डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

एकूणच समकालीन महाराष्ट्रीय समाजजीवनाचे अंतरंग उलगडून दाखवणारी ‘जोहार’ ही महत्त्वाची कादंबरी आहे. नवभांडवली उदार अर्थव्यवस्थेतून घडवला जात असलेला समाज आणि त्यातले ताण तीमधून मोठ्या प्रमाणात ध्वनीत झाले आहेत. त्याचा एक अक्ष हा बहुजनांच्या इतिहासलेखनाच्या चर्चाविश्वाचा आहे. नेमाडे प्रभावातील समकालीन समाजाच्या दिशा दर्शवणारी व तरुणांच्या विचारविश्वाचे दर्शन घडवणारी ही कादंबरी आहे. जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर समाजवास्तवातील अनेक गुंतागुंतीचे प्रश्न या कादंबरीने प्रभावीरित्या मांडले आहेत. 

नव्वदच्या दशकात मराठी कादंबरीतील समाज- चित्रणाचा आवाका विस्तृत आणि व्यापक झालेला आहे. त्याआधीच्या काळात तशा वाटा निर्माण करण्याचे महत्त्वाचे प्रयत्न मराठी कादंबरीकारांकडून झाले आहेत. अशा प्रभावित करणाऱ्या वाटांवरून मार्गक्रमण करणाऱ्या अनेक कादंबऱ्या पुढील टप्प्यावर प्रकाशित झाल्या. समकालीन कादंबरीच्या धमन्या विस्तारणाऱ्या अनेक कादंबऱ्या या कालखंडात प्रकाशित झाल्या. या काळात समाजपटलावर उपस्थित असणाऱ्या प्रश्नांची खोलवरची जाण मराठी कादंबरीने व्यक्त केली आहे. या कादंबऱ्यांच्या अनुभवद्रव्यावर समकालीन माहोलाचा मोठा प्रभाव आहे. अनेक तरुण लेखक नव्या कादंबरीची घडण करीत आहेत. या साखळीतील सुशील धसकटे यांची ‘जोहार’ ही कादंबरी अक्षरवाङ्‌मय प्रकाशनाकडून प्रकाशित झाली आहे. 

भालचंद्र नेमाडे यांच्या कादंबरीलेखनाचा व विचारांचा मोठा प्रभाव असणारा कादंबरी-लेखकांचा वर्ग मराठीत निर्माण झाला. मराठी समाजजीवनाचे अंतरंगदर्शन घडवणाऱ्या नेमाडे यांच्या कादंबरीप्रकल्पाचा प्रभाव ऐंशीनंतरच्या मराठी कादंबरीवर आहे. ‘कोसला,’ ‘चांगदेव चतुष्टय’ व ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ या नेमाडे यांच्या कादंबऱ्यांनी नवा दृष्टिकोन ललित लेखकांना दिला. पारंपरिक कादंबरीपेक्षा वेगळी दृष्टी दिली. कादंबरी हा समाजदर्शन घडवणारा दस्तऐवज आहे, याची जाण दिली. समाजाचे खरेखुरे वास्तववादी दर्शन कादंबरीतून घडवता येते, याचा प्रत्यय दिला. या बरोबरच नेमाडे यांनी आपल्या समीक्षालेखनातून नवा विचार मांडला. देशीयतेचा आग्रही पुरस्कार केला. वसाहतवादी दृष्टीची नवी मीमांसा केली. त्यांच्या या विचारांबद्दल उलटसुलट चर्चाही झाली. मात्र नव्या लेखकांना नेमाडे यांच्या भूमिकेने नवे आत्मभान दिले. आपला भवताल पकडण्याचे हुकमी तंत्र यातून पुढे आले. समकाळ नोंदवणाऱ्या कादंबरी साहित्यप्रकारात हे प्रकर्षाने झाले. 

सुशील धसकटे यांच्या ‘जोहार’ या कादंबरीवरही नेमाडे यांच्या साहित्य व विचारदृष्टीचा मोठा प्रभाव आहे. कादंबरीच्या शीर्षकापासून ते पात्ररचित, अनुभवविश्व, चर्चाविश्व, भाषा, मूल्यविषयक जाण या सर्वांवर नेमाडे यांच्या कादंबरीचा प्रभाव आहे. अगदी ‘जोहार’ या कादंबरीचा आरंभ असा आहे, ‘खट्‌ खट्‌ कुणीतरी दाराची कडी जोरात वाजवली, तशी झोपमोड झाली.’ हे निवेदन ‘हिंदू’तील आरंभनिवेदनाशी साम्य दर्शवणारे आहे. ‘आपला समानधर्मा पूर्वज पांडुरंग सांगवीकर इथं कुठं कुठं वावरला ते ते ताडून बघणं, असं वारंवार सुरू झालं’ असं ‘जोहार’चा नायक म्हणतो. ‘पांडुरंगने आपल्यात हळूहळू थोडा थोडा कॉन्फिडन्स भरायला सुरुवात केली’ नायकाच्या या म्हणण्यातून कादंबरीच्या प्रारंभीच लेखकाने कोणती नजर प्राप्त केली आहे, त्याचा वाचकाला अदमास येतो. 

नेमाडे यांच्या प्रभावाचा दर्शनबिंदू घेऊन आजच्या समाजवास्तवाच्या विविध परी न्याहाळल्या आहेत. त्याचे विविध कंगोरे मांडले आहेत. देशीयतेच्या अंगाने आजच्या समाजाचे पुनर्वाचन केले आहे. नेमाडे प्रभावित मराठी कादंबरीपेक्षा या कादंबरीला वेगळे परिमाण प्राप्त होते, ते एका वेगळ्या गोष्टीमुळे. कादंबरीत समाजवास्तव मांडत असताना या काळात महाराष्ट्राच्या समाजपटलावर उपस्थित असणाऱ्या प्रश्नांची खोलवरची जाण व्यक्त केली आहे. विशेषतः जागतिकीकरण प्रभावित काळ आणि बहुजनांच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक इतिहास रचिताचे चर्चाविश्व कादंबरीतून मोठ्या प्रमाणात उलगडले आहे. यामुळे या जीवनचित्रणास नवे आयाम प्राप्त होतात. 

ही कादंबरी समजून घेताना गेल्या दोन दशकातील महाराष्ट्रीय समाजजीवन ध्यानात घ्यावे लागते. कारण या काळातील सामाजिक अवकाशाने या कादंबरीची घडण केली आहे. नवभांडवली समाजरचनेत महाराष्ट्रीय जीवनातील सर्व क्षेत्रांतील चर्चाविश्वे ‘जोहार’ कादंबरीच्या केंद्रस्थानी आहेत. शिक्षण, नगर विरुद्ध खेडे, शिक्षितांचे प्रश्न, स्त्रीप्रश्न, पर्यावरण ते जातवर्ग अस्मितांसंबंधीचे प्रश्न हे या नवभांडवली अर्थव्यवस्थेच्या कक्षेत आली आहेत. यातून नवे ताणतणाव आणि संघर्ष उभे राहिले आहेत. ‘‘या काळातील महाराष्ट्रातील समाजवास्तव, चर्चाविश्व व समाजमन कोणत्या दिशेने जात आहे, याचे थेट दृश्यस्वरूप या कादंबरीत आहे. हे समजून घेण्यासाठी कादंबरीसारखं दुसरं सत्यवादी माध्यम नाही.’’ (भालचंद्र नेमाडे, निवडक भाषणे, पृ.115) त्याप्रमाणे ‘जोहार’मधून या काळातले वास्तव मोठ्याप्रमाणात साकार झाले आहे. 

जागतिकीकरण, आधुनिकीकरण हे मानवी विकासाला पोषक ठरताना त्याला मानवी चेहरा असावा, अशी भूमिका कादंबरीतील जीवनचित्रणास आहे. नवा समाज घडत असताना ‘बाजार-मार्केट’ या मूल्याला केंद्रवर्ती स्थान प्राप्त झाले आहे. हे रचले जात असताना वर्गीय विषमतेची दरी मोठ्या प्रमाणात निर्माण होते आहे. त्याची गती अनेक पटीने वाढली आहे. भारत भूमीवर काय आकारले जात आहे, यातून कोणते समाजवास्तव घडत आहे, याविषयीचे मूल्यात्म स्वरूपाचे अनुभवविश्व केंद्रवर्ती आहे. राम बापट म्हणतात, ‘‘भारतातील भांडवल व त्याला लागणारे व्यवस्थापक व कारकुनी समूह, जातीच्या संदर्भात फारच संकुचित पायावर उभे आहेत. 

आपल्या भांडवलाच्या या सामाजिक पायाचे स्वरूप लक्षात घेतल्यास भांडवलशाहीच्या विकासात विशेष, दक्ष व आग्रही भूमिका न घेतल्यास वैश्य व ब्राह्मण व काही अंशी अलीकडे बलदंड शेतकरी जातीतील वरिष्ठ स्तर सोडल्यास बाकीच्या जातीजमाती यापुढे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रूपात निर्माण होत असलेल्या आर्थिक व सामाजिक संपदेच्या परिघाबाहेरच राहतील.’’ (राम बापट : राजसंस्था, भांडवलशाही आणि पर्यावरणवाद, 2013, पृ.130) याचे नेमके सूचन ‘जोहार’मधून झाले आहे. सुधारणांचा कोणताच अवकाश या परिघावरच्या घटकांना उपलब्ध नाही. 

एकेकाळी शिक्षणातून निर्माण होणाऱ्या संधीही या नव्या जगाने नाकारल्या आहेत. याचे कारण ‘बाजार’ हा जागतिकीकरणाचा पाया आहे. त्यात सर्वहारा, कष्टकरी, कामकरी वर्गाचे अत्यंत बिकट प्रश्न निर्माण झाले आहेत. नवे पराकोटीचे ताण आकाराला आले आहेत. या वास्तवाने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. हे वास्तव कादंबरीने समूर्त केले आहे. ‘जोहार’मधील एका लीळेमध्ये लेखक म्हणतो, ‘पर तो इकास नोहे : भासु-आभासुचा खेळ : सगळु व्हर्च्युअल होए : येथ कोणु आपुलेनि नोहे : सर्वे सत्ताद्रव्यलोभी’ या विचारसूत्राचा मोठा प्रभाव या कादंबरीवर आहे. नवभांडवली उदारमतवादी अर्थव्यवस्थेत एक आभासी जग निर्माण होते आहे. त्यामध्ये आत्यंतिक व्यक्तिवादी स्वातंत्र्याचा पुरस्कार केला जातो. 

1990 नंतरच्या जागतिकीकरण प्रभावाच्या काळातून निष्पन्न होऊ घातलेले हे जग आहे. नवभांडवलशाही काळातील अंतर्विरोध आणि पेचाने या कादंबरीचा मोठा आवकाश व्यापला आहे. किंबहुना जागतिकीकरण काळाची प्रतिक्रिया या कादंबरीत मध्यवर्ती आहे. जीवनाची सारी क्षेत्रे आणि मानवी वर्तनव्यवहार भांडवली जगाच्या कक्षेत आला आहे. त्याचा पसारा आणि वेग स्तिमित करणारा आहे. नवऔद्योगिक भांडवली या चित्रणदृष्टीमागे भूसांस्कृतिक भानही मोठ्या प्रमाणात आहे. खेड्याचे, निसर्गाचे, जीवसृष्टीचे शोषण करून शहरे फुगत आहेत. शेती, भाषा, मानवी जीवन व पर्यावरणाचे असंख्य प्रश्न या भांडवली जगाने निर्माण केले आहेत. भलीमोठी विविधता नाहीशी करून एकसाची सपाट समाज निर्माण करण्याकडे या जागतिकीकरणाचा ओढा आहे. या जागतिकीकरणाबद्दलचा तीव्र निषेधस्वर नायकाच्या मूल्यदृष्टीतून व्यक्त झाला आहे. 

नवभांडवली व्यवस्थेत एकसाची समाज घडवला जातो. ज्याला गो.पु. देशपांडे ‘संस्कृती सपाटीकरणाचे षड्‌यंत्र’ म्हणतात. या सपाटीकरणाच्या मोहिमेत बहुसंख्य समाजाचे काय होते, याचा कालस्वर या कादंबरीत आहे. या कादंबरीचा दुसरा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे इतिहासलेखनासंबंधीचा. प्रस्थापित इतिहास हा अल्पजनांच्या हितसंबंधांचे पोषण, संवर्धन करणारा आहे. मल्हार हा विचारी विद्यार्थी आहे. तो सर्व तऱ्हेचे वाचन करणारा आणि त्यावरचा आपला विचार बोलून दाखवणारा आहे. या काळाच्या आधी महाराष्ट्रात जी काही इतिहासाची नवी मांडणी होऊ लागली होती, या विचार मांडणीचे प्रतिध्वनी कादंबरीत ठिकठिकाणी उमटलेले आहेत. मल्हार या विचाराने प्रभावीत झाला आहे. या काळात ज्या पद्धतीने इतिहासलेखनाच्या नव्या वाटा निर्माण झाल्या, ज्ञातिप्रेमातून व स्ववर्गाच्या हितसंबंधांच्या पोषणाकरिता इतिहास लिहिला जात होता. तो तटस्थ व वस्तुनिष्ठ स्वरूपाचा असावा. त्यातही नायककेंद्री इतिहासाऐवजी समूहकेंद्री इतिहासाला प्राधान्य द्यायला हवे, हे भान या काळातील इतिहासलेखनातून प्रकट होऊ लागले. 

अशा बहुजन समाजेतिहासाची मांडणी महाराष्ट्राच्या विचारविश्वात होऊ लागली आहे. कॉ.शरद पाटील, भालचंद्र नेमाडे यांच्या मांडणी-चर्चांचा प्रभाव कादंबरीच्या नायकावर आहे. बुद्ध, चक्रधर, अखिल संत तसेच तो महात्मा फुले, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, महात्मा गांधी, साने गुरुजी, बाबासाहेब आंबेडकर या धुरिणांना आपलेसे करणारा; विस्मरणात गेलेल्या त्यांच्या कार्याच्या उपेक्षेचे स्मरण करणारा आहे. विशेषत: महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या विचारकार्याचा प्रकट-अप्रकट प्रभावही नायकाच्या एकंदर व्यक्तिमत्त्वावर दिसतो. श्रमकरी, कष्टकरी समूहाचे जग या इतिहास मांडणीतून प्रकट होते. या वैचारिक जगाची बाजू कादंबरीतून मोठ्या प्रमाणात प्रकटली आहे. 

शेतकरी व कामकरी वर्गाच्या कळवळ्याच्या हितसंबंधांची वर्गजाणीव कादंबरीत पानोपानी आहे. म्हणूनच प्रस्थापित धुरीणवर्गाने शिवाजीमहाराजांचे हिंदुत्ववादी ‘मार्केटशरण’ प्रतिमान रचले. मात्र प्रत्यक्षात शिवछत्रपती तसे नाहीत, तर ते भारतीय अब्राह्यणी शौर्याचा इतिहास निर्माण करणारे, तसेच सकलजन प्रतिपालक, शूद्रातिशूद्रभूषण अशा बहुजनवादी इतिहास मांडणीची गरज मल्हार प्रतिपादतो. तळाच्या, खालच्या समूहाचा साइडट्रॅक इतिहास लिहिला जावा, अशी आकांक्षा व्यक्त करणारी मल्हारची ही जाणीव आहे. सर्वहारा वर्गाचे सांस्कृतिक संचित शोधू पाहणारे काही करावे, असे मल्हारला वाटते. 

गेल्या दोन दशकात जीवनाच्या सर्व क्षेत्रांत मूल्यांची, नैतिकतेची जी पडझड झाली, त्याबद्दल कमालीचा कडवा स्वर या कादंबरीतून व्यक्त झाला आहे. किंबहुना सामाजिक मूल्यऱ्हासाची पातळी किती खालावली आहे, त्याच्या विविध परी कादंबरीतून व्यक्त झाल्या आहेत. आजचा विवेकी विद्यार्थी शिक्षण व सांस्कृतिक व्यवस्थेकडे कोणत्या नजरेने पाहतो, याचे चित्र मल्हारच्या दृष्टिकोनातून व्यक्त झाले आहे. ज्ञानपरंपरा व तिचा वर्तनव्यवहार किती आत्मसंकोची व भ्रष्ट झाला आहे, त्याचा हस्तक्षेप प्रतिसाद या कादंबरीरचनेत आहे. 

कादंबरीत समकालीन उच्चशिक्षित तरुणांचे जग केंद्रवर्ती असल्यामुळे तरुणांच्या विचार आणि भावविश्वाला त्यामध्ये कमालीचे महत्त्व प्राप्त झाले आहे. ग्रामीण पार्श्वभूमी घेऊन आलेल्या तरुणांच्या या नागर-मध्यमवर्गीय जगातील न-नैतिक वातावरण, तसेच शिक्षणक्षेत्र आतून भयंकर पोखरल्याची जाणीव टोकदारपणे व्यक्त झाली आहे. मल्हार पाटील हा मराठवाड्यातील शेतकरी कुटुंबातील एक तरुण एम.ए. एम.फिल. शिक्षणासाठी पुण्यात येतो. विद्यापीठात शिक्षण घेत असताना स्व-अध्ययन, मित्रांच्या चर्चा, शिक्षकी पेशा व समाजाचा त्याला येणारा अनुभव यातून जगाकडे पाहण्याची त्याची म्हणून एक दृष्टी तयार झालेली आहे. मित्रांशी होणाऱ्या चर्चांमधून व त्याच्या आत्मनिवेदनातून पदव्युत्तर व एम. फिल. संशोधन अशा तीन-चार वर्षांच्या कार्यकाळाचे आत्मनिवेदन या कादंबरीत आहे. 

या काळात त्याला पुण्यात ज्या तऱ्हेचे अनुभव येतात त्याचे कथन या कादंबरीत आहे. विद्यापीठातील विभाग हे सांस्कृतिक- जातीय हितसंबंधांच्या राजकारणाचे अड्डे झाले आहेत. ज्ञानव्यवहारापासून त्यांनी फारकत घेऊन ते आक्रसलेले आहेत; ढोंगी झालेले आहेत. त्याचे चित्रणही कादंबरीत आहे. तसेच लेखकांचा दुटप्पीपणा, करिअरिस्ट वृत्ती, पुरस्कारांसाठीचे साटेलोटे याबद्दलची विपुल चित्रणे कादंबरीत आहेत. शिक्षकाकडून विद्यार्थी-विद्यार्थीनींचे आर्थिक तसेच लैंगिक शोषण कशा प्रकारे होते; मध्यमवर्गीय सांस्कृतिक धुरीण समजला जाणारा समाजाचा एक वर्ग मद्यपानाच्या किती आहारी गेला आहे, याच्या अनेक परी कादंबरीत आहेत. 

एका अर्थाने या काळातील शैक्षणिक, सांस्कृतिक जीवनाच्या अधःपतनाचे चित्रण कादंबरीतून व्यक्त झाले आहे. महाराष्ट्रातले वास्तव आणि समाजाचे विचारविश्व तरुणांच्या विविध चर्चांद्वारे कादंबरीत मुरविले आहे. या आभासी (व्हर्च्युअल) जगाचे वास्तव स्वरूप मांडत असताना लेखकाने आधीच्या काळातल्या जगाचे समांतरपणे स्मरण करून दिले आहे की, जे निवेदकाच्या मनातील देशीय जाणिवेचे जग आहे. ज्यात परंपरानिष्ठ समूहभाव, सद्‌भाव, एकोपा, सहानुभाव, चांगल्या रीती, मानवेतर सृष्टीविषयीचा विशाल भाव या बाबींना स्थान आहे. त्यामुळे कादंबरीतील जीवनदृष्टीत समांतरपणे विरोधपूर्ण ताणांनी उपरोक्त भान बांधले जाते. विचारी, संवेदनशील मुख्य पात्राच्या दृष्टिकोनातून समकाळ उभा केला आहे. त्याच्या अनेकविध मिती उलगडल्या आहेत. चर्चाविश्वातून एकाच विषयाच्या सर्व बाजू उजागर होतील, अशी भूमी तरुणांच्या चर्चांतून तयार केली आहे. 

उन्नत जीवन जाणिवांचा प्रगल्भ निवेदक उभा केल्याने वाचक त्याच्या दृष्टिनियंत्रणक्षेत्रात आपोआप सामावला जातो. या दृष्टिबिंदूतून वाचक कादंबरीगत वास्तवाशी समरस होतो आणि त्याच्या व्यक्तिगत भवतालाशी हे कादंबरीगत वास्तव अनेक दिशांनी सेंद्रिय बंध निर्माण करते, हे या कादंबरीचे यश आहे. व्यक्तिगत अनुभवविश्वाचे सार्वत्रिकीकरण करणे, व्यक्तीच्या जगण्यातील अनेक दिशांनी व्यापत जाणारे अनुभवविश्व समूहभावाशी जोडून घेणे, हे या प्रथम पुरुषी निवेदनाने या कादंबरीत साधले आहे. एका तरुण नायकाचे आजच्या काळाविषयीचे मनोगत तीमधून कैफियतीच्या स्वरात मांडले गेले आहे. त्यामुळे निवेदकाला जे काही सांगावयाचे आहे, ते सांगायला प्रथमपुरुषी निवेदनतंत्र उपयुक्त ठरले आहे. 

तरुण मुलांच्या निवेदनसृष्टीत भाषारूपात जी बेधडकता, तिरकसपणा असतो तो या शैलीत आहे. या स्व-संवादी आत्मपर निवेदनात स्वतःचे अंतरंग उलगडून दाखवणारी ही शैली आहे. निवेदकाच्या विविध भावभावना, चीड, संताप, उद्वेग, मूल्यविषयक दृष्टिकोन भारीत करणारी ही आत्मनिवेदनशैली आहे. पत्रात्मक निवेदनतंत्रही कादंबरीत आहे. नायकाला घरून तसेच मित्रांची आलेली पत्रे यामध्ये आहेत. या पत्रशैलीतूनही पात्रांचे अंतरंगदर्शन व त्या त्या पात्राचे आजच्या काळाविषयीचे विचार व्यक्त झाले आहेत. तसेच या कादंबरीतील चर्चात्मक संवादाचे वेगळे परिमाण आहे. 

मल्हारचे मित्र, लेखक, प्राध्यापक व आई-वडील यांच्यातील चर्चाप्रधानतेतून आजच्या काळाचे संवेदन आणि मराठी समाजाचा कलस्वभाव व्यक्त झाला आहे. किंबहुना कादंबरीतील या चर्चांनी आजच्या महाराष्ट्राचे समाजमन व त्याची वाटचाल व्यक्त झाली आहे. साधारणतः दहा दीर्घ भागांच्या मांडणीतून कादंबरी उलगडते. प्रत्येक भागाच्या अखेरीस महानुभाव भाषाशैलीतील लीळारूपे देऊन कादंबरीची साखळी सांधली आहे. कादंबरीच्या अनुभवविश्वाला सांधणाऱ्या सूत्रप्रतिमांची बांधणी महानुभावीय गद्यशैलीने दृष्टान्तरूपाने सादर केली आहे. 

मात्र हे सर्व रचत असताना निवेदकाच्या मनात नागर जीवनाच्या सुस्तावलेपणातून, सुजीतून येणाऱ्या नैराश्यातून तो आपल्या पूर्वपरंपराकडे वळतो. हा परंपराशोध काही वेळा भावनिक व अतिरिक्त प्रेमबहुलता दर्शवतो. निवेदकाचा विचारपक्ष काही वेळा आग्रही एकरंगी होताना दिसतो. एकूणच समकालीन महाराष्ट्रीय समाजजीवनाचे अंतरंग उलगडून दाखवणारी ‘जोहार’ ही महत्त्वाची कादंबरी आहे. नवभांडवली उदार अर्थव्यवस्थेतून घडवला जात असलेला समाज आणि त्यातले ताण तीमधून मोठ्या प्रमाणात ध्वनीत झाले आहेत. त्याचा एक अक्ष हा बहुजनांच्या इतिहासलेखनाच्या चर्चाविश्वाचा आहे. नेमाडे प्रभावातील समकालीन समाजाच्या दिशा दर्शवणारी व तरुणांच्या विचारविश्वाचे दर्शन घडवणारी ही कादंबरी आहे. 

जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर समाजवास्तवातील अनेक गुंतागुंतीचे प्रश्न या कादंबरीने प्रभावीरित्या मांडले आहेत. त्याचा सांस्कृतिक अन्वयार्थ शोधायचा प्रयत्न केला आहे. सर्वहारा वर्गाचा भविष्यकाळातील कालस्वर काय असेल, याचे सूचन करणारी ही या काळातील महत्त्वाची कादंबरी आहे.

जोहार 

लेखक : सुशील धसकटे, 
अक्षरवाङ्‌मय प्रकाशन, पुणे. 
पृष्ठे : 332 । मूल्य : 300/- 

Tags: अक्षरवाङ्‌मय प्रकाशन सुशील धसकटे नवे पुस्तक maharshi vitthal ramji shinde sharad patil go pu deshpande ram bapat modernization globalization novel kadambari neo capitalist economy johar randheer shinde bhalchandra nemade aksharvadmay publication sushil dhaskate nave pustak book महर्षी विठ्ठल रामजी शिंदे कॉ.शरद पाटील गो.पु. देशपांडे राम बापट आधुनिकीकरण जागतिकीकरण कादंबरी नवभांडवली अर्थव्यवस्था जोहार रणधीर शिंदे जागतिकीकरण काळातील मूल्यसंघर्षाची कहाणी भालचंद्र नेमाडे weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके