डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

कलाश्रीमंत विद्यादानी हरपला - पं. गजाननबुवा जोशी यांना आदरांजली

भारतीय कीर्तीचे कलावंत पं. गजाननबुवा जोशी यांचे अलीकडेच निधन झाले, त्यांच्या गायनाचा आणि व्हायोलिनवादनाचा आस्वाद ज्या लक्षावधी रसिकांनी घेतला, त्यांना बुवांच्या मृत्यूमुळे अतिशय हळहळ वाटली. गजाननबुवांचे आजोबा आणि वडील हे दोघेही गानविद्येचे उपासक होते. म्हणजेच पितृपरंपरेने जतन केलेली घराणेदार संगीत-साधना बुवांनी पुढे चालविली होती. त्यांचा कालाजीवनाची वैशिष्टये कोणती, हे स्पष्ट करीत श्री. बाक्रे यांनी पं. गजाननबुवांमधील विद्यार्थी हाच सर्वश्रेष्ठ होता, असा मार्मिक अभिप्राय व्यक्त केला आहे.

पं. गजाननबुवा जोशी हे श्रेष्ठ व्हायोलिन वादक की श्रेष्ठ गायक? की दोन्ही? निकष कोणतेही लावले तरी बुवा व्हायोलिन- वादक म्हणून काकणभर अधिक सरस होते, असाच कौल द्यावा लागेल असं मला वाटतं. व्हायोलिन वादक म्हणून त्यांनी जेवढ्या लढाया गाजवल्या तेवढ्या काही गायक म्हणून गाजवल्या असं म्हणता येणार नाही. बुवांनी गोरेगावच्या वा. वा. केतकरांना व्हायोलिन शिकवीत असता आणि पूर्वाश्रमीच्या जयश्री पाटकरांना गाणं शिकवीत असता मुंबईच्या त्या उपनगरात आत्मकथन केलं. श्री. ग. रा. फाटक यांनी ते लिहून घेतलं. श्रीरंग वरेरकर आणि अन्य अनेकांनी त्याचं संपादन केलं एकसष्टीच्या सुमारास केलेलं ते आत्मकथन प्रांजळ आहे. इतकं प्रांजळ की त्यातून बुवांच्या आत्म विश्वासाची पट्टी मूळची कोणती आणि त्यांनी मध्यम कुठं केला हे लक्षात आल्यावाचून राहात नाही! त्यांच्यात श्रेष्ठ कलागुणांचे तरतमत्व त्यांनीच सूचित केलं आहे. त्यांच देशभर नाव झालं ते व्हायोलिनमुळं आणि त्यांना उर्जितावस्था प्राप्त झाली ती डॉ. बाळकृष्ण केसकर यांच्याकडे 53 साली झालेल्या गाण्यामुळं असा एक सूक्ष्म पदर त्या आत्मकथनातून निघतो. पण उर्जितावस्था म्हणजे कलेतील कांकणभर आधिक्य नव्हे. 

मला हे मान्यच आहे की केवळ ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीवर संतुष्ट न राहता ग्वाल्हेर घराण्याची खास वझेबुवांची पठडी शिकून घेण्यासाठी त्यांनी अपार कष्ट घेतले. एवढे कष्ट की आपली काळी दोन पट्टी वझेबुवांच्या तालमीसाठी खुप खालची आहे म्हणून त्यांच्या प्रमाणं पांढरी पाचमध्ये गाता येण्यासाठी आपण सराव केला पाहिजे हे त्यांनी ओळखलं. डॉ. मारुळकरांची टिळक रोडवरची खोली अशा रियाझासाठी सर्वस्वी प्रतिकूल असताही प्रकृतीची अथवा त्या वास्तूच्या परिस्थितीची पर्वा न करता रियाझ केला हे त्यांचं मोठेपण. सहसा असा जिद्दीचा कलाकार- ढोर मेहनत करणारा कलाकार या सदरात जमा होईल. त्यांच्यातील गायक त्यांच्यातील वादकापेक्षा श्रेष्ठ होता असं अनुमान मात्र त्यावरून काढता येणार.

गजाननबुवांना जयपूर- अंत्रोली घराण्याची गायकी सुरश्री केसरबाईंना गुरू करून शिकावयाची होती. ते एवढे धारिष्टयाचे की सरळ केसरबाईंच्या पुढ्यात जाऊन उभे राहिले आणि मला शिकवाल काय म्हणून त्यांनी विचारलं. 'मी पुरुषांना शिकवीत नसते' हे उत्तर घेऊन त्याना परतावं लागलं. मग वझेंबुवांच्या निधनानंतर त्यांचा नव्या गुरुसाठी शोध सुरू झाला. डॉ. मारुळकरांनी एके ठिकाणी स्पष्टपणे लिहून ठेवलंय्‌ की गजानन बुवांना उस्ताद भुर्जीखांचं गाणं मुळात आवडत नव्हतं.

डॉ. मारुलकर यांनी पक्क्या माहीतगारीनेच हे लिहिले असणार यात शंका नाही. पण मग प्रश्न निर्माण होतो तो असा की गजाननबुवा उस्ताद भुर्जीखांकडे शिकायला गेलेच कसे? नुसतेच गेले नाहीत तर पुण्यात प्रपंचाचं बस्तान ठीक बसलेलं असताना तो सर्व मांड मोडून अंधारात उडी टाकण्याचं साहस त्यांनी केलंच का?

गजाननबुवांच्या आयुष्यातील या आणि अशाच सर्व प्रश्‍नांची उत्तरं शोधण्याची एक ‘मास्टर की' आहे. ती म्हणजे त्यांच्यातील कलावंतापेक्षाही त्यांच्यातला विद्यार्थी अधिक उंचीचा होता ही! ‘मी खूप शिकलो पण अजून खुप शिकायचं राहून गेलंय’ हे जे त्यांचे प्रसिद्ध उद्‌गार आहेत त्यात ही उंची प्रतीत झालेली आहे. आपल्याला मान्यवर कलावंत व्हायचं असेल तर तीन घराण्यांची गायकी संपादन केली पाहिजे हे त्यांना आयुष्यात केव्हा जाणवू लागलं असेल? एच्‌. एम्‌. व्ही. नं गजाननबुवांची पहिली ध्वनिमुद्रिका काढली; तीमुळं त्यांचं भारतभर जे नाव झालं त्यावेळीच त्यांना जाणवू लागलं असलं पाहिजे, सर्वोत्तम व्हायोलिन वादक व्हायचं असेल तर डोक्यात गायकीच्या विविध कला पाहिजेत.

गायकी अंगानं व्हायोलिनमधून बडा ख्याल मांडता येण्यासाठी, आधी मिळेल तिथून गायकी संपादन केली पाहिजे. लयकारीनं श्रेष्ठ तब्बलियांवर मात करता येण्यासाठी तबला पुरेपूर व उत्तम गुरूकडून शिकून घेतला पाहिजे हे सर्व त्यांना 1936 च्या आसपास केव्हा तरी प्रकर्षानं जाणवलं असावं. आणि मग गुरूदेखील असे शोधले की जवाब नाही. विनायकराव घांग्रेकर तबल्यासाठी; वझेबुवा, भुर्जीखां. आणि आकाशवाणीत सल्लागार म्हणून नियुक्‍त झाल्यानंतर उस्ताद विलायत हुसेन गायकीसाठी. नियतीनं या शिक्षणातही लयीची जाती योजलेली आढळते. कुठे तिस्र जातो तर कुठे चतस्र! 1934 ते 37: घांग्रेकरांकडे तीन वर्षं; 1939 ते 43: वजे बुवांकडे झाली. चार वर्ष. 1944 ते 1948: ते उस्ताद भुर्जीखांकडे पुनः चतस्र! कलावंताच्या आयुष्यात शोधू जाता गम्मत आढळते ती ही. गजाननबुवांमधील विद्यार्थी त्यांच्यातील कलावंतापेक्षाही जास्त उंचीचा म्हणायचे ते यासाठी की गायन असो की वादन असो सीधा ठेका धरायला जवळपास कोणी असला की झालाच यांचा रियाज सुरू.

सैन्य कवायतीवर आणि कलावंत रियाझावर युद्धं जिंकतात, गजाननबुवांनी चिरकवांशी केलेल्या जुगललबंद्या गाजल्या त्या ते दोघेही अजोड रियाझी होते म्हणूनच. त्या दोघांच्या मैफलीत हुर्षा- मर्षाचे क्षण कैकदा आले असतील आणि थोडोफार खडाखडीही झाली असेल; पण अखेरीस झालं ते धर्मयुद्ध-असाच कौल रसिकांनी दिला. बुवा श्रेष्ठ गायक होते त्यापेक्षाही तसूभर जास्त श्रेष्ठ वादक होते असं मला म्हणावसं वाटतं याचं आणखी एक कारण आहे. बुवांनी खडक फोडण्याएवढी मेहनत करून गळा तयार केला तरी डोक्यातली सर्व गायकी व्हायोलिनच्या तंतांतुन जशी आणि ज्या दर्जानं निघेल तशी गळ्यातून कशी निघणार? मारवाडी विद्यालयात झालेल्या एका ऐतिहासिक जुगलबंदीनं हे सिद्धच केलेलं आहे. 

ही ऐतिहासिक जुगलबंदी पं. रविशंकर यांच्याबरोबर झाली होती. पं. गजाननबुवांच्या साथीला पं. किशन महाराज आणि रविशंकर यांच्या साथीस उस्ताद अल्लारखां होते. म्हणजे चार श्रेष्ठ कालाकारांची ती अफलातून मैफल होती. प्रचलित ताल आणि प्रचलित राग वाजवायचा हे आधीच ठरलेलं होतं. सगळा मारवाडी हॉल तुडुंब भरला होता. बुवांचा हमीर हा अत्यंत आवडता राग होता. (आता होता असंच म्हटलं पाहिजे.) त्यांची ही आवड युयुत्सूपणाला शोभेशीच. एखाद्या उत्तम शरीरसौष्ठव असलेल्या आणि मेहनतीने शरीर गोटीबंद केलेल्या पहिलवानासारखा हा राग आहे. त्यातील तीव्र धैवत म्हणजे कुस्तीतील पहिल्या झडपेतील पकडच. तीव्र गंधार, कोमल मध्यम आणि तीव्र धैवत हे व्हायोलिनवर झटक्यात घेतले तर ‘बो’ धैवतात घुसल्याचाच साक्षात्कार होतो आणि मागील स्वराच्या अनुबंधात कुस्ती जुंपली आहे असंच वाटू लागतं. गंजाननबुवांच्या अचाट रियाझामुळं त्यांनी पहिका बो गंघारावरून धैवतावर गमध असा ओढताच मारवाडी विद्यालयाच्या गच्चीवरील गवताचं एखादं पातं देखील एकदम

ताठ झालं असे. मग श्रोतृवूंद रोमांचित झाला असेल यात काय नवल!
उत्पद्यते च युगपद्‌ वदनेःक्ष्णोश्च यस्य वाः | 

असे जे काव्याविषयी म्हटलं आहे ते संगीतांत सच्च्या स्वराबद्दल - अथवा स्वरसमूहांबद्दलही खरं आहे. तोंडातून वाः म्हणजे वाहवा जाते आणि त्याच डोळ्यांतून वा: म्हणजे आनंदाश्रू! गजानन बुवांनी ती किमया केली आणि हॉलभर टाचा एकच कडकडाट झाला!

बुवा श्रेष्ठ गायक, त्याहून श्रेष्ठ वादक आणि त्याहूनही श्रेष्ठ विद्यार्थी होते असं गणित मांडाव लागतं ते यासाठी. बुवांच व्हायोलिन वादन जगाला ठाऊक होतं, पण ते उत्तम जलतरंग, छान हार्मोनियम आणि चांगल्यापैकी सतारही वाजवीत, या अर्थनेही त्यांना आपण गायकांपेक्षा अधिकतर वादक असं म्हणू शकतो. बुवा विद्यादांनातही श्रीमंत होते. गेल्या 15 वर्षांत श्रेष्ठ विद्यादानी म्हणून डोंबिवलीस राहून कीर्ती संपादन केली. त्यांच्या गायक शिष्यांत अखिल भारतीय कीर्ती संपादन करू शकतील असे दोघेजण आज दिसतात- पहिळे उल्हास कशाळकर आणि दुसऱ्या पद्मा तळवळकर. कशाळकरांना ग्वाल्हेर, जयपूर या दोन घराण्यांची गायकी पोचलेली आहे. आणि अलगअलगपणे दोन्ही घराणी पेश करण्याचं कसब त्यांच्यापाशी आहे. पद्मा तळवलकर समवायात सौंदर्य शोधणाऱ्या आहेत. पण ही दोघेजणे गजाननबुवांचे नाव उज्ज्वल करतील या विषयी शंका नकी. बुवांच्या निधनानं निर्माण झालेली पोकळी त्याच वेळी अंशतः का होईना भरून निघेल.

Tags: श्री. ग. रा. फाटक डॉ. बाळकृष्ण केसकर डॉ. मारुलकर हुसेन खा पं. रविशंकर पं. किशन महाराज पं. गजाननबुवा उल्हास कशाळकर पद्मा तळवळकर Shri. G. R. Fatak Dr. Balkrushna Keskar Dr. Marulkar Husain Khaan P.Ravishankar P. Kishan Maharaj P. Gajananbua Ullhas Kashalkar Padma Talvalkar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके