डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

‘इंटरनॅशनल क्रॉप रिसर्चइन्स्टिट्यूट फॉर सेमी-एरिड ट्रॉपिस’ या हैद्राबादमधील संशोधन संस्थेने काही महिन्यांपूर्वी ज्वारी या वनस्पतीचा डी.एन.ए. कोड पूर्णार्थाने उलगडण्यात यश मिळविले आहे.

यामुळे भविष्यात अत्यंत कमी पाण्यावर भरघोस उत्पादन देणारे ज्वारीचे बियाणे विकसित करण्यात आमच्या शास्त्रज्ञांना यश मिळू शकेल. हैद्राबादच्या याच संशोधन करणाऱ्या संस्थेने सहा महिन्यांपूर्वी तुरीचे अधिक उत्पादक संकरित वाण बाजारात आणले आहे. ते कसाला उतरले तर देशातील कडधान्यांची टंचाई कमी होण्यास हातभार लागणार आहे. तशाच प्रकारे जेनेटिक मॉडिफिकेशन तंत्रज्ञानाचा अवलंबकरून कोण्या एका भारतीय वैज्ञानिकाने राईचे संकरित वाण निर्माण केले आहे.

हे सर्व प्रयोग यशस्वी ठरले तर कमी पर्जन्यमान असणाऱ्या प्रदेशात हरितक्रांती साकार होऊ शकेल.

शेती आणि विज्ञान यांचा संबंध शेती करण्याला सुरुवात झाल्यापासून निर्माण झाल्याचे दाखविता येणे शक्य व्हावे. कारण निसर्गामध्ये उपलब्ध असणाऱ्या लाखो वनस्पतींमधून आपल्या आहारासाठी सुयोग्य ठरणाऱ्या आणि ज्यांच्यापासून अधिक उत्पादन मिळू शकेल अशा धान्यांची बियाणी निवडण्याचे काम आदिमानवाने सुरू केले. तसेच, अशा शोधलेल्या बियाण्यामधील अधिक उत्पादन व दर्जेदार प्रजातींची बियाणी पुढील हंगामात पेरा करण्यासाठी राखून ठेवण्यासही त्याने सुरुवात केली. म्हणजे आज आधुनिक काळात कृषिशास्त्रज्ञ लाखो रोपांमधून निवड पद्धतीने, आपल्याला ज्या गुणधर्माची रोपे हवी आहेत त्यांची निवड करण्याचे काम जेवढ्या तन्मयतेने करतात, तशाच प्रकारे निवड पद्धतीने धान्याची बियाणी निश्चित करण्याचे काम मानवाकडून गेली हजारो वर्षे सुरू राहिल्याचे आपल्या निदर्शनास येते. वनस्पतीमध्ये बदल होण्याची प्रक्रिया निसर्गात अखंडित पद्धतीने सुरू आहे. अशा रीतीने होणाऱ्या बदलांचे निरीक्षण करून अधिक चांगल्या दर्जाची वाणे निवडून त्यांचे जतन करणे आणि त्यांचा प्रसार करणे, हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग बनला आहे. आज आपण ऐहिक जीवनाच्या संदर्भात विकासाच्या ज्या टप्प्यावर आहोत, त्या टप्प्यावर आपल्याला पोहोचविण्याच्या कामाला, इतिहासक्रमात लाखो लोकांच्या सूक्ष्माचा वेध घेणाऱ्या निरीक्षण शक्तीने हातभार लावला आहे. ही गोष्ट लक्षात घेऊनच आधुनिक काळातील कृषि विज्ञानाचा उदम आणि विकास यांचा मागोवा घेणे उचित ठरावे.

जगामध्ये शेतीचा शोध लागून माणसाने शेती करायला सुमारे 12000 वर्षांपूर्वी सुरुवात केली असावी, असा त्या विषयातील तज्ज्ञांचा कयास आहे. जंगलात पायपीट करून उपजीविकेसाठी खाद्यान्न मिळविण्यापेक्षा जंगलात नैसर्गिकरित्या उपलब्ध असणाऱ्या बियाण्याचा पेरा करून त्यापासून आपले अन्न उपलब्ध करून घेण्यास आदिमानवाने सुरुवात केली. अशी शेती करण्यास सुरुवात केल्यामुळे उपजीविकेसाठी कराव्या लागणाऱ्या श्रमांत लक्षणीय कपात घडून आली. यामुळे नागरी संस्कृती निर्माण होऊन तिच्या विकासाला चालना मिळाली. सुरुवातीला नदीकाठच्या गाळाच्या व नैसर्गिकरित्या सुपीक आणि आर्द्रता असणाऱ्या जमिनीवर प्रामुख्याने गहू, भात, जवस, मका इत्यादी तृणधान्यांची लागवड करून, आपल्याला आणि आपल्या टोळीला वर्षभर पुरेल एवढ्या धान्याचे उत्पादन घेण्यास सुरुवात झाली. यामुळे वर्षभरासाठी पिकविलेले धान्य साठवून ठेवण्यासाठी धान्याची कोठारे तयार करण्याची गरज निर्माण झाली. तसेच शेतात पिकविलेले धान्य धान्याच्या कोठारापर्यंत कमीत कमी मानवी श्रमात वाहून नेण्यासाठी पाळीव प्राण्यांचा वापर सुरू झाला. अशा रीतीने आपल्या टोळीच्या निर्वाहासाठी साठविलेले धान्य दुसऱ्या टोळीने लुटून ‘स्त करू नये म्हणून कोठारांचे रक्षण करण्यासाठी व्यावसायिक सैन्यदल उभे करण्यास सुरुवात झाली. थोडक्यात औद्योगिक क्रांतीला सुरुवात होण्यापूर्वी हजारो वर्षे आधी, काही प्रमाणात श्रम विभागणीची प्रक्रिया सुरू झाल्याचे आपल्या निदर्शनास येते.

शेती व्यवसायाला सुरुवात झाल्यामुळे निर्वाहासाठी कराव्या लागणाऱ्या श्रमामध्ये लक्षणीय प्रमाणात कपात झाल्यामुळे नव्या कृषिप्रधान समाजात मानवी संस्कृतीच्या विकासाला चालना देणारे अनेक बदल घडू लागले. त्यातील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे, निसर्गचक्राचे अवलोकन करून त्याच्याआधारे शेती करण्याचा व्यवहार अधिक शास्त्रीय पायावर उभा करण्याच्या प्रक्रियेला चालना मिळाली, हा होय. तसेच शेतीसाठी शक्य असेल तेथे शाश्वत पाणीपुरवठा व्हावा यासाठी सिंचनाची सोय करण्यास जगामध्ये सुरुवात झाली. त्याचप्रमाणे शेतजमिनीची मशागत करण्यासाठी जगातील विविध संस्कृतींमध्ये शेतीअवजारे विकसित होऊ लागली. याच प्रक्रियेमध्ये पाळीव प्राण्यांची शक्ती वापरून जमिनीची नांगरट करण्यास सुरुवात झाली. ब्राँझ या धातूचा माणसाला शोध लागल्यावर शेतीची अवजारे धातूची बनू लागली. यामुळे पूर्वी ज्या जमिनीची नांगरट अशक्य ठरत होती, अशा जमिनी कसल्या जाऊ लागल्या. अशा रीतीने एका बाजूला कृषिविस्ताराला चालना देणारे बदल सुरू असतानाच, दुसऱ्या बाजूला निसर्गात उपलब्ध असणारी नवनवीन अधिक उत्पादक बियाणी निवडून त्यामाध्यामांद्वारे शेती अधिक उत्पादक करण्याचे प्रयत्न  जगभर अव्याहत सुरू राहिलेले दिसून येतात. या प्रक्रियेला एक प्रकारे निसर्गानेही हातभार लावलेला आढळतो. उदाहरणार्थ, निसर्गक्रमात वनस्पतींमध्ये सूक्ष्म बदल घडून येतात. ते योग्य प्रकारे हेरून, केवळ पोषण मूल्यापुरता विचार न करता, स्वाद आणि चव या बाबतीत पसंतीला उतरणाऱ्या बियाण्यांची निवड करून, माणसाने आपले जीवन संपन्न बनविण्यास सुरुवात केली. जगभरच्या विविध भौगोलिक प्रदेशांमध्ये कृषि उत्क्रांतीची ही प्रक्रिया अव्याहतपणे सुरू राहिलेली आढळते.

जगभरातील विविध संस्कृतीमध्ये कृषी उत्क्रांतीची प्रक्रिया सातत्याने सुरू राहिलेली पहावयास मिळते. या संदर्भात भारतातील स्थिती कशा प्रकारची होती याचा आढावा घेण्याचा आपण प्रयत्न करू या. पुरातन वास्तुशास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार फार प्राचीन काळापासून मध्ययुगापर्यंत भारताने कृषी उत्पादनाच्या संदर्भात फार मोठी आघाडी प्रस्थापित केली होती असे सूचित करणारे काही दस्तावेज आज उपलब्ध आहेत. साधारणपणे इसवीसन पूर्व 6000 वर्षांपूर्वी गंगा नदीच्या खोऱ्यामध्ये भाताची लागवड केली जात असे. नंतरच्या काळात इतर भागामध्येही ते पीक घेण्यास सुरुवात झाली. तसेच हिवाळ्यामध्ये गहू, बार्ली, ओट अशा तृणधान्यांसोबत मसूर, छोटा वाटाणा या कडधान्यांची लागवडही फार पुरातन काळापासून रूढ झालेली होती. तसेच पुढील 3000 वर्षांत त्यात अनेक पिकांची भर घालून भारतीय लोकांनी आपले जीवन संपन्न करण्याचे प्रयत्न सुरू ठेवलेले दिसतात. उदाहरणार्थ, या तीन हजार वर्षांच्या कालखंडात भारतामध्ये मूग, उडीद, चणा, तूर अशी कडधान्ये, तीळ, करडई, राई, एरंड आणि जवस अशा तेलबिया, कपास यासारखे तंतुमय पीक आणि बोर, द्राक्षे, खजूर, आंबा, ‘णस, तुती, आलुबुखार इत्यादी ‘ळझाडांची लागवड करून कृषी उत्पादनात मोलाची भर घालण्याचा प्रयत्न यशस्वीपणे पार पाडलेला दिसतो. याच बरोबर या काळात भारतीयांनी गाई, शेळ्या, मेंढ्या, गाढवे, घोडे, कुत्रे या प्राण्यांचे संगोपन करण्यास सुरुवात केलेली पहावयास मिळते.

जेथे वर्षातून केवळ शंभर दिवस पाऊस पडतो, अशा भारतासारख्या भूप्रदेशामध्ये यशस्वी शेती करायची तर या पावसाचे भाकीत करण्याची गरज अधोरेखित होते. या दृष्टीने निसर्गचक्र जाणून घेण्याचे काम इसवीसन पूर्व 400 वर्षांपूर्वी सुरू झाल्याचे ‘कृषी-पराशर’ या ग्रंथाद्वारे सूचित होते. आणि पुढे इसवीसन 587 मध्ये ते पूर्णत्वाला पोहोचल्याचे बृहतसंहिता या ग्रंथाने निर्देशित केले आहे. साधारणपणे या कालखंडात पावसाचे भाकीत करण्याचा एक कित्ता विकसित करण्यात आला. यामध्ये सूर्य आणि चंद्र यांच्या वर्षभरातील बदलणाऱ्या स्थानांचा विचार करून पावसाळा हा ऋतू कधी सुरू होईल, कधी संपेल व पावसाचे मान कसे राहील हे वर्तविण्याची एक पद्धत भारतातील त्यावेळच्या खगोल शास्त्रज्ञांनी विकसित केली. आजही बऱ्याच मोठ्या प्रमाणात भारतातील शेतकरी आपली शेतीची कामे, हे पंचांग पाहून करतात.

‘कृषी-पराशर’ या ग्रंथामध्ये भरघोस कृषी उत्पादनासाठी सेंद्रीय खतांचे महात्म्य वर्णन केलेले आहे. तसेच गाईच्या शेणापासून चांगले सेंद्रीय खत कसे करावे हे देखील नमूद केलेले आहे. पुढे कौटिल्याने शेण, गुरांची हाडे, मत्स्यांचे अवशेष आणि दूध यांच्या मिश्रणांचा खत म्हणून वापर करावा असा सल्ला दिला आहे. याच्याही पुढे जाऊन ख्रिस्तोत्तर पहिल्या शतकामध्ये ‘कुराल’ या ग्रंथामध्ये जमिनीची नांगरट करण्यापेक्षाही सेंद्रीय खतांचा वापर अधिक महत्त्वाचा असल्याचे नमूद केलेले आहे. त्यानंतरच्या हजार वर्षांमध्ये हिरवळीचा वापर सेंद्रीय खत म्हणून कसा करावा याविषयीचे लिखाण आज उपलब्ध आहे. तसेच शेतकऱ्यांनी आपल्या फळबागांच्या निगराणीसाठी जनावरांचे शेण, मूत, पशूंच्या हाडातील मगज, मेलेले मासे, तिळाची पेंड,मध, भिजवलेले उडीद, तूप यांचा वापर करून द्रवरूप खताची निर्मिती कशी करावी याचे वर्णन कुराल या ग्रंथात केलेले आहे.

पुरातन वस्तुशास्त्राच्या संशोधनानुसार इसवीसन पूर्व 1300 वर्षे आधी, इनामगाव या महाराष्ट्रातील गावामध्ये दगड आणि चिखल यांच्या साहाय्याने घोड नदीला बंधारा घालून पुराचे पाणी कालव्यामध्ये वळविण्याची सोय केलेली दिसून येते. अगदी ऋग्वेदामध्येही सिंचनासाठी नदीचे पाणी कालव्यांच्या माध्यमातून शेतात वळविण्याचे वा विहिरींच्या पाण्याचा अशा सिंचनासाठी वापर करण्याचे उल्लेख आहेत. इसवीसन पूर्व 500 ते 300 या बुद्धधर्मांचा प्रभाव असणाऱ्या काळातील वाङ्‌मयात, सिंचनासाठी तलावांच्या पाण्याचा वापर कसा नियमित करावा, यासंबंधीचे विवेचन केलेले पहावयास मिळते. तशाच प्रकारे कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्येही याच प्रश्नाच्या संदर्भात विस्तृत विवेचन केलेले आहे. दक्षिण भारतामध्ये तलावात साठविलेल्या पाण्याचा वापर करून मोठ्या प्रमाणावर शेती केली जायची. अशा सिंचनासाठी निर्माण केलेल्या तलावांची डागडुजी करणे, त्यात साठलेला गाळ उपसणे ही कामे त्या समाजात बिनधोक सुरू रहावीत यासाठी अशा पाणीपुरवठ्याच्या व्यवस्थेवर देखरेख करण्यासाठी ग्रामीण पातळीवर ग्रामस्थांचे एक मंडळ नियुक्त करण्याची पद्धत रूढ होती. संपूर्ण भारताचा विचार करायचा तर शेतीला हमखास पाणीपुरवठा करण्यासाठी विहिरीचे पाणी मोटेने उपसून ते पाटाने शेतीला पुरविण्याची पद्धत फार प्राचीन काळापासून भारतात रूढ होती.

आपण पेरलेल्या बियाण्यांपासून भरघोस उत्पादन मिळण्यासाठी पेरा केलेले बियाणे दर्जेदार असले पाहिजे, याचे ज्ञान सुमारे 2500 वर्षांपूर्वीच्या शेतकऱ्यांना होते. यामुळे अशा बियाण्यांची प्रत चांगली रहावी यासाठी काय काळजी घ्यावी, या संदर्भात कृषी-पराशर या ग्रंथात विस्तृत निवेदन केलेले पहावयास मिळते. पेरा करण्यासाठी राखून ठेवलेली बियाणी खडखडीत सुकवावीत, त्यातील तणांचे बी वेचून नष्ट करावे, बियाण्यांचे धान्य समान आकारमानाचे असावे, बियाणे मजबूत पिशव्यांमध्ये साठवावे, ते साठविण्याची जागा वाळवी व दमटपणा यापासून मुक्त असावी, इत्यादी सूचना या ग्रंथामध्ये शब्दबद्ध केलेल्या आहेत.

तसेच हवामानाचा अंदाज घेऊन शेतकऱ्याने कोणत्या धान्याचा पेरा आधी करावा व नंतर कोणते धान्य पेरावे या संदर्भातील विवेचन कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये केलेले आपल्याला दिसून येते. वाईट बियाणी विकणाऱ्या व्यापाऱ्यांना जबरदस्त शिक्षा करण्यात यावी, असे इसवीसन पूर्व 400 वर्षे आधी मनूने सांगून ठेवले होते.

शेती व्यवसायाशी निगडित असणारा पशुपालन व्यवसाय नेटकेपणाने कसा करावा, या संबंधीचे विवेचन ऋग्वेद, कृषी-पराशर, अर्थशास्त्र या ग्रंथांमध्ये करण्यात आलेले आहे. तसेच पशुधनाचे नीट संगोपन व्हावे यासाठी, प्रत्येक गावाच्या हद्दीत चराऊ कुरणे कशी राखावीत याचे विवेचन करण्यात आलेले आहे. बैल, गाई, म्हशी यांना साधारणपणे किती खाद्य लागते व ते त्यांना मिळावे यासाठी ग्राम समाजामध्ये कशा पद्धतीची व्यवस्था केली पाहिजे, हे सदर ग्रंथांमध्ये सांगितलेले आहेत. थोडक्यात शेती आणि त्या व्यवसायाशी निगडित असणारा पशुपालन व्यवसाय यांचा उत्कर्ष होण्यासाठी समाजाने काय करावे, याचे मापदंड ठरविण्याचे काम भारतात पुरातन काळापासून सुरू होते. पण पिकांवर पडणारे रोग, पिकांवर होणारा कीटकांचा हल्ला यांचा बंदोबस्त करण्यासाठी काही ठोस उपाय सुचविण्यात आपले पूर्वज यशस्वी ठरले नाहीत. तसेच पशुधनाला वेळप्रसंगी भेडसावणाऱ्या व्याधींवर काय उपाय योजावेत, यासंबंधी मार्गदर्शन करण्यात त्यांना यश आले नाही. पाळीव प्राण्यांना रोग होऊ नयेत म्हणून त्यांचे गोठे स्वच्छ ठेवावेत, एवढा एकच महत्त्वाचा सल्ला  त्यांनी शेतकऱ्यांना दिल्याचे आपल्या निदर्शनास येते.

या मध्ययुगीन भारतातील कृषी-संस्कृती खूपच पुढारलेलीहोती. भारत हा खंडप्राय देश. तसेच येथील हवामान कृषी उत्पादनाला सुयोग्य. यामुळे भारताने कृषी उत्पादनात आघाडी घेतली होती. या विकासक्रमाला जसा निसर्गाचा वरदहस्त लाभला होता, तसाच यामध्ये येथील माणसांच्या उद्यमशीलतेचाही त्यात मोठा हिस्सा होता. निसर्गात निर्माण झालेल्या वनस्पतींचे गुणधर्म ओळखून, त्यांची लागवड करून, त्यापासून आपल्या चवी तृप्त करण्यामध्ये भारतीय कृषी-तज्ज्ञांनी तत्परता दाखविलेली दिसून येते. या संदर्भात सर्वांत महत्त्वाचे उदाहरण म्हणजे भारतामध्ये फार प्राचीन काळापासून उसाची लागवड करण्यात येत होती. तसेच अशा उसाचा रस काढून त्यापासून गूळ बनविण्याची पद्धत येथे रूढ झाली होती. तशाच प्रकारे अन्नाची रूची वाढविण्यासाठी मसाल्याच्या वनस्पतींचा शोध घेऊन त्यांची लागवड करण्यात, भारतीय लोक जगातील त्या वेळच्या इतर समाजाच्या तुलनेत फारच पुढारलेले होते असे म्हणता येईल. तशाच प्रकारे कापसाची लागवड करून त्यापासून कापड तयार करण्यास फार पुरातन काळापासून सुरुवात झालेली पहावयास मिळते. कापसापासून केवळ वस्त्रे तयार करण्याने भारतीयांचे समाधान झाले नाही, तर विविध रंगाच्या फळाफुलांचा वापर करून रंगीबेरंगी वस्त्रे तयार करण्यात भारतीयांनी आघाडी घेतल्याचे दिसून येते. यामुळेच मध्ययुगातच नव्हे, तर युरोपमध्ये औद्योगिक क्रांतीला सुरुवात होईपर्यंत भारतात उत्पादन केलेल्या रंगीत वस्त्रांना युरोप खंडामध्ये भरपूर मागणी होती, ही गोष्ट खास नमूद करायला हवी. भारतात इंग्लंडची ईस्ट इंडिया कंपनी आली ती भारतातून तयार होणारे कापड युरोपमध्ये विकण्यासाठी खरेदीदार म्हणून! पण इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीची मुहूर्तमेढ लावली गेल्यानंतर ‘कंपनी’ची भूमिका बदलली. मग भारतामधून तयार कापडाऐवजी कापसाची निर्यात सुरू झाली.

दुसऱ्या पद्धतीने विचार करायचा तर, पश्चिम युरोपमध्ये औद्योगिक क्रांतीची लाट फुटण्यापूर्वी तेथील शेतीक्षेत्राच्या उत्पादकतेपेक्षा, भारतामधील शेतीक्षेत्राची उत्पादकता अधिक होती. कारण युरोपमधील सरंजामशाही पद्धतीच्या समाजरचनेमुळे तेथे प्रत्यक्ष शेती करणाऱ्या भूदासाला शेती करण्यामध्ये सुधारणा करून आपले जीवन आर्थिकदृष्ट्या संपन्न करण्याचा पर्याय उपलब्ध नव्हता. याच्या उलट भारतामध्ये पूर्वापार स्वतंत्र शेतकऱ्यांचा वर्ग अस्तित्वात होता. अशा स्वतंत्र शेतकऱ्यांनी अधिक नेटकेपणाने शेती केल्यास त्यांना विकासाची मधुर फळे चाखण्याची संधी उपलब्ध होती. यामुळेच इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीला सुरुवात होऊन तेथील सरंजामी व्यवस्थेचा अंत होईपर्यंत, भारतामधील कृषीक्षेत्रामधील उत्पादन संबंध कृषी विकासाला चालना देणारे होते. याचा परिणाम म्हणून भारतात अधिक आणि शाश्वत उत्पादनासाठी पिकामध्ये फेरपालट करण्याची पद्धत मोठ्या प्रमाणावर रूढ होती. तसेच शेतामध्ये एका कृषी हंगामात एकाच तृणधान्याचा पेरा न करता, तृणधान्याबरोबर शेतामध्ये तृणधान्याच्या काही ओळीनंतर द्विदल धान्याच्या एक-दोन ओळी लावण्याची पद्धत मोठ्या प्रमाणावर रूढ होती. तसेच खरिपामध्ये भाताचे पीक घेतल्यावर त्या शेतामध्ये रब्बी हंगामात कडधान्याचे पीक घेतले जात असे. यामुळे भाताच्या पिकावर वाढणाऱ्या रोगांचा नायनाट तर होईच, पण त्याचबरोबर कडधान्याच्या लागवडीमुळे त्या पिकाच्या मुळांकडे आकर्षिल्या जाणाऱ्या सूक्ष्म जिवाणूंमुळे, हवेतील नत्र जमिनीमध्ये स्थिर होण्यास हातभार लागत असे. पण पश्चिम युरोपमध्ये औद्योगिक क्रांतीची लाट फुटली आणि तेथे सरंजामशाहीचा अंत होऊन स्वतंत्र शेतकऱ्यांचा वर्ग अस्तित्वात आला. त्यानंतर तेथे शेती विकासाला जोरदार चालना मिळाली. या कालखंडामध्ये युरोपमधील लोकसंख्याही वेगाने वाढत होती. या वाढणाऱ्या लोकसंख्येची भूक भागविण्यासाठी तेथे शेती उत्पादनात वाढ करण्याची गरज निर्माण झाली. अशी वाट साध्य करण्यासाठी आवश्यक ठरणाऱ्या आधुनिक विज्ञानाचा पाया तेथे घातला गेला होता. या आधुनिक विज्ञानाचा वापर करून तेथे शेती उत्पादन वाढविण्यास सुरुवात झाली आणि एकदा ही सुरुवात झाल्यावर तेथे शेतीक्षेत्राच्या प्रगतीची जी घोडदौडसुरू झाली, ती आजतागायत अविरतपणे सुरू आहे.

युरोपमध्ये आधुनिक विज्ञानाचे युग सुरू झाल्यानंतर तेथे जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये या आधुनिक विज्ञानाने मुसंडी मारण्यास सुरुवात केली. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर जर्मन शास्त्रज्ञ जस्टुस हॉन लेयबिग आणि फ्रेंच शास्त्रज्ञ जीन बाप्टिस्ट बोसिंगॉल्ट यांनी मृद-रसायन शास्त्राचा पाया घातला. याच सुमारास 1842 साली सर बेनेट लावेस याने सुपर फॉस्फेट या रासामनिक खताचे औद्योगिक उत्पादन करण्याचा शोध लावला. तसेच या कालखंडात दक्षिण अमेरिकेतील चिली या देशातून नैसर्गिक अमोनियम नायट्रेट या खताची आयात, उत्तर अमेरिकेतील व पश्चिम युरोपमधील बंदरामध्ये सुरू झाली. परंतु तरीही 20 व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात शेतीसाठी प्रामुख्याने सेंद्रीय खतांचा वापरच सुरू होता. याच कालखंडात हेबर बोश या जर्मन रसायन शास्त्रज्ञाने हवेतील नत्र अमोनियम नायट्रेट या संयुगामध्ये स्थिर करण्याचा शोध लावला. या शोधाचा वापर करून औद्योगिकरित्या अमोनियम नायट्रेट तयार करण्याची प्रक्रिया विकसित करण्याचे काम कार्ल बोश या शास्त्रज्ञाने केले. यामुळे जर्मनीमध्ये अमोनियम नायट्रेट तयार करण्यास सुरुवातही झाली. पण याच काळात पहिल्या महायुद्धाला तोंड फुटल्यामुळे या अमोनियम नायट्रेटचा वापर पिकासाठी रासायनिक खत म्हणून होण्याऐवजी युद्धासाठी स्फोटके बनविण्यासाठी होऊ लागला. पहिले जागतिक महायुद्ध 1919 मध्ये समाप्त झाले. त्यानंतर झालेल्या उलथापालथीतून जगबाहेर पडेपर्यंत, संपूर्ण जगाला 1930 च्या आर्थिक महामंदीने ग्रासले. या अरिष्टाचा परिणाम म्हणून बाजारपेठेतील शेतमालाची मागणी घटत गेली. यामुळे कृषिमालाचे उत्पादन वाढविण्यासाठी सुरू असणाऱ्या प्रयासांना खीळ बसली. ही अवस्था दुसऱ्या जागतिक महायुद्धाला तोंड फुटेपर्यंत कायम राहिली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात नवनवीन शस्त्रास्त्रांची निर्मिती व वापर करण्याला स्वाभाविकपणेच प्राधान्य मिळाले. पण दुसरे महायुद्ध समाप्त झाल्यावर जगातील राजकीय धुरीण आणि शास्त्रज्ञ यांचे लक्ष जगातील वाढती उपासमार आणि वाढते कुपोषण या समस्यांकडे जाऊ लागले. परिणामी कृषी विषयक संशोधनाला चालना मिळाली आणि या संशोधनाचे पर्यवसान मेक्सिको या देशामध्ये हरितक्रांतीची सुरुवात होण्यात झाले. हा आधुनिक कृषिविज्ञानाचा इतिहास खूपच रंजक आहे.

दुसऱ्या महायुद्धाचा अंत दृष्टिपथात आला, तेव्हा 1943 साली मेक्सिको हा देश लोकांच्या उपजीविकेसाठी धान्याच्या आयातीवर विसंबून होता. तेव्हा या देशामध्ये त्यांच्या एकूण गरजेच्या सुमारे 50 टक्के उत्पादन देशांतर्गत होत असे व बाकी राहिलेली 50 टक्के गरज आयातीमार्फत भागविली जात असे. अशा परिस्थितीत मेक्सिकोमधील धान्याचे उत्पादन वाढावे या उद्देशाने मेक्सिकन सरकार, अमेरिकेतील रॉकफेलर आणि फोर्ड फाऊंडेशन यांच्या सहकार्याने गहू आणि मका या तृणधान्यांची अधिक उत्पादक बियाणी निर्माण करण्याचे काम 1944 साली सुरू करण्यात आले. या कामासाठी अमेरिकेतील कृषिवैज्ञानिक डॉ. नॉरमन बोरलॉग यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी अल्पावधीत उंचीला कमी पण धान्याचे भरपूर उत्पादन देणारे गव्हाचे संकरित वाण निर्माण करण्यात यश मिळविले. या संकरित वाणाचे खास गुणविशेष म्हणजे, हे वाण पिकासाठी दिलेल्या रासामनिक खताला उत्तम प्रकारे प्रतिसाद देऊन गव्हाचे अमाप पीक देणारे होते. तसेच सर्वसाधारणपणे गहू या पिकावर पडणाऱ्या रोगांना दाद न देणारे होते. या वाणाची मेक्सिकोमध्ये लागवड सुरू झाल्यावर अल्पावधीत मेक्सिकोने गव्हाच्या उत्पादनात आपल्या लोकसंख्येला पुरून उरेल एवढे गव्हाचे उत्पादन साध्य करून, गव्हाची निर्यात करण्यास सुरुवात केली. एकदा असे यश प्राप्त होताच कृषी-वैज्ञानिकांनी मागे वळून पाहिले नाही. त्यानंतर पुढील वीस वर्षांच्या कालखंडात जगभरातील अनेक देशांमध्ये, त्यांच्या हवामानाला सुयोग्य ठरणाऱ्या अधिक उत्पादक गव्हाच्या वाणांची निर्मिती करण्याच्या कामाने वेग घेतला. तसेच अशाप्रकारे विकसित केलेली अधिक उत्पादक वाणे आणि रासायनिक खते व किटाणूनाशके शेतकऱ्यांच्या शिवारापर्यंत पोहोचवून या आधुनिक शेतीचे तंत्र त्यांना शिकविण्याचे काम हा कृषिवैज्ञानिक आणि कृषिविस्तारक यांच्या दैनंदिन कामाचा भाग झाला. यामुळे भारत, पाकिस्तान, आफ्रिका खंडातील काही देश अशा अविकसित देशांमध्येही या आधुनिक कृषितंत्राचा झपाट्याने प्रसार झाला. जगामध्ये हे आधुनिक कृषीतंत्रज्ञान झपाट्याने पसरत गेल्यामुळे वाढत्या लोकसंख्येची धान्याची वाढती गरज पूर्ण करणे शेतकऱ्यांना शक्य झाले.

आंतरराष्ट्रीय पातळीवर गहू आणि मका या पिकांवर संशोधन करणारी संस्था मेक्सिको या देशात उभी करण्यामध्ये अमेरिकेच्या रॉकफेलर आणि फोर्ड फाऊंडेशन यांनी पुढाकार घेतला. तशाच प्रकारे एशियामधील महत्त्वाचे तृणधान्य, तांदूळ या पिकावर संशोधन करण्यासाठी इंटरनॅशनल राइस रिसर्च इन्स्टिट्यूट, फिलिपाईन्स या देशामध्ये स्थापन करण्यात आली. या संस्थेच्या माध्यमातून तांदुळाची अधिक उत्पादक वाणे विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. अशी संकरित वाणे कशी विकसित करायची याचा वस्तुपाठ, गव्हाची संकरित वाणे विकसित करण्याच्या कार्यक्रमाने घालून दिला होता. त्यामुळे त्याच तंत्राचा वापर करून अल्पावधीत आयआर 8 हे तांदुळाचे अधिक उत्पादक वाण विकसित करण्यास कृषी वैज्ञानिकांना वेळ लागला नाही. गव्हाच्या अधिक उत्पादक वाणाप्रमाणेच तांदुळाचे हे नवीन वाण बुटके, अधिक उत्पादक आणि रासायनिक खताला चांगला प्रतिसाद देणारे होते. अल्पावधीत तांदुळाचे हे संकरित वाण एशिया खंडामध्ये लोकप्रिय झाले. उत्तरेला साम्यवादी राष्ट्र चीनपासून दक्षिणेला इंडोनेशिया, फिलिपाईन्सपर्यंत सर्व एशियामधील देशांत या वाणाचे चांगले स्वागत झाले. यामुळे एशिया खंडातील तांदुळाचा दुष्काळ आटोकयात येऊ लागला. तेथील भुकेच्या समस्येची तीव्रता लक्षणीय प्रमाणात घसरणीला लागली.

मेक्सिकोमध्ये संशोधन करून विकसित केलेले गव्हाचे अधिक उत्पादक संकरित वाण किंवा फिलिपाइन्समध्ये विकसित केलेले तांदळाचे अधिक उत्पादक संकरित वाण, ही 20व्या शतकातील हरितक्रांतीच्या मार्गातील महत्त्वाची भर होती. यामुळे जगभरच्या कृषी वैज्ञानिकांना संशोधन करण्यासाठी एक नवा मार्ग सापडला. देशोदेशींच्या कृषी वैज्ञानिकांनी या नव्या वाटेने संशोधन सुरू ठेवून मिळालेल्या संधीचे अक्षरश: सोने केले. यामुळे जागतिक पातळीवर अन्नधान्याचे उत्पादन सुमारे तीस वर्षांच्या काळात जवळपास साडेतीन पट झाले. आता जगात अन्नधान्याचे पुरेसे उत्पादन होत असल्यामुळे कोणाची उपासमार सुरू राहिल्याचे दृश्य सहजपणे नजरेला पडत नाही. हेच या हरितक्रांतीचे फलित आहे. भारतापुरता विचार करायचा तर, येथील कृषी वैज्ञानिकांनी भारताचे कृषी हवामान आणि येथील जनतेच्या चवीढवी लक्षात घेऊन, गहू आणि तांदूळ या तृणधान्याची अधिक उत्पादक नवीन वाणे विकसित करण्याचे काम धडाकेबंद पद्धतीने केले. पण हे सर्व काम शाश्वत सिंचनाची सोय असणाऱ्या क्षेत्राला लाभदामक ठरू शकेल, अशाच स्वरूपाचे आहे. भारतातील लागवडीखालील 65 टक्के क्षेत्र हे लहरी पावसावर निर्भर असणारे आहे. एवढेच नव्हे, तर यामधील 50 टक्कयांपेक्षा जास्त क्षेत्रावर पडणाऱ्या पावसाचे प्रमाण, अत्यंत अपुरे, या सदरात मोडणारे आहे. एकदा ही गोष्ट विचारात घेतली तर पाण्याचा ताण सहन करू शकणारी धान्याची अधिक उत्पादक संकरित बियाणी निर्माण करण्याच्या कामाने वेग घेणे गरजेचे होते, पण प्रत्यक्षात तसे झाले नाही.

दुसऱ्या बाजूने पाहिले तर भारतात तांदूळ आणि गहू या तृणधान्यांचे उत्पादन, येथील लोकसंख्येची आजची गरज भागण्याएवढे होत असले तरी, आजपर्यंत विकसित करण्यात आलेले तंत्रज्ञान विचारात घेता, भविष्यात वाढणारी लोकसंख्या आणि सधनवर्गाची बदलत जाणारी जीवनशैली या बाबी विचारात घेता नजिकच्या काळात अन्नधान्याच्या संदर्भात प्राप्त केलेली स्वयंपूर्णता संपुष्टात येण्याची चिन्हे आता स्पष्ट झाली आहेत. यामुळेच गेल्या पाच वर्षांच्या काळात पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंह यांनी दुसऱ्या हरितक्रांतीची गरज सार्वजनिक व्यासपीठावरून वारंवार व्यक्त केली आहे. पण या दुसऱ्या हरितक्रांतीचा आशय काय असावा, हे स्पष्ट करण्याचे काम त्यांनी आजता गायत केलेले नाही. भारतातील पहिल्या हरितक्रांतीच्या तंत्रविज्ञानाला आता थकवा जाणवू लागला आहे, असे विधानही त्यांनी अधूनमधून केल्याचे वाचनात आले आहे. पण हा थकवा दूर करण्यासाठी गेल्या पाच वर्षांच्या काळात सरकारने काही ठोस कार्यक्रम हाती घेतलेला दिसत नाही. हरितक्रांतीच्या तंत्रविज्ञानाच्या थकव्याचा विचार करायचा तर असा थकवा जगाच्या पाठीवर सर्व ठिकाणी जाणवू लागलेला नाही. उदाहरणार्थ, चीनमध्ये भारताबरोबरचहरितक्रांतीचे रोपटे लावण्यात आले. पण तेथील कृषीवैज्ञानिकांनी तांदूळ आणि मका या पिकांच्या संदर्भात मूलभूत संशोधन करून या धान्यांची जगामधील सर्वांत अधिक उत्पादक वाणे विकसित केली आहेत. डॉ. नॉरमन बोरलॉग या कृषीवैज्ञानिकाने उघड केल्याप्रमाणे, चीनने तांदळाचे अधिक उत्पादक संकरित वाण विकसित करण्यासाठी अवलंबिलेली पद्धत पूर्णपणे वेगळी आहे. यामुळे भविष्यात गव्हाची नवीन संकरित वाणे विकसित करताना चीनच्या या पथदर्शी पद्धतीचा वापर करणे लाभदायक ठरणार आहे. चीनमधील कृषी वैज्ञानिक मुआन लाँगपिंग यांनी विकसित केलेले तांदळाचे वाण शेतकऱ्याला हेक्टरी दहा टन उत्पादन देणारे आहे. भारतामध्ये तांदळाची नवीन बियाणी वापरून, हेक्टरी सुमारे अडीच टन उत्पादन घेतले जाते, हे वास्तव लक्षात घेतले तर तांदुळाच्या संकरित वाणाच्या संदर्भात चीनने कशी हनुमान उडी मारली आहे ही बाब स्पष्ट होते. तशाच प्रकारे हुआ लाँग एक हे चीनने प्रसारित केलेले मक्याचे संकरित वाण हेक्टरी 25 टन उत्पादन देणारे आहे. तसेच या वाणाचे ताट तीन मीटर उंचीचे असल्यामुळे, या वाणापासून हेक्टरी 75 टन पशुखाद्य मिळते. अशा प्रकारचे नेत्रदीपक शोध भारतातील कृषीवैज्ञानिकांना लावता आलेले नाहीत.

एवढेच नव्हे, तर भारतीयांच्या आहाराचा प्रमुख घटक असणारी कडधान्ये आणि तेलबिया यांची अधिक उत्पादक संकरित वाणे विकसित करण्याचे काम, भारतीय कृषी वैज्ञानिक यशस्वीपणे करू शकलेले नाहीत. यामुळे भारतात हरितक्रांतीचा जसा विस्तार होत गेला, तसा कडधान्ये आणि तेलबिया या पिकांच्या खालील चांगल्या प्रतीच्या जमिनीचा वापर संकुचित होत गेला. यामुळे कडधान्ये आणि खाद्यतेल यांची मोठ्या प्रमाणावर आयात करण्यावाचून आपल्याला दुसरा पर्याय उरलेला नाही. आज भारतात खाद्यतेलाचे जेवढे उत्पादन होते, तेवढेच खाद्यतेल आपण आयात करतो. कडधान्यांच्या संदर्भातील स्थिती फारशी वेगळी नाही. आपले कडधान्यांचे उत्पादन आपली 70टक्के गरज पूर्ण करते, तर राहिलेली 30 टक्के गरज आयातीमार्फत भागविली जाते. या संदर्भात विचारात घेण्यासारखा आणखी एक मुद्दा म्हणजे, गेल्या 20/25 वर्षांमध्ये देशातील दरडोई प्रती दिवसाचा कडधान्याचा खप 70 ग्रॅमवरून 50 ग्रॅमपर्यंत घसरत गेला आहे. याचा अर्थ भारतीयांच्या आहारामधील प्रथिनांचे प्रमाण घसरणीला लागले आहे. यामधून देशातील कुपोषितांचे प्रमाण वाढीला लागल्याचे सूचित होते.

अशा सर्वांगाने विचार केला तर कृषी उत्पादनाच्या संदर्भात जागतिक पातळीवर एके काळी आघाडीवर असणारा देश, आधुनिक काळात आपले ते स्थान प्राप्त करण्यात यशस्वी झालेला नाही, हे सत्य कोणालाच नाकारता येणार नाही. पण अशी निराशाजनक स्थिती आज असली, तरी काही आशेचे किरण आज दिसू लागले आहेत. उदाहरणार्थ, ‘इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर सेमी-एरिड ट्रॉपिस’ या हैद्राबादमधील संशोधन संस्थेने काही महिन्यांपूर्वी ज्वारी या वनस्पतीचा डी.एन.ए. कोड पूर्णार्थाने उलगडण्यात यश मिळविले आहे. यामुळे भविष्यात अत्यंत कमी पाण्यावर भरघोस उत्पादन देणारे ज्वारीचे बियाणे विकसित करण्यात आमच्या शास्त्रज्ञांना यश मिळू शकेल. हैद्राबादच्या याच संशोधन करणाऱ्या संस्थेने सहा महिन्यांपूर्वी तुरीचे अधिक उत्पादक संकरित वाण बाजारात आणले आहे. ते कसाला उतरले तर देशातील कडधान्यांची टंचाई कमी होण्यास हातभार लागणार आहे. तशाच प्रकारे जेनेटिक मॉडिफिकेशन तंत्रज्ञानाचा अवलंब करून कोण्या एका भारतीय वैज्ञानिकाने राईचे संकरित वाण निर्माण केले आहे. हे सर्व प्रयोग यशस्वी ठरले तर कमी पर्जन्यमान असणाऱ्या प्रदेशात हरितक्रांती साकार होऊ शकेल. याला जर आपण ‘येऊ घातलेली दुसरी हरितक्रांती’हे नाव दिले तर ते सार्थ म्हणावे लागेल. ही दुसरी हरित क्रांती साकार व्हावी यासाठी सरकार कशी पावले उचलते, त्याकडे डोळे लावून प्रतिक्षा करणे एवढेच आपल्या हातांत आहे.

Tags: शेती विज्ञान प्रगती कृषीविज्ञान हरित क्रांतीची गरज दुसरी हरित क्रांती  अन्नधान्याची स्वयंपूर्णता संकरित बियाणे संशोधन शेतीपिके भारतीय शेती हरितक्रांती रमेश पाध्ये Modified seeds Norman Borlog Need of Second green revolution Wheat Rice Success of Indian Scientist Genetic Modification Second Green Revolution Green Revolution Ramesh padhye Farming weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके