डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

सतीश धवन यांच्याकडून मिळालेले नेतृत्वगुणांचे धडे

सतीश धवन आधुनिक महानतम भारतीयांपैकी एक होते. उद्योजकतेच्या क्षेत्रात जे.आर.डी. टाटा, हस्तकलेच्या क्षेत्रात कमलादेवी चट्टोपाध्याय, सहकारी चळवळीत वर्गीस कुरियन यांचे जे स्थान आहे, तेच विज्ञानाच्या क्षेत्रात सतीश धवन यांचे आहे. विज्ञान असो अथवा राजकारण, व्यापार, प्रशासन अन्‌ नागरी समाज; वर्तमानातील उदयोन्मुख नेत्यांना त्यांच्या जीवनातून अनेक धडे शिकण्यासारखे आहेत. जसे वैयक्तिक व व्यावसायिक जीवनातील संपूर्ण प्रामाणिकपणा, गुणवत्तेची पारख करण्याची व प्रोत्साहन देण्याची उल्लेखनीय क्षमता, समंजसपणे व योग्य प्रकारे केलेले जबाबदाऱ्यांचे वाटप, अंत:करणाची अशी उदारता- जी हाताखालील सहकाऱ्यांना यशाचे श्रेय घेण्यास प्रोत्साहित करते आणि असे नैतिक धैर्य- जे नेतृत्वाला अपयशाचा दोष स्वीकारण्यास प्रवृत्त करते. 

दिवंगत राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना नीतिकथा सांगण्याची आवड होती. जुलै 1979 मध्ये भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) प्रक्षेपित केलेल्या उपग्रहासंबंधीची एक कहाणी त्यांच्या विशेष आवडीची होती. इस्रोच्या एका प्रकल्पाचे प्रमुख कलाम होते आणि जेव्हा प्रकल्पाच्या काही सदस्यांनी त्याच्या सिद्धतेबद्दल साशंकता दर्शविली, तेव्हा कलामांनी त्यांचे मत डावलून प्रकल्प पुढे कार्यान्वित करण्याचे आदेश दिले. प्रक्षेपण असफल झाले आणि उपग्रह अंतराळात न झेपावता बंगालच्या उपसागरात कोसळला. प्रकल्पप्रमुख असलेल्या कलामांना या अपयशाने अपमानित झाल्यासारखे वाटत होते आणि प्रसारमाध्यमांपुढे अपयशाची घोषणा करण्याच्या विचारानेच ते भयभीत झाले होते. इस्रोचे अध्यक्ष सतीश धवन यांनी कलामांना या पेचप्रसंगातून वाचविले. टीव्ही कॅमेऱ्यासमोर स्वतः जाऊन धवन यांनी असे प्रतिपादन केले की, या अपयशानंतरही त्यांचा आपल्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे आणि पुढील प्रयत्नात ते यशस्वी होतील, अशी त्यांना खात्री आहे. 

पुढील वर्षी ऑगस्टमध्ये कलाम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अंतराळात उपग्रह प्रक्षेपित करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केला. या वेळी ते यशस्वी झाले. धवन यांनी आपल्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि कलाम यांना पत्रकार परिषदेस संबोधित करण्यास सांगितले. अनेक वर्षांनंतर आपल्या राष्ट्रपतीपदाच्या कार्यकाळात आणि त्यानंतरही या घटनेची आठवण सांगताना कलाम भावुकपणे म्हणायचे, ‘‘जेव्हा अपयश आले, तेव्हा नेत्याने त्याची जबाबदारी घेतली; जेव्हा यश मिळाले, तेव्हा त्याने आपल्या सहकाऱ्यांना (टीमला) श्रेय दिले.’’ 

या महिन्यात भारताचा वैज्ञानिक समुदाय अब्दुल कलामांचे आदर्श असलेल्या सतीश धवन यांची जन्मशताब्दी साजरी करीत आहे. सतीश धवन यांचा जन्म 25 सप्टेंबर 1920 रोजी श्रीनगर येथे झाला. न्यायाधीशांचे पुत्र असलेले धवन यांचे संगोपन आणि शिक्षण लाहोर येथे झाले; जेथे त्यांनी अनुक्रमे भौतिकशास्त्र, गणित, साहित्य आणि यांत्रिक अभियांत्रिकी, विषयांत पदव्या संपादन केल्या. विज्ञानाच्या तीन विेशांचा, मानवतेचा आणि तंत्रज्ञानाचा संगम असलेल्या त्यांच्या पदव्यांचे एकत्रीकरण हे भारतीय संदर्भात अद्वितीय नसले, तरी असामान्य नक्कीच होते. लाहोरमध्ये 1930 आणि 1940 च्या सुमारास अशा प्रकारच्या प्रयोगांना प्रोत्साहन मिळत होते. त्या वेळी लाहोर शहर संस्कृती व विद्वत्तेचे महान केंद्र होते; जेथे हिंदू, मुस्लिम, शीख आणि युरोपियनांच्या सर्वोत्तम बौद्धिक परंपरांचा संगम झाला होता. 

वरील पदव्यांपैकी तिसरी पदवी 1945 मध्ये मिळविल्यानंतर धवन बंगळुरू येथे आले आणि नव्यानेच स्थापन झालेल्या हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये त्यांनी वर्षभर काम केले. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते अमेरिकेस रवाना झाले. मिनेसोटा येथील विद्यापीठातून एम.एस. झाल्यानंतर कॅलटेकमधून- कॅलिफोर्नियातील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतून (तंत्रज्ञान संस्थेतून) त्यांनी एरोनॉटिकल इंजिनिअरिंग (वैमानिकी अभियांत्रिकी) या विषयांत एम्‌.एस्‌. आणि पीएच.डी. या पदव्या प्राप्त केल्या. भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि भारत-पाकिस्तान फाळणी झाली, तेव्हा ते परदेशात होते. फाळणीमुळे त्यांच्या कुटुंबाला पाकिस्तान सोडून भारतात स्थलांतर करणे भाग पडले. 

यांना संशोधनाच्या कार्यात आनंद मिळत होता. भारतातील पहिल्या सुपरसॉनिक विंड टनेलची त्यांनी निर्मिती केली. त्यांना त्यांची कर्मभूमीही आवडत होती तिथे ते सायटोजेनेटिस्ट (पेशी जीवशास्त्रज्ञ) नलिनी निरोदी यांच्या प्रेमात पडून विवाहबद्ध झाले. (या दांपत्यास 3 अपत्ये झाली.) त्यांची नेमणूक खखडल - इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या (भारतीय वैज्ञानिक संस्थेच्या) संचालकपदी 1962 मध्ये झाली. एका बखरकाराच्या शब्दांत सांगायचे झाल्यास- त्या वेळी या संस्थेस ‘हळूहळू आरामदायक शैक्षणिक निद्रावस्था’ प्राप्त होत होती. धवन यांनी या संस्थेला निद्रावस्थेतून जागे केले आणि देशाची मुख्य संशोधन संस्था म्हणून नावारूपास आणले. खखडल च्या संचालकपदावरील त्यांच्या कार्यकाळात त्यांनी संगणकशास्त्र, आण्विक जैवभौतिकशास्त्र, घन रसायनशास्त्र, पर्यावरणशास्त्र, वातावरणशास्त्र या विषयांतील नवे संशोधन कार्यक्रम उर्जितावस्थेत आणले. संपूर्ण भारतातील (आणि जगातील) तेजस्वी विद्वानांची संस्थेत नेमणूक करून नव्या संशोधनाचे कार्यक्रम कार्यरत केले. 

धवन यांना IISc मधून 1971-1972 मध्ये अध्ययनासाठी रजा मंजूर झाली. आपल्या गुरुकुलातकॅ लटेकमध्ये (कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये) जाऊन संशोधनात मग्न होण्याची त्यांची इच्छा होती. जेव्हा ते परदेशी होते, तेव्हा भारताच्या अवकाश कार्यक्रमाचे प्रमुख विक्रम साराभाई यांचे वयाच्या 52 व्या वर्षी अकाली दुःखद निधन झाले. भारतीय विज्ञानावर- प्रामुख्याने नवजात अवस्थेत असलेल्या आपल्या अंतराळ संशोधन प्रयत्नांवर हा मोठा आघात होता. पंतप्रधान इंदिरा गांधींनी त्यांचे प्रमुख सचिव पी.एन. हक्सर यांच्या सल्ल्यानुसार कॅलिफोर्नियात एक दीर्घ केबल संदेश पाठविला, ज्यात त्यांनी साराभार्इंच्या पश्चात इस्रोच्या संचालकपदाची जबाबदारी घेण्याचे आवाहन सतीश धवन यांना केले. धवन यांनी दोन अटींवर ते मान्य केले. पहिली अट म्हणजे- ते IISc च्या संचालकपदी कायम राहतील आणि दुसरी अट म्हणजे- भारतीय अवकाश कार्यक्रमाचे मुख्यालय अहमदाबादमधून बंगळुरूला हलविण्यात यावे. श्रीमती गांधींनी या दोन अटींशिवाय तिसरी अटही मान्य केली. धवन यांनी भारतात येऊन आपल्या नव्या जबाबदाऱ्या स्वीकारण्याअगोदर कॅलटेकमधील आपले वर्षभराचे संशोधन पूर्ण करण्यास त्यांनी अनुमती दिली. 

‘इस्रो : एक वैयक्तिक इतिहास’ पुस्तकाचे लेखक आर. अरवामुदन यांना धवन यांनी संचालकपद स्वीकारल्याचे आणि संस्थेत बदल घडवून आणल्याचे स्पष्टपणे आठवते. अरवामुदन लिहितात, ‘साराभार्इंची कार्यपद्धती एका छोट्या, व्यवस्थित, पितृसत्ताक परिवाराच्या कुटुंब- प्रमुखाप्रमाणे होती. संस्थेची रचना अखंड होती आणि साराभाई एकास एक पद्धतीने संचालन करीत होते. कुठलीही अधिकृत व्यवस्था अस्तित्वात नसल्याने, संघटनात्मक रचनेचा अभाव असल्याने एकमेकांशी समांतर असे तांत्रिक गट कधी कधी एकाच प्रणालीवर कार्यरत असायचे.’ 

जेव्हा इस्रो लहान आणि विकसनशील होती, तेव्हा ही सैलसर-अनौपचारिक कार्यपद्धती यशस्वी ठरली; परंतु जेव्हा तिचा विस्तार झाला आणि तिची उद्दिष्टे अधिक महत्त्वाकांक्षी झाली, तेव्हा संस्थेस अधिक संरचित व्यवस्थापनाची गरज भासू लागली. त्यामुळे विस्तृतपणे विखुरलेल्या गटांचे एकत्रीकरण करून प्रत्येकाची वैयक्तिक भूमिका आणि एकत्रित जबाबदाऱ्या निश्चित करणे हे धवन यांच्यापुढील पहिले अवघड काम होते. हे उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी त्यांनी नियोजित कार्यक्रमांवर आधारित केंद्रांची निर्मिती केली आणि ज्यांचे नेतृत्व निर्विवादपणे स्वीकारले जाईल, अशा व्यक्तींना त्या केंद्रांचे नेतृत्व दिले. अंतर्गत व बाह्य तज्ज्ञांच्या साह्याने इस्रोच्या दीर्घकालीन कार्यांचे राष्ट्रीय स्तरावर पुनरवलोकन करण्याची व्यवस्था त्यांनी केली. 

इस्रोचा वैज्ञानिक या नात्याने ज्यांनी हा बदल प्रत्यक्ष अनुभवला, ते अरवामुदन लिहितात, ‘आमचे नवे अध्यक्ष हे महान बौद्धिक संपदा आणि प्रामाणिकपणा असणारे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. प्रामाणिकपणे केलेल्या चिकित्सेला ते प्रोत्साहन देतात आणि तत्परतेने गुणवत्तेची पारख करतात. जेव्हा संस्थागत रचना सैलसर आणि विकसनशील होती, तेव्हा साराभार्इंची कार्यपद्धती चांगलीच वाटत होती, परंतु आता संस्थेत स्थैर्य आणून वेगाने कार्यान्वित होणे गरजेचे आहे. पद्धतशीर दृष्टिकोन आणि प्रगल्भ कार्यप्रणाली असलेले धवन या भूमिकेत चपखल बसतात.’ 

सतीश धवन इस्रोत संघटनेच्या सामाजिक भूमिकेवर भर देण्यास उत्सुक असायचे. हवामानाच्या पूर्वानुमानासाठी, नैसर्गिक संसाधनांना नकाशाबद्ध करण्यासाठी आणि संदेशवहनासाठी उपग्रह काय करू शकतात, यावर ते लक्ष केंद्रित करीत होते. सामर्थ्यशाली राजकारण्यांपासून संस्थेला दूर ठेवण्यासाठी त्यांनी निश्चितपणे प्रयत्न केले. त्यामुळेच त्यांनी संस्थेचे मुख्यालय दिल्लीपासून अधिक दूरवर हलविण्याचा निर्णय घेतला आणि राज्यसभेच्या सदस्यत्वासारख्या वैयक्तिक खिरापती स्वीकारण्यास नकार दिला. 

IISc हे आपले सर्वोत्तम वैज्ञानिक संशोधनकेंद्र निश्चितपणे आहे. इस्रो आपली सर्वाधिक प्रशंसनीय सार्वजनिक संस्था नक्कीच आहे. या दोन्ही संस्था उभारण्यासाठी आणि त्यांना नावारूपास आणण्यासाठी काही व्यक्तींनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या दोन्ही संस्थांना काहीशा वेगळ्या स्वरूपाच्या नेतृत्वाची गरज होती. धवन एकाच वेळी दोन्ही संस्थांना यशस्वीपणे मार्गदर्शन करू शकले, यातूनच त्यांच्या नेतृत्वगुणांची महानता प्रतीत होते. धवन यांच्या निधनानंतर ‘करंट सायन्स’मध्ये पी.बलराम यांनी 2002 मध्ये श्रद्धांजलीपर लेख लिहिला होता- ‘भारताच्या अंतराळ कार्यक्रमाला विलक्षण रोमांचक इतिहास आहे. सतीश धवन हे त्याची मार्गदर्शक शक्ती होते. अपयशाची जबाबदारी त्यांनी स्वतःच्या खांद्यावर पेलली. रोमहर्षक यशाच्या दिवसांत ते बाजूला सरून शांतपणे उभे राहिले. धवन यांच्यामध्ये इस्रोसारखी संस्था उभारण्याचे सामर्थ्य होते- जिचे यश सांघिक प्रयत्न, शिस्त आणि एकत्रित समर्पणावर अवलंबून होते. त्यासोबतच जिथे पूर्वी व्यक्तिमाहात्म्य, व्यक्तिविशेषत्वाचे अवास्तव स्तोम माजविले जात होते, अशा IISc संस्थेचीही ते उभारणी करीत असल्यामुळे त्यांचे कार्य खरोखर उल्लेखनीय ठरते.’ 

धवन यांना त्यांच्या अखेरच्या वर्षांमध्ये जाणून घेण्याचे भाग्य प्रस्तुत लेखकाला लाभले. ते एक उत्कृष्ट वैज्ञानिक, संस्थांचे महान रचनाकर्ते, सहृदयी आणि दयाळू मनुष्य होते. IISc मध्ये त्यांचे दीर्घकालीन सहकारी असलेले अमूल्य रेड्डी यांनी त्यांच्याबद्दल लिहिले आहे- ‘आपल्या बहुतांश समकालीनांच्या विपरीत धवन यांच्यात मत्सर आणि असूयेचा अभाव होता.’ दरम्यान, त्यांचे इस्रोमधील सहकारी यशपाल यांनी धवन यांच्याबद्दल म्हटले आहे की, त्यांची कुठल्याही व्यक्तीशी वर्तणूक ही पक्षपातीपणाची अथवा वैरभावाची नसे. ज्या भारतीय वैज्ञानिकासोबत धवन सर्वाधिक काळ कार्यरत होते, त्या रोद्दाम नरसिंह यांनी धवन यांच्यावर लिहिलेल्या श्रद्धांजलीपर लेखाचा समारोप पुढील शब्दांत केला आहे- ‘सतीश धवन ही व्यक्ती भारतीय वैज्ञानिक समुदायाची अघोषित, परंतु सर्वमान्य अशी नैतिक आणि सामाजिक विवेकबुद्धी होती.’ 

सहकाऱ्यांनी वाहिलेल्या या श्रद्धांजलीनंतर मला त्यांच्या सुकन्या ज्योत्स्ना धवन- ज्या स्वतः एक प्रतिष्ठित भारतीय बायोलॉजिस्ट (जीवशास्त्रज्ञ) आहेत- त्यांच्या शब्दांची भर घालवीशी वाटत आहे. आपल्या वडिलांच्या सखोल सामाजिक भानाबद्दल त्या लिहितात- ‘श्रीहरिकोटा येथे प्रक्षेपण केंद्राची उभारणी करीत असताना स्थानिक येनादी जमातीचे विस्थापन त्यांना अस्वस्थ करीत होते. विकासाच्या नावाखाली देशभर जी प्रचंड विस्थापने सुरू होती, त्याच्या ते विरुद्ध होते आणि विस्थापितांना काही तरी नुकसानभरपाई दिली जावी, यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. विस्थापितांचे प्राक्तन आपल्या सामाजिक जाणिवेत टिकवून ठेवण्यासाठी मेधा पाटकर करीत असलेला नि:स्वार्थ संघर्ष त्यांना प्रचंड प्रशंसनीय वाटत असे.’ 

सतीश धवन हे आधुनिक महानतम भारतीयांपैकी एक होते. उद्योजकतेच्या क्षेत्रात जे.आर.डी. टाटा, हस्तकलेच्या क्षेत्रात कमलादेवी चट्टोपाध्याय, सहकारी चळवळीत वर्गीस कुरियन यांचे जे स्थान आहे, तेच विज्ञानाच्या क्षेत्रात सतीश धवन यांचे आहे. विज्ञान असो अथवा राजकारण, व्यापार, प्रशासन अन्‌ नागरी समाज; वर्तमानातील उदयोन्मुख नेत्यांना त्यांच्या जीवनातून अनेक धडे शिकण्यासारखे आहेत. जसे वैयक्तिक व व्यावसायिक जीवनातील संपूर्ण प्रामाणिकपणा, गुणवत्तेची पारख करण्याची व प्रोत्साहन देण्याची उल्लेखनीय क्षमता, समंजसपणे आणि योग्य प्रकारे केलेले जबाबदाऱ्यांचे वाटप, अंत:करणाची अशी उदारता- जी हाताखालील सहकाऱ्यांना यशाचे श्रेय घेण्यास प्रोत्साहित करते आणि असे नैतिक धैर्य- जे नेतृत्वाला अपयशाचा दोष स्वीकारण्यास प्रवृत्त करते. 

(अनुवाद : प्रगती पाटील) 

Tags: जे आर डी टाटा संशोधन अब्दुल कलाम इंदिरा गांधी इस्त्रो विज्ञान प्रगती पाटील अनुवाद रामचंद्र गुहा सतीश धवन ramchandra guha and satish dhawan ramchandra guha on science india science and technology indian institute of scinece iisc istro ram guha on satish dhavan indira gandhi satish dhavan satish dhavan abdul kalam weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

रामचंद्र गुहा,  बंगळुरू, कर्नाटक

भारतीय इतिहासकार व लेखक. समकालीन सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक विषयांवर तसेच पर्यावरणावर आणि क्रिकेटच्या इतिहासावर लेखन. 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके