डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

'अष्टदर्शने' निघाले नसते तर?

विंदा करंदीकर यांनी 1981 साली 'विरुपिका' ह्या कवितासंग्रहात आपल्या वाचकांचा निरोप घेतला. त्यानंतर तब्बल 25 वर्षानंतर त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळतो आहे. म्हणजे 'अष्टदर्शने' हे पुस्तक अलीकडे निघाले नसते तर त्यांच्या कर्तृत्वाचा ह्या समितीला विसर पडला असता का? कदाचित पडलाही असता, पण त्यामुळे काहीही फरक पडला नसता. विंदांची कविता आपल्याला तशीच स्फुरण देत राहिली असती, आणि मराठी किंवा भारतीय साहित्याच्या चोखंदळ इतिहासात तिचे स्थान मानाचेच राहिले असते.

काही पुरस्कारांना विलक्षण महत्त्व प्राप्त होते. का ते, सांगता येत नाही, नोबेल पोरितोषिकाचे असेच आहे. नोबेल हा त्या विशिष्ट पाच-सहा विषयातील मानबिंदू मानला जातो. वास्तविक रवींद्रनाथ टागोरांना, सी. व्ही. रामन यांना किंवा नेल्सन मंडेला यांना हा पुरस्कार मिळाला नसता तर त्यांचे आपापल्या क्षेत्रातील श्रेष्ठत्व यत्किंचितही कमी झाले नसते. इतकेच नव्हे तर त्याची जाणीवही सर्व जाणत्या व्यक्तींना झाली असती. फारतर वर्तमानपत्रांतील रकाने त्यांच्या नावाने भरले नसते एवढेच.

महात्मा गांधींना नोबेल पारितोषिक मिळाले नाही म्हणून हळहळणारे अजूनही भेटतात तेव्हा आश्चर्य वाटते. ज्यांची योग्यता बुद्ध-निस्त पैगंबर यांच्या बरोबरीने ओळखली जाते, त्यांची हेन्री किसिंजरसारख्यांशी बरोबरी झालेली, मला तरी  चालली नसती. थोडक्यात 'पुरस्कार' हा एक व्यावहारिक मामला आहे आणि त्याला अधिक महत्व देणे योग्य नव्हे. 

पुरस्कारांचे काहीच महत्त्व नाही का? अर्थातच आहे. आणि ते म्हणजे देणाऱ्याच्या दृष्टीने. काही वेळा कृतज्ञतेचे ओझे फार जड होते आणि त्यावेळी वैयक्तिक पातळीवर लोटांगण घालणे आणि सार्वजनिक पातळीवर पुरस्कार देणे हा मार्ग असतो. केसरबाई केरकर यांची मैफल ऐकायची संधी मला चार-पाच वेळाच आली असेल. दरवेळी मैफल संपल्यावर प्रचंड मोह व्हायचा की त्यांच्यासमोर साष्टांग दंडवत घालावे. तसा धीर झाला नाही म्हणून अजून खंत वाटते. निरनिराळे पुरस्कार देण्यामागे ही एकच भावना असू शकते. या निमित्ताने त्या त्या क्षेत्रातील अनभिज्ञ लोकांना त्या व्यक्तीची महती पटते, हे दुसरे एक प्रयोजन. 

विंदा करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला तेव्हा असेच समाधान लाभले. वास्तविक त्यांच्या लेखनाची महत्ता मृद्गंध' प्रसिद्ध झाला तेव्हाच पटली होती. आता असे लिहिणे हे खोटेपणाचे वाटेल, पण एकावन्न वर्षांपूर्वी 'मृद्गंध' प्रसिद्ध करायची संधी मला म्हणजेच पॉप्युलर प्रकाशनाला मिळाली, तेव्हाच एका महान कलाकृतीशी आपला संबंध येतो आहे याची कल्पना मला आली होती. 'धृपद्', 'जातक' असे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध होत गेले तशी त्या आनंदानुभवात भर पडली. पण त्यांचे मोठेपण आधीच लक्षात आले होते. 'स्पर्शाची पालवी' आणि 'आकाशाचा अर्थ' हे लघुनिबंध संग्रह हातात आले, तेव्हा द्या वेगळ्या वाङ्मयप्रकारातही हा लेखक आपल्याला रोमांचित करू शकतो, 'दिल' देऊ शकतो याचा अभिमान वाटू लागला.

हा गडी एवढ्यावर थांबणार नव्हता. आपल्या मुलाला रिझवण्यासाठी, त्याच्यावर मानसिक उपचार करून त्याची अनामिक भीती घालवण्यासाठी म्हणा ना, त्यांनी बालकविता लिहायला सुरुवात केली आणि आपल्यासमोर 'अजबखाना' उभा केला. प्रतिभेने त्यांच्या बाबतीत काहीतरी वेगळीच करामत केली होती, हे प्रत्येक वाचकाच्या लक्षात येत होते. हा काही निव्वळ कसबाचा मामला नव्हता, यांत क्लप्त्या नव्हत्या. होते ते चटकन् डसणारे पण काहीतरी अस्सल होते. त्यांचे सौंदर्य लक्षात घ्यायला त्यांना किती पुरस्कार मिळाले, यांची मोजदाद करण्याची आवश्यकता नव्हती. गंमत म्हणून सांगण्यासारखी गोष्ट की राणीची बाग' ह्या सर्वांनाच प्रिय असणाऱ्या पुस्तकाला तांत्रिक कारणांसाठी राज्य पुरस्कार दिला गेला नव्हता. श्रेष्ठ अशा अनेक कलाकृतींच्या बाबतीत असे झाल्याचे दाखवून देता येईल. 

मग ज्ञानपीठ पुरस्काराला एवढे महत्त्व का? सुरुवातीला ह्या पुरस्काराची रकम मोठी वाटत होती म्हणून ह्या पुरस्काराला विशेष महत्त्व प्राप्त झाले. दुसरा विशेष म्हणजे. हा पुरस्कार ज्या विश्वस्त निधीच्यामार्फत दिला जातो, त्या निधीचा 'टाइम्स ऑफ इंडिया सारख्या वर्तमानपवराशी संबंध आहे. त्यामुळे द्या पुरस्कारांना अमाप प्रसिद्धी मिळाली. आयोजकांनी सुरुवातीपासून राष्ट्राध्यक्षांसारख्या व्यक्तींना पुरस्कार प्रदानासाठी बोलावले. त्यामुळेही ह्या पुरस्काराचा बोलबाला झाला आणि इतर प्रसिद्धीमाध्यमांनाही त्यांची दखल घ्यावी लागली. तरीही ह्या पुरस्काराचे खरे महत्त्व म्हणजे भारतातील सर्व भाषांतून एकाच पुरस्काराची होत असलेली निवड आणि त्यासाठी तयार केलेली बरीचशी निर्दोष अशी निवड पद्धती.

हा पुरस्कार पायला 1965 साली सुरुवात झाली तेव्हा साहजिकच भारतीय भाषांतून ज्यांना असा अत्युच्च पुरस्कार मिळायला हवा अशी पाच-पन्नास नावे डोळ्यांसमोर असणार. ह्या सर्वांना एकत्रित नमस्कार करून मग नव्या श्रेष्ठांचा शोध घेणे हा एक उपाय होता. अन्यथा निवडलेल्या लेखकाखेरीज इतर सर्वांवर अन्याय झाला असे मानावे लागले असते. निरनिराळ्या भाषांतील श्रेष्ठ कलाकृतींमधून एका कलाकाराची निवड करणे हे ज्ञानपीठ पुरस्काराचे वेगळेपण आणि तीच त्याची मर्यादा. महाश्वेतादेवी, फिराख गोरखपुरी, तकाझी शिवशंकर पिल्ले आणि पन्नालाल पटेल यांतून निवड कशी करायची? यांत आपले पु.ल. देशपांडे यांचा समावेश नाही म्हणून तक्रार कोणत्या आधारावर करायची?

हा सारा विषय निघतो आहे. कारण विंदा करंदीकर यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वच मराठी माणसांनी एकमताने आनंद व्यक्त केला आहे. खांडेकरांना पुरस्कार मिळाला तेव्हा त्यांच्याविषयीचे साहित्यिक कुतूहल कमी झाले होते. मराठी वाङ्मयात नवीन प्रवाह आले होते. कुसुमाग्रजांना पुरस्कार मिळाला तेव्हा आपल्या लाडक्या पु. लं. ना मिळायला हवा होता असे म्हणणारे जाणकार होते. परंतु करंदीकरांना पुरस्कार जाहीर झाला आणि प्राचीनांपासून नव्यांपर्यंत, भगव्यांपासून लाल-तांबड्यांपर्यंत, उजव्या-डाव्या सर्वांनीच स्वागत केले. तक्रार होती दोन गोष्टींसंबंधी, आतापर्यंत जवळजवळ चाळीस ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाले आणि त्यात फक्त तीनच मराठी लेखकांना? मग मराठी अस्मितेचे काय? आपण आपली मायमराठी भारतातीलच काय पण जगातील श्रेष्ठ भाषा मानतो.

मग हा जाणीवपूर्वक मराठीचा अवमान तर नाही ना? दुसरी तक्रार त्या अनुषंगिक, विंदा करंदीकर यांनी 1981 साली 'विरूपिका' ह्या कवितासंग्रहात आपल्या वाचकांचा निरोप घेतला. त्यानंतर तब्बल 25 वर्षांनंतर त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळतो आहे. म्हणजे 'अष्टदर्शने' हे पुस्तक अलीकडे निघाले नसते तर त्यांच्या कर्तृत्वाचा ह्या समितीला विसर पडला असता का?

कदाचित पडलाही असता, पण त्यामुळे काहीही फरक पडला नसता. विंदांची कविता आपल्याला तशीच स्फुरण देत राहिली असती, आणि मराठी किंवा भारतीय साहित्याच्या चोखंदळ इतिहासात तिचे स्थान मानाचेच राहिले असते. करंदीकर ऐन बहरात असतानाच त्यांना ज्ञानपीठ मिळायला हवे होते, असे म्हणणे म्हणजे 1982 साली महादेवी वर्मा यांना, 1983 साली मास्ती वेंकटेश अव्यंगार यांना, 1996 साली महाश्वेतादेवी यांना, इतकेच काय पण 1987 साली वि.वा.शिरवाडकर यांना डावलले जायला हवे होते, असे म्हणावे लागेल. आणि तेही हिंदी, बंगाली, कानडी या भाषांतील साहित्याशी प्रत्यक्ष परिचय नसताना!

सुरुवातीच्या काळातच उमाशंकर जोशी यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. त्यांना हा मुद्दा नीट उमगला असावा, त्यांनी एका प्रतिष्ठानाची स्थापना केली आणि इतर भाषांतील उत्तम कविता गुजराती भाषेत आणण्याची व्यवस्था केली. ग्रेससारख्या त्या काळात नव्याने स्वीकारल्या गेलेल्या मराठी कवीची कविता त्यांनी गुजरातीत उपलब्ध करून दिली. आपल्या साहित्यातील कृतींचा अभिमान बाळगायचा असेल तर इतर भाषांतील साहित्य समजून घेतले पाहिजे, त्यासाठी साने गुरुजी स्मारक, आंतरभारती व्या संस्थांनी अशा प्रकारचे काम तातडीने हातात घ्यायला हवे.

Tags: नोबेल पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार पु. ल. देशपांडे विंदा करंदीकर मराठी साहित्यिक साहित्यिक पुरस्कार Nobel Prize Gyanpeeth Award marathi Writers Vinda Karandikar Awards Literature weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

रामदास भटकळ

पॉप्युलर प्रकाशन या पुस्तक प्रकाशन संस्थेचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके