डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

आणि जागतिक क्रिकेटवर भारत अधिराज्य गाजवू लागला...

लॉर्ड्‌स मैदानावर बॅटिंग करताना बॉलसंबंधीचा एक अंदाज चुकला, याचाच दूरगामी परिणाम भारतात क्रिकेट हा अतिमहत्त्वाचा खेळ ठरण्यात झाला. त्याचप्रमाणे भारत हे जागतिक क्रिकेटचे आर्थिक आणि व्यवस्थापकीय केंद्र बनण्यासाठी आणखी एका निर्णयातील कसूर कारणीभूत ठरली. सन 2007 च्या सप्टेंबर महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने (आय.सी.सी.) दक्षिण आफ्रिकेमध्ये टी- 20 वर्ल्ड कपचे सामने भरवले. या सामन्यांवर सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यांच्यासारख्या खेळाडूंनी बहिष्कार टाकला; कारण खेळाचे हे अनिर्णित उपप्रदर्शन आहे, असे त्यांचे मत होते. मग महेंद्रसिंह धोनी या अननुभवी विकेटकीपर-बॅट्‌समनच्या नेतृत्वाखाली तशीच एक फारसा अनुभव नसलेली खेळाडूंची टीम पाठवण्यात आली. 

कॅरॅव्हान मासिकाच्या अलीकडच्या अंकात जागतिक क्रिकेटच्या क्षेत्रात सर्वांत ‘पॉवरफुल’ सिद्ध झालेले एन.श्रीनिवासन यांचा परिचय राहुल भाटिया यांनी करून दिला आहे. त्यांनी सांगितलेली श्रीनिवासन यांची कथा विलोभनीय तर आहेच, पण अंगावर काटा उभा करणारी आहे. हुषारी, धूर्तपणा आणि कमालीचा निष्ठुरपणा यांच्या जोरावर श्रीनिवासन यांनी प्रथम तमिळनाडू क्रिकेट असोसिएशनवर, नंतर भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डावर (बी.सी.सी.आय.) आणि शेवटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळावर (आय.सी.सी.) कसा कब्जा केला, त्याची ती कहाणी आहे. 

श्रीनिवासन यांच्या अंगचे उपजत कौशल्य व त्यांची महत्त्वाकांक्षा या गोष्टी गृहीत धरूनही असे म्हणावे लागेल की, भारताविरुद्धच्या दोन सामन्यांत अनपेक्षितपणे पडलेल्या दोन विकेट्‌स (त्याही तब्बल चोवीस वर्षांच्या अंतराने) त्यांना या सर्वोच्च स्थानी घेऊन गेल्या. जागतिक क्रिकेटचा केंद्रबिंदू भारत कसा बनला आणि मद्रास (चेन्नई)चा एक उद्योजक त्या खेळातील सर्वांत प्रभावी स्थानापर्यंत कसा पोहोचला, याची कथा सांगताना त्या दोन विकेट्‌सविषयी थोडक्यात सांगितले पाहिजे. 

यांपैकी पहिली घटना 1983 च्या विश्वकप सामन्यामध्ये घडली. भारताने त्या अंतिम सामन्यात पोहोचून तो हस्तगत करणे, ही गोष्ट एकूणच सर्व अपेक्षांपलीकडील होती. आधीच्या दोन सामन्यांत भारताला पात्रतेच्या मर्यादाही ओलांडता आल्या नव्हत्या. पण तरीही अंतिम सामन्यात भारत पोहोचू शकला, याला कारण कपिलदेवने त्याच्या आयुष्यात गाजवलेला खेळाचा तो पहिलाच डाव असावा! त्यानंतर भारतीय संघाची गाठ एका वरिष्ठ इंग्लिश संघाशी होती; पण तिथेही नशिबाने त्याला हात दिला आणि त्याचे कारण होते मैदानावरील विकेटची देखरेख करणारे पर्यवेक्षक. त्यांनी तयार केलेल्या संथ, नरम विकेटवरील मोहिंदर अमरनाथ आणि कीर्ती आझाद यांच्या खेळाने त्यांना अनपेक्षितपणे ‘बोलिंग हीरोज’ या उच्चपदावर नेऊन बसवले! 

आणि अशा प्रकारे सर्व प्रतिकूल परिस्थितीतून भारत 1983 ‘वर्ल्ड कप’च्या अंतिम फेरीत जाऊन पोहोचला. एकदा तिथे पोहोचल्यावर मग आधीच्या वर्ल्ड कप सामन्यांमध्ये ‘चॅम्पियन’ ठरलेल्या वेस्ट इंडीजशी त्यांची गाठ होती. भारतीय संघाचा घास वेस्ट इंडीज सहजपणे घेणार, असेच सर्वांना वाटत होते. भारताने प्रथम बॅटिंग घेतली; पण मार्शल, होल्डिंग आणि कंपनीने फक्त 183 धावांमध्ये भारतीय खेळाडूंना पॅव्हेलियनमध्ये परतवले. 

आता भारताची एकमेव आशा वेस्ट इंडीच्या बॅटिंगच्या फळीमध्ये शक्य तितक्या लवकर भगदाड पाडण्यावर केंद्रित होती. भारताच्या बोलिंगवर पहिली विकेट पडली ती गॉर्डन ग्रीनिजची. ग्रीनिज एकदिवसीय क्रिकेटचा ‘दादा’ समजला जात असे. लॉडर्‌स मैदानावर त्या दुपारी ग्रीनिज बॅटिंगसाठी उतरला, तेव्हा सर्व सामना आपल्याच बॅटवर तोलून नेता येणार, अशी त्याची अपेक्षा होती. कारण भारतीय संघाच्या धावा मर्यादितच होत्या आणि पिच एकदम सपाट म्हणजे वेस्ट इंडीजच्या खेळाडूंना अनुकूल होते. भारतीय संघात कपिलदेव हा एकच कसलेला बोलर होता. त्याच्याबरोबर चार मध्यम प्रतीचे बोलर्स होते. 

या सर्व परिवारात बलविंदरसिंग संधू हा सर्वांत निरुपद्रवी बोलर. सावकाशपणे पावले टाकीत तो पुढे आला आणि सत्तर मैलांपेक्षाही कमी वेगाने तो बोलिंग करू लागला, पण त्याचा बॉल वळत होता- दोनही बाजूंना. म्हणूनच जोडीला कपिलदेव असल्यामुळे त्याने नवा बॉल वापरला होता. संधूच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये एक बॉल ग्रीनिजने तसाच सोडून दिला, पण त्याला त्या दूर जाताना दिसणाऱ्या बॉलने चकवले आणि त्या बॉलने वळून ऑफ स्टंपवर झेप घेतली.   

ग्रीनिज बाद झाल्यानंतरही कदाचित वेस्ट इंडीज संघ जिंकू शकला असता. आधीच्या वर्ल्ड कप अंतिम सामन्यांत लॉईड आणि रिचर्डस यांनी शतके झळकविली होती. शिवाय त्यांच्याकडे इतरही नावाजलेले बॅट्‌समन होतेच. ग्रीनिजने त्या ‘इन्स्विंगर’ला अडवले असते, तर त्यांनी सामना नक्कीच जिंकला असता. 

भारतात सर्वाधिक लोकप्रिय खेळ असे 1983 मध्ये क्रिकेटचे आजच्यासारखे चित्र नव्हते. शिवाय, भारताने 1975 मध्ये हॉकी वर्ल्ड कप जिंकला होता आणि 1980 च्या ऑलिंपिकमध्ये हॉकीचे सुवर्णपदकही जिंकलं होते. रामनाथन कृष्णन्‌ व जयदीप मुखर्जी यांनी 1966 मध्ये आणि 1974 मध्ये अमृतराज बंधू व जसजीतसिंग यांनी भारताला डेव्हिस कपाच्या अंतिम सामन्यापर्यंत नेले होते. विल्सन जोन्स आणि मायकेल फरेरा हे आपले बिलियर्डस चॅम्पियन होते. 

माझ्या पिढीतील भारतीय क्रीडाप्रेमींना बेदी, चंद्रशेखर, गावसकर व विश्वनाथ यांच्याइतकेच फुटबॉल खेळाडू अजित पाल आणि सुरजीत यांचे कौतुक होते. सन 1983 मधील वर्ल्ड कप विजयाने हे सर्व संपुष्टात आले. आता क्रिकेटला क्रीडाक्षेत्राचा सम्राट समजले जाऊ लागले. भारतात सॅटेलाईट टेलिव्हिजनचा नुकताच प्रवेश झाला होता. पूर्वी जिथे क्रिकेटचा सामना खेळला जात होता, तेवढ्याच शहरापुरते त्याचे प्रक्षेपण दूरदर्शनवर होत होते; पण आता लंडन, बार्बाडोस येथे सिडनी आणि शारजा येथेही भारतीयांनी खेळलेला क्रिकेट सामना घरी बसून पाहता येऊ लागला. हे पाहणाऱ्या प्रेक्षकांइतकीच उत्सुकता जाहिरातदार दाखवू लागले. कारण भारतीय खेळाडूंनी आता ‘वर्ल्ड चँपियन्स’चा सन्मान मिळवला होता. 

लॉर्ड्‌स मैदानावर बॅटिंग करताना बॉलसंबंधीचा एक अंदाज चुकला, याचाच दूरगामी परिणाम भारतात क्रिकेट हा अतिमहत्त्वाचा खेळ ठरण्यात झाला. त्याचप्रमाणे भारत हे जागतिक क्रिकेटचे आर्थिक आणि व्यवस्थापकीय केंद्र बनण्यासाठी आणखी एका निर्णयातील कसूर कारणीभूत ठरली. सन 2007 च्या सप्टेंबर महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने (आय.सी.सी.) दक्षिण आफ्रिकेमध्ये टी- 20 वर्ल्ड कपचे सामने भरवले. या सामन्यांवर सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यांच्यासारख्या खेळाडूंनी बहिष्कार टाकला; कारण खेळाचे हे अनिर्णित उपप्रदर्शन आहे, असे त्यांचे मत होते. मग महेंद्रसिंह धोनी या अननुभवी विकेटकीपर-बॅट्‌समनच्या नेतृत्वाखाली तशीच एक फारसा अनुभव नसलेली खेळाडूंची टीम पाठवण्यात आली. 

याच वर्षीच्या सुरुवातीला झालेल्या वर्ल्ड कपच्या सुरुवातीच्या फेऱ्यांत भारताला चांगलाच फटका बसला होता. भराभर बाद होऊन परतणारे खेळाडू पाहून देशभरचे प्रेक्षक प्रक्षुब्ध झाले होते. खेळाडूंच्या प्रतिकृती जाळण्यात आल्या आणि त्यांच्या प्रेतयात्राही काढण्यात आल्या होत्या. या अपमानित क्रिकेटपटूंच्या घरांबाहेर पोलीस पहारे बसविण्यात आले होते. 

पण सहा महिन्यांनंतर दक्षिण आफ्रिकेतील टी-20 चॅम्पियनशिप मिळवून भारतीय संघाने आपली प्रतिष्ठा पुन्हा मिळवली. या स्पर्धेतील शेवटचा सामना पाकिस्तान या ‘शत्रू’संघाबरोबर (शेवटच्या ओव्हरमध्ये मात करून) जिंकण्यात आला. हरियाणाच्या जोगिंदर शर्माने शेवटचा बॉल टाकला होता. त्याचे पदलालित्य आणि चेंडूची फेक संधूने टाकलेल्या बॉलपेक्षाही अधिक निरुपद्रवी आणि अहिंसक होती. 

शर्मासमोर पाकिस्तानचा मिसबा-उल-हक उभा होता. तो जरी गॉर्डन ग्रीनिजएवढा प्रख्यात नसला, तरी चांगल्यापैकी बॅट्‌समन होता. त्याचा विशेष म्हणजे, त्याचे खेळाचे सुनियोजित तंत्र आणि त्याचा उमदा स्वभाव. दहांपैकी नऊ वेळा त्याने त्याचा संघ यशाच्या मार्गावर नेला असावा. दहाव्या वेळी त्याने शर्माचा चेंडू हवेत गोलाकार टोलवला, पण त्याची फटक्याची वेळ चुकली आणि फाइन लेगला उभ्या राहिलेल्या श्रीसंतच्या हातात तो बॉल अलगद विसावला. त्याचा अंदाज चुकण्याचे कारण कदाचित शर्माचा बॉल अपेक्षेपेक्षा अधिक संथपणे त्याच्या बॅटच्या दिशेने आला असावा. 

त्या पहिल्या वर्ल्ड टी-20 कप सामन्यातील अनपेक्षित यशामुळे इंडियन प्रिमियर लीग (आय.पी.एल.)च्या उद्‌घाटनाच्या निमित्ताने पुढील काही महिन्यांत आयोजित केलेल्या सामन्यांत भारताचा हुरूप बराचसा वाढला होता. त्या सामन्यांच्या सुरुवातीच्या काळात आय.पी.एल. स्थापनेचा उद्देश सुभाषचंद्र आणि त्यांचे ‘इंडियन क्रिकेट लीग’ (आय.सी.एल.) यांना व्यवसायक्षेत्राबाहेर घालविण्याचा होता. कसोटी सामन्यांना सरावलेले आणि पन्नास-पन्नास षटकांचे सामने पाहण्यास चटावलेले प्रेक्षक क्रिकेटच्या या नव्या प्रकारच्या सामन्यांचे स्वागत कसे करतील, याचा अंदाज नसल्यामुळे एका बाजूने मागील अपयशाचा वचपा आणि दुसरीकडे दैवावर भरवसा अशा  भूमिकांत आय.पी.एल. जन्माला घातली गेली. अर्थात, आता हे सिद्धच झाले की, त्यांचे वर्ल्ड चॅम्पियन्स पाहण्यासाठी या सामन्यांना प्रेक्षकांची अलोट गर्दी झाली. 

सन 1982 मध्ये प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात स्किल्ड बेरी यांनी असे भाकीत केले होते की- ‘भारतात क्रिकेट हा जगातील कोणत्याही देशापेक्षा लवकरच एक अत्यंत लोकप्रिय खेळ बनेल. हजारो मैल दूर असलेल्या प्रदेशात याचा शोध लागला असला, तरी भारतामध्येच त्याचे केंद्रस्थान असेल, अशी नियती आहे.’ 

बेरी आपले अंदाज व्यक्त करण्यासाठी भारताची लोकसंख्या आणि तेथील क्रिकेटप्रेमी जनतेचे अतिरेकी प्रेम यांचा आधार घेतो; पण त्याचा पुढचा प्रश्न- ‘1983 च्या वर्ल्ड कप सामन्यात भारत सुरुवातीलाच हरला असता तर?’ असा आहे. तरीसुद्धा सॅटेलाईट टेलिव्हिजनवर त्या मंडळींना दाखविण्यात येणारे क्रिकेटचे सामने पाहून भारतीयांना क्रिकेट हाच खेळ सर्वश्रेष्ठ वाटला असता काय? त्यांना वर्ल्ड कप आणि ऑलिम्पिकचे सुवर्णपदक जिंकून देणारा हॉकीचा खेळ क्रिकेटच्या खेळाइतकाच- किंबहुना, त्याहूनही जवळचा किंवा महत्त्वाचा खात्रीने वाटला असता! 

किंवा मिसबाने मारलेल्या फटक्यामुळे तो चेंडू हवेत उंच न उडता तसाच जमिनीवर वेगात सरपटत जाऊन चौकार किंवा उंचावर लांब जाऊन षटकार ठरला असता... तर? धोनीच्या संघाला पाकिस्तानने लोळवले, अशी अवहेलना पदरात घ्यावी लागली असती. म्हणजेच इंडियन प्रिमियर लीगच्या सुरुवातीला भारत जगज्जेत्ता ठरला नसता, तर मग त्या संघाभोवतीची चाहत्यांची आणि जाहिरातदारांची अलोट गर्दी कमी झाली असती. त्यामुळे आर्थिक पाया थोडा कमकुवत राहिल्यामुळे आजच्यासारखी इतर देशांतील क्रिकेट संघावर बी.सी.सी.आय.ची चाललेली दादागिरी आणि दाखविण्यात येणारी प्रलोभने यांना थोडा तरी आळा बसला असता. 

कोणत्याही घटनेमागील इतिहासाप्रमाणेच क्रिकेटच्या इतिहासामध्येही संधी आणि निकड यांचे स्थान विशेष महत्त्वाचे आहे. ग्रीनिज आणि मिसबा यांनी अनुक्रमे 1983 व 2007 या वर्षांत ज्या चुका केल्या, त्या टळल्या असत्या; तर आज एन. श्रीनिवासन हे गृहस्थ क्रिकेटविश्वाचे सर्वेसर्वा न दिसता फक्त ‘इंडिया सिमेंट’च्या संचालकपदावरच बसलेले दिसले असते! 

(अनुवाद : कुमुद करकरे)

Tags: आयपीएल क्रिकेट महेंद्र सिंग धोनी कपिलदेव आयसीसी बीसीसीआय राहुल भाटीया एन. श्रीनिवासन कॅरव्हान कालपरवा रामचंद्र गुहा IPL Cricket Mahendr Singh Dhoni Kapildev ICC BCCI Rahul Bhatia N.Shrinivasan Carvan Kalparwa Ramchandr Guha weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

रामचंद्र गुहा,  बंगळुरू, कर्नाटक

भारतीय इतिहासकार व लेखक. समकालीन सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक विषयांवर तसेच पर्यावरणावर आणि क्रिकेटच्या इतिहासावर लेखन. 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके