डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

अनंतमूर्तींखेरीज भारतातील इतर कोणत्याही व्यक्तीला ‘पब्लिक इंटलेक्च्युअल’ असे म्हणता येणार नाही. कदाचित या बाबतीत त्यांची बरोबरी आणखी एक व्यक्ती करू शकेल; त्यांच्याचप्रमाणे वयातीत आणि अदम्य असलेल्या महाश्वेतादेवी. अनंतमूर्तींना लाभलेली सामाजिक व लौकिक प्रतिष्ठा या देशातील एकाही इंग्रजी लेखकाकडे नाही; त्यांचे वाचक आणि भोवतालची जनता यांच्याबरोबरचा त्यांचा अनुबंध सखोल आणि पूर्ण जीवनभराचा आहे. आमच्या लेखक जमातीपैकी एखाद्याचे निधन होते तेव्हा जास्तीत जास्त त्याची नोंद इंडिया इंटरनॅशनल सेंटरच्या बारमध्ये घेतली जात असावी. पण अनंतमूर्ती आपल्या निर्मात्याला भेटतील तेव्हा त्यांचे लिखाण आणि त्यांचा वारसा यांच्यावर कर्नाटकातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये चर्चा आणि वाद- विवाद चालू झालेले असतील.

एक प्रसिद्ध कादंबरीकार, ललित लेखक आणि राजकीय टीकाकार म्हणून यू.आर.अनंतमूर्ती देशभर विख्यात आहेत. त्यांचा ऐंशीवा वाढदिवस नुकताच येऊन गेला. बंगलोर येथील त्यांच्या घराचे नाव ‘सुरागी’ असे आहे. सुरागी (मराठी सुरंगी) हे असे एक फूल आहे की ते शिळे झाले आणि वाळून गेले तरीही त्याचा सुगंध दरवळत राहतो. अनंतमूर्तींच्या व्यक्तिमत्त्वाशी साम्य दर्शविणारे हे नाव आहे असे कोणाला वाटले तर ते मात्र साफ चूक आहे. अनंतमूर्तींचे वर्णन एक रूढिभंजक बंडखोर माणूस असेच करावे लागेल. त्यांच्या ‘संस्कार’ आणि ‘भारतीपूर’ या कादंबऱ्यांनी आधुनिक भारतीय साहित्याच्या प्रवाहाला वाट करून दिली आहे. कन्नड वर्तानपत्रांधील त्यांचे लेख आवडीने आणि अत्यंत जागरूकपणे वाचणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. सागर आणि म्हैसूर या दोन विद्यापीठांत इंग्रजी शिकवताना त्यांनी उत्कृष्ट प्राध्यापक हा लौकिक मिळवलाच, पण अनेक विद्यार्थ्यांना लेखन व अभ्यास यासाठी विशेष प्रेरणा दिली, आणि तसे योगदान देणाऱ्या अनेक पिढ्या निर्माण केल्या. 

त्यांच्या या वाढदिवसाच्या समारंभाचे आमंत्रण मिळाल्यामुळे मी तिथे उपस्थित होतो. ‘सुरागी’मध्ये जमलेले साहित्यिक, समीक्षक, शिक्षक, कवी, कादंबरीकार, नाट्यलेखक, चित्रपटनिर्माते, छायाचित्रकार आणि संगीतकार हे सर्व कानडी भाषिकच होते. कदाचित मीच एकटा इंग्रजीभाषिक लेखक त्यांच्यामध्ये होतो, पण आम्ही सर्वच अनंतमूर्तींना शुभेच्छा देण्यासाठी त्या समारंभात सहभागी झालो होतो. व्यक्तिमत्त्वातील गोडवा आणि वृत्तीतील औदार्य यांमुळे त्यांना मित्र भरपूर आणि थोडे शत्रूही होते, कारण त्यांचे विचार व भाषा एखाद्याबद्दल लिहिताना जितकी कोल आणि प्रेळ असे; तितकीच ती सौंदर्यास्वाद किंवा राजकारण यांसारख्या विषयांवरील तीव्र मतभेदांना वाट करून देताना धारदार व जहाल होत असे. 

दिल्लीमध्ये 1989 या वर्षांत पंडित जवाहरलाल नेहरूंच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने बोलावण्यात आलेल्या एका परिषदेच्या वेळी मी अनंतमूर्तींना प्रथम भेटलो. त्या वेळी आम्हा दोघांच्याही परिचयाचे एक समीक्षक टी.जी.वैद्यनाथन्‌ यांनी अनंतमूर्तींच्याजवळ जाऊन त्यांची ओळख करून घेण्यास मला सुचवले. त्या वेळी अनंतमूर्ती ही साहित्यक्षेत्रातील एक फार मोठी व्यक्ती मानली जात होती आणि माझ्या नावावर एक साधे पुस्तकही नव्हते. आम्हा दोघांच्या दर्जाधली ही प्रचंड दरी ओलांडून त्यांच्यापर्यंत पोचणे मला अवघड वाटत होते. पण त्या दिवसांत मी टी.जी.व्हीं (वैद्यनाथन्‌)चा शब्द आणि इच्छा विनाअट पाळत होतो. टी.जी.व्हीं.नी पाठवल्यामुळे मी आलो आहे असे जवळ जाऊन अनंतमूर्तींना सांगितले, तेव्हा ‘वैद्य, वैद्य’ म्हणत त्यांनी माझा हात घट्ट धरला. त्यांचा आवाज आणि हावभाव यांवरून माझ्या लक्षात आले की टी.जी.व्हींचा कोणताही मित्र त्यांचाही मित्र होऊ शकतो. 

त्या पहिल्या भेटीतच त्यांची उत्स्फूर्तता आणि त्यांच्या स्वभावातील सौजन्य लक्षात आले. त्याचबरोबर नावांबाबतचा त्यांचा विशिष्ट आग्रहही लक्षात आला. टी.जी.व्ही या नावाने त्याच्या मित्रांना आणि त्याच्या विरोधकांना परिचित असलेला माणूस त्यांच्या लेखी फक्त ‘वैद्य’ होता. मला सर्वजण राम म्हणून संबोधतात पण फक्त अनंतमूर्तींसाठी मी नेहमीच ‘गुहा’ असतो. जमावापासून वेगळे होऊन राहण्याच्या आणि प्रत्येक व्यक्ती आणि जागा यांना संदर्भ लक्षात घेऊन योग्य नाव ठेवण्याच्या त्यांच्या उत्कट इच्छेतून आणि पुढाकारातूनच बंगलोरचे नाव ‘बंगळुरू’ असे करण्याची चळवळ यशस्वी झाली. 

त्यानंतर काही वर्षांनी एकदा बोलता बोलता मी त्यांना प्रथम कसा आणि कधी भेटलो याची आठवण करून दिली तेव्हा अनंतमूर्तींनी मला सांगितले की, तरुण वयात त्यांना नेहरू कधीच आवडले नव्हते. ते त्या वेळी राममनोहर लोहिया या जहाल समाजवाद्याचे शिष्य होते. नेहरूंची उच्चवर्णीय, आंग्लाळलेली, नव-वसाहतवादी जीवनपद्धती पाहून भारतातील लोकांचे आणि भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधित्व करायला देशाचे प्रधानमंत्री म्हणून नेहरू लायक नाहीत असेच लोहियांना वाटे. 1967 साली लोहियांचे निधन झाले. वीस वर्षांनंतर भारतात ‘अयोध्या कांड’ झाले. ती घटना व त्यानंतर देशभर उसळलेल्या दंगलींचे वातावरण यांनी लोहियांच्या अनुयायांना धडा दिला की जातीय ऐक्याचा पुरस्कार या एका कळीच्या मुद्यावर स्वातंत्र्य चळवळीतील इतर अनेक नेत्यांपेक्षा नेहरूंवर गांधींचा प्रभाव अधिक होता. वास्तवात या बाबतीत ते गांधींचे पट्टशिष्य होते. नेहरूंनंतरच्या संक्रमण काळात मी अनंतमूर्तींना भेटलो. 1969 किंवा 1979 सालात नेहरूंच्या स्मृतीनिमित्त आयोजित केलेल्या सभा-समारंभांना ते कदाचित उपस्थित राहिलेही नसतील, पण 1989 मध्ये नेहरूंवरील परिसंवादासाठी ते उपस्थित राहिले, त्यामागे काही विशिष्ट कारण होते असे मला वाटले. 

नव्याने पुढे येणारे पुरावे पाहून आपले जुने समज अगर श्रद्धा तपासून त्यांच्यामध्ये बदल घडवून आणण्याची तयारी हा या माणसाचा एक विशेष होता. पहिल्याच भेटीत पाश्चिमात्त्य पद्धतीने समोर हात लांबवून, दुसऱ्याचा हात घट्ट पकडून औपचारिक हस्तांदोलन करण्याऐवजी भारतीय पद्धतीने शेजारी उभे राहून माझ्या हाताचा तळवा आपल्या हातात धरून ठेवून सहृदयतेने त्यांनी माझी ओळख करून घेतली; त्याच वेळी माझ्या मनात विचार आला की, दिल्ली आणि कलकत्ता येथे माझे जे वैचारिक प्रणेते (गुरू) आहेत त्यांपेक्षा अनंतमूर्ती वेगळे आहेत. ज्ञानपीठ, पद्मभूषण आणि साहित्य अकादमीचे अध्यक्षपद अशी मोठी पारितोषिके, पुरस्कार आणि सन्मान प्राप्त झालेली ही व्यक्ती उपदेश किंवा सल्ले देणारी भाषणे करीत बसत नाही. ते जेवढे बोलतात, तेवढे शांतपणाने ऐकतातही. दुसऱ्याचे- विशेषत: त्यांच्यापेक्षा लहान असलेल्या तरुणांचे- मत, प्रतिवादही ते शांतपणे ऐकून घेतात. 

1994 साली मी बंगलोरला स्थायिक झालो. तिथे डी.आर.नागराज या समीक्षकांशी माझी ओळख झाली आणि त्याचे पुढे दोस्तीत रूपांतर झाले. त्यांनी त्यांच्या गुरूंबद्दलची हकीगत मला सांगितली. पूर्ण दहा वर्षे अध्ययन केल्यानंतर अनंतमूर्तींनी नागराजांना सांगितले, ‘मला जेवढे येत होते तेवढे मी तुला शिकवले आहे, आता तुला दिल्लीला आशिष नंदीकडे पुढील शिक्षणासाठी पाठवावे लागेल.’ मग अनंतमूर्तींनीच खटपट करून ‘सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज्‌’ या संस्थेची फेलोशिप नागराजना मिळवून दिली, जिथे त्यांनी पुढील काही वर्षे अत्यंत विधायक, उत्पादक असे काम भरभरून केले. 

मी स्वत: दिल्लीहूनच बंगलोरला आलो होतो; आशिष नंदींना ओळखत होतो. जरी त्यांचे लिखाण मला आवडत होते तरी मला हे जाणवले होते की, आपल्या कोणत्याही विद्यार्थ्याला, ‘मला जेवढे माहीत होते ते मी तुला शिकवले आहे; आता पुढील शिक्षणासाठी तुला बंगलोरला अनंतमूर्तींकडे पाठवतो’ हे सांगणे त्यांना जमण्यासारखे नाही. खरे म्हणजे आमच्या आजच्या विविध विद्याशाखांध्ये जी बुजुर्ग मंडळी आहेत त्यांच्यापेक्षा नंदी काही वेगळे नव्हते. विद्यार्थ्यांवर एक प्रकारचा मालकीहक्क आणि स्वमतांच्या अचूकपणाचा आग्रह हे सर्व सगळीकडे सारखेच होते. 

1998 साली नागराज यांचे चाळिशीतच अकाली निधन झाले तेव्हा अनंतमूर्तींना शोक अनावर झाला होता. ते म्हणाले, ‘नागराज माझा शिष्य आणि गुरू असा दोन्ही होता’. नागराज, देवनूर महादेव आणि सिद्दलंगय्या यांच्यासारख्या तरुण लेखकांमुळेच दलित साहित्य व चळवळ यांचा परिचय अनंतमूर्तींना झाला होता. जे.एन.यु.मधील आमच्या प्रथम परिचयानंतर ‘सुरागी’च्या मालकाला मी जवळपास वीस वेळा तरी भेटलो. बहुतेक वेळा बंगलोरमध्ये; पण मणिपाल, मॉस्को आणि वायव्य कर्नाटकात हेग्गोडू येथेसुद्धा. त्यांचे दिवंगत मित्र के.व्ही.सुबण्णा यांनी हेग्गोडू या लहानशा गावात एका वार्षिक सांस्कृतिक शिबिराचा उपक्रम सुरू केला होता. आता सुब्बण्णांचा मुलगा- अक्षर- हे चालवतो! 

अनंतमूर्तींची हुकमी उपस्थिती या समारंभाच्या अध्यक्षस्थानी असते. त्यांच्याशी झालेल्या बहुतेक संवादांतून मी भारतातील राजकारण आणि समाजजीवन यांच्यासंबंधी काही मौलिक धडे घेतले. अनंतमूर्तींकडूनच मी ऐकले की, भारतीय लेखक पाश्चात्त्य लेखकांपेक्षा अधिक सुदैवी आहेत; कारण भारतीय लेखक एकाच वेळी 12 व्या आणि 21 व्या अशा दोनही शतकांत जगू शकतो; शिवाय तो त्या दोन शतकांधील काळातही वावरू शकतो. केशरी रंगासारखा सुरेख रंग उजव्या धर्माभिमान्यांचा रंग म्हणून त्यावरचा हक्क आपण मुळीच सोडता कामा नये, असेही मला अनंतमूर्तींनीच बजावले. 

सुमारे दहा वर्षांपूर्वी मणिपाल येथे व्हिजिटिंग प्रोफेसरशिप घेण्यासाठी अनंतमूर्तींनी बंगलोर सोडले, पण ते तिथे वरचेवर येतच राहिले; मी मजेत माझ्या बायकोला म्हणत असे की, हे प्रसिद्ध लेखक सागर किनाऱ्यावरील मणिपालहून राजधानीच्या शहरात कधी येतात ते मला अचूक कळते. वर्तानपत्रातूनच त्यांची हालचाल जाहीर होत असते. अगदी दिवसा-दिवसाची! मणिपालमध्ये पुस्तकाचे प्रकाशन, बंटवालमध्ये व्याख्यान, पर्यावरण विषयावर कार्यकर्त्यांची सकलेशपूरला सभा, हसन येथे साहित्य सोहळ्याचे उद्‌घाटन... तो बहुधा शेवटचा कार्यक्रम असावा! कारण अनेक कार्यक्रमांसाठी अनेक ठिकाणी त्यांनी दिलेल्या व्याख्यानांनी श्रोत्यांना एवढी भुरळ घातलेली असते की कुनिगळ स्टड फार्मध्ये या जुन्या समाजवाद्याचे स्वागत कसे केले जाते हे कोणालाही पाहणे शक्य होत नाही. 

बंगलोरमध्ये या माझ्या मित्रासह विविध कार्यक्रमांत उपस्थित असताना मी पाहिले आहे की, तो जाईल तेथे कॅमेरा त्याचा पाठलाग करतो. अनंतमूर्तींच्या जवळ पोहोचण्यासाठी लोकांची गर्दी लोटलेली असते. त्या सर्व दृश्याच्या केंद्रस्थानी ते असतात. मी त्यांची मधून मधून चेष्टा करतो. (अर्थात्‌ त्यांच्या अनुपस्थितीत) पण त्या चेष्टेमध्ये प्रेम आणि आदरभाव अध्याहृत असतो- थोडा हेवाही वाटतच असतो अर्थात! कारण आज अनंतमूर्तींखेरीज भारतातील इतर कोणत्याही व्यक्तीला ‘पब्लिक इंटलेक्च्युअल’ असे म्हणता येणार नाही. कदाचित या बाबतीत त्यांची बरोबरी आणखी एक व्यक्ती करू शकेल; त्यांच्याचप्रमाणे वयातीत आणि अदम्य असलेल्या महाश्वेतादेवी. 

अनंतमूर्तींना लाभलेली सामाजिक व लौकिक प्रतिष्ठा या देशातील एकाही इंग्रजी लेखकाकडे नाही; त्यांचे वाचक आणि भोवतालची जनता यांच्याबरोबरचा त्यांचा अनुबंध सखोल आणि पूर्ण जीवनभराचा आहे. आमच्या लेखक जमातीपैकी एखाद्याचे निधन होते तेव्हा जास्तीत जास्त त्याची नोंद इंडिया इंटरनॅशनल सेंटरच्या बारमध्ये घेतली जात असावी. पण अनंतमूर्ती आपल्या निर्मात्याला भेटतील तेव्हा त्यांचे लिखाण आणि त्यांचा वारसा यांच्यावर कर्नाटकातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये चर्चा आणि वाद-विवाद चालू झालेले असतील. 

(अनुवाद: कुमुद करकरे) 

Tags: कुमुद करकरे बंगलोर महाश्वेतादेवी डी.आर.नागराज टी.जी.वैद्यनाथन्‌ भारतीपूर संस्कार यू.आर.अनंतमूर्ती रामचंद्र गुहा Kumud Karkare Mahashwetadevi Banglore D R Nagraj T G Vaidyanathan Bhartipur Sanskar U R Anantmurthi Ramchandra Guha weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

रामचंद्र गुहा,  बंगळुरू, कर्नाटक

भारतीय इतिहासकार व लेखक. समकालीन सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक विषयांवर तसेच पर्यावरणावर आणि क्रिकेटच्या इतिहासावर लेखन. 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके