डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

साबरमती आश्रमाच्या पुनर्विकासाची योजना नैतिक दृष्ट्या, (कायदेशीर दृष्ट्याही) पाहिली तर यापेक्षाही भयंकर आहे. निवडून दिलेले पंतप्रधान म्हणून मोदींना, काही वास्तू पाडून टाकण्याचा, त्यांना हवं ते हवं तसं बांधण्याचा अधिकार आहे... मग ते कितीही विध्वंसक असो, इतिहास पुसणारं असो की नागरिकांच्या पैशांची नासाडी करणारं आणि सार्वजनिक जागांची शोभा घालवणारं असो. साबरमती आश्रमाची गोष्ट मात्र निराळी आहे. हा आश्रम केवळ अहमदाबादचा, गुजरातचा, भारताचा नाही. तर तो प्रत्येक माणसाचा आहे. अगदी येणाऱ्या पिढ्यांचाही. ज्या माणसाने आपली पूर्ण राजकीय कारकीर्द गांधीविचारांच्या विरोधात काम करण्यात घालवली आणि ज्या स्थापत्यशास्त्रज्ञाची सत्तेची मखलाशी करण्यापलीकडे फार गुणवत्ता नाही, त्यांना महात्म्याशी संबंधित सगळ्यात पवित्र जागेचा, कायापालटाच्या नावाखाली विध्वंस करण्याचा अधिकार मुळीच नाही.

 

1979 मध्ये मी प्रथमच अहमदाबादला गेलो होतो. त्यानंतर त्या दशकात अहमदाबादच्या कित्येक वाऱ्या झाल्या. कधी खासगी तर कधी व्यावसायिक कामासाठी मी अहमदाबादला जातच राहिलो. काही काळाने मी गांधींवर संशोधन करायला सुरुवात केली, तेव्हा तर मी या शहराच्या प्रेमातच पडलो. फेब्रुवारी 2002 मधील भयंकर दंगलीनंतर मी पहिल्यांदा जेव्हा अहमदाबादला गेलो तेव्हा साहजिकच साबरमती आश्रमात जाणं झालं. तिथे मी आश्रमाच्या एका विश्वस्तांशी बोललो. हा माणूस अतिशय शांत, नम्र, फारसा कुणाला माहीत नसलेला होता. 30 वर्षे त्याने गांधीजींची सेवा केली होती. आम्ही बोलत असताना तो म्हणाला,  या दंगली (2002 च्या) ही महात्मा गांधींची दुसऱ्यांदा केलेली हत्या आहे.

ही दंगल तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींच्या काळात झाली. मोदींची संपूर्ण जडणघडण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत झाली. संघाची विचारसरणी विभाजनवादी आणि इतर समूह, देशांबाबत तिरस्कार निर्माण करणारी आणि गांधींच्या वैश्विक दृष्टिकोनाच्या अगदी विरुद्ध आहे. रा.स्व. संघाचे सरसंघचालक मा.स. गोळवलकरांची भक्ती करतच तर नरेंद्र मोदी मोठे झाले आणि गोळवलकरांचे गांधींबद्दलचे विचार सर्वज्ञात आहेत. 1947 मधील एका भाषणात गोळवलकर म्हणतात, ‘महात्मा गांधी यापुढे त्यांना अजून भरकटवू शकत नाहीत. अशा माणसांना त्वरीत शांत करण्याचे सगळे मार्ग आपल्याकडे आहेत. हिंदूंशी क्रूर व्यवहार करण्याची आपली परंपरा नाही, पण आपल्याला ते करणं भाग पडलं तर यापुढे तेही करू.’

गोळवलकर म्हणजे मोदींसाठी ‘पूजनीय श्री.गुरुजी’च होते. ते मोदींसाठी अतिशय आदरणीय शिक्षक, गुरू होते. मोदींनी त्यांच्या संपूर्ण राजकीय प्रवासात गोळवलकरांचा खूप आदर, सन्मान केला. गांधीजींना मात्र क्वचितच कधी आदर दिला असेल. मोदी मुख्यमंत्री असताना साबरमती आश्रमाला क्वचितच भेट देत असत. पण जेव्हा ते पंतप्रधानपदी बसले, तेव्हापासून अचानकच त्यांना या आश्रमात रस वाटू लागला. जपान, इस्रायल, चीन आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या भारत दौऱ्यांदरम्यान, ते स्वत: त्यांना या आश्रमाला भेट देण्यासाठी घेऊन गेले. 

या भेटीत झाले काय? तर आश्रमाचे अनेक विश्वस्त, कर्मचाऱ्यांना गांधींजींच्या जीवनकार्याविषयी, तत्त्वज्ञानाविषयी सखोल माहिती आहे, त्यामुळे यांपैकी कोणाही व्यक्तीने परदेशी पाहुण्यांना गांधींजींच्या जीवनाविषयी माहिती देणे उचित ठरले असते. पण त्याऐवजी गांधींजींचा तिरस्कार, द्वेष करणाऱ्या संघटनेत जडणघडण झालेल्या माणसानेच (मोदींनी) या पाहुण्यांना गांधींजींच्या कार्याबद्दल माहिती दिली. आश्रमातील बापूंची कुटी, ते सूत कातत असत तो चरखा, इतर प्रमुख वास्तूंची माहिती मोदी आपल्या परदेशी पाहुण्यांना देत असताना, यथोचित छायाचित्रे काढण्याच्या, मोदी त्या छायाचित्रांत केंद्रस्थानी कसे राहतील, हे पाहण्याच्या सूचनाही छा़याचित्रकारांना दिल्या गेल्या होत्या. चरख्याकडे निर्देश करत पाहुण्यांना त्याबद्दल माहिती सांगतानाचे छायाचित्र तर गांधींबद्दल मोदी किती अधिकारवाणीने बोलू शकतात, हेच दर्शवणारे आहे. 

गांधीजींशी, गांधी विचारांशी सार्वजनिक अवकाशात नाळ जोडण्याची पंतप्रधान मोदींची ही धडपड काय दर्शवते?  एखाद्या विचारसरणीशी असलेले नाते, राजकीय बांधिलकी या साऱ्यापेक्षा व्यक्तिमहात्म्य, एखाद्या व्यक्तीचे (मोदींचे) अति उदात्तीकरण करणे हे किती महत्त्वाचे आहे, हेच या धडपडीतून दिसते. रा.स्व.संघ गांधींच्या बाबतीत नेहमीच द्विधेत राहिलेला आहे. मोदीभक्त समाजमाध्यमांवर गांधीजींची खिल्ली उडवत असतात, त्यांच्या विचारांना विरोध करत असतात. मात्र गांधीजी या साऱ्यालाही पुरून उरतात, हे मोदींना माहीत आहे. सद्यकालीन परिस्थितीत ‘गांधी’ हा जगभर चलती असलेला, ठळकपणे दिसणारा एक भारतीय ब्रँड आहे, हे मोदींना माहीत आहे. त्यामुळे जपान, चीन, इस्रायल, फ्रान्स असो की अमेरिका, रशिया जर्मनी वगैरे... आपण कसे गांधीविचारांच्या बाजूचे आहोत, हे प्रतिकात्मरीत्या का होईना जगाला दाखवण्याची आवश्यकता मोदींना वाटते.   

पंतप्रधान बनल्यानंतर त्यांनी साबरमती आश्रमात कितीही फेऱ्या मारल्या तरी त्यांच्या आणि गांधींच्या विचारसरणीत जमीन-अस्मानाचं अंतर आहे, ते कधीही मिटणार नाही की कमी होणार नाही. ज्या पंतप्रधानाच्या पक्षाचे 300 खासदार लोकसभेत असतात आणि त्यापैकी एकही खासदार मुस्लिम नसतो, जे सरकार मुस्लिमांना भेदभावमूलक वागणूक देणारी, त्यांचं गुन्हेगारीकरण करणारी विधेयकं संमत करतं, ते गांधींच्या धार्मिक सलोख्याच्या, एकोप्याच्या विचारांपासून कोसो दूर आहे. ज्या माणसाने आपला वैयक्तिक इतिहास सोयीस्करपणे बदलला, त्या राज्यात अर्थव्यवस्थेपासून ते डॉक्टरांकडील रुग्णांचे आकडे बदलू शकतात, आरोग्ययंत्रणा कोलमडली तरी सराईतपणे खोटं बोलून वर ‘सत्यमेव जयते’चा उद्‌घोष करतात, त्यांनी खरं तर आता या वाक्यात त्यांच्या राजवटीला साजेलसा ‘असत्यमेव जयते’ असा बदल करावा. फसवणुकीची हद्द पार करून विजय मिळवणाऱ्या राजवटीसाठी, भाजपसाठी हे घोषवाक्य सार्थ ठरेल.

सत्य, पारदर्शकता, धार्मिक विविधता हा गांधीविचार होय. तर कपट, अपारदर्शकता आणि बहुसंख्याकवाद हा मोदींचा विचार आणि कार्यपद्धती आहे. त्यामुळे मोदीसमर्थक गांधींविचारांशी, गांधींशी आपलं नातं आहे, असं कशाच्या आधारावर म्हणू शकतात? तर्क आणि नैतिकतेच्या आधारे विचार केला तर हे शक्य नाही. पण सत्ता आणि ती टिकवण्यासाठी करावा लागणारा आटापिटा याकरता त्यांना हे गरजेचे आहे. त्यामुळेच मोदींच्या प्रतिमेवरील काही डाग पुसून टाकण्यासाठी ते गांधींचा वापर करत आहेत. अलीकडेच जाहीर केलेला, साबरमती आश्रमाचं जागतिक दर्जाचे स्मारक बनवण्याचा संकल्प हाही प्रतिमासुधारणेचाच एक प्रयत्न आहे.

‘माझे जीवन हाच एक संदेश आहे’, असं गांधी म्हणाले होते. मोदींप्रमाणे एखाद्या स्टेडियमला आपलं नाव देण्याची गरज त्यांना वाटली नाही. किंवा इतिहासातलं आपलं स्थान बळकट करण्यासाठी, राजधान्यांना, शहरांना असलेली जुन्या राजांची, शासकांची नावं बदलून स्वत:ला हवी ती नावं त्या शहरांवर थोपवण्याची गरजही त्यांना वाटली नाही. आजचा साबरमती आश्रम म्हणजे गांधीजी ज्या मूल्यांसाठी जगले, त्याचं मूर्तिमंत प्रतीक आहे. गांधींच्या काळातील स्वच्छ इमारती, भवताली झाडं, पक्षी, खूपशी सुरक्षा-व्यवस्था- प्रवेश फी नसलेलं मुक्त प्रवेशद्वार, खाकी वर्दीतील बंदुकधारी पोलिसांचा अभाव, जवळून वाहणाऱ्या नदीचं दृश्य यामुळे या जागेला एक उबदारपणा प्राप्त होतो. तिथे जावंसं बसावंसं वाटतं. भारतातील इतर प्रेक्षणीय वास्तूंमध्ये असा अनुभव क्वचितच येतो.    

गांधीजींनी स्थापन केलेल्या पाच आश्रमांपैकी दोन दक्षिण आफ्रिकेत आणि तीन भारतात आहेत. साबरमती हा निर्विवादपणे अत्यंत महत्त्वाचा आश्रम! भारतातील, जगातील लाखो लोकांनी या आश्रमाला भेट दिली आहे. या वास्तूतील सौंदर्याने, साधेपणाने, इतिहासाने ज्याला भुरळ घातली नसेल अशी व्यक्ती विरळाच...

जेव्हा एखादी सत्ता सौंदर्यशास्त्राबाबत एकाधिकारशाही चालवणारी, प्रतिकांची पूजा करणारी असते आणि ती साबरमती आश्रमाबाबत ‘जागतिक दर्जाचे प्रेक्षणीय स्थळ’ असे शब्द वापरते, तेव्हा अंगावर काटा येतो. या वास्तूचं अद्ययावतीकरण करण्यासाठी  वास्तूरचनाकार बिमल पटेल यांना निवडण्यात आलं आहे, यामुळे आणखीच अस्वस्थ वाटतं. त्यांनी केलेली कामं क्राँकिटची आणि अतिशय कोरडी आहेत, तिथे उबदारपणाचा लवलेशही नाही. साबरमती आणि सेवाग्राम आश्रमातील गांधीजींची साधी घरं कुठे आणि बिमल यांनी बांधलेली मोठी काँक्रिटची बांधकामं कुठे... हे दोन्ही एकमेकांशी अजिबात मेळ खाणारं नाही.

पंतप्रधानांनी बिमल पटेल यांची निवड केली, जणू काही हा एकच वास्तूरचनाकार त्यांना माहीत आहे. दिल्ली, वाराणसी आणि अहमदाबादमधील काही ‘संस्कारी’ (धार्मिक) प्रकल्पांचे वास्तूरचनेचे काम त्यांनी केल्यामुळे साहजिकच साबरमती आश्रमाचा कायापालट करण्याचे काम त्यांना दिले गेले. मोंदींनी गुजरातमधील त्यांच्या खास गोटातील काही ‘विश्वासू’ प्रशासकीय अधिकारीही या कामी पटेल यांच्या दिमतीला दिले आहेत. या ‘पुनर्विकासाची’ योजनाही त्यांच्या आतल्या गोटातील काही लोकांनी बनवली आणि त्याकरता स्थापत्यशास्त्रज्ञ, ऐतिहासिक वास्तू जतन करणारे तज्ज्ञ, गांधीवादी, गांधी विचारांचे अभ्यासक यांपैकी कोणाचीही मते जाणून घेतली नाहीत. किंबहुना आश्रमाच्या विश्वस्तांनाही ही योजना आणि तिच्या तपशीलांपासून अंधारात ठेवण्यात आलं.  

साबरमती आश्रमाचा कायापालट करण्याची मोदींची योजना अतिशय गुप्तपणे आणि  त्यांच्या निकटवर्तीयांमार्फत तयार करण्यात आली आहे. 1960 मध्ये याच्या अगदी उलट घडलं. आश्रमाच्या विश्वस्तांना आश्रमातच एक संग्रहालय बांधायचं होतं, तेव्हा त्यांनी वास्तूविशारद म्हणून गुजराती माणसालाच काम न देता मुंबईच्या (तत्कालिन बाँम्बे) चार्ल्स कोरिया यांना पाचारण केलं. कोरिया वेगळ्या धर्माचे, वेगळ्या भूप्रदेशात राहणारे होते. मात्र गांधीजी स्वत:ही कधी प्रांतीयतेत अडकले नाहीत, ते वैश्विक होते, त्यामुळे कोरिया यांच्या निवडीतही ही बाब आड आली नाही. शिवाय त्यांनी केलेल्या कामाची खूप प्रशंसा झाली. स्थापत्यरचना करताना त्या वास्तूचा मानवी चेहरा हरवणार नाही, हे त्यांनी कटाक्षाने पाहिले. आपल्या रचनेत त्यांनी मोठमोठे वऱ्हांडे, प्रशस्त मोकळ्या जागा, झाडांचा समावेश केला. त्यांनी तयार केलेले हे संग्रहालय आणि गांधींच्या काळातील वास्तू यांचा सुरेख मिलाफ त्यांच्या शैलीमुळे साधला गेला आहे.   

या सगळ्यावर माझा अहमदाबादी मित्र विनोदानं म्हणतो, आपल्याला सुदैवाने कदाचित ‘एक देश, एक राजकीय पक्ष’ मिळणार नाही, पण आपण ‘एक देश एक आर्किटेक्ट’च्या दिशेने नक्की जातोय. आता एखाद्या कोट्यधीश स्त्री- पुरुषाने, त्याला हवी असलेली वेगवेगळी घरं म्हणजे समुद्रकिनारी बांधायचं घर, डोंगरांमधलं घर, वाळवंटातलं घर अशा साऱ्यांचं कंत्राट एकाच माणसाला दिलं तर त्याला हरकत असायचं कारण नाही... कारण त्यासाठी खर्च होणारा पैसा त्याच्याच खिशातला असल्याने तिथे कुणीही नैतिक आक्षेप घेऊ शकत नाही. मात्र करदात्यांच्या पैशांतून केल्या जाणाऱ्या सर्वच मोठ्या बांधकाम प्रकल्पांचं काम एकाच स्थापत्यशास्त्रज्ञाला दिलं तर ती मोठी समस्या आहे. काही स्थापत्यशास्त्रज्ञ व्यक्तिमहात्म्याला प्रमाण मानणाऱ्या नेत्याच्या खास जवळचे असतात आणि त्यांनाच ही मोठी कामे दिली जातात, हे असं केवळ हुकूमशाही राजवटींतच होऊ शकतं. या स्थापत्यशास्त्रज्ञांना सगळीच कामे दिली जातात, मग ते एखादं धार्मिक शहर बांधणं असो की एखाद्या आधुनिक शहराची रचना किंवा मग साबरमती आश्रम... सर्वच बांधकाम, स्थापत्य, वास्तूरचनेसाठी हेच लोक योग्य ठरतात. ही घराणेशाही आणि सत्तेजवळ असणाऱ्या लोकांना दिलेली खैरातच नव्हे काय? भारतीय स्थापत्यशास्त्र आणि भारतालाही याची अपेक्षा नाही.

अधिक स्पष्टपणे आणि धाडसाने बोलायचं झालं तर, मोदी आणि त्यांचे निकटवर्तीय उद्योगपती हा विध्वंस रोखणार नाहीत. आणि दु:खाची गोष्ट अशी की साबरमती आश्रमाचे सगळे विश्वस्त (स्त्रिया-पुरुष) आज वृद्धत्वाकडे झुकलेले आहेत, शिवाय ते सगळेच गुजरातमध्ये राहतात. त्यामुळे त्यांना सरकारच्या मनमानी कारभाराविरोधात बोलता येत नाही. विध्वंसासाठीच प्रसिद्ध असलेल्या राज्यात ते राहत असल्याने साहजिकच त्यांच्या मनात भीती आहे. विरोधाचा सूर लावला तर त्यांच्या कुटुंबांचं काय होईल, या भयामुळेही त्यांना या घडामोडींना विरोधही करता येत नाही. त्यामुळे मोदी आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी केलेली ही फसवी योजना बेमालूमपणे प्रत्यक्षात येईल. आता हा माणूस (मोदी) आपल्याला ठाऊक झालेला आहे, त्यामुळे स्वत:चा काही तरी स्वार्थ असल्याशिवाय तो कोणतीही गोष्ट करत नाही, हेही उघड आहे. साबरमती आश्रमावरील प्रेमापोटी अथवा गांधींप्रती आदर, सन्मान म्हणून मोदी हा पुनर्विकास करत नाहीत, तर त्यांचीच डागाळलेली प्रतिमा सुधारण्यासाठी चालवलेला हा खटाटोप आहे.  

दिल्लीत सध्या विध्वंसक सेंट्रल विस्टा प्रकल्पाचा घातलेला घाटही असाच आहे. चहूबाजूंनी त्यावर टीका झाली. साबरमती आश्रमाच्या पुनर्विकासाची योजना नैतिक दृष्ट्या, (कायदेशीर दृष्ट्याही) पाहिली तर यापेक्षाही भयंकर आहे. निवडून दिलेले पंतप्रधान म्हणून मोदींना, काही वास्तू पाडून टाकण्याचा, त्यांना हवं ते हवं तसं बांधण्याचा अधिकार आहे... मग ते कितीही विध्वंसक असो, इतिहास पुसणारं असो की नागरिकांच्या पैशांची नासाडी करणारं आणि सार्वजनिक जागांची शोभा घालवणारं असो. साबरमती आश्रमाची गोष्ट मात्र निराळी आहे. हा आश्रम केवळ अहमदाबादचा, गुजरातचा, भारताचा नाही. तर तो प्रत्येक माणसाचा आहे. अगदी येणाऱ्या पिढ्यांचाही. ज्या माणसाने आपली पूर्ण राजकीय कारकीर्द गांधीविचारांच्या विरोधात काम करण्यात घालवली आणि ज्या स्थापत्यशास्त्रज्ञाची सत्तेची मखलाशी करण्यापलीकडे फार गुणवत्ता नाही, त्यांना महात्म्याशी संबंधित सगळ्यात पवित्र जागेचा, कायापालटाच्या नावाखाली विध्वंस करण्याचा अधिकार मुळीच नाही.

(अनुवाद : प्रियांका तुपे)

Tags: महात्मागांधी कालपरवा रामचंद्रगुहा weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

रामचंद्र गुहा,  बंगळुरू, कर्नाटक

भारतीय इतिहासकार व लेखक. समकालीन सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक विषयांवर तसेच पर्यावरणावर आणि क्रिकेटच्या इतिहासावर लेखन. 


Comments

  1. Girish Gandhi- 25 Jul 2021

    writing not worth commenting The writer s presentation seems to be for his bread and butter.

    save

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके