डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

काँग्रेस पक्ष नेहरू-गांधींना विसरून का जाऊ शकत नाही?

पक्षातील पहिल्या नंबरचा परिवार आणि इतर काँग्रेसजन यांच्यातील परस्परनाते हे राजा व प्रजा किंवा मालक व याप्रमाणे आहे. नेहरू-गांधी म्हणजे अगदी उच्च प्रतीची प्रजाती आहे, असेच त्यांच्याकडे पाहिले जाते. आता राजकीय राजेशाही आणि परिवाराचे नियंत्रण ढासळू लागले असले; तरीही प्रजेने त्यांना बदलावे, हा विचारच सुचत नाही. अशा तथाकथित करिश्म्यावरील ही श्रद्धा एकीकडे मन हेलावणारी आहे, तर दुसरीकडे मूर्खपणाची आहे. ही गोष्ट याचवरून स्पष्ट होते की, काही काँग्रेसजन २०१४ या वर्षाला १९७७ समजतात.

 

सन 2014 च्या मे महिन्यात सार्वत्रिक निवडणुका जशा भारतात झाल्या, तशा इंग्लंडमध्येही झाल्या. आपली निवडणूकपद्धती आपण इंग्लंडकडूनच घेतली आहे. इंग्लंडमधील या निवडणुकीत मजूर पक्षाला आधीच्या 2010 च्या निवडणुकीपेक्षा 24 कमी म्हणजे 232 जागा मिळाल्या. म्हणून मजूर पक्षाचे नेते एड्‌ मिलिबँड यांनी ताबडतोब राजीनामा दिला. त्यांनी या पराभवाची जबाबदारी स्वीकारली.

इकडे भारतात काँग्रेसला 44 जागा मिळाल्या, म्हणजे आधीच्या निवडणुकीपेक्षा 150 जागा कमी मिळाल्या; परंतु काँग्रेसचे नेते म्हणजे अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी (प्रचारमोहिमेत काँग्रेसने पुढे केलेला चेहरा) आपल्या पक्षातील जागेवर जसेच्या तसेच राहिले. आपल्या अक्षमतेची (की विनाशकतेचीच) जबाबदारी त्यांनी घेतली नाही.

सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांनंतर आता दीड वर्ष उलटले आहे. या काळात गांधी कुटुंबीयांनी देशातील सर्वांत जुन्या पक्षावरील आपली पकड अजूनच घट्ट केली आहे, हे गेल्याच शनिवारी म्हणजे 19 डिसेंबरला स्पष्ट झाले. ‘नॅशनल हेरॉल्ड’च्या प्रकरणात या दोघांना कोर्टात हजर व्हायचे होते. हे एक व्यक्तिगत प्रकरण एका व्यक्तिगत तक्रारीवर आधारलेले; तरीही एकजुटीने आलेल्या वरिष्ठ काँग्रेस नेत्यांची फळीच तिथे जमली होती. त्यात काही पूर्वीचे केंद्रीय मंत्री तसेच मुख्यमंत्रीही होते. आरोपींबरोबर तेही कोर्टात आले होते. हे सगळे आपले दृढ ऐक्य आणि पाठिंबा दाखविण्यासाठी आले होते, का ही केवळ खुशमस्करी होती? दुसरीच शक्यता अधिक वाटते.

त्या दिवशी पक्षातील अनेक स्त्री-पुरुष कर्यकर्ते आपल्या नेत्यांच्या जवळ जाण्यासाठी धसमुसळेपणा करत होते. या सगळ्यांना सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या निकट जायचे होते आणि त्यांच्या भोवतीच्या गर्दीमुळे नाहीच जमले, तर निदान प्रियांका गांधींजवळ तरी जाता यावे, असा त्यांचा प्रयत्न होता. काँग्रेस पक्ष नेहरू-गांधी घराण्यावर एवढ्या दयनीयपणे का अवलंबून आहे? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याआधी मला हे सांगायचे आहे की- एका परिवाराच्या पलीकडे जाण्याने या पक्षाचे हित कसे अधिक साधले जाणार आहे.

पहिले कारण मी आधीच सूचित केले आहे. ते म्हणजे, नेहरू-गांधींनी या पक्षाच्या इतिहासातील सर्वांत दारुण अशा पराभवाकडे पक्षाला पोचविले. दुसरे कारण हे की, या कुटुंबाचा करिश्मा ओसरतो आहे. मतदार जसजसा अधिक युवा होतो आहे, तसतसे इंदिरा गांधी किंवा जवाहरलाल  नेहरू यांनी देशासाठी काय केले असावे किंवा काय केले नसावे, हे आता कुणाला आठवत नाही. तिसरे कारण म्हणजे, तरुण असणाऱ्या भारताला आता वंशावळ-वारसा अशा गोष्टींचे अप्रूप उरलेले नाही. ते आता म्हणतात- ‘तुमची स्वत:ची पात्रता काय आहे ते सांगा; वडिलांची, आजीची नका सांगू.’ चौथे कारण आहे- ज्याला पक्षाचा वारसदार म्हणून समजले जाते, त्या राहुल गांधींच्या बाबतीत आता दहा वर्षांत हेच दिसले आहे की; त्याच्याकडे हुशारी, भावना किंवा चिवटपणाही नाही. एका प्रभावी नेत्याकडे हे असणे फार गरजेचे आहे. पाचवे कारण आहे की- एका राष्ट्रव्यापी पक्षाचे नेतृत्व एका कुटुंबाशी सीमित करणे योग्यच नाही. कारण त्यामुळे पक्षात सुप्तावस्थेत असणारे श्रेष्ठ आणि कणखर नेतृत्व देऊ शकणारे स्रोतच बंद होतात. काँग्रेसच्या हेच हिताचे होणार आहे की, दीर्घकालीन भविष्यासाठी आपल्या राष्ट्रीय नेतृत्वाची दारे पक्षातील हुशारीच्या मोठ्या भांडारासाठी उघडली पाहिजेत; परंतु काँग्रेसने असे केलेले नाही. तसे करण्याची इच्छा असल्याचीसुद्धा चिन्हे दिसत नाहीत. अशा वेळी प्रश्न पडतो की, नेहरू-गांधींचा हा जाचक पगडा पक्षावर का आहे?

याचे पहिले कारण असे आहे की- पक्षातील बहुधा सर्वांना असा काळच आठवत नाही की, ज्या वेळी पक्षावर नेहरू-गांधींचे नियंत्रण नव्हते. इंदिरा गांधींनी 19७5 मध्ये संजय गांधींना आपला राजकीय वारस म्हणून अभिषिक्त केले. त्याच वेळी काँग्रेस पक्षाचे रूपांतर ‘एका कुटुंबाचे दुकान’ होण्यात झाले. राजीव गांधींच्या हत्येचा काळ सोडता, नेहरू-गांधी कुटुंबानेच काँग्रेसचे नेतृत्व सातत्याने केले आहे. यातून मानसिक परावलंबनाची संस्कृती निर्माण झाली. हे इतके अति झाले की ७0-७5 वर्षांचे काँग्रेसजनसुद्धा एखाद्या लहान मुलाने काहीही झाले तर आईकडे पाहावे, तसे नेहरू-गांधी घराण्याकडे पाहू लागले. त्या घराण्याशिवाय हे लोक वेगळे जगू शकत नाहीत, त्यांना स्वत:चे अस्तित्व नाही, त्यांचे असे वेगळे जीवन नाही.

दुसरे कारण हे आहे की, प्रौढ वयाचे गुलाम नबी आझाद किंवा मल्लिकार्जुन खर्गे, तसेच समतोल विचारांच्या शीला दीक्षित किंवा मीरा कुमार यांनासुद्धा अजूनही वाटते की; या परिवाराच्या नावाच्या आणि कीर्तीच्या भोवती अजूनही प्रकाशवलय आहे. परंतु प्रस्तुत इतिहासकाराला किंवा काँग्रेसच्या विरोधात मत देणाऱ्या लक्षावधी मतदारांना मात्र तसे वाटत नाही. हे सगळे फक्त प्रादेशिक नेते आहेत; परंतु नेहरू-गांधी यांचा पगडा प्रदेश, जात, भाषा यांच्या पार पलीकडला आहे. मात्र हा पगडा खूप वेगाने ओसरत आहे, हे पक्षाबाहेरच्या निरीक्षकांना दिसत आहे; पण तंबूत राहणाऱ्या काँग्रेसच्या लोकांना अजूनही वाटते की, नेहरू आणि इंदिरा गांधी जशा निवडणुका जिंकून देत असत, तसेच राहुल गांधीसुद्धा करतील.

पक्षातील पहिल्या नंबरचा परिवार आणि इतर काँग्रेसजन यांच्यातील परस्परनाते हे राजा व प्रजा किंवा मालक व सेवक याप्रमाणे आहे. नेहरू-गांधी म्हणजे अगदी उच्च प्रतीची प्रजाती आहे, असेच त्यांच्याकडे पाहिले जाते. आता राजकीय राजेशाही आणि परिवाराचे नियंत्रण ढासळू लागले असले; तरीही प्रजेने त्यांना बदलावे, हा विचारच सुचत नाही. अशा तथाकथित करिश्म्यावरील ही श्रद्धा एकीकडे मन हेलावणारी आहे, तर दुसरीकडे मूर्खपणाची आहे. ही गोष्ट याचवरून स्पष्ट होते की, काही काँग्रेसजन 2014 या वर्षाला 19७७ समजतात. सन 19७७ च्या पराभवातून इंदिरा गांधी पुन्हा उसळी मारून सत्तेत आल्या; त्याप्रमाणेच सोनिया आणि राहुल येतील, असे त्यांना वाटते. बाकीच्या काँग्रेसजनांना प्रियांकांनी राजकारणात यावे, असे वाटते.  म्हणजे परिवाराचे उतरत गेलेले आकर्षण त्याच परिवारातील कुणी तरी पुन्हा उंचावर नेईल.

नेहरू-गांधी यांच्याशी असलेले पाश काँग्रेसला तोडता येत नाहीत याचे तिसरे कारण म्हणजे- हा परिवारच काँग्रेसला एकसंध ठेवू शकतो, ही प्रचलित असणारी भावना. परिवार म्हणजे पक्षाला बांधून ठेवणारे सिमेंट आहे, डिंक आहे. त्यांच्यामुळे लोकांची वैयक्तिक महत्त्वाकांक्षा तसेच गटा-गटातील भांडणे नियंत्रणात राहतात. हे नियंत्रण जर गेले, तर पक्षातील इतर पुढाऱ्यांमधील वितुष्टे पक्षाला फाडून टाकतील असा तो समज आहे. काँग्रेसच्या सध्याच्या काळासाठी आणि भविष्यासाठीही नेहरू-गांधी हेच पक्षाचे अंग असणे अत्यावश्यक आहे असे मानले जाते, याचे चौथे कारण असे असावे की- नेहरू-गांधी किंवा त्यांचे जवळचे सल्लागार यांचे पक्षाच्या पैशांवर नियंत्रण आहे. आता या गोष्टीला पुष्टीही मिळणार नाही आणि हे नाकारताही येणार नाही. कारण प्रमुख राजकीय पक्षांचा पैसा माहितीच्या अधिकाराखाली आणावा, असा प्रमुख माहिती आयुक्तांनी हुकूम काढूनसुद्धा काँग्रेसचे व भाजपचे हिशेब जनतेपासून अद्याप दूरच आहेत. खरे तर या पक्षांच्या बहुतेक लोकांपासूनसुद्धा ते दूरच आहेत. तरीसुद्धा काँग्रेसमधील आणि काँग्रेसबाहेरच्या लोकांना असे वाटते की, पक्षाच्या खजिन्याच्या चाव्या ‘10, जनपथ’ आणि त्याजवळच्या कंपूने स्वत:च्या ताब्यात घट्ट धरून ठेवल्या आहेत.

हे जर खरे असेल, तर नेहरू-गांधींचे काँग्रेसमधील वर्चस्व अभेद्य का आहे, हे काही प्रमाणात तरी स्पष्ट होते; मग त्यांनी पक्षाला जरी पराभवाकडे ढकलले तरी. ‘नॅशनल हेरॉल्ड’च्या बाबतीत आपल्याला जे समजले आहे, त्यामुळे या अंदाजाला पुष्टीच मिळते. मी हे लिहिण्याच्या आदल्याच रात्री भूतपूर्व केंद्रिय अर्थमंत्री पी.चिदंबरम्‌ यांची टीव्हीवर मुलाखत घेतली जात होती. त्यांनी असा दावा केला की- नॅशनल हेरॉल्ड हे काँग्रेसचेच वृत्तपत्र आहे, त्यामुळे पक्षाने त्याला कर्ज देणे अगदी साहजिक आहे. आणि म्हणून पक्षाध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे त्यातील समभाग बहुसंख्य असणे, हेही सरळच आहे. यातून उद्‌भवणारे पुढचे प्रश्न मुलाखतकाराने विचारावयास पाहिजे होते, ते दुर्दैवाने विचारलेच नाहीत. ते म्हणजे- हे म्हणजे सोनिया गांधी व राहुल गांधी यांचे व्यक्तिगत समभाग आहेत, का काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या नात्याने आहेत? म्हणजे या दोघांनी पक्षातील पदे सोडली, तर ते समभाग नवे पक्षाध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या नावाचे होणार आहेत का? जर हे प्रश्न त्या मुलाखतीत विचारले गेले असते तर मला वाटते की- अगदी सभ्य आणि हजरजबाबी असणाऱ्या चिदंबरम यांनासुद्धा त्यांनी परिस्थितीत जी धूसरता शिताफीने निर्माण केलेली होती, ती घालवता- घालवता नाकीनऊ आले असते.

एम.जे.अकबर यांनी काही महिन्यांपूर्वी एक मुलाखत दिली होती. तेव्हा त्यांनी सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढविला होता. त्यांनी असे म्हटले होते की, ‘काँग्रेस अध्यक्षांच्या आपल्या चिरंजीवावरील भक्तीमुळे राहुल गांधी म्हणजे भारताच्या राजकारणातील एक बिघडलेला मुलगा झाला आहे. आईच्या मुलावरील आंधळ्या प्रेमाने पक्ष नष्ट होत आहे.’ असे अकबर यांनी मांडले आणि ‘हे थांबवले नाही, तर त्यामुळे देशसुद्धा नष्ट होईल’, असा निर्णय दिला. एम.जे.अकबर एके काळी काँग्रेसमध्ये होते; आता ते भाजपमध्ये आहेत. परंतु त्यांचे हे मत त्यांनी भाजपचा प्रवक्ता किंवा पूर्वश्रमीचा काँग्रेसमन म्हणून मांडले नव्हते, तर आधुनिक भारताचा इतिहासकार आणि जवाहरलाल नेहरूंना समजून-उमजून घेणारा त्यांचा चरित्रकार म्हणून मांडले होते. हा पक्ष एका जमान्यात देशासाठी काय होता, हे त्यांच्यातील इतिहासकाराला माहीत आहे. एम.जे.अकबर यांच्यातील लोकशाहीच्या चाहत्याला सुदृढ आणि प्रबळ विरोधी पक्षाचे महत्त्वही चांगलेच माहीत आहे.

म्हणजे या माता-पुत्रांना वगळून काँग्रेस पक्ष तात्त्विकदृष्ट्या पाहिले तर विरोधी पक्षाची भूमिका बजावू शकतो, असे त्यांना वाटते. अर्थात, अकबर यांचा असा उत्स्फूर्त अभिप्राय ही काही त्यांच्या पक्षाची विचारसरणी नाही, कारण भाजपच्या कोणत्याही प्रवक्त्याला काँग्रेस संपण्याच्या संभाव्यतेमुळे मुळीच वाईट वाटणार नाही (नरेंद्र मोदींनी तर देशाला काँग्रेसमुक्त करण्याची भाषा केली आहे); परंतु अकबर यांचे मत म्हणजे प्रस्तुत लेखकाच्या स्वत:च्या मताचाच प्रतिध्वनी वाटतो. प्रस्तुत लेखक कोणत्याही राजकीय पक्षाचा कधीच नव्हता तरी त्याच्या मनात येते- जो पक्ष एके काळी या देशासाठी एवढा मोलाचा होता, त्याचा आज इतका संघटनात्मक आणि नैतिक अध:पात झाला आहे. खरं तर यामुळे विषण्णताच येते.

(अनुवाद: अशोक वाडीकर)

Tags: Ashok Vadikar अशोक वाडीकर नेहरू एमजेअकबर सोनिया गांधी राहुल गांधी काँग्रेस रामचंद्र गुहा Neharu MJAkbar Sonia Gandhi Rahul Gandhi Congress Ramchandra Guha weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

रामचंद्र गुहा,  बंगळुरू, कर्नाटक

भारतीय इतिहासकार व लेखक. समकालीन सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक विषयांवर तसेच पर्यावरणावर आणि क्रिकेटच्या इतिहासावर लेखन. 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके