डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

जागतिकीकरण आणि देशीवाद (उत्तरार्ध)

देशीवादी असणे म्हणजे प्रभाव नाकारणे नव्हे. परकी मूल्ये नाकारणे नव्हे. देशी बहुजनांना ते शक्यही नाही. परकी मूल्ये आणि प्रभाव यांच्यातले विवेकाने स्वीकारणे; या स्वीकारासाठीचे आंतरिक बळ आपल्या मूल्यव्यवस्थेतून उभे करणे व परकी प्रभावातून मिळालेले अधिक बळ घेऊन अधिक सशक्तपणे उभे राहणे एवढा एकमेव पर्याय टिकण्यासाठी बहुजनांना खुला आहे.

आपल्या देशात अभिजन प्रवृत्ती ही प्रायः 'ब्राह्मणप्रवृत्ती' म्हणता येईल अशी; आणि बहुजनप्रवृत्ती ही 'श्रमणप्रवृत्ती' म्हणता येईल अशी राहिली आहे. म्हणजे तसं आपल्या प्रदीर्घ सामाजिक, राजकीय इतिहासात आपल्याला दिसतं. वेदप्रामाण्य, मनुसंहिताप्रणित चातुर्वर्ण्य मानणारी प्रवृत्ती ही प्रायः ब्राह्मणप्रवृत्ती होय आणि चार्वाक, बुद्ध, गांधी, फुले, आंबेडकर किंवा ग्यानबा-तुकारामाचे संतमंडळ ही श्रमणप्रवृत्ती होय. पहिल्या प्रवृत्तीमध्ये ईश्वरसान्निध्यासाठी धर्मगुरू, पुजारी वा तत्सम मध्यस्थाच्या आवश्यकतेचा पुरस्कार असतो. दुसरीत अशा मध्यस्थाला फाटा मारून ईश्वर आणि माणूस यात थेट संवाद शक्य मानला जातो किंवा ईश्वर आहे-नाही याची चर्चा करण्याची गरजच नाही असंही त्यांतल्या काहींचं म्हणणं असतं.

आपला सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक इतिहास हा प्रायः या दोन प्रवृत्तींमधल्या संघर्षाचा इतिहास आहे. यात ब्राह्मणप्रवृत्ती नेहमीच दीर्घकाळ टिकलेली, सत्तास्थानी राहिलेली व तिला अधूनमधून- अल्पकाल का होईना- श्रमणप्रवृत्तीने धक्के दिले; कधी काही काळासाठी तिला सत्ताभ्रष्ट केले असेही आपल्याला दिसते. ब्राह्मणप्रवृत्ती ही बहुशः स्थितिशीलता टिकवणारी, आधुनिकतेपेक्षा परंपरेला जवळ करणारी, परके प्रभाव नाकारणारी अशी राहिली आहे. श्रमणप्रवृत्ती ही सामान्यतः नवतेचा, आधुनिकतेचा स्वीकार करणारी, मानवी समतेचा पुरस्कार करणारी, परके प्रभाव स्वीकारून पचवणारी अशी वाटते. यातल्या ब्राह्मण्यप्रवृत्तीविषयी आणखी काही नोंदले पाहिजे. तिच्यात ब्राह्मण, क्षत्रिय तत्सम उच्च जाती येतात व त्यांच्या प्रतिक्रिया बाह्य प्रभावांच्या संदर्भात एकसंध नसतात. प्रायः सत्ताधारी असणारा हा वर्ग आपले हितसंबंध धोक्यात आले की बाह्य प्रभावांना आमंत्रितसुद्धा करतो. निदान याच्यातले काही घटक तसे करतात. आधी उदाहरणे दिलीच आहेत. पण समजा गोव्यातील सारस्वत व्यापाऱ्यांनी आपले हितसंबंध अडचणीत आले तेव्हा पोर्तुगीजांना बोलावलं हे इतिहासात नमूद आहे. किंवा दुसऱ्या बाजीरावाने यशवंतराव होळकरांच्या विरोधात इंग्रजांचे साहाय्य घेतले हेही किंवा त्याआधी नानासाहेब पेशवे याने इंग्रजांच्या नौदलाची मदत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठ्या दूरदृष्टीने उभारलेले आंग्रे यांचे शक्तिशाली आरमार बुडवले आणि पोर्तुगीजांचे वा इंग्रजांचे राज्य आल्यावर याच वर्गातल्या काहींनी त्या भाषांचा अंगीकार करून नव्या व्यवस्थेत जागा पटकावल्या. हे सगळे होताना याच वर्गातल्या काहींनी हे प्रभाव नाकारत संस्कृत भाषा, पठन परंपरा, वेदविद्या यांचा अंगिकार व पुरस्कार चालू ठेवला.

म्हणजे परकीय प्रभाव आल्यानंतर ज्या चार प्रतिक्रियांचा उल्लेख मी आधी केला त्यातल्या पहिल्या तीनही प्रतिक्रिया या पहिल्या म्हणजे ब्राह्मणप्रवृत्तीतून उपस्थित होतात असे म्हणता येते. उरलेला बहुजनांचा मोठा वर्ग, ज्याने कोणालाही बोलावलेले नसते या हितसंबंधाच्या घालमेलीत जो कुठेही नसतो त्याला मात्र त्याची इच्छा असो वा नसो; परकी प्रभावांना सामोरे जावे लागते व स्वताला टिकविण्यासाठी त्याला त्या प्रभावांना पचवावे लागते. अशा वर्गातून वा अशा वर्गाविषयी प्रेम, ममत्व, सहानुभूती असणाऱ्यांमधून उभे राहणारे कवी, तत्त्वचिंतक प्रभाव पचविण्याची शिकवण देतात.

नेमाडे यांनी जिला देशीयता म्हटले आहे. ती प्रकट करणाऱ्या अशा दोन ठळक प्रवृत्ती आपल्याला दिसतात. त्यांना ‘अभिजन देशीयता’ आणि ‘बहुजन देशीयता’ अशी दोन वेगळी नावे दिली असता, बरेच काही स्पष्ट होते.

देशीयतेच्या ज्या मर्यादा नेमाडे यांनी मांडलेल्या आहेत त्या अभिजन देशीयतेला लागू होतात. बाहेरचे प्रभाव नाकारत आपले पारंपरिक बळ वापरून टिकण्याची यांची प्रवृत्ती असते. या प्रभावी झाल्या की समाज आत्मकेंद्रित व ऱ्हासशील होणार हे उघड आहे. या प्रवृत्तीत विवेकशीलता कमी असणे, शब्दप्रामाण्य असणे; तिचे तोंड भविष्यकाळापेक्षा भूतकाळाकडे असणे स्वाभाविकच होय. म्हणूनच अभिजन देशीयतचे तत्व स्थितिशीलतेच्या जवळ जाणारे ठरते आणि प्रतिगामी वृत्तीशी हातमिळवणी करण्याकडे याच देशीयतेचा कल असतो. आज जागतिकीकरणाच्या वाटेत अमेरिका प्रभूती एकाधिकारशाही प्रवृत्तीच्या कच्छपी लागणाऱ्या आपल्याला देशातील सत्ताधारी प्रवृत्ती स्वदेशीचा पुरस्कार करताना दिसतातच, त्यांचा स्वदेश, स्वधर्म, मुल्यव्यवस्था यांच्यासंबंधीचा आग्रहही त्यांनी स्पष्ट केलेला आहे.

त्यांच्या देश, धर्म आणि मूल्ये यांच्या कल्पना ब्राम्हण प्रवृत्तीतल्याच आहेत. या देशाचा एक मंत्री- बहुधा मनुष्यबळ खात्याचा मंत्री- न्युक्लियर फिजिक्समध्ये डॉक्टोरेट केलेला आहे. तो रोज सकाळी दोन तास पूजाअर्चा करतो असे अभिमानाने सांगतो. खेरीज विद्यापीठ अनुदान मंडळाच्या माध्यमातून ज्योतिषशास्त्र हे शास्त्र असून त्याचा पाठ्यक्रमात समावेश करण्याचा पुरस्कारही त्याच्या प्रेरणेने झाला आहे. किंवा असे एखादे व्यक्तिगत उदाहरण बाजूला ठेवले तरी समजा रामजन्मस्थानाचे उदाहरण घेऊ. किमान चार हजार वर्षांआधी रामाचा जन्म कुठे झाला याची तपासणी चालू आहे. झुंडीने जाऊन मशीद पाडण्याचा पराक्रम करण्यात आला आहे. इतिहासाचीच एकूण पुनर्मांडणी करून त्यांना हवा तसा तो लिहिणे चालू आहे. मुसलमान हे परके, ते शत्रू. आता त्यांच्यातले जे आहेत त्यांनी मुकाटपणे इथे राहावे. या देशावर प्रेम करावे असे ते म्हणतात. या संबंधात कितीतरी प्रश्न उपस्थित करण्याजोगे आहेत. एकूणात या प्रवृत्ती स्वतःला देशीच म्हणवतात. पण त्या ‘अभिजन देशी’ आहेत हे लक्षात घेतले पाहिजे. त्यांच्या सत्तास्थानी असण्यातून आपण आत्मकेंद्री व ऱ्हासशील अवस्थेकडेच जाणार हेही सरस आहे.

आज भाजपाप्रणीत आघाडी सत्तेत आहे. म्हणून त्यांचे उदाहरण घेतले. त्याऐवजी काँग्रेसप्रणीत आघाडी असेल तर थोडासा फरक पडेल इतकेच; पण एकूण जी काही देशीयता व्यक्त होईल ती बव्हंशी अभिजन देशीयताच असेल.

जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरण यांना निमंत्रण देणाऱ्या या आपल्यासाठी ते अपरिहार्य करणाऱ्या अभिजन प्रवृत्तीमधल्या अभिजन देशीयवादासंबधी इतके पुरे. पण जे आले आहे वा येत आहे त्याला सामोरा जाणारा बहुजन वर्ग. त्याने कशालाही आमंत्रण दिलेले नाही, तरीही त्याला ते स्वीकारणे भाग आहे. त्याला पळायला जागा नाही. लपण्यासाठी अभिजन ‘कोष’ नाही. तो फक्त सामोराच जाऊ शकतो आणि आपल्या अस्तित्वासाठी, आपले असणे टिकविण्यासाठी येणारी परकी मूल्ये, भाषा आणि संस्कृती यांना पचवणे त्याला भाग आहे. दुनियेतल्या अनेक बारक्या बारक्या देशांतील भाषा, संस्कृती व मूल्यव्यवस्था या महालाटेत अस्तंगत झाल्या आहेत. तेथील अभिजनांनी परकी मूल्यांचा अंगीकार केला. स्वताची मूल्यावस्था संपवली. तेथील बहुजन संस्कृतीत टिकण्यासाठी या परकीय प्रभाग पचविण्यासाठी आयुधे पुरेशी नसल्यामुळे तिचीही तीच गत झाली.

प्रश्न आपल्यासारख्या प्रदीर्घ इतिहासाचा वारसा असलेल्या संस्कृतीचा आहे. भाषा म्हणून इंग्रजी, मराठी, रशियन, फ्रेंच यांचे वय जवळपास सारखेच आहे. कोणताही व्यापार हा संस्कृतिसंकराला उत्तेजना देत असतो. इंग्रजी ही हुषार व्यापारी वृत्तीच्या लोकांची भाषा होती व आहे. दुनियेतल्या साऱ्या भाषांमधून शब्द, संकेत, चिन्हव्यवस्था घेऊन, त्यांना पचवून ती आधीच बलिष्ट होत गेली. त्यात आता ती अमेरिकेची भाषा आहे. पण म्हणून तिच्या वरवंट्याखाली तितकाच प्राचीन इतिहास असलेल्या भाषांनी रगडून जायचे काय? अशा भाषिक समूहांनी ते स्वीकारायचे काय? तमाम दुनियेने अमेरिकेचे या ना त्या प्रकारे गिऱ्हाईक व्हावे; दुनियेतल्या माणसांनी त्यांच्या तालावर नाचून त्यांचे गुलाम व्हावे हे स्वीकारायचे का? ते नको असेल तर ‘बहुजन देशीयता’ हे एक प्रभावी अस्त्र आपण लोकांनी आपल्यातून सिद्ध केले पाहिजे. त्यांनी देशीवादी होणे क्रमप्राप्त आहे. देशीवादी असणे म्हणजे प्रभाव नाकारणे नव्हे. परकी मूल्ये नाकारणे नव्हे. देशी बहुजनांना ते शक्यही नाही. परकी मूल्ये आणि प्रभाव यांच्यातले विवेकाने स्वीकारणे, या स्वीकारासाठीचे आंतरिक बळ आपल्या मूल्यव्यवस्थेतून उभे करणे व परकी प्रभावातून मिळालेले अधिक बळ घेऊन अधिक सशक्तपणे उभे राहणे एवढा एकमेव पर्याय टिकण्यासाठी बहुजनांना खुला आहे.

एकदा हे स्वीकारले की या जागतिकीकरणातला तिसऱ्या जगातील लेखकाचा रोल स्पष्ट होतो. त्याची भूमिका बहुजन देशीयतेचा पुरस्कार करीत व परकी प्रभाव पचवत काही मांडण्याची व शोधण्याचीच असू शकते. परकीय भाषा आणि संस्कृती यांची दहशत बाळगायचे कारण नाही. त्यांच्याखाली दबून जायचे नाही. त्यांना आत्मसात करीत आपल्या भाषेला, मूल्यव्यवस्थेला टिकवून ठेवणे व त्या बळावर परक्या संस्कृतीला बरोबरीच्या नात्याने खुल्या संवादाची संधी ठेवणे आवश्यक आहे. अभिजनांनी हे केलेले आहे. त्यांनी सरळ सरळ परकी प्रभावांचा अंगीकार केलेला आहे.

हा अंगीकार म्हणजे आत्मसातीकरण नाही. ते सरळ शरण जाणे आहे. आपले सारे टाकुनच असा अंगीकार होत असतो. पण यापल्याड प्रचंड मोठया संख्येचा बहुजनांचा वर्ग अजूनही आहे. तेच आपले सामर्थ्य आहे. एक उदाहरण सांगतो. आपल्यापेक्षा खूपच लहान भाषिक, सांस्कृतिक गटातून आलेल्या लेखकाचं उदाहरण देतो. हा केनियामधला लेखक आहे. त्याचे नाव 'गुगी' अस आहे. केनियावर आपल्यासारखीच इंग्रजांची सत्ता होती. गुगी याचं शिक्षण इंग्रजीत झालं, त्यानं इंग्रजी भाषेतच लेखन केलं. त्याच्या तीन-चार कादंबऱ्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. त्यासाठी त्याला इंग्रजी वाचणाऱ्या दुनियेत चांगल्यापैकी मान्यतासुद्धा मिळाली त्यानंतर त्यानं ठरवलं की आता आपण इंग्रजीत लिहायचं नाही. तो म्हणाला, माझी जी मातृभाषा आहे – ‘गिकुयू’ तिचं नाव- त्या भाषेत मी लिहिणार.

या भाषेला लिखित गद्याची परंपरासुद्धा नव्हती, खूप मित्र त्याला म्हणाले की 'बाबा, तू हा काय वेडेपणा सुरू केलायस? तुझं करियर बरबाद करायच्या मागे लागला आहेस. तू आणखी लिहित राहिलास इंग्रजीत तर तुला आणखी मान्यता मिळेल. उद्या तुला नोबेल प्राईझ सुद्धा मिळेल,’ तो म्हणाला, 'नाही. मी माझ्याच भाषेत लिहिणार. मुळात मी कोणासाठी लिहितोय? अगदी इंग्रजीतही कोणत्या लोकांसाठी लिहितोय? कोणत्या लोकांचं लिहितोय? हे सारं मी माझ्या लोकांचं, माझ्या लोकांसाठी लिहितोय. तर ते मी माझ्या लोकांच्या भाषेत का लिहू नये? ते मी केलं पाहिजे. तेच कारण योग्य आहे. शिकताना मला माझी भाषा उपलब्ध नव्हती. आता लिहिताना आहे. मी माझ्या लोकांसाठी माझ्या भाषेतच लिहिणार. त्यानं तसं केलं, इतकं मोठं नाव व मान्यता असलेला लेखक मातृभाषेत लिहायला लागल्यावर बाकी अनेकजण लिहायला लागले. त्या भाषेचं, संस्कृतीचं पुनरुत्थान होण्याचा मार्ग खुला झाला.

गुगी याचं म्हणणं असं होत की, 'मी इंग्रजीत शिकलो, इंग्रजीत लिहिलं पण ती काही माझी, माझ्या लोकांची भाषा नाही. वसाहतवाद्यांनी ती भाषा मला दिली. या भाषेचा अंगीकार मला करायला लावणे ही मला माझ्या लोकांपासून तोडण्याची वसाहतवाद्यांची स्ट्रैटेजी आहे. त्यांच्या डावपेचाचा भाग आहे. मी इंग्रजीत लिहीत राहिलो, त्याच भाषेत विचार करीत राहिलो तर मी माझ्या लोकांपासून तूटलेलाच असेन. मला तुटायचं नाही. कारण मी त्यांच्यापैकीच एक आहे. बहुजन देशीवादाचा अंगीकार केलेल्या या लेखकाचं उदाहरण आपल्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणार आहे. मुख्य म्हणजे लिखित गद्याची फारशी परंपरा नसलेल्या भाषिक गटातल्या लेखकानं ते घालून दिलेलं आहे.

आणखी एक उदाहरण सांगतो. ते देशीवादी होऊच न शकणाऱ्या व कदाचित प्रामाणिक असलेल्या लेखकाचं आहे, नाव सलमान रश्दी. मूळ भारतीय वंशाचा व इंग्रजीत लिहिणारा. आधी ब्रिटनमध्ये राहत होता. आता बहुतेक अमेरिकेत. त्यानं एका ठिकाणी म्हटलं होतं की, ‘नाहीतरी अमेरिकन संस्कृती आता सगळ्या दुनियेवर प्रभाव गाजवणारच आहे. तर मग आपणही तिचा भाग का होऊन जाऊ नये. त्यातच आपलं हित आहे. तिच्यात जाऊनच आपल्याला सारे प्रगतीचे रस्ते खुले होतील.’ त्याची ही भूमिका अर्थातच मला मान्य नाही.

रश्दी यांची अलीकडे एक कादंबरी वाचली ‘The Ground Boneath Her Feet’ नावाची ती मला आवडली. मग मला प्रश्न पडला. असं कसं होतंय? याची वाङ्मयीन भूमिकाच मला मान्य नाही, याची कादंबरी मला चांगली वाटतेय. या कादंबरीत त्यानं magic realism चा बऱ्यापैकी वापर केलाय तिच्यात मुंबई आहे. एके ठिकाणी एक पात्र म्हणतं, ‘मुंबई इलाख्याचे दोन भाग झाले. अन आमची मुंबई महाराष्ट्र नावाच्या कुठल्यातरी प्रांताची राजधानी झाली. मला समजेनासं झालंय.’ या पात्राचं बालपण मुंबईत गेलंय, त्याची घडण पण तिथं झालीय. पण ती एक अतिशय बारकी मुंबई आहे. दक्षिण मुंबईचा जो भाग प्राय; अंग्लो इंडियन, पारसी वा श्रीमंत मुसलमान, यहुदी अशा लोकांनी व्यापलेला होता, तिथे त्याचं निवांत जग होतं, त्याचा बाकी मुंबईशी कसलाही संबंधच नव्हता. अशा मुंबईत जगलेल्या, वाढलेल्या पात्राचं हे म्हणणं खरंच म्हटलं पाहिजे.

पण आपल्याला तर माहीत आहे की यापल्याड मुंबईची बृहद् दुनिया आहे. तिचं चित्रण भाऊ पाध्ये आणि सआदत हसन् मंटोने जबरदस्त ताकदीनं केलंय. अगदी सलमान रश्दीच्या मुंबईचंही. रश्दीला बाहेरची मुंबई माहीतच नाही. त्यानं फार तर तिचं काही वाचलेलं असेल. त्याला स्वातंत्र्यलढा माहीत आहे. त्याला रामायण, महाभारत माहीत आहेत. ग्रीक महाकाव्ये व नंतरच्या युरोपातले महत्वाचे लेखन त्याला माहीत आहे. पण जगण्याच्या वास्तवात त्याच्या हरपलेल्या मुंबईनंतर त्याचं पाऊल पडतं ते थेट लंडन किंवा तत्सम युरोपी शहरात. त्याच्या जगण्याचा अंदाजच वेगळा आहे. त्याला आपली स्वत:ची भूमीच नाही. त्याच्याशी जोडून घ्यावं अशी भूमीच नसलेला दुर्दैवी माणूस आहे तो. भूमी नाही अन् भाषाही नाही. म्हणूनच जी भाषा त्याच्या वाट्याला आली ती तो वापरतोय. मला हीच भाषा कळालीय अन् मी ती वापरणार आहे असंच तो म्हणतोय.

ज्याला स्वतःची भूमीच नाही तो ‘देशी’ कुठून असणार? देशीवादी होण्याचा रस्ताच खुला नाहीय त्याला. या कादंबरीतलं दूधवाला नावाचं बहुधा पारशी जातीचं पात्र आतल्या गर्भित लेखकाला म्हणतं, ‘अरे तुम्ही converts. धर्मांतरित. सदाचे निर्वासित. तुमची अवस्था सतत धावत असलेल्या आगगाडीत बसलेल्या माणसासारखी. तुम्ही जिथून निघालात, त्या भूमीशी तुमचं नातं नसतं अन् जिथं जाणार आहात तिच्याशीही. तुम्ही कुठं जाणार हे तुम्हाला माहीत नाही.. तुम्ही जाणार की नाही, हेही नाही, म्हणून तुम्ही सतत आगगाडीत बसलेले असता....’ रश्दीनं स्वतःची मनोवस्थाच ध्वनित केलीय.

भूमीशी कोणतंही नातं नसण्याची रश्दीची भावनाच यातून प्रकट होते. अशा परिस्थितीत त्याच्या परीनं तो प्रामाणिकपणेच लिहीत असणार, त्याचा अमेरिकन संस्कृती अंगीकारण्याचा प्रयत्न हा भूमीशी नातं जोडण्याचा प्रयत्न आहे. त्याला ती मिळणार नाही; कारण त्याची मुळे या ना त्या प्रकारे भारतातच आहेत. पण तिथेही तो रुजलेला नाहीय. अशा परिस्थितीत लिहीणं ही मोठीच मुश्कील गोष्ट आहे. तो ती बहुधा प्रामाणिकपणे करीत असेल. पण एक वाङ्मयीन भूमिका म्हणून तो जे काही म्हणतोय त्याला आत्मसमर्थनापल्ल्याड अर्थ नाहीय. तो म्हणतोय ते सुधारणीकरण होण्याच्या लायकीचं नाहीय.

सलमान रश्दी म्हणतो त्याप्रमाणे आपणही अमेरिकन संस्कृती अंगीकारतो. आपणही तिचा भाग झालो, तर काय होईल? असं बघा, दुनियेमध्ये सहाशे कोटींवर माणसं आहेत, तरीही दोन माणसं एकमेकांसारखी नाहीत. प्रत्येक माणूस बाकीच्यांपेक्षा वेगळा असणं ही त्याची स्वाभाविक ओळख आहे. प्राणी, वनस्पती, निसर्ग एकूणच प्रत्येक भौगोलिक क्षेत्रानुसार वेगवेगळा आहे. नुसता तांदूळ हा घेतला तर कृषितज्ञ डॉ.रिछारिया यांच्या मते नुसत्या भारतात त्याच्या 25000 पेक्षा जास्त जाती आहेत, अस्वलं, माकड, कुत्री अशी प्रत्येक प्रदेशात वेगवेगळी, निसर्गाशी जुळवून घेत वेगवेगळी रूपं, वेगवेगळे चेहरे, आकार धारण करणारी. नुसते हत्ती म्हटले तरी भारतीय आणि आफ्रिकन हत्ती किती वेगवेगळे दिसतात! विविधता ही नैसर्गिक गोष्ट आहे. आता याच्यात इकडून तिकडे जाणं, बदलणं, नव्या पर्यावरणात नव्या पद्धतीनं जगणं हेही असतंच. पोर्तुगीजांनी आणलेला अल्फान्सो आपल्याकडे रुजून जगप्रसिद्ध हापूस झाला. नवी वेगळी चव आली. तसंच केळी, टोमॅटो, बटाटे याचंही आहे. एकूण साऱ्याला ज्याचा त्याचा चेहरा आहे आणि सारं प्रभावांना, संकराला खुलं आहे. नवं काही घडण्यासाठी खुलं आहे.

जागतिकीकरणात माणसं, प्राणी, वनस्पती यांचं पुरत सपाटीकरण करण्याची आकांक्षा आहे. जगभर सारं युनिफॉर्म आणि सोयीस्कर, ओळखीची वेगळी गरज नसलेलं, गोल टोमॅटो पॅकींग करायला अडचणीचा म्हणून त्याच्यात जनुकीय बदल करुन अमेरिकनांनी तो चौकोनी केलाय. उद्या त्यांना असं वाटलं की आंबा बिनकोयींचा असावा. त्यात काही खूपसून त्याचा रस सुलभपणे पिता यावा तर तसाही ते तयार करतील. डुक्कर, बैल, गायी यांना खाद्यपदार्थ करुन त्यांनी या सजीवांच्या आयुष्याची निर्घृण थट्टा केलेली आहे. डूकराचं वजन वाढवं म्हणून त्याला खूप खाऊ घालायचं आणि हलुसुद्धा द्यायचं नाही. कॅलरीज वापरूनच द्यायच्या नाहीत. डुक्कर लठ्ठ होते. पैसा अधिक. गायी म्हणजे दूध देणारे जिवंत नळ. दुनियेतली माणसं ही जिवंत गिऱ्हाईक. उपयोगाच्या वस्तू टोमॅटो, बटाटे, बैल वा डूकरांसारख्या. जागतिकीकरणात हे सपाटीकरण अभिप्रेत आहेत. निसर्गात हस्तक्षेप करून माणसाने नेहमीच त्याला आपल्या सुखसोयीसाठी बदलत आणले आहे.

पण आता जागतिकीकरणात माणसांसकट साऱ्या सजीव-निर्जीव वस्तूंचे सपाटीकरण होणार. तिथं बदलाला जागाच उरणार नाही, संकराची संधीच नाही. बदलायचं असेल,ते करणे त्याला आवश्यक असेल तर से बदलतील. बाकीच्यांनी तो विचार करायचा नाही. निसर्गाच्या व्यवस्थेतला हा आडमाप वा वारेमाप हस्तक्षेप दुनियेला सपाट करून टाकील. उभ्या -आडव्या कोणत्याही अक्षांच्या कल्पनांची गरजच राहणार नाही. दोन इलेक्ट्रॉन घेतले तर ते अगदी एकसारखे असतात, वेगळी ओळख न उरलेले असतात. तसंच माणसांचं. यातून दुनियेत फक्त काही माणसं साऱ्या इतरांवर ताबा मिळवणार. इतर आहेत ते सारे एकसारखे. वेगवेगळ्या माणसांनी वेगवेगळ्या प्रकारे विचार करून, विचारविनिमय करून निके सत्त्व शोधून सत्याच्या निकट जायचे असते. त्यातूनच मानवी संस्कृतीचा विकास होतो असं आजवर आपण म्हणत आलो. अशा विकासात सहभागी होण्याची संधीच दुनियेतल्या बव्हंशी माणसांकडून काढून घेतली जाईल.

ज्या पद्धतीने दुनियेतील श्रीमंत देश पृथ्वीवरील ऊर्जास्रोतांचा वापर करीत आहेत, त्यामुळे पृथ्वीचे वाळवंट होण्याच्या प्रक्रियेला असाधारण वेग आलेला आहे. थर्मोडायनॅमिक्सचे दोन साधे नियम आहेत आणि अजून तरी ते सर्वमान्य आहेत. त्यांतल्या पहिल्या नियमानुसार विश्वातील ऊर्जा ही अविनाशी आहे. ती संपत नाही. ती नित्य आहे आणि दुसऱ्या नियमानुसार ही ऊर्जा नेहमी जास्त उपलब्धीकडून कमी उपलब्धीकडे जात असते. म्हणजे ऊर्जा असते पण उत्तरोत्तर ती कमी उपलब्धीकडे जाते, तसा तिचा नैसर्गिक प्रवास असतो. समजा आपण वाहनासाठी पेट्रोल वापरतो. ते जाळून ऊर्जा मिळवतो. या प्रक्रियेत जितकी ऊर्जा गाडी चालवण्यासाठी उपलब्ध होते त्यापेक्षा कितीतरी जास्त धूर, बाहेर पडणारा गॅस यांद्वारे बाहेर फेकली जाते. ही बाहेर फेकली गेलेली ऊर्जा असतेच पण ती आता सहज उपलब्ध नसते. तो कचराच असतो. त्यातून पुन्हा ऊर्जा उपलब्ध करणं मुश्किल असतं.

आपण लोक अजून फार कमी ऊर्जा वापरतो. तरीही आपले आदर्श अमेरिकनच आहेत. ते अपरिमित नासाडीचेच आहेत. दुनियेत जिथं जिथं ऊर्जेचे नैसर्गिक स्रोत आहेत तिथं तिथं अमेरिकेला त्यावर ताबा हवा आहे. त्यासाठी त्या देशाचे वाळवंट झालं तरी त्याची त्यांना फिकीर नाही. परवा घाना नावाच्या देशातल्या परिस्थितीवर एक डॉक्युमेंटरी मी बीबीसीवर पाहिली. एका भागातल्या जमिनीत सोनं होतं. सरकारने त्या जमिनी शेतकऱ्यांकडून नाममात्र पैसे देऊन घेतल्या आणि धनदांडग्या विदेशी कंपन्यांना सोनं काढण्यासाठी दिल्या. त्यांनी त्या जमिनीतलं सोनं काढलं. त्यासाठी केलेल्या खोदकामातून आतल्या दगडमातीचे प्रचंड डोंगर तिथे उभे राहिले. मग पुन्हा त्या जमिनी शेतकऱ्यांना परत करण्यात आल्या. तर तिथे सारे भले मोठाले डोंगर. जमिनीला फूल यायला. तिला लागवडी योग्य होण्याला किती काळ जावा लागतो याची शेतकरी मंडळींना कल्पना असते. त्या डॉक्युमेंटरीत तिथला शेतकरी बीबीसीच्या प्रतिनिधीला दाखवत होता, इथं इथं माझी जमीन होती. मी अशी अशी पिकं काढत होतो. अन् आता हे सारे डोंगरच डोंगर, यांच्यात आता मी काय करू?

याप्रकारे वापरणे, मौल्यवान गोष्टी काढून घेणे व बाकी टाकून देणे हा भांडवलवादी जागतिकीकरणाचा चेहरा आहे त्यासाठीच इराकला धमकावले जातेय. त्यासाठीच व्हेनेशुएलासारख्या देशात अमेरिकाधार्जिणा सत्ताबदल होतो.

या प्रकारच्या ऊर्जेच्या साधनांची अपरिमित लूट, दुनियेची सांस्कृतिक सपाटीकरण याला मान्यता कशी द्यायची? याच्यात सहभागी व्हायचं म्हणजे कसं व्हायचं? यात सहभागी होणं म्हणजे अंततः घानामधल्या त्या शेतकऱ्यांसारखे डोंगर दाखवायला सज्ज होणं. हताश होणे. संपून जाणं.

जागतिकीकरणाचा हा अमानवी चेहरा ओळखणं, त्याला सामोरं जात त्यातल्या अमानवी पवित्र्यांचा प्रतिकार करणं साहजिकच आवश्यक आहे. तो करायचा तर या प्रक्रियेला आपल्या अटीवर आपल्यात घेतलं पाहिजे त्यासाठी अटी घालण्याइतकी ताकद प्रकट केली पाहिजे. ती अर्थातच आपल्या मूल्यव्यवस्थेतूनच प्रकट होणार आणि ही मूल्यव्यवस्था म्हणजे काही बंदिस्त, अविचल, स्थितीशील चौकट नव्हे. तीही प्रभावांना खुलीच असली पाहिजे. आपल्या बहुजनांना तर दुसरा इलाजच नाही. येणारे पचवणे व त्यासकट उभे राहणे एवढाच रस्ता त्यांना खुला आणि त्या प्रक्रियेत टिकण्यासाठी बहुजन देशीयता, बहुजन देशीवाद.

‘तिसऱ्या जगातल्या’ लेखकाला, ज्याचे त्याची भाषा, संस्कृती आणि मूल्यव्यवस्था यांच्याशी नैसर्गिक असे गंभीर नाते आहे, त्यालाही याखेरीज वेगळा पवित्रा उपलब्ध नाही.

(श्रमिक प्रतिष्ठान, कोल्हापूर येथे दिलेले व्याख्यान)

या व्याख्यानाचा पूर्वार्ध वाचण्यासाठी येथे क्लिक करा. 

Tags: साहित्य सलमान रश्दी रंगनाथ पठारे देशियता देशीवाद जागतिकीकरण deshiyata literature salman rushdie deshivad jagtikikaran weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

रंगनाथ पठारे

मराठी कथालेखक, कादंबरीकार आणि समीक्षक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके