डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

2002-03 मध्ये रामदास भटकळ यांनी ‘मोहनमाया’ या शीर्षकाची लेखमाला ‘साधना’तून लिहिली. ती लेखमाला नंतर मौज प्रकाशनाकडून पुस्तकरूपाने आली... आता रामदास भटकळ ‘मोहनशोध’ या लेखमालेत, 1915 मध्ये भारतात परतल्यानंतरचे गांधी व त्यांचा मित्रपरिवार याविषयी लिहिणार आहेत. ही लेखमाला साधनातून महिन्यातून दोनदा (एका आड एक अंकात) प्रसिद्ध होईल. – संपादक

‘गांधींसारखा माणूस प्रत्यक्ष हाडा-मांसात ह्या पृथ्वीतलावर होऊन गेला, यावर शंभर वर्षांनी कोणाचा विश्वास बसणार नाही’ असे उद्‌गार आल्बर्ट आइन्स्टाईन ह्या शास्त्रज्ञाने गांधी जिवंत असतानाच काढले होते. तशी वेळ ह्या साठ-सत्तर वर्षांतच आलेली आहे. तरी ज्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक कालखंडाबद्दल चक्षुर्वैसत्यम्‌ तपशील उपलब्ध आहे, अशांपैकी गांधी हे एकमेव. तरीसुद्धा त्यांनी स्वत:ची अशी विचारपद्धती कशी घडवली याचा पुरता थांग लागत नाही.

शालेय जीवनात फक्त परीक्षांतील यशापयशाचा विचार केला, तर मोहनदास हा एक सर्वसामान्य विद्यार्थी होता, असे त्यांनी स्वत: आपल्या आत्मकथेत लिहिले आहे. याची अनेकांनी री ओढली आणि त्यांच्या विरोधकांनी तर त्यांना सामान्य बुद्धीचा विशेषत: इतिहासाचा गंध नसलेला ठरवलं. राघवन अय्यरसारख्या अभ्यासकांनी मात्र गांधींनी अभ्यास केलेल्या ग्रंथांचा छडा लावून त्याकडे लक्ष वेधले आहे. दक्षिण आफ्रिकेतही गांधींना तुरुंगात वारंवार जावं लागलं. प्रत्येक वेळी ते तुरुंगातून बाहेर पडताना अधिक प्रगल्भ झालेले असायचे, असे त्यांचे चरित्रकार डी.जी.तेंडुलकर यांनी लिहिलं आहे. फेब्रुवारी ते मे 1909 या काळात गांधी प्रिटोरिया तुरुंगात होते; तेव्हा त्यांनी इंग्रजी, हिंदी, गुजराती, संस्कृत आणि तमिळ भाषांतील तीस पुस्तकांचा अभ्यास केला.

गांधींच्या जडण-घडणीत वाचनाचा जसा भाग होता, त्यांहून प्रत्यक्ष घटनांचा. त्यांनी राजकारण जाणीवपूर्वक स्वीकारले नव्हते. राजकारणात सत्तेचा विचार केंद्रीभूत असतो. त्यांनी सत्ताकारण कधी केलं नाही. कर्तव्यभावनेने ते जसजसे सार्वजनिक कामात ओढले गेले तसतसे ते (धनंजय कीर म्हणतात तसे) ‘राजकारणी संत’ बनत गेले. समाजरचना आणि शासनव्यवस्था यासंबंधी त्यांचे विचार घडत गेले.

बायबल, गीता, कुराण यांसारखे धर्मग्रंथ आणि प्लेटो, जॉन रस्किन, राजचंद्र, मेटलंड, टॉलस्टॉय, थोरो यांसारख्यांच्या लेखनाचा परिणाम यावर बराच विचार झाला आहे आणि होत राहील. प्रत्येक इतिहासकार ऐतिहासिक घटनांच्या संदर्भात गांधींच्या आचाराचा अर्थ लावत राहील. ज्या गोष्टीचा वेध घेणं कठीण; ती म्हणजे गांधी आणि त्यांच्या सभोवतालची माणसं यांनी एकमेकांवर केलेले परिणाम समजून घेणे. इतर कोणत्याही संस्कारांपेक्षा माणसांनी माणसांवर केलेले परिणाम हे अधिक महत्त्वाचे असतात.

मोहनदास करमचंद बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला गेले, तेव्हा जेमतेम एकोणीस वर्षांचे होते. विशीच्या आसपासच्या ऐन तारुण्यात त्यांनी ‘जीवाचे लंडन केलं’ म्हणायला हरकत नाही. विलायतेत मजा करणं याचा आजकालचा अर्थ लक्षात घेतला, तर हा तरुण त्या दिवसांत लंडनला जे करत होता त्याचं आश्चर्य वाटत होतं. आपल्या हिंदी पद्धतीप्रमाणे त्यांच्याबरोबर ओळखपत्रे होती, ती लंडनमधील चार गुजराती माणसांसाठी- त्यात दादाभाई नौरोजींसारखे ज्येष्ठ नेते होते, त्याचप्रमाणे कुमारावस्थेतील महाराजा रणजितसिंग होते. गांधींनी प्राणजीवन मेहता यांच्या ओळखपत्राचा विशेष उपयोग केला. ते डॉक्टर, वकील, व्यापारी- गांधींच्या पुढील आयुष्यात महत्त्वाची कामगिरी करणार होते. परंतु प्रामुख्याने गांधी शाकाहारी मंडळींच्या शोधात तिथल्या इंग्रज विचारवंतांत मिसळले. सुरुवात जरी आईला दिलेल्या वचनातून झाली तरी पुढे शाकाहाराचे शास्त्र, त्याचा माणसाच्या मनाशी संबंध आणि इतर अनेक पैलू यांचा विचार करत त्यांनी शाकाहाराला आपल्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान दिले.

धर्मविचाराची फक्त सुरुवात इंग्लंडमध्ये झाली होती; त्याला कवी राजचंद्र यांच्या भेटीमुळे खतपाणी मिळालं. व्यवसायदृष्ट्या आणि कौटुंबिक पातळीवर फारसे न जुळल्यामुळे बॅरिस्टर गांधी संधी मिळताच देशाबाहेर गेले. दक्षिण आफ्रिकेला जाताना ते जेमतेम चोवीस वर्षांचे होते. त्यांचे बहिरंग बॅरिस्टरला शोभेल असेच होते. संसारसुखाचा अनुभव घेतलेल्या दोन मुलांच्या या बापाने दक्षिण आफ्रिकेत ध्यास घेतला तो धर्माचा अर्थ समजून घेण्याचा. मुसलमान व्यापारी, ख्रिश्चन धर्मप्रसारक, काही पारशी मित्र, थिऑसॉफीसारख्या नव्या पंथांमुळे जवळ आलेले युरोपियन मित्र यांच्याशी झालेल्या संगतीचा वेध घेण्याचा थोडाफार प्रयत्न ‘मोहनमाया : गांधी आणि त्यांचा मित्रपरिवार’ या माझ्या लेखमालेत/पुस्तकात झाला आहे.

या सर्वांमागे मुख्य म्हणजे गांधींची विशिष्ट विचारपद्धती होती. ती समजून घेणे सोपे नाही. असे पाहू या की- हा तरुण परक्या देशात जातो. आपल्या हिंदी लोकांची सवय अशी की कोणत्याही परक्या ठिकाणी गेलो की जात, भाषा, मूळ गाव यांची कास धरून माणसे गोळा करायची, ज्या गावी जायचे, द. आफ्रिका सोडून 1915 मध्ये भारतात परतलेले गांधी व कस्तुरबा  त्या गावातल्या लोकांबरोबर जमवून घेण्यात पिढ्या जाव्या लागतात. माणसे गोळा करण्यास कुटुंबाची मदत लागते. पहिली अडीच-तीन वर्षे गांधी दक्षिण आफ्रिकेत एकटेच होते. नाताळ इंडियन काँग्रेसची स्थापना करताना त्यांनी आपल्याभोवती माणसं गोळा केली. त्यांत मुसलमान आणि पारशी व्यापारी आणि ख्रिश्चन पांढरपेशे होते. हिंदू मुळात नाताळमध्ये कमी. बरेचसे कंत्राटी कामगार म्हणून गेलेले. त्यांपैकी काही मुदत पूर्ण झाल्यावर जमीन घेऊन स्थायिक झालेले.

सुरुवातीपासून निरनिराळ्या धर्मांच्या लोकांना सोबत घेऊनच गांधींनी आपल्या सार्वजनिक जीवनाला सुरुवात केली. ते बॅरिस्टर असल्यामुळे युरोपियन लोकांशी संपर्क होताच, पण त्यांना सोबत घेणे सोपे नव्हते. किंबहुना, कुटुंबाला घेऊन गांधी 1896 मध्ये दरबानला आले, तेव्हा जीवघेण्या प्रसंगाला तोंड द्यावे लागले होते. हळूहळू एस्कंब, अलेक्झांडर यांसारखे पदाधिकारी असोत किंवा डे.बूथ, रिंचसारखे उदारमतवादी असोत, ही माणसंही गांधींच्या जवळ आली. बालसुंदरम हा कंत्राटी कामगार त्यांच्याकडे आला आणि ज्या पद्धतीने त्यांनी तो प्रश्न सोडवला, त्यामुळे कंत्राटी कामगारही गांधींना मानू लागले. जे काही करायचं, ते साऱ्यांना बरोबर घेऊन- त्यात तथाकथित शत्रूही आले, ही भूमिका गांधी घेऊ लागले. सर्वधर्म समभाव, सर्वोदय, सत्याग्रह ह्या कल्पनांचा यांतूनच उगम झाला.

कुटुंबीयांनी दिलेल्या पैशातून गांधी बॅरिस्टर झाले होते. ते कर्ज फेडण्यासाठी त्यांनी दक्षिण आफ्रिकेत जायची संधी घेतली होती. म्हणता-म्हणता ते अत्यंत यशस्वी वकील झाले होते. स्वत: मिळवलेले वैभव सोडून देण्याला वरवर पाहता काही कारण नव्हते. रस्किन, टॉलस्टॉय, थोरो यांच्या विचारसरणीचा परिणाम असेल किंवा त्यांच्या भोवतालच्या मनसुखलाल नाझर, आल्बर्ट, वेस्ट, मोन्जाश्चेसिन सारख्यांची निर्लोभी वृत्ती असेल; गांधी आमूलाग्र बदलले आणि त्यांनी अपरिग्रहाला ब्रह्मचर्याची जोड देऊन गरिबीचा स्वीकार स्वेच्छेने केला. त्याचबरोबर शारीरिक श्रमाने पोट भरण्याचा. धर्मविषयक श्रद्धेने अशा प्रकारचे काम करणारे लोक त्यांनी पाहिले होते; परंतु विशिष्ट धर्माच्या श्रद्धेने काम करणाऱ्यांना उपलब्ध प्रेरणा आणि आधार नसूनही गांधींनी स्वत:ला असे घडवले.

गांधींच्या सर्वधर्म समभावाबद्दल अनेकांनी लिहिले आहे. प्रत्येक धर्मात काही त्रुटी असतात; त्या दूर करण्यासाठी नवा धर्म किंवा पंथ यांच्याशी गांधींचा संबंध आला होता. त्यांनी विचारमंथनातून, रामचंदभार्इंच्या प्रेरणेतून आणि त्यांच्या स्वत:च्या मूळ वृत्तीमुळे नैतिकतेवर आधारित सर्वधर्म समभाव ही भूमिका स्वीकारली. त्यांच्या मूळ वृत्तीचा उल्लेख केला, कारण आतापर्यंत त्यांच्याविषयी वापरल्या न गेलेल्या काही याच प्रकारच्या भूमिकांची मला जाणीव झाली. मातृभाषेचं मूलभूत महत्त्व आणि प्रत्येक मुलाला मातृभाषेतून शिक्षण घेण्याचा अधिकार त्यांनी मानला; त्यानुसार त्यांच्या ‘फिनिक्स’ वसाहतीवर व्यवस्था केली आणि त्या पायावर सर्व भाषा समभाव ही भूमिका प्रसृत केली. रशियन बोंडारिएम आणि टॉलस्टॉय यांच्याकडून ‘ब्रेडलेबर’ किंवा शारीरिक श्रमावर आधारलेली उपजीविका स्वीकारल्यावर आणि जॉन रस्किन यांच्या ‘अन टू धिस-लास्ट’च्या वाचनानंतर सर्वोदयाची कल्पना फिनिक्स येथील सहजीवनात प्रत्यक्षात आणल्यावर सर्व व्यवसाय समभाव, हे तत्त्व आपोआप प्रस्थापित झाले. ही अनोखी विचारपद्धती निर्भयपणे प्रत्यक्षात आणण्यात त्यांच्या भोवतालच्या अनेकांचा सहभाग आहे.

आजवर अनेक संशोधक-लेखकांनी उपलब्ध करून दिलेल्या माहितीच्या आधारावर दहा वर्षांपूर्वी ह्या दिशेने मी थोडाफार विचार केला. गांधी एव्हाना भाई आणि बापू म्हणून ओळखले जाऊ लागले होते- ते 1915 च्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेतले आपले काम संपवून हिंदुस्थानात परत आले. तोपर्यंत त्यांचा ज्यांच्याशी विशेष संबंध आला, त्यांपैकी तीस जणांविषयी मी ‘मोहनमाया’मध्ये लिहिले. त्यात त्यांची सहधर्मचारिणी कस्तुरबा आणि चार मुलगे यांचा जाणीवपूर्वक समावेश केला नव्हता. त्या विषयाचा स्वतंत्र विचार आता करावा लागेल. गांधींच्या चळवळीत दक्षिण आफ्रिकेतील जवळजवळ सर्वच हिंदी लोक सामील होते. क्वचित काही विरोधी होते. तरीही मनापासून सामील झालेल्यांची संख्याही बरीच मोठी आहे. त्यांपैकी वलिअम्मा, नागप्पन, नारायण स्वामी अशा काहींचा नामोल्लेख सापडतो; परंतु त्याबद्दल अधिक तपशील मिळाले नाहीत.

अहमद महमद काचलिया आणि थंबी नायडू यांचा सहभाग फार महत्त्वाचा आहे. त्यांच्याबद्दलची काही माहिती आता उपलब्ध झाली आहे. गांधी आणि त्यांच्या दक्षिण आफ्रिकेतील मित्र परिवारासंबंधी लिहूनच दक्षिण आफ्रिका सोडल्यानंतर गांधींच्या जीवनात महत्त्वाची संगत करणाऱ्या मित्र परिवाराबद्दल लिहावे लागेल.

Tags: आफ्रिका मोहनशोध महात्मा गांधी रामदास भटकळ मोहनमाया धनंजय कीर डी.जी. तेंडुलकर लेखमाला धर्मप्रसार सर्वधर्म Dhananjay Kir D.G.Tendulkar Lekhmala Dhamprasar Sarvdharm Africa Mohanshodh Mahatma Gandhi Ramdas Bhatkal Mohanmaya weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

रामदास भटकळ

पॉप्युलर प्रकाशन या पुस्तक प्रकाशन संस्थेचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके