डिजिटल अर्काईव्ह

बुडणारे बाबासाहेब: तरणारे डॉ. उदास

मुख्यमंत्री श्री. भोसले यांना पदच्युत करण्याचा निकराचा प्रयत्न होत आहे. त्याची परिणती महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट येण्यात होणार, हाच अंदाज तर्कशुद्ध वाटतो. ही घडामोड बाई ताबडतोबही घडवून आणू शकतात.

मुख्यमंत्री श्री. भोसले यांना पदच्युत करण्याचा निकराचा प्रयत्न होत आहे. त्याची परिणती महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट येण्यात होणार, हाच अंदाज तर्कशुद्ध वाटतो. ही घडामोड बाई ताबडतोबही घडवून आणू शकतात. अंतुल्यांच्या नंतर बाबासाहेबांना सतरंजीवरुन खुर्चीवर जाणून बसविण्याचे कार्य जर त्यांचे तर तो भातुकलीचा खेळ चट्टामट्टा करून त्यांनाच संपवावा लागणार. पण बाबासाहेबांचा कोणीही विरोधक इंदिरा गांधीना दोष देण्यास धजावत नाही. इंदिराजी म्हणजे सुप्रीम कोर्ट असे म्हणतो. छोटे असोत की अंतुले, त्यांच्यातही बाईना दोष देण्याचे धाडस नाही. विरोधीपक्ष कांग्रेस खत्म करायला निघालेत, असे बोलताना बाईना खरोखरी तर मनाची तरी लाज वाटावयास हवी. माधवसिंग सोळंकी यांच्या विरुद्ध ई. का. पक्षात बंड उभारण्याची प्रेरणा काय विरोधी पक्षांनी दिली? महाराष्ट्रात तर विरोधी पक्ष अगदीच नगण्य! काँग्रेस पक्षाचे तुकडे करण्याचा प्रारंभ इंदिराजींनी चार वर्षांपूर्वी केला आणि माता तोच कित्ता गुजरातेत महिपत मेहता, महाराष्ट्रात छोटे-पवार-गुलाबराव, आंध्रात अंजय्या रेड्डी पक्षात राहून वा समांतर पक्ष काढण्याचा इरादा व्यक्त करून वा तुमचा पक्ष तुम्ही सांभाळा, हे आम्ही चाललो असे बजावून गिरवीत आहेत.

इंदिराजींच्या एकाधिकाराच्या विकारी वृक्षाला आलेली ही फळे आहेत. आता महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट आणून पक्षाची अब्रू झाकली जाईलच असे नाही. पक्षाचे जे काय तीन-तेरा व्हायचे ते झालेच आहेत. मराठी विज्ञान परिषदेच्या कोल्हापूर येथे भरणाऱ्या सतराव्या विज्ञानसम्मेलनाचे अध्यक्ष डॉ. गजानन राजाराम उदास यांची काही दिवसांपूर्वी मुंबईत गाठ पडली. अध्यक्षीय भाषणात ते महाराष्ट्राच्या भूगर्भातील पाणी या विषयावर सविस्तर माहिती देणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रीयांना पाणीसमस्या आणि दुष्काळसमस्या या संबंधात खूप नवे काही समजेलच. आजच ते संमेलन कोल्हापुरात सुरू होत आहे. तेव्हा तो विषय वगळून डॉ. उदास जे उरतात तेही केवढ्या प्रभावी कर्तुत्वाचे आहेत हे सांगणे उचित ठरेल. त्यांचे हे कर्तृत्व केवळ महाराष्ट्राला नव्हे तर देशाला ललामभूत ठरावे असे आहे व ते प्रामुख्याने अणुऊर्जेपासून वीज मिळविण्याच्या संदर्भात आहे. या शतकाअखेर अणुवीजकेंद्राच्या जाळ्याद्वारे 10 हजार मॅ. वॅ. वीज निर्माण करण्याच्या घोषणा झालेल्या आहेत 1982 साल सरत आले. उरली आहेत फक्त अठरा वर्षे. सध्या भारतातील अणुवीज केंद्र फक्त 860 में. वॅ. वीज देत असता, येत्या 18 वर्षात 10 हजार मॅ. वॅ. वीज निर्माण करणे आपणास कसे काय शक्य होईल असा प्रश्न मी डॉ. उदास यांना विचारला असता ते आत्मविश्वासाने म्हणाले, आतापर्यंतच्या अडचणी विसरून जा. स्वकर्तुत्वावर विसंबून अणुऊर्जेचे तंत्रज्ञान आत्मसात् करायचे म्हणजे त्याची किंमत मोजावी लागणारच. ती आपण मोजली आहे.

आता मागे पहाणे नाही. डॉ. उदास यांचा आत्मविश्वास चालू घडीला अतिरंजित वाटतो हे खरे आहे. एका बेसावध क्षणी इंदिराजींनी पोखरण स्फोटाचा निर्णय घेऊन आपला अहंकार शमवला नसता तर आजचे दृश्य दिसले नसते. डॉ. होमी भाभांचे स्वप्न 80-81 साली 8 हजार मे. वॅ. वीज अणुशक्तीने निर्माण करण्याचे होते. त्यांच्या मागून डॉ. विक्रम साराभाईंनी ते आठ हजारा वरून प्रथम 2700 मे. वॅ. इतकेच संकल्पिले व नंतर 1240 मॅ. वॅ. इतके नेले. तरीही 860 मे. वॅ. इथपर्यंतच आपली प्रगती आहे. याची कारणे वेगळी आहेत. अणुशक्तीच्याद्वारा वीज मिळवण्यासाठी दोन घटक प्रामुख्याने लागतात. पहिला नैसर्गिक यूरेनियमचा व दुसरा जडपाण्याचा (हेवी वॉटर). हेवी वॉटर आपणाला देशांतर्गत पुरेसे उपलब्ध नाही, पण नैसर्गिक यूरेनियम भरपूर उपलब्ध आहे. तो उपलब्ध करून देण्याचे एकाकी डॉ. उदास यांचे. ती साहसी कथा भलतीच रोमांचक आहे. 

डॉ. गजाननराव उदास बेचाळीसच्या आंदोलनात चार महिने कारावास भोगलेले फर्ग्युसनचे विद्यार्थी पुढे 46 साली भारत अखंड असता पेशावर नजिकच्या चित्रळ संस्थानात अॅन्टोमनी धातू खडकातून कसा शोधतात हे शिकण्यासाठी गेले. पुश्तू शिकले. चित्रळ संस्थानाधिपतींचे बंधू श्वस्त यांचे गाढ स्नेही बनले. त्यामुळेच त्यांना 47 साली फाळणी होताच पठाणाचा वेष करून खुश्वस्त मुल्क यांच्या मदतीने पेशावरहून निसटता आले. भूगर्भातील खडक ओळखण्याच्या विद्येचा पाया त्यांनी चित्रळच्या रिशन गोल नाल्यात घातला. 50 साली त्यांना भाभांच्या अणुशक्ती विभागात नोकरी मिळाली व नैसर्गिक युरेनियम शोधून देण्याचे आव्हान त्यांनी पत्करले. पहिल्या नमुना चाचणीसाठी देशाला 10 टन यूरेनियम हवा होता. तो परदेशातून विकत घ्यावा असेच दिल्लीतील सुखासीन भूगर्भशास्त्रज्ञांना वाटत होते. दोन कोटी रु. खर्च करून एक हजार टन नैसर्गिक यूरेनियम शोधून काढण्याची दगदग करण्यापेक्षा आयता परदेशातून घेतला तर बरे नव्हे काय? ही त्यामागील भावना, पण डॉ. उदास यांनी भाभांना शब्द दिला, कमीतकमी खर्चात युरेनियम शोधून देतो म्हणाले. बिहारमधील सिंगभूम जिल्ह्यात शंभर मैलांचा जंगली पट्टा त्यांनी पायी तुडवला.

चित्रळ संस्थानातील अनुभवाने नजर दिलीच होती. डॉ. उदास यांच्या मदतीस चाळीस श्रमिक होते. 210 फूट खणणे, सुरुंग लावणे, खडक फोटून तपासणे ही कामे ते एकटे करीत. दिवसांतून दोनदा विवरे पहावी लागत. दोन महिने व आणखी एक आठवडा काम करून त्यांनी 10 टनांचा पहिला नमुना पॅक नैसनिक यूरेनियम दिला. बाज बिहार मधील जादू गोडाची खाण 5 हजार टन युरेनियम देत आहे. आजचा युरेनियमचा आंतरराष्ट्रीय भाव 40 डॉलर्सला एक पौंड असा आहे आणि आपणास देशातल्या देशात तो 22 डॉलर्सला पौंड या भावाने पडत आहे. हा युरेनियम व जड पाणी यांच्या संयोगाने इंधन मिळेल व अणुशक्तीपासून वीजही मिळेल पण उत्तरोत्तर यामधून जो प्लुटोनियम तयार होईल तो अणुबॉंबनिर्मितीसाठी उपयोगी पडत असल्याने प्लुटोनियमची साठवणूक धोकादायक नाही काय? की तयार झालेला प्लुटोनियम तुम्ही अमेरिका, फ्रान्स, चीन, ब्रिटन यासारख्या देशांना विकणार? मी हा प्रश्न विचारला होता खरे तर डॉ. उदास यांना उत्तर देणे अडचणीचे व्हावे म्हणून. पण ते मुळीच अडचणीत आले नाहीत. ते म्हणाले, नैसर्गिक युरेनियमपासून बनलेला प्लुटोनियम इतरांना देऊन टाकणे वा विकणे हा मूर्खपणाच ठरेल. तारापूरला अमेरिका समृद्ध युरेनियम देते व त्यातून निर्माण होणारा प्लुटोनियम अमेरिकेत नेण्यासही तिची तयारी नाही. त्यांच्याकडेच असलेला प्लुटोनियम कुठे व कसा ठेवायचा त्या देशापुढे प्रश्न आहे. तेव्हा आपला प्लुटोनियम आपल्याच देशात राहील. कुठेही जाणार नाही.

आता यामुळे अणुबॉम्ब स्फोटाचा धोका निर्माण होऊ नये ही खबरदारी घेणे आपले काम आहे. जोपर्यंत 14 किलोग्रॅम प्लूटोनियम एकत्र येत नाही तोपर्यंत तसा धोका नाही. तात्पर्य इतकेच की 14 किलो प्लूटोनियम एकत्र न येऊ देणे एवढी खबरदारी आपण घ्यायची. डॉ. ग. रा. उदास अणुशक्ती विभागातील मिनरल्स विभागाचे प्रमुख होते. ते नुकतेच निवृत्त झाले आहेत. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या या भूगर्भ शास्त्रज्ञास मराठी विज्ञान परिषदेने यंदा अध्यक्षपद देऊन स्वतःचाच गौरव करून घेतला आहे.

Tags: Anuurjaa. Shri. Bhosale Indiraji Madhavsing Solanki Urenium Singbhum Anubomb Dr. G.R. Udas Plutonium अणुऊर्जा श्री. भोसले इंदिराजी माधवसिंग सोळंकी युरेनियम सिंगभूम अणुबॉंब डॉ. ग. रा. उदास प्लूटोनियम weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी