डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

वाचनाची अगदी अतोनात आवड असलेला माणूस नव्हता नामदेव. तरीही ती नसलेलाच असाही नव्हता. बाकी पहिल्यापासून सार्या गोष्टी अतोनात पद्धतीनंच केल्यात त्यानं. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात सत्तावन्न साली मुंबईत मोरारजी देसाईंनी जो गोळीबार केला त्या हुतात्मे झालेल्यांत नामदेवचा बाप महादेव  शिंपीही होता. त्यावेळी नामदेव त्याच्या आईच्या पोटात होता. नंतर साहजिकच त्याची आई मुंबईतल्या चाळीतला तिचा बाडबिस्तारा आवरून पोटातल्या नामदेवसकट देशावर आली.

 -: 1 :-
बस वातानुकूलित होती. हमरस्त्यानं चालली होती. आभाळात चांदणं होतं. गडद रंगांच्या काचांमधून सोबत चाललेला फिकट चंद्र तेवढा दिसत होता. आत मंद उजेड अन् गारवा. आधी थोडा कुबट वास होता. नंतर तो सवयीचा होऊन गेला. चाळीस सीटांच्या गाडीत एकूण तेवीस लोक होते. ड्रायव्हर चोवीसावा. तो पुढच्या त्याच्या केबिनमध्ये. आतल्या तेवीसांत नामदेवसकट बावीस नगरसेवक. तेवीसावा आमदारसाहेबांचा कार्यकर्ता. 

विधानपरिषदेची निवडणूक होती. उमेदवार आमदारांचे पाव्हणे. त्यांच्याच पक्षाचे नगरसेवक मतदार. त्यांची खातिरदारी करण्यासाठी त्यांना घेऊन गाडी निघाली होती. कुठं जायचंय ते ड्रायव्हरला माहीत होतं. कदाचित त्या कार्यकर्त्यालाही. चार दिवसांआधी आमदारांचा निरोप घेऊन त्यांचा माणूस नामदेवकडं आला होता. नामदेव मग त्यांना भेटायला गेला. म्हणाले, असं असं? नामदेव म्हणाला, मी कशाला जाऊ त्यांच्यात? तुमच्या उमेदवारालाच मत देणार मी. वेगळा पर्यायच नाही. ते म्हणाले, ते माहितीये हो. तुम्ही लोकांना सांभाळून न्याल. मुख्य म्हणजे जाल तिथं सांभाळाल. नामदेव म्हणाला, सगळे तुमच्याच पक्षाचे लोक. त्यांना मी कोण सांभाळणार? आमदार हसून म्हणाले, 'आमचा तुमच्यावर जास्त भरंवसा आहे. त्यासाठी जा. माझं ऐका.' नामदेवनं ऐकलं.

गाडीत वातावरण मोकळं होतं. सारे नेहमी भेटणारे लोक. तरीही सहलीला निघाल्याचा माहौल असल्यानं वातावरण वेगळं होतं. ठिकठिकाणी गट करून सुका मेवा चापत गप्पा चालू होत्या. हसण्या खिदळण्याचे आवाज कुठूनही निघून कुठंही आदळत होते.

'वोऽऽ नामदेव भौ! आवो काय हये!' एकानं त्याला हाक दिली. तब्येतीनं तुस्त. मिशाळ. ऐसपैस हसण्या- वागण्याची जाहीर रीत असलेला एक नगरसेवक. नामदेव पटकन उठून त्याच्याजवळ गेला.
‘का वो दादा?’ त्यानं विचारलं. 
‘आवो काय सांगायचं? हे काजू घशाखाली उतरत नायीत ना!’
'आँ..?
'तोबरा धरितंय.' ते गृहस्थ अंगभरून हसले. बाकी आसपासचेही.
'पाणी प्या.’ नामदेव सहजभावाने म्हणाला.
‘निस्त्या पान्यानी काजू खाली सरकत आस्तेय व्हय? काय नामदेव भौ! तुम्हीय पन...'
‘काय करू या?’
‘कोंता ब्रँड?’ आमदारांचा कार्यकर्ता तेवढ्यात शेजारी येऊन उभा राहिला होता. त्यानं शांतपणानं विचारलं.
'काढा तुमच्याकं काय आसन ते.' 
'कोंची ती स्काच व्हिस्की का काय आसती-तीच पायजे.'
'हां. बाकीच्या आपन पेतच आसतो कायेम, पेशल टायमाला पेशल माल.’
'बरंय, सोडा पायजे.'
'आपन कोकाकोला घेनार त्याच्यात.'
'कोका कोल्यात मजा नायी.'
'नसू दे. आपली सर्विस नाय तेवढी आझून.'

हे असं चालू असताना कार्यकर्त्यानं तत्परतेनं सारा सरंजाम काढला. बाटल्या, पेले, बर्फ, सोडा. सगळी तयारी होती. कोकाकोला नव्हता तर गाडी थांबवून त्याही बाटल्या आणल्या त्यानं. सार्यांच्या माहितीचं होतं. एकटा नामदेव नवखा. सारं व्यवस्थित सुरू झालं अन् कार्यकर्ता नामदेवशेजारी येऊन बसला.

'तुमचा पह्यलाच टायम आसन सायेब. आमची कैक सर्विस.’ तो नामदेवच्या कानाशी लागला.
‘चांगलं आहे. अनुभव असणं केव्हाही चांगलंच.' नामदेव हसून म्हणाला.
'सायबांसाठी करायचं, त्यांच्यामुळंच आम्ही. त्यांच्याच जीवाव समदं.' तो म्हणाला. सायेब म्हणजे आमदारसाहेब.

नगरपरिषदेत नामदेव हा अपक्ष सदस्य. तसं त्याचं लहानपण राष्ट्र सेवादलात गेलंय आणि आजही त्याचे सगळे तसलेच उद्योग चालतात. समाजवादी साथी करतात तसले. काही लोक टवाळी करायची म्हणून त्याला समाजवादी साथी म्हणतातही. आता तसलं कोणी उरलेलंच नाहीय. एसेम जोशी, नानासाहेब गोरे गेले. प्रधान मास्तर, भाई वैद्य आहेत. तेही आता पंच्याहत्तरीच्या पल्याड. बाकीचे हाताच्या बोटावर मोजता येतील. नामदेव स्वतःला काहीच म्हणवून घेत नाही. लोक म्हणतात, त्यांना अडवतही नाही. अजूनही त्याचा येथील राष्ट्र सेवादलाशी संबंध आहे. काही मित्रांना सोबत घेऊन त्यानं वैदुवाडीतल्या झोपडपट्टीत शाळा सुरू केलीय. तो राहतो त्या वॉर्डात एक व्यायामशाळा चालू केलीय. जाणीव जागृतीची शिबिरं, महिला कल्याण कार्यक्रम, कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरं असे सतत काहीना काही उद्योग चाललेले असतात त्याचे. महाराष्ट्रभर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांशी चांगला संपर्क आहे त्याचा. सध्याच्या इथल्या नगराध्यक्षाच्या निवडणुकीत त्यानं जोरात काम केलं. तो पूर्वाश्रमीचा समाजवादी मित्र, सेवादलातला सोबती म्हणून. आता तो सत्ताधारी पक्षात आहे तरीही. त्याच्याच प्रयत्नानं स्वीकृत सदस्य म्हणून नामदेवला नगरसेवक करण्यात आलंय. एरवी त्याच्यासारख्या फाटक्या माणसाचं हे कामच नाही. ह्या निवडणुकांना अफाट पैसा तर लागतोच अन् जातीय आधारही. नगराध्यक्ष झालेला मित्र माळी. शहरात माळी, कुणबी, वंजारी, निर्हाळी, कोष्टी, साळी अशा सगळ्या जातींचे लहान-मोठे गठ्ठे आहेत. त्या हिशेबात त्याच्या मित्राचं जमलं. नामदेव हा शिंपी. जन्मानं नामदेव शिंपी. संत नामदेवानं या जातीत जन्म घेतला, तर त्याच्या नावानं लोकांनी नवी पोटजात जन्माला घातली! नामदेव शिंपी. त्याच्या आईनंही त्याचं नाव नामदेवच ठेवलंय. आता शिंपी, न्हावी अशा जातींची बहुसंख्या कुठंच होण्याची शक्यता नाही. त्यामुळे राजकारणात त्यांना जागा कुठून असणार? विदर्भात चंद्रपूर भागात तेलीसुद्धा बहुसंख्य आहेत म्हणे. शिंपी कुठंच नाहीत!

तास अर्ध्या तासात आतला बसमधला माहौल बिलकुल पालटून गेला. आवाजाची सरासरी पातळी साहजिकच वर गेली होती. बोलणारे सगळे अन् ऐकणारे जवळपास कोणीच नाही अशा स्थितीला सारं आलं होतं. कार्यकर्ता अधून-मधून प्रत्येक गटाजवळ जाऊन काय हवं नकोय विचारण्याच्या मिषानं तिथल्या तिथल्या परिस्थितीचा अंदाज घेत होता. नामदेव स्वतःच्या जागेवरच बसून होता. दारू पिणारे लोक त्यानं आधीही पुष्कळ पाहिलेले होते. मुंबईत एका सिनेमादिग्दर्शकाच्या हाताखाली त्यानं दोन वर्षे काढली होती. तिथं ते नित्याचंच होतं. त्याआधी पुण्याला अभिनव कला विद्यालयात पेंटिंग शिकतानाही विद्यार्थी मित्रांच्या ओल्या पार्ट्या होत. या सगळ्यात तो स्वतः मात्र कोरडा राहिला होता.

एक नगरसेवक उठून त्याच्याजवळ आले अन् म्हणाले, 'चलो, उधर बैठेंगे' हे मुस्लिम. जाफरभाई बागवान.
'का बरं? बसा की इथं. नामदेव म्हणाला. शेजारी असलेला कार्यकर्ता उठून सारीकडं हिंडत होता.

"नही. उधरही बैठेंगे. त्यांनी मागच्या बाजूच्या एका मोकळ्या सीटकडं संकेत केला.
'मैने आमदारसाबकू बोल्या था. हमकू कायकू भेजते? हम तो आपके कॅन्डिडेटकूच मत देनेवाले. हौर किसीकू देय भी नयी सकते.’ मागच्या बाजूला बसल्यावर त्यांनी सुरुवात केली. 
'बराबर हय.'
'हमारी हौर तुम्हारी एकच बात. तुमबी हौर क्या करते? बीजेपीकू थोडाच देते?' 
‘हां ना.’
'लेकिन वो बोले की जाव जाफरभाई. सबका साथ होना जरूरी हय. तो आनाच पड्या. हौर मिल गयी तो थोडी पी भी ली हमने.'
'कोई बात नहीं जाफरभाई, नामदेव म्हणाला.

'नई नई' सावकाश एकेक शब्द हळू आवाजात उच्चारत जाफरभाई म्हणाले, ‘उस टायमकूभी मै आमदारकू बोल्या था. ये तुम्हारे दोस्तकू मेयर बनाना तब- माली है ना वो! हम बागवान. एकच है. खाली वो हिंदू हौर हम मुसलमान. क्या फर्क है?" 
'बराबर'
'लेकिन होता नई तैसा. उनके अपने अपने हिसाब रहयते, मायनॉरिटीको कोई नहीं पूछता. हम मुसलमान करके मायनॉरिटी. तुम शिंपी माने तो दर्जी करके वहीच. हौर ये मर्हेटे इतने जास्ती हय ना... इनकू भी वो उप्पर नई आने देनेवाला. करके मालीकू बनाया. इन खलगुट्योंको को कुछ नही समजता. बिलकुल बकरीके माफिक साले. आमदारकु कॉम्पिटिशन किसका? उनकी जमातवालोंकाच ना? समझ गये ना तुम?’ 
'हां हां. बिलकुल'. 
दरम्यान आणखी एकजण तिथं आले. नगरसेवकच. जाफरभाई म्हणाला तसा मर्हेटा. खळगुट्या. आमदारांचा निष्ठावंत. ते सांगतील ते करायचं. बाकी ताप करून घ्यायचा नाही. आमदार ईश्वरच. तो चुकीचा कसा असेल, इतकी पक्की निष्ठा. त्याच्यामुळं वर्षानुवर्षे नगरसेवक. त्यापल्याड संधी नाही; अन् तशी यांची अपेक्षाही नाही.
‘काय म्हंतेत जाफरभाई? तिकडं मैफल जोशात आन् तुम्ही का इठं लांब बसले?’ त्यांनी विचारलं.
'वोच मैं इनको बोल रहया था. इधर सबजन गिल्ले हुए हौर ये वैसेके वैसेच.' 
‘तकदीर आस्तंय ज्याचं त्याचं. चाला.’ म्हणत त्यांनी जाफरभाईंना घेतलं. 
नामदेव पुन्हा त्याच्या जागेवर जाऊन बसला. जरा वेळानं कार्यकर्ताही आला. 'काय जाफरभाई काय म्हंतेन?’ त्यानं विचारलं.
‘आयुष्यातल्या दुःखाविषयी सांगत होते. दारू प्याल्यावर हळुवार होतो माणूस.’
कार्यकर्ता जरा वेळ गप्प झाला. त्याला नीट कळलं नाही म्हणून. 
'दादा काढून टाखतीयन काय आसन् ते.’ तो म्हणाला. दादा म्हणजे तो ज्येष्ठ नगरसेवक.
नामदेव काही बोलला नाही.
‘आता तीन-चार दिवस हे समदे राजे अन् आपन सेवक म्हंजे मी एकटा सेवक.’ कार्यकर्ता म्हणाला अन् हसला. 
‘आमदारांचा भरवसा दिसतो तुमच्यावर.’
‘मघा सांगितलं ना- त्यांच्या आसीरवादानीच चाललंय आमचं समदं. कामात कुचिरपना कशापायी करन्हार?’
'आता जेवणावं-' नामदेवनं प्रश्न अधांतरी सोडला. कार्यकर्त्यानं घड्याळात पाहिलं. हिशेब केला.
'जास्तीत जास्त पाऊन तासात पोहोचनार आपन.’ तो म्हणाला, 
'तोपर्यंत चालू देयाचं.'
'त्यात काय अडचण येईल असं वाटत नाही.'
'आडचन नायी पन काय ना काय तरी निघातंच. लय बाळातपन आस्तंय... तुम्हांला कल्पना नायी.’ कार्यकर्ता म्हणाला अन् त्यानं एकवार सारीकड नजर फिरवली.

तेवढ्यात कुठूनतरी डरकाळी फोडल्यासारखा आवाज आला अन् त्यानंतर बदाबदा पाणी सांडावं असा. कार्यकर्ता ताटकन उठला.
‘झालंय पघा. मी म्हनत नव्हतो? लय हावरी जात. फुकाट मिळालं का भसाभसा पेल्यात. मंग ही आशी वकावकी.’ तो म्हणाला, 'आता हे जास्ती पांगलं नायी म्हंजी मिळावली.'

-: 2 :-

रात्री झोपायला उशीर झाला होता तरी सकाळी सवयीनं लवकर जाग आली म्हणून नामदेव उठला अन् दरवाजा उघडून बाहेर आला. समोर नजर जाईल तिथवर पाणी. समुद्र. दोन्ही बाजूंना दाट राई. झाडीमध्ये बारकी घरं असतीलसुद्धा. समुद्रात कुठं कुठं बारक्या होड्या दिसत होत्या. मच्छिमारांच्या.

नामदेव आत आला. त्यानं मागच्या बाजूचा दरवाजा उघडून पाहिलं. दूरपर्यंत डोंगराची रांग. झाडं. रात्री, सालं आलो कोणत्या रस्त्यानं आपण? इथं तर रस्ताच दिसत नाहीय. त्याच्या मनात आलं. त्यानं पायात चपला अडकवल्या अन् जिना उतरून तो खाली आला. लाऊंजमध्ये सामसूम होती. बाहेर समोर फुलांचे शिस्तशीर ताटवे. नारळाची झाडं. बोगनवेली. मोरपंखी पानांची बुटकी, झाडं. चारी बाजूंनी उंच भिंतीचं कंपाऊंड होतं. सर्वत्र सामसूम. उजवीकडं भलंमोठं लोखंडी गेट होतं. तेही कुलुपबंद. 
'इतक्या सकाळी उठले तुमी?’ आतून कार्यकर्ताही तिथं आला.
'हाच प्रश्न तुम्हांलाही विचारता येईल. 
'आमचं कामच हये ते.’

'सवयीनं जाग आली.’ नामदेव म्हणाला, 'रात्री आपण आलो कोणत्या रस्त्यानं असा विचार करीत होतो तर समोर हे गेट दिसलं.’
'तिकडूनच आलो आपन.' कार्यकर्ता म्हणाला, 'इथून समुद्रात जाता येतंय. पन तिथंय बी कुलूपच आसनार. माहीतगार लोकं आसल्यासिवाय नायी जाऊन देत. बाकी समदीकून बंद.'
‘आमच्यासारख्या लोकांना कोंडून ठेवायला अगदी आदर्श जागा निवडलीत तुम्ही.’
'आशी बरीच ठिकानं हयेत. आतमंदी समदी मोकळीक. काय पायजे ते करा. पब्लिकचा संबंद नायी. समदं हाटेलच बुक केल्यालं हाये.'
'वा!' नामदेव स्वतःशी उद्गारला. 
त्यानं समोर हॉटेलकडं पाहिलं. तीन मजली भव्य इमारत. पन्नासेक खोल्या सहज असतील.

'समद्या सोयी हयेत. पोहन्याचा तलाव- म्हंजी समुद्र हयेच पन आनखी तलाव बी. क्लब, कॉन्फरन्स हाल, डायनिंग हाल. समद्या सोयी.'
'बंदिस्त करमणुकीला तोटाच नाही.' नामदेव हसला.
‘आपल्या लोकान्ला समदं सवैचं. मायतीचं हये. आझून तास दोन तास कोनी उठायच्या भानगडीत पडत नायी.' कार्यकर्ता म्हणाला, 'जावा. तुम्ही. पन आराम करा.'
'हां म्हणजे तुम्हालाही आराम.' नामदेव तिरकसपणे म्हणाला.
‘मंग काय तर!’ कार्यकर्त्यानं ते सरळ घेतलं, असं वाटलं.

नामदेव त्याच्या खोलीत परतला. आराम वगैरे काय करणार? सवयीनं त्यानं भराभर उरकल सकाळचं सारं. टबबाथ. फ्लशचा संडास. शॉवर. अगदी अलीकडेच मुंबईला एका मित्राकडं गेला होता तो. वरसोव्यात घर होतं त्याचं. पंचवीस मजली आलिशान इमारत. आठशे कुटुंब राहात होती. प्रत्येक घरात अशीच सोय; साधी लघवी केली तर साखळी ओढून बदाबदा पाणी सांडायचं. आख्ख्या कोकणच्या तोंडचं पाणी काढून बदाबदा फ्लश केलं जातंय असल्या घरांतून, मित्राशी बोलला तो. त्यानं हसून खांदे उडवले. तेराव्या मजल्यावरच्या त्याच्या फ्लॅटच्या बाल्कनीतून समीर खाली कामगारांची तात्पुरती घरं दिसली. पत्र्याच्या शेडस्. समोर प्लॅस्टिकचे निळे ड्रम. सारं कुटुंब-  ते किमान साताठ जणांचं तरी असणार- ड्रमभर पाण्यात भागवत असणार तिथं. वाहून पाणी आणणार किती? अन् गरजेपेक्षा जास्ती कशाला?

सगळीकडं सारी अतोनात नासाडी चालू आहे. नेहमीसारखं नामदेवच्या मनात आलं, काही लोक अमाप लुटतात. त्याहीपेक्षा अमाप नासाडी करतात. आणि बाकी खूप लोकांना गरजेइतकंसुद्धा नाही. अन् हे बाकी खूप लोकच सारं निर्माण करतात. हे असं कुठवर चालणार? आता हे सगळे नगरसेवक- वॉर्डगणिक निवडून आलेले लोकप्रतिनिधी काय काम करतात?

प्रत्येक ठिकाणी किती पैसा काढता येईल हीच दृष्टी. त्यासाठी कमिट्यांत घुसणार. त्यासाठी भांडणार. त्याच चर्चा अन् तेच हिशेब. साले निवडून येतानाच मुळी पैसे वाटून निवडून येतात. मग वसुली करीत राहतात. कैक पटीनं मोठी वसुली. गोरगरीब निवडणुकीत पैसे घेतात. कितीसे घेतात? का घेऊ नयेत त्यांनी. त्यांनी नाही घेतले तर यांची लुटालूट थांबणार आहे थोडीच? अन् आता हेही मतदार आहेत. यांचा भाव मोठा. फुटलायच म्हणे तो. अर्धी पेटी मिळणार प्रत्येकाला. जनतेचा पैसा लुटायचा अन् घरं भरायची. मौजमजा करायच्या.

या सगळ्यांत आपण काय करीत आहोत? त्याच्या मनात आलं, यातलं आपण काय अन् किती थांबवू शकतो? आमदारानं इतक्या आग्रहानं आपल्याला या लोकांसोबत का यायला सांगितलंय? आपण काय करणार? आपल्यासारख्या कैकांना पोहोचवून उरतील असे हे सारे लोक कशासाठी आलोय आपण?

दारावरची घंटी वाजली. नामदेवनं उघडलं तर चहाचा ट्रे घेऊन कार्यकर्ता स्वत: हजर.
'सगळ्यांना असा स्वतः नेऊन देणार?' नामदेव चकित झाला होता. 
'छ्या छ्या! मी आपलं सयज घेऊन आलो, म्हनलं संगतीनी घेऊ सकाळी सकाळी.'
'हां. हे छान आहे.'
‘बरं तुमच्याकं ते मोबाईल हये ना?’ 
नामदेव चहा भरताना कार्यकर्त्यानं सहज स्वरात विचारलं.
'नाहीय्ये. का हो? कुठं फोन करायचाय का? आमदारांशी...' 
'नायी नायी. बाकी कोनाकडंच मोबाईल नायी. फक्त तुमाला विचारलं नवतं. कान्ट्याक्टला आपल्याकं एक हये ना!' कार्यकर्त्यानं तो दाखवला. 'इथं हाटेलातून भायेर फोन करायची सोय कटाप हये. त्याच्यामुळं लागला तं आपल्याकं हये.’

आपल्यासोबत चहा घेण्यासाठी खरा उद्देश हा होता; नामदेवच्या लक्षात आलं. हा माणूस फारच तयारीचा आहे. याच्याशी जरा जपूनच वागलं, बोललं पाहिजे, त्यानं नोंद घेतली.

‘येऊ का सायेब. काय आडचण आसली तं सांगा. तशी चक्कर व्हतच राहनार म्हना.’ म्हणून कार्यकर्ता बाहेर पडला.

इथं आता दिवसभर करायचं काय? येणारे दोन-तीन दिवस इथं घालवायचेत. कसे घालवत असतील लोक? दारू, जेवण, गप्पाटप्पा, फारतर एकत्रितपणे खेळणं वगैरे. आपण काय करणार? नामदेवला वाटलं, वायाच जाणार हे सगळे दिवस. उगीचंच आलो इथं आपण. आता सरळ कार्यकर्त्याला गाठून आमदाराशी बोलावं फोनवर अनू सांगावं की नाही थांबत इथं मी. एकतर कामच नाही. सांभाळायचं लोकांना तर त्यासाठी तुमची कडेकोट व्यवस्था आहे. तुमचा कार्यकर्ता तयार आहे. आणि काही असेल नसेल. इथं थांबणं नाही. बस्स.

नामदेव बाहेर पडला तर पुन्हा कार्यकर्ता समोर हजर.
‘आवो मघाशी ते सांगायचं इसायलंच, कार्यकर्ता म्हणाला. 
'तुमच्यासाठी पुस्तकं आनलीत. आमदारसायबांनीच कोनाला तरी सांगितलं आसन. तुम्हांला ती द्या म्हणाले. तुम्हाला इथं करमनार नायी. बाकीच्या लोकांचा प्रश्न नायी पन तुमचं यागळं हये म्हणून-  मी लगेच घेऊन आलो.'

च्यायला! हाही विचार केलेला दिसतोय या लोकांनी. म्हणजे असा प्रत्येकाविषयी बारकाईनं विचार केलेला असणार; नामदेवच्या मनात आलं. तो पुन्हा खोलीत येऊन बसला.

बरीच पुस्तकं होती. माझे सत्याचे प्रयोग, टॉलस्टॉयची आत्मकथा, माणूस जेव्हा जागा होतो, कोरीव लेणी, साने गुरुजींचं भारतीय संस्कृती अशी पुष्कळ अन् पुष्कळ चांगल्या कादंबऱ्या... कल्पना चांगली आहे. नाहीतरी बऱ्याच दिवसांत निवांत वाचन केलेलं नाहीये आपण. अलीकडं जमतच नाही. आता या सक्तीच्या कैदेत ही नामी संधी आहे. नाहीतरी तुरुंगातच कार्यकर्ते वाचतात, ऐकतात, शिकतात. आपणही करून बघू. 

-: 3 :-

वाचनाची अगदी अतोनात आवड असलेला माणूस नव्हता नामदेव. तरीही ती नसलेलाच असाही नव्हता. बाकी पहिल्यापासून सार्या गोष्टी अतोनात पद्धतीनंच केल्यात त्यानं. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात सत्तावन्न साली मुंबईत मोरारजी देसाईंनी जो गोळीबार केला त्या हुतात्मे झालेल्यांत नामदेवचा बाप महादेव  शिंपीही होता. त्यावेळी नामदेव त्याच्या आईच्या पोटात होता. नंतर साहजिकच त्याची आई मुंबईतल्या चाळीतला तिचा बाडबिस्तारा आवरून पोटातल्या नामदेवसकट देशावर आली. नामदेव बापाचा दाब नसताना मोकळा वाढला. माऊलीचा सारा वेळ जगण्यासाठीच्या खस्ता खाण्यात जाई. हा आपला जगायला स्वतंत्र. आईच्या जिव्हाळ्याची उब होती व आपल्या परीनं बर्या-वाईटाचा निवाडा करीत तो वाढला. अतोनात भांडणं, मारामार्या, भटकणं, गाणी म्हणणं अन् 'सदैव सैनिका पुढेच जायचे...'

मुळात सत्प्रवृत्तच असतात माणसं; असं गांधीजींचं म्हणणं. खरं खोटं देव जाणे. नामदेव जरा अधिक तसा होता. सेवादलात गेला तिथं अतोनात काम करायचा. कसाबसा मैट्रिक पास झाला अन् पुण्याला कलाविद्यालयात गेला. तिथं चार-दोन वर्षे घालवली. नंतर मुंबईतल्या फिल्म इंडस्ट्रीत दोन वर्षे उमेदवारी केली. सगळीकडं अतोनात काम केलं. पण ओंजळीत उरलं काहीच नाही. म्हणून पुन्हा देशावर आला. गावी आला अन् जुन्या जगण्याशी जोडून घेतलं स्वतःला.

आता बरं आहे. नोकरी करणारी बायको आहे. हा फुकटचे सतरा उद्योग करायला मोकळा. आता नगरसेवक स्वीकृत सदस्य. त्यामुळे इथं कशाला? प्रामाणिक, निष्कलंक चारित्र्य हे त्याचं बळ. सभोवतालच्या दुनियेत असा माणूस वेगळाच पडणार. तरीही तो अशा दुनियेशी फटकून राहात नाही. भोवताली चाललेलं त्याला दिसत असतं. त्याला नुसत्या शिव्या देण्यापेक्षा त्याच्या ज्ञानासकट काही करता येत का हे आजमावयाचे उद्योग त्याचे. सतत काम त्यामुळे वाचण्याचं मागंच पडत गेलेलं. या कैदेत पुस्तक हाती आल्यानं नामदेव त्यांच्यावर तुटूनच पडला.

नामदेव असा वाचनाच्या नादाला लागला हे लक्षात आल्यानं कार्यकर्त्याचा हा भार जरा कमी झाला. आमदारसाहेबांनी व्यवस्थित सांगितलं होतं त्याला. बाकीचे सारे आपले लोक. आपल्या पक्षाचे. सगळे व्यवस्थित व्यवहारात बसणारे. थोडाफार वांडपणा, बारक्या बारक्या हुशारी करतील ते. पण निस्तरता येण्याजोगं, सांभाळून घेण्याजोगं असतं ते. हा खरेदी करायचा माणूस नाहीए. त्याला तो प्रस्तावच द्यायचा नाही. पण त्याला सारं बघू द्यायचं. अडवायचं नाही.

‘मंग न्हयायाचंच कस्यासाठी?’ कार्यकर्त्यानं आमदारांना विचारलं होतं. ते म्हणाले, 'सगळंच तुला सांगितलं पाहिजे का? आवश्यक आहे म्हणूनच सांगतोय ना. पण ठीक आहे; ते सगळं पाहून त्याच्या मनात जो सात्त्विक ताण निर्माण होईल त्याच्यातच विरघळून टाकायचं त्याला. त्याचं मत आपलंच आहे. पण विरघळल्यानं ते अधिक पक्कं. मुख्य म्हणजे नंतरसुद्धा त्याचा उपयोग. आता सांग; यातलं काय समजलं तुला?’

'कायच नायी. वरलोडच हये. तुम्ही म्हनता तेच खरं,' कार्यकर्ता तेव्हा हसून म्हणाला होता.

आता कार्यकर्त्याचं काम शिस्तशीर सुरू झालं होतं. साऱ्यांचं खाणं-पिणं, करमणूक. प्रत्येकाच्या आवडीनिवडी ध्यानात घेऊन तशी व्यवस्था. एकावर दुसऱ्याची पाळत अन् दुसऱ्यावर तिसर्याची अशी कडेकोट योजना. सतत रिपोर्ट घ्यायचे अनू बंदोबस्त करायचा. तरीही माणसं सगळ्या व्यवस्थांच्या पल्याड असतात. कुठून ना कुठून कशीतरी जागा करून काहीतरी उपस्थित करतातच.

एकजणानं कार्यकर्त्याला बाजूला घेतलं. म्हणाला, 'मुलाबाळांपासून लांब राहायचं लय कठीन.' 
'अगदी बराबर. पन कामासाठी इलाज नायी. झाले; दोनच दिवस आता.' तो म्हणाला.
हो, एकजण थोडा गप्प झाला, पण लगेचच म्हणाला, 'एकट्यानी झोपच येत नायी. सवेच नायी.

कार्यकर्त्याच्या तात्काळ लक्षात आलं. पण करायचं काय? या सोयीसंबंधी काहीच बोलणं झालेलं नव्हतं. अन् आमदारसाहेबांना सांगणार कसं?
'बघू, मार्ग काढू.' कार्यकर्ता त्याला म्हणाला. पण मार्ग मात्र सुचेना. परस्पर काही करण्याची हिंमत करणं शक्य नव्हतं. ही नगरसेवक मंडळी एकत्र अशी चैन करण्यासाठी शहरातल्या हॉटेलात जातात असं दुरून त्यानं ऐकलेलं होतं. पण इथं ती सोय करायची? मुख्य म्हणजे आमदारसाहेबांना कळलं तर त्यांच्यासमोर त्या नगरसेवकाची काय इभ्रत उरणार?

‘आमची नगरसेवक मंडळी जरा चमत्कारिक असतात. अडचण आली काही तर फोन करा मला,’ नगराध्यक्ष म्हणाले होते. कार्यकर्त्याला हे आठवलं. त्यानं त्यांनाच फोन लावला.
'बरं झालं. मला सांगितलंत. आमदारसाहेबांशी बोलू नका. मी व्यवस्था करतो.' ते हसून म्हणाले.
बिनबोभाट व्यवस्था झाली, आणखी ज्यांना हवी होती,  त्यांचीही. 
आवाज न करता ज्याला जे हवं ते त्यानं करावं. कार्यकर्ता लगेच आता आमदारसाहेबांना सांगणार नाही.  पण नंतर सांगणारच. त्यांच्यापासून कसं लपवणार? नगराध्यक्षांना ते माहीत आहे. पण मुळात आमदारसाहेबांनाच सार माहीत आहे हे कार्यकर्त्याला माहीत नाहीय. हे बरं आहे. 

वाचायचं म्हटलं तरी सारखं वाचत नाही बसत माणूस. बाकी नित्याच्या गोष्टी असतात. इतरांना आपल्याबद्दल कुतूहल असतं. आपल्यालाही इतरांबद्दल. नामदेवला भोवताली चाललेलं काही दिसत होतं, काही नव्हतंही. रेस जिंकण्यासाठी पाळलेल्या जनावरांची काळजी घ्यावी तशी सगळ्यांची घेतली जात होती; आणि ते सारे ती तशाच आनंदाने साजरी करीत होते. अधूनमधून कोणीतरी नामदेवकडं यायचा. बारक्या आवाजात कुजबुजी. यानं त्याच्याबद्दल अन् त्यानं तिसऱ्याबद्दल. एकजण दारू प्याल्यानंतर अत्यंत विव्हल मनःस्थितीत नामदेवकरडं आला अन् त्यानं आपल्या तारुण्यातली विफल प्रेमकहाणी सादर केली. हे सगळं झूट आहे. ती माझ्या आयुष्यातून गेली अन् मी कायमचा पोकळ होऊन गेलो अशा अर्थाची मांडणी. नामदेव चकितच झाला. या इतक्या निर्ढावलेल्या दुनियेत वावरताना दारू प्यायल्यावर का होईना प्रेमकहाणी आठवावी, हेही कमी नाही! त्याला वाटलं.

कार्यकर्ता अधूनमधून भेटे. जुजबी चौकशा. पण नियमित. एकदा नगराध्यक्षांचा फोन येऊन गेला. काय, कसं काय वगैरे. काय सांगणार? ठीक होतं. पुस्तकं होती. बाकी करमणूक थोडीफार. प्रेमकहाण्यासुद्धा ऐकायला मिळतात. बंदिस्त दुनियेतली करमणूक आहे.

पण एकूण वातावरणात न दिसणारा ताण आहे. नामदेवला वाटलं, नेमकं लक्षात येत नाहीय; पण काहीतरी आहे. सगळ्या सोयी-सुविधांपल्याड आत गच्च असं काहीतरी आहे. मग एका दुपारी एक दणदणीत मारामारीच झाली. मोठाच हंगामा. बसमध्ये जाफरभाई त्याच्याजवळ बसला असताना त्याला तिथून घेऊन जाणारा नगरसेवक; त्यानं दुसऱ्या एकाला जोरदार हाणलं. आरडाओरडा झाल्यानं नामदेव तिकडं गेला. सगळेच जमले होते. कार्यकर्ता आणखी एक दोघांना घेऊन मध्यस्थी करायचा प्रयत्न करत होता. फारच तापलेलं होतं वातावरण. मार खाल्लेल्याच्या बाजूनं तावातावानं बोलत होते काहीजण. नामदेव दिसताच कार्यकर्त्याला जरा धीर आला. 'यान् ला बाजूला घेऊन जा तुमी. मी दादान् ला संबाळतो. तो म्हणाला.

नामदेवनं दादा-पुता करत त्या मार खाल्लेल्या नगरसेवकाला बाजूला घेतलं. त्याच्यापाठी त्याचे लोक आले. काहीही न बोलता नामदेव त्यांना स्वतःच्या खोलीत घेऊन आला.
'अशी दादागिरी म्हंजे हद्द झाली.’
'आंगावं हात टाखायचा म्हंजी काय!’ 
'याच्यासाठी घेऊन आलं इथं?’ 
'समजलेत कोन स्वताला? आमचा पन ओबीसीवाला ग्रुप करू आमी.’ 
'हैचं.'

अशा सगळ्या फैरीत मार खाल्लेला नगरसेवक गप्प होता.
'काय, कशामुळे झालं?" नामदेवनं त्याला विचारलं. 
'आवो कायच नायी, घरी फोन करीत व्हतो...’ 
'कुठून? फोन तर बंद आहेत.' 
'मोबाईल व्हता...'
'हां, माझ्याकडं होता.’ दुसरा एकजण म्हणाला, 'मी ठेवला होता माझ्याकडं. मी माझ्या घरच्यांशी बोललो तर हे म्हणाले, मला पण बोलायचं.'
'आता कुठंय मोबाईल?"
‘हिसकून घेतला त्यानी' मार खाल्लेला रडवेल्या आवाजात म्हणाला. तो घाबरलेला दिसत होता.
'मी सांगतो ना साह्यबांना अशी मोगलाई नाही चालणार. अशा रीतीने आमची मतं घेणार तुम्ही?' मोबाईलवाला म्हणाला.

तेवढ्यात कार्यकर्ता तिथं आला. त्या दादांचा बंदोबस्त करून आला असणार. त्यानं मार खाल्लेल्याला तिथंच थांबायला सांगितलं अन् मोबाईलवाल्याला घेऊन तो बाहेर गेला. 'काय झालं असेल... नसेल पण हाणामारी ही काही ठीक नाही. अजिबात बरोबर नाही.’ नामदेव म्हणाला. मार खाल्लेल्या आणि घाबवरून बसलेल्या नगरसेवकाविषयी कणव वाटली त्याला.

'मपली चूकच झाली तशी... पन हानामारी, आन् ते आता सायबान् ला सांगनार... मार खाल्लेल्याला सलग बोलता येईना.
‘काळजी नका करू.’ नामदेव म्हणाला.
‘आन् चूक काय त्यात; त्यान् ला पन मायती आस्तंय.'
'काय व्हत नायी.'  
‘त्याचेय पन काय, काय धंदे चालतेत; ते पर सांगू आपन
सायबानला'
असं बाकीच्यांचं सुरू झालं. त्याचा अर्थ नामदेवला लागेना. हा नुसता कुटुंबाशी संवाद करण्याचा मामला नसावा. एवढा अंदाज त्याला आला.

'चला. बोललो मी साह्यबांशी. सांगितलं त्यांना सारं. ते नीट करतील त्याला. अशा पद्धतीनी कोणाला दाबून टाकणं चालवून घेतलं जाणार नाही; मी साह्यबांना स्पष्ट सांगितलं. मोबाईलवाला परत येऊन म्हणाला.

सगळं निस्तरताना कार्यकर्त्याचा पुष्कळच वेळ गेला. अन् सगळं आलबेल होतंच त्यानं, असंही नसतं. पण वरवरची निदान शांतता. संध्याकाळी नामदेवकडं येऊन सगळा वृत्तांत दिला. चार-सहाजण मोबाईलवरून विरोधी उमेदवाराशी संपर्क करीत होते.

मोबाईलवाला त्यांचा लीडर. त्यानंच फूस लावून बाकीच्यांना तयार केलं होतं. आधीपासूनचाच डाव असणार. यांच्यात येऊनही फोडाफोडी करायची. नैतिक वगैरे भानगडीच नाहीत. सौदेबाजीचा व्यवहार यांचे घ्यायचे अन् त्यांचेही. ते कदाचित जास्तही देणार असतील; किंवा नसतीलसुद्धा. पण दोन्हीकडून मिळाल्यास अधिक उत्तम हा विचार. 'दादान् ला बातमी लागली न् ते घुसले तिथं. ज्याच्या हातात मोबाईल होता त्याला धरलं अन् केली ठोकाठोकी सुरू....'  कार्यकर्ता सांगू लागला.
'मारामारी करून काय साधणार?’
'अगदी बराबर. मीयबी तेच म्हनलो. त म्हनले, चुकीच झाली. सबागती व्हऊन गेलं.’
'आता अशा मनःस्थितीत हे तुम्हांला मतदान करतील?’
'करनार. साह्यबांनी खुद्द समजूत काहाडली.'

‘म्हंजे काय केलं?’
‘ते नायी सांगता येनार. मलाच माहीत नायी त तुम्हांला कुठून सांगनार?'

'मला मुळातच प्रश्न आहेत' नामदेव म्हणाला, 'तुम्ही या लोकांना असं ठेवलंय. त्यांना पैसे देणार आहात. तरीही ऐनवेळी तुम्हांला ते मत देतील याची खात्री कशी करणार?’

'ते बराबर. पन व्हत नायी तसं. त्याची सिस्टीम आस्तीय.' 
'काय सिस्टीम?’
‘ते मला नायी सांगता येनार.'
'तुम्हांला माहीत नाही?’ 
'तसंच समजा.' कार्यकर्ता पटकन् म्हणाला.
‘त्या भानगडीत आपन पडतंच नायी. सांगितल्यालं काम चोख करायचं. बास.' जरा वेळानं तो म्हणाला.
'खरं आहे.' नामदेव म्हणाला, 'तुमच्याइतकी बिनतोड निष्ठा ठेवणारी माणसं आहेत. त्यामुळे प्रश्नच नाही."
'चाल्लंय.' म्हणत नामदेवच्या तिरकस शेऱ्याकडे दुर्लक्ष करीत कार्यकर्ता बाहेर पडला. त्याला बिचार्याला सवडच कुठं होती? सारखं काम, काम अन् कामच फक्त.

रात्रीच्या जेवणानंतर नामदेव खाली बागेत हिंडत होता. शतपावली. नेहमी न परवडणारी चैन. वेळच असतो कुठं एरवी इतका निवांत. आताही वेळ मोकळा हाती होता पण मन निवांत नव्हतं. डोक्यात एकीकडं वाचलेले गांधी, टॉलस्टॉय, साने गुरुजींची भारतीय संस्कृती. दुसरीकडं सभोवतालचे वळवळणारे जीव. भारतीय संस्कृती! गुरुजींची आणि प्रत्यक्षातली. नामदेवला वाटत होतं की आपण किती निब्बर होऊन गेलोय, किती निर्ढावलोय! लोकशाहीची इतकी क्रूर थट्टा भोवताली चाललेली आहे. अन् आपल्याला त्याचं काहीच वाटत नाही? कसं संवयीचं होऊन जातं सारं? आपण वाचतोय काय अन् जगतोय काय? कशाचाच कुठं मेळ नाही अन् आपण निष्क्रियपण बघतोय सारं....

'खाने के बाद टहलना अच्छा.' जाफरभाई त्याच्याजवळ येऊन म्हणाले. 
'चाललंय. वेळ आहे म्हणून.’ नामदेव म्हणाला.
‘बाकी सब लोगोंके अलग काम चर रहे. खाली तुमचं मस्त अपनी धूनमें किसीका कुछ लेना नही अन् देना नहीं.' 
‘मग काय!’
'ये दोपहरका झगड़ा इन लोगोंकू बहोत महंगा पड़ेगा.

‘बरं नाही झाल ते.'
'बहोत जादा माल लेंगे वो. छोड़ेंगे नहीं. तुम देखते रहना.’
'क्या बात करते हो?’
‘हां. मै बोलता ना. ऐसा हुवाच नहीं इसके पहले कधी. ये बिलकुल सही प्लॅन बनाया इन लोगोंने. खाली एक आदमी को झापड्या खान्या पड्या. लेकिन माल बेचेंगे वो.'
'तुम्ही पण करा की काहीतरी आयडिया', नामदेव हसून म्हणाला.
'हम उस झंजटमें नही पडनेवाला, जो है सो ठीक है. हम तुम्हारे जैसा आदमी है. वैसे तो, थोडा फर्क है; हम लेता है जो मिलता है. तुम वो भी नहीं करता. इनको कायकू छोड़नेका?' 
'बराबर'.
'हमको बोलो, बराबर करके. मैं सबकुछ समझता. इधर साले क्या क्या धंदे करते लोग, तुमको पता भी नहीं. यहां तो लौंडियां भी मिलती हैं, जो चाहे उसको.'
‘उगीच काहीतरी सांगू नका.’
‘मै सच बोलता’ जाफरभाई म्हणाला. तेवढ्यात आपल्या पाळतीवर असलेलं आणखी कोणी टप्प्यात आल्याचा अंदाज येऊन तो तिथून सटकला. ‘बिलकुल सच है’ तो जाताना चोरट्या आवाजात म्हणाला.

-: 4 :-

सकाळी घाईघाईनं कार्यकर्ता नामदेवकडं आला अन् मोबाईल त्याच्या हाती देत म्हणाला, 'सायेब बोलतेत.' 'काय नामदेवराव, बरे आहात ना?’
आमदारांचा कमावलेला मधाळ स्वर. 
'वैतागलोय.' तो म्हणाला. 
‘का हो?’
'तुम्ही एकीकडं आम्हांला गांधी, लोहिया अन् गोदूताई परूळेकर वाचायला देणार अन् दुसरीकडं हा तमाशाही दाखवणार.

आमदार हसले. 'आपली लोकशाही कोणत्या थराला पोहोचलीय हे तुम्हांला दिसलं पाहिजे. तुम्ही साधनशुचिता पाळणारे लोक. आम्हांलाही ती आवडत नाही असं नाही. पण प्रत्यक्षात कोणत्या पातळीवर जाऊन तडजोडी करायला लागतात ते बघा तुम्ही.'
'कशासाठी? मी पाहून काय होणार?’ 
'याच्यातून काही मार्ग आहे का, सांगा. तुम्ही मार्ग दाखवा; आम्ही मान्य करू.'
'कशाला बोलता उगीच! आम्ही कोण मार्ग दाखवणार? अन् तुम्ही तो मानणार?’
'बिलकुल मानणार.'
'बंद करा ही कोंडाकोंडी. ही सौदेबाजी एकीकडं करता अन् मार्ग दाखवा म्हणता-

लोकांना बाया पुरवण्याइतपत खाली उतरला तुम्ही, असं त्याला म्हणायचं होतं. मुष्किलीन आवरलं त्यानं स्वतःला. तरीही त्याच्या आवाजाच्या तीव्रतेत उत्तरलं सारं. शेजारी कार्यकर्ता उभा होता. तोसुद्धा दचकला. चकितच झाला. साह्यबांशी ही भाषा करण्याची हिंमत! 
'रागावू नका हो,' आमदार निर्ढावलेल्या मधाळ स्वरात म्हणाले, 'तुमचा त्रागा समजतो आम्हांला. पण त्यानं प्रश्न सुटत नाहीय. आम्ही हे केलं नाही तरी विरोधक करणारच ना. फार खालच्या पातळीवर गेलंय सारं. आम्हांला ते मान्यच आहे. माझं म्हणणं असं की आम्ही तुमच्यापासून काहीच लपवत नाहीय. तुम्ही बघा. गांधी, लोहिया यांच्यातून किंवा आणखी कुठून काही रस्ता दिसतो का सांगा. तुम्ही स्वतः प्रामाणिक आहात; पण तुमच्या भोवतीची दुनिया कोणत्या दर्जाची आहे, ते प्रत्यक्ष बघा. तिच्यात टिकण्यासाठी आम्हांला काय करावं लागतंय तेही. आणि टिकायचंय आम्हांला. संपवायचं नाहीय. तुम्हांला तिथं पाठवताना हेच मनात होतं माझ्या. अगदी अंतःकरणापासून सांगतो.'

आमदारांचा स्वर इतका आर्जवी होता की नामदेवला सुचेचना काय बोलावं ते. अन् होतंच काय बोलण्यासारखं? काय सापडणार गांधी, लोहियांमधून? 
‘ठीक आहे.' तो म्हणाला.
‘आणि भेटू आपण. हे निवडणुकीचं वगैरे किरकोळ. खरंच जरा सविस्तर भेटू या.’ आमदार म्हणाले.

कार्यकर्ता गेला. नामदेव एकटाच रूममध्ये बसून राहिला. आमदारांचे शब्द त्याच्या कानात आणि मनात दुमदुमत राहिले. काय करणार गांधी अन् लोहिया? काळच सगळा बदलला त्याला कोण काय करणार? दुनिया बदलली. देश बदलला. माणसं बदलली. समाजवादाच्या स्वप्नाचं पृथ्वीवरून उच्चाटन झालं. सारी दुनिया अमेरिकेला आंदण. सगळं मुक्त. दांडग्यांची सत्ता. त्यांची अमाप हाव. सगळीकडं स्वार्थभावाला उधाण आलंय. इतक्या सगळ्या भल्या गोष्टी पाहता पाहता वळचणीला गेल्या. कोण कोणाचं ऐकणार? अन् कशासाठी ऐकणार? ओरबाडणं हाच दुनियेचा न्याय झालाय. मोठ्यांपासून छोट्यांपर्यंत. कोण कसं थांबवणार हे? भांबावल्यासारखे होऊन गेलेत लोक. बधिर झालेत. कसला मार्ग शोधणार? आमदार काही तितका भला माणूस नाही. पण भलेपणानं जगण्यासारखी परिस्थितीच उरलेली नाही. अन् टिकायचं तर आहे. काय करणार? अन् तसा बरा माणूस आहे तो! पूर्वी चांगली कामं केलेली आहेत त्यानं. आता या बदलत्या काळात टिकायचं तर तो तरी काय करणार? त्याचा स्वर खराच होता. त्याचं आर्जव खरं होतं. मुख्य म्हणजे आपल्याजवळ त्याला देण्याजोगं उत्तरच नाही. आपल्यापुरते फार तर आपण स्वतःला या सार्यातून दूर ठेवू शकतो.

म्हणजे काय, आपण हे असंच बघत राहायचं? नामदेवला वाटलं, चुकतंय. काहीतरी फार चुकतंय. आपण आपल्या भोवतालची कीड सरळ स्वीकारतोय. अरे! सरळ वागूनसुद्धा काम करता येतात. टिकता येतं. आमदार कोणत्या टिकण्याच्या गोष्टी करतोय? त्याला त्याची सत्ता टिकवायचीय. माणूसपण टिकवण्याच्या गोष्टी तो का नाही करीत? पण मग ते तर कोणीच करत नाही. विश्वासच हरवून बसलेत सारे! आपण काय करायचं? मतदानाचा हक्क बजवायचा. मतदानाचा पवित्र हक्क. कोणतं पावित्र्य उरलंय त्यात? मतपेटीचं राजकारण सुरू झालं, तेव्हाच ते संपलं. आता तर तसला संबंध मनात यावा इतकंही उरलं नाहीय ते. त्यातल्या त्यात कमी वाईट समजून आपण यांना मत देणार, धर्मवादी जास्त वाईट म्हणून. तसा काय फरक आहे यांच्यात अन् त्यांच्यात?....

काहीच सुचेनासं होऊन नामदेव नुसताच बसून राहिला. समोर पुस्तकं होती. उघडावीशी वाटेनात. मग कोणीतरी आलंय, असं त्याला वाटलं. दाराशी हालचालीचा भास. तो पुढे जाऊन आला. कोणीही नव्हतं. तो पुन्हा आत येऊन बसला. जरा वेळानं दबकत एकजण आत आला. 
‘काहो, तुम्ही येऊन गेलात का मघाशी?’ नामदेवनं विचारलं.
'हां. मीच व्हतो.'
‘आत नाही आले?’

'म्हनलं डिस्टर्ब करावा का नको?’
‘का बरं? काहीच कारण नाही तसं.' 
'मला वाटलं वाचत असतात.'
'कंटाळा आलाय त्याचाही.'
'बराबर हये.' तो म्हणाला. बराच वेळ नुसताच बसून राहिला. नामदेवलाही काही सुचेना. काय बोलणार? आतल्या आतचे त्याचे स्वतःचेच पुष्कळ प्रश्न होते. त्यांचं दुसर्याशी काय बोलणार?
‘चलतो मंग.’ 
‘काय सहज आला होता ना?’
‘हां. मंग काय!’ 
‘ठीक आहे.' नामदेवलाही कळेना. पण रसही वाटेना.
'मी आसं म्हनत व्हतो- दारापर्यंत जाऊन परत येत हा एकजण म्हणाला, 'आज वाटप करनार हयेत.' 
‘कशाचं.'
'तेच. आर्धी पेटी परतेकाला.'
‘बरं.’ काय बोलणार? 
'तुमी काय त्याच्यात नायी.' 
'नाही.'
'पन आसं समजा केलं. तुमी ते घेतले आन् दुसऱ्या कोनाला धिले- 
'कोणाला?’ नामदेवच्या प्रस्ताव ध्यानात आला.
‘कोनीय पनः घ्या. समजा मला धिले.’ 
‘अरे व्वा!’
'नायतरी तुम्ही नायी घेऊन त्या लोकान् ला काय फरोक पडनार? तरीय पन तुम्हांला नको हये तर...’
‘चांगली कल्पना आहे!’

'तुमचं काय तात्त्विक आसन ते तुमच्यापशी र्हातंय; आन दुसऱ्याचा फायदा केल्याचं पुन्य.'
'फारच चांगली कल्पना!' नामदेव अचानक मोठमोठ्यानं हसायला लागला. आवरेनाच त्याला ते. लोभ, भाबडेपणा आणि धूर्त हुषारी यांचं इतकं भन्नाट मिश्रण करायचं काय याचं?
‘सांगतो मी तसं त्यांना.’ 
‘नायी नायी सांगू कायच नका. घ्या अन्...’
'सांगायला तर लागेलच. त्याशिवाय कसे देणार मला ते?’ नामदेव पुन्हा हसला.
‘काय देताय, काय सांगताय?’ कार्यकर्ता आत येत म्हणाला. त्याक्षणी आधी आलेल्या त्या एकजणाचा चेहरा खर्रकन उतरला.

'काही नाही. यांना बसचा त्रास होतो. म्हटलं, तुम्हांला सांगतो. गोळ्या देतो.' नामदेवनं पटकन् सावरून घेतलं. शक्य असतं तर त्या एकजणानं नामदेवच्या पायाशी लोटांगणच घेतलं असतं! असाधारण कृतज्ञभाव चेहऱ्यावर प्रकट करीत तो बाहेर पडला. जुजबी काही बोलून कार्यकर्ताही पाठोपाठ गेला. तो आलाच मुळी त्या एकाच्या पाठी. म्हणून त्याच्या पाठीच गेला.

नामदेवचं डोकं भणाणून गेलं होतं. बिनचेहऱ्याचे विचार. निराकार आकार. पांढरे ढंग उगवतात अन् पांढऱ्या डोंगरावर आदळतात. शुचित्वाच्या गोष्टी. शुचित्व की नपुंसकत्व? नाकारून नाकर्तेपण. कोणती शुभ्रता फडकवत ठेवतो आहोत आपण? काय साधतो? सामान्य माणूस आपल्यापेक्षा खरा. उघड्या डोळ्यांनी सत्याला सामोरा जातो तो. पैसे घेतो अन् नागवलाही जातो. चिमूटभर घेऊन ढीगभर नागवला जातो. आपण काय करतो? आपली मदार कोणावर? या नागावल्यांमध्ये काम करण्याच्या गोष्टी करतो आपण! कशाच्या बळावर? कशाच्या बळावर शाळा चालवणार? बिनपगारी सेवाभावाचं आवाहन कायम करत आलो आपण वैदूवाडीतल्या शिक्षकांना. तिथं शाळेला साधा पत्रा नाही. पोरांना बसण्यासाठी बाकडीसुद्धा नाहीत. आपल्या कोणत्या शुचित्वातून होणार आहे ते? याच आमदाराकडे शाळेसाठी देणगी मागायला गेलो तर मुष्किलीनं हजार पाचशेवर बोळवण होणार आपली. मुळात मागायला जाणारच नाही आपण. कधीच गेलो नाही. आता हे पन्नास हजार रुपये देणार प्रत्येकाला आपल्याला नाही. आपण घेणार नाही म्हणून. आपल्या शुचित्वासाठी, आपल्या शुद्ध प्रतिमेसाठी. खड्डयात गेली साली प्रतिमा, काय चाटायचीय?...

नामदेव तरातरा बाहेर आला. आपण कशासाठी बाहेर आलो हे न कळून पुन्हा आत गेला. पुन्हा खुर्चीत बसला.
काय चुकलं त्या नगरसेवकाचं? त्याच्या मनात आलं, आपलं शुचित्व सांभाळून तो आपल्याला परमार्थाचा रस्ताच दाखवत होता ना! त्यात त्याचा स्वार्थ साधला जात होता हा अनुषंगिक फायदा फक्त! नामदेवला पुन्हा हसू फुटलं.

आपलं शुचित्व ही काही मिरवण्याची गोष्ट नाहीय, ती आतल्या आत जपण्याची गोष्ट आहे, हे त्याच्यामुळंच आपल्याला जाणवलं. उपकारच आहेत त्याचे त्याच्या मनात आलं. 
'येऊ का आत?' कार्यकर्त्यानं दारातून विचारलं. 
‘तुम्ही परवानगी विचारल्याचं आठवत नाही. आत्ताच का विचारताय?’ नामदेव मोकळेपणानं हसला.
'आणि मघाशी घाईनी गेलो त्याच्यानी तुम्हांला...’
‘तुमचं काम असतं तुम्हांला.’
‘हां, पण आता लागलं रांकीला. रात्री निघणार आपन, उद्या सकाळी डायरेक म्युनिसिपाल्टीत.'
‘बरं झालं. मोकळं होणार तुम्ही.’ 
'समदी वाटावाटी रात्रीच व्हनार. 
तुमचा काय प्रश्न नायी, पन बाकीच्या लोकान् ला...'
‘माझा कसला प्रश्न नाही?’
'हेच, आपलं ते...'
'पैसेच ना? मी घेणार आहे पैसे. मला का नकोत? तुम्ही सगळ्यांना देणार. मला का नाही?’
कार्यकर्ता दचकला. थट्टाच वाटली त्याला.
‘आवो पन; सायेब म्हनले...’ त्यानं जरा प्रयत्न केला.
'ते काहीही म्हणतील. मी घेणार आहे' नामदेव स्पष्ट खणखणीत स्वरात म्हणाला.
'कार्यकर्ता बाहेर पडला अन् अगदी थोड्याच वेळात परतला. मोबाईल हातात होता, तो पुढं करीत म्हणाला, 'सायेब हायेत.'
‘अहो, काय थट्टा लावलीय नामदेवराव?’ आमदार म्हणाले.

‘थट्टा कसली? घेणार आहे मी पैसे.’ 
‘काय बोलताय? तुमच्याविषयी असं...’ 
'तुम्हांला काय वाटतंय याचा विचार मी का करू? मी पैसे घेणार. ते वापरायला माझ्याकडं पुष्कळ जागा आहेत. मी योग्य ठिकाणीच वापरीन ते. आमच्या शाळेतल्या गरीब पोरांना निवारा मिळेल, गार जमिनीवर घाणीत बसून त्यांना रोग होणार नाहीतं. पन्नास हजार ही तुमच्या नजरेत किरकोळ रक्कम. माझ्याकडं योग्य खर्चाला खूप जागा आहेत. मी आमच्या शिक्षकांनासुद्धा देईन काही. तुम्हांला हवी असेल तर देणगीची पावतीसुद्धा देईन मी. आपले उमेदवार निवडून येणारच आहेत. त्यांच्या हस्ते आमच्या नव्या पत्र्याचं, बाकड्यांचं- नव्या शाळेचं उद्घाटनसुद्धा करू आपण. तुम्ही विचारून बघा.'
‘हा अगदीच वेगळा मुद्दा काढलात तुम्ही.’

‘तुम्ही रस्ता दाखवा म्हणालात. तुम्हांला मी तो काय दाखवणार? माझ्यापुरता मी तो शोधलाय.’ नामदेव म्हणाला.
 

Tags: कार्यकर्ते आमदार साने गुरुजी राष्ट्र सेवा दल राममनोहर लोहिया Activists महात्मा गांधी MLA Sane Guruji Rashtra Seva Dal Rammanohar Lohia Mahatma Gandhi weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

रंगनाथ पठारे

मराठी कथालेखक, कादंबरीकार आणि समीक्षक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके