डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

अखेरच्या दिवसांत सिंधुताईच्या या वागण्याला फळ मिळाले. इतके दिवस फक्त त्यांची रसिकता आणि चिकित्सक वृत्ती दिसत होती. पण अचानक त्यांच्यातील सृजनशीलता उफाळून येऊ लागली. त्यांनी कविता लिहायला सुरुवात केली. नव्याने कविता लिहिणाऱ्याला शंका येत असते की आपण लिहितो ते खरेच सांगण्यासारखे आहे का? कुमार किंवा तरुण वयाचे कवी काही प्रमाणात बिनधास्तपणे लिहू शकतात. परंतु समज आलेल्या चिकित्सक मनाला कविता हा एक फसवा वाङ्मयप्रकार असू शकतो, याची जाणीव असते. सुदैवाने त्यांना रामकृष्ण नाईकसारखा रसिक वाचक भेटला.

मला माझ्या आईवडिलांचे प्रेम अनेक वर्षे लाभले. तसेच माझ्यावर पुत्रवत प्रेम करणारी माणसेही भेटली. वहिनी हे माणसाच्या आयुष्यात येणारे एक भाग्यवान नाते. माझी निर्मलावहिनी मी सत्तरीचा झालो तरी माझ्यावर पाखर घालून आहे. तरीही दुसरे वहिनीचे नाते माझ्याशी जोडले गेले ते सिंधुताई कानेटकर यांच्याशी.

वसंतरावांची आणि माझी भेट झाली, तेव्हा मी जेमतेम अठरा-एकोणीस वर्षांचा होतो. ते माझ्याहून एका तपाने मोठे आणि माझा मोठा भाऊ सदानंद याच्या वयाचे. साहित्य, तत्त्वज्ञान आणि एकूण जीवन यांबद्दल वसंतरावांना जी काही बडबड करायची असे समजण्याची माझी पात्रता नव्हती. पण बुद्धी तयार नसली तरी माझा कान तयार होताच, म्हणून कदाचित आमची गट्टी जमली.

मी माझ्या एका मित्राला घेऊन नाशिकला वसंतरावांकडे गेलो. त्यावेळी ते कॉलेजच्या प्रांगणात एका छोट्या क्कार्टरमध्ये राहत असत. आमची निजायची व्यवस्था हॉस्टेलवर करण्यात आली, तरी जेवायला त्यांच्या घरीच जात होतो. सिंधुताईंचा खास ब्राम्हणी स्वयंपाक मला आवडला आणि गेली पन्नास वर्षे आवडत राहिला. मी नाशिकला पहिल्यांदाच जात होतो. तेव्हा त्र्यंबकेश्वरला जाऊन यायचे ठरवले. निरोप घेण्यासाठी घरात गेलो. तर सिंधुताईंनी ट्रिपला जाणाऱ्या आम्हा मुलांसाठी दशम्या बांधून डबा तयार ठेवला होता. तेव्हाच हे नाते पक्के झाले. 

नाटककार होण्याची वसंतरावांची ऊर्मी बळावण्यात मला वाटणारा रंगभूमीबद्दलचा उत्साह हाही अल्पसा कारणीभूत होता. त्यांची पहिली तीन नाटके रंगभूमीवर येईपर्यंत आमची गट्टी वाढत गेली. तेव्हाही मी एकटा गेलो तर त्यांच्या त्या छोट्या घरातच राहत असे अगदी घरच्यासारखा. वसंतरावांना लिहिले की वाचून दाखवायची सवय. माझ्याबरोबर आणि स्वतंत्रपणे ही त्यांचे लेखन वाचून किंवा ऐकून आपले परखड मत देणाऱ्यांत सिंधुताई होत्या. हळूहळू माझ्या लक्षात येऊ लागले की त्यांची बरीचशी इतर मित्रमंडळी - विशेषतः नाट्यकर्मी यांना तटस्थपणे नाटकाकडे कलाकृती म्हणून पाहता येत नसे. उदाहरणार्थ, ऐकणारा जर नट असेल तर आपल्याकडे कोणती भूमिका येण्याची शक्यता आहे, त्यानुसार त्या संहितेचे मूल्यमापन करायचा. मी आणि सिंधुताई या असल्या मोहापासून अलिप्त होतो. रंगभूमीवरील व्यवस्थेबद्दल आमचे अज्ञान असेल किंवा आमच्या वाङ्मयीन समजुतीला मर्यादा असतील. परंतु आमची मूलभूत भूमिका ही रसिक वाचक-प्रेक्षकाचीच होती. आमच्या सांगण्यात अर्थातच एकवाक्यता नसायची. तरीही या सर्व चर्चेचा वसंतरावांच्या लिखाणावर परिणाम होत असे.

'रायगडाला जेव्हा जाग येते' नाटकाला व्यावसायिक यश मिळाले तेव्हापासून परिस्थिती बदलत गेली. व्यवहार म्हणून रंगभूमीची मागणी वेगळीच आहे; असा वसंतरावांचा कल होत गेला. तेव्हापासून माझ्या 'तटस्थ' सूचनांचे महत्त्व कमी होते गेले. हळूहळू वसंतरावांनी मला विचारणेही कमी केले. सिंधूताई मात्र या प्रक्रियेत भाग घेत राहिल्या. निव्वळ पत्नी म्हणून नव्हे; तर एक हुकमी श्रोता आणि चिकित्सक वाचक या नात्याने.

माझे आणि वसंतरावांचे एकूण संबंध पंचेचाळीस वर्षे होते. साहजिकच त्यात व्यावहारिक आणि व्यक्तिगत पातळीवर चढउतार हे होणारच. त्यांची मूळ पुस्तके जरी पॉप्युलर प्रकाशनाकडेच राहिली तरी नवीन नाटके इतर प्रकाशक काढू लागले. व्यवहारातील हा तणाव मला जाणवत राहिला तरी आमचे मित्रत्वाचे नाते कायम राहिले. स्वतंत्र बंगला बांधून आणि कॉलेजातील नोकरी सोडून कानेटकर शरणपूरला राहू लागले. या प्रशस्त घरात पाहुणचार सोपा होता आणि मी शेवटपर्यंत तिथेच राहत असे.

वसंतरावांना जिवाभावाच्या काही गोष्टी सांगायच्या असल्या की सातत्याने मीच लागत असे. या आमच्या मित्रत्वाच्या नात्यातून मला सिंधुताईंचे वेगळेच रूप दिसू लागले. कोणीही पुरुष स्वतःचे प्रमाद लपविण्यासाठी किंवा त्यांचे समर्थन करण्यासाठी बायकोवर दोष ढकलत असतो. वसंतरावांनी तसे केले तरी त्यातून सिंधुताईंची प्रतिमा माझ्या मनात उजळत असे. सोशिकपणा हा भारतीय स्त्रीचा दोष की गुण हे ठरविणे कठीण. पण तो सोशिकपणा कणखरपणाबरोबर अंगात बाणावा. या दोन्ही गुणांच्या जोरावर जर बाई ठामपणे उभी राहत असेल तर त्या बाईचे उज्ज्वल रूपच समोर येणार या सर्व गदारोळात घर शाबूत ठेवणे, ते नीट चालविणे, मुलांना योग्य रीतीने मोठे करणे, कौटुंबिक कलहांचे ओरखडे त्यांच्या मनावर उमटू न देणे या सामान्य गोष्टी नाहीत. या सर्वातून स्वतःचे स्वत्व टिकवून ठेवणे ही किमया सिंधुताईंना साधली होती.

वसंतरावांनी मला काही सांगितले नसते तर मला काही शंकाही येऊ नये अशा सिंधुताई वागत आणि मला सारे माहीत आहे हेही त्यांना ठाऊक असायचे आणि माझ्याशीच नव्हे; तर सर्वांशीच सिंधुताईंचे वागणे एवढे निर्मळपणाचे असायचे, की त्यामुळे घराचे घरपण टिकून राहिले.

अखेरच्या दिवसांत सिंधुताईच्या या वागण्याला फळ मिळाले. इतके दिवस फक्त त्यांची रसिकता आणि चिकित्सक वृत्ती दिसत होती. पण अचानक त्यांच्यातील सृजनशीलता उफाळून येऊ लागली. त्यांनी कविता लिहायला सुरुवात केली. नव्याने कविता लिहिणाऱ्याला शंका येत असते की आपण लिहितो ते खरेच सांगण्यासारखे आहे का? कुमार किंवा तरुण वयाचे कवी काही प्रमाणात बिनधास्तपणे लिहू शकतात. परंतु समज आलेल्या चिकित्सक मनाला कविता हा एक फसवा वाङ्मयप्रकार असू शकतो, याची जाणीव असते. सुदैवाने त्यांना रामकृष्ण नाईकसारखा रसिक वाचक भेटला. 

माझ्या समजुतीप्रमाणे सिंधुताईंनी पहिल्यांदा या कविता तात्यासाहेबांना - म्हणजे कुसुमाग्रजांना दाखवल्या असणार. त्याही मित्रत्वाच्या पोटी. त्यातून तात्या हे सहृदयतेने मार्गदर्शन करणारे, शिरवाडकर या कविता वाचून चकितच झाले. सिंधुताईंना नम्रतेने स्वतः मातीसमान आहोत; तरीही आपण काहीतरी सांगावे असे वाटले असेल. परंतु वाक्प्रचारात मातीमोल म्हणजे क:पदार्थ असले तरी मातीचा अस्सलपणाशीही संबंध आहे आणि निसर्गात सृजनही मातीतूनच होते. 

तात्यासाहेबांनी ही शक्ती ओळखली. त्यांनी लिहिले, 'कविता वाचून खरं तर धक्काच बसला. उतारवयात अकस्मात भेटलेली ही मैत्रीण. एक हौसेचा मामला असावा अशी कल्पना. गुळाच्या पोळ्या चांगल्या असल्या तरी कविता चांगल्या असतील याची काय शाश्वती? नेहमीप्रमाणे वहीची दोन-चार पाने चाळावीत आणि औपचारिक ठीक म्हणून मोकळे व्हावे असा विचार होता. पण वहीचा विचार वेगळा होता. ती हातातून सुटेना. एकदा नव्हे अनेकदा.'

तात्यांनी माझे लक्ष या कवितेकडे वेधले आणि वसंतरावांनीही विषय काढला. पण प्रकाशक म्हणून माझ्या खोडी आहेत. कोणीही सांगितले तरी माझी स्वतःची ट्यूब पेटल्याशिवाय मी प्रकाशन करायला उत्सुक नसतो आणि नातीगोती किंवा मैत्री हे माझ्या निर्णयाला मदत करत नाहीत.

परंतु सिंधुताईच्या कविता मनापासून भिडणार्‍या होत्या आणि त्या इतर कोणाहीसारख्या नव्हत्या. कोणत्याही प्रकारे वाचकाला ताब्यात घ्यायचे असा हेतू नसून मनापासून सांगावेसे वाटते तेवढेच त्यात दिसत होते. त्यामुळे 'मातीलाही कधीतरी वाटतं' प्रसिद्ध करायचा निर्णय घेणे जड गेले नाही.

तेवढ्यात सिंधुताईंनी काही लेख लिहिण्यास सुरुवात केली. घरच्या मंडळींबद्दलच पण याच निर्मळ मोकळेपणाने. कवी गिरीश, त्यांच्या पत्नी माई यांसारखी मंडळी त्यांची माहेरची आणि सासरची, अशांबद्दल लिहिणे कठीण, पण सिंधुताईच्या हाताला चव होती तशी लेखणीलाही. या चरित्र-आत्मचरित्रात्मक किंवा आत्मपर उत्तम लिहू शकतील असा मला विश्वास वाटला. निरनिराळ्या निमित्ताने त्यांनी वसंतरावांबद्दल लिहायला सुरुवात केली होती आणि त्यातही आपल्या प्रांजळ विचारशक्तीची चुणूक दाखविली होती.

वसंतराव गेल्यानंतरही मी त्यांच्या घरी जात राहिलो. त्यांना खूप लिहायचे होते. काय लिहायचे हेही त्यांच्या मनात साचत होते. बांध फुटून हे सारे बाहेर यायला काहीतरी निमित्त लागते. ते जाणूनबुजून निर्माण करता येत नाही. तरी मी त्यांच्याशी बोलत राहिलो तर ते सुकर होईल याचा मला विश्वास होता. पण माझे नाशिकला जाणेही इतर कामांत कमी होऊ लागले आणि गेलो तो एका दारुण प्रसंगी.

त्यांचा मुलगा प्रियदर्शन हा अचानक गेला. हा आघात सोसणे माझ्यासारख्यालाही कठीण होते. मग सिंधुताईंची काय अवस्था झाली असणार?

त्यांचे पुढील लिहिणे सावकाश व्हावे आणि त्यांनी लिहिलेले व्यक्तिचित्रणात्मक लेख 'साथसोबत' या शीर्षकाखाली पुस्तकरूपाने छापावेत असे ठरले. त्यांना लिहिणे जमत असले तरी वाचन कठीण होते. तेव्हा प्रुफे तुम्हीच पाहून घ्या, मी फक्त प्रस्तावना पाठवते, असा त्यांचा फोन आला; आणि दोनच दिवसांनी - तीन जानेवारीला - त्या गेल्या.

Tags: रामकृष्ण नाईक शरणपूर त्र्यंबकेश्वर नाशिक वसंतराव कानेटकर सिंधुताई कानेटकर Ramkrishna Naik Sharanpur Trimbakeshwar Nashik Vasantrao Kanetkar Sindhutai Kanetkar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

रामदास भटकळ

पॉप्युलर प्रकाशन या पुस्तक प्रकाशन संस्थेचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके