डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

उत्तर आणि दक्षिण भारतातील गांधीवादी

या तिन्ही व्यक्तिमत्त्वांची आयुष्ये पाहिली की त्यातून आपल्यासारख्या लोकांनी खूप काही शिकण्यासारखं आहे, असं मला वाटतं. माणसं निसर्गाहून वेगळी किंवा त्यापेक्षा वरचढ नसतात, हे उत्तराखंडचे बहुगुणा आपल्याला शिकवून जातात. आपल्या अस्तित्वासाठी आपण निसर्गाचा आदर केला पाहिजे. तर कर्नाटकचे दूरस्वामी जात, वर्ग, लिंग, धर्माच्या आधारावर केला जाणारा भेदभाव भारतीय संविधानाच्या गाभ्याशी असणाऱ्या मूल्यांच्या विरोधात आहे, इतकंच नाही तर हे सारं अखिल मानवतेच्या विरोधात आहे, असं सांगतात. भेदभावाचा अहिंसकपणे विरोध करणं ही आपली- स्वातंत्र्य आणि न्यायप्रियता या मूल्यांचा उद्‌घोष करणाऱ्यांची जबाबदारी आहे. तर खरी आत्मनिर्भरता ही व्यक्तीवर, तिच्या स्वत:च्या कुटुंबाशी, समूहाशी असलेल्या संबंधांवर, त्यासाठी केल्या जाणाऱ्या कामावर अवलंबून असते, अशी शिकवण नटराजन यांच्या जीवन-प्रवासातून मिळते. 

मे महिन्यात एकाच आठवड्यात तीन महत्त्वाच्या भारतीय व्यक्तींचं निधन झालं. या तिन्ही व्यक्तींवर महात्मा गांधींचा खूप प्रभाव होता. गांधीवादाबद्दलची या तिघांची समज आणि कामाचे मार्ग वेगवेगळे होते, वेगवेगळ्या भूप्रदेशात त्यांचं काम होतं. यातली एक व्यक्ती ऐंशीच्या घरात वय असलेली, तर दुसरी नव्वदीतली होती. तिसरी व्यक्ती तर शंभर वर्षे आयुष्य जगली. त्यामुळे त्यांच्या जाण्याचं दु:ख व्यक्त करत असतानाच आपण त्यांच्या आयुष्याच्या, कार्यकर्तृत्वाच्या स्मृतीही जागवल्या पाहिजेत.

उत्तराखंडचे सुंदरलाल बहुगुणा हे यातले पहिले गांधीवादी. 1973 मध्ये उत्तर अलकनंदामध्ये चिपको आंदोलनाची सुरुवात झाली, तेव्हा बहुगुणा यांच्या ठायी अनेक दशकं सामाजिक काम केल्याचा अनुभव होता. सुरुवातीला या आंदोलनांचं नेतृत्व चंडीप्रसाद भट्ट यांनी केलं होतं. बहुगुणा यांच्या भाषेत सांगायचं झालं तर भट्ट हेच या आंदोलनाचे मुख्य संचालक होते. चमोली जिल्ह्यात स्त्री-पुरुषांनी जे आंदोलन केलं, त्यावरून प्रेरित होऊन बहुगुणांनी या आंदोलनाची कल्पना आपल्या स्वत:च्या कार्यक्षेत्रात वापरायचं ठरवलं. त्यानंतर मग त्यांनी गंगा नदीची शाखा असलेल्या भगीरथीच्या खोऱ्यात लोकांना संघटित केलं. या भागात जिवंत झाडं कापली जाणार होती, त्याविरोधात उपोषण, आंदोलन करण्यासाठी त्यांनी लोकांना संघटित केलं. 

माझी आणि सुंदरजींची पहिली भेट मला आठवते. 1981 मध्ये कोलकात्यात मी त्यांना भेटलो होतो. चिपको आंदोलनावर मी संशोधन करायला तेव्हा नुकतीच सुरुवात केली होती आणि ते नेमके तेव्हाच याच विषयावर बोलण्यासाठी कोलकात्याला आले होते. हिंदी-इंग्रजीत सहजपणे बोलणारे सुंदरजी त्यांची मातृभाषा ‘गढवाली’तही फार सुंदर, ओघवतं बोलत. त्यांचं बोलणं श्रोत्यांचं लक्ष आकर्षून घेणारं, विचार करायला लावणारं असे. त्यानंतर दोन वर्षांनी बड्यार खोऱ्यात मी फील्ड वर्क करण्यासाठी गेलो. तिथं मी एका शेतमजूर महिलेची मुलाखत घेतली. या महिलेने सुंदरलाल यांच्या नेतृत्वाखाली, त्या भागातील अनेक महत्त्वाच्या आंदोलनांमध्ये सहभाग घेतला होता, बरीच वर्ष काम केलं होतं.

माझ्या संशोधनादरम्यान मला सुंदरलाल बहुगुणा आणि चंडीप्रसाद भट्ट या दोघांच्याही कामाची महती कळली, त्यामुळे दोघांचंही योगदान मला महत्त्वाचं वाटतं. सहसा दिल्लीतले पत्रकार, अकादमिक क्षेत्रातली माणसं चिपको आंदोलनाबाबत पटकन, कोणती तरी एक बाजू निवडतात. त्यांच्या दृष्टीने दोन्हीपैकी कोणती तरी एकच बाजू ‘वास्तव’ आणि एकच नेता ‘खरा’ असतो. परंतु खरं तर या आंदोलनात दोघांनीही दिलेलं योगदान लक्षणीय आहे. बहुगुणा आणि भट्ट यांचा दृष्टिकोन आणि कार्यपद्धती वेगळी असली तरी ती एकमेकांच्या अंतिम ध्येयाला पूरक ठरणारीच होती.

1970 च्या मोठ्या आंदोलनानंतर उत्तराखंडमध्ये व्यावसायिकीकरणाला उतरती कळा लागली, तेव्हा बहुगुणांनी चिपको आंदोलनाचा संपूर्ण हिमालयात प्रचार करण्यास सुरुवात केली. तर भट्ट यांनी उत्तराखंडमध्येच अगदी तळागाळापर्यंत पोहोचून रचनात्मक काम करण्यास प्राधान्य दिलं. त्यांनी स्त्रिया आणि विद्यार्थ्यांना संघटित करून उजाड झालेल्या टेकड्या, डोंगररांगांवर पुन्हा वनीकरण करण्याची सुरुवात केली. वनविभागाबरोबर संगनमत करून काही कंत्राटदारांनी या भागात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली होती, चिपको कार्यकर्त्याच्या भाषेत ‘अंदाधुंद कटाई’, त्यामुळे इथे वनीकरण महत्त्वाचं होतं. बहुगुणा आणि भट्ट या दोघांनीही आपापल्या पद्धतीने काम करून अनेक तरुण भारतीयांसमोर सामाजिक कामाचा आदर्श ठेवला, अनेकांना प्रेरित केलं.

बहुगुणा यांच्या मृत्यूनंतर, पाचच दिवसांत त्यांच्याप्रमाणेच धाडस, ऊर्जा, ज्ञान व प्रभावी व्यक्तिमत्व असलेले दुसरे गांधीवादी एच.एस. दूरस्वामी यांचं निधन झालं. दूरस्वामी कर्नाटकचे होते, बहुगुणा यांच्यापेक्षा दशकभराने तरी मोठे. त्यामुळेच त्यांचा कार्यकाळ, सेवाही मोठी आहे. 1936 च्या उन्हाळ्यात एकदा गांधीजी नंदी हिल्सला आले असताना विद्यार्थिदशेत असलेले दूरस्वामींनी त्यांना भेटले होते. त्यानंतर सहा वर्षांनी सुरू झालेल्या ‘भारत छोडो’ आंदोलनात, म्हैसूर प्रांतात दूरस्वामींनी महत्त्वाची कामगिरी बजावली आणि त्याचा परिणाम म्हणून अनेक वर्षे कारावासही भोगला.

1950 आणि 60 च्या दशकात दूरस्वामींनी सर्वोदय चळवळीत काम केलं, जमिनीच्या फेरवाटपाकडे त्यांनी विशेष लक्ष दिलं. 1972 मध्ये जेव्हा आणीबाणी जाहीर झाली, तेव्हा मात्र त्यांनी सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करणं सोडून दिलं. मात्र त्याचा परिणाम म्हणून पुन्हा त्यांना स्वतंत्र भारतात तुरुंगवास घडला. एके काळी भारतावर राज्य करणाऱ्या सरंजामी, वसाहतवादी शोषकांनी त्यांना तुरुंगात टाकलं नि पुन्हा स्वतंत्र भारतात, भारत सरकारनेही त्यांना तुरुंगात डांबलं. काही महिन्यानंतर त्यांची तुरुंगातून सुटका झाली, त्यानंतर त्यांनी स्वत:च्या राज्यातील सामाजिक सरंचना अधिकाधिक मानवी कशी करता येईल, यासाठी काम सुरू केलं. 

1980 मध्ये मी पहिल्यांदा दूरस्वामींना भेटलो होतो. पश्चिम घाटात, लष्करी औद्योगिक वसाहत बांधल्याने तिथल्या जैवविविधतेचं प्रचंड नुकसान होणार होतं, त्याविरोधात दूरस्वामींच्या नेतृत्वाखाली निदर्शनं केली जात होती, त्यात मी सहभाग घेतला होता. तेव्हा ते सत्तरीत होते, तरीही त्यांचा वावर अतिशय प्रभावी, करारी होता. आंदोलन करायचं असो वा उपोषण, त्या वयातही ते एका पायावर तयार असत. त्यांच्या ठायी असलेली विनोदबुद्धी आणि सर्वांना आपलंसं करून घेण्याचा गुण यामुळे ते सुंदरलालजींप्रमाणेच सगळ्यांना हवेहवेसे वाटत. 

मागील वर्षी मार्चमध्ये त्यांची नि माझी अखेरची भेट झाली. मागील काही दशकांत मी त्यांचं काम जवळून पाहिलं आहे. कर्नाटकच्या भल्यासाठी त्यांनी खूप काम केलं. जमिनींचा व्यवहार करणारे बडे लोक असो, खाणकंपन्या, भ्रष्ट राजकारणी... सगळ्यांनाच त्यांनी नेहमी नीडरपणे अंगावर घेतलं. त्यांच्या सत्तरीत आणि अगदी नव्वदीतही त्यांची कामाप्रतीची तळमळ अबाधित होती, आर्थिक आणि सामाजिक अन्यायाविरोधात त्यांनी नेहमीच भूमिका घेतली. राज्य सरकारकडून देऊ केलेल्या सेवा, सुविधा, फायदे त्यांनी आयुष्यभर नाकारले. त्यांच्याकडे स्वत:ची कारही नव्हती, ते नेहमीच सार्वजनिक वाहनांतून प्रवास करायचे. के.भाग्यप्रकाश या फोटोग्राफरने या 93 वर्षांच्या गांधीवादी म्हाताऱ्याला, बंगळुरूतल्या एका बसथांब्यावर एकदा बसची वाट बघत थांबलेलं पाहिलं. तेव्हा न राहवून भाग्यप्रकाशने त्यांचे काही फोटो काढले. ‘अननोटिस्ड बाय द मॅन हिमसेल्फ’ असं शीर्षक असलेल्या या सीरीजमधले दूरस्वामी यांचे बसथांब्यावरचे, बसमध्ये चढतानाचे फोटो फार सुंदर आहेत. त्यांच्या निधनानंतर अनेकांनी हे फोटो टि्वटरवर पुन्हा शेअर केले.

गांधीवादी चळवळीच्या भारतातल्या फार मोठ्या यशानंतर, स्वतंत्र भारतात लोकशाही राज्याला बहुसंख्याकवादी हिंदुत्ववाद्यांकडून हळूहळू धोका निर्माण होत गेला, त्याकडे मात्र या चळवळीने पुरेसं लक्ष दिलं नाही. (स्वत: सुंदरलाल बहुगुणा विश्व हिंदू परिषदेसारख्या गलिच्छ संस्थेच्या वळचणीला गेले.) या पार्श्वभूमीवर एच.एस.दूरस्वामी हा मात्र एक लख्ख अपवाद ठरला. वय वर्ष 102 असतानाही त्यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए)ला विरोध करण्यासाठी आंदोलन केलं. हे त्यांचं अखेरचं आंदोलन ठरलं. दिल्लीत जामिया-मिलिया इस्लामिया विद्यापीठात पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेली क्रूर दडपशाही पाहून त्यांना राहवलं नाही, त्यांनी जाहीरपणे यावर भूमिका घेतली. मार्च 2020 मध्ये रस्त्यावर एक मंडप टाकून तिथं ते ठाण मांडून बसले. त्यांचे हजारो चाहते, मित्र, कार्यकर्ते तिथे जमले होते. मी त्यांना भेटायला गेलो. द हिंदूनं या घटनेचं वार्तांकन केलं होतं. ‘सीएए अतिशय भेदभावमूलक असून, या देशाची स्थापना ज्या मूल्यांवर झाली, त्यालाच हरताळ फासणारं आहे. इथल्या मुस्लिमांनी भारतीय असणं निवडलं. आता त्यांना कोणीही त्यांचं नागरिकत्व सिद्ध करायला भाग पाडू शकत नाही. सत्ताधाऱ्यांच्या धोरणांना विरोध केल्याने कुणीही देशविरोधी ठरत नाही. राज्यव्यवस्था, देश आणि सरकार यात आपण फरक केला पाहिजे’ असं दूरस्वामी त्या वेळी म्हणाले होते.

सुंदरलाल बहुगुणा, एच. एस. दूरस्वामी दोघेही सार्वजनिक जीवनात लीलया वावरणारे कार्यकर्ते होते. समोर माईक असल्यावर ते नेहमीच उत्साहाने बोलत, आपले विचार लोकांसमोर प्रभावीपणे मांडत. दोघांचीही व्यक्तिमत्वे कमालीची फोटोजेनिक होती. या दोघांपेक्षा अगदी भिन्न स्वभाववैशिष्ट्य, वागण्या बोलण्याची वेगळी पद्धत असलेले एक गांधीवादी के.एम.नटराजन यांचंही यादरम्यानच निधन झालं... सुंदरलाल यांच्या निधनापाठोपाठ. ते स्वभावाने अतिशय मृदू, विनम्र आणि फारसे प्रकाशझोतात न आलेले होते. त्यामुळेच बहुगुणा आणि दूरस्वामी या दोघांच्या तुलनेत नटराजन फार कमी लोकांना माहीत आहेत. त्यांनी गांधीवाद आत्मसात करून त्यांच्या राज्यात (तमिळनाडू) प्रभावीपणे काम केलं. 

नटराजन यांचा पिंड कार्यकर्त्याचा नव्हता, त्यापेक्षा ते रचनात्मक काम करण्यावर भर देत. विद्यार्थीदशेत असताना 1956-57 मध्ये त्यांनी गांधींपासून प्रेरित होऊन विनोबा भावेंसोबत तमिळनाडूत मोठी पदयात्रा केली. भूदान चळवळीचा प्रचार ते करत. तेव्हापासून त्यांनी आपलं आयुष्य ग्रामीण उत्कर्षासाठी वाहिलं. जातीभेद नष्ट करणं, खादीचा प्रचार-प्रसार आणि सेंद्रीय शेती ही तीन मुख्य कामं ते करत. याशिवाय त्यांचं आणखी एक काम अत्यंत महत्त्वाचं आहे- मंदिरांच्या ताब्यात असलेल्या जमिनीचं भूमिहीनांना वाटप करणं. या कामात त्यांच्या तीन जवळच्या सहकाऱ्यांनीही महत्त्वाचं योगदान दिलं. शंकरलिंगम आणि क्रिष्णाम्मल जग्गनाथन हे जोडपं आणि खादीत वावरणारे अमेरिकन गृहस्थ राल्फ रिचर्ड केईथन. 

के.एम. नटराजन यांना भारतीय डाक सेवेबद्दल फार आपुलकी आहे, असं मला प्रथम कळलं होतं. त्याचं झालं असं की, 1996 मध्ये मी गांधीवादी अर्थतज्ज्ञ जे.सी. कुमारप्पा यांच्यावर एक लेख लिहिला होता. त्यानंतर लगेच मला मदुराईवरून एका व्यक्तीचं टपाल आलं. ही व्यक्ती कुमारप्पांसोबत जवळून काम केलेली होती. त्यानंतर अनेक वर्षांनी मी आर.आर.केईथन यांच्यावर काही संशोधन करत होतो, तेव्हा मला समजलं की नटराजन आणि केईथन यांचा चांगला परिचय होता, त्यामुळे मी नटराजन यांच्याशी चर्चा करण्याकरता मदुराईला गेलो. तिथे गांधी म्युझियमच्या आवारातील सर्वोदयच्या कार्यालयात बसून चहा पीत गप्पा मारत असताना नटराजन यांनी मला, केईथन यांच्या आयुष्यातील, मला माहीत नसलेल्या बऱ्याच गोष्टी सांगितल्या. त्यानंतर त्यांनी दिंडीगुल येथील गांधीग्राम ग्रामीण विद्यापीठातील, केईथन यांच्याशी संबंधित अनेक लोकांच्या ओळखीही मला करून दिल्या आणि मला तिथे पाठवलं.

त्या काळात आमच्यामध्ये बराच संवाद झाला. गांधीवादाव्यतिरिक्त नटराजन यांना क्रिकेटमध्ये रस आहे, हे कळल्यावर तर मला आनंदाचा, आश्चर्याचा धक्काच बसला. नटराजन फारच उदार होते. मी बंगळुरूला परतल्यावर एक भलं मोठं टपाल मला मिळालं. नटराजन यांनी, केईथन यांनी लिहिलेली अनेक पत्रं (मूळ प्रती) त्यांनी अख्ख्या तमिळनाडूभर शोधून मला पाठवली होती. इतकंच नाही तर मी या विषयावर केलेल्या लिखाणाचा खर्डा वाचून त्यांनी नम्रपणे त्यातल्या उणिवाही सांगितल्या.  

या तिन्ही व्यक्तिमत्त्वांची आ़युष्य पाहिली की, त्यातून आपल्यासारख्या लोकांनी खूप काही शिकण्यासारखं आहे, असं मला वाटतं. माणसं निसर्गाहून वेगळी किंवा त्यापेक्षा वरचढ नसतात, हे उत्तराखंडचे बहुगुणा आपल्याला शिकवून जातात. आपल्या अस्तित्वासाठी आपण निसर्गाचा आदर केला पाहिजे. तर कर्नाटकचे दूरस्वामी जात, वर्ग, लिंग, धर्माच्या आधारावर केला जाणारा भेदभाव भारतीय संविधानाच्या गाभ्याशी असणाऱ्या मूल्यांच्या विरोधात आहे, इतकंच नाही तर हे सारं अखिल मानवतेच्या विरोधात आहे, असं सांगतात. त्यामुळेच या भेदभावाचा अहिंसकपणे विरोध करणं ही आपली- स्वातंत्र्य आणि न्यायप्रियता या मूल्यांचा उद्‌घोष करणाऱ्यांची जबाबदारी आहे. तर खरी आत्मनिर्भरता ही व्यक्तीवर, तिच्या स्वत:च्या कुटुंबाशी, समूहाशी असलेल्या संबंधांवर, त्यासाठी केल्या जाणाऱ्या कामावर अवलंबून असते, अशी शिकवण नटराजन यांच्या जीवन-प्रवासातून मिळते. शाश्वत विकासासाठी ग्रामीण भागात स्थानिक पातळीवर केले जाणारे प्रयत्नच भविष्यात महत्त्वाचे ठरतील. कार्बन उत्सर्जनावरील नियंत्रणासाठी केल्या जाणाऱ्या विविध उपाययोजना करारांमध्ये भविष्यात याबाबत विचार केला जाऊ शकतो.    

ही तिन्ही व्यक्तिमत्व- प्रत्येकाचं कार्य प्रेरणा देणारं... त्यांचे मार्ग वेगवेगळे आहेत पण तरी त्यांच्यात एक समान धागा आढळतो. बहुगुणा, नटराजन, दूरस्वामी हे तिघेही आपापल्या राज्यात, जिल्ह्यात काम करत होते. भारताचा आणि जगाचा विचार करत असतानाच त्यांची मूळं स्वत:च्या मातीत खोलवर रुजलेली होती. विचार ग्लोबल पण काम लोकल हा त्यांच्या कार्याचा पाया होता. या तिघांचं आयुष्य आणि काम मला पाहता आलं, याबद्दल कृतज्ञता वाटते.

(अनुवाद : प्रियांका तुपे)

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

रामचंद्र गुहा,  बंगळुरू, कर्नाटक

भारतीय इतिहासकार व लेखक. समकालीन सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक विषयांवर तसेच पर्यावरणावर आणि क्रिकेटच्या इतिहासावर लेखन. 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके