डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

दोन पावले पुढे- अर्थात पुष्पाच

माझ्यासारख्याला देशातील राजकारणातील पेच लक्षात येत होता, पण उत्तर सापडत नव्हते. एकाधिकारशाहीला  विरोध करणारे सगळे पक्ष 1975 नंतर एकत्र आले. त्यांत अकाली, जनसंघ यांसारखे धर्माधिष्ठित होते, कम्युनिस्ट होते, समाजवादी होते, पूर्वाश्रमीचे काँग्रेसजन होते. मुंबईत सातही उमेदवार निवडून आले ते मुळात विविध पक्षांचे होते. जनसंघ, समाजवादी, कम्युनिस्ट, शे.का.फे., काँग्रेस (ओ). आम्ही सर्वांसाठी काम करत होतो. पुढे जेव्हा देशाला खरा धोका हा जातीयवादी पक्षांकडून आहे याची जाणीव झाली, तेव्हा वेगळा विचार पुढे आला. निधर्मी पक्षांची मोट बांधणे आवश्यक वाटले. मग त्यात काँग्रेसही आली. मात्र देशापुढील खरा लढा आहे रे आणि वंचित यांच्यात आहे, याचा सर्वांनाच विसर पडला. मला ह्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसला नाही. पुष्पालाही सापडला नसावा. तिने नंतरच्या दिवसांत समाजकारण, सांस्कृतिक कार्य यांच्याकडे अधिक लक्ष याच कारणांसाठी दिले असावे.

मी एल्फिन्स्टन कॉलेजात जाण्याच्या आधीच सरकार कुटुंबीयांच्या एका खासियतीशी माझा परिचय झाला होता. रमेशचंद्र हा रोहिणी ह्या माझ्या मोठ्या बहिणीच्या वर्गातला. तिची-माझी गट्टी असल्याने तिच्या वर्गातल्या सगळ्या बातम्या ती मला सांगत असे. रमेशने कॉलेजातच नव्हे, तर बाहेरही आपले इंग्रजीवरील प्रभुत्व आणि असामान्य वक्तृत्व यांची छाप पाडलेली होती. त्याने बीएला इंग्रजी विषय न घेता अर्थशास्त्र विषय निवडला आणि परीक्षेत फारसा चमकू शकला नाही. पुढे मी त्याला ओळखू लागल्यावर विचारले की, इंग्रजी घेऊन उत्तम मार्क का नाही मिळवले? तो म्हणाला, ‘‘मला जे येत नाही ते शिकायला मी कॉलेजात आलो आहे!’’ 

त्याची बहीण तिलोत्तमा ही माझ्याच वर्गात आली. तिने इंग्रजी विषय घेतला. ती अभ्यासू वृत्तीची आणि नंतरच्या काळात आपला नवरा दासवानी याच्यासोबत तिने शिक्षणाच्या क्षेत्रात मोठी कामगिरी केली. पुष्पा त्यानंतर चार वर्षांनी 1954 मध्ये कॉलेजात आली. तिच्या वर्गातली लैला पालेकर पुढे माझी बायको झाली. त्या निमित्ताने माझा कॉलेजशी संबंध होताच. पुष्पातली अभ्यासू, चिकित्सक वृत्ती आणि ज्ञानपिपासा यांची चुणूक तेव्हापासूनच जाणवत होती. ती आणि तिच्या वर्गातले रत्नाकर मतकरी, अरविंद देशपांडे, सरोज सोहनी अशा हुशार, प्रतिभावंत मुलांचा एक गट होता. अभ्यासाखेरीजही अनेक बाबतींत ही मंडळी पारंगत होती. रत्नाकर आणि पुष्पा हे रेडिओवर संस्कृत नाटकांतदेखील भाग घेत, असे अंधुकसे आठवते. त्यांच्या प्रगल्भतेचे लक्षण म्हणजे त्यांच्या गप्पागोष्टींत प्राध्यापक, मंडळींपैकी शंकर वैद्य, अंबिका भिडे हेही सामील असायचे.

कॉलेजच्या  दिवसांत दोन चळवळी जोरात होत्या आणि त्यांत विद्यार्थीही सामील असायचे. मी स्वत: 1947 पूर्वी स्वातंत्र्यलढ्यात माझ्या अल्पवयानुसार भाग घेत असे. राष्ट्रसेवा दलाचा अनुभवही गाठीशी होता. कॉलेजच्या दिवसांत मी प्रकाशनकार्यात आणि नाटकांत जास्त गुंतत होतो. बी.ए. नंतर 1956 पासून मी राज्यशास्त्राचा विद्यार्थी होतो आणि आमचे प्राध्यापक के.पी. मुकर्जी यांच्या काही विचारांचा माझ्यावर पगडा होता. राज्यांची पुनर्रचना करताना अनेक छोटी राज्ये असावीत आणि प्रत्येक राज्य बहुभाषिक असावे, अशी त्यांची सूचना निदान विचार करण्यासारखी मला वाटत होती. त्यामुळे संयुक्त महाराष्ट्र- चळवळ हा जीवन-मरणाचा प्रश्न मानून तिच्यात मी मनाने गुंतू शकत नव्हतो. गोवा मुक्ती संग्रामात कॉलेजची मुले एक दिवस सचिवालयावर मोर्चा घेऊन गेली. ‘हा लढा जर गोव्यातील पोर्तुगीजांविरुद्घ, तर मग सचिवालयावर मोर्चा कशासाठी?’ हे मला कळत नसे. बहुधा पुष्पा या चळवळींत असावी; पण मी नव्हतो.

कॉलेजच्या शतसांवत्सरी उत्सवात 1956 मध्ये मराठी नाटकाच्या निमित्ताने माझा पुष्पाशी अधिक संबंध आला. तिने वरेरकरांच्या ‘भूमिकन्या सीता’ नाटकात वासंतीची भूमिका केली होती. नाटक आणि रंगभूमी यांच्याकडे पाहण्याची पुष्पाची  दृष्टी आधीपासून घडत होती. नंतर कळले की, तिने शाळेत असताना स्वत: एक नाटकही लिहिले होते, तेही सामाजिक विषयावर. तेव्हा आम्ही चिंतामणराव कोल्हटकर, मामा वरेरकर, मामा पेंडसे आणि तालमींच्या निमित्ताने येणारे जुन्या पिढीचे व तरीही नव्या विचारांचे स्वागत करणारे नाट्यकर्मी यांच्याकडून शिकत होतो. रंगभूमीचा प्रत्यक्ष अनुभव तिने घेतला याचा पुढच्या काळात समीक्षा करताना निश्चित उपयोग झाला असणार. ती साहित्याची जाणकार, तरी प्रयोगांचीही उत्तम समीक्षा करत असे.

पुष्पा मराठी विषय घेऊन बी.ए. झाली. कॉलेजात डॉक्टर म.अ.करंदीकर आणि शंकर वैद्य मराठी शिकवत. ते दोघेही अभ्यासू, त्या दोघांची विचारपद्घती वेगळी. त्या दोघांचेही संस्कार पुष्पाच्या मराठीच्या अभ्यासावर झाले असणार. मी फक्त पहिल्याच वर्षी करंदीकरांच्या शिकवण्याचा अनुभव घेतला होता. नंतर माझा  विषय मराठी नव्हता. त्याच वेळी मी व्यवसायात आणि संसारात गुंतलो होतो. पण पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने माझा अनेक थोर साहित्यिकांशी संबंध येत असे.

ती मराठीची अभ्यासक-प्राध्यापक होईतो आमचा संपर्क फारसा राहिला नाही. तिच्या बाबतीत परीक्षेतील उज्ज्वल यश, पुरस्कार असे काही ऐकू आले नाही. पुष्पा आणि अनंता कधी एकत्र आले, याचाही मी साक्षीदार नव्हतो. ती एम्‌.ए. करत असताना त्यांचे जुळले, असा माझा तर्क आहे. अनंता काही दिवस मौज प्रकाशनात काम करत असे, तेव्हा आमची अधूनमधून भेट व्हायची. पुढे निरनिराळ्या कॉलेजांत शिकवत पुष्पा जेव्हा रुईया कॉलेजात शिकवू लागली; तेव्हा तिची आपल्या विषयावरील पकड लक्षात येऊ लागली. तिच्या कारकिर्दीत रुईया मराठी विभागाला पुन्हा महत्त्व प्राप्त झाले. तिचे सहकारी आणि विद्यार्थी यांना तिच्याबद्दल वाटणारा आदरही यावरून माझ्या लक्षात येत होता.

तिच्या वाङ़्‌मयीन जडण-घडणीचा मागोवा मी घेऊ शकलो नाही. आम्हा दोघांवरही साहित्य-कला यांच्या बाबतींत सारखेच संस्कार होत असले पाहिजेत. कॉलेजात प्रा. शंकर वैद्य आले होते. ते पुष्पाचे शिक्षक आणि मित्रही झाले होते. मी वैद्यसरांच्या वर्गातला विद्यार्थी कधीच नव्हतो; पण मी दिसलो की, मला ते कॉरिडॉरमध्ये थांबवून कवितेची गोडी लावत. प्रा.वा.ल. कुळकर्णी सातत्याने लिहीत असत. साहित्यसंघात भाषणे देत. पुष्पाची प्रा.श्री.पु. भागवत यांच्याशी प्रत्यक्ष ओळख नंतर अनंतामुळे झाली असली, तरी त्यांचा प्रभाव ‘सत्यकथे’मुळे आणि मौज प्रकाशनांमुळे सर्वांवर होताच. नाटक आणि रंगभूमी ह्या क्षेत्रांत इब्राहिम अल्काझी, विजय तेंडुलकर, विजया जयवंत, दामू केंकरे, आत्माराम भेंडे आणि नंतरच्या काळात सत्यदेव दुबे, अमोल पालेकर आणि श्रीराम व दीपा लागू अशांचा सहवास दोघांनाही मिळत होता. प्रत्येकाच्या जीवनात कोणी कमी, कोणी जास्त प्रभावशाली ठरत असे.

‘माणूस’चे श्रीभाऊ माजगावकर यांची जवळीक हा आमच्यातला तेव्हाचा एक महत्त्वाचा दुवा. आज खरेही वाटत नाही, पण श्रीभाऊ संघाचे कार्यकर्ते असूनही समाजवाद्यांशी त्यांचा जवळचा संबंध होता. आणीबाणी जाहीर झाल्यापासून असा प्रयत्न आवश्यकच होता, पण ही त्या आधीपासूनची गोष्ट आहे. अरुण साधू, अनिल बर्वे हे तर डाव्या विचारांचे, तरी तेही माणूस गोटातले समजले जात. पुढे दिलीप माजगावकर हेही असेच सर्वसंग्राहक निघाले. माझ्या लेखनाला चालना माजगावकर बंधूच देत असत. दिलीपरावांच्या सांगण्यावरून पुष्पाही ‘माणूस’ साप्ताहिकात नाटकांच्या प्रयोगांवर सदर लिहू लागली. श्रीभाऊ लवकर गेल्याने त्यांचा आमच्यावरील नेमका प्रभाव लक्षात राहिला नाही.

आणीबाणीच्या दिवसांत  पुष्पा अधिक जवळ आली. दुर्गाबाई भागवत, पन्नालाल सुराणा, मृणाल गोरे, अहिल्या रांगणेकर अशा योद्ध्यांसोबत पुष्पा असायची. केवळ त्यांना रक्षणकर्त्यांची गरज होती म्हणून नव्हे, तर पुष्पाचे बौद्घिक साहचर्य त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते म्हणूनही. त्या काळात जाहीर चर्चा अशक्य होती. कोणत्याही प्रश्नांची उकल व्हायला त्याचा साधक-बाधक विचार आवश्यक असतो. आम्ही काही जण खुर्चीत बसून सल्ला देणारे, तर पुष्पा निरनिराळ्या प्रकारच्या समाजकार्यात गुंतलेली. त्यामुळे ती काय म्हणते याला अनुभवाची जोड असायची.

आणीबाणीचे दिवस विसरताही येत नाहीत आणि त्या आठवणी आजच्या बदललेल्या परिस्थितीत खऱ्या वाटतही नाहीत. त्या दिवसांत अनेक माणसे जवळ आली आणि अनेकांनी विरस केला. आणीबाणीविरोधी काही करावे अशा विचारांनी एकत्र आलेल्या मित्रमंडळींत अर्थातच पुष्पा आणि अनंता सुरुवातीपासून होते. आणीबाणी जाहीर झाली तेव्हा काही काळ आम्ही सुन्न झालो होतो. काय होते आहे हे जसे लक्षात येऊ लागले, तशी आम्ही समविचारी मंडळी एकत्र बसू लागलो. शशी आणि उषा मेहता दादरला मध्यवर्ती जागेत राहत. त्यांच्या घरी जमणे सोईचे वाटू लागले. समाजवादी नेत्यांची तिथे ऊठबस असायची. आम्हा बहुतेकांवर समाजवादी संस्कार होते, तरी काही हिंदुत्ववादीही त्यांच्या तेव्हाच्या धोरणानुसार त्यांत होते. एकूण एकाधिकारशाहीला विरोध हे समान सूत्र होते. चळवळींचा प्रत्यक्ष अनुभव आणि कोणत्याही पक्षाशी बांधिलकी न मानता लढ्याची बौद्घिक बैठक स्पष्ट करणाऱ्या थोड्या कार्यकर्त्या-विचारवंतांत पुष्पा होती. आम्हा तीस-चाळीस जणांचा कार्यक्रम ठरवण्यात तिची भूमिका महत्त्वाची होती.

त्या दिवसांत महत्त्व होते निर्भय होण्याचे. काही नेते भूमिगत झाले. त्यांत मोहन धारिया, जॉर्ज फर्नांडिस यांना पोलिसांच्या नजरेपासून दूर ठेवण्यास मदत करणारी बरीच फौज होती. पुष्पाच्या घरी मृणाल गोरे आणि पन्नालाल सुराणा यांसारखी विशेष मंडळी राहत होती. पुष्पातील समाजकारणाची जडण-घडण त्या पूर्वीच झाली होती, त्याला आता उत्कट रूप आले. मृणाल गोरे यांच्याशी पुष्पाचे अनेक वर्षे संबंध घनिष्ठ होत गेले. मी स्वत:  आणीबाणीच्या दिवसांत आमूलाग्र बदललो. आमच्या अनौपचारिक गटाला नाव, पत्ता, पदाधिकारी असे लौकिक स्वरूप देणे इष्ट नव्हते. तरीही काळ जाऊ लागला, तेव्हा शशी मेहता आणि मी कार्यवाहाचे काम करू लागलो. धोंडो विठ्ठल देशपांडे यांना अध्यक्ष मानू लागलो.

एस.एम.जोशी यांना इंदिराबार्इंनी तुरुंगात घातले नव्हते. त्यांचे आम्हाला लांबून मार्गदर्शन मिळायचे. नानासाहेब गोरे परदेशाहून आले आणि आम्हाला बळ मिळाले. भूमिगत नेत्याची राहण्याची व कामाची सोय करणे आणि तुरुंगात गेलेल्यांच्या कुटुंबाची उभारी राखणे, एवढेच काम शक्य होते. जानेवारी 1977 मध्ये निवडणुका जाहीर झाल्या आणि आमच्या कामाला वेगळे स्वरूप आले. या गटासाठी मी सुचवलेले ‘ग्रुप 77’ हे नाव स्वीकारले गेले. पुष्पा आमच्यातील होती. आम्ही कोणत्याही पक्षात प्रवेश  न करता मुंबईत जनता पक्षाच्या आणि इतरत्रही चांगल्या उमेदवारांसाठी पैशांची जमवाजमव करू लागलो. जमणाऱ्या रकमा फार मोठ्या नसायच्या, पण ह्या कामासाठी निर्भयपणे बोलता येणे महत्त्वाचे होते. आमच्यात निर्भयतेचा आदर्श पुष्पाच बिंबवायची. आ़म्ही अनेक सभा घेतल्या. बहुतेक सभांत पुष्पा बोलायचीच. पोदार कॉलेजमधील एका सभेत अरुण शौेरी, प्रभुराम जोशी यांच्यासमवेत पुष्पाचे भाषण लक्षात राहण्यासारखे झाले.

नाटक रंगभूमीसारख्या कला आणि समाजकार्य यांची सांगड चमत्कारिक वाटते. पण पुष्पाने मुलाखतीत सांगितल्यानुसार तिच्या नाट्यवेडापायी ती औरंगाबादला जाऊ लागली आणि त्या संपर्कातून समाजकार्याकडे वळली. तिच्यावर बाळपणापासून जे संस्कार झाले होते त्यांत गांधी विचार, विनोबांची ग्रामदान चळवळ, थिऑसॉफिकल सोसायटीची विचारधारणा यांचा व्यामिश्र प्रभाव होता. त्याचमुळे हे स्थित्यंतर झाले असणार. माझ्या स्वत:च्या बाबतीत गांधीविचार, मेधा पाटकरांचे कार्य आणि शास्त्रीय संगीत ह्या विभिन्न गोष्टींत मला सारखाच रस कसा वाटतो, हा मला पडलेला प्रश्नच आहे. पुष्पाच्या बाबतींत तर अशा अनेक अनाकलनीय गोष्टी लक्षात येऊ लागल्या.

पुष्पा ज्या समाजकार्यात गुंतली होती, त्यांचा थोडक्यात आढावा घेणेदेखील सोपे नाही. तिच्या आयुष्यात अनेक कृतिशील विचारवंत आले आणि ज्यांच्या कामाबद्दल तिला आस्था वाटली, त्यांत ती मनापासून सहभाग घेऊ लागली. त्यांतील अनेकांशी माझा परिचय होता. एखादा अपवाद वगळता पुष्पाच्या आणि माझ्या मतांत फारसा फरक नव्हता. पण तिच्यासारखा मी प्रत्यक्ष भाग घेऊ शकत नसे. मृणाल गोरे यांच्या कितीएक कामांत पुष्पाचा सहभाग असावा? - नागरी निवारा परिषद, महागाईविरोधी ग्राहक चळवळ, दलित स्त्रियांसाठीचे काम, स्वाधार समस्या निवारण केंद्र, श्रमजीवी स्त्री संघटना, अंगणवाडी युनियन- अशा किती तरी चळवळी. ही सगळी नावे लक्षात ठेवणेसुद्घा मला जड गेले असते.  प्रत्येक कामासाठी वेगळी संस्था काढणे ही गांधींची खासियत मृणालतार्इंनीही उचलली असावी, त्यामुळे त्यांच्या काही कामांत कम्युनिस्ट आणि जनसंघाचे कार्यकर्तेही सामील होऊ शकले. ह्या सगळ्या कामांत खांद्याला खांदा लावून साथ देणे आणि तरी त्याबद्दल स्वतंत्रपणे विचार करणे पुष्पाला कसे शक्य झाले असेल, याचा विचार केला तरी दम लागतो. फक्त ़मृणालताईच नाही; पन्नालाल सुराणा, बाबा आढाव, नरेंद्र दाभोलकर, श्रीराम लागू, य. दि. फडके, मेधा पाटकर आणि नंतरच्या काळात उल्का महाजन, विद्या बाळ व सुरेखा दळवी अशा किती जणांना कामात आणि ज्ञानसाधनेत तिने साथ दिली आहे. सामाजिक कृतज्ञता निधी, अंधश्रद्घा निर्मूलन समिती, आविष्कार-स्वातंत्र्यासाठीचा लढा, मराठवाडा नामांतर चळवळ, भारत-पाकिस्तान मैत्री फोरम, स्त्री अभ्यास केंद्र, केशव गोरे ट्रस्टचे काम... हे सारे न संपणारे. मृणालतार्इंच्या आणि य. दि. फडके यांच्या निधनानंतर गोरेगावला त्यांनी ‘मृणाल गोरे इंटरॲक्टिव्ह सेंटर फॉर जस्टिस ऑण्ड पीस’ ह्या संस्थेची जबाबदारी घेतली आणि अलीकडे माझ्या आवडत्या आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्राचीही.

आणीबाणी संपताना निवडणुकांच्या निमित्ताने तिने राजकारणात गुंतणे साहजिक होते. आम्ही जनता पक्षाला पाठिंबा देणारे, पण प्रत्यक्ष पक्षात गेलो नाही. पण पुष्पा इतकी गुंतत गेली होती की, तिच्यावर बी.सी. कांबळे यांच्या मतदारसंघातील प्रचाराचे काम सोपवण्यात आले. ते तर निवडून आलेच, शिवाय मुंबईतील सर्व जागा जनता पक्षाने जिंकल्या. आ़म्ही पक्षसभासद नसलो तरी आम्हालाही नशा चढली होती. पुष्पाला जबाबदारी टाळणे अशक्य होते. ती मुंबई जनता पक्षाची सेक्रेटरी झाली.

पुढे जनता पक्ष हा सर्व समर्थकांसाठी एक कोडे ठरला. कोण बरोबर- कोण चूक, काय केले असते किंवा नसते तर काय झाले असते- हे आज सांगणे कठीण. एका बाजूने आमच्यासारख्यांना वाटायचे की पुष्पाने आमदार व्हावे; तर दुसऱ्या बाजूने लक्षात यायचे की, पक्षीय राजकारणातून बाहेर पडणे हेच शहाणपणाचे ठरेल. वैयक्तिक पातळीवर अगदी जयप्रकाश नारायण यांची जवळीक साधूनही ती पक्षीय राजकारणातून लवकरच बाहेर पडली.      

माझ्यासारख्याला देशातील राजकारणातील पेच लक्षात येत होता, पण उत्तर सापडत नव्हते. एकाधिकारशाहीला  विरोध करणारे सगळे पक्ष 1975 नंतर एकत्र आले. त्यांत अकाली, जनसंघ यांसारखे धर्माधिष्ठित होते, कम्युनिस्ट होते, समाजवादी होते, पूर्वाश्रमीचे काँग्रेसजन होते. मुंबईत सातही उमेदवार निवडून आले ते मुळात विविध पक्षांचे होते. जनसंघ, समाजवादी, कम्युनिस्ट, शे.का.फे., काँग्रेस (ओ). आम्ही सर्वांसाठी काम करत होतो. पुढे जेव्हा देशाला खरा धोका हा जातीयवादी पक्षांकडून आहे याची जाणीव झाली, तेव्हा वेगळा विचार पुढे आला. निधर्मी पक्षांची मोट बांधणे आवश्यक वाटले. मग त्यात काँग्रेसही आली. मात्र देशापुढील खरा लढा आहे रे आणि वंचित यांच्यात आहे, याचा सर्वांनाच विसर पडला. मला ह्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसला नाही. पुष्पालाही सापडला नसावा. तिने नंतरच्या दिवसांत समाजकारण, सांस्कृतिक कार्य यांच्याकडे अधिक लक्ष याच कारणांसाठी दिले असावे.

पुष्पा वर्गात काय शिकवत असेल, हे तिच्या विद्यार्थ्यांकडूनच कळणार. रुईयात आधी अनेक थोर प्राध्यापक होऊन गेले. प्रा. न. र. फाटकांपासून ते प्रा. वसंत बापट, सरोजिनी वैद्यांपर्यंत. त्या पार्श्वभूमीवर पुष्पाला स्वत:ची प्रतिमा उभी करायची होती. तिच्या विद्यार्थ्यांकडून जे-जे ऐकले, त्यावरून ती उत्तम शिकवत असावी. निव्वळ पुस्तकी किंवा परीक्षार्थी नव्हे किंवा समाजकार्याबद्दलही  नव्हे; ते तर होतेच, पण अधिक महत्त्वाचे भाषा आणि साहित्य यांच्याकडे स्वतंत्र बुद्धीने कसे पाहावे ते.

तिची समाजकारणावरील तशीच साहित्यावरील भाषणेही मी बरीच ऐकली. नेमके, मोजके व समर्पक बोलणे हे तिच्या भाषणांचे रूप असायचे. सगळ्या बाबतींत एकमत शक्यही नसते आणि अपेक्षितही नसते. तिचा व्यवसाय व्याख्याने देण्याचा आणि ओढवून घेतलेले काम प्रचार व प्रबोधन करण्याचे. पण प्रत्येक प्राध्यापक उत्तम वक्ता असतोच असे नाही. तिचे वक्तृत्व अत्यंत प्रभावी होते आणि  तिने उपस्थित केलेले मुद्दे विचार करायला लावत.

तिच्याबरोबर विभावरी पुरस्काराचे काम करण्याची संधी मला मिळाली. बहुतेक बाबतींत अमचा दृष्टिकोन सारखाच होता, याचा मला दिलासा मिळाला. फक्त ती चळवळींत गुंतल्याने एक फरक जाणवला. जीवनवादी समीक्षेला नाही तरी पॉप्युलरच्या कोल्हापूर चर्चासत्रापासून अधिक महत्त्व प्राप्त झालेच होते. त्यातूनही ज्यांत सद्य:स्थितीवर परखड विचार मांडले आहेत, अशा लेखनाबद्दल पुष्पाला अधिक आस्था दिसली.

याच संदर्भात दुसऱ्या एका मतभेदाचा उल्लेख केला पाहिजे. साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक प्रतिष्ठानने आपल्या माणगावच्या जागेत भाषांचे वर्ग ठेवावेत, असा माझा आग्रह होता. त्या निमित्ताने काहीशा आडवाटेवर असलेल्या आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्राला वळण लागेल, वाचनालयात भर पडेल आणि अनेक सहयोगी मिळतील- हा तर हेतू होताच; शिवाय भाषा आणि अनुवाद यांत घट्ट नाते आहे, याबद्दल माझ्या मनात संदेह नव्हता. गुजरात विद्यापीठात अशी सोय सहा महिन्यांच्या कार्यक्रमात बसवलेली, इथे 15 दिवसांत कशी आणता येईल याची मी चौकशी केली होती. मी पुष्पाला पटवून देऊ शकलो नाही. अमराठी उमेदवारांसाठी मराठी शिकवण्याची सुरुवात करावी आणि नंतर इतर भाषांसाठीही, ही माझी योजना बारगळली.

अन्यथा, आमच्यात फारसे मतभेद होत नसत. ती इतक्या कार्यांत कशी भाग घेऊ शकते, याचे प्रचंड कौतुक मला  वाटायचे. कधी शंका यायची की- अण्णा हजारे, मेधा पाटकर, दत्ता इस्वलकर असे कार्यकर्ते अनेक कामांत गुंतले तरी कोणती तरी एक कृती त्यांची म्हणून लक्षात राहते; तसे पुष्पाच्या बाबतीत म्हणता येईल का? की, तिचे काम हे ‘भाराभर चिंध्या’च ठरतील? मला तिच्या ह्या अजस्र पसाऱ्यापासून कोणता बोध घेता येईल? मीही ‘एक ना धड’ असाच वागतो का? तिचे एक ऋण मान्य केलेच पाहिजे. पुष्पाने ज्या असंख्य कार्यकर्त्यांबरोबर काम केले, ज्या चळवळींत स्वत:ला गुंतवले; त्या निवडीमागे एक सूत्र होते, काही सिद्घान्त होते- निष्ठा म्हटले तरी चालेल. तिने निवडलेल्या मार्गावर बिनदिक्कत चालत जाण्यात मला संदेह वाटणार नाही. तिने कोणताही झेंडा हातात घेणे बरेचसे टाळले तरी ती आपल्या दोन पावले पुढे असणार याची खात्री असायची. फक्त आपल्याला पुष्पासारखे निगर्वी, नि:स्वार्थ होता आले पाहिजे.

(‘पुष्पा भावे : विचार आणि वारसा’ हा स्मृतिग्रंथ गणेश विसपुते व वैशाली रोडे यांनी संपादित केला आहे. आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्राच्या वतीने पुढील आठवड्यात त्याचे प्रकाशन होत आहे, त्यातील एक लेख येथे प्रसिद्ध करीत आहोत. - संपादक)

Tags: आणीबाणी माणूस लैला पालेकर सामाजिक स्मृतीलेख पुष्पा भावे रामदास भटकळ ramdas bhatakal smrutilekh pushpa bhave weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

रामदास भटकळ

पॉप्युलर प्रकाशन या पुस्तक प्रकाशन संस्थेचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक


Comments

  1. G V Hinge- 17 Jun 2021

    सुंदर

    save

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके