डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

वसंत बापट यांच्या जन्मशताब्दीनिमित्त प्रसिद्ध झालेल्या अंकामुळे अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. अंकातील सर्वच लेख उत्तम आहेत, आणि त्यांच्या चतुरस्र व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडतात. बालवयात आम्ही भावंडे राष्ट्र सेवादलात तीन-चार वर्षे तरी जात होतो. त्यामुळे सेवादलात गायल्या जात असलेल्या व आजवर लक्षात राहिलेल्या काही गाण्यांच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. विशेषत: साने गुरुजींनी लिहिलेल्या ‘उठू दे देश, पेटू दे देश येथून तेथून सारा पेटू देश' पासून पुढे वसंत बापटांनी लिहिलेल्या असंख्य गाण्यांच्या आठवणी श्यामला वनारसे, झेलम परांजपे, उषा मेहता यांच्या लेखांमधून जाग्या झाल्या.

1950-51 मध्ये सेवादलाच्या कलापथकाचा लोकनृत्य नाटकाचा ‘पुढारी पाहिजे’चा प्रयोग साताऱ्यात केला गेला. त्यामध्ये गोऱ्या साहेबांच्या छोट्या भूमिकेतील बापट पहिल्यांदा पाहिले. पुढे कधी बापटांना भेटण्याचा योग येण्याची शक्यता नव्हती, कारण 1960 नंतर 1988 पर्यंत भारत सरकारच्या नोकरीमुळे माझे वास्तव्य महाराष्ट्राबाहेर होते.

1980-81 मध्ये बॅरिस्टर अंतुलेंना इंदिरा गांधींनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नियुक्त केले. त्यामुळे अंतुलेंनी आपले मराठीपण अधोरेखित करण्यासाठी ‘मी लंडनमधून छत्रपतींची भवानी तलवार परत आणीन’ अशी घोषणा केली. तसेच 1980-81 मध्ये शिवाजी महाराजांची त्रिशतकी जन्मशताब्दी साजरी करण्यासाठी जे वेगवेगळे कार्यक्रम झाले, त्यात राष्ट्र सेवादलाने ‘शिवदर्शन’ हा कार्यक्रम अनेक ठिकाणी सादर केला व तो उत्तम निर्मितीमूल्यांमुळे खूप गाजला. अंतुलेसाहेबांनी आपली शिवाजीनिष्ठेची ग्वाही देण्यासाठी शिवदर्शन हा कार्यक्रम उत्तर हिंदुस्थानातील काही महत्त्वाच्या शहरांत महाराष्ट्र सरकार स्पॉन्सर करेल असा निर्णय घेतला. त्यासाठी इंदोर, आग्रा, चंडीगढ ही शहरे निवडण्यात आली.

योगायोग असा की, त्यावेळपर्यंत माझे चंडीगढमध्ये वास्तव्य होते, एवढेच नव्हे तर मी महाराष्ट्र मंडळाचा सेक्रेटरी आणि प्रमुख कार्यकर्त्यांमधील एक असल्याने, चंडीगढमधील शिवदर्शन प्रयोग करण्याची जबाबदारी माझ्याकडे आली. त्या वेळी लीलाधर हेगडे यांच्याशी संवाद साधला, त्यांच्याकडून सेवादल पथक प्रथम नागदा, इंदोर, आग्रा येथील कार्यक्रम उरकून चंडीगढमध्ये येईल असे कळले. चंडीगढ कार्यक्रमाच्या तारखा लक्षात घेऊन टागोर हॉलचे बुकींग केले व त्याप्रसंगी सोव्हिनर काढून जाहिरातीतून मंडळासाठी फंड गोळा करण्याचे ठरल्याने सोव्हिनयरचे लेखन करून छपाईचे नियोजन पूर्ण केले. अशा तऱ्हेचे प्रयोग आम्ही त्यापूर्वी, भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, प्रभाकर कारेकर यांचे व इतर काही कार्यक्रम करून महाराष्ट्र भवन चंडीगढसाठी फंड जमा केला होता.

कार्यक्रम तयार झाल्यावर ऐनवेळी एक मोठेच विघ्न आले, त्यामुळे सेवादल हा कार्यक्रम करू शकेल का याविषयी शंका निर्माण झाली. त्याचे असे झाले की, डिझेलच्या किंमती अचानक वाढल्याने सेवादलाची बस आणि नाट्यप्रयोगाचा खर्च अचानक रुपये पंधरा हजार रुपये इतका वाढल्याने खर्चाचे बजेट कोडमडले. कारण महाराष्ट्र शासनाच्या स्पॉन्सरशिप फीमध्ये ते बसत नसल्याने सेवादलावर सर्वच दौरा रद्द करण्याची वेळ आल्याचे लीलाधर हेगडे यांनी कळवल्याने, काही तरी तातडीने करण्याची वेळ आली. कार्यक्रमाची घोषणा आधीच झाल्याने तिकीटविक्री व इतर सर्व व्यवस्था सुरू झाली होती. याप्रसंगी माझे सातारा कनेक्शन कामी आले. श्रीमंत राजमाता सुमित्राराजे भोसले यांचे आगाशे कुटुंबीयांशी जवळचे संबंध असल्याने व त्यांची व्यक्तिगत ओळख, तिचा मी वापर करून त्यांच्याशी संपर्क साधला. त्रिशत सांवत्सरी योजनेसाठी नेमलेल्या समितीच्या सुमित्राराजे अध्यक्ष्या होत्या. त्यांनी अंतुल्यांजवळ ही अडचण मांडली. त्यांनी ताबडतोब रुपये 4000 ने बजेट वाढवले व सेक्रेटरी देशमुख यांना तसे कळवले. त्यामुळे कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की होता होता वाचली.

ठरल्याप्रमाणे वसंत बापट व हेगडे यांच्या नेतृत्वात 25 कलाकारांची बस व ट्रक येऊन पोहोचले. त्यांची राहण्याची व्यवस्था प्रोफेसर कुलकर्णी यांनी टेक्निकल टीसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या होस्टेलवर केली व महामंडळाच्या कर्तबगार महिला सदस्या सौ.प्रमिला मेहेंदळे व त्यांची बहीण सौ.मांडे व सुनंदा कुलकर्णी यांनी अंगावर घेऊन चार दिवस श्री.मेहेंदळे, चीफ इंजिनियर यांच्या बंगल्याच्या लॉजवर बसून त्यांना जेऊ घातले.

ठरल्या दिवशी शिवदर्शनचा बहारदार प्रयोग चंडीगढमध्ये खूप गाजला. कार्यक्रमाला मूळचे साताऱ्याचे, हरियाणाचे श्री.तपासे उपस्थित होते. त्यांना हा कार्यक्रम इतका आवडला की, मध्ये एक दिवस सोडून तोच प्रयोग हरियाणा सांस्कृतिक विभागामध्ये पुन्हा होणार असल्याचे जाहीर केले.

पुढचा दिवस रिकामा असल्याने मी, बापट आणि प्रयोगातील सर्वांना सुप्रसिद्ध पिंजौर गार्डन बघायला घेऊन गेलो. त्या दिवशी दुपारचे भोजन हरियाणा राजभवनावर होते. सर्व मुले-मुली सकाळी हिंडल्यामुळे राजभवनवर पोहोचण्याआधीच दमली व भुकेली होती. जेवण वाढायला वेळ असल्याने चुळबूळ करत असल्याचे लक्षात आल्याने तपासे त्यांना म्हणाले, ‘दाबून धरलेले दिसता’ असे म्हणून टॉयलेट ब्लॉकडे इशारा केला. त्यामुळे सर्वजण विशेषत: बायका-मुली, लगेच तिकडे वळाले.

जेवण उत्तम होते. बापटांना तपासेंनी आपल्याबरोबर जेवायला आत नेले. स्वातंत्र्यपूर्व काळापासून काँग्रेसमध्ये एकत्र असल्याने त्यांचा मोकळेपणाने संवाद झाला. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी हरियाणातर्फे पुन्हा प्रयोग झाला. प्रयोगाच्या शेवटी तपास्यांच्या सुनेने जिजाबार्इंचा रोल करणाऱ्या महिलांची महाराष्ट्रीय पद्धतीने ओटी भरून व साडीचोळी देऊन वाकून नमस्कार केला. ही महाराष्ट्राची परंपरा असल्याने तपास्यांनी स्थानिक प्रेक्षकांना सांगितले.

मंडळाचे एक चाहते दिल्लीमधून आले होते. त्यांना हा प्रयोग इतका आवडला की, परतीच्या प्रवासात त्यांचा आणखी एक प्रयोग मी ठरवतो असे सांगून पुढे गेले. दिल्लीमध्ये दोन दिवसांच्या नोटिसीवर हॉल, थिएटर कठीण असूनही श्री.गुप्तांनी सर्व खटपट करून गुजराती समाजाचा हॉल मिळवल्याने आमची दोन-तीन दिवसांची सोबत संपली. दोन जादा प्रयोग मिळाल्याने सेवादलाचा फायदाच झाला. चंडीगढ महाराष्ट्र मंडळालाही जाहिरातींमधून 70,000 रुपयांची कमाई झाली. त्याचा उपयोग मंडळाची वास्तू उभारण्यात झाला.

जाण्याआधीच्या रात्रीच्या जेवणानंतर वसंत बापटांमधील कलाकार जागा झाला. त्यांनी अर्धा तास एकपात्री प्रयोग करून सर्वांना पोट धरून हसायला लावले. संवाद कोणत्या भाषेत होता? म्हणजे तेलगु किंवा संस्कृतचा अपभ्रंश असावा. कारण मधून मधून लक्ष्मणा, लक्ष्मणा म्हणून दुसऱ्या पायाला संबोधायचे.

माझे दोन-तीन दिवस बापट आणि मुलांच्या संगतीत गेले, हा सर्व योगायोगाचा भाग. साताऱ्यात बापटांचे मामा निवृत्त कॅप्टन भिडे राहत असल्याने त्याबद्दल एकमेकांशी बोललो. अचानक घडून आलेल्या या भेटीचा वृत्तांत इथेच संपवतो.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके