डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

साने गुरुजींचे धडपडणारे मूल

पण या तिघांनी कधी एकट्या दुकट्याने आणि बऱ्याचवेळी त्रिकूट म्हणून महाराष्ट्र पिंजून काढला. कविता घरोघरी पोचवण्यात आधीच्या पिढीचे रविकिरण मंडळ जसे यशस्वी झाले तसेच हे त्रिकूट. एव्हाना बिदागीही भरपूर मिळू लागली. अमेरिकेत आणि आखाती देशांतही दौरे केले. बापटांनी सहजपणे कर्णधारपद स्वीकारले. संयोजकांशी बोलणी करणे आणि त्यानुसार सर्व व्यवस्था करून घेणे इत्यादींचा उत्साह फक्त बापटांचाच.

 

माझ्या पिढीच्या सगळ्या मुलांप्रमाणेच मलाही साने गुरुजी आपलेसे वाटत असत. त्यांची जवळजवळ सर्व कथात्मक पुस्तके मी निदान एकदा वाचली होती, ती माझ्या शाळेच्या दिवसांत. पण 1950 पर्यंत माझा साहित्यिक जगाशी फक्त वाचक म्हणूनच संबंध होता. त्यामुळे कदाचित मी गुरुजींना कधी भेटलो नाही. तरीही त्यांचा माझ्यावरील प्रभाव मला जाणवत राहिला. त्यांनी घडवलेल्या अनेक धडपडणाऱ्या मुलांशी माझा परिचय होत गेला. आणि राष्ट्र सेवादल, समाजवादी पक्ष आणि साधना परिवार यांच्याविषयी मला आपुलकी वाटू लागली.

धडपडणाऱ्या मुलांपैकी काहींची राष्ट्र सेवादलाच्या शाखेत भेट प्रत्यक्ष होत असे तर काहींची अप्रत्यक्ष. आम्ही गाणी म्हणत असू, ती कोणातरी कवीने लिहिलेली असणार वगैरे लक्षात येण्याचे ते वय नव्हते. त्यांपैकी निदान काही बापट या कवीने लिहिली आहेत हे कळायला वेळ लागला.

मी मराठी साहित्याच्या डोळस वाचनात ओढलो गेलो ते कॉलेजमध्ये गेल्यावर. आणि पॉप्युलरने विकत घेतलेल्या बाँबे बुक डेपोत फेऱ्या वाढल्या तशी पॉप्युलरच्या मराठी पुस्तकांच्या प्रकाशनातही. याच सुमारास कधी तरी जिना हॉलमध्ये एका कविसंमेलनात बापट-पाडगांवकर यांच्या काव्यवाचनाने प्रभावित झालो. ‘लारालप्पा’बरोबर डुललो आणि ‘दख्खन राणी’तल्या प्रवाशातले एक पिल्लू बनलो.

त्यानंतर मंगेश पाडगांवकर यांचा दुसरा कवितासंग्रह ‘जिप्सी’ आम्ही प्रसिद्ध केला. आमचे ते फक्त पाचवे मराठी प्रकाशन. मी स्वत: अजून विद्यार्थी होतो. त्यामुळे प्रकाशनाला वेग धरला नव्हता. औरंगाबाद साहित्यसंमेलनाच्या निमित्ताने पाडगांवकरांच्या ‘छोरी’ या पुढील संग्रहाची तयारी काहीशी घाईत सुरू झाली. वसंत बापटांनाही हुक्की आली. मग तेही ‘सेतू’ची वही घेऊन आले. दोन्ही पुस्तकांसाठी द.ग.गोडसेंकडून मुखपृष्ठा-साठीचीं चित्रे आणि धारगळकर स्टुडियोत त्यांचे ठसे गडबडीत करून घेतल्याचे आठवते. त्यानंतर बापटांच्या भेटी अधिक होऊ लागल्या. त्यांचे काव्यगायन, भाषणे आणि सेवादलाच्या कला पथकाचेे कार्यक्रम पाहणे हा आनंददायी आणि स्फुरण देणारा प्रसंग असे. त्यांच्या खळखळणाऱ्या  स्वभावातील उमदेपणा जाणवत असे. या भेटींतून पॉप्युलरच्या वतीने बापटांसमवेत पाडगांवकर-करंदीकर यांच्या कवितांच्या एकत्रित ‘काव्यदर्शन’ कार्यक्रमाची योजना ठरली.

किंग जॉर्ज स्कूलचा हॉल भरला होता. पूर्वार्धात या तिघा कवींनी केशवसुत ते मर्ढेकर यांच्या निवडक कवितांचा कार्यक्रम सादर केला. प्रत्येकाने आपापल्या आवडीनुसार कविता निवडल्या. त्यांचे निरूपण आणि कवींचा परिचय अर्थातच वसंत बापट यांचा. उत्तरार्धात या तीन कवींनी स्वत:च्या निवडक कविता सादर केल्या. तेव्हा प्रत्येक कवी इतर दोघांची मिस्कील ओळख करून देत असे.

ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुद्दाम ‘काव्यदर्शन’ या तिघांच्या निवडक कवितांच्या पुस्तकाचे प्रकाशन केले. प्रभाकर गोरे हा सर्वांचाच मित्र, त्याने या छोटेखानी पुस्तकाची अप्रतिम वेगळीच मांडणी केली. बापट आणि नानासाहेब गोरे ‘रचना’ हे द्वैमासिक प्रसिद्ध करत. बहुधा यात बंडू गोरे आणि मधु लिमयेही असावेत. त्या पुस्तकासाठी तिघांचे फोटो मुद्दाम हरबन्स चढ्ढा या ज्येष्ठ छायाचित्रकाराने काढून दिले. प्रत्येक कवीने आपली एक कविता हस्ताक्षरात लिहून दिली. हा सारा डौल करूनही या पुस्तकाची किंमत अगदी माफक ठेवली. असे कार्यक्रम गावोगाव करावेत अशी योजना होती. जवळपासच्या ठिकाणी मी त्यांना कारमधून घेऊन जाऊ शकलो होतो. या ना त्या कारणाने हा आमचा सुविहीत कार्यक्रम पुन्हा होऊ शकला नाही. पण या तिघांनी कधी एकट्या दुकट्याने आणि बऱ्याचवेळी त्रिकूट म्हणून महाराष्ट्र पिंजून काढला. कविता घरोघरी पोचवण्यात आधीच्या पिढीचे रविकिरण मंडळ जसे यशस्वी झाले तसेच हे त्रिकूट. एव्हाना बिदागीही भरपूर मिळू लागली. अमेरिकेत आणि आखाती देशांतही दौरे केले. बापटांनी सहजपणे कर्णधारपद स्वीकारले. संयोजकांशी बोलणी करणे आणि त्यानुसार सर्व व्यवस्था करून घेणे इत्यादींचा उत्साह फक्त बापटांचाच.

काही किरकोळ गोष्टी आठवतात. प्रत्येक लेखकाला आपल्या पुस्तकाची निदान एक तरी प्रत घरात नेहमी असावी असे वाटते. बापटांसारख्या समाजाभिमुख माण़साला तर स्वाक्षरीसह भेटप्रती मागणारे रोजच भेटणार. म्हणून त्यांनी एक युक्ती केलेली मला दाखवली. त्यांनी आपल्या प्रत्येक पुस्तकाची एकेक प्रत विशेष खादीच्या कपड्यात बांधून घेतली. त्यावर ‘प्रिय नलूस’ अशी आपल्या बायकोला भेट लिहिली. निदान ह्या प्रती कोणी मागणार नाही, असा त्यांना विश्वास होता. दुसरी विशेष आठवण म्हणजे, काही बाबतींत ते इतर साहित्यिकांहून वेगळे वागत. बहुतेक साहित्यिक कलावंतांना आरती ओवाळून घेण्याची सवय असते. सर्वसाधारण माणसांसारखे त्यांना वागता येत नाही. विशेषत: एकत्र कुठे प्रवासात असताना आपणही खर्चात हातभार लावावा, हे त्यांच्या गावी नसते. पण बापट या बाबतीत अत्यंत दिलदारपणाने वागत. आणखी एक, मोटारगाडी प्रेमाने चालवणाऱ्या फार थोड्या साहित्यिकांपैकी ते एक.

खट्याळपणा त्यांच्या स्वभावात होता. एकदा मात्र तो त्यांच्यावरच शेकला असता. आमच्याकडे मृदुला जोशी संपादक म्हणून नुकतीच काम करू लागली होती. मृदुला त्यांची विद्यार्थिनी, एकदा बसमध्ये त्यांची भेट झाली. ते तिला म्हणाले, ‘रामदासला विचार माझी पुस्तकं कधी तयार होणार’. ती साहजिकच बावरली. चाचरत तिने मला विचारले. मी म्हणालो, ‘फोन लाव आणि त्यांना सांग प्रुफं आली आहेत’. ती म्हणाली, ‘खरंच का?’ सरांची प्रुफं वाचायला मिळतील म्हणून ती खूश झाली. मी हसत सांगितले की, त्यांनी मुद्रणप्रतच दिलेली नाही. झाले होते असे की, काही दिवसांआधी त्यांनी त्यांच्या विपुल स्फुट लेखनाची यादी मला दाखवल्यावर त्यातून पाच सुरेख पुस्तके तयार करायची असे आम्ही ठरवले. पण लष्करच्या भाकऱ्या भाजता भाजता त्यांचे हे स्वत:चे काम तसेच राहिले होते. पुढे पॉप्युलरने मौजेने आणि साधनाने त्यांची बरीचशी पुस्तके प्रसिद्ध केली- बहुतेक कवितासंग्रह. आम्ही ‘अकरावी दिशा’, ‘सकीना’, ‘शततारका’ हे कवितासंग्रह, ‘बारा गावचं पाणी’ हे प्रवासवर्णन आणि ‘बालगोविंद’ हे मुलांसाठी नाटक. तरी त्यांचे बरेच महत्त्वाचे लेखन अप्रकाशित राहिले.

वसंत बापट यांनी अनंत गोष्टी केल्या तरी अनेक गोष्टी राहून गेल्या. पॉप्युलर प्रकाशनाने मौज प्रकाशनाच्या सहकार्याने मराठी  लेखकांवर ‘इंग्लिश मेन ऑफ लेटर्स’च्या धर्तीवर एक मालिका प्रसिद्ध करायचे ठरवले. ह्या मालिकेत चरित्र आणि साहित्यविचार यांची गुंफण असावी, असा  हेतू होता. मौजेच्या वतीने श्री.पु. भागवत आणि पॉप्युलरच्या वतीने वसंत बापट यांच्यावर जबाबदारी टाकण्यात आली. काही लेखकांवर पुस्तकांची तयारी सुरू झाली. गोपाळ गणेश आगरकर यांच्यावर वसंत दावतर आणि भा.रा.तांबे यांच्यावर रा.भि.जोशी लिहिणार होते. पण प्रत्यक्षात एकही पुस्तक तयार होऊ शकले नाही. या दोन संपादकांनी नमुन्यादाखल एक एक पुस्तक लिहावे, अशी माझी अपेक्षा होती.   दुसरा प्रकल्प मात्र माझ्या मनातच राहिला. ऑडियो बुक्स किंवा ध्वनिमुद्रित पुस्तकांच्या पॉप्युलरच्या प्रकल्पात संत कवी, पंत कवी आणि तंत कवी यांचे निवडक काव्य कसे वाचावे, हे जर कोणी पुढील पिढीसाठी मुद्रित करू शकेल तर ते बापटच- याची आम्हाला खात्री होती. बापटांचे वयोमानानुसार प्रवास कमी झाले तसे हे काम शक्य झाले असते. पण ते राहूनच  गेले. तात्पर्य काय की ज्या माणसाने निघून जाणे हे रसिकांना चालण्यासारखे नाही त्यात वसंत बापट यांचे नाव अगदी वरचे असेल.

Tags: साने गुरुजी वसंत बापट sane guruji vasant bapat weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

रामदास भटकळ

पॉप्युलर प्रकाशन या पुस्तक प्रकाशन संस्थेचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके