डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

आपल्याकडील संशोधन परंपरेचा एक विशेष मला पुन्हापुन्हा जाणवतो. सर्वसामान्यपणे विद्यापीठांतून दूरगामी सखोल संशोधन व्हावे, अशी अपेक्षा असते. आपल्या अनेक विद्यापीठांतून असे संशोधन व्हायला हरकत नसते. काही विभागांतून असे संशोधन झालेलेही आहे. उदाहरणार्थ, मुंबई विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागात अनेक वर्षे प्रा. गोविंद सदाशिव घुर्ये यांच्या नेतृत्वाखाली समाजशास्त्राच्या निरनिराळ्या शाखांचा पाया घातला गेला. हे सारे संशोधन इंग्रजी भाषेतून उपलब्ध आहे. परंतु मराठी भाषेत जे महत्त्वाचे संदर्भग्रंथ उपलब्ध आहेत, त्यांपेक्षा बरेचसे शिक्षणसंस्थांच्या बाहेर तयार झाले आहेत. 

आपल्याकडील संशोधन परंपरेचा एक विशेष मला पुन्हापुन्हा जाणवतो. सर्वसामान्यपणे विद्यापीठांतून दूरगामी सखोल संशोधन व्हावे, अशी अपेक्षा असते. आपल्या अनेक विद्यापीठांतून असे संशोधन व्हायला हरकत नसते. काही विभागांतून असे संशोधन झालेलेही आहे. उदाहरणार्थ, मुंबई विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागात अनेक वर्षे प्रा. गोविंद सदाशिव घुर्ये यांच्या नेतृत्वाखाली समाजशास्त्राच्या निरनिराळ्या शाखांचा पाया घातला गेला. हे सारे संशोधन इंग्रजी भाषेतून उपलब्ध आहे. परंतु मराठी भाषेत जे महत्त्वाचे संदर्भग्रंथ उपलब्ध आहेत, त्यांपेक्षा बरेचसे शिक्षणसंस्थांच्या बाहेर तयार झाले आहेत. 

उदाहरणे घ्यायची तर गोविंद सदाशिव सरदेसाई यांच्या रियासती. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला बडोद्याच्या महाराजांनी राजपुत्राला शिकवण्यासाठी सरदेसाईंची नेमणूक केली. त्याच वेळी त्यांना इतिहासलेखन करता येईल अशा सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या. रियासतीची पहिली आवृत्ती प्रसिद्ध होऊन आज शंभर वर्षे होऊन गेली. त्यानंतरच्या पन्नास वर्षांत सरदेसाईंनी रियासतीचे काम व्रतस्थपणे चालू ठेवले. जसजशी साधने हातांत येतील, तसतशी सुधारणा करत जायची ह्या धोरणाने त्यांनी अनेक खंडांत मराठी रियासत, मुसलमानी रियासत आणि ब्रिटिश रियासत लिहिली. सरदेसाईंनी अखेरपर्यंत हे काम चालू ठेवले; इतके, की त्यांच्या मृत्यूसमयी छापली न गेलेली नवीन सुधारित प्रकरणे उपलब्ध होती. सतरा-अठरा वर्षांपूर्वी पॉप्युलरने स. मा. गर्गे यांच्या संपादनाखाली जी आवृत्ती छापली, त्यात ह्या सर्व साहित्याचा समावेश करण्यात आला. 

सरदेसाई हे आजच्या अर्थाने जरी विद्यापीठात शिक्षक/संशोधक नव्हते, तरी त्यांना संशोधन करता यावे अशा सुविधा होत्या. वि. ल. भावे हे तर एक सुखवस्तू जमीनदार. ठाण्याजवळ त्यांची मिठागरे असल्यामुळे त्यांना पोटा-पाण्याची ददात नव्हती. परंतु दुर्मिळ माहिती जमवून 'महाराष्ट्र सारस्वत' लिहिण्याचा उपद्व्याप करावा अशी काही गरजही त्यांना नव्हती. तरीही त्यांनी प्राचीन मराठी साहित्य जगवले, त्याचा अभ्यास केला आणि त्यासंबंधी शेकडो पाने लिहून काढली. त्यांच्या लेखनाची पातळी अशी की त्या लेखनाला हात लावणे कठीण. शं. गो. तुळपुळे यांनी दोनदा ह्या ग्रंथाच्या संपादनाचे काम हातांत घेतले ते अशा अटीवर, की त्यांच्या मूळ लेखनाला हात लावणार नाही. मला जे सांगायचे आहे ते पुरवणीच्या रूपात लिहीन. 

एका वेगळ्याच क्षेत्रात-संगीताच्या क्षेत्रात, विष्णु नारायण भातखंडे यांनी केलेले काम तर अद्भुत आहे. ते व्यवसायाने वकील किंवा सॉलिसिटर होते. सुखठणकर कुटुंबाच्या इस्टेटीची काळजी घेण्याचे काम त्यांच्याकडे आले आणि त्यामुळे कोर्टाच्या दैनंदिन धकाधकीपासून लांब राहून त्यांना आपल्या संशोधनात मग्न राहणे शक्य झाले. विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या दशकात त्यांनी देशभर प्रवास केला. अनेक पंडितांची भेट घेतली. अनेक गुरूंकडून विद्या प्राप्त करून घेतली. दोन-तीन हजार बंदिशी मुखोद्गत केल्या, त्या स्वरबद्ध टिपून ठेवता याव्यात म्हणून नोटेशन पद्धती तयार केली. संस्कृत, इंग्रजी ग्रंथ मिळविले; त्यांवरून स्वतः नवीन पद्धती तयार केली. नवीन पद्धती 'लक्ष्यसंगीत' ह्या संस्कृत ग्रंथात लिहिली आणि त्यावर दोन हजार पानांत 'हिंदुस्थानी पद्धती' ही टीका लिहिली. भातखंडे यांच्या ग्रंथात जो खजिना आहे त्यात पुढील सत्तर वर्षात फारशी कोणी भर टाकू शकले नाही. 

ह्या साऱ्या गोष्टींची आठवण होण्याचे कारण, की अलीकडच्या काळात ह्या निष्ठेने संशोधन होताना क्वचित दिसते, तरी एक नमुना माझ्या नजरेत आला. जवळजवळ पंचेचाळीस वर्षांपूर्वीची गोष्ट. राम कोलारकर ह्या तरुणाला लघुकथा ह्या साहित्यप्रकारात प्रचंड गोडी निर्माण झाली. त्याने क्वचित थोडे लेखन स्वतः केलेही असेल. 'नवलेखन' ह्या नियतकालिकातून संपादकाचे काम केले आणि काही पुस्तकांचेही प्रकाशन केले. पण ह्या तरुणाला वेड लागले ते कथा वाचनाचे. 

फक्त मराठीतूनच नाही तर इतर भाषांतूनही- इंग्रजी, हिंदी, मराठी भाषांतरांच्या माध्यमाने. तेवढ्यात त्यांनी एडवर्ड ओब्रायन ह्या संपादकाने संपादित केलेल्या दरवर्षीच्या सर्वोत्कृष्ट कथांचे संग्रह पाहिले आणि मराठीतूनही आपण असे काम करावे असे त्याने मनात घेतले. वास्तविक त्यांनी बी. ए. ची परीक्षाही दिली नव्हती. तेवढी त्यांना फुरसतही नव्हती. कथा वाचणे, त्यांची काटेकोर नोंद करणे आणि त्यातून उत्कृष्ट वाटणाऱ्या कथांची निवड करणे ह्या गोष्टींचा त्याला ध्यास लागला. नुकतेच लग्न झाले होते, छायाताई ह्याही ह्या वेडाने झपाटल्या. दोघांनी मिळून प्रचंड काम केले. 

ह्या कामाला दिशा देण्यात प्रा. वा. ल. कुलकर्णी यांचा हातभार लागला. वालंनी तोवर लघुकथा ह्या विषयावर महत्त्वपूर्ण लेख लिहिले होते. त्याशिवाय वाङ्मयीन चर्चा करायला ते तत्पर असत. कोलारकरांच्या कामावर ते खूष होते. मला ते सारखे सांगत, 'हा ग्रॅज्युएट होऊ दे, मी त्याला डॉक्टरेट देतो' परंतु कोलारकर आपल्या कामात दंग. त्यांनी पुढील पंचवीस-तीस वर्षांत मराठी कथेवर प्रचंड काम केले. मूळ प्रकल्पानुसार त्यांनी मराठी कथेच्या सुरुवातीपासून नवकथेच्या सुरुवातीपर्यंत. . . म्हणजे 1944 पर्यंत सर्व कथांची सूची तयार केली. ती सर्वोत्कृष्ट मराठी कथा खंड 1, खंड 2 चे पूर्वार्ध व उत्तरार्ध अशा तीन भागांत छापली आहे. ही माहिती जमवण्यासाठी कोलारकरांना प्रामुख्याने मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात आणि इतर वाचनालयांतही अनेक फायली पालथ्या घालाव्या लागल्या. 

आता कोणाही संशोधकाला किंवा लेखकाला ही सारी माहिती आपसूक मिळणार आहे. विसरल्या गेलेल्या गो. गं. लिमये, चिं. य. मराठे, कमलाबाई टिळक अशा लेखकांचा शोध ह्या संशोधनामधून लागला. त्यानंतरच्या काळातील कथांचेही त्यांनी अनेक निवडक संग्रह प्रसिद्ध केले. आचार्य अत्रे यांनी त्यांच्या अपूर्व शैलीत कोलारकरांना मराठी कथेचे कोलंबस हा किताब देऊन टाकला तर अनेकांनी मराठी कथेचा सायक्लोपीडिया हा कोलारकरांचा अधिकार मान्य केला. ह्या कोलारकरांचा आणि कोणत्याही विद्यापीठाचा संबंध आला नाही. वास्तविक 'ऑथर इन रेसिडेन्सी' अशी व्यवस्था काही विद्यापीठात असते अशी 'एडिटर इन रेसिडेन्सी' अशी कोलारकरांची नेमणूक झाली असती तर ह्या क्षेत्रात खूप काम झाले असते. अर्थात तो जमाना उत्तम कथालेखनाचा होता. आज ह्या क्षेत्रात पूर्वीइतका 'थ्रिल' मिळत नाही हेही खरे.

Tags: राम कोलारकर. बंदीश संगीत विष्णू भातखंडे महाराष्ट्र सारस्वत मराठा रियासत इतिहास विद्यापीठ Ram Kolarkar. #संशोधन Bandish Music Vishnu Bhatkhande Maharashtra Saraswat Maratha Riyasat History University Discovery weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

रामदास भटकळ

पॉप्युलर प्रकाशन या पुस्तक प्रकाशन संस्थेचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके