डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

जागतिक साहित्याच्या तुलनेत समकालीन मराठी साहित्य

भारतीय लेखकांचाही मिलेनियम सर्वे होतो, त्यात मराठी लेखकांचे नाव नसते. पण हे त्या लोकांचे अज्ञान आहे, त्याला काय करणार? आपल्या माहितीच्या आणि आकलनाच्या उजेडात आपल्याला जे दिसते ते आपण मांडलेच पाहिजे. भाऊ पाध्ये, नेमाडे, दिलीप चित्र, अरुण कोल्हटकर, महानोर, नामदेव ढसाळ, सुर्वे, बाबुराव बागूल यांच्या लेखनाला अव्वल दर्जा आहे हे नक्की. दुनियेतील श्रेष्ठ गोळा करायचे ठरवले तर यांना जागा द्यावी लागेल.

जागतिक साहित्य म्हणजे कोणतं साहित्य ? इंग्लंड-अमेरिकेचं की चीन-रशियाचं? की या सगळ्यांचं मिळून? कारण, उदाहरणार्थ अमेरिकन नागरिकाला जे अमेरिकन असतं तेच जागतिक वाटत असतं. अगदी मिरच्या खाण्याचा तिथल्या कोणत्याही गावातला विक्रम हा त्यांच्या भाषेत जागतिक विक्रम असतो, इतकं त्यांचं दुनियेविषयी अज्ञान आणि दुनियेविषयीची कदाचित अवांछित तुच्छता. तरीही अमेरिका ही दुनियेतली सगळ्यात मोठी आर्थिक, राजकीय, वैज्ञानिक, लष्करी सत्ता आहे हे आपल्याला माहीत असतं आणि तो एक मानदंड धरून बाकी कोणाचाही विचार त्या त्या संबंधाने करता येतो. पण समजा आजचं अमेरिकन साहित्य हे दुनियेतलं सर्वश्रेष्ठ साहित्य आहे असं विधान केलं तर ते कितपत टिकेल? ते टिकत नाही हे आपल्यातल्या जाणत्या लोकांना जसं माहीत आहे तसंच ते अमेरिकेतल्या ज्ञानी लोकांनाही माहीत आहे! 'अ‍ॅडव्हेंचर्स ऑफ ऑगी मार्च' लिहिणारा सॉल बेल्लो किंवा 'कॅच ट्वेंटी टू'. 'समथिंग हॅपन्ड' लिहिणारा जोसेफ हेलर वगळता मोठे कादंबरीकार आज त्यांच्याकडे नाहीत आणि त्यांना आज समकालीन म्हणता येणार नाही. साहित्याच्या जगातील आर्थिक उलाढाल त्यांचीच सगळ्यांत मोठी आहे कारण तिथं लिहिल्या जाणाऱ्या बेस्ट सेलर्स अव्वल दर्जाची कथा, कादंबरी, कविता अमेरिकेतून येण्याची जी थोडी-फार शक्यता आहे ती काळे अमेरिकन, आशियाई अमेरिकन, अमेरिकन ज्यू, आदिवासी अमेरिकन, इंडियन अशा लोकांमधल्या लेखकांमधून. बाकी सगळ्या गोष्टींचे कारखाने अमेरिकेत आहेत. अगदी साहित्य निर्मितीचे साचेही तिथल्या व्यवस्थेत तयार उपलब्ध असतात. विविध प्रसंग, व्यक्ती, भावभावना, प्रतिक्रिया यांच्या वर्णनांचे तयार सॉफ्टवेअर वापरून परिस्थिती, पात्र, प्रसंग यांच्या पर्युटेशन व कॉम्बिनेशनची अनेकविध रूपं संगणकाच्या साहाय्याने तयार करून कादंबऱ्या लिहिण्याचे मनसुबे ज्या व्यवस्थेत प्रत्यक्षात आणले जातात तिथे आणखी बोलणार काय? माणसाचे सगळे जगणंच व्यापारीकरणाच्या, व्यावसायिकतेच्या विळख्यात इतकं घट्ट अडकलेलं असताना साहित्य वगैरे गोष्टी त्यातून कशा सुटणार? त्या सुटलेल्या नाहीत. तरीही ते हिकमती लोक बुद्धिमान खासच आहेत. दुनियेतले नवे, चांगले सगळे आपल्या भाषेत आणून ठेवण्याची खबरदारी त्यांनी कायम घेतलेली आहे. त्यामुळे त्यांचा जसा फायदा तसाच आपलाही. कारण आपणही इंग्रजीतूनच दुनिया वाचतो आणि अर्थात दुनियेतलं साहित्यही. त्यामुळे जागतिक साहित्य म्हणजे इंग्रजीतून आपल्यापर्यंत पोहोचलेलं साहित्य अशी मर्यादा आपल्याला घालून घ्यावी लागते. ही खिडकी इंग्लंड-अमेरिकेने आपल्याला उपलब्ध करून दिलीय हे त्यांचे आपल्यावर उपकार म्हटले पाहिजेत.

दक्षिणेचा दबावगट 

या खिडकीतून पाहिले की रशियासकट पूर्व युरोप, लॅटिन अमेरिका, आफ्रिका व आशिया खंडातील गरीब देश यांतून आज दुनियेतलं अव्वल साहित्य लिहिलं जातंय असं ढोबळ अथवा स्थूल मानाने केलेलं विधान फारसं चुकीचं दिसणार नाही. त्यात काही चमत्कृती अर्थातच आहेत. उदाहरणार्थ, चेक भाषेत मुळ असलेला मिलान कुंदेरा हा आजचा महत्त्वाचा कादंबरीकार सरळ इंग्रजीत लिहितोय. 'इम्पॉर्टलिटी सारखी महत्त्वाची कादंबरी लिहिणाऱ्या या लेखकाची अलीकडची कादंबरी 'स्लोनेस' त्यानं मुळात फ्रेन्चमध्ये लिहिलीय. ती 1995 साली फ्रेन्चमध्ये प्रसिद्ध झाली आणि 1996 मध्ये तिचा इंग्रजी अनुवाद प्रसिद्ध झाला आहे. भारतात मुळं असलेला सलमान रश्दी इंग्रजीत लिहितो व आज तो ब्रिटिश नागरिक आहे. आणि उद्या तो अमेरिकनहीं होईल. देश, भाषा, संस्कृती यांना कच्चा माल म्हणून वापरत लिहिण्याचे प्रयत्न अशा लेखकाला कुठे घेऊन जातील, समजत नाही. अर्थात, इंग्रजीत लिहिणारे हिंदुस्तानी लोक आणखी पुष्कळ आहेत. पण दुनियेच्या नकाशात त्यांनी आपली जागा केल्याचे दिसत नाही. मुळात अशी जागा करण्यासाठी कोणताही बरा लेखक लिहीत नसतो, तरी हिंदुस्तानातल्या अनेकांची गर्भित धारणा त्या प्रकारची आहे हेही खरे आहे. त्यामानाने पोर्तुगालचा जोस सारामागो, कोलंबिया (लॅटिन अमेरिका) येथील गार्सिया मार्केझ, पेरूचा मारिओ व्हर्गास योसा हे आपापल्या मातृभाषेत लिहिणारे श्रेष्ठ लेखक म्हटले पाहिजेत. योसा तर राजकीय उद्योगांमध्येही सक्रिय आहे. फुजिमोरी या पेरूच्या सध्याच्या अध्यक्षांविरुद्ध त्यानं निवडणूक लढवली होती आणि निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत तो महत्त्वाचा उमेदवार होता. याच प्रकाराने अँकन पॅटन, नादिन गॉर्दिमेर (द. आफ्रिका), हाकिब महफूज (इजिप्त) हे महत्वाचे लेखक आहेत. इराण, इंडोनेशिया, पाकिस्तान, बांगलादेश, भारत अशा अनेक देशांतले आपापल्या मातृभाषेत लिहिणारे लेखक अव्वल काही नक्की करीत असणार, पण आपल्यापर्यंत त्यांतलं फारच थोड येतं ही आपली मर्यादा. तरीही जागतिक म्हणून असंच काहीतरी मॉडेल समोर घेऊन समकालीन मराठी साहित्याविषयी भाष्य करावं लागणार. त्याआधी आपल्या देशाला सुद्धा साहित्याच्या संदर्भात एक विशाल दुनिया म्हणून पाहणे अगत्याचे आहे. त्यातही पुन्हा बंगाली, तमिळ, तेलगू ,मल्याळम अशा भाषांतल साहित्य हिंदीतूनच सहसा आपल्याकडं येणार. पैकी बंगाली लेखक आणि त्यांची पुस्तकं यांचा बाकी भाषांत गवगवा आणि दबदबा फार असला तरी त्या लोकांना मात्र त्यांच्या भाषेपल्याड हिंदुस्तानातल्या भाषा दिसत नाहीत. बंगालीतून ते थेट बाकी दुनियेत घुसतात, आता बांगला देशी तसलिमा नसरीनमुळं ते भारताशी जास्त जोडले जाऊ शकतील अशी स्थिती आहे! आपल्याकडं हिंदीत बंगालीपेक्षा आज नवं चांगलं लिहिलं जातंय आणि बंगालीसकट बाकी भारतीय भाषांतलं महत्वाचंही हिंदीत येतंय हे महत्त्वाचं आहे. निर्मल वर्मा, केदारनाथ सिंह, उदयप्रकाश, विनोदकुमार शुक्ल, विष्णू खरे हे महत्वाचं लिहिणारे हिंदीतील आजचे काही लेखक. हे सगळे मूलतः कवी आहेत. बाकी दक्षिणी भाषा आणि इतर भारतीय भाषांत चांगलं लिहिलं जात असणारच पण आपल्याला ते तितकं माहीत नसल्याने यांना आजचे भारतीय प्रातिनिधिक लेखक समजा म्हटलं तर त्याने विशेष बिघडणार नाही. त्यांना भारतीय लेखकांचे प्रतिनिधी म्हणून बघायचं, एरवी ज्ञानपीठ वगैरे कसोट्या लावल्या तर कन्नड व उडिया भाषांत लेखकच सर्वश्रेष्ठ म्हटले पाहिजेत, कारण त्यांच्यात हे वा यांसारखे सन्मान फारच पोहोचलेले आहेत. यामागची वस्तुस्थिती मात्र थोडी वेगळी आहे. या भाषांमधले बरे लिहिणारे लोक व त्यांच्यासाठी राष्ट्रीय पातळीवर लॉबींग करणारे लोक बव्हंशी एकाच जातीच्या गटातले असतात व त्यांच्यात सहसा एकवाक्यता असते, तशी उदाहरणार्थ मराठी लोकांची स्थिती नाही. आपल्याला जी एक समाजसुधारणेची, चळवळींची परंपरा आहे त्यातून आज आपला लेखक साऱ्या जातीतून, समाजगटांतून येतोय आणि लॉबींग करणाऱ्या लोकांत त्यांच्यासाठी एकवाक्यता सहसा होत नाही. जातीयता कितीही संपली म्हटली तरी ती उरलेली असते हे एक आणि चळवळीचा वारसा असण्यातून हे होणं हे दुसरे, पण तो सगळा आपला प्रॉब्लेम. असो.

म्हणूनच समजा विनोदकुमार शुक्ल यांच्या 'दीवारमें एक खिडकी रहती थी' या कादंबरीला मिलान कुंदेराच्या 'स्लोनेस च्या शेजारी उभं करता येतं का, किंवा उदय प्रकाशच्या 'तिरिछ'सारख्या कथेला मार्केझच्या 'इनोसंट इरेंदिश शेजारी ठेवता येतं का, असे प्रश्न गंभीरपणे उपस्थित केले तर भारतीय साहित्याच्या सद्यःस्थितीविषयी बोलता येईल, ज्यांनी हे वाचलंय त्यांना तर कळेलच पण समजा वाचलं नसेल तर माझ्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही. दोन्ही भारतीय निर्मिती जागतिक स्तरावर अतिशय सन्मानानं बसू शकतात, किंबहुना त्या इतरांपेक्षा काकणभर सरसच आहेत असं म्हणता येईल, यात आत्मगौरवाचा किंवा आपलं ते श्रेष्ठ म्हणण्याचा आत्मसंतोषाचा भाग नाही, हे मी कळकळीने सांगू इच्छितो. (ते विस्तारानं सांगायला इथं जागा नाहीय, एवढीच माझी अडचण आहे.) यात आत्तापर्यंत मराठीचा विचारच केलेला नाहीय याचं कारण विषयाचे शीर्षक. जागतिक साहित्याच्या तुलनेत समकालीन मराठी साहित्य. एरवी भारतीय मानदंड म्हणून ढळढळीतपणे मांडता येईल असं आजच्या मराठीत आहे हे खासच म्हणता येईल व या म्हणूनच ते जागतिक साहित्यात बसवता येईल असंही. 

आजच्या आपल्या भाऊ पाध्येंच्या कादंबऱ्या नेमाडे यांच्या कादंबऱ्या आणि 'देखणी मधली कविता, दिलीप चित्रे, अरुण कोलटकर यांची कविता, महानोर, नामदेव ढसाळ, सुर्वे, बाबुराव बागूल यांचं लेखन या साऱ्याला अव्वल दर्जा आहे हे नक्की. या साऱ्या लेखकांच सारंच लेखन श्रेष्ठ आहे, असं मला म्हणायचं नाही. तसं दुनियेत कोणत्याच लेखकाचं नसतं, पण दुनियेतले श्रेष्ठ समजा गोळा करायचे ठरवले तर यांना जागा द्यावी लागेल. बाबुराव बागूल यांच्या 'सूड सारखी श्रेष्ठ कृती आज आपल्या भाषेत आहे. ज्या हिंदी लेखकांचा प्रातिनिधिक भारतीय म्हणून मी उल्लेख केलाय त्यांच्यापेक्षाही अधिक महत्त्वाचं यांतल्या काही मराठी लेखकांनी लिहिलं आहे.

मराठीतील महत्त्वाचं लेखन 

यावर कोणी म्हणेल की दुनियेच्या एकूण व्यवहारात बाकीचे लोक कुठे असे म्हणताहेत? त्यांना तर आपलं काहीच माहीत नाही. अगदी भारतीय लेखकांचाही मिलेनियम सर्वे होतो, त्यांत मराठी लेखकांचे नाव नसत, त्याचं काय? ते नाहीय हे खरं आहे. पण ते त्या लोकांचे अज्ञान आहे. त्याला आपण काय करणार? आपल्या माहितीच्या आणि आकलनाच्या उजेडात आपल्याला जे दिसतं ते आपण मांडलंच पाहिजे. आपलं हे महत्त्वाचं लेखन समजावून घेण्यासाठी त्या लोकांना ते आपल्या भाषेतून त्यांच्या भाषेत न्यावं लागेल आणि ते नीट न्यावं लागेल. (तुकारामाला नाही का त्यांनी नेलं? तसंच आणखी जे महत्त्वाचं असेल ते जाईल. आज पुष्कळ तिय्यम दर्जाचं अनेक व्यावसायिक हिकमती आणि हितसंबंधांतून इतर भाषांत जातंय. मराठीतलं श्रेष्ठ ते हेच म्हणूनही कदाचित तिथं ते मांडल जात असेल. पण ते काही फार टिकाऊ असणार नाही. काळाच्या प्रवाहात चांगल्या-वाईटाचा नीट निवाडा होत असतो. उगीच अधीर व्हायचं कारण नाही. देशमुख आणि कंपनीनं 'स्वामी (रणजित देसाई) व 'कोसला (भालचंद्र नेमाडे) या कादंबऱ्या जवळपास एकाच वेळी प्रसिद्ध केल्या. त्या वेळी नरहर कुरुंदकर यांनी रा. ज. देशमुखांना लिहिलेल्या एका पत्रात 'देशमुख आणि कंपनी तून एकाच वेळी इंद्राचा ऐरावत (स्वामी) व श्यामभट्टाची तट्टाणी (कोसला) प्रकाशित होतेय यासंबंधी अचंबा प्रकट केला होता. आज हेच चित्र उलटं झालंय आणि त्यात बदलाची अजिबात शक्यता नाही. श्याम मनोहरसारखा लेखक आपल्या भाषेतच इतका वेगळा आहे आणि दुनियेतल्या एकूण भाषांतही त्याला कोणाशीच नाही जोडता येणार. असा लेखक आपल्या भाषेत लिहितो ही महत्त्वाचीच गोष्ट आहे. त्याला गंभीरपणे वाचतात किती आणि प्रतिसाद देतात किती हा वेगळा प्रॉब्लेम आणि तो आपल्या वाड्ग्मयीन संस्कृतीचा प्रॉब्लेम आणि ते चित्रही समजा बदललंच तरी ते सगळं इथं कशाला उगाळत बसायचं?

कोणी असंही म्हणेल की बाकीचेही पुष्कळ महत्त्वाचे लेखक मराठीत आहेतच की! तेंडूलकर, एलकुंचलवार असे अव्वल दर्जाचे नाटककार आहेत. "उद्विग्न सरोवर लिहिणाऱ्या शांताराम पुरोहितांपासून आजचे भारत सासणे, मेघना पेठे असे कलाकार, राजन गवस, राजन खान हे कादंबरीकार किंवा इंद्रजित भालेरावसारखा कवी आहे. हे बरोबरच आहे. पण ही यादी फार नाही वाढवता येणार. लिहिलं कितीही जात असलं तरी समकालीन साहित्याचा विचार करताना महत्वाच्या प्रातिनिधिक अशा कृती आणि प्रवृत्ती डोळ्यांसमोर आणाव्या लागतात. यादी आणखी वाढवायची तर फारतर रिपिटिशन होणार किंवा बोटचेपेपणाखातर नावं घालायची असं होणार. म्हणजे पुन्हा आपण सगळेच जागतिक. त्याचा काय उपयोग? दुनियेच्या बाकीच्या भाषांतही असंच असतं. वेगळं काही करणारे वा करू पाहणारे लोक थोडेच असतात. संस्कृतीत भर घालणारं, नवं आकलन मांडणारं असं थोडंच असतं. आधीचं इतकं सगळं असतं. त्यांत भर घालायची म्हणजे सोपं नाहीय. प्रयत्न खुपजण करतात आणि त्यांनी ते केलेच पाहिजेत. आपले वाङ्ममयीन पर्यावरण जिवंत आणि सळसळतं ठेवण्यात या लोकांचं कौट्रिब्यूशन महत्त्वाचंच आहे. अगरदी बेस्ट सेलर दर्जाच्या पुस्तकांचाही काही एक मर्यादित उपयोग असतोच, आपापल्या परीनं साऱ्यांची काही जागा असतेच.

हल्ली मराठीत कादंबरी खूपच जास्ती लिहिली जायला लागलीय, अगदी सत्तरीतल्या लेखकांपासून तरुण नव्या लेखकांपर्यंत साऱ्यांना कादंबरीच आकर्षण सगळ्यात जास्त आहे. ही चांगली खूण आहे. मणिपुरी भाषेसाठी यंदा साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला लेखक सागोलसैम लनचैनबा मीतै म्हणत होता, की आज मणिपुरीत कथा आणि कवितेची जास्त मातब्बरी आहे. मग त्यानं विचारलं, मराठीतही कथेचं फारच आहे ना? गाडगीळ कथेचे मोठे पुरस्कर्ते आणि मोठे कथाकार आहेत ना! (गंगाधर गाडगीळ त्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे होते.) म्हटलं. कथेची मातब्बरी होती. पण ती पन्नास वर्षाआधी, आज कादंबरीची सत्ता आहे आणि चांगली कथा अर्थातच लिहिली जातेय. पण ती बव्हंशी दीर्घकथाच आहे.

कोणत्या भाषिक समाजात कोणत्या वाङ्ममय प्रकाराची कशी कधी चलती होईल, याला पुष्कळ सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक पदर असतात. मणिपुरी मागे आहे असं नाही म्हणता येणार, आज मल्याळममध्येही कथेचीच प्रतिष्ठा जास्त आहे. अर्थात ही चर्चा करायची ही जागा नाही, मराठीत आज वास्तववादी कादंबरीचा जो प्रभाव आहे त्याचे वजन गंभीरपणे झुगारत अनुभव मांडण्याची शैली, भाषिक प्रयोगांच्या शक्यता, वास्तव, अवास्तव व अतिवास्तव यांच्या समकालीन प्रतिक्रियांच्या उजेडातील शक्यता तपासत जाणे, विज्ञानाचे गैर वजन नाकारणे व रचनेच्या श्रेष्ठत्वाचा पुरस्कार करणे आवश्यक झाले आहे. कादंबरीने कवितेतून ताकद घेणे व कवितेने कादंबरीतून हेही महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीने बरेच कवी कादंबऱ्या लिहू पाहताहेत हे भले लक्षण होय. जागतिक पार्श्वभूमीवर आपल्या आजच्या साहित्याला जागा आहे असे आपण खात्रीने म्हणू शकतो. दुनियेलाही उद्या ते म्हणावे लागेल.

Tags: मिलान कुंदेरा 'इम्पॉर्टलिटी बाबुराव बागूल सुर्वे नामदेव ढसाळ महानोर अरुण कोल्हटकर दिलीप चित्र नेमाडे भाऊ पाध्ये रंगनाथ पठारे जागतिक साहित्याच्या तुलनेत समकालीन मराठी साहित्य सलमान रश्दी salman rashdi milan Kundera importility babaurao bagul surve namdev dhasal mahanor arun kolhatakar dilip chitre nemade bhau padhye ranganath pathare #jagatik sahityachya tulanet samakalin Marathi sahitya weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

रंगनाथ पठारे

मराठी कथालेखक, कादंबरीकार आणि समीक्षक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके