डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

‘इंडियन होमरूल’ ह्या इंग्रजी ग्रंथाचे स्वतंत्रपणे भाषांतर करावे, असे मी मनात घेतले. इंग्रजी पुस्तक 20 मार्च 1910 रोजी प्रसिद्ध झाले. ह्या वर्षी त्याच दिवशी हा अनुवाद प्रसिद्ध व्हावा अशी इच्छा होती. परंतु पहिला खर्डा केल्यावर लक्षात आले की त्यातील अनेक सूक्ष्म छटा ह्या तज्ज्ञांकडून तपासून घेणे आवश्यक आहे. त्यानुसार हा खर्डा पुढील महिन्याभरात पक्का होऊन प्रसिद्ध होईल. परंतु त्यापूर्वी ह्या प्रयत्नाची नोंद व्हावी म्हणून हा उपद्‌व्याप.

गेले काही महिने किंवा वर्षभर म्हणता येईल, गांधींच्या ‘हिंद स्वराज’च्या लेखनप्रकाशनाच्या शतसंवत्सरीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी चर्चासत्रे झडताहेत. ह्या पुस्तकातील गांधीविचारांचा वेध निरनिराळ्या पिढ्यांतील विचारवंत घेत आहेत. त्या मानाने सर्वसाधारण जनतेने त्याकडे फारसे लक्ष दिलेले दिसत नाही. एक कारण हेही आहे की, शंभर वर्षांपूर्वी लिहिलेल्या ह्या लेखनाचे संदर्भ नीट समजावून घेतले नाहीत तर ह्या लेखनाचे गांभीर्य, त्यातील मूलभूत विचार याकडे दुर्लक्ष होऊन काही फालतू उदाहरणांवर विचारधारा दुभंगण्याची शक्यता आहे. हे सारे संदर्भ एका लेखाच्या द्वारे लक्षात आणून देणे शक्य नाही.

गांधी 1893 ते 1914 असा प्रदीर्घ काळ दक्षिण आफ्रिकेत होते. खरे तर ह्या काळातील गांधींकडेही सर्वसामान्यांनीच नव्हे, तर अभ्यासकांनीही द्यावे तितके लक्ष दिलेले नाही. वास्तविक सर्वधर्मसमभाव, सर्वोदय, सत्याग्रह हे सारे महत्त्वाचे विचार याच काळात आकार घेतहोते आणि ह्या पूर्वतयारीनिशी गांधी हिंदुस्थानात येऊन काम करू शकले. नामदार गोखले, गुरुदेव टागोर, स्वामी श्रद्धानंद ह्या तोडीच्या नेत्यांनी आफ्रिकेतील कामाचे मोठेपण ओळखले होते आणि यातील फक्त गोखले त्यांना प्रत्यक्ष भेटले होते.

ह्या वीस एकवीस वर्षांच्या काळात गांधी फक्त दोनदा हिंदुस्थानात आले आणि दोनदा ट्रान्सवालमधील हिंदी लोकांचे प्रतिनिधी म्हणून इंग्लंडला गेले. ह्या दोन लंडन भेटींत त्यांचा श्यामजी कृष्ण वर्मा आणि विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रभावाखालील इंडिया हाऊसमधील क्रांतिकारकांच्या गटाशी परिचय झाला. इंग्लंडमधील रहिवासी हिंदी तरुणच नव्हे, तर दक्षिण आफ्रिकेतील गांधींबरोबर गेलेले तरुणही हिंसात्मक मार्गाने स्वातंत्र्य किंवा स्वराज्य मिळवू पाहताहेत हे पाहून गांधी व्यथित झाले. लंडनला सर विल्यम कर्झन-वायली यांची मदनलाल धिंग्राने केलेली हत्या आणि त्याच काळात हिंदुस्थानात झालेले खून (जॅक्सन) आणि बाँबहल्ले, यांमुळे साधनशुचिता मानणारे गांधी उद्विग्न झाले. फक्त लिओ टॉलस्टॉय यांच्याशी झालेल्या छोट्याशा पत्रव्यवहारातून त्यांना दिलासा मिळाला.

ह्या मनस्थितीत इंग्लंडहून दक्षिण आफ्रिकेला परतताना बोटीवर आठ दिवसांत गांधींनी ‘हिंद स्वराज’ हे पुस्तक गुजरातीत लिहिले. प्रामुख्याने ‘हिंसात्मक विचारसरणीला उद्देशून लिहिलेले पुस्तक’ असे त्यांनी याचे वर्णन केलेले असले, तरी त्यात ‘स्वराज्य म्हणजे काय’ आणि ‘सिव्हिलायझेशन म्हणजे काय’ ह्या दोन मूलभूत प्रश्नांना हात घातला आहे.

लंडनला त्यांची सावरकर, व्ही.व्ही.एस. अय्यर इत्यादी क्रांतिकारकांशी झालेली भेट त्यांच्या मनात ताजी होती. त्याच इंग्लंड भेटीत, त्यांनी आपले ज्येष्ठ स्नेही प्राणजीवन मेहता यांच्याशी अनेक मुद्यांवर चर्चा केली. प्राणजीवनजी हे गांधींच्या लंडनमधील विद्यार्थिदशेपासूनच त्यांचे हितचिंतक, पण काही काळ तेही श्यामजींच्या प्रभावाखाली गेले होते. गांधींनी त्यांच्याशीप्रदीर्घ चर्चा करून त्यांना आपल्या अहिंसक विचारसरणीकडे वळवून घेतले होते. इंडियाहाऊसमधील वाद आणि प्राणजीवनजींशी झालेली चर्चा त्यांनी संवादरूपाने लिहून काढली.

हा संवाद ‘वाचक’ आणि ‘संपादक’ ह्या दोन पात्रांमधील आहे. यांपैकी ‘संपादक’ म्हणजे निर्विवादपणे गांधी स्वत:. ‘वाचक’ हा मात्र अंशत: श्यामजी, बराचसा सावरकर आणि काही अंशी प्राणजीवनजी ह्या तीन व्यक्तींवर बेतलेला आहे. ‘वाचक’ अधूनमधून ‘संपादकां’चे म्हणणे मान्य करतो. सावरकरांनी गांधींचे काहीच मनापासून स्वीकारले नाही.

तरी ‘हिंद स्वराज’ची रचना करताना लेखकाने सावरकरांचे मुद्दे अत्यंत चोखपणे मांडले आहेत.

उत्तर देताना संपादक गांधींच्या नंतरच्या मृदू स्वभावाचा अनुभव न देता, अत्यंत रोखठोकपणे आणि काहीशा कठोरपणे बोलत असताना दिसतात. याचे एक कारण त्या लेखकाच्या मनातील तीव्र निषेधाची भावना.

वास्तविक ह्या पुस्तकात, गांधी हिंसक मार्गाचा विरोध करतात. इंग्रज लोकांबद्दल आपुलकी दाखवतात. परंतु ज्याला ते आधुनिक जीवनपद्धती किंवा इंग्रजीत ‘सिव्हिलायझेशन’ आणि गुजरातीत ‘सुधारो’ म्हणतात, त्याबद्दल तीव्र निषेध व्यक्त करतात. हे लेखन नोव्हेंबर 1909 मध्ये लिहिले गेले आणि डिसेंबरच्या ‘इंडियन ओपिनियन’च्या दोन अंकांत प्रसिद्ध झाले. हे पुस्तक गुजरातीत असल्यामुळे प्रामुख्याने दक्षिण आफ्रिकेतील हिंदी समाज हाच डोळ्यांपुढे होता. हिंदुस्थानातील वाचकांपुढे पुस्तक जाण्यापूर्वीच त्याच्यावर मुंबई इलाख्याच्या शासनाने बंदी आणली. गमतीची गोष्ट अशी की, याच काळात लिहिल्या गेलेल्या सावरकरांच्या ‘1857 चे स्वातंत्र्यसमर’ ह्या पुस्तकावरही ते न वाचताच बंदी घालण्यात आली होती.

‘हिंद स्वराज’मधील विचार इंग्लंडमधील वाचक, गोखले आणि टॉलस्टॉय यांच्यासारखे गुरुस्थानी असलेले विचारवंत यांना वाचता यावेत म्हणून मित्र हरमान कॅलनबॅक याच्या सांगण्यावरून गांधींनी त्याचा इंग्रजी अनुवाद सांगितला आणि कॅलनबॅकनी तोलिहून घेतला. ‘इंडियन होमरूल’ ह्या इंग्रजी अनुवादाच्या प्रस्तावनेत ‘हा शब्दश: अनुवाद नव्हे’ असा गांधींनी उल्लेख केला असला तरी ते भाषांतरच आहे. गांधींनी स्वत:च्या गुजराती लेखनाचे केलेले एकमेव भाषांतर असे मानले जाते. तसे ते आहेही; आणि तरीही त्यात जो काही शब्दांचा भेद आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे.

हे महत्त्वाचे भेद सांगण्यासारखे आहेत. साध्य-साधन विवेकासंबंधी लिहिताना गांधींनी सशस्त्र साधने आणि प्रेमाची साधने यांच्यातील भेद स्पष्ट केला आहे. पशूपासून माणसाचे वेगळेपण ही उत्क्रांती किती महत्त्वाची आहे, हे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यात एका प्रकरणाचे गुजरातीत ‘दारू गोळे’ असे शीर्षक दिले आहे. इंग्रजीत ह्याला ‘ब्रूट फोर्स’ किंवा पाशवी शक्ती म्हटले आहे. सर्वांत महत्त्वाचा विषय म्हणजे ‘सुधारो’. गुजरातीतील ह्या शब्दाचा कोशातला अर्थ ‘सिव्हिलायझेशन’ असा सापडतो. परंतु आपल्या मनातील ह्या दोन शब्दांचे संदर्भ फार वेगळे आहेत.

‘हिंद स्वराज’चा आज उपलब्ध असलेला अनुवाद 1946 सालचा. त्यात ‘सुधारो’चा अनुवाद ‘सुधारणा’ असा सापडतो. काका कालेलकर यांनी सुचवलेला ‘सभ्यता’ हा शब्द अगदी अलीकडे प्रसिद्ध झालेल्या मराठी अनुवादात सापडतो. गांधींनी ‘इंडियन होमरूल’मध्ये ‘सिव्हिलायझेशन’ आणि ‘ब्रूट फोर्स’ हे शब्द वापरले. हा निव्वळ भाषांतराचा विपर्यास आहे असे मला वाटत नाही. ‘हिंद स्वराज’चे लेखन एका आवेगात झाले. ते प्रामुख्याने दक्षिण आफ्रिकेतील ‘इंडियन ओपिनियन’च्या गुजराती वाचकांसाठी. ‘इंडियन होमरूल’चा वाचकवर्ग वेगळा. हे लेखन करताना गांधी काहीसे शांत झालेले असणार आणि कॅलनबॅक यांच्याशी झालेल्या चर्चेचाही थोडाफार परिणाम असण्याची शक्यता आहे.

हे सारे लक्षात घेऊन ‘इंडियन होम रूल’ ह्या इंग्रजी ग्रंथाचे स्वतंत्रपणे भाषांतर करावे, असे मी मनात घेतले. इंग्रजी पुस्तक 20 मार्च1910 रोजी प्रसिद्ध झाले. ह्या वर्षी त्याच दिवशी हा अनुवाद प्रसिद्ध व्हावा अशी इच्छा होती. परंतु पहिला खर्डा केल्यावर लक्षात आले की त्यातील अनेक सूक्ष्म छटा ह्या तज्ज्ञांकडून तपासून घेणे आवश्यक आहे. त्यानुसार हा खर्डा पुढील महिन्याभरात पक्का होऊन प्रसिद्ध होईल. परंतु त्यापूर्वी ह्या प्रयत्नाची नोंद व्हावी म्हणून हा उपद्‌व्याप.

Tags: हिंद स्वराज रामदास भटकळ इंडियन होम रूल महात्मा गांधी mahatma gandhi ramdas bhatkal indian home rule weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

रामदास भटकळ

पॉप्युलर प्रकाशन या पुस्तक प्रकाशन संस्थेचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके