डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मराठी कथेच्या क्षेत्रात अरविंद गोखले यांनी एकनिष्ठपणे कथेची नवनवीन रूपे कशी वापरता येतील याचा शोध घेतला. पाडगावकरांनी त्याचप्रमाणे कविता, ऑपेरा, गाणी, भावगीते, वात्रटिका, बालगीते, बोलगाणी अशी कितीतरी रूपे शोधून काढली आणि यात विषयांची व्याप्ती तरी किती असावी? मानवी मनाच्या गाभ्यातील सूक्ष्मातिसूक्ष्म नाजूक भावनांचा त्यांनी वेध घेतला, त्यात तारुण्यसुलभ उच्छृंखल भावनाही त्यांनी अस्पर्श मानल्या नाहीत. ‘सलाम’सारख्या कवितांतून त्यांनी काहीशा तिरकसपणे समाजातील व्यंग टिपून दाखविले. उपरोधाच्या आश्रयाने विसंगतीवर प्रहार करणारी राजकीय आशयाची कविता पाडगावकरांनी रुजवली.

मंगेश पाडगावकर हे आजच्या आबालवृद्धांचे लाडके कवी आहेत. शाळेतली मुले मोठ्या झोकात ‘सांग सांग भोलानाथ’ म्हणत असतात, तर तरुण-तरुणी अजूनही पाडगावकरांच्या भावगीतांच्या आणि भावकवितांच्या तालावर प्रेमाची पावले टाकतात. त्यांच्या कवितेतील ताजेपणा, त्यांच्या वृत्तीतील ओसंडून जाणारी जीवनाविषयीची आसक्ती, त्यांची प्रयोगशीलता पाहिली, तर ह्या पाडगावकरांचा अमृतमहोत्सव 10 मार्चला साजरा झाला, हे खरे वाटत नाही.

परंतु पाडगावकर ‘साधना’ साप्ताहिकात संपादनसाहाय्य करीत, ह्या गोष्टीला पन्नास वर्षे झाली, याची आठवण होते. आमची पिढी त्यांच्या जिप्सी कुतुहलाचे कौतुक मनात साठवत ‘केवळ सौंदर्य, केवळ आनंद’ हा मंत्र जपत होती, ह्या गोष्टीलाही अर्धशतक लोटले. तेव्हा आकडेमोड करून आमच्या वसंत बापटांचे ‘मंगूअण्णा’ पाऊणशे वर्षांचे झाले, हे मान्य करावे लागेल.

पाडगावकरांचा पहिला कवितासंग्रह ‘धारानृत्य’ 1950 साली प्रसिद्ध झाला. त्यापूर्वीच त्यांची कविता फुलू-झुलू लागली होती. त्यांना नुकतीच कुठे मिसरूड (आणि अर्थात दाढीही) फुटू लागली होती. तेव्हापासून त्यांचे आणि कवितेचे नाते अतूट झाले. त्यांच्या आयुष्यात कोणतेही टप्पे येवोत, ते अकाली प्रेमात पडून विवाहबद्ध होवोत, की त्यानंतर जणू संसाराचा विसर पडून ते काका कालेलकरांच्या प्रभावाखाली वर्ध्याला वाढू लागोत, त्यांनी कवितेची साथ कधी सोडली नाही आणि काव्यप्रेमी रसिकांनीही त्यांची पाठ सोडली नाही.

1953मध्ये ‘जिप्सी’ हा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला आणि मराठी कवितेच्या इतिहासात ही एक महत्त्वाची घटना ठरली. त्यांच्या काव्यवाचनाच्या लोकाभिमुखतेमुळे चांगली कविता हीही सामान्य रसिकांपर्यंत पोचली. काव्यलेखन आणि काव्यवाचन ह्या प्रकारांना व्यावहारिक यश मिळू लागले. ह्या पुस्तकाची आवृत्ती दोन-चार महिन्यांत संपल्यामुळे पॉप्युलर प्रकाशनसारख्या संस्थेला कवितांची पुस्तके प्रकाशित करण्यासाठी एकूणच बळ लाभले.

पाडगावकरांचे गुरुतुल्य स्नेही स्वतःची ‘पोएट बोरकर’ अशी ओळख देत असत. त्यांच्यापेक्षाही पाडगावकरांनी ‘कविवर्य’ हे बिरुद निराळ्या अर्थाने खरे करून दाखवले. आज जवळजवळ साठ वर्षे ते कविता लिहित आहेत. त्यांची कविता सातत्याने निरनिराळी रूपे घेत राहिली. अजूनही पाडगावकर कोणती नवीन आकृती निर्माण करतील, यासंबंधी कोणीही भाकीत करू शकणार नाही. ते काहीतरी नवीन करत राहतील, एवढेच फक्त आपल्याला सांगता येईल.

मराठी कथेच्या क्षेत्रात अरविंद गोखले यांनी एकनिष्ठपणे कथेची नवनवीन रूपे कशी वापरता येतील याचा शोध घेतला. पाडगावकरांनी त्याचप्रमाणे कविता, ऑपेरा, गाणी, भावगीते, वात्रटिका, बालगीते, बोलगाणी अशी कितीतरी रूपे शोधून काढली आणि यात विषयांची व्याप्ती तरी किती असावी? मानवी मनाच्या गाभ्यातील सूक्ष्मातिसूक्ष्म नाजूक भावनांचा त्यांनी वेध घेतला, त्यात तारुण्यसुलभ उच्छृंखल भावनाही त्यांनी अस्पर्श मानल्या नाहीत. ‘सलाम’सारख्या कवितांतून त्यांनी काहीशा तिरकसपणे समाजातील व्यंग टिपून दाखविले. उपरोधाच्या आश्रयाने विसंगतीवर प्रहार करणारी राजकीय आशयाची कविता पाडगावकरांनी रुजवली. मामा वरेरकर म्हणत की, माझ्या कादंबऱ्या ह्या त्या कालखंडाच्या बखरी आहेत. त्यांच्याशी नातवाचे नाते सांगणाऱ्या पाडगावकरांनी जाणता-अजाणता मागील अर्धशतकाचा सामाजिक इतिहास काव्यबद्ध केला आहे. व्यक्तिमन आणि समाजपुरुष यांचा वेध घेत असताना त्यांनी एकूण जीवनाकडे पाहण्याची आपली निकोप दृष्टी, हीही आपल्यासारख्यांच्या कानात आणि मनात उतरविली आहे. गात राहणे आणि स्वप्ने पाहणे, ह्या त्यांच्या स्वभावातील खोडी आपल्यालाही हव्याहव्याशा वाटतात.

हे सारे करत असताना त्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टींचे भान सोडले नाही. रसिकांचे रंजन करणे इतकेच नव्हे, तर त्यांची अभिरुची घडविणे हे त्यांनी ज्या प्रमाणावर केले, त्यासाठी आपण त्यांच्या ऋणात आहोत. त्यांच्या आत माणसाची निरनिराळी रूपे दडून बसली आहेत. त्यांपैकी एक रूप परखडपणे डोळस चिकित्सा करणान्या समीक्षकाचेही आहे. लोकाभिमुख क्वचित मंचीय कविता लिहीत असतानाही त्यांनी अभिजाततेच्या कसोटीचा विसर पडू दिला नाही. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यांचे आत्मभान त्यांच्या लेखनामागे त्यांची निश्चित अशी जीवनदृष्टी आहे. त्यापासून ते कधी ढळले नाहीत.

श्रेष्ठ कवितेबद्दल त्यांना वाटणारे प्रेम त्यांनी संपादित केलेल्या काही पुस्तकांवरून स्पष्ट होते. ‘मीरा’, ‘कबीर’ आणि ‘सूरदास’ यांची निवडक कविता प्रदीर्घ प्रस्तावनेसह मराठीत आणणे आणि शेक्सपिअरच्या ‘टेम्पेस्ट’, ‘ज्यूलियस सीझर’ आणि ‘रोमिओ ज्यूलिएट’ ह्या भिन्न प्रकृतीच्या नाटकांचा मुळाबरहुकूम अनुवाद समीक्षेसह मराठी वाचकांपर्यंत पोचविणे, ही त्यांची फार मोठी देणगी आहे.

मराठी माणसाला कवितेत न्हायला शिकवले ते पाडगावकरांनी. त्यांनी कवितेखेरीज इतर लेखन क्वचितच केले. काही ललित निबंध (‘निंबोणीच्या झाडामागे’), मोजकी व्यक्तिचित्रे, काही निमित्ताने केलेले समीक्षा लेखन. या शिवाय त्यांनी स्फुटलेखन केले ते आपल्या ‘साधना’ साप्ताहिकातूनच - अनेक वर्षांपूर्वी. 

मंगेश पाडगावकर यांना साधना परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा!

Tags: सलाम जिप्सी धारानृत्य मंगेश पाडगावकर weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

रामदास भटकळ

पॉप्युलर प्रकाशन या पुस्तक प्रकाशन संस्थेचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके