डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

भाजप आणि संघ यांनी सुभाषचंद्र बोसांवर हक्क सांगणे, आदर दाखवणे हे अतिशय बेगडी प्रेम आहे. पण आजच्या काँग्रेसलादेखील त्यांच्यावर हक्क सांगता येणार नाही. तसेच केवळ बोस बंगाली होते, या एकाच कारणासाठी तृणमूल काँग्रेस पक्षाला त्यांच्यावर हक्क सांगता येणार नाही. कारण गांधीजींप्रमाणेच बोससुद्धा क्षुद्र प्रादेशिकातावादी कधीही नव्हते. खरे तर आज कोणत्याही राजकीय पक्षाला बोस आणि त्यांना ज्यांच्याविषयी आदर होता त्या गांधीजींवर हक्क सांगता येणार नाही. निरंजनसिंग गिल, शाहनवाज खान आणि लक्ष्मी सेहगल यांनी जसे काम केले (धार्मिक आणि वांशिक अल्पसंख्य लोकांना सुरक्षित करण्यासाठी, दलित आणि स्त्रियांना त्यांचे सर्व अधिकार मिळण्यासाठी) तसे काम करण्याची इच्छा असलेल्या सर्वांचा त्यांच्यावर हक्क आहे.

सुभाषचंद्र बोस यांच्या वाढदिवसाच्या दिवशी २३ जानेवारी २०१६ रोजी पंतप्रधानांनी या देशभक्ताशी संबंधित केंद्र सरकारकडे असलेली गुप्त कागदपत्रे खुली करण्यास सुरुवात केली. ही कागदपत्रे खुली करण्याचा कार्यक्रम पंतप्रधानांची गाजावाजा करत काम करण्याची जी शैली आहे तिला अनुसरूनच केला गेला. पंतप्रधान स्वतः राष्ट्रीय अभिलेखागारात गेले. त्यांची प्रत्येक कृती कव्हर करत तिथे त्यांच्या मागोमाग टीव्ही कॅमेरे गेले. त्या दिवशी शंभर फाइल्स खुल्या केल्या गेल्या. तेथे असे आश्वासन दिले गेले की, इथून पुढे दर महिन्याला शंभर फाइल्स खुल्या केल्या जातील.

ऐतिहासिक सत्याविषयी असलेले प्रेम किंवा पारदर्शकता यापैकी कोणत्याही कारणाने ही कागदपत्रे खुली केली गेली नाहीत. उलट सत्तेत आल्यानंतर लगेचच मोदी सरकारने गृह मंत्रालयातील तब्बल दीड लाख फाइल्स जाळून नष्ट केल्या होत्या. (या फाइल्समध्ये कशाविषयीचे पुरावे होते याविषयी आता आपण केवळ अंदाजच बंधू शकतो.) परंतु सुभाषचंद्र बोस यांच्याबाबत कागदपत्रे खुली करण्याची आवश्यकता सरकारला पटवून देण्यामागे काही हौशी आणि विक्षिप्त संशोधक होते. त्यांच्या म्हणण्यानुसार जर सरकारने राष्ट्रीय अभिलेखागारातील कागदपत्रे खुली केली तर, सुभाषचंद्र बोस १९४५साली तैवानमध्ये झालेल्या विमान अपघातात मृत्य पावले नाहीत व जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने बोस यांच्या आयुष्यविषयीचे आणि मृत्यूविषयीचे तपशील दडवून ठेवले, हे दोन मुद्दे सिद्ध करता येऊ शकतील.

फाइल्स खुल्या करण्याची प्रक्रिया सुरू होऊन आता एक वर्ष झाले आहे. आतापर्यंत खुल्या केल्या गेलेल्या १२०० फाइल्समधून दोन्हीपैकी एकाही कारस्थानी कृत्याबाबत पुरावा मिळालेला नाही. उलट विक्षिप्त संशोधकांच्या सांगण्यातील दोनपैकी एक मुद्दा खोडून काढावा असा पुरावा मिळालेला आहे. नेहरूंनी बोसांच्या स्मृतींचे विस्मरण व्हावे असे जाणीवपूर्वक काहीही केले नसून, उलट त्यांच्या स्मृतीचा सन्मानच केला आहे. ऑस्ट्रियात राहणाऱ्या बोसांच्या मुलीला (अनिताला) नेहरूंनी सरकारी तिजोरीतून भत्ता देण्याची व्यवस्था केली होती.

सुभाषचंद्र बोसांची पुन्हा एकदा जयंती जवळ येत असताना हा लेख लिहिला आहे. प्रस्तुत लेखात या थोर  देशभक्ताचे त्याहूनही थोर अशा देशभक्ताशी म्हणजे महात्मा गांधींशी कसे संबंध होते याचे काही विस्मरणात गेलेले तपशील देत आहे. या लेखात ठोस अशा ऐतिहासिक पुरावांच्या आधारे गांधी आणि बोस हे एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी किंवा शत्रू होते हा समज खोडून काढलेला आहे.

हे खरे आहे की, बोस आणि गांधी यांच्यात महत्त्वाचा असा मतभेद झाला होता आणि तो फार गाजलेलाही होता. सन १९३९मध्ये बोसांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड करण्याला गांधींनी विरोध केला होता. परंतु त्याआधी किमान दीड दशके तरी बोसांना गांधीजींविषयी स्वातंत्र्यलढ्याचे सर्वोच्च नेते म्हणून नितांत आदर होता. त्यामुळेच १९३९साली बोसांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तेव्हा झालेल्या पत्र व्यवहारात त्यांनी असे लिहिले होते की, ‘गांधीजी सोडून इतर कोणालाही मी शरण जाणार नाही.’ तसेच पुढे बोसांनी असे लिहिले की, जर मी देशाचा विश्वास संपादन करू शकलो मात्र देशातील सर्वोच्च व्यक्तीचा विश्वास संपादन करण्यात कमी पडलो तर ती फारच दु:खद गोष्ट असेल.

एकदा गांधीजींनी स्वराज्याची तुलना पलंगाच्या चार पायांशी केली होती. हिंदू-मुस्लीम ऐक्य, अस्पृश्यतेचे उच्चाटन, आर्थिक स्वावलंबन आणि अहिंसा ही ती चार तत्त्वे. या चारपैकी पहिल्या तीनविषयी बोसांचे गांधीजींशी पूर्णत: मतैक्य होते. तर चौथ्या तत्त्वाविषयी म्हणजे अहिंसेविषयी त्यांचे मतभेद होते. याच कारणामुळे त्यांनी पुढे आझाद हिंद सेनेचे नेतृत्व केले. परंतु असे असले तरी विशेष उल्लेख करावा अशी गोष्ट म्हणजे आझाद हिंद सेनेच्या चार ब्रिगेडसपैकी तिन्हीची नावे गांधीजी, नेहरू आणि मौलाना आझाद अशी होती. (आपली खुशमस्करी करणाऱ्यांच्या आग्रहाला बळी पडल्यानंतर चौथ्या ब्रिगेडला बोसांचेच नाव दिले गेले.)

परंतु आझाद हिंद सेनेच्या गणवेषात असतानाही बोसांना आपल्या काँग्रेसमधील सहकाऱ्यांविषयी आणि विशेषतः गांधीजींविषयी आत्मीयता आणि आदर शिल्लक होता. गांधीजींच्या वाढदिवसाला म्हणजे २ ऑक्टोबर १९४३रोजी, सुभाषबाबूंनी बँकॉक येथून रेडिओवर भाषण केले. त्यात त्यांनी आपल्या श्रोत्यांना याची आठवण करून दिली की, आज गांधीजींचा- देशाच्या सर्वोच्च नेत्याचा पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे. आपल्या भाषणात त्यांनी गांधीजींच्या योगदानाचा उल्लेख केला. ते म्हणाले, असहकार चळवळ सुरू झाली तेव्हा असे वाटले की दैवी शक्तीनेच त्यांना मुक्तीचा मार्ग दाखवण्यासाठी पाठवले आहे. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सारा देश त्यांच्यामागे गेला. बोस पुढे असे म्हणाले की, गांधीजींनी देशाचे नेतृत्व हाती घेतल्यानंतरच्या विसेक वर्षांत भारतीयांना राष्ट्रीय सन्मान, आत्मविश्वास आणि स्वाभिमान काय असतो याची जाणीव झाली आहे. आता त्यांना सर्व देशाचे प्रतिनिधित्व करू शकेल अशी संघटना लाभलेली आहे. देशासाठी आणि त्याच्या स्वातंत्र्य लढ्यात गांधीजींचे योगदान इतके अफाट आहे की, इतिहासात त्यांचे नाव कायमचे सुवर्णाक्षरांनी कोरले जाईल.

बोसांनी हे भाषण केले तेव्हा गांधीजी पुण्याला तुरुंगात होते. मे १९४४मध्ये त्यांची सुटका झाली. त्यानंतर वर्षभरात बोस मृत्युमुखी पडले. सन १९४५-४६मध्ये ज्यांनी आझाद हिंद सेनेत काम केले होते अशा अनेक सैनिकांना गांधीजी भेटले. त्यांचा आदर्शवाद आणि धैर्य यांनी ते प्रभावित झाले होते. जुन्या सहकाऱ्याविषयीच्या त्यांच्या आठवणी ताज्या झाल्या होत्या. जानेवारी १९४६ मध्ये ‘युनायटेड प्रेस ऑफ इंडिया’च्या पत्रकाराशी बोलताना आझाद हिंद सेनेच्या ‘जय हिंद’ या घोषणेला आपलेसे करताना ते म्हणाले, जरी ही घोषणा युद्धात दिली गेली असली तरी अहिंसात्मक कामासाठी तिला नाकारण्याचे काहीही कारण नाही. पुढे गांधीजी असे म्हणाले की, बोसांच्या समर्पण करण्याच्या क्षमतेविषयी मला चांगली कल्पना होती. परंतु त्यांची उद्यमशीलता, सैनिकी वृत्ती आणि संघटन क्षमता यांची पूर्ण कल्पना मात्र त्यांनी देश सोडल्यावर आली. पुढे ते असेही म्हणाले की, बोस आणि माझ्या दृष्टिकोनातील फरक सर्वांना परिचयाचा असल्याने त्याविषयी काही भाष्य करत नाही.

त्यानंतर १९४६साली नोआखाली या पूर्व बंगालमधील प्रदेशात दंगली उसळल्यानंतर गांधीजी तिथे गेले. त्यांनी त्या प्रदेशात केलेल्या शांतिकार्याची सर्वांना कल्पना आहे. मात्र हे फारच कमी लोकांना माहीत असेल की, तिथल्या कामात त्यांना निरंजनसिंग गिल आणि जीवनसिंग यांच्या नेतृत्वाखालील इतर काही शीख तरुणांनी मदत केली होती. हे दोघेही आझाद हिंद सेनेत अधिकारी होते. मजबूत बांध्याच्या शीख सैनिकांनी सामानची ने-आण, तात्पुरती घरे उभारणे आणि गाड्या चालवणे या कामात सहभाग घेतला होता.

नोआखालीमध्ये मुख्यतः हिंदू समाजाला लक्ष्य केले  होते. त्याच सुमारास बिहारमध्ये उसळलेल्या दंगलींची झळ मुख्यतः मुस्लिमांना लागली होती. त्यामुळे नोआखालीहून गांधीजींनी तिथे जायचे ठरवले. परंतु स्वतः बिहारमध्ये येण्याआधी त्यांनी आझाद हिंद सेनेच्या एका माजी अधिकाऱ्याला, मेजर जनरल शाहनवाज खान यांना पाठवले होते. शाहनवाज आणि आझाद हिंद सेनेतील इतर सहाजणांनी तिथे मुस्लिम निर्वासितांमध्ये काम केले होते. त्यांची घरे आणि गावे पुन्हा उभी करण्यास मदत केली होती. शाहनवाज खान असे म्हणाले की, त्यांना गांधीजींनी असे सांगितले की, जर बिहारमधील कामाला यश आले तर त्याचा सर्व देशावर प्रभाव पडेल. देशाला ग्रासणाऱ्या जातीयवादाच्या विषावर हे चांगले उत्तर असेल. काही अधिकाऱ्यांनी त्यांचे काम थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र गांधीजी येताच हे अडथळे थांबले. शाहनवाज यांनी असे नोंदवले की, गांधीजींची भाषणे आणि त्यांचा वावर याचा बिहारमधील जनतेवर खूप चांगला प्रभाव पडला. माझ्याविषयीचा जनतेचा दृष्टिकोन अतिशय सहकार्याचा होता. गांधीजी काय म्हणत आहेत ते ऐकून घेण्याची आणि त्यांचे काम यशस्वी व्हावे याला लोकांची तयारी होती.

बंगालप्रमाणेच बिहारमध्येसुद्धा आझाद हिंद सेनेच्या सैनिकांनी जातीय शांतता प्रस्थापित करण्यात दिलेल्या योगदानामुळे गांधीजी प्रभावित झाले होते. बिहारमधील एका प्रार्थनासभेत ते असे म्हणाले की, शाहनवाजसाहेब अतिशय चांगले काम करीत आहेत. पुढे शाहनवाज आणि त्यांचे सहा सहकारी यांनी कसे दंगलग्रस्तांमध्ये अन्नाचे वाटप केले, कसे त्यांनी हिंदू शेतकऱ्यांना पिकांची पेरणी करण्याची तयारी दाखवून हिंदूंना स्वतःची लाज वाटेल असे वर्तन केले हे गांधीजींनी सांगितले. त्यांचे हे बोलणे ऐकून बिहारातून पळून बंगालात गेलेले मुस्लिम परत यायला सुरुवात झाली.

आझाद हिंद सेनेच्या सैनिकांनी आणि अधिकाऱ्यांनी बिहारमध्ये दंगलग्रस्त मुस्लिमांना आणि बंगालमध्ये दंगलग्रस्त हिंदूंना पुन्हा आयुष्य सुरळीत करण्यास मदत केली. इथे जर बोसांनी गांधीजींविषयी वापरलेले शब्द वापरायचे म्हटले तर असे म्हणत येईल की, या अधिकाऱ्यांचे आणि सैनिकांचे काम देशाच्या इतिहासात कायमचे सुवर्णाक्षरांनी कोरले जाईल. परंतु दुर्दैवाने हा इतिहास आज विस्मृतीत गेला आहे.

तसे पाहता, पुढील काळातील आझाद हिंद सेनेच्या काही अधिकाऱ्यांच्या करिअरच्या नोंदी झालेल्या आहेत. शाहनवाज खान मेरठ येथून अनेकदा खासदार म्हणून निवडून गेले होते. तेथील मजुरांना न्याय मिळावा हा प्रश्न त्यांनी लावून धरला होता. तसेच कॅप्टन लक्ष्मी सेहगल यांचे नाव बऱ्यापैकी लोकांना माहीत आहे. त्यांनी आझाद हिंद सेनेत झाशी राणी रेजिमेंटचे नेतृत्व केले होते. पुढे त्यांनी डॉक्टरकीचा पेशा स्वीकारला आणि कानपूरमध्ये कामगार वर्गात त्यांनी काम केले. सन २००२ मध्ये डाव्या आघाडीने त्यांचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सेहगल यांना पुढे केले होते.

बिहार असो, बंगाल असो किंवा उत्तर प्रदेश असो, स्वतंत्र भारतात काम केलेले आझाद हिंद सेनेतील हे अधिकारी गांधीजी आणि बोस या दोघांच्या विचारांनी सारखेच प्रभावित झाले होते. भारत १९४७मध्ये स्वतंत्र होताच बोस आणि गांधीजी यांच्यातील मतभेदाचा मुद्दा संपला. उलट आता त्यांचे ज्यावर एकमत झाले असते अशा, स्वार्थरहित राष्ट्रवाद, हिंदू मुस्लिम ऐक्याशी बांधिलकी, दारिद्य्राचे उच्चाटन आणि जात व लिंगाधारित भेदभावाची समाप्ती या मुद्‌द्यांना महत्त्व आले.

भाजप आणि संघ यांनी सुभाषचंद्र बोसांवर हक्क सांगणे, आदर दाखवणे हे अतिशय बेगडी प्रेम आहे. पण आजच्या काँग्रेसलादेखील त्यांच्यावर हक्क सांगता येणार नाही. तसेच केवळ बोस बंगाली होते, या एकाच कारणासाठी तृणमूल काँग्रेस पक्षाला त्यांच्यावर हक्क सांगता येणार नाही. कारण गांधीजींप्रमाणेच बोससुद्धा क्षुद्र प्रादेशिकातावादी कधीही नव्हते. खरे तर आज कोणत्याही राजकीय पक्षाला बोस आणि त्यांना ज्यांच्याविषयी आदर होता त्या गांधीजींवर हक्क सांगता येणार नाही. निरंजनसिंग गिल, शाहनवाज खान आणि लक्ष्मी सेहगल यांनी जसे काम केले (धार्मिक आणि वांशिक अल्पसंख्य लोकांना सुरक्षित करण्यासाठी, दलित आणि स्त्रियांना देशाच्या त्यांचे सर्व अधिकार मिळण्यासाठी) तसे काम करण्याची इच्छा असलेल्या सर्वांचा त्यांच्यावर हक्क आहे.

 (अनुवाद : संकल्प गुर्जर)

Tags: संकल्प गुर्जर रामचंद्र गुहा बोस-गांधी समेटाची दिशा जवाहरलाल बोस गांधीजी लक्ष्मी सेहगल शाहनवाज खान जीवनसिंग निरंजनसिंग गिल युनायटेड प्रेस ऑफ इंडिया नोआखाली Bose Gandhi sametachi disha Ramchandra Guha Javaharlal bose gandhiji lakshmi sehagal Shahnvaaj khan Jivansing Niranjansing Gil United Press of India Noakhali weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

रामचंद्र गुहा,  बंगळुरू, कर्नाटक

भारतीय इतिहासकार व लेखक. समकालीन सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक विषयांवर तसेच पर्यावरणावर आणि क्रिकेटच्या इतिहासावर लेखन. 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके