डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंतचे शिक्षण ऑस्ट्रेलियात मोफत असते. हे जसे ऑस्ट्रेलियाचे वैशिष्ट्य, त्याप्रमाणे बससर्विसकडे अर्ज करून विद्यार्थ्यांना शाळा ते घर घर ते शाळा असा मोफत प्रवासाचा पास देणे हे वैशिष्ट्यच. अशा मुलांसाठी बसचे थांबूही वेगळे असतात. तेथून त्यांना शाळेत पोचविणे व शाळा सुटताच घरी आणणे ही जोखीम बस सेवा पत्करते. पण सामान्यतः प्रत्येक घरी मोटरगाडी उपलब्ध असते व नोकरी न करणार्‍या आयाही आपली गाडी चालवू शकतात. त्यामुळे मुलांना शाळेत पोचवणे-आणणे हे काम आयांच्यावरच पडते.

मी सिडनीतील बारावीच्या परीक्षांचे निकाल वाचीत होतो. मला आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. गुणवत्ता यादीत जास्तीत जास्त गुण मिळविणारे विद्यार्थी भारतीय किंवा चिनी होते. असला तर अपवादादाखल एखादा विद्यार्थी ऑस्ट्रेलियन. जोशी, वळंजू यासारखी परिचयाची मराठी नावे वाचून मी अगदीच खुशावलो. मार्कांची टक्केवारी 98.30%, इतकी होती. ही मुले एक तर पहिली पसंती वैद्यकीय शिक्षणाला किंवा कायद्याचे अभ्यासाला देणार हे उघड होते. मेडिसिन व कायदा या परीक्षा अस्ट्रेलियात सर्वोच्च मानल्या जातात. खोर्‍याने पैसा ओढणारे नागरिक एकतर डॉक्टर किंवा सॉलिसिटर हेच असतात.

विद्यापीठीय शिक्षणात प्रवेश सर्वांनाच मिळतो असे नाही. यंदा न्यू साउथ वेल्स आणि सिडनी या दोन्ही विद्यापीठात मिळून 23903 जागा होत्या; आणि 44 हजार 942 विद्यार्थ्यांना प्रवेश हवा होता. 21 हजार विद्यार्थ्यांना विद्यापीठात प्रवेश मिळाला नाही व ज्यांना मिळाला त्यांना आपल्या पसंतीचा विषय मिळाला असेही म्हणता येणार नाही. प्रत्येक विद्यार्थ्याला फॉर्म भरताना अनुक्रमाने पसंतीचे विषय लिहून द्यावे लागतात. बेनलिम नावाच्या विद्यार्थ्याची टक्केवारी 91.2 इतकी होती त्यांची पहिली पसंती कॉमर्सला होती पण कॉमर्सला त्याला प्रवेश मिळाला नाही. अर्थशास्त्र हा विषय घेऊन पदवी परीक्षा देणे त्याला पत्करावे लागले. याउलट ॲलन स्मिथ नावाच्या विद्यार्थ्यास 82.75%गुण मिळूनही तो विद्युत अभियांत्रिकी कॉलेजात जाऊ शकला. ज्यांना विद्यापीठात अजिबातच प्रवेश मिळत नाही असे नाकारली विद्यार्थी मग विद्यापीठबाह्य अभ्यासक्रमात डिप्लोमा मिळविणे पसंत करतात. इलाजच नसतो.

पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंतचे शिक्षण ऑस्ट्रेलियात मोफत असते. हे जसे ऑस्ट्रेलियाचे वैशिष्ट्य, त्याप्रमाणे बससर्विसकडे अर्ज करून विद्यार्थ्यांना शाळा ते घर घर ते शाळा असा मोफत प्रवासाचा पास देणे हे वैशिष्ट्यच. अशा मुलांसाठी बसचे थांबूही वेगळे असतात. तेथून त्यांना शाळेत पोचविणे व शाळा सुटताच घरी आणणे ही जोखीम बस सेवा पत्करते. पण सामान्यतः प्रत्येक घरी मोटरगाडी उपलब्ध असते व नोकरी न करणार्‍या आयाही आपली गाडी चालवू शकतात. त्यामुळे मुलांना शाळेत पोचवणे-आणणे हे काम आयांच्यावरच पडते.

ऑस्ट्रेलियात सरकारी शाळांना पूर्ण अनुदान मिळते आणि ते आपल्या भाषेत सांगायचे तर केंद्र सरकार कडून (फेडरल सरकारकडून) मिळते. खाजगी शाळाही बऱ्याच आहेत. आकडेवारीच सांगायची तर न्यू साउथ वेल्थ राज्यात 2523 शाळा. त्या पूर्ण फी घेतात व थोडेसे सरकारी अनुदानही. भारताप्रमाणेच एक प्रवृत्ती अशी दिसून येते ती ही की नेते मंडळी खासदार मंत्रिगण आणि लक्षावधी श्रीमंत यांची मुले खाजगी शाळेत पाठविले जातात. आजचा ऑस्ट्रेलियाचा पंतप्रधान कीटिंग हा मजूर पक्षाचा नेता. त्याची मुले खाजगी शाळेत शिकतात! विरोधी पक्ष प्रमुख डॉ. ह्युसन याची मुलेही खाजगी शाळेत. पण बारावीच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत येणारी मुले मात्र सरकारी (पब्लिक) शाळेतीलच असतात. यंदा किंग्जग्रोव्ह या उपनगरातील सरकारी शाळेच्या प्राचार्यांनी आणखी एक धक्कादायक विधान केले. ते म्हणाले ‘गुणवत्तेत अग्रभागी येणारी मुले ज्यांची मातृभाषा इंग्रजी नाही अशीच असतात. हा अनुभव अलीकडे पुन्हा पुन्हा येऊ लागला आहे’ या विधानावर वेगळे भाष्य नको.

इयत्ता सातवी पासून माध्यमिक शिक्षण सुरू झाले असे मानले जाते. इयत्ता सहावीच्या शेवटी जी मुले परीक्षेत उत्तीर्ण होतात त्यांच्यासाठी सिलेक्टिव्ह हायस्कूल असते. तेथे प्रवेश मिळाला की बारावीत गुणवत्ता यादीत येण्याचा मार्ग मोकळा होतो. आपल्याकडे माध्यमिक शाळेत शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या मुलांसाठी अशी सिलेक्टिव्ह हायस्कूल काढली तर ती बाब एखादे आंदोलन उभारले जाण्यास उपकारक ठरेल की काय, अशी शंका येते.

शिक्षण बारावीपर्यंत मोफत याचा अर्थ इतकाच की फी नाही. पण दर आठवड्यास काही ना काही नवा उपक्रम करून अगदी के. जी. मधील मुलेही पालकांकडून तीन ते पाच डॉलर वसूल करतात व शाळेत मॅडमना देतात. सहली असल्या अथवा मुलींना प्रात्यक्षिक म्हणून शाळेतील स्वयंपाकघरात एखादा जिन्नस तयार करण्यास सांगितला तर डॉलर्सची मागणी होतेच. उन्हाळ्यातील शाळेचा युनिफॉर्म आणि हिवाळ्यातील युनिफॉर्म शाळा सांगेल ती किंमत मोजूनच खरेदी करावा लागतो. शिक्षण देण्याचे स्वरूप कसे असते हे एक घडलेले उदाहरण घेऊनच सांगितलेले बरे. माझ्या नातीने एके दिवशी पन्नास पाकिटांची मागणी केली. एका एन्व्हलपला 45 सेंट्स पडतात. या हिशोबाने 50 पाकीटांचे 22 डॉलर्स आणि 50 सेंट्स होतात. मी म्हटले, ‘वेड लागलंय की मॅडमना? एकदम साडेबावीसची मागणी?’

‘आम्हाला प्रोजेक्ट देणार आहेत त्या करायला?’

‘अजून सातव्या इयत्तेत नाहीस तर प्रोजेक्ट?’

‘इथं के. जी.तल्या मुलांना देखील प्रोजेक्ट असतो.’

मी गप्प बसलो. पाकिटे दिली गेली. मॅडमनी आमच्या नातीला पोलीस सुपरिंटेंटची भूमिका दिली. वर्गातील प्रत्येक मुलीने आपापल्या भागातील (खरी वा खोटीखोटी) तक्रार लिहून आपापल्या पाकिटातून माझ्या नातीकडे द्यायची. माझ्या नातीने प्रत्येक तक्रारीचे उत्तर लिहून आपल्याकडील पाकिटातून प्रत्येक मुलीला द्यायचे. त्या आठवड्याचे ते वर्कशॉप होते. पत्रलेखनाचे शिक्षण होऊन गेले. काही चांगले प्रोजेक्टसही करायला देतात. बोटॅनिकल गार्डन मध्ये सहल नेतात आणि जास्तीत जास्त झाडांची माहिती (जी झाडावर लिहिलेली असते) लिहून आणावयास सांगतात. लायब्ररीत जाऊन ऑस्ट्रेलियातील आदिवासींची माहिती फोटो कॉपी करून उतरवून आणावयास सांगतात. येथे विद्यार्थ्यांचा पुस्तकांशी, संगणकाशी संबंध येतो. असे खेळत खेळत शिक्षण. टेनिसचा तास, पोहण्याचा तास, हॉकी, फुटबॉलचा तास असे तासिका असतात. यासाठी लागणारी रॅकेट, पोहोण्याचा ड्रेस वगैरे साधनसामग्री लागते. म्हणजे डॉलर्सची मागणी आलीच. एकूण काय तर शिक्षण मोफत पण प्रत्येक साधनसामग्रीसाठी आणि सहलीच्या वेळी बसभाडे म्हणून डॉलर देत राहावे लागते. शाळांना सुट्ट्या कमी असतात, हे मात्र खरे. तसेच मुले खेळात प्रावीण्य मिळवितात हेही खरे.

अफाट मुलुख आणि अतिदूर अंतरावर शाळा असेल तर विरळ वस्तीमुळे जाण्यायेण्यातच मुलांचा वेळ फार जाईल हे ओळखून अशा मुलांसाठी रेडिओवर एक खास चॅनेलवर नियमित शाळा ठेवतात. त्या शाळेतही नाव नोंदवून रोज शाळेत गेल्याप्रमाणे घरच्या घरी बसून शिक्षण घेता येते. आठवड्यातून किमान तीन पाठांना हजेरी असल्याचे विद्यार्थ्यांनी सिद्ध करावे लागते. ही गोष्ट मुले व्यवस्थित करतात की नाही याचा तपास घेण्यासाठी शिक्षक नियमितपणे मुलांना त्यांच्या घरी जाऊन भेटतात.

पत्रव्यवहाराने अभ्यास कसा करावा याचाही पाठ देतात. विद्यार्थ्यांनी घेतलेली टिपणे पोस्टाने जातात व या शाळांसाठी नेमलेले शिक्षक ती तपासून पोस्टानेच परत पाठवितात. यासाठी पोस्ट खाते पैसे आकारीत नाही. संबंध ऑस्ट्रेलियात अशा रेडिओवरून चालणाऱ्या शाळा 26 आहेत.

यंदा मंदी तीव्र असल्याने बेकारी आहे. अनेक शिक्षक प्रशिक्षित असूनही बेकार आहेत. त्यांना डोल देऊन जगण्यापेक्षा अर्धवेळ काम देता येईल का याचा विचार झाला. सिडनीच्या पूर्व भागातील कायम अर्धवेळ शिक्षकांची संख्या वर्षभरात शंभरांनी वाढली आहे. या संबंधीची मार्गदर्शक तत्त्वे 1990 साली मंदीची लाट आल्यानंतर एका वर्षाने घालून देण्यात आली आहेत. ‘टॅक्सी शेअर करणे’ हा शब्दप्रयोग आपण ज्या अर्थाने वापरतो त्याअर्थाने सिडनीत ‘जॉब शेअरिंग’ हा शब्दप्रयोग केला जात आहे. एखाद्या विशिष्ट शाळेत एकूण शिक्षक संख्या पैकी दहा टक्के शिक्षक ‘पर्मनंट पार्टटाईम शिक्ष’क नेमायचे असे मार्गदर्शन तत्त्व सरकारी शाळांपुरते ठरले आहे. या शिक्षकांना पूर्णवेळ शिक्षकांना मिळणारे लाभ यथाप्रमाण (प्रो-रेटा) मिळतात.

1973 साली भारतातून गेल्याल्या व तीन मुलींचा संसार सांभाळून कायम पार्टटाइम शिक्षिका म्हणून काम करून आता पेन्शन घेतलेल्या श्रीमती सरोज बडवे म्हणाल्या, ‘माझ्या नोकरीच्या काळात पार्टटाईम शिक्षकास कॅज्युअल टीचर म्हणत. नोकरी एकाच शाळेत असेल असे नाही. कधी या शाळेत तर कधी त्या शाळेत. गरजेप्रमाणे बोलावणे येई.

अनेकांशी चर्चा करताना असेही लक्षात आले की भारतातून ऑस्ट्रेलियात येणारी मंडळी बौद्धिकदृष्ट्या जास्त सक्षम असतात असा ज्या ज्या वेळी प्रत्येक येतो, त्या त्या वेळी ऑस्ट्रेलियन मंडळींच्या मनामधील सुप्त विकृती पुढे कुठल्यातरी गैर सनदशीर मार्गाने व्यक्त होते. राजीव गांधी आले त्या वेळी झालेली निदर्शने हा त्याचा बोलका पुरावा होय.

ऑस्ट्रेलिया विद्यापीठातून पदवी घेणे अथवा पदव्युत्तर अभ्यासक्रम पार पाडणे या गोष्टीसाठी अनेक श्रीमंत आईबाप फी किती घेतले जाते याची पर्वा न करता मुळे धाडतात – अर्थात इंडोनेशिया, सिंगापूर, मलेशिया वगैरेसारख्या दूरच्या देशांतून फॉरेन रिटर्न्ड होऊन स्वदेशात प्रतिष्ठा मिळवावी हा जसा यामागे उद्देश असतो तसाच ‘कुसल प्रवेशात् मुसल प्रवेश:’ असाही ‘आंतर:कोपि हेतु:’ असतो. पण बुद्धिमान, अनेक जबाबदारीच्या जागांवर व्यवस्थापक म्हणून काम केलेली मंडळी नोकरी मिळावी म्हणून सध्या इथे येतात तेव्हा त्यांची कॉलिफिकेशन बघूनच काही व्यवस्थापने ‘तुमच्या एवढ्या कर्तबगारीचा माणूस आम्हाला ठेवता येणार नाही’ असे सांगतात.

अलीकडे असे एक उदाहरण घडले, ‘2 लाख परीक्षार्थी गणितात मी पहिला आलो’ असे सांगणाऱ्या एका भारतीय व्यक्तीला बघण्यासाठी त्या मालकाने कारखान्यातील अनेक महत्त्वाच्या जागी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना बोलावले. सगळेजण एक आश्चर्याची वस्तू म्हणून त्याकडे पाहत राहिले आश्चर्य ओसरल्यावर तो मालक म्हणाला, ‘मला एवढ्या आगळ्यावेगळ्या लायकीचा माणूस ठेवणे जमणार नाही. सॉरी!’

शैक्षणिक गुणवत्तेची अशी उदाहरणेही इथे घडतात!

Tags: प्रवेश प्रक्रिया विद्यापीठ डॉलर्स सेंट सरकारी शाळा खाजगी शाळा स्कूलबस अभ्यास रेडीओ उमेदवार मुलाखत निकाल विद्यार्थी शिक्षक के. जी. सिडनी शिक्षण ऑस्ट्रेलिया Admission Enterance University Dollars Sent Public School Private School School Bus Study Redio Candidate Interview Result Student Teacher Sidney K. G. Education Australia weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके