डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

देशात सर्वाधिक अन्याय हा आदिवासींवर झालेला आहे, हे मी या स्तंभातून यापूर्वीही अनेकदा लिहिलेले आहे. दलित व मुस्लिमांपेक्षाही जादा पटीने आदिवासींना एकटे पाडून लक्ष्य करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील आर्थिक व सामाजिक निर्देशांक पाहिल्यास गडचिरोली हा राज्यातील गरीब जिल्हा आहे, पण तो याहूनही अधिक वाईट झाला असता. जिल्ह्याच्या काही भागात मात्र चांगल्या सुधारणा झाल्याचे पाहायला मिळते. गांधीवादी सामाजिक कार्यकर्ते आणि आदिवासी चळवळीतील कार्यकर्त्यांमुळे येथील आरोग्यसेवा व जीवनमान खूप सुधारलेले आहे. येथील सामाजिक वातावरण पूर्ण सुरक्षित नाही, पण छत्तीसगडमधील आदिवासी जिल्ह्यांपेक्षा ते खूप कमी धोकादायक आहे. छत्तीसगडमध्ये हा भाग जणू युद्धभूमीच झाला आहे.

या वर्षीच्या जानेवारीत पुण्यात झालेल्या महाराष्ट्रातील प्रतिभावंतांच्या गौरव समारंभाला (महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका यांचा पुरस्कार वितरण समारंभ) मी उपस्थित होतो. त्या वेळी सामाजिक कार्यकर्त्या मेहरुन्निसा दलवाई व लेखक अरुण साधू यांचा गौरव करण्यात आला. दुर्दैवाने वर्षभरात या दोघांचाही मृत्यू झाला. याच कार्यक्रमात गौरवण्यात आलेले अन्य लोक हयात आहेत, ही आनंदाची बाब आहे. यातील एक आहेत गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील मेंढा गावचे आदिवासी चळवळीतील कार्यकर्ते देवाजी तोफा.

अभय व राणी बंग या डॉक्टर दांपत्याने चालवलेले शोधग्राम येथे उभारलेले सामाजिक आरोग्य केंद्र पाहण्याची माझी बऱ्याच दिवसांची इच्छा होती. त्यासाठी गेल्या नोव्हेंबर महिन्यात मी गडचिरोलीत गेलो होतो. उच्चविद्याविभूषित व सुवर्णपदकाचे मानकरी असलेल्या बंग दांपत्याने जर खासगी आरोग्यक्षेत्रात करिअर केले असते, तर त्यांना फार उज्ज्वल भविष्य होते. मात्र असे न करता त्यांनी भारतीय खेड्यांतील लोकांसमवेत राहण्याचे, त्यांची सेवा करण्याचे, त्यासाठी अभ्यास करण्याचे ठरविले. सुमारे तीस वर्षांपूर्वी ते विदर्भातील जंगलाने वेढलेल्या या दुर्गम भागात आले. तिथे त्यांनी ‘सर्च’ (सोसायटी फॉर एज्युकेशन, ॲक्शन ॲन्ड रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ) या संस्थेची स्थापना केली. सर्च जिथे काम करते, त्या गावांना मी भेटी दिल्या. तेथील सर्चच्या स्टाफचे काम पाहून मी फारच प्रभावित झालो. त्यामध्ये अमेरिकेत शिकलेल्या डॉक्टरांपासून ते कामासाठी प्रशिक्षित केलेल्या आदिवासी स्वयंसेवकांपर्यंत अनेकांचा समावेश आहे. आपल्या कामाप्रति असलेली त्यांची निष्ठा पदोपदी जाणवली. आपल्या नवजात अर्भकाची काळजी कशा प्रकारे घ्यायची याबाबतच्या सूचना खेडुत महिलेला तेथील आरोग्य कर्मचारी देत असल्याचे मी पाहिले. या आरोग्य कर्मचाऱ्यांवर तज्ज्ञ पर्यवेक्षक लक्ष ठेवून होते, त्यांना निष्णांत डॉक्टरांचे मार्गदर्शन होते.

सर्चच्या अविरत कार्यामुळे शोधग्राम परिसरातील अनेक गावांतील नवजात अर्भकांच्या मृत्यूचे प्रमाण आश्चर्यकारकरीत्या कमी झाले आहे. प्रत्यक्ष फिल्डवर मिळालेल्या आकडेवारीचा व माहिती यावर आधारित अनेक शोधनिबंध लिहिले गेले आहेत. या शोधनिबंधांची चर्चा जगभरातील वैद्यकीय क्षेत्रात झाली. याचा परिणाम सार्वजनिक धोरणे ठरवण्यासाठीही झाला, हे महत्त्वाचे आहे.  

बंग दांपत्याची भागीदारी वैयक्तिक व व्यावसायिक, शास्त्रीय व आध्यात्मिक अशी आहे. ‘सर्च’च्या कामावर सर्व अंगांनी या दोघांचाही प्रभाव झाल्याचे दिसते. या कामांची दोघांनी छान विभागणी केली आहे. अभय प्रामुख्याने संशोधनात गुंतलेले असतात आणि राणी आरोग्यसेवेचे काम पाहतात. शोधग्राममधील रुग्णालयात दर वर्षी चाळीस हजार रुग्णांची तपासणी केली जाते. त्यावर राणी बंग यांची देखरेख असते. अनेक ठिकाणी आरोग्यशिबिरे होतात. त्या स्वतः रुग्णांना सतत तपासत असतात.

दहा वर्षांपूर्वी अभय व राणी बंग यांनी ‘निर्माण’ नावाचा उपक्रम सुरू केला. त्यामध्ये दर वर्षी शंभरहून अधिक हुशार तरुण व्यावसायिकांना प्रशिक्षण दिले जाते. मी जेव्हा शोधग्रामला गेलो, त्या वेळी योगायोगाने ‘निर्माण’मधील या विद्यार्थ्यांचे शिबिर सुरू होते. या विशी-तिशीतील डॉक्टर-इंजिनिअर्सशी मी अनेक तास गप्पा मारल्या. बंग यांच्याप्रमाणेच ही तरुण मुलेही उच्चशिक्षित होती. महत्त्वाचे म्हणजे, त्यांच्या शिक्षणाचा उपयोग स्वतःसाठी न करता समाजाच्या सेवेसाठी करण्याची त्यांची मनोमन इच्छा होती.

गडचिरोलीपासून सुमारे दहा मैलांवर शोधग्राम वसलेले आहे. येथून काही मैल आत गेले की, तुम्ही देवाजी तोफा यांच्या मेंढा गावात जाता. गेल्या जानेवारीत पुण्यात देवाजी तोफा यांचा त्यांच्या कार्यासाठी झालेला सत्कार मी पाहिला होता. आता मला त्यांच्या भागात जाऊन त्यांचे काम पाहता येणार होते. ‘सर्च’चा स्वयंसेवक मला एका सकाळी मेंढा गावात घेऊन गेला. पंचायत कार्यालयाबाहेरील एका झाडाखाली बसलेले तोफा आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी त्या गावाने जंगलावरील हक्कांसाठी दिलेल्या लढ्याविषयी माहिती दिली.

मेंढा या गावाभोवती अनेक एकरांचे घनदाट जंगल आहे. विपुल व समृद्ध जैवविविधतेमुळे या भागाला मोठी किंमत आहे. एके काळी येथील ग्रामस्थ बांबू गोळा करत व बल्लारपूर पेपर मिलला विकत असत. शंभर बांबूंच्या मोळीसाठी त्यांना एक रुपया मिळत असे. दरम्यानच्या काळात भ्रष्ट अधिकाऱ्यांशी संगनमत करून कंत्राटदारांनी लाकूड मिलसाठी येथील मोठमोठाली झाडे तोडली आणि दगडखाणी सुरू केल्या. वृक्षतोडीमुळे जमीन ओसाड बनू लागली. जमिनीची धूप होऊ लागली, पाणी वाहून जाऊ लागले. ही सारी हानी गावकऱ्यांच्या डोळ्यांना स्पष्ट दिसत होती. त्यामुळे हे सारे थांबविण्यासाठी ग्रामस्थ एकत्र आले. अनेक वर्षांच्या लढ्यानंतर त्यांनी जंगलावरील त्यांचा हक्क मिळवला.

सन 2007 मध्ये संमत झालेल्या वनजंगल अधिकार कायद्यानुसार गडचिरोली जिल्ह्यातील मेंढा व अन्य डझनभर गावांनी तेथील जंगलावर समाजाचा (कम्युनिटी) कायदेशीर अधिकृत अधिकार मिळवला आहे. त्यामुळे ही जंगले तेथील समाजाच्या मालकीची झाली आहेत. हे आदिवासी लोक पडलेली किंवा तोडलेली झाडे वन खात्याप्रमाणे विकून टाकत नाहीत. उलट जंगल शाश्वत राहण्यासाठी प्रयत्न करतात. तिथून ते बांबू, तेंदूची पाने, आवळा आणि महूची फुले गोळा करतात. लाकूड गोळा करत नाहीत. यामुळे तेथील स्थानिक अर्थव्यवस्था शाबूत राहतेच, त्याशिवाय पर्यावरणाचा ऱ्हास होत नाही.

आपल्या कामाविषयी सारी माहिती दिल्यानंतर देवाजी तोफा यांनी आम्हाला मेंढाच्या मालकीच्या जंगलात दूरवर फेरफटका मारण्यास नेले. तेथील निसर्ग फारच सुंदर होता, तसेच तिथे विपुल जैवविविधताही होती. अनेक प्रकारची झाडे, वनस्पती, पक्षी यामुळे जंगलातील परिसंस्था जतन झाली होती. (वन विभागाच्या क्षेत्रात नेमके याविरुद्ध चित्र पाहायला मिळते. तिथे पाईन, साग, साल अशी ठराविक प्रकारची झाडे असतात.) वाटेत आम्हाला संरक्षणासाठीचे स्वयंसेवक झालेले तरुण ग्रामस्थ भेटले. बंद पडलेली दगडाची खाण तसेच दगडाचे ढीगही पाहायला मिळाले. दूर आत जंगलात दोन लहान, पण खोल तलावही होते. दिसायला फारच सुंदर असलेल्या त्या तलावात भरपूर मासेही होते.

मेंढा येथे पाहिलेले दृश्य फारच प्रभावित करणारे होते. माझ्यासमवेत आलेला सर्चमधील तरुण याच जिल्ह्यातील होता. तो म्हणाला, ‘‘देवाजी तोफा यांचे कार्य प्रशंसनीय आहेच, पण असे काम करणारे ते काही एकटेच नाहीत. गडचिरोलीत अनेक आदिवासी नेते आहेत, त्यांचा त्यांच्या भागात मोठा प्रभाव आहे. त्यांनीही त्यांच्या भागात सामाजिक जंगलाचा कार्यक्रम यशस्वीपणे राबविला आहे.’’

गडचिरोलीचा हा माझा पहिलाच दौरा होता. मात्र पूर्वी बस्तरला भेट दिलेली असल्याने येथील नैसर्गिक व सामाजिक परिस्थिती मला चांगलीच माहिती होती. कारण छत्तीसगढ राज्यातील बस्तर व महाराष्ट्रातील गडचिरोली हे प्रदेश पूर्वी एकाच मोठ्या जंगलाचा भाग होता. येथील आदिवासी, त्यांची संस्कृती, निसर्ग, इतिहास सारे काही  समान व एकच होते. मात्र राजकीय सीमांमुळे हा भाग आता दोन वेगवेगळ्या राज्यांत विभागला गेला आहे.

बस्तरप्रमाणेच गेल्या काही दशकांत गडचिरोलीलाही माओवाद्यांचा मोठा फटका बसला आहे. सुदैवाची बाब म्हणजे, नक्षलवाद्यांचे तेथील प्रमाण आता कमी होत आहे. ते आता बचावात्मक भूमिकेत गेले असले, तरी ते नामशेष मात्र झालेले नाहीत. मी गडचिरोलीत असताना त्याच आठवड्यात शोधग्रामपासून अवघ्या तीस मैल अंतरावर नक्षलवाद्यांनी पोलीस पथकावर हल्ला केला होता.

बस्तरप्रमाणेच गडचिरोलीतही बांबू, साल, मोहाची फुले, नद्या, डोंगररांगा, तळी, आदिवासी, हिंदू आणि नक्षलवादी- इत्यादी सर्व काही आहे. या दोन्ही ठिकाणी अशी अनेक साम्यस्थळे आहेत, मात्र त्याच वेळी काही फरकदेखील आहेत. या मोजक्या फरकाचे परिणामही मोठे आहेत. गडचिरोलीला लोकशाहीचा व अहिंसक कार्याचा मोठा वारसा आहे. त्या कार्यावर गांधीवादी, तसेच आदिवासींनी सुरू केलेल्या चळवळीचा मोठा प्रभाव आहे. बस्तरमध्ये आपल्याला हे पाहायला मिळत नाही. दुसऱ्या बाजूला बस्तरमध्ये राज्य सरकारपुरस्कृत ‘सलवा जुडूम’ नावाच्या कट्टर दक्षता आर्मीचा प्रभाव आहे. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात हिंसाचार व हानी झालेली आहे.

देशात सर्वाधिक अन्याय आदिवासींवर झालेला आहे, हे मी या स्तंभातून यापूर्वीही अनेकदा लिहिलेले आहे. दलित व मुस्लिमांपेक्षाही जास्त प्रमाणात आदिवासींना एकटे पाडून लक्ष्य करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील आर्थिक व सामाजिक निर्देशांक पाहिल्यास गडचिरोली हा राज्यातील सर्वाधिक गरीब जिल्हा आहे, पण तो याहूनही अधिक वाईट झाला असता. मात्र जिल्ह्याच्या काही भागात चांगल्या सुधारणा झाल्याचे पाहायला मिळते. गांधीवादी सामाजिक कार्यकर्ते आणि आदिवासी चळवळीतील कार्यकर्त्यांमुळे येथील आरोग्यसेवा व जीवनमान खूप सुधारलेले आहे. येथील सामाजिक वातावरण पूर्ण सुरक्षित नाही, पण छत्तीसगडमधील आदिवासी जिल्ह्यांपेक्षा ते खूप कमी धोकादायक आहे. छत्तीसगडमध्ये हा भाग जणू युद्धभूमीच झाला आहे.

छत्तीसगडमधील बस्तर विभागात जो काही नागरी समाज (सिव्हिल सोसायटी) होता, तो सलवा जुडूममुळे उद्‌ध्वस्त झाला आहे. छत्तीसगड आता पोलिसी राज्य म्हणूनच पुढे येत आहे. दंतेवाडा, बिजापूर, बस्तर आणि सुकमा जिल्ह्यांतील आदिवासींना वांशिक युद्धाच्या भितीच्या सावटाने सतत ग्रासलेले असते. त्यांचे वर्तमान अंधकारमय आहेच. त्याहीपेक्षा भविष्य जास्त अंधकारमय आहे. जोपर्यंत तेथील राज्य सरकार आपली कट्टर धोरणे मागे घेत नाही आणि मानवतावादी व लोकशाहीवादी दृष्टिकोन स्वीकारत नाही, तोपर्यंत या आदिवासींचे जीवन बदलणार नाही.

मला बस्तरला पुन्हा एकदा भेट द्यायला नक्कीच आवडेल. मात्र, असे पुन्हा करणे नक्कीच शहाणपणाचे ठरणार नाही. कारण बाहेरच्या लोकांसाठी हा भाग फार असुरक्षित आहे. त्यातच ‘सलवा जुडूमवर बंदी घालावी’ अशी सर्वोच्च न्यायालयात मागणी करणाऱ्या याचिकाकर्त्यांपैकी मी एक असल्याने, माझ्यासाठी ते जास्त असुरक्षित आहे. आणि छत्तीसगडमधील सत्तारूढ पक्षाने तर मला जवळपास शत्रू म्हणूनच घोषित केले आहे.

दुसऱ्या बाजूला एखाद्यासाठी देशाच्या कोणत्याही अन्य भागात जाणे जितके सुरक्षित आहे, तितकेच गडचिरोलीला जाणे सुरक्षित आहे.

मुख्यमंत्र्यांचे वेळापत्रक नेहमीच भरगच्च असते याची मला माहिती आहे. पण छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह यांनी जर राज्याच्या सीमेवरील नारायणपूर ओलांडून गडचिरोलीला भेट दिली, तर त्यांच्यासाठी ती फारच लाभदायक गोष्ट ठरेल. स्थानिक लोक, राज्य सरकारकडून त्यांचे चांगले स्वागत-आदरातिथ्य होईल. कारण महाराष्ट्रातही त्यांच्याच पक्षाचे म्हणजे भाजपचे सरकार आहे. त्यांनी ‘सर्च’सारख्या संस्थेला, ते काम करत असलेल्या गावांना, त्याचप्रमाणे सामाजिक जंगलाचा उपक्रम राबविणाऱ्या मेंढासारख्या गावाला भेट दिली, तर माझ्याप्रमाणेच त्यांचेही यातून मोठे शिक्षण होईल, त्यांना चांगली माहिती मिळेल. कदाचित येथे मिळणाऱ्या या माहितीचा, ज्ञानाचा ते अधिक सकारात्मक-संरचनात्मक उपयोगसुद्धा करू शकतील. कारण लेखक केवळ लेख लिहील किंवा पुस्तक प्रकाशित करेल; पण मुख्यमंत्री अशा प्रकारच्या सुधारणा राज्याच्या धोरणांत घडवून आणू शकतो आणि सामान्यांचे जीवनमान बदलवू शकतो.

(अनुवाद - धनंजय बिजले) 

Tags: धनंजय बिजले रामचंद्र गुहा गडचिरोलीतील गोंड आणि गांधीवादी कालपरवा बस्तर ‘निर्माण’ ॲक्शन ॲन्ड रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ) ‘सर्च’ (सोसायटी फॉर एज्युकेशन शोधग्राम राणी बंग अभय बंग मेंढा गडचिरोली देवाजी तोफा Ramchandra Guha Gadachirolitil Gaund aani Gandhivadi Kaalparava dhananjay bijale Bastar NIRMAN Action and Research in Community Helath (Society For Education SEARCH Shodhgram Rani Bang Abhay Bang Mendha Gadachiroli Devaji Tofa weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

रामचंद्र गुहा,  बंगळुरू, कर्नाटक

भारतीय इतिहासकार व लेखक. समकालीन सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक विषयांवर तसेच पर्यावरणावर आणि क्रिकेटच्या इतिहासावर लेखन. 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके