डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

भारतात परतल्यानंतर सुरुवातीला स्त्रियांना राष्ट्रवादी राजकारणापासून दूर ठेवण्याकडे गांधींचा कल होता. सार्वजनिक अवकाशात पुरुष व स्त्रिया एकत्र आले, तर दृढ रूढिवादी असलेला समाज वैरभावी प्रतिक्रिया देईल अशी भीती त्यांना वाटत होती. इथेही दोन आदर्श स्त्रियांमुळे त्यांना अधिक प्रगतिशील भूमिका घेण्यासाठी प्रोत्साहन मिळालं. सरोजिनी नायडू व कमलादेवी चट्टोपाध्याय यांच्यामुळे गांधींची भूमिका बदलली. नायडू 1925 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्ष झाल्या. युरोप व उत्तर अमेरिकेतील राजकीय पक्षांमध्ये नेतृत्वस्थानी स्त्रिया अजिबात नव्हत्या, तेव्हा भारतात हे घडलं. चट्टोपाध्याय यांनी मिठाच्या सत्याग्रहामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडली. त्यानंतर, 1942 साली चले जाव आंदोलनावेळी शेकडो महिला कार्यकर्त्यांनी- यात अनेक जणी समाजवादी विचारांच्या होत्या- संपांचं नेतृत्व केलं, निदर्शनं केली आणि तुरुंगवासही भोगला.

अमेरिकी लेखक लुई फिशर ‘द लाइफ ऑफ महात्मा गांधी’ या त्यांच्या पुस्तकासाठी सुविख्यात आहेत. 1982 साली प्रदर्शित झालेल्या ‘गांधी’ या चित्रपटाचे दिग्दर्शक रिचर्ड अटेनबरो यांनी चित्रपट तयार करताना हे पुस्तक आधारभूत मानलं होतं. गांधींची हत्या झाल्यानंतर एक वर्षाने, 1949 साली फिशर यांचं पुस्तक प्रकाशित झालं. तत्पूर्वी, सात वर्षं आधी त्यांनी ‘अ वीक विथ गांधी’ हे छोटेखानी (आणि आता खूपच कमी लोकांना माहीत असणारं) पुस्तक लिहिलं होतं. फिशर यांनी 1942 सालच्या उन्हाळ्यात भारताचा दौरा केला, तेव्हा मुंबई महानगरीमध्ये आंबेडकर, सावरकर व जिना यांच्याशी त्यांची संभाषणं झाली. त्यानंतर ते सेवाग्रामला गेले- त्या गावातील तेव्हाच्या सर्वांत प्रसिद्ध रहिवाशाशी त्यांना संवाद साधायचा होता. या पुस्तकातील एका विशेष उल्लेखनीय परिच्छेदात फिशर लिहितात:

‘जिना एकतर्फी बोलत सुटत होते. त्यांनी मला त्यांचं म्हणणं पटवून द्यायचा प्रयत्न केला. मी त्यांना काही प्रश्न विचारला की, जणू काही फोनोग्रामवर रेकॉर्ड लावल्यासारखं वाटायचं. ते जे काही बोलत होते ते सर्व मी पूर्वी ऐकलेलं होतं किंवा त्यांनी दिलेल्या पुस्तकांमधून वाचलेलं होतं. पण गांधींना मी काही विचारायचो, तेव्हा मी एखादी सर्जनशील प्रक्रिया सुरू करतोय असं वाटायचं. त्यांचं मन कृतिशील झाल्याचं मला कळत होतं, लक्षात येत होतं. जिनांच्या बाबतीत मला फक्त फोनोग्राम रेकॉर्डवरची सुई खरखरल्याचं तेवढंच कळत होतं. पण गांधी काहीएक निष्कर्ष काढू पाहायचे, तेव्हा मला त्यांच्या म्हणण्याचा अर्थ आकळत होता. त्यामुळे (एखाद्या मुलाखतकाराच्या दृष्टीने) जिनांपेक्षा गांधी खूप जास्त रोमांचक आहेत. गांधींसोबत सूर जुळले तर विचारांची नवीन पोतडीच आपल्यासमोर खुली होते. त्यांची मुलाखत घेणं म्हणजे एखाद्या शोधसफरीला जाण्यासारखं असतं, आणि काही वेळा ते स्वतःदेखील स्वतःच्या बोलण्याने चकित होतात.’ ऐकून घेण्याची व शिकण्याची ही क्षमता, विरोधी पुरावा समोर आला तर स्वतःची मतं बदलण्याची तयारी, यामुळे गांधी त्यांच्या काळातील, आणि आपल्या काळातीलही इतर राजकीय नेत्यांपेक्षा ठळकपणे वेगळे ठरतात. ते सातत्याने स्वतःच्या पूर्वग्रहांसमोर प्रश्नचिन्ह उभं करत होते, त्यांच्या सहकाऱ्यांशी व टीकाकारांशी सातत्याने संवाद ठेवत होते. वंश, जात व लिंगभाव या संदर्भातील गांधींची मतं पाहा. या प्रत्येक बाबतीत गांधींनी त्यांचे आधीचे प्रतिगामी पूर्वग्रह सोडून दिले आणि अधिक समतावादी भूमिका आपलीशी केली.

भारतीय संस्कृतीमध्ये वंशद्वेष खोलवर रुजलेला आहे. आजही ‘गौरवर्णीय’ वधू शोधणाऱ्या पुरुषांच्या वृत्तीमधून वंशद्वेषाचाच आविष्कार होत असतो. काठियावाडमध्ये लहानाचे मोठे झालेल्या गांधींनी निःशंकपणे वांशिक साचेबद्ध विचार स्वीकारले होते. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेतील सुरुवातीच्या वर्षांमध्ये त्यांनी आफ्रिकी लोकांबद्दल अनेक तुच्छतादर्शक टिप्पण्या केल्या होत्या. आपल्या भारतीय लोकांपेक्षा आफ्रिकी लोक स्पष्टपणे निकृष्ट आहेत, अशी त्यांची धारणा होती. परंतु, कालांतराने आफ्रिकी लोकांकडे बघण्याचा गांधींचा दृष्टिकोन कमी तुच्छतादर्शक झाला. ‘सर्व वंश एकमेकांमध्ये मिसळतील आणि बहुधा जगाने कधीच पाहिली नसेल अशी सभ्यता ते निर्माण करतील’, अशी आशा त्यांनी जोहान्सबर्गमध्ये 1908 सालच्या एका जाहीर व्याख्यानात व्यक्त केली होती. 

दक्षिण आफ्रिकेतील आपल्या वास्तव्याच्या अखेरच्या काळात गांधींचा वंशद्वेष लुप्त झाला होता. त्यांची मतं पुढेही आणखी उत्क्रांत होणार होती. आयुष्याच्या अखेरच्या दशकांमध्ये ते सातत्याने तत्त्वनिष्ठ वंशद्वेषविरोधी भूमिका घेताना दिसतात. आफ्रिकी-अमेरिकी कार्यकर्त्यांशी त्यांचा संपर्क होता, या कार्यकर्त्यांचा त्यांनी सेवाग्राममध्ये पाहुणचार केला होता. या कार्यकर्त्यांनी त्यांच्या देशातील वांशिक पूर्वग्रहाशी लढताना अहिंसक सत्याग्रहाचा अवलंब करावा, अशी आग्रही विनंती गांधींनी केली होती, आणि या कार्यकर्त्यांनी तसं केलंही. दक्षिण आफ्रिकेत राहत असेपर्यंत गांधी भारतीयांचा संघर्ष खुद्द आफ्रिकी लोकांच्या संघर्षापेक्षा वेगळा मानत होते. पण मागे वळून पाहताना त्यांना ही भूमिका शहाणपणाची वाटली नाही. दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांचं एक प्रतिनिधीमंडळ 1946 साली त्यांना भेटलं तेव्हा गांधींनी त्यांना सांगितलं की त्यांनी ‘झुलू व बंटू लोकांशी सहयोग’ साधायलाच हवा. ‘आशियाई लोकांसाठी आशिया किंवा आफ्रिकी लोकांसाठी आफ्रिका, अशी घोषणा आता देऊन चालणार नाही, तर जगातील सर्व शोषित वंशांचं ऐक्य साधावं लागेल,’ अशी टिप्पणी गांधींनी केली होती.

परदेशगमन करून आपल्या मोढ बनिया समुदायाचं बंधन झुगारून दिल्याबद्दल गांधींनी त्यांच्या आत्मचरित्रात नोंद केली आहे. परंतु, 1915 साली मायभूमीत परतेपर्यंत त्यांच्यात जातीय भेदभावाची व्यापक समजूत आलेली नव्हती. दक्षिण भारतात प्रवास करताना दलितांना मिळणाऱ्या गैरवागणुकीने ते व्यथित झाले. या टप्प्यावर ते खुद्द जातिव्यवस्थेला आव्हान देण्याबाबत अनिच्छुक असले, तरी त्यांनी अस्पृश्यतेला विरोध करण्याचा निर्धार केला. लक्षणीय समाजसुधारक नारायण गुरू यांच्या अनुयायांकडून प्रेरणा घेत गांधींनी 1920च्या दशकात मंदिरप्रवेशाच्या आंदोलनापाठी आपलं बळ उभं केलं, दलितांनी व सवर्ण हिंदूंनी एकत्र प्रार्थना करावी यासाठी ते प्रयत्नशील राहिले. दलितांचे थोर मुक्तिदाते भीमराव रामजी आंबेडकर यांनी डिवचल्यानंतर व आव्हान दिल्यानंतर गांधींनी 1930च्या दशकात अधिक जहाल भूमिका घ्यायला सुरुवात केली. आता त्यांनी सकारात्मक उपाययोजना, सहभोजन आणि अखेरीस सवर्ण व दलित यांच्यातील विवाह, अशा कार्यक्रमांचाही कैवार घेतला. टीकाकारांशी संवाद साधून आणि स्वतःच्या अनुभवांच्या आधारावर गांधींच्या लक्षात आलं की, विभाजन, विलगीकरण व भेदभाव ही कार्यं पार पाडण्यासाठी जातिव्यवस्थेने अस्तित्वात राहण्याची कोणतीही गरज नाही.

तारुण्यातील वांशिक व जातीय पूर्वग्रह गांधींनी उत्तरायुष्यात पूर्णतः सोडून दिले. लिंगभावासंदर्भातील त्यांची नैतिक उत्क्रांती इतकी पूर्णत्वास पोचली नाही. तरीही, ती कमी महत्त्वाची नव्हती. आपल्या घरेलू आयुष्यामध्ये गांधी साचेबद्ध हिंदू पितामहासारखे होते. दक्षिण आफ्रिकेत स्वतंत्र मनोवृत्तीच्या युरोपीय स्त्रिया भेटल्या नसत्या तर ते कदाचित सार्वजनिक आयुष्यातही तसेच राहिले असते. गांधींचे मित्र व घरसोबती हेन्री पोलक यांची पत्नी मिली ग्राहम, आणि वकिली कार्यालयात गांधींसोबत काम करणाऱ्या सोन्जा श्लेसीन अशा काही स्त्रियांचा यात समावेश होतो. स्त्रिया अंकित व दुय्यम असतात असं पाहण्याची सवय असलेल्या गांधींना मिली यांच्यासह एका घरात राहताना आणि सोन्जा यांच्यासह एका कार्यालयात काम करताना स्वायत्त नैतिक व सामाजिक कर्तेपणा असलेल्या स्त्रिया दिसल्या. परिणामी, गांधींनी 1913 साली केलेल्या एका मोठ्या सत्याग्रहामध्ये भारतीय स्त्रियांचा (यात कस्तुरबाही होत्या) सहभाग राहिल्याचं दिसतं.

भारतात परतल्यानंतर सुरुवातीला स्त्रियांना राष्ट्रवादी राजकारणापासून दूर ठेवण्याकडे गांधींचा कल होता. सार्वजनिक अवकाशात पुरुष व स्त्रिया एकत्र आले, तर दृढ रूढिवादी असलेला समाज वैरभावी प्रतिक्रिया देईल अशी भीती त्यांना वाटत होती. इथेही दोन आदर्श स्त्रियांमुळे त्यांना अधिक प्रगतिशील भूमिका घेण्यासाठी प्रोत्साहन मिळालं. सरोजिनी नायडू व कमलादेवी चट्टोपाध्याय यांच्यामुळे गांधींची भूमिका बदलली. नायडू 1925 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्ष झाल्या. युरोप व उत्तर अमेरिकेतील राजकीय पक्षांमध्ये नेतृत्वस्थानी स्त्रिया अजिबात नव्हत्या, तेव्हा भारतात हे घडलं. चट्टोपाध्याय यांनी मिठाच्या सत्याग्रहामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडली. त्यानंतर, 1942 साली चले जाव आंदोलनावेळी शेकडो महिला कार्यकर्त्यांनी- यात अनेक जणी समाजवादी विचारांच्या होत्या- संपांचं नेतृत्व केलं, निदर्शनं केली आणि तुरुंगवासही भोगला. या टप्प्यावर गांधीवादी चळवळीतील स्त्रियांचा सहभाग खूपच विस्तारला होता. आशिया वा आफ्रिकेतील इतर कोणत्याही वसाहतविरोधी संघर्षामध्ये स्त्रियांची इतकी व्यापक उपस्थिती दिसत नाही.

वंश, जात व लिंगभाव, हे सामाजिक भेदभावाचे तीन मूलभूत अक्ष आहेत. त्यामुळे या संदर्भात गांधींच्या मतांमधील उत्क्रांतीचा मागोवा घेताना मी इथे या तीन प्रश्नांवर लक्ष केंद्रित केलं आहे. पण इतर अवकाशांमध्येही गांधी सातत्याने शिकत होते, वृद्धिंगत होत होते. उदाहरणार्थ, विज्ञान व तंत्रज्ञान या संदर्भातील त्यांचा दृष्टिकोन पाहा. ‘हिंदस्वराज’ या 1909 साली प्रकाशित झालेल्या पुस्तकात गांधी कट्टर तंत्र-विरोधी म्हणून मतं मांडताना दिसतात. परंतु, नंतरच्या वर्षांमध्ये त्यांची मतं मोठ्या प्रमाणात दुरुस्त होणार होती. शल्यविशारद डॉक्टरांनी- यातील एक भारतीय होते, तर दुसरे युरोपीय होते- त्यांची दोनदा यशस्वी शस्त्रक्रिया केली, त्यानंतर आधुनिक वैद्यकशास्त्राविषयीचा त्यांचा निग्रही वैरभाव संपुष्टात आला. सी. व्ही. रामन यांच्यासारख्या वैज्ञानिकांशी संपर्क आल्यावर गांधींनी आधुनिक विज्ञानाच्या पद्धती व प्रक्रिया निकोप रितीने समजून घ्यायला सुरुवात केली. त्यांनी त्यांच्या आत्मचरित्राला ‘माझे सत्याचे प्रयोग’ असं शीर्षक दिलं, हा काही अपघात नव्हता.

ट्रेनमध्ये असताना, आश्रमात असताना, एकट्यात असताना किंवा इतरांशी संभाषण करत असतानाही गांधी सत्याचे प्रयोग करत राहिले. स्वतःची तपासणी करण्याची व स्वतःची चिकित्सा करण्याची क्षमता हा गांधींच्या स्वभावातील उत्कृष्ट गुण होता, आणि त्यांचे विख्यात प्रतिस्पर्धी, मूळचे गुजरातचेच असणारे मोहम्मद अली जिना यांच्यात या गुणाचा अभाव ठळकपणे जाणवतो, असं लुई फिशर यांनी 1942 साली नमूद केलं होतं. आज हयात असलेले सर्वांत शक्तिशाली भारतीय आणि गांधींप्रमाणे गुजराती असणारे नरेंद्र मोदी यांच्यातदेखील या गुणाचा अभाव ठळकपणे दिसतो, असं मी 2021 साली लिहू शकतो.

गांधींची मुलाखत घेणं ‘आनंददायी असतं, याचं एक कारण असं आहे की, ते खरोखरच मन मोकळं करतात आणि मुलाखतकाराला त्यांची यंत्रणा कशी काम करते हे पाहायची मुभा देतात.’ या संदर्भात गांधी इतर भारतीय राजकीय नेत्यांपेक्षा बरेच वेगळे ठरतात. ‘आपले विचार अंतिम परिपूर्ण रूपात मांडले जावेत जेणेकरून आपल्यावर टीका होण्याची शक्यता कमीतकमी राहील,’ असा इतर नेत्यांचा प्रयत्न होता. फिशर पत्रकार म्हणून लिहीत होते, त्यांनी उपरोक्त पुस्तकाचा विषय असणाऱ्या व्यक्तिमत्वांशी प्रत्यक्ष संवाद साधला होता. परंतु, (छापील व अप्रकाशित) दस्तावेजांची छाननी करण्यावर अवलंबून असणाऱ्या इतिहासकाराच्या दृष्टीने पाहायचं तर, गांधीअभ्यासातील ही सर्वांत मोठी आनंददायी गोष्ट आहे: गांधींच्या उक्तीमध्ये व कृतीमध्ये कोणतंही प्रचारतंत्र नव्हतं, क्लृप्त्या नव्हत्या, लपवाछपवी नव्हती, फिरवाफिरवी नव्हती, आपण उत्कृष्ट रितीने पेश व्हायला हवं असा प्रयत्न नव्हता. गांधींबद्दल वाचताना, गांधींबद्दल संशोधन करताना आपल्याला एक मनुष्यप्राणी पाहायला मिळतो. तो शुद्ध व परिपूर्ण होता, अगदी महात्मा होता, असा दावा त्याचे अनुयायी करतात. पण शेवटी, आपण स्खलनशील आहोत, आपल्यात वैगुण्य आहे, याची जाणीव असलेला मनुष्यप्राणीच गांधींच्या रूपात आपल्या समोर असतो.

(अनुवाद- प्रभाकर पानवलकर)

अमेरिकन पत्रकार लुई फिशर यांनी लिहिलेले 'Mahatma Gandhi - His Life and Times' हे पुस्तक 1951 ला प्रसिद्ध झाले. प्रकाशनानंतर सत्तर वर्षांनी हे पुस्तक प्रथमच मराठीत आले आहे. साधना प्रकाशनाचे हे पुस्तक AMAZON वर उपलब्ध आहे. 

Tags: प्रभाकर पानवलकर सी. व्ही. रामन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सरोजिनी नायडू कमलादेवी चट्टोपाध्याय भीमराव रामजी आंबेडकर सेवाग्राम द लाइफ ऑफ महात्मा गांधी लुई फिशर अ वीक विथ गांधी luis fischer weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

रामचंद्र गुहा,  बंगळुरू, कर्नाटक

भारतीय इतिहासकार व लेखक. समकालीन सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक विषयांवर तसेच पर्यावरणावर आणि क्रिकेटच्या इतिहासावर लेखन. 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके