डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

कॉम्रेड यशवंत चव्हाण यांच्या 90 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे ‘भारत : काल, आज, उद्या’ या विषयांवर तीन व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. ‘भारत : काल’ या विषयावर रामचंद्र गुहा, ‘भारत : आज’ या विषयावर कुमार केतकर आणि ‘भारत : उद्या’ या विषयावर नंदन नीलकेणी यांची भाषणे झाली होती. त्यातील रामचंद्र गुहा यांचे अर्धे भाषण पी.बाळू या क्रिकेटपटूचा संदर्भ घेऊन होते, म्हणून ते प्रसिद्ध करीत आहोत. या तीन भाषणांची मिळून एक पुस्तिका ‘लोकवाङ्‌य गृह’ या प्रकाशन संस्थेकडून लवकरच प्रकाशित होत आहे. - संपादक  

माधवने(आताच बोलताना) माझ्याविषयी दोन निरीक्षणं नोंदवली. ती दोन्ही अपमानास्पद होती! त्यांपैकी एक कदाचित अजाणतेपणे तर दुसरं मात्र जाणीवपूर्वक होतं. त्याने ‘डून स्कूल’चा उल्लेख केला. मला असं वाटतं की, कोणत्याही व्यक्तीचं मूल्यमापन त्याच्या शाळेवरून केलं जाऊ नये. माझ्या बाबतीत शाळेचा निर्णय हा असा एक निर्णय होता, जो माझ्यासाठी ‘घेतला’ गेला होता. बाकी माझे कॉलेज, पीएच.डी.चे मित्र, प्रकाशक, शत्रू इत्यादींबाबत सर्व निर्णयांची जबाबदारी माझीच आहे आणि मी ती आनंदाने स्वीकारण्यास तयार आहे. परंतु केवळ माझी शाळा अमुक एक होती म्हणून मला दोष दिला जाऊ नये.

कदाचित अजाणतेपणे माधवने हे निरीक्षण नोंदवलं असावं. मात्र जेव्हा तो असं म्हणाला की, जर (आजचा) कार्यक्रम मराठीत असता तर रामचंद्र गुहा आणि नंदन नीलकेणींना ‘काय चाललं आहे’ हे समजलं नसतं, तेव्हा मात्र (मला वाटतं) तो जाणीवपूर्वक केलेला अपमान होता. (मराठीबाबत मी नीलकेणींविषयी बोलू शकणार नाही. त्यांची पत्नी उत्तम मराठी बोलते.) पण जर मला मराठीत बोलण्यास सांगितलं तर मी (काहीच बोलणार नाही! पण) तेंडुलकर, गावस्कर, उम्रीगर, विजय मांजरेकर, सुभाष गुप्ते यांची नावं घेईन! आणि मी तिथेच थांबणार नाही, तर पुढे जाऊन किशोरी आमोणकर, मोगूबाई कुर्डीकर, केसरबाई केरकर, पद्मा तळवलकर, वीणा सहस्रबुद्धे यांची नावं घेईन. (कारण हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतावरसुद्धा माझं क्रिकेटइतकंच प्रेम आहे) परंतु मी पं.भीमसेन जोशींचं नाव घेणार नाही, कारण ते कर्नाटकातले आहेत.

मी आज इथे माझ्या आवडी-निवडींविषयी बोलायला आलेलो नाही याची मला जाणीव आहे. भारताच्या इतिहासाविषयी मी आज बोलणार आहे. तिथेही मराठी माझी मान मला खाली घालू देत नाही. अभ्यासांती, एक इतिहासकार म्हणून माझं असं मत झालं आहे की, गांधी, नेहरू व टागोर वगळता आधुनिक भारताच्या इतिहासात जे जे काही प्रभावशाली आहे, त्याचं उगमस्थान महाराष्ट्रच आहे. आगरकर, गोखले, रानडे, कर्वे, ताराबाई शिंदे, आंबेडकर ही याची उत्तम उदाहरणे आहेत. त्यामुळे जेव्हा मी पुढच्या वेळी येईन तेव्हा मला मराठीत बोलायला सांगाच!

आपण आज कॉ.चव्हाण यांचा आणि त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यास जमलो आहोत. आज काय बोलावं याविषयी मी बराच विचार केला आणि मी असं ठरवलं की मी काही व्यक्तींविषयी बोलावं. (त्यापूर्वी मला एक गोष्ट सांगायला हवी.) कॉ.चव्हाण हे मार्क्सवादी आहेत. मी स्वत: मार्क्सचा अभ्यास केला आहे. मार्क्सवाद्यांच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे व्यक्तीचं मूल्य कमी लेखण्यावर त्यांचा भर असतो. वर्गांसारख्या सोशल ॲग्रेगेट्‌समुळे इतिहासाला धक्के बसतात अशी त्यामागे धारणा असू शकते. व्यक्ती महत्त्वाची नाही, हा विचार मार्क्सवादी तत्त्वज्ञानातच अनुस्यूत आहे. त्यामुळे त्यांची व्यक्तित्वं तशीच घडवली जातात.

आपल्या देशात आणि माझ्या व्यवसायातसुद्धा व्यक्तींचं महत्त्व कमी लेखले जातं. जर तुम्ही हिंदू असाल तर या जन्माचा आनंद घेण्यापेक्षा तुमचं लक्ष पुनर्जन्मावरच अधिक असतं. कारण मृत्यूनंतर लगेच तुमचा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात पुनर्जन्म होतो, अशी तुची श्रद्धा असते. परंपरेचं महत्त्व कमी करून वेगळ्या विचाराने जगणं कठीण असतं.

व्यक्तिस्वातंत्र्य आणि व्यक्तीला महत्त्व देणं याबाबत (जर आपण नीट पाहिले तर लक्षात येईल की) मार्क्सवाद आणि हिंदूंचे धार्मिक तत्त्वज्ञान हे एकमेकांना विरोध करणारे दोन विचार (विरोधी तत्त्वज्ञान) सारखंच प्रतिपादन करताना आढळतात!

व्यक्तीविषयी आणि इतिहासातील त्यांच्या योगदानाविषयी मला कायमच आकर्षण वाटत आलं आहे. माझ्या संशोधनाच्या निमित्ताने माझा असंख्य व्यक्तींशी संबंध आला. अर्धविस्मृतीत गेलेल्या ज्या व्यक्तीविषयी मी आज बोलणार आहे, ‘त्यातील पहिली व्यक्ती ही मुंबईकर होती. त्या व्यक्तीचे नाव दिलेल्या रस्त्यावर राहणाऱ्या एका मित्रासमवेत मी आज दुपारी जेवलो. आज त्याची (शिल्लक) असणारी एकमेव ओळख म्हणजे ती एक उल्लेखनीय व्यक्ती होती. मला त्याच्याविषयी उत्सुकता निर्माण होण्याचे कारण म्हणजे ‘सामाजिक इतिहास’ आणि ‘क्रिकेट’ या माझ्या दोन आवडीच्या क्षेत्रांना मी त्याच्यामुळे एकत्र आणू शकलो.

अनेक वर्षांपूर्वी मी असा विचार केला होता की, भारतातल्या सगळ्यात पहिल्या क्रिकेट स्पर्धेविषयी एक पुस्तक लिहावं. त्या स्पर्धेस सुरुवातीला ‘प्रेसिडेंसी मॅच’ असे संबोधले जायचे आणि स्पर्धेत युरोपीय व पारशी संघांत समाने व्हायचे. पुढे हिंदू धर्माच्या समावेशामुळे स्पर्धा तिरंगी झाली. मुस्लिम संघ समाविष्ट होताच त्याचे नामकरण ‘चौरंगी स्पर्धा’ असे झाले. (ब्रिटिशांचा धर्मावरून संघ तयार करण्याबाबत आग्रह असायचा.) स्पर्धा चौरंगी झाल्या असल्या तरीही लोकसंख्येचा एक भाग स्पर्धेत खेळू शकत नव्हता. विजय हजारेसारखे भारतीय ख्रिश्चन, ज्यू यांच्यासाठी मग 1935 साली पाचवा संघ आणला गेला. ‘इतर’ या नावाने! (निस्सीम एझिकिल या कवीचे आजोबा ‘इतर’ संघाकडून खेळले होते.)

या स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज, गोलंदाज कोण होते? युरोपियन संघाचं वर्चस्व कसं संपलं वगैरे माहिती मिळवण्यासाठी मी मायक्रोफिल्म्स नजरेखालून घातल्या. 1920 सालातील मायक्रोफिल्म्स अभ्यासताना माझ्या लक्षात आले की, या स्पर्धेविषयी तेव्हाची वृत्तपत्रंसुद्धा खूपच रस घेत असत. मुंबईतील मध्यमवर्गासाठी ‘क्रिकेट’ हा तेव्हाही एक आकर्षणाचा भाग होता. वृत्तपत्रांमध्ये संघनिवडीच्या चर्चा चालू होत्या आणि हिंदू संघाचा कर्णधार म्हणून एम.डी.पैंची निवड झाली होती. त्यांच्या सन्मानार्थ मुंबईतील गौड सारस्वत समाजाने एक कार्यक्रम आयोजित केला होता. (कारण तो गौड सारस्वत जातीचा होता. जातिधर्मांनी विभाजित झालेल्या तेव्हाच्या समाजाला आताच्या मापदंडांनी मोजणे योग्य ठरणार नाही.)

त्या समारंभाविषयीची बातमी मी वाचत होतो. वृत्तपत्र होते, ‘द बाँबे क्रॉनिकल’. बातमीत असे नोंदवले होते की, आपल्या समाजाचे आभार मानताना एम.डी.पै असं म्हणाले की, ‘खरं तर संघाचा कर्णधार होण्याइतकी माझी पात्रता नाही! बाळू पालवणकर ही कर्णधारपदास अधिक लायक व्यक्ती आहे.’ आता मला सांगा की तुमच्यापैकी कोणी महेंद्रसिंग धोनीला सेहवागबद्दल किंवा सौरव गांगुलीला राहुल द्रवीडबद्दल असं बोलताना पाहिलं आहे का, की माझ्याऐवजी याला कर्णधार करायला हवं. कोणताही क्रिकेटपटू असं कधीच म्हणणार नाही आणि म्हणूनच हा सगळा प्रकार अतिशय कुतूहल उत्पन्न करणारा होता.

मी एम.डी.पैंच्या विधानाविषयी आणखी शोध घेत गेलो आणि बाळू पालवणकरला कर्णधार न बनवण्याची दोन कारणं माझ्या लक्षात आली. त्यापैकी कमी महत्त्वाचं कारण हे होतं की, तो गोलंदाज होता. (कर्नाटकचा रहिवासी म्हणून मला याविषयी विशेष रस आहे. भारताच्या सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक असूनही अनिल कुंबळे कर्णधार बनू शकला नाही. शेन वॉर्नदेखील ऑस्ट्रेलियाचा कर्णधार न बनण्यामागे हेच कारण होतं. क्रिकेटविश्वातही एक कर्मठ अशी जातिव्यवस्था अस्तित्वात असते आणि दुसरं व जास्त महत्त्वाचं कारण हे होतं की, बाळू दलित होता.

या बाळूविषयी अधिक माहिती मी मिळवत गेलो आणि माझ्या लक्षात आले की त्याचे आयुष्य हे प्रतिकूलतेवर मात करणाऱ्या धैर्यवान पुरुषाचं आयुष्य आहे. कॉ.चव्हाण यांच्याप्रमाणेच त्यालाही फार संघर्ष करावा लागला.

बाळूचा जन्म धारवाडचा. साल 1875. वडील खडकी येथील युद्धसामग्री उत्पादन करणाऱ्या कारखान्यात कामास असल्याने बाळू त्यांच्याबरोबर पुण्याला आला. (त्या काळात ब्रिटिशांच्या कारखान्यात काम करणं ही दलित समाजासमोर असणाऱ्या फार थोड्या रोजगाराच्या संधींपैकी एक संधी होती.) ‘ऑल व्हाईट पूना क्लब’मध्ये बाळूला नोकरी मिळाली. काम खेळपट्टीशी संबंधित पडेल ते आणि दुसरं म्हणजे गोऱ्या फलंदाजांना नेट्‌समध्ये गोलंदाजी करणं. तो ‘पूना क्लब’मध्ये असताना त्याला कधीही फलंदाजी दिली नसावी असा माझ अंदाज आहे. ‘पूना क्लब’च्या काळातच त्याच्यातील गोलंदाजीची कौशल्यं चांगलीच बहरली. त्याच्या गोलंदाजीची कीर्ती पुणे शहरातील हिंदूंपर्यंत पोहोचली. त्यांनी बाळूला संघात घेतलं. आपल्या गोलंदाजीच्या जोरावर त्याने संघाला बहुतेक वेळा विजय मिळवून दिला आणि चहापानाच्या वेळी मात्र त्याच बाळूला तो दलित आहे या कारणास्तव फेकून देण्याजोग्या कपात आणि पॅव्हिलियनच्या बाहेरच चहा दिला जात असे.

पुढे बाळू मुंबईस आला.(मुंबईला भारतीय क्रिकेटचे माहेरघर असे संबोधतात) मुंबईतही तो हिंदू संघाकडूनच खेळला. त्या काळात बनिया आणि ब्राह्मण यांचं हिंदू जिमखान्यावर वर्चस्व होतं. मालकही तेच होते. जातीने दलित असल्यामुळे उत्तम खेळूनसुद्धा बाळूचा कधी कर्णधारपदासाठी विचार झाला नाही. 1911 साली पहिला अखिल भारतीय संघ ब्रिटनच्या दौऱ्यावर गेला. भारतीय संघाला तिथे दारुण पराभव स्वीकारावे लागले. फक्त एकच जण इंग्लंडध्ये चमकत होता आणि तो म्हणजे बाळू होता. 16 च्या स्ट्राईक रेटने त्याने दीडशे बळी मिळवले. (आणि जर आताच्यासारखे स्लीपमधले क्षेत्ररक्षण तेव्हा असते, तर त्याच्या बळींची संख्या 300 झाली असती!)

धारवाड ते मुंबई व्हाया पुणे असा प्रवास करणाऱ्या बाळूने इंग्लंडमध्ये आपल्या उत्कृष्ट कामगिरीने छाप पाडली. जातीने दलित असणाऱ्या बाळूचा हा सर्व प्रवास रोमांचकारी असाच आहे. अनेक कौंटी संघांनी त्याच्याशी त्या काळी करार करण्याची तयारी दर्शवली होती. (लक्षात घ्या, तो सर्व ग्लोबलायझेशनच्या पूर्वीचा काळ आहे. जगभर जाऊन करार करणाऱ्या आणि करार कसे करावे हे भारतीयांना शिकवणाऱ्या  ‘इन्फोसिस’चा तेव्हा जन्म झाला नव्हता.) त्यामुळे बाळूला करार म्हणजे काय हे माहीत नव्हतं. इंग्लंडहून मुंबईला परतल्यानंतर मुंबईच्या दलित समाजातर्फे बाळू आणि त्याचा भाऊ शिवराम (जो हिंदू संघातील उत्तम अष्टपैलू खेळाडू होता) यांचा ‘मानपत्र’ देऊन सन्मान करण्यात आला. मानपत्राचं वाचन बी.आर.आंबेडकर यांनी केलं होतं. दलित चळवळ आणि महाराष्ट्रातील महार समाज यांचा गाढा अभ्यास असणाऱ्या एलिनॉर झेलिअन यांच्या मते डॉ.आंबेडकरांचा तो पहिलाच सार्वजनिक कार्यक्रम होता. (तत्पूर्वी ते मुंबईतील हुशार विद्यार्थी म्हणून ओळखले जात.)

इतकं सारं होऊनसुद्धा बाळूला कर्णधार केलं नाही. खरं तर त्याच्यामुळेच 1910 च्या दशकात युरोपियन, पारशी व मुस्लिम संघ हिंदू संघाकडून पराभूत होत होते. त्या काळातील तो सर्वोत्तम गोलंदाज होता. त्याची गुणवत्ता इतकी की, खुद्द हिंदू संघाच्या कर्णधाराने- एम.डी.पैंनी- कर्णधारपदास तो (स्वत:हून) जास्त योग्य आहे हे मान्य केलं होतं. (त्याचा मागे उल्लेख केला आहे.)

1920 साली गांधीजींनी आपल्या भाषणांतून जाहीरपणे सांगण्यास सुरुवात केली की, जर भारतीयांना स्वराज्य मिळवण्यास पात्र व्हायचे असेल तर अस्पृश्यतेचा कलंक संपुष्टात यायलाच हवा. स्वातंत्र्यसंग्रामात 1920 नंतर गांधीजींनी अस्पृश्यतानिवारणाच्या कार्यक्रमाची जोड आपल्या राजकारणास दिली. या काळातच असहकार आंदोलन ऐन भरात होतं. सर्वत्र वातावरणात (राजकीय) अस्वस्थता भरून राहिली होती. या सर्व बाह्य घडामोडींचा क्रिकेटवर परिणाम झालाच. ऑगस्ट-सप्टेंबर 1920 मध्ये गांधीजींनी अस्पृश्यता निवारणासंबंधी जाहीर भाषणे करण्यास प्रारंभ केला. डिसेंबर 1920 मध्ये चौरंगी स्पर्धा मुंबईस झाल्या. एम.डी.पै आजारी असल्याने बाळू हाच कर्णधारपदास लायक पर्याय उपलब्ध होता. पण तसं न करता उच्चवर्णीय हिंदूंच्या निवड समितीने बाळूला संघातून वगळले आणि पुण्याच्या एका ब्राह्मणास कर्णधारपद दिलं. (इथे हे आवर्जून सांगायला हवे की, क्रिकेटमध्ये हॉकी व फुटबॉलपेक्षा कर्णधारास खूप जास्त महत्त्व असते. कर्णधारास ऐन वेळचे निर्णय घ्यावे लागतात; डावपेच लढवावे वगैरे.)

जर एखाद्या दलितास कर्णधारपद दिलं तर याचा अर्थ दलितांना ब्राह्मणांपेक्षा जास्त कळू शकते हे मान्य करावं लागलं असतं. असं मान्य करणं हा तर जातिव्यवस्थेच्या तर्कशास्त्राचा भंग होता, त्यामुळे बाळूला वगळण्याचा निर्णय घेतला गेला. ज्या क्षणी हा निर्णय घेतला गेला, त्यानंतर लगेचच बाळूचे दोन भाऊ विठ्ठल आणि शिवराम (हिंदूं संघाचे अनुक्रमे चांगले फलंदाज व अष्टपैलू खेळाडू) यांनी संप करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी एक पत्रक प्रसिद्ध केलं, ज्याचा आशय असा की, ‘आम्ही या निर्णयाप्रत आलो याचं कारण म्हणजे बाळूला वगळण्याचा निर्णय घेऊन आमचा (तथाकथित मागास जातीचा) छुपेपणाने अथवा उघडपणाने अपमान करण्यात आला आहे. जातीसारख्या गोष्टीचा वापर क्रिकेटमध्ये एक महत्त्वाचा घटक म्हणून व्हावा हे आम्ही शांतपणे सहन करू शकत नाही. स्वाभिमान आणि तत्त्वं यांच्यासाठी आम्ही या वर्षी हिंदू संघातून खेळायचं नाही असं ठरवलं आहे. आम्हास असा विश्वास वाटतो की, मुंबईची नि:पक्षपाती क्रिकेटप्रेमी जनता आमची भूमिका समजून घेईल व कोणताही दोष आम्हाला देणार नाही.’

त्या काळात या दोन दलित क्रिकेटपटूंचं ते पत्रक ही एक असामान्य अशीच घटना होती. मुंबईच्या नि:पक्षपाती जनतेनेसुद्धा पालवणकर बंधूंची निराशा केली नाही. त्यांच्यासाठी होणारं त्यांचं नुकसान भरून निघालं आणि तरीही पालवणकर बंधूंना प्रतिक्रियावादी आणि दुराग्रही असे संबोधले गेले.

पुढच्या वर्षी स्पर्धा पुण्यात होत्या. सर्व पालवणकर बंधूंना संघातून वगळण्यात आलं होतं. परिणामी जे अपेक्षित होतं तेच झालं. उपांत्य फेरीत हिंदू संघाचा दारुण पराभव झाला. त्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर श्रेष्ठ मराठी नाटककार मामा वरेरकर यांनी ‘क्रिकेटमध्ये जातिभेद कसा अवतरतो’ अशा आशयाचं नाटकही लिहिलं होतं.

साल 1923. स्पर्धा मुंबईत होत्या. गांधीवादी कार्यकर्त्यांनी जनतेच्या भावना जातिभेदाच्या विरुद्ध चेतवलेल्या होत्याच. त्यामुळे आधीच्या सर्व प्रकारांमुळे संतप्त झालेल्या आणि क्रिकेटवेड्या मुंबईकर जनतेच्या आग्रहामुळे विठ्ठलकडे हिंदू संघाचं कर्णधारपद दिलं गेलं. त्या स्पर्धेचा शेवट अक्षरश: परीकथेसदृश झाला. अंतिम सामना हिंदू व युरोपियन संघामध्ये झाला. विठ्ठलने शतक झळकावलं आणि हिंदू संघ विजयी ठरला. सवर्ण हिंदूंच्या खांद्यावरून विठ्ठलला जल्लोषात मैदानाबाहेर नेण्यात आले.

विठ्ठलबाबत एकच निरीक्षण व तेही क्रिकेटच्या दृष्टिकोनातून मी नोंदवतो. संशोधनाच्या निमित्ताने कै.राजसिंग डुंगरपूर यांच्याशी खूपदा गप्पा झाल्या होत्या. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की, त्यांचे वडील कै.लक्ष्मणसिंग डुंगरपूर त्यांना नेहमी सांगत की, विठ्ठल पालवणकर हा विजय हजारेच्या तोडीचा होता. राजसिंगनी मला अनेकदा सांगितलं आहे की, विजय हजारे आणि सुनील गावसकर यांची गुणवत्ता सारखीच होती. मी माझ्या मुलाला नेहमी सांगतो की, सुनील गावसकर आणि सचिन तेंडुलकर तोडीस तोड आहेत. म्हणजे गणिताच्या नियमानुसार विठ्ठल हा सचिनच्या गुणवत्तेचा फलंदाज ठरतो.

पालवणकर बंधूंची कथा लोकांच्या विस्मरणात जाण्यामागे काही कारणं आहेत. भारतात अधिकृत कसोटी क्रिकेट सुरू होण्याआधी ते खेळले. त्यामुळे अधिकृत रेकॉर्डमध्ये त्यांचा समावेश नाही. दुसरं कारण असं की, आपण खेळ आणि समाजजीवन या दोन गोष्टींना भिन्न मानतो. (जे खरं तर नसायला हवं.) खेळ हा एक असा रंगमंच आहे ज्यावर समाजाच्या सर्व आशा-आकांक्षा, दु:खं, सकारात्मक- नकारात्मक बाजू यांचं प्रतिबिंब पडत असतं आणि पालवणकर बंधूंच्या या सर्व कहाणीस एक दु:खद परिमाण आहे. त्यांचे आणि डॉ.आंबेडकरांचे संबंध गुंतागुंतीचे होते, हे तिसरं आणि खूप महत्त्वाचं कारण आहे. कारण बाळू काँग्रेसचा निष्ठावान होता तर आंबेडकर काँग्रेसविरोधी होते. 1937 साली मुंबई प्रांतिक सभेच्या निवडणुकीत बाळू काँग्रेसचा उमेदवार म्हणून आंबेडकरांच्या विरुद्ध उभा राहिला होता. तिथेही त्याच्या मनाचा मोठेपणा असा की, प्रचारसभांत ‘मला डॉ.आंबेडकरांच्या कार्याविषयी खूप आदर आहे. परंतु मी काँग्रेसनिष्ठ आहे. त्यामुळे मला त्यांच्याविरुद्ध उभं राहिलंच पाहिजे.’ असे तो म्हणत असे.

***

ज्या दुसऱ्या व्यक्तीविषयी मी आता बोलणार आहे त्या व्यक्तीची पार्श्वभूमी बाळूच्या अगदी उलट होती. ब्रिटिश साम्राज्य उत्कर्षाच्या शिखरावर असताना 1892 मध्ये तिचा जन्म झाला. अतिशय श्रीमंत, लब्धप्रतिष्ठित असं कुटुंब असल्याने सर्व सुखं तिच्यासमोर हात जोडून उभी होती. 1920च्या दशकाच्या सुरुवातीच्या वर्षात ती लंडनमध्ये संगीताचे कार्यक्रम करीत असे; ज्याच्या बातम्या ‘लंडन टाइम्स’मध्ये येत असत.

1924 साली फ्रेंच कादंबरीकार रोमा रोलाँ यांनी लिहिलेले ‘बीथोवेन’चे चरित्र तिच्या वाचनात आलं. चरित्र वाचून ती झपाटली व कादंबरीकाराला भेटायला फ्रान्सला गेली. तिथे रोमा रोलाँबरोबर ‘बीथोवेन’संबंधी चर्चा करताना रोलाँ यांनी तिला त्यांच्या नवीन पुस्तकाची प्रुफं वाचण्यास दिली. ते कोणा एका मोहनदास करमचंद गांधी नावाच्या माणसाचं चरित्र होतं. ती व्यक्ती इंग्लंडला परतली. रोलाँ यांचं गांधीसंबंधीचं ते पुस्तक वाचून ती भारावून गेली. तिने ‘बीथोवेन’ला रामराम ठोकण्याचं ठरवलं. कारण गांधीजींच्या विचारांच्या प्रेमात ती पडली होती.

त्या व्यक्तीने (जिचे नाव तुमच्यापैकी अनेकांनी ओळखले असेल) मॅडेलिन स्लेडने गांधीजींना पत्र लिहिलं की, भारतीय स्वातंत्र्यलढा आणि गांधीजींचे विचार यासाठी संपूर्ण आयुष्य अर्पण करण्याची तिला इच्छा आहे. त्यावर गांधीजींनी तिला उत्तरादाखल लिहिलं की, ‘तू तुझे दागिने वापरणे बंद कर, स्वत: शाकाहारी जेवण, तेही हाताने करण्यास शीक, सर्व आकर्षक गोष्टींचा त्याग कर, जमिनीवर बसण्यास शीक, संगीताच्या मैफलींना जाणे बंद कर आणि हे सर्व वर्षभर केल्यानंतरही जर तुला यायची इच्छा असेल तर तुझं स्वागत आहे.’ तिने ते सर्व वर्षभर (संयमाने!) केले आणि 1926 साली ती भारतात आली.

मीराबेन असं मॅडेलिनचं नाव बदलण्यात आलं. ती गांधीजींची दत्तककन्या झाली. ती आश्रमात राहिली. तिने सत्याग्रहांत भाग घेतला. ‘हरिजन’चं संपादन केलं. अतिशय उच्चकुलीन पार्श्वभूमी असलेली मॅडेलिन तिची माणसं, तिचा देश सोडते काय, भारतात येते काय, सारंच अद्‌भुत! तिच्याबाबतचा हा भाग सर्वांनाच माहीत आहे. पण स्वातंत्र्यसंग्रामाच्या रेकॉर्डमध्ये नोंद नसलेला असाही एक भाग तिच्या आयुष्याचा आहे, जो फारसा कोणाला ज्ञात नाही.

1930 च्या दशकात जेव्हा ती तिच्या चाळिशीत होती, तेव्हा पहिल्यांदाच (आपण ज्याला रूढार्थाने प्रेम समजतो त्या प्रकारे) प्रेमात पडली. पृथ्वीसिंग आझाद नावाचा देखणा, दाढीधारी सशस्त्र क्रांतिकारक तिला आवडला होता. (तो शिक्षा म्हणून अनेक वर्षं अंदमानला होता. गांधीसंबंधी त्याने तिथेच वाचलं, ऐकलं होतं. गांधी हे काय प्रकरण आहे, हे समजून घ्यायला तो आश्रमात आला होता.)

मीराबेनसमोर तेव्हा दोन मुख्य अडचणी होत्या. त्यापैकी कमी महत्त्वाची अडचण अशी होती की, तिचं प्रेम एकतर्फी होतं. (ज्याचा आपणा सर्वांनाच अनुभव असतो!) आणि जास्त महत्त्वाची अडचण अशी होती की, तिची ज्यांच्यावर श्रद्धा होती ते गांधीजी या सगळ्याच्या ठाम विरोधात होते. ती प्रेमात पडली हा त्यांना विश्वासघात वाटला. आश्रमाच्या नियमांनुसार आश्रमात कोणत्याही प्रकारच्या भावनिक, शारीरिक संबंधांना परवानगी नव्हती. त्यामुळे गांधीजी अस्वस्थ झाले, तर मीराबेन पार उद्‌ध्वस्त झाली.

त्या काळातले भारतीय जेव्हा मानसिकदृष्ट्या खचत तेव्हा मानसिक शांतीसाठी हिमालयामध्ये जात असत. मीराबेनने तेच केलं. हजारो किमीचा प्रवास करून ती हिमालयात गेली. प्रथम ती हृषिकेशला राहिली. नंतर आणखी पुढे जात गढवाल परिसरात सुारे 7000 फूट उंचीवर तिने आश्रम स्थापन केला. 1945 ते 1959 या काळात ती तिथे राहिली. पर्यावरणाच्या क्षेत्रात भारतासाठी तिने महत्त्वाची कामगिरी बजावली. ओक वृक्षराजींचा ऱ्हास व जैवविविधता नष्ट होणे याच्याविरुद्ध तिने त्या काळात आवाज उठवला. मोठ्या धरणांचे तोटे, रासायनिक खतांचा दुष्परिणाम याकडे तिने लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्याविषयी तिने नेहरू, राजेंद्रप्रसाद इत्यादींना पत्रेही लिहिली होती. ‘पत्रे संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येत आहेत.’ असे उत्तरही तिला त्यांच्याकडून मिळाले. परंतु कोणतेही बदल होताना मात्र दिसले नाहीत. आज तिचे लेखन हे हिमालयातील पर्यावरणाच्या प्रश्नांचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे ठरते आहे.

जून 1959 मध्ये तिचे बीथोवेन प्रेम पुन्हा उफाळून आले. तिने सामान बांधले आणि भारत सोडला. बीथोवेने त्याच्या रचना जिथे केल्या त्या व्हिएन्नाला ती गेली. पुढची वीस वर्षं ती तिथेच राहिली. सगळंच अपूर्व आहे! ती सर्व आयुष्य स्वत:च्या विचारांनुसार जगली. संगीत हे तिचं प्रेम होतं, तर भारतीय नागरिकांना राजकीय स्वातंत्र्य व सामाजिक न्याय मिळवून देणं हे तिचं ध्येय होतं.

***

या कार्यक्रमाला येत असताना गप्पांमध्ये मी माधवला विचारले की, कॉ.चव्हाणांचं गांधीजींविषयी काय मत आहे? त्यावर तो उत्तरला की, हा एक स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. मी ते समजू शकतो. कारण मला असं कायमच वाटत आलं आहे की, विचार करणाऱ्या प्रत्येक भारतीयाच्या मनात मार्क्सवाद आणि गांधीवाद यांचं अंतर्गत द्वंद्व सुरू असतं. नंतर तो असं म्हणाला की, कॉ.चव्हाण नेहरूंचे प्रशंसक आहेत. मी स्वत: नेहरूवादी आहे आणि (जरी मी पन्नाशीच्या पुढे गेलो असलो तरी) मला वाटतं, मी भारतातला सध्याचा सर्वांत तरुण नेहरूवादी आहे. (सध्याच्या तरुण पिढीच्या मनात का कोण जाणे नेहरूंविषयी गैरसमज आहेत.)

‘मानवी अनुभवातील सर्वांत गौरवास्पद आणि सर्वांत घृणास्पद असं जे जे काही आहे ते भारतात आढळतं’ असं विधान एकदा नेहरूंनी केलं होतं. महाराष्ट्राबाबतसुद्धा असंच म्हणता येईल. आज आपण येथे एका गौरवशाली व्यक्तीचा, कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी जमलो आहोत. त्यामुळे भारतीय इतिहास, समाज आणि राज्यव्यवस्था यांच्या गडद पैलूंविषयी मी बोलणार नाही.

भारतीय प्रजासत्ताकाच्या सर्वोत्तम मूल्यांचा आविष्कार ज्यांच्यात झाला आहे, अशा अनेक उल्लेखनीय भारतीयांना भेटण्याचे भाग्य मला लाभले. मी नेहरूवादी आहे. (माझ्या मित्रांच्या मते त्याचा अर्थ असा की, मी भारतात कोठेही रमू शकतो तर माझ्या शत्रूंच्या मते मी धड कुठलाच नाही!) मी देशभर फिरलो आहे. मला वाटतं, मला माहीत असलेल्या असामान्य व्यक्तिमत्त्वांमध्ये (उदाहरणार्थ, चंडीप्रसाद भट, महाश्वेतादेवी, पं.भीमसेन जोशी) सर्वश्रेष्ठ व्यक्तिमत्त्व हे डॉ.शिवराम कारंथ यांचं होतं. त्यांच्याविषयी थोडं बोलून मी आज थांबणार आहे.

लेखक म्हणून तीस वर्षांच्या माझ्या करिअरमध्ये मी तीन-चार धाडसी गोष्टी केल्या आहेत. (लेखक हे स्वत:तच रमलेले असतात. धाडसी कृत्यांसाठी त्यांना ओळखलं जात नाही!) त्यांपैकी सर्वांत धाडसी कृत्य हे होतं की, एका कोलकात्याच्या वृत्तपत्रात मी असे लिहिलं की, बंगाली नसणारा परंतु टागोरांइतक्याच सर्वस्पर्शी प्रतिभेची देणगी लाभलेला अजून एक माणूस होता आणि त्याचं नाव होतं डॉ.शिवराम कारंथ! ‘एका वेड्या माणसाचे दहा चेहरे’ असं नाव असणारं कारंथांचं आत्मचरित्र (इंग्रजी) मी वाचलं आहे. जरी मी नंदनइतका गणितात हुशार नाही तरीसुद्धा मी सांगू शकतो की, खरे तर त्यांचे (दहा नव्हे!) सोळा चेहरे होते! त्यांनी सोळा विविध प्रकारची करिअर्स केली. आधुनिक कन्नड कांदबरीचा प्रणेता, अनाथ मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणे, कन्नडध्ये सिनेमे काढणे (त्यांच्या चित्रपटांचा दर्जा फारसा चांगला नाही), कर्नाटकात पर्यावरणवादी चळवळीची पायाभरणी करणे, वगैरे वगैरे...

1989 साली मी पहिल्यांदा त्यांना भेटलो. कैगा अणुप्रकल्प होऊ नये म्हणून चालू असणाऱ्या मोहिमेचं नेतृत्व ते त्या वेळी करीत होते. कारण त्यामुळे पश्चिम घाटावरील उत्तम वनसंपत्ती नष्ट होणार होती. त्यांचं वय तेव्हा ऐंशीच्या पुढेच होतं आणि तरीही ते नेतृत्वस्थानी होते! मला एका वृत्तपत्रासाठी त्यांची मुलाखत हवी होती. त्यासंबंधी विचारणा करणारं पत्र मी त्यांना पाठवलं होतं. ते जुन्या पिढीचे असल्याने त्यांचं उत्तर मला पोस्टकार्डावर आलं होतं! त्यांनी दिलेल्या वेळेत पोहोचण्यासाठी (जिवाचा आटापिटा करत) दोन वेळा बस बदलून मी ते होते त्या गावात गेलो. अत्यंत प्रभावी असं त्यांचं व्यक्तिमत्त्व होते. स्वच्छ पांढरा कुर्ता, पांढरं धोतर आणि पांढरे केस व मिशी अशा रूपात ते आइन्स्टाईन वाटत होते! (कारण भारतीय कपडे युरोपियन कपड्यांपेक्षा जास्त ग्रेसफुल वाटतात.) त्यांची चळवळ, एकूण भूमिका यांविषयी आमचं तेव्हा बोलणं झालं.

डॉ.कारंथांशी बोललो त्या सुमारासच माझं दिल्लीत बाळू पालवणकरसंबंधी संशोधन चालू होतं. 1936 सालची एक मायक्रोफिल्म अभ्यासताना एका बातमीने माझं लक्ष वेधून घेतलं. ‘मुंबईत यक्ष-गण कार्यक्रम पहिल्यांदाच’ अशी ती बातमी होती. (यक्ष- गण हे कर्नाटकाच्या किनारी भागातील लोकांचं नृत्य-नाट्य आहे. आधुनिक काळात डॉ.कारंथ यांनी त्याचं पुनरुज्जीवन केलं.) त्या बातमीत असं म्हटले होतं की, कर्नाटकातून मुंबईत यक्ष-गण सादर करायला एक गट आला आहे, त्याचं नेतृत्व कोणीतरी शिवराम कारंथ करत आहे. मी त्यांना 1989 साली भेटलो होतो, त्याआधी 53 वर्षांपूर्वी हा माणूस एका कलाप्रकाराचं पुनरुज्जीवन करत होता. आश्चर्यचकित व्हावं असाच हा अनुभव होता.

काळ पुढे सरकत होता आणि आमची आयुष्यंसुद्धा. मधल्या काळात पाच वर्षं निघून गेली. 1994 साली मी ज्या पर्यावरणवादी गटाशी संबंधित होतो, त्यांना सर्वोच्च न्यायालयात मोठाच विजय मिळाला होता. तुंगभद्रेचं पाणी प्रदूषित करणारा कारखाना बंद करण्याचे न्यायालयाचे आदेश होते. (बंगालसाठी जे स्थान टागोरांचं तेच डॉ.कारंथांचे कर्नाटकासाठी.) जनहित याचिकांचे ते सुरुवातीचे दिवस होते. कर्नाटकातून दाखल केल्या जाणाऱ्या जवळपास प्रत्येक याचिकेवर याचिकाकर्ते म्हणून ‘डॉ.कारंथ आणि इतर’ असे नाव असायचे. (कारंथांच्या वलयाचा त्यामुळे फायदा मिळायचा.) सुप्रीम कोर्टातील त्या विजयानिमित्त एक सत्कार समारंभ आयोजित केला गेला होता. ‘सुप्रीम कोर्टातला विजय आणि डॉ.कारंथ यांचा नव्वदावा वाढदिवस साजरा करण्यासाठी असलेला सार्वजनिक कार्यक्रम’ असे बोर्ड (इंग्रजी व कानडीत) राणी कन्नूरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा लागले होते (ज्या रस्त्याने आम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी गेलो होतो.)

त्या कार्यक्रमात डॉ.कारंथांनी पायात घुंगरू चढवून तीस सेकंद नृत्य केलं. त्यानंतर त्यांनी भाषणसुद्धा केलं. नंतर आम्ही पीडब्ल्यूडीच्या बंगल्यावर परतलो. (ते ग्लोबलायझेशनचे सुरुवातीचे दिवस होते. त्या काळी आतासारखी सर्वत्र आढळणारी थ्री-स्टार हॉटेल्स नव्हती.) त्यामुळे आमचं जेवणसुद्धा त्या बंगल्यातच होतं. इतिहासकार असल्याने मला नेमक्या तारखांमध्ये रस असतो. त्यामुळे इतर लोक जेवत असताना मी डॉ.कारंथांच्या ड्रायव्हरला भेटलो. त्यांच्याकडे पांढऱ्या रंगाची ॲम्बॅसिडर गाडी होती! त्याला मी डॉ.कारंथांच्या वाढदिवसाची तारीख विचारली. त्यावर तो उत्तरला की, ‘सर, खरं तर आता ते 93 वर्षांचे आहेत! गेली तीन वर्षं आम्ही त्यांचा 90 वा वाढदिवस साजरा करत आहोत! कोणताही कार्यक्रम असो, म्हणजे जसं की तुकूरला कानडी साहित्य संमेलन आणि डॉ.कारंथांचा नव्वदावा वाढदिवस, म्हैसूरमध्ये मुलींच्या शाळेचं उद्‌घाटन आणि डॉ.कारंथांचा नव्वदावा वाढदिवस. कारवारमध्ये राज्यविज्ञान परिषद आणि डॉ.कारंथांचा नव्वदावा वाढदिवस... असंच तीन वर्षं चालू आहे!’

हे इथं सांगण्याचं कारण कॉ.चव्हाणांच्या नव्वदाव्या वाढदिवसाचा आनंदोत्सव आणखी काही काळ चालू रहावा हीच इच्छा आहे.

(शब्दांकन व अनुवाद : संकल्प गुर्जर)  

Tags: पी.बाळू कॉम्रेड यशवंत चव्हाण  मॅडेलिन स्लेड डॉ. शिवराम कारंथ बाळू पालवणकर रामचंद्र गुहा संकल्प गुर्जर क्रिकेट मीराबाई comrade yashwant chavan ramchandra guha sanklp gurjar madeline sled meerabai dr. shivram karanth balu palwankar cricket weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

रामचंद्र गुहा,  बंगळुरू, कर्नाटक

भारतीय इतिहासकार व लेखक. समकालीन सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक विषयांवर तसेच पर्यावरणावर आणि क्रिकेटच्या इतिहासावर लेखन. 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके