डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

बऱ्याच काळापर्यंत भारतीय क्रिकेट चाहत्यांनी न्यूझीलंडच्या खेळाडूंना कमी लेखलं. यामागे दोन महत्त्वाची कारणं आहेत. एक म्हणजे कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात कमी धावा न्यूझीलंडनं केल्या आहेत. एका सामन्यात अवघ्या 26 धावा करून न्यूझीलंडचा अख्खा संघ गारद झाला होता. आणि दुसरं म्हणजे एखाद्या संघाला त्यांच्याच देशात धूळ चारण्यात भारताला प्रथम यश मिळालं होतं ते न्यूझीलंडविरोधात. मात्र टर्नर जेव्हा ग्रेस, हेमंड आणि ब्रॅडमनच्या पंक्तीत जाऊन बसला आणि कॉग्डन आणि पोलार्डनं ट्रेंट ब्रिज मैदानावरच्या सामन्यात 478 धावांचा पाठलाग करताना केलेली फलंदाजी पाहिली तेव्हा मी न्यूझीलंडच्या खेळाडूंकडे गांभीर्याने बघू लागलो, त्यानंतर किवींना हलक्यात घेण्याची चूक मी केली नाही. पुढे तीन वर्षांनी वेलिंग्टनमध्ये झालेल्या कसोटीनं तर सगळ्यांच्याच भ्रमाचा भोपळा फुटला. 

आज भारतीय क्रिकेट चाहत्यांची क्रिकेटबाबतची समज कशामुळे विकसित झाली असेल तर ती टीव्हीवरील क्रिकेट सामन्यांच्या थेट प्रक्षेपणामुळे. माझ्या बालपणी मात्र असं नव्हतं. रेडिओ नावाच्या एकमेव खिडकीतून बाहेरच्या जगात डोकावता यायचं, जगातील घडामोडी जाणून घेता यायच्या. मी पहिल्यांदा रेडिओ ऐकला, तेव्हा बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसचा ‘टॉप ट्वेंटी’ हा कार्यक्रम सुरू होता. हा कार्यक्रम खास होता. कारण तेव्हा लॉर्डसच्या मैदानावर गॅरी सोबर्सने कसोटी सामन्यात झळकावलेलं शतक मी पाहिलं (ऐकलं) होतं, त्याचा प्रत्येक फटका अक्षरश: अविस्मरणीय होता. आणि याचीच चर्चा ‘टॉप ट्वेन्टी’ कार्यक्रमात सुरू होती.  

हा सामना 1966 मधला. तेव्हा मी आठ वर्षांचा होतो. त्यानंतर तीनच वर्षांनी न्यूझीलंडच्या संघानं भारताचा दौरा केला. तीन कसोटी सामन्यांसाठी हा दौरा होता. साहजिकच या पूर्ण दौऱ्याचं प्रसारण ऑल इंडिया रेडिओवरून आपण ऐकलंच पाहिजे, असं मला वाटलं. मात्र तेव्हाचं आता फार आठवत नाही. एक गोष्ट मात्र ठळकपणे आठवते. 1973 च्या त्या समर क्रिकेट (एखाद्या देशातला उन्हाळी क्रिकेट हंगाम) टूरमध्ये न्यूझीलंडच्या खेळाडूंनी मला फारच प्रभावित केलं होतं. माझ्या शाळेत तेव्हा अकरा वर्षांखालील खेळाडूंच्या क्रिकेट संघाचा मी भाग होतो. तो सीझनच फार जबरदस्त होता, अंडर इलेवन क्रिकेटचं ते माझ्या शाळेतलं पहिलंच वर्ष. फेब्रुवारी ते एप्रिल असे तीन महिने मी दर रविवारी क्रिकेट खेळायचो आणि फार चांगला खेळत होतो. एकदा उन्हाळा सुरू झाला की, असह्य उकाड्यामुळे बाहेर क्रिकेट खेळणं शक्य होत नसे. मग मी तासन्‌तास क्रिकेट पाहायचो, ऑल इंडिया रेडिओच्या प्रक्षेपणामुळे हे शक्य व्हायचं.

1973 च्या उन्हाळी क्रिकेट दौऱ्यामध्ये ग्लेन टर्नरनं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एक हजार धावा पूर्ण केल्या होत्या. त्यावर्षी इंग्लिश समर सीझन मेमध्ये संपणार होता. तोवरच्या 35 वर्षांत, कसोटीत हजार धावा पूर्ण करणारा टर्नर हा पहिलाच खेळाडू. न्यूझीलंडच्या या खेळाडूनं काऊंटी क्रिकेटच्या वूस्टरशायर संघासाठी खेळताना हा विक्रम केला. तोपर्यंत बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसचं, स्पोट्‌र्स स्पेशल बुलेटिन दर शनिवारी प्रक्षेपित होत असे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी पाच ते रात्री सव्वाअकरापर्यंत हा कार्यक्रम प्रसारित व्हायचा, अधेमधे फक्त बातम्या सांगण्यासाठी ब्रेक घेतला जायचा. टर्नरचे अनेक सामने मी लाईव्ह ऐकले आहेत, त्यामुळे शनिवार सत्कारणी लागायचा. बीबीसीच्या दररोज प्रक्षेपित होणाऱ्या 15 मिनिटांच्या स्पोट्‌र्स बुलेटिनमध्ये मागच्या चोवीस तासांतील खेळाच्या सर्व घडामोडींचं थोडक्यात विश्लेषण केलं जायचं, तेही मी ऐकायचो.  

त्या-त्या वर्षी समर सीझन संपण्याआधी एखाद्या क्रिकेटरनं केलेल्या हजार धावा पाहणं, ऐकणं ही क्रीडाविषयक कार्यक्रमांतली माझी सगळ्यात लाडकी गोष्ट होती. 1973 पर्यंत हा विक्रम सहा जणांनी केला होता, त्यात वी.जी. ग्रेस, वॉली हेमंड, डॉन ब्रॅडमन (ब्रॅडमननं हा विक्रम दोनदा केला) या महान खेळाडूंचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर न्यूझीलंडसारख्या (तोवर) क्रिकेटचं फार वलय प्राप्त न झालेल्या देशातल्या खेळाडूने, या हजारी मनसबदारांमध्ये स्वत:चं स्थान मिळवणं ही मोठीच गोष्ट होती. एरवी इंग्लिश खेळाडूंचं अथक कौतुक करणाऱ्या समालोचकांनीही टर्नरचं भरपूर कौतुक केलं. माझ्यासारखा शाळकरी मुलगाही तेव्हा टर्नरच्या या विलक्षण कामगिरीने भारावून गेला नसता तरच नवल!

मेमध्ये वूस्टरशायरसाठी हा विक्रम रचल्यानंतर जूनमध्ये टर्नरचा न्यूझीलंडच्या कसोटी संघात प्रवेश झाला. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ इंग्लड दौऱ्यावर जाणार होता. 1973 मधील या मालिकेतला पहिला सामना नॉटिंगहमला 7 ते 12 जूनदरम्यान रंगला. रेडिओवर सामन्याचं प्रक्षेपण ऐकणं हा फारच रोमांचकारी अनुभव होता आणि प्रत्यक्षात तो मैदानावर पाहणं किती तरी अधिक रोमांचक असणार. चौथ्या डावाअखेरीस इंग्लडनं न्यूझीलंडसमोर 478 धावांचा प्रचंड डोंगर उभा करून सामन्यावर आपली पकड घट्ट केली. या डोंगराएवढ्या धावांचा पाठलाग करणंही तेवढंच आव्हानात्मक होतं, या प्रत्येक धावेचं प्रक्षेपण मी आमच्या घरच्या रेडिओवर ऐकत होतो. रात्री नऊनंतर घरातल्या लोकांना झोपायचं होतं, पुढे 11 वाजेपर्यंत- त्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत सामना बघण्याची जबाबदारी माझ्यावर टाकून ते झोपी गेले. मी रेडिओचा आवाज कमी करून, रिसीव्हर अगदी कानाशी लावून सामना पाहत (ऐकत) होतो.   

तो अविस्मरणीय कसोटी सामना होऊन आज जवळपास अर्ध शतक झालं, पण त्याची आकडेवारी न पाहताही मी या सामन्यातली प्रत्येक गोष्ट सांगू शकतो. कर्णधार बेवन काँग्डन आणि ऑफ स्पिनिंग ऑल राऊंडर विक्टर पोलार्ड या दोघांनीही तेव्हा शतकी खेळी केली होती. दोघांची फलंदाजी एकदम भिन्न शैलीची होती. काँग्डन जुन्या शैलीनं खेळत होता तर पोलार्ड अक्रॉस द लाईन खेळायचा, कधी हवेतही काही फटके मारायचा.

या मालिकेच्या दोन वर्ष आधीच भारतानं इंग्लंडला, त्यांच्याच देशात हरवलं होतं. 40 वर्षांच्या अथक प्रयत्नांचं सार्थक झालं होतं. 1971 चा ओव्हलवरचा कसोटी सामना ऑगस्टच्या अखेरीस खेळवला होता. पण माझं दुर्दैव असं की मी तोपर्यंत बोर्डिंग स्कूलला गेलो होतो, म्हणून मला त्या सामन्याचं प्रसारण रेडिओवर ऐकता आलं नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात सामन्यातल्या घडामोडी वाचण्यावरचं समाधान मानावं लागत होतं. मात्र 1973 मध्ये इंग्लड विरूद्ध न्यूझीलंड सामना मी पूर्ण पाहिला... अगदी प्रत्येक बॉलगणिक. त्यामुळे त्या सामन्याबद्दलच्या पुष्कळ आठवणी आहेत.

बऱ्याच काळापर्यंत भारतीय क्रिकेट चाहत्यांनी न्यूझीलंडच्या खेळाडूंना कमी लेखलं. यामागे दोन महत्त्वाची कारणं आहेत. एक म्हणजे कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात कमी धावा न्यूझीलंडनं केल्या आहेत. एका सामन्यात अवघ्या 26 धावा करून न्यूझीलंडचा अख्खा संघ गारद झाला होता. आणि दुसरं म्हणजे एखाद्या संघाला त्यांच्याच देशात धूळ चारण्यात भारताला प्रथम यश मिळालं होतं ते न्यूझीलंडविरोधात. मात्र टर्नर जेव्हा ग्रेस, हेमंड आणि ब्रॅडमनच्या पंक्तीत जाऊन बसला आणि कॉग्डन आणि पोलार्डनं ट्रेंट ब्रिज मैदानावरच्या सामन्यात 478 धावांचा पाठलाग करताना केलेली फलंदाजी पाहिली तेव्हा मी न्यूझीलंडच्या खेळाडूंकडे गांभीर्याने बघू लागलो. त्यानंतर किवींना हलक्यात घेण्याची चूक मी केली नाही.

पुढे तीन वर्षांनी वेलिंग्टनमध्ये झालेल्या कसोटीनं तर सगळ्यांच्याच भ्रमाचा भोपळा फुटला. न्यूझीलंडचा संघ सहज मात देण्यासारखा आहे, असा (गैर)समज तोवर इंग्लिश, ऑस्ट्रेलियन आणि भारतीय खेळाडूंच्या ठायी होता. पण कसोटी सामन्यात, रिचर्ड हॅडलीच्या खतरनाक, उसळी मारणाऱ्या एका बोलिंग स्पेलनं हा समज सपशेल खोटा ठरवला. पहिल्याच डावात गावसकर, विश्वनाथ, वेंगसरकर यांच्यासह चार विकेट्‌स घेणाऱ्या हॅडलीनं दुसऱ्या डावात भारताला पार नामोहरम करून टाकलं. 8.3-0-23-7 ही त्याची आकडेवारी. भारतानं एक डाव आणि काही धावांनी तो सामना गमावला. रिचर्ड हॅडली तर या सामन्याचा हिरो ठरलाच, पण 1973 च्या त्या इंग्लिश समर सामन्यात ग्लेन टर्नर आणि बेवन काँग्डन या दोघांनीही एकाच डावात अर्धशतकी धावा केल्या.          

जगातील इतर देशांतील क्रिकेटर्स आणि क्रिकेट चाहत्यांच्या मनात न्यूझीलंडच्या संघाचं अढळ स्थान बनवण्यासाठी रिचर्ड हॅडलीइतकी मेहनत दुसऱ्या कोणत्या खेळाडूनं खचितच घेतली असेल. हॅडली आणि त्याच्यापासून कधीही वेगळा न करता येणारा त्याचा साथीदार मार्टिन क्रो, हे आजही जगातले सर्वोत्तम खेळाडू आहेत. मार्टिन क्रो तर सार्वकालिक महान फलंदाज आणि हॅडली महान गोलंदाज. क्रो हा सर्वोत्तम कर्णधारही होता. 1992 च्या विश्वकप स्पर्धेदरम्यान त्याच्या चाणाक्ष रणनीतीची चुणूक दिसली होती. यावेळी वेगळा प्रयोग करताना, गोलंदाजांचा भेदक मारा करण्याच्या त्याच्या रणनीतीत त्यानं सुरुवातीलाच स्पिनर्सना पाचारण केलं.

नुकत्याच झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या निमित्तानं मी हे सारं लिहिलंय, हे एव्हाना वाचकांना कळलंच असेल. तर यातला न्यूझीलंडचा विजय हा सर्वार्थानं समर्पक आणि त्यांनी केलेल्या खेळाला साजेसाच होता. ऑस्ट्रेलियाला नमवून किवीज अंतिम लढतीपर्यंत पोहोचले. तसं पाहिलं तर भौगोलिक अंतराच्या दृष्टीने ऑस्ट्रेलिया, किवींच्या जवळचा देश. पण ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडपासून कायम अंतर ठेवलं, त्यांना क्षुल्लक समजलं, हे काही लपून राहिलेलं नाही. (1946 मध्ये न्यूझीलंडमध्ये कसोटी सामना खेळल्यानंतर, ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडसोबत खेळायला नकार दिला. थोडथोडकी नाही, तब्बल 27 वर्ष ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडविरोधात सामने खेळले नाहीत.) दुसरी महत्त्वाची गोष्ट, अंतिम सामन्यात त्यांनी भारताला हरवलं. लोकसंख्या, आर्थिक ताकद, प्रशासकीय व्यवस्था अशा अनेक पातळ्यांवर भारत न्यूझीलंडपेक्षा किती तरी पटींनी बलाढ्य आहेच, शिवाय इतरांना हीन लेखण्याची आणि या खेळावर निरंकुश सत्ता गाजवण्याची पुरेपूर क्षमता भारताकडे आहे, असं असताना न्यूझीलंडनं भारताला पराभवाची धूळ चारली, याचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे.

अशा या न्यूझीलंडच्या ‘जंटलमन’ खेळाडूंच्या खेळाला अभिवादन करताना, मला माझी ऑल टाईम फेवरेट टीम तुमच्याशी शेअर करावीशी वाटते. नव्या-जुन्या सर्वोत्तम खेळाडूंचा समावेश करून मी खेळणाऱ्या अकरा खेळाडूंची माझी टीम तुम्हाला सांगतो. सलामीवीर म्हणून मी ग्लेन टर्नर आणि डावखुरा फलंदाड बर्ट सटक्लिफला प्राधान्य देईन. सटक्लिफ दोनदा भारत दौऱ्यावर आलेला आहे आणि दोन्ही वेळेला तो फार चांगलं खेळला. तिसऱ्या क्रमांकावर मी केन विल्यमसनला आणि चौथ्या क्रमांकावर मार्टिन क्रोला फलंदाजीला पाठवीन. कर्णधारपदाची जबाबदारीही या दोघांवर सोपवेन. मार्टिन डनली या आणखी एका डावखुऱ्या आणि खास फलंदाजाला मी मधल्या फळीत स्थान देईन, जुन्या काळातला हा अतिशय उत्कृष्ट डावखुरा फलंदाज आहे. त्यानं लॉर्डसच्या मैदानावर इंग्लडविरोधात शतक झळकावलं आहे. ऑक्सफर्ड संघाकडून, केब्रिंजविरोधात खेळताना चांगली कामगिरी केली आहे. व्यावसायिक खेळाडूंविरोधात ‘जंटलमेन’च्या बाजूने तर 1945 च्या इंग्लडविरोधातील ‘विक्टरी टेस्ट’ (कसोटी सामन्यांची मालिका)मध्येही तो खेळला आहे.

सहाव्या, सातव्या आणि आठव्या क्रमांकावर मी तीन सार्वकालिक आणि सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंना स्थान देईन. त्यात यष्टीरक्षक ब्रेंडन मॅक्युलम आणि लेफ्ट आर्म स्लो बॉलर डॅनियल व्हिटोरी असतील. हे दोघे जगभरात प्रसिद्ध आहेत, विशेषत: भारतीय तरुणांमध्ये. त्यानंतर रिचर्ड हॅडली... हा खतरनाक गोलंदाज तर आहेच पण तळाला थोडीफार फलंदाजीही करू शकतो.

उर्वरित तीन जागा या सीम आणि स्विंग बॉलर्ससाठी आहेत. न्यूझीलंड ही अशा उत्कृष्ट गोलंदाज रत्नांची खाण आहे, या रत्नांना अधिकाधिक पैलू पाडण्यावर त्यांचा भर असतो. तर या चमूमध्ये एक जागा लेफ्ट आर्मरसाठी राखून ठेवायला हवी. 1973 च्या संघात असणारा रिचर्ड कॉलिंग या जागेचा प्रबळ दावेदार असला तरी, मी आताच्या संघात असणाऱ्या ट्रेंट बोल्टची यासाठी निवड करेन. आणि शेवटच्या जागेसाठी शेन बाँडला घेईन. ताशी शंभर मैलांपेक्षा अधिक वेगाने, स्विंग करणारी बोलिंग टाकण्याच्या बाबतीत केवळ आणि केवळ वकार युनूसच त्यांची बरोबरी करू शकतो.

तर ही आहे माझी अकरा खेळाडूंची टीम. 1. ग्लेन टर्नर 2. बर्ट सचक्लिफ 3. केन विलियमसन (कर्णधार) 4. मार्टिन क्रो (उपकर्णधार) 5. मार्टिन डनली 6. ब्रेंडन मॅक्युलम 7. डॅनियल व्हेट्टोरी 8. रिचर्ड हॅडली 9. टीम साऊदी 10. ट्रेंट बोल्ट 11. शेन बाँड.

मी मनोमन कल्पना केल्याप्रमाणे या संघाची समजा अशाच भारतीय संघाशी, उपखंडात अतिशय चुरशीची  लढत झाली तर, या अटीतटीच्या लढाईत कुंबळे, मंकड आणि अश्विन न्यूझीलंडला जरा भारी पडू शकतात. पण हाच सामना साउदम्पटनला ढगाळलेल्या वातावरणात झाला तर गावस्कर, तेंडूलकर आणि तत्सम खेळाडूंना चीतपट करण्यासाठी मी हॅडली आणि बाँडला प्राधान्य देईन.

(अनुवाद : प्रियांका तुपे)

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

रामचंद्र गुहा,  बंगळुरू, कर्नाटक

भारतीय इतिहासकार व लेखक. समकालीन सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक विषयांवर तसेच पर्यावरणावर आणि क्रिकेटच्या इतिहासावर लेखन. 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके