘इंडिया टुडे’ या प्रसिद्ध (पाक्षिक आणि नंतर साप्ताहिक झालेल्या) नियतकालिकाविषयीचा लेखही असाच रंजक आहे. ‘एक छोटुकले मोठे मासिक’ हा ‘रिडर्स डायजेस्ट’ आणि त्याचे संस्थापक-संपादक डेविट वॉलास यांच्याविषयीचा लेख ‘रिडर्स’च्या वाचकांचे आणि त्याच्याविषयी आकर्षण असणाऱ्यांचे कुतूहल शमवणारा आहे. (दुर्दैवाची गोष्ट एवढीच, गेल्या काही महिन्यांपासून जगभर आलेल्या मंदीने हे मासिक बंद करण्याची वेळ त्याच्या चालकावर आलेली आहे.) ‘असाही एक भारत भाग्य-विधाता’ हा लेख सर ऑर्थर थॉमस कॉटन या ब्रिटिश माणसाने भारतात पाणीप्रश्नाविषयी केवढे अवाढव्य काम केले आहे याची ओळख करून देणारा आहे. आपल्याला एल्फिन्स्टन, जॉन विल्सन, रुड्यार्ड किपलिंग, मोल्सवर्थ, मेजर कँडी, विल्यम कॅरे असे अनेक ब्रिटिश अधिकारी माहित असतात, त्यांनी केलेले कामही बऱ्यापैकी माहीत असते. थॉमस कॉटन हा त्यांच्याच पंक्तीतला पण तुलनेने अपरिचित. ‘सामाजिक कार्या’विषयीच्या लेखाची मांडणीही चांगली झाली आहे; पण त्यातून कार्यकारणभाव समजण्यापलीकडे ठोस काही हाती लागत नाही.

जेफ्री आर्चर हा जगप्रसिद्ध लेखक पुण्यात आला असता त्याच्यासोबत घालवलेल्या काही तासांचे वर्णन ‘एक संध्याकाळ बेस्ट सेलरच्या सहवासात’ या लेखात केले आहे. आकर्षण, कुतूहल आणि प्रत्यक्ष अनुभव या तिन्हींचा मेळ जमल्याने हाही चांगला ललित लेख झाला आहे.

या सात लेखांव्यतिरिक्तचे बाकी जवळपास सर्वच लेख भानू काळे यांनी संपादकीये म्हणून लिहिलेले आहेत. त्यामुळे त्यांचे विषय प्रासंगिक आहेत. त्यातल्या काही लेखांची मांडणी भानू काळे यांनी चांगली केली आहे, पण त्यांनी काढलेले निष्कर्ष मात्र तितकेसे पटत नाहीत. पन्नासावा स्वातंत्र्यदिन, आनंदवन, शूल आणि अरुण भाटिया, नवी आध्यात्मिकता हे त्यापैकी काही लेख. तर ‘महात्मा देखील माणूस असतो’ आणि ‘आनंदवन’ या लेखांची शीर्षके आकर्षक आहेत, पण तशी लेखांची मांडणी नाही. गांधीजींविषयीचा लेख एका मूळ गुजरातीत लिहिलेल्या पण मराठीत अनुवादित झालेल्या कादंबरीचा परिचय आहे, पण कुठल्याही कादंबरीविषयी लिहिताना ठोस आणि व्यापक स्वरूपाचे विधान करता येणे अवघड असते, हे अवधान हा लेख लिहिताना विसरले गेले असे वाटते. ‘आपण आणि ते’, ‘फुकाचे मुखी’, ‘ब्राह्मण नाही, हिंदूही नाही’ हे तीन लेख वगळायला हवे होते आणि ‘अंतर्नादची दशकपूर्ती’ या लेखाचे थोडेसे पुनर्लेखन करावयास हवे होते, असे वाटते. ‘दोन अनुभव- शारदेच्या उपासकांसाठी’ आणि ‘जगण्याचे बळ वाढवणारा श्वास’ या लेखांना पुस्तकरूप का दिले असा प्रश्न पडतो. एकूण आशय व विषय पाहता ‘अंतरिचे धावे’ हे पुस्तकाचे नाव समर्पक आहे.

अंतरीचे धावे : भानू काळे

मौज प्रकाशन गृह, मुंबई, पाने : 233, किंमत 200 रुपये.

Tags: राम जगताप लेखाचे पुस्तक संपादकीय लेख ललित लेखांचा संग्रह पुस्तक परिचय अंतरीचे धावे Ram Jagtap भानू काळे Editorials Collection Of Article Book Review Antriche Dhave Bhanu Kale weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

प्रतिक्रिया द्या

लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके