डिजिटल अर्काईव्ह

इंदापूर तालुक्यातील चार दिवस

काही तरुणांच्यापुढे नोकरीच्या प्रश्नापेक्षाही वेगळेच भयानक प्रश्न उभे ठाकले आहेत! अजोती गावचा एक तरुण सांगत होता की उजनी धरणामुळे निर्वासितांची कळा आल्यामुळे आज त्याला लग्न करणे फारच कठीण होऊन बसले आहे. शेतीवाडी, घरदार गेल्यामुळे कोणत्याही मुलीचा बाप आज विचारायला तयार नाही. अशा प्रकारे अविवाहितपणाची कुऱ्हाड आज अनेक तरुणांवर कोसळेल असे दिसते.

इंदापूर तालुक्याच्या धरणग्रस्त भागात फेरी मारली. चार दिवसांच्या पदयात्रेतून बरेच काही शिकायला मिळाले. आधुनिक समाजवादाचे दर्शन झाले! सध्याच्या वीस कलमांखेरीज कितीतरी नवीन कलमे पहावयास मिळाली! वीस कलमी कार्यक्रमाच्या झालेल्या काटेकोर अंमलबजावणीने सुखी झालेली जनता पाहून आम्ही सर्द झालो.

काहींना पोळी, बऱ्याच जणांना झोळी

उजनी धरणामुळे नेमके किती क्षेत्र बागायती होईल हे जरी समजले नसले, तरी बरेचसे कोरडवाहू क्षेत्र ओलिताखाली येत आहे हे ऐकून फारच आनंद झाला. ज्या कोरडवाहू जमिनीत आठ पायल्या ज्वारी होत नव्हती तेथे आता अठरा ते वीस क्विंटल गहू होईल. हा आठ पायल्या पिकवणारा शेतकरी राजा आता दररोज दिवाळीचा सण साजरा करील! ही आशा लावली आहे. पण प्रत्यक्षात काय दिसले?

अजोती हे एक धरणग्रस्त छोटेसे खेडे आहे. त्यांनाही समाजवादी धोरणाने पाजलेले मुबलक पाणी ऐकणाऱ्याच्या डोळ्यांतून गंगा-यमुना सुरू करते. अजोतीवासियांना 1975 च्या पावसाळ्यात गाव सोडण्यास सांगितले. बिचाऱ्यांनी एका माळावर पाण्या-पावसात आपल्या वेड्यावाककड्या झोपड्या बांधल्या. ऐन वेळेस घाईगर्दीत केलेला हा निवारा काही उपयोगाचा नव्हता. पाऊस आला म्हणजे अंगण आणि घरात सारख्याच प्रमाणात चिखल आणि पाणी होत असे! (येथील पाणी आणि चिखल खरीखुरी समानता आचरणात आणतात हे ऐकून आश्चर्य वाटले!) उघडीनागडी पोरेबाळे पडत्या पावसात उभी रहात असत. कोरड्या जागेच्या अभावामुळे दोन दोन, तीन तीन दिवस चुली पेटवल्या जात नसत. मात्र येथील काही लोक इतके हुशार आहेत की, घरात जास्त पाऊस लागतो म्हणून ते झाडाखाली उभे रहात असत! अशाप्रकारे, अजोती खेडे धरणग्रस्त असूनही पाण्याचा मुबलक उपभोग घेत होते, जसा पाटपाण्याचा अनेक बागाईतदारांना पुढे मुबलक उपभोग घेता येणार आहे.

समाजवादी सरकारकडून भर पाण्यापावसात झालेला हा अन्याय ऐकून मन खिन्न झाले! धरणग्रस्तांच्या जमिनी गेल्या आणि अगदी थोड्या प्रमाणात त्यांना निकस जमिनी बदल्यात मिळाल्या. काहींना पुढे मिळण्याची आशा आहे. आज 10-10 हजार रुपये किंमतीची धरणग्रस्तांची घरे पाडून त्यांना नवीन घरे बांधण्यासाठी फक्त दोन हजार रुपये मिळतात! काही दिवसांनी रु. 900 चा एक हप्ता त्यांना मिळणार असल्याचे समजले.

गुबगुबीत होणारा भ्रष्टाचार

आणीबाणीमुळे भ्रष्टाचाराला आळा बसला आहे. ह्या आमच्या विचाराला पडस्थळ या खेड्यात तडा गेला! जुन्या गावठाणात घर असणाऱ्यांना नवीन गावठाणात घरासाठी जागा व कर्ज ताबडतोब मिळावे असे धोरण आहे. परंतु काही कुटुंबांना जुन्या गावठाणात घर असूनदेखील नवीन गावठाणात घरबांधणीसाठी जागा मिळवण्यास व कर्ज पदरात पाडून घेण्यास अनेक अडचणी आल्या. परंतु दोनतीन कुटुंबांना ते या गावचे रहिवासी नसताना देखील ताबडतोब घरासाठी जागा आणि कर्ज मिळाले! कारण शोधता शोधता समजले की संबंधितांनी अशा चार दोन लोकांची सोय केली आहे.

प्रत्येक खेड्यात कुणालाही भेटले तरी अनेक अडचणी ऐकावयास मिळत. जुन्या घरातील सामानसुमान वाहून नेण्यास पाटबंधारे खात्यातर्फे साधारणतः प्रत्येक कुटुंबास ट्रक्सच्या दोन मोफत खेपा मिळतात. परंतु काही लोकांना मोठ्या जिकीरीने त्या दोन खेपा मिळतात आणि काहींना मात्र पाच ते सात खेपा मिळतात. तथाकथित प्रतिष्ठित येथेही आपल्या पोळीवर तूप ओढून घेण्यास मागे पडलेले नाहीत!

आश्वासनाला हरताळ

काही तरुणांनी सांगितले की, धरणग्रस्तांच्या सुशिक्षित बेकार मुलांना उजनी प्रकल्पावर नोकरीसाठी प्राधान्य देऊन नोकरी दिली जाईल असे आश्वासन मिळाले होते. परंतु सध्या मात्र उलटेच घडत आहे. आज धरणग्रस्त सुशिक्षित बेकार तरुण नोकरीसाठी वणवण भटकत आहेत, परंतु धरणग्रस्त नसलेले आणि नोकरीची फारशी जरूरीही नसलेले वशिल्याचे तट्टू उजनी प्रकल्पावर नोकरीत आहेत. धरणग्रस्त तरुण मात्र नोकरी मिळवण्यासाठी सोलापूरला खेटे घालून दमले आहेत! सोलापूरला पाटबंधारे खात्याचे विभागीय ऑफिस आहे. ज्यांना पैशाचे आणि तथाकषित प्रतिष्ठितांचे पाठबळ नाही त्यांना चुलीजवळ गुडघ्यात डोके घालून बसावे लागत आहे. रहायला व्यवस्थित घर नाही, खायला पुरेसे अन्न नाही, नोकरी मिळत नाही. नोकरी मिळवण्यासाठी सोलापूरला सतरा खेटे घालणे परवडत नाही!

काही तरुणांच्यापुढे नोकरीच्या प्रश्नापेक्षाही वेगळेच भयानक प्रश्न उभे ठाकले आहेत! अजोती गावचा एक तरुण सांगत होता की उजनी धरणामुळे निर्वासितांची कळा आल्यामुळे आज त्याला लग्न करणे फारच कठीण होऊन बसले आहे. शेतीवाडी, घरदार गेल्यामुळे कोणत्याही मुलीचा बाप आज विचारायला तयार नाही. अशा प्रकारे अविवाहितपणाची कुऱ्हाड आज अनेक तरुणांवर कोसळेल असे दिसते.

धुमधडाक्याचे पुनर्वसन

जुन्या गावठाणातून नवीन गावठाणात तातडीने जाण्यास सांगण्यात येत आहे. परंतु काही नवीन गावठाणात पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आलेली नाही! पडस्थळ येथील लोकांना नवीन गावठाणात राहाण्यास आल्यावर जवळ जवळ दोन मैल नदीला पाणी आणण्यासाठी जावे लागणार आहे. एक नळाची विहीर नवीन गावठाणात आहे. एक शोभेची वस्तू यापलिकडे तिथल्या पंपाचा काहीच उपयोग नाही. अशाप्रकारे लोकांच्या पुनर्वसनाची अंमलबजावणी धुमधडाक्यात चालू आहे.

एक गाव : एक पाणवठ्याचा कार्यक्रम मोठ्या वेगाने व उत्साहाने आगेकूच करत असताना, नवीन गावठाणामध्ये हरिजनांना, खुबीने वेगळे ठेवण्याशी दक्षता घेतली आहे! जुन्या गावठाणातील हरिजनांच्या वेगळ्या वस्तीप्रमाणेच नवीन गावठाणातदेखील त्यांना वेगळे ठेवले आहे. मात्र मोठ्या खुबीने सांगण्यात येते की हरिजनांनी स्वतःच वेगळे राहणे पसंत केले आहे! हरिजन-गिरिजनांचा वेगळेपणा नष्टच करायचे मनापासून ठरवले असते तर समाजात मिळून मिसळून राहण्यास त्यांना भाग पाडता आले असते. असो. कामाचा व्याप फारच वाढल्यामुळे कदाचित असे करण्यास सरकारला वेळ मिळाला नसावा.

निर्लिप्त गावे

काही खेड्यात कर्जमुक्तीचा आदेश, किंवा खाजगी सावकारांकडून कर्जमुक्ती झाली ही बातमीदेखील पोचलेली नाही, तेव्हा खरोखर कर्जातून मुक्ती किती लोकांची झाली याविषयी विचार न करणेच उचित होईल. कदाचित इकडे दगडधोंड्याच्या रस्त्यामुळे तथाकथित प्रतिष्ठितांच्या पदयात्रा झाल्या नसाव्यात. वीस कलमी कार्यक्रमाची भव्यता व दिव्यता सांगण्यासाठी त्यांनी ह्या भागात यावे, अशी लोक त्यांना विनंती करण्यास जाणार आहेत.

अल्पबचतीचा कहर

अजोती या खेड्यात अल्पबचतीने केलेला कहर ऐकला! आणीबाणीच्या काळात अल्पबचतीला मिळालेला पाठींबा आश्चर्यकारक होता. धरणग्रस्तांना नवीन जमिनी घेण्यासाठी ‘फूल नाही फुलाची पाकळी का होईना’ काही रक्कम देण्याचे ठरले. पैसे देताना काही रक्कम सक्तीने अल्पबचतीत गुंतवण्यास त्यांना भाग पाडण्यात आले. लोकांनी नाइलाजाने एक वर्षाच्या मुदतीने काही रक्कम गुंतवण्यास संमती दिली. परंतु पैसे अल्पवधीत टाकल्यानंतर काही दिवसानंतर गरीब बिचाऱ्या अंगठेबहाद्दरांच्या ध्यानात आले की त्यांची रक्कम चार ते सहा वर्षे मुदतीच्या अल्पमुदतीत गुंतवण्यात आली आहे! एक वर्षाच्या मुदतीने पैसे ठेवतो सांगुन असे का करण्यात आले, हे काही कळले नाही! एक तर ज्याचे पैसे अल्पावधीत गुंतवले त्याला ते किती वर्षांसाठी गुंतवले हे समजले नाही आणि दुसरे असे की आज पैशांअभावी त्यांचे हातच बांधले गेले आहेत.

ताबा आणि कागद

काही खातेदारांना नवीन जमिनी देऊन त्यांचे खरेदी इ. कायदेशीर व्यवहार करून एक वर्ष झाले तरी त्या नवीन जमिनीचा ताबा मिळालेला नाही. सध्या कामाचा वेग, कार्यक्षमता इ. खूप वाढली आहे हे त्याचे कारण असावे! कदाचित ज्यांची जमीन सिलिंगमध्ये गेली आहे व ह्या धरणग्रस्तांना मिळाली आहे असा बड्यांची तथाकथित प्रतिष्ठा यांच्या आड आली असावी, या धरणग्रस्तांची एक अडचण ऐकावी तर दुसरी दत्त म्हणून हजर राहते व ऐकणाऱ्याचे डोके गरगरू लागते. पण वीस कलमी कार्यक्रमाच्या जलद व काटेकोर अंमलबजावणीमुळे तसे घडत असावे! 

आम्ही परतताना असा निर्णय घेतला की पुन्हा पाहणीस जाण्याची संधी आली तर बरोबर मोठा – अगदी भला मोठा दूरदर्शक व सूक्ष्मदर्शक घेवून जावू आणि पुन्हा एकदा वीस कलमी कार्यक्रम व त्यामुळे होत असलेले जनतेचे कल्याण पाहण्याचा प्रयत्न करू.

Tags: राम शरमाळे उजनी धरण इंदापूर Indapur Ram Sharmale weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी