डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

नाटक व रंगभूमीविषयक परिभाषा संग्रहाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे सादरीकरण व शैली. या संज्ञा-स्पष्टीकरणात वस्तुनिष्ठता आणि सुस्पष्टता आहे. भाषा सुबोध आणि प्रौढ आहे. वाचकांना समजावून देण्याची त्यात हातोटी  आहे. एखादी संज्ञा घेऊन तिचा अर्थ सांगणे, त्यातील ऐतिहासिक परिवर्तने नोंदवून त्या संज्ञेचे अन्य संबंधित घटकांशी नाते अधोरेखित करणारी ही पद्धत त्यांनी अवलंबली आहे. त्या विषयासंदर्भात अन्य अभ्यासकांची मते देऊन त्याविषयीचे स्वतंत्र असे प्रतिपादनही आहे. विषय अधिक खुलावा म्हणून संस्कृत, पाश्चात्त्य व मराठी नाटकांमधील अनेक उदाहरणे दिली आहेत. त्या त्या विषयाच्या नोंदीच्या प्रारंभी किंवा स्पष्टीकरणार्थ मूळ संस्कृत श्लोकांचा व इंग्रजी अवतरणांचा पदोपदी निर्देश आहे. संस्कृत आणि युरोपिअन नाटकांचा त्यांचा व्यासंग थक्क व्हावं असा आहे.

मराठीत ज्ञानपरंपरेला कोश व परिभाषासंग्रह वाङ्‌मयाची समृद्ध परंपरा लाभली आहे. विविध प्रकारच्या शब्दकोशांनी यात मौलिक अशी भर पडली आहे. शब्दकोश, स्थळकोश, व्युत्पत्तिकोश, नामकोश, मिथक कोश, संतसाहित्य शब्दकोश, बोलीभाषाकोश तसेच विविध प्रकारचे पारिभाषिक कोश काळाच्या टप्प्यावर निर्माण झाले. श्री.व्यं. केतकरांच्या ज्ञानकोशापासून समृद्ध अशा कोशवाङ्‌मयाची परंपरा मराठीत निर्माण झाली. कोशवाङ्‌मय व परिभाषा संग्रह ज्ञानसंकल्पना व्यवहारात ‘वाटाडे’ म्हणून काम करतात. कोणत्याही भाषिक ज्ञानपरंपरेला अनेक प्रकारच्या परिभाषा संग्रहांच्या निर्मितीतून समृद्धता लाभत असते. अलीकडे मात्र परिभाषा संग्रहनिर्मितीची परंपरा क्षीण झाली आहे. त्याची विविध कारणे संभवू शकतात. मराठीत कोशवाङ्‌मयाची परंपरा अधिक समृद्ध होऊ शकली नाही. याचे कारण ‘मराठी भाषा ही सर्वार्थाने ज्ञानभाषा होऊ शकली नाही. आपली प्रचलित शिक्षणयंत्रणाही याला जबाबदार आहे. शिक्षणाचे माध्यम, बौद्धिक कार्य करणाऱ्या वर्गाची वृत्ती आणि एकूण शिक्षणयंत्रणा कोशनिर्मितीसाठी पोषक-पूरक नाही.’ (सुधीर रसाळ, प्रस्तावना, कोशवाङ्‌मय विचार आणि व्यवहार - सदाशिव देव) हा विचार ध्यानात घेण्याजोगा आहे.

मराठीत परिभाषा संग्रहाची निर्मिती संस्थात्मक तसेच व्यक्तिगत पातळीवर झाली. विशेषतः महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालयाच्या वतीने विविध विषयांवरील परिभाषा कोशांची निर्मिती झाली. विज्ञान व मानव्य विद्या शाखेतील अनेक विषयांवर कोशांची निर्मिती झाली. या बरोबर व्यक्तिगत स्वरूपातदेखील काही कोशांची निर्मिती झाली. दे. द. वाडेकर यांचा तत्त्वज्ञान कोश व स.मा.गर्गे यांचा सामाजिक शास्त्रांतील विषयसंकल्पनांचा परिचय करून देणारा ‘भारतीय समाजविज्ञान कोश’ हे महत्त्वाचे होत. मराठी नाटकाच्या संदर्भात यापूर्वी वि.भा.देशपांडे यांचा ‘मराठी नाट्यकोश’ प्रसिद्ध झालेला आहे. भाषिक संस्कृतीत शासन स्तरावर झालेल्या सांस्कृतिक कार्याची नोंद फारशी सकारात्मक पद्धतीने घेतली जात नाही. बऱ्याचदा त्याकडे नकारात्मक दृष्टीने पाहिले जाते. तेही माहिती न घेता. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या उद्‌घाटनपर भाषणात मराठी ज्ञानभाषा व्हावी अशी इच्छा व्यक्त केली होती. आणि ‘ज्ञानाच्या सरोवराचे पाट आपण लोकांच्या जीवनापर्यंत पोहोचवण्यासाठी साहित्य संस्कृती मंडळाने मदत केली पाहिजे,’ अशी त्यांची धारणा होती. त्या दृष्टीने मंडळाने आजवर भाषासाहित्यासंबंधी मूलभूत स्वरूपाची कामे केली आहेत. त्याचेच एक रूप म्हणजे प्रा.विलास खोले यांचा ‘नाटक आणि रंगभूमी परिभाषा संग्रह’.

ज्येष्ठ समीक्षक प्रा. विलास खोले यांचा अलीकडेच ‘नाटक आणि रंगभूमी परिभाषा संग्रह’ (ऐतिहासिक व विवरणात्मक पर्यालोचन) हा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून प्रकाशित झाला आहे. मराठीतला हा पहिलाच नाटक आणि रंगभूमीविषयक परिभाषा संग्रह आहे. प्रा. विलास खोले हे मराठीचे व्यासंगी आणि साक्षेपी समीक्षक म्हणून ओळखले जातात. आधुनिक साहित्य, प्राचीन साहित्य ते एकोणिसावे शतक असे त्यांचे व्यासंगविषय आहेत. त्यांची काही वाङ्‌मयविषयक संपादने मौलिक ठरली आहेत. शोकांतिका उदय, चरित्रवाङ्‌मय व मराठी वाङ्‌मयीन संस्कृतीवरील त्यांचे लेखन महत्त्वाचे आहे. चौकट, शांताराम कथा, विसाव्या शतकातील मराठी समीक्षा, गेल्या अर्धशतकातील मराठी कादंबरी, भालचंद्र नेमाडे : व्यक्ती, विचार आणि साहित्य- ही त्यांची संपादने महत्त्वाची होत. त्यामुळे खोले यांच्या वाङ्‌मयीन व्यासंगदृष्टीचा परिपाक असणारा हा परिभाषा संग्रह महत्त्वाचा ठरतो.

‘नाटक आणि रंगभूमी परिभाषा संग्रह’ भारतीय नाट्यशास्त्र, पाश्चात्त्य नाट्यशास्त्र, नाट्यप्रकार आणि मराठी नाट्यरूपे या चार भागांत विभागला आहे. या परिभाषा संग्रहाचे मोल अनेकांगांनी महत्त्वाचे आहे. नाटक-रंगभूमीचे अभ्यासक, भाषासाहित्य- ललितकलेचे विद्यार्थी, रंगकर्मी व सर्वसामान्य वाचकांच्या दृष्टीने उपयुक्त असा हा परिभाषा संग्रह आहे. जवळपास 827 पृष्ठांच्या या महाग्रंथात नाटक रंगभूमीच्या महत्त्वपूर्ण संकल्पनांचा विस्तृत परिचय आहे. या परिभाषा संग्रहाचे एक वेगळेपण म्हणजे त्याची रचना कोशवाङ्‌मयाच्या मर्यादा ओलांडून त्या त्या संज्ञेविषयी सर्वांगीण, यथार्थ, विवरणात्मक माहिती देणारा हा परिभाषा संग्रह आहे. एखाद्या विषयाची व्याप्ती आणि महत्त्व लक्षात घेऊन त्याचे विवेचन केले आहे. एखादी नोंद चार-पाच ओळींपासून ते त्या विषयाचे महत्त्व लक्षात घेता ती दहा पृष्ठांचीसुद्धा दिलेली आहे. खोले यांच्या नाट्य व वाङ्‌मयविषयक दृष्टिकोनाचाही त्यावर प्रभाव आहे. रंगभूमी व नाटकाविषयीचा ज्ञानमाहितीचा पसारा हा व्यापक आहे. नाटकाच्या उगमापासून नाट्यपरंपरेतील परिवर्तनाचा चिकित्सक आंतरभेद त्यामध्ये आहे. अलीकडील काळात मराठी ज्ञानपरंपरेत या प्रकारची ज्ञानसाधना विरळा म्हणावी लागेल. नाटक ह्या प्रकाराच्या भारतीय व पाश्चात्त्य परंपरा, त्यातील ऐतिहासिक परिवर्तने व वैशिष्ट्यांचा सूक्ष्म स्वरूपाचा वेध त्यामध्ये आहे.

‘भारतीय नाट्यशास्त्र’ या भागात ‘भरता’पासून ‘भरतवाक्या’पर्यंतच्या जवळपास 76 नोंदींतून भारतीय नाट्यपरंपरेचा परिचय आहे. पहिल्या भागामध्ये संस्कृत नाट्यशास्त्रातून उद्‌भवलेल्या नाट्यपरंपरेची मांडणी आहे. मुख्यत्वे भरताचे ‘नाट्यशास्त्र’ व भारतीय साहित्य मीमांसकांच्या मांडणीतून आकाराला आलेली ही मांडणी आहे. अभिनय, रसचर्चा, नाट्यांगे, नाट्यतंत्रे, कथानक, संविधान स्वरूप, नायक, विदूषक, नांदी ते भरतवाक्य- या नाट्यघटकांची मांडणी आरंभीच्या भागात आहे. भारतीय नाट्यशास्त्राची वाटचाल यात आहे. एका अर्थाने संस्कृत परंपरेतून उद्‌भवलेल्या नाट्यवाङ्‌मयाचा नकाशा त्यामध्ये आहे. नाट्यस्वरूप, नाटकांगे, रूपसादरीकरण स्वरूपाची माहिती आहे. कोशवाङ्‌मयामध्ये एक प्रकारची वस्तुनिष्ठता अपेक्षिलेली असते. अशी वस्तुनिष्ठता या परिभाषा संग्रहामध्ये तर आहेच; मात्र ते ओलांडून ती विश्लेषण-स्वरूप धारण करते. त्यामुळे संबंधित विषयाच्या माहितीच्या कक्षा विस्तारतात. नाट्य स्वरूपाच्या दिग्दर्शनाबरोबरच त्यातील टप्पे, बदल आणि त्या भाषिक संस्कृतीच्या नाट्यविषयक दृष्टिकोनाची प्रचिती येते. त्या त्या विषयासंदर्भात अन्य मीमांसकांनी जोडलेल्या विचारापुष्ट्यर्थ त्या त्या ठिकाणी दिला आहे. त्यामुळे पहिल्या भागात भारतीय नाट्यसृष्टीचे स्वरूप विशद करणाऱ्या पारिभाषिक संज्ञांची माहिती आहे.

दुसऱ्या भागात पाश्चात्त्य परंपरेतील नाट्यस्वरूपाची मांडणी आहे. भारतीय रंगभूमीपेक्षा तुलनात्मकदृष्ट्या प्रगत आणि वैविध्यपूर्ण असणाऱ्या युरोपीय रंगभूमीचा विमर्श या भागात आहे. जवळपास 130 नाट्यविषयक संज्ञांतून पाश्चात्त्य नाटक व रंगभूमीविषयीचा परिचय आहे. एका अर्थाने आधुनिक नाट्यसंकल्पनेच्या वाटचालीचे दिशादिग्दर्शन यामध्ये आहे. पाश्चात्त्य रंगभूमी ही वैविध्यपूर्ण व चल स्वरूपाची आहे. त्यामुळे अशा नाट्यपरंपरेची माहिती आणि त्या संबंधीचा परिप्रेक्ष्य अभ्यासकाकडे नीट असल्याशिवाय त्याचे सादरीकरण नीट होणे शक्य नसते. त्यामुळे नाट्यशास्त्रावरील मूलभूत ग्रंथांच्या वाचन-व्यासंगातून आलेली विचारदृष्टी त्यांच्या विवेचनात आहे. नाट्यविचारांच्या जागतिक परिप्रेक्ष्याची मांडणी  आहे. ॲरिस्टॉटलपासून ॲब्सर्ड रंगभूमीपर्यंतच्या बदलांचा ज्ञानमागोवा आहे. पाश्चात्त्य नाटककार, नाट्यपरंपरा, नाट्यचळवळी, अभिनय शैली यांच्या महत्त्वपूर्णर् नोंदी तसेच अंक, नट, अभिनय, संवादाची विविधस्वरूपी कार्ये, मुद्राविष्कार, रंगभूषा व रंगमंच संकेत या विषयांची मांडणी आहे. विशेषतः महत्त्वाच्या नाट्यकृतींचे विशेष, लेखक-कामगिरी, अभिनेते व नाट्यचळवळींची माहिती या भागात आहे. पाश्चात्त्य रंगभूमीची मांडणी करत असताना काही महत्त्वाच्या विषयांची विस्ताराने त्यांनी चर्चा केली आहे. नाटकातील कथानकाचे स्वरूप, संवादाची कार्ये, नाटकातील संघर्ष स्वरूप यांची अतिशय विस्तृत माहिती दिली आहे. त्यामुळे पाश्चात्त्य आधुनिक रंगभूमीचे स्वरूप व वाटचालीचा नोंदपट या भागात आहे. 

ग्रंथाच्या तिसऱ्या भागात नाट्यप्रकारविषयक संज्ञांचा विचार आहे. यात शोकान्तिका, सुखान्तिका, मेलोड्रामा, प्रहसन, उपहासिका या नाट्यप्रकारांचे विवेचन आहे. शोकात्मिका हा खोले यांच्या अभ्यासाचा दीर्घ काळाचा विषय राहिला आहे. यापूर्वी त्यांचा ‘शोकांतिकेचा उदय’ हा ग्रंथही प्रकाशित झालेला आहे. मूलभूत नाट्यप्रकाराची सैद्धान्तिक स्वरूपे, इतिहासक्रम व वैशिष्ट्ये त्यांनी नोंदविली आहेत. सांकल्पनिक मांडणीबरोबरच त्या त्या प्रकाराच्या उदयाची पार्श्वभूमी आणि परंपरा वाटचालीचे दिग्दर्शन आहे. त्याच्या आशयरूप वैशिष्ट्यांचे स्वरूप विशद केले आहे. संज्ञा स्पष्टीकरणाबरोबर नाट्यविषयाचे स्वतंत्र विश्लेषणात्मक चिंतन आहे. तिसऱ्या आणि चौथ्या भागात हा विवरणात्मक पट जास्त आहे. या प्रकारातील परिभाषा विवेचनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे नाट्यसंकल्पनाविषयक स्वरूपाची विश्लेषणात्मक मांडणी. त्यात त्यांची नाटक प्रकाराविषयीची स्वतंत्र अन्वेषणदृष्टी आहे. शोकान्तिका व सुखान्तिकांवर जवळपास 60 पृष्ठांचा मजकूर आहे. विशेषतः नाट्यप्रकाराच्या मराठीतील सैद्धान्तिक प्रत्यक्ष परिस्थितीबद्दलची मीमांसा आहे. ती नवी आहे. मराठी नाट्यचर्चेतील नाट्यसंकल्पनांकडे पाहण्याची नवी दृष्टी त्यामध्ये आहे. मराठीत नाट्यपरंपरेत शोकान्तिका न आढळण्याचे कारण ते संस्कृत नाटकाच्या अनुबंधात शोधतात. भारतीय नाट्यपरंपरेला वास्तवाऐवजी आदर्शाचे असलेल्या कारणातही शोधले आहे. याबरोबरच मराठी नाटककारांना शेक्सपिअरचे समग्र आणि वास्तव आकलन झाले नव्हते. मराठी नाटककारांचे नाटकाचे संकल्पन हे रोमँटिक होते, अशी मौलिक मीमांसा त्यांनी केली आहे. स्वाभाविकच मराठी नाटककारांच्या दृष्टिकोनावर असलेल्या भारतीयत्वाच्या प्रभावाची ही सखोल मीमांसा आहे.

सुखान्तिका प्रकाराचे स्वरूप विशद करताना त्याची सामाजिक, सांस्कृतिक, पार्श्वभूमी ध्यानात घेतली आहे. मानवी जीवनेच्छाकर्षण, स्त्री-पुरुष प्रेमबंध, हास्य, सत्य प्रीती, जीवनाची आस, सुखात्म जीवनकलह व आनंदविषयक तृष्णा यांत सुखान्तिकेचे वेगळेपण शोधले आहे. या संकल्पनेतील सूक्ष्मता आणि प्रत्यक्षातील मराठी नाट्यस्थितीचे विहंगामवलोकन आहे. खोले यांच्या विवेचनात नाट्यवाङ्‌मय व परंपरेविषयीची एक इतिहासदृष्टी आहे. ती सूक्ष्म अशा वाचन-व्यासंगातून आलेली आहे. प्रहसन ही रंगभूमीची विशुद्ध अशी निर्मिती आहे, असे सांगून प्रहसनाचे सारे लक्ष नटाच्या शरीराकडे असते- असे नोंदवून चार्ली चॅप्लिनच्या अभिनयाचे नाते प्रहसनाशी जोडले आहे. मेलोड्रामा व प्रहसन हे दोन्ही नाट्यप्रकार पलायनवादी असून ते नैतिक जबाबदारीपासून दूर राहतात असे सुचविले आहे. तर ‘समकालीन असण्या’त उपहासिकेचे सामर्थ्य जसे साठविले आहे तशीच तिची मर्यादाही- असा निष्कर्ष नोंदविला आहे. ‘मराठीत एकांकिकेला प्रतिष्ठा मिळवून देणारे दोन लेखक म्हणजे पु.ल.देशपांडे व विजय तेंडुलकर’, या प्रकारची निरीक्षणे अनेक ठिकाणी आहेत. त्यामुळे विषय संकल्पना मांडणीबरोबरच त्याला रंगभूमीच्या जडणघडणीचा व्यापक परिप्रेक्ष्य लाभतो. त्यामुळे नाट्यसंकल्पनांच्या स्वतंत्र अर्थनिर्णयनाबरोबर तिच्या सूक्ष्म कंगोऱ्यासह नाट्यपरंपरेच्या इतिहासदृष्टीचे भान त्यात आहे. संहिता, नट, अभिनय, सादरीकरणाबरोबर सामाजिक-सांस्कृतिक परिवेशाच्या सूचना या विवेचनात आहेत.

चौथ्या भागात मराठीतील काही नाट्यरूपांचे विवेचन आहे. पोवाडा, लावणी, फटका, तमाशा, बुकिश नाटक, संगीत नाटक, एकांकिका, नाट्यच्छटा या मराठीतील नाट्यरूपाची माहिती आहे. खास मराठीच्या म्हणून नाट्यरूपाची ही मांडणी आहे. मराठी नाट्यसंस्कृती व लोकरंगभूमीचा परिप्रेक्ष्य त्यामध्ये आहे. दोन शतकांतील मराठीतील नाट्यविषयक रूपमीमांसेचा त्यास आधार आहे. बदलत्या परिमाणातील  मराठी रंगभानाची दृष्टी त्यात आहे. नाटक कंपन्या, त्यांचे सादरीकरण, नाट्यकलावंत, संहिता बारकावे, शहरांचे, संस्थांचे, स्थळांचे असंख्य तपशील त्यात आहेत. बुकिश व संगीत नाटके  महाराष्ट्रात कुठे सादर होत, त्याबद्दलची विपुल माहिती आहे. मराठी नाट्यरूपाच्या जडणघडणीच्या प्रवासखुणा त्यात आहेत. नाट्यरूपाच्या वाटचालीत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षणे अध्याहृत असणाऱ्या महाराष्ट्र नाट्यसंस्कृती काळाची पार्श्वभूमी व दिशांचे सूचन आहे. त्यामुळे नाटक व रंगभूमीविषयीची ऐतिहासिक दृष्टी या संग्रहाचा लक्षणीय विशेष आहे. हा परिभाषा संग्रह केवळ नाट्यस्वरूपाकडे लक्ष वेधतो असे नव्हे, तर भारतीय, पाश्चात्त्य नाट्यपरंपरेचा प्रवास आणि गुणविशेष विशद करताना नाट्यस्वरूपाबरोबर समाजसंस्कृती व काळभानाचे  अधोरेखन त्यामधून झाले आहे. एका अर्थाने त्या त्या संस्कृतीची रंगभानदृष्टी अप्रत्यक्षपणे त्यामधून सादर झाली आहे. तसेच या परिभाषा संग्रहाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे नाटकाविषयीच्या अनेक अपरिचित संज्ञांचे स्पष्टीकरण. सर्वसामान्यांना अनभिज्ञ वाटाव्यात अशा अनेक नाट्यसंज्ञांचा समावेश यात आहे. उदा. ‘विष्कंभक’, ‘पताका’, ‘ईहामृगा’, ‘डिम’, ‘वीथी’, ‘डॅमॅटर्जी’, ‘हॅमिर्शिया’, ‘ह्युब्रिस’, ‘काबुकी’, ‘अपोलो’ अशा अनेक नव्या संज्ञांचे स्पष्टीकरण दिले आहे.

नाटक व रंगभूमीविषयक परिभाषा संग्रहाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे सादरीकरण व शैली. या संज्ञा-स्पष्टीकरणात वस्तुनिष्ठता आणि सुस्पष्टता आहे. भाषा सुबोध आणि प्रौढ आहे. वाचकांना समजावून देण्याची त्यात हातोटी  आहे. एखादी संज्ञा घेऊन तिचा अर्थ सांगणे, त्यातील ऐतिहासिक परिवर्तने नोंदवून त्या संज्ञेचा अन्य संबंधित घटकांशी नाते अधोरेखित करणारी ही पद्धत त्यांनी अवलंबली आहे. त्या विषयासंदर्भात अन्य अभ्यासकांची मते देऊन त्याविषयीचे स्वतंत्र असे प्रतिपादनही आहे. विषय अधिक खुलावा म्हणून संस्कृत, पाश्चात्त्य व मराठी नाटकांमधील अनेक उदाहरणे दिली आहेत. त्या त्या विषयाच्या नोंदीच्या प्रारंभी किंवा स्पष्टीकरणार्थ मूळ संस्कृत श्लोकांचा व इंग्रजी अवतरणांचा पदोपदी निर्देश आहे. संस्कृत आणि युरोपिअन नाटकांचा त्यांचा व्यासंग थक्क वाटावा असा आहे. नाटक व रंगभूमी प्रकारांविषयी खोले यांना विशेष आस्था असल्यामुळे त्यांच्या व्यासंग व अन्वेषणाच्या मार्मिक नोंदी सर्वत्र आहेत. त्यामुळे ही शैली वस्तुनिष्ठतेची बाजू दक्ष ठेवून विश्लेषणात्मक मीमांसेच्या प्रांतात शिरते. ‘सं. सौभद्र’ या नाटकाविषयी त्यांनी लिहिले आहे ते असे, ‘झाली ज्याची उपवर दुहिता, चैन नसे त्या तापवि चिंता’ अशा निर्मळ कौटुंबिक समस्येचा स्पर्श झालेले, सामाजिक जिव्हाळ्याच्या नात्यात पौराणिकता मिसळवून टाकणारे आणि रसिकवृत्ती हसत्या खेळत्या ठेवीत उत्कट जिव्हाळ्याने सामाजिक पातळीवरील कथेशी एकजीव झालेले आनंदमय कौटुंबिक नाटक सौभद्र 1883 पासून मराठी रंगभूमीच्या अखंड शिरोभागी राहिले.’ अशा भाषेत सौभद्रची ऐतिहासिक कामगिरी विशद केली आहे. त्यासाठी त्यांनी भाषेचा रास्त, यथोचित आणि प्रगल्भ वापर केला आहे. ही विवरणशैली प्रौढ आणि प्रगल्भ स्वरूपाची आहे. उदा. ‘प्रेक्षक अधिकारी असणे म्हणजे विमल प्रतिभेने संपन्न असे हृदय असलेला मनुष्य’ किंवा रसविचारासंदर्भात बेडेकरांचे उदाहरण त्यांनी बेडेकरांच्याच शब्दांत ‘वीरपुरुषांच्या हौतात्म्यतेचा आनंद कृतार्थता व ध्येयपूर्तीचा असतो.’ असे म्हटले आहे. नाट्यस्वरूपातील व इतिहासक्रमातील सूक्ष्म बारकावे त्यांनी जागोजागी नोंदवले आहेत. ‘पूर्वरंग हा देवदेवतांना प्रसन्न करण्याचा नाट्यारंभीचा विधी आहे’, ‘आहार्य अभिनय म्हणजे नेपथ्यकर्म,’ अशी भाषास्थळे सबंध संग्रहात विखुरली आहेत.

या परिभाषा संग्रहाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, मराठीत संशोधनात्मक लेखन बव्हंशी वेळा पसरट, आस्वादपर, वर्णनात्मक स्वरूपाचे असते. त्यात वस्तुनिष्ठतेचा अभाव असतो. अलंकारिक भाषेचा आश्रय तसेच अनौपचारिक गोष्टीवेल्हाळ बऱ्याचदा दिसतो. त्यामुळे त्यात नेमकेपणाचा अभाव असतो. खोले यांनी प्रास्ताविकात म्हटले आहे की, आजवर एकाही मराठी अभ्यासकाने नाट्यविषयक लेखन करताना इतके मूलाधार दिलेले नाहीत. ना संस्कृत, ना इंग्लिश. हे एका अर्थाने खरेच आहे. या पार्श्वभूमीवर या लेखनाचे महत्त्व ध्यानात येते. त्यांचा स्वतःचा वाङ्‌मयकलादी विषयाचा व्यासंग तसेच इंग्रजी-मराठीतील 70 ग्रंथांची संदर्भसूची आहे. या पार्श्वभूमीवर खोले यांची लेखनशैली अत्यंत चिकित्सक, वस्तुनिष्ठ आणि प्रगल्भ स्वरूपाची आहे. त्यात विश्वासार्ह व्यासंग संदर्भाचा मोठा पट आहे. ती लक्ष्यविषयाला केंद्र करून नेमकेपणाला महत्त्व देणारी आहे. त्यामुळे नाटक व रंगभूमीविषयीच्या माहितीची विश्वसनीयता हे या परिभाषा संग्रहाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. या परिभाषा संग्रहाचे निर्मितिमूल्य हे गुणसंपन्न आहे. बऱ्याचदा शासकीय ग्रंथ फार निष्काळजीपणे छापले जातात. या संग्रहात लेखनविषयक नियमांचा अत्यंत काटेकोर अवलंब केला आहे. संस्कृत, मराठी, इंग्रजी भाषांतील लेखन त्या त्या ठिकाणी मुळाबरहुकूम व अधिक काटेकोरपणे नोंदविले आहे. आजच्या अभ्यासक्षेत्रात एवढे मुद्रणसौंदर्य अपवादभूत म्हणावे लागते. भाषेतील लिपिचिन्हे नेमकेपणाने नोंदविण्याचा कटाक्ष सर्वत्र सांभाळला आहे. संस्कृत, इंग्रजी मूळ शब्द व व्याकरणिक रूपांची अचूक मांडणी आहे.

एखाद्या विषयावरील इतकी सांगोपांग, प्रदीर्घ स्वरूपाची ग्रंथनिर्मिती करणे हे काम मोठे आव्हानप्रद  आणि जिकिरीचे काम असते. त्यासाठी एकाच वेळी अनेक पातळ्यांवरील अवधाने अभ्यासकाला सांभाळावी लागतात. व्यासंग, चिंतन, विषयकार्यकक्षा, व्याप्ती आणि तिच्या मर्यादा, अभ्यासविषयाबद्दलची चिंतनदृष्टी तसेच त्या विषयाच्या खोलवरच्या जिज्ञासा व आस्थेमुळे अशा प्रकारची दुर्लभ कार्ये सिद्धीस जातात. हा परिभाषा संग्रह या गुणांचे उत्तम उदाहरण आहे. विलास खोले यांच्या दीर्घ व्यासंग-साधनेचे फलस्वरूप म्हणजे हा संग्रह. मराठी ज्ञानपरंपरेला समृद्धता प्राप्त करून देणारे हे कार्य आहे. भविष्यात या परिभाषा संग्रहाचे मुद्रण झाल्यास समकालीन जागतिक रंगभूमीविषयक काही संज्ञांचा व मराठी रंगभूमी व नाटकाविषयी निश्चितच भर घालता येऊ शकेल. उदा. पथनाट्य, रिंगणनाटक वा राजकीय चर्चानाटक यांसारख्या विषयांचा त्यात समावेश होऊ शकेल.

एकंदरीत, मराठी ज्ञानपरंपरेत मौलिक ठरावा असा हा नाटक आणि रंगभूमीविषयीचा परिभाषा संग्रह आहे. नाटक व रंगभूमीविषयीची पायाभूत आणि सांगोपांग माहिती यामध्ये समाविष्ट आहे. सर्वसामान्य वाचक-प्रेक्षक, नाट्यलेखक, रंगकर्मी आणि विद्यार्थी-संशोधक यांना उपयुक्त असा हा परिभाषा संग्रह आहे. भारतीय, जागतिक नाट्यविचारांच्याबरोबर मराठी रंगभूमीचा मागोवा आणि ऐतिहासिक विमर्श त्यामध्ये आहे. नाट्यसृष्टीचे रंगभान उजळविणारा हा परिभाषा संग्रह आहे. नाटक व रंगभूमीविषयीची इतकी इत्यंभूत माहिती असणारा हा मराठीतील पहिलाच परिभाषा संग्रह असल्यामुळे सतीश आळेकर यांनी त्यास ‘नाटकज्ञानाचा नवा मूलभूत वाचनीय ग्रंथ’ म्हटले आहे.

नाटक आणि रंगभूमी परिभाषा संग्रह
(ऐतिहासिक व विवरणात्मक पर्यालोचन)

लेखक : विलास खोले
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई. 
पृष्ठे : 827, मूल्य : 263 रुपये

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके