डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

माझ्या एक लक्षात आलं की गांधीजी असे अचानक या संध्याकाळी नदीकाठी समोर आल्यानं मला धक्का  नव्हता बसला. मुळात ते मला माझ्या आतून माझ्यासमोर प्रकट झालेत, असंही वाटलं असेल. आपल्या प्रत्येकात ते तसे थोडेफार असतातच. अर्थात् प्रकट असं समोर मी त्यांना कधीही पाहिलेलं नव्हतं. त्यांच्या जिवंत साजिवंत दिसण्यानं मी गोंधळलो. म्हटलं, “तुम्हांला पुतळ्यात बघायची इतकी सवय झालीय. म्हणजे गांधीजी आपले आहेत बुवा गुपचूप, असं. तशा तसबिरीही असतात पण त्यांच्याकडे तितकं लक्ष जात नाही, वर भिंती कोण कशाला बघतो? त्यापेक्षा समोरचा सरकारी कारकून महत्त्वाचा. त्याच्याकडं निदान काम तरी असतं. तुमचा आता काहीच उपयोग नाही. तुमचा जमाना संपला. तरीही तुम्ही कशासाठी आहात?” 

गांधीजींना खरं तर सव्वाशे वर्ष जगायचं होतं. त्यांनी तसं अनेकदा बोलूनही दाखवलं होतं. पण नथुरामाला ते काही पटलं नाही. गेल्या शतकातल्या अठ्ठेचाळीस सालीच गांधीजींचा खून झाला. त्यांचं ते हे ‘राऽऽम!’, किंवा येशुसारखें ‘ईश्वर त्यांना क्षमा करो. आपण काय करतो हे त्यांना समजत नाही’, अथवा नथुरामाला हात जोडणं किंवा इतक्या सगळ्या घडलेल्या, न घडलेल्या महात्म्यांच्या गोष्टी हे इतकं सगळं प्रसिद्ध आहेच आणि चित्रपट, पुस्तकं, साक्षीपुरावे, मोरारजी देसाईंपासून गोपाळ गोडसेंपर्यंत इतक्या साक्षी. ढळढळीत हजारांनी पाहिले म्हणे गोळ्या झाडताना, तरी कायद्याच्या राज्यात साक्षीपुराव्यांच्या नोंदीचं कायदेशीर महत्त्व असतंच. खेरीज आपल्या जन्मापासून इतके सारे लोक गांधीजींवर भाषणं करतात. त्यांचे पुतळे, तसबिरी हे इतकं पाठ असतं व एकूण आपल्या आयुष्याचा मात्र त्याच्याशी काहीच संबंध नसतो, तेव्हा गांधीजींचं आपल्यात नसणं, किंवा स्पष्टपणे बोलायचं तर त्यांचं मेलेलं असणं आपल्याला इतकं ठाम माहीत असतं की गेल्या अकरा सप्टेंबरला संध्याकाळी साडेसहा वाजता संगमनेरात गंगामाईच्या घाटापल्याड म्हणजे नदीकाठीच त्यांना मी पाकसुरत पाहिलं, तेव्हा तो मला मोठ्ठाच विनोद वाटला. आपलं भासात्मक अस्तित्व दाखवून गांधीजी आपली फिरकी घेताहेत असं वाटलं; किंवा आत्मा अमर असतो, हे आपल्या हिंदू लोकांचं असतंच! त्यातलंच काहीतरी आणि शरीराचं वस्त्र तात्पुरतं पांघरून आलेत बुवा, असंही थोडं मनात आलं. गांधीसारख्या महात्म्याला ईश्वर इतकी तात्पुरती सवलत अगदी सहज देत असेल असा आंतरिक विश्वास मनात कुठंतरी असणार. सगळ्याच गोष्टी काही एकाच वेळी डोक्यात येत नाहीत! मुळात त्या त्या वेळचं सारं वेगळं असतं. शब्दांत सांगताना हस्तक्षेप सुरु होतात. आपली प्रत्येक कृती हा हस्तक्षेप असतो. कशालाही न दुखावता हस्तक्षेप करायला गांधीजी सांगत होते. 

गांधीजींचे अचानक समोर येणं हा असा हळुवार हस्तक्षेप होता. पण त्यात पटण्याजोगं काही नव्हतं. माझ्या जन्माआधीच जो माणूस मेलाय, तो माझ्या आयुष्यात कसा येणार? साधं तर्कशास्त्र आहे. फार ज्ञानाची त्यासाठी गरज नाही. 

अर्थात होते गांधीजीच. मी लगेचच ओळखलं. जन्मापासून म्हणजे माझ्या जन्मापासून त्यांना इतकं सारखं बघत आलोय! हडकुळे शरीर, पंचा, चष्मा, टक्कल, काठी, वैष्णव जण तो तेणे कहिएऽऽ… 

म्हटलं , “कमाल आहे गांधीजी! ही कसली गंमत करताय? पुतळ्यात, फोटोत ठीक आहे.” 
“काहीच नाहीय रेss!” ते म्हणाले “एरवीही मी सव्वाशे वर्षे जगणारच होतो. ते मागच्या पंचाण्णव सालापर्यंत आलंच असतं. त्यात पाच-सहा वर्षे अधिक दिलीस तर काय बिघडेल तुझं? एरवीही आपल्या शरीराच्या डिझाइनपेक्षा आपण जास्त जगतोच.” 
“म्हणजे तुम्ही खरोखरीचे जिवंत होता?”
“होतो म्हणजे? आहे.”
“कशाला आता?” 

“का?” त्यांनी मृदू हसत विचारलं. 
माझ्या एक लक्षात आलं की गांधीजी असे अचानक या संध्याकाळी नदीकाठी समोर आल्यानं मला धक्का  नव्हता बसला. मुळात ते मला माझ्या आतून माझ्यासमोर प्रकट झालेत, असंही वाटलं असेल. आपल्या प्रत्येकात ते तसे थोडेफार असतातच. अर्थात् प्रकट असं समोर मी त्यांना कधीही पाहिलेलं नव्हतं. त्यांच्या जिवंत साजिवंत दिसण्यानं मी गोंधळलो. म्हटलं, “तुम्हांला पुतळ्यात बघायची इतकी सवय झालीय. म्हणजे गांधीजी आपले आहेत बुवा गुपचूप, असं. तशा तसबिरीही असतात पण त्यांच्याकडे तितकं लक्ष जात नाही, वर भिंती कोण कशाला बघतो? त्यापेक्षा समोरचा सरकारी कारकून महत्त्वाचा. त्याच्याकडं निदान काम तरी असतं. तुमचा आता काहीच उपयोग नाही. तुमचा जमाना संपला. तरीही तुम्ही कशासाठी आहात?” 
“कशासाठी आहे हे मी काय सांगू? पण आहे म्हणूनच मला हादरा बसलाय. म्हणूनच बाहेर आलोय.” 
“कशाचा हादरा? सगळं नेहमीचं तर आहे.”
“आसपास बघ, ऐक.” 

हे त्यांचं विधान म्हणजे फारच दार्शनिक वगैरे झालं आणि आता ते अपरिहार्यपणे अदृश्य होणार, अशी अटकळ बांधून मी डोळे मिटले. जरा वेळानं ते उघडले तर गांधीजी तिथेच, तसेच.म्हणजे गांधीजी खरेच होते तर! आता मात्र हद्द झाली होती.
वस्तुस्थिती नावाच्या कल्पनेची विधासार्हताच धोक्यात आली. याला काय म्हणायचं? 

“आता तुम्हांला आणि मला, अस दोघांनाही चिमटा घेऊन पाहिलं पाहिजे.” मी स्वतःला करत असलेली सूचना प्रकट केली. 
“कशाला? या नदीतलं पाणीच माझ्या अंगावर उडव.” ते म्हणाले, “भूत-पिशाच्च पाण्याला भितात, त्यापासून पळतात असं आपण मानतो ना!”

नदीकाठाची संध्याकाळ, पावणेसात वाजायला आले होते. साडेसहालाच कच्चा अंधार सुरू झालेला होता. झाडांची दाटी, देवळं, पाण्याचा गारवा यातून तो आणखी जाणवत होता. पाणी अजूनही जरासं चमकत होतं. मला हे पाणी फार आवडतं. आपल्या मनात चमकलं की बाहेरही ते लगेच चमकतं. किंवा मला ही नदीच फार आवडते. इतकं आवडावं असं आणखी इथं काहीही नाही. वाहती नदी, चमकती वाळू, चांदण्या रंगाच्या मासोळ्या, दूरवरची गाणी, पक्ष्यांच्या झाडांवरील निवाऱ्यासाठीच्या हालचाली.... खरं म्हणजे यातले काहीही असो-नसो; ही नदी असली की असलं काहीतरी असेलच. हे नसेल तर ते आपल्या आतल्या चैतन्याचे स्वप्नात पाहावं तसं खचित काहीतरी मला इथं दिसत असेल. किंवा इथं आहे ते माझ्या आत आहे असं मला वाटत असेल, आणि आपल्यातले गांधीजीच जिथं आपल्यासमोर येत असतील, तितकी आपल्याला आवडणारी जागा आणखी कोणती असणार? 

“उडवतोस ना पाणी?” त्यांनी पुन्हा सुचवलं.
“नको. असू द्यात. तुम्ही आता इतके आहातच तर असा. तुम्ही काही मला नकोसे झालेले नाही आहात. तरीही तुम्ही असणार कुठून, हेही मला वाटतंच. तुम्ही मला आपलं वाटतं म्हणून आहात आणि दिसताय, तर ठीक आहे." मी शांतपणे म्हणालो. 
"हे जरा जास्त ठीक." 
"कसं काय?" 
“आपल्याला ज्याचं असणं जाणवतं त्याला आपल्या जाणवण्यानंच अर्थ येतो, आकार येतो. जाणवणं महत्त्वाचं. त्यातूनच सगळं उगवतं.”
“जे अस्तित्वातच नाहीय हे आपल्याला माहीताये; त्याला, त्याच्या असण्याला कुठून अर्थ येणार?” “अस्तित्वात नसण्याचं गृहीतक तपास, त्याचा पुनर्विचार करून बघ.” 

“म्हणजे? तुम्ही आता दिसताय, तर तुम्ही मेलेलेच नाही आहात, असं स्वतःला सांगू? माझ्या जन्माआधीपासूनच्या सगळ्या ढळढळीत सत्यांना नाकारू? तुम्ही तर त्रेपन्न वर्षांपूर्वीच.... तुमचा खून झाला. नथुराम गोडसे -”
“तरीही इतक्या लवकर संपणाऱ्यातला मी आहे असे तुला वाटतं? तुलाही वाटतं?” गांधीजींचा व्यथित स्वर. माझ्या मनाच्या आतून आल्याइतका व्यथित. 
“नाही नाही. तसं नाही वाटत. तुम्ही आहातच.” मी घाईघाईने म्हणालो, “तरीही असे साक्षात समोर, हे पटत नाही. भास, प्रेम हीच भावना जास्ती मनात येते.” 
“एखादा माणूस उरतो अनेकांच्या असण्यात.” गांधीजी अपराधी चेहऱ्यानं म्हणाले आणि थबकले. पण मग त्यांचा चेहरा थोडा उजळलासुद्धा. काहीतरी सुचलं असावं. “प्रत्येकजण उरतोच रे.” ते म्हणाले, “मुलंबाळं, नातवंड, पतवंड, इतके जेनेटिक प्रवाह असतात.” 

“तुम्हांला हे म्हणायचं नाहीय, गांधीजी.” मी त्यांना अडवलं. 
“इतकं काही नम्र व्हायचं तुम्ही कारण नाही. तुम्ही दुनियाभर करोडोंमध्ये उरलेले आहात. पिढयांनपिढ्या उरणार आहात. आणि किती दूरवरच्या आपल्या संस्कृतीतल्या भलेपणाशी, साधेपणाशी तुम्ही आम्हाला जोडून दिलंत, तो काहीच प्रश्न नाही. ते मनात असतंच कायम. पण मनातल्या तुमच्या अशा असण्याला काही आकार धारण करता येतो, हे तर्कानं स्वतःला नाही पटवता येत. इतकंचं मला म्हणायचंय.”
“तर्काबिकाचं सोड. दुनिया त्याच्या पल्याड निघालीय. अगदी आजचीच गोष्ट घे. महणजे आत्ता याक्षणीही मला ऐकू येतंय." 
"काय?" 
"बघ. ऐक."
“गांधीजी! एवढं सगळं इतकं स्वच्छ सांगताय तर हे 'बघ, ऐक’ काय लावलंय? नीट सांगा की” मी म्हणालो, “इथं तर छान नदीकाठ, गारवा, गवताच्या वासाची रात्र आणि तुम्हीसुद्धा आहात. तर्कापल्याडचे फक्त तुम्ही आहात बुवा. पण ते ठीक आहे.”
"हा नदीकाठ म्हणजे दुनिया नाही. आता जग किती छोटं झालंय." 
"ते झालय. पण असं काय झालंय ते, तर्कापल्याडचं असं? मी इथं येईपर्यंत तरी ठीक होती दुनिया.” 
“असं तुला वाटतंय.”
“आणि तुम्ही?” 
“मी म्हणतोय तेही मला वाटतच असेल.” 
“गांधीजी तुम्ही कोड्यात बोलणारे नव्हता कधीच-” 
“ठीक आहे. आहे हे असं आहे. मी निघतो आता.” 

“म्हणजे, अदृश्य होताय?” 
“तसं म्हण.” 
“म्हणजे, तुम्ही नाही आहात.”
“का बरं? असतो तोच अदृश्य होऊ शकतो ना! नसेल तो अदृश्य कसा होईल? दृश्य असणाऱ्यालाच अदृश्य होता येतं.”
“छे छे! गांधीजी, तुम्ही आता जास्ती हुषार झालात. तर्काचा इतका कूट ही काही तुमची खासियत नव्हती कधीच. तुमचा तर साध्या साध्या छोट्या छोट्या गोष्टींवर भर. आणि तर्कापेक्षा ते आतून वाटणं वगैरे हे तुम्ही महत्त्वाचं मानायचं...” 
“या गुंतागुंतीच्या दुनियेत टिकाव धरायचा तर असं बदलावं लागतंच बाबा!” ते म्हणाले, “आणि आपली खासियत वगैरे असं काही नसतंय. सोय बघायची. मुळात प्रवृत्ती विवेकाची पाहिजे, बाकी होतं ते. असू दे. तूर्तास मी जातोय. पण मी आहे. माझ्या असण्यावर भरवसा ठेव.”

आपल्याला परिचित झपझप चालीनं गांधीजी नदीकाठानं चालत गेले. त्यांची कोणतीही डॉक्युमेंट्री पाहताना जसे आपण स्थिर राहतो तसा मी तिथे उभा राहिलो. त्यांच्यापाठी जाण्यात मतलब नव्हता. एकशेबत्तीस वर्षे वयाच्या त्या म्हाताऱ्याला उगी पळायला लागलं असतं. खेरीज त्यात दमला असतो मीच हेही मनात असेलच आणि त्याहीपेक्षा मुळातच हा सारा भ्रमाचा भोपळा आहे, हे मला कळत होतं ना! पण तो सुखाचा असल्यानं तो फुटणार नाही याची मनात काळजी घेत सावकाश चालीनं मी घरी निघालो. 

‘अमेरिकेवर हल्ला झालाय.’ असं रस्त्यात कोणीतरी कोणाला तरी म्हणाल्याचं मी ऐकलं. हसायला आलं, अर्थातच. अमेरिकेवर आज कोण हल्ला करणार? या दुनियेत तशी हिंमत कोण करू शकतो? अमेरिका सर्वशक्तिमान. सगळी दुनिया व्यापून उरलेली ऑम्नीपोटेंट, ऑम्नीप्रेझेंट-ती ईश्वराइतकी शक्तिशाली. तिच्यावर कोण हल्ला करणार? झालं असेल काहीतरी किरकोळ. लोक त्याला तसं म्हणतात तेव्हा ते स्वतःचं समाधान शोधतात. अमेरिकेवर हल्ला! दुबळ्यांना या प्रकारच्या शब्दप्रयोगातूनदेखील पुष्कळ ऊब मिळते! दुबळ्यांच्या जगण्याला अर्थ देणारं दुबळं बळ मिळतं. दुसरं काय? 

घरी आलो. पाहिलं. पुन्हापुन्हा पाहिलं. वर्ल्ड ट्रेड सेंटर, पेंटॅगॉन. अजस्त्र कोसळणं. धूर, माणसांच्या जीव वाचवू पाहणाऱ्या निरर्थक उड्या. अमेरिका जगातील सगळ्यांत शक्तिशाली व्यवस्था, तिच्या हृदयावर, वर्मी घाव बसत असतानाचे लाईव शूटिंग तर्कापल्याडचं होतं. खरंच तर्कापल्याडचं होतं. आणि जे तर्कापल्याड असतं ते मुळातच किती सहज आणि सोपं असतं! किंवा ते इतकं सहज असतं, सोपं असतं म्हणूनच ते तर्काच्या तावडीतून निसटतं आणि सहज पल्याड जाऊन बसतं! विचारांच्या व्यूहाला बोगदे पडतात. त्यातून नाजूक वाटा पल्याड जातात, ज्यांना आपण विसरलेलोच असतो. पेट्रोलनं पूर्ण टाक्या भरून असलेली विमाने थेट शंभर इमल्यांच्या कर्तबगारीच्या दिमाखांवर. बॉम्ब वगैरे. बाकी इतका खर्च आणि त्याचा ताप, या भानगडीच नाहीत. दुनियेतल्या सगळ्यांत गजबजलेल्या धमन्यांवर धमाका. इतकी जबरदस्त लक्षवेधी कृती आधी कोणीही कधी केलेली नसेल! 

सारी दुनिया हादरली, तसाच मीही हादरलो. माणसांच्या मरण्याचं दुःख. प्रचंड हाहाकार, वाताहत, सारखं समोर दिसत होतं. किमान पन्नास हजार निरपराध माणसं- कमी असतील वा जास्ती. माणसांनी माणसांना मारलं. एकमेकांची ओळख नसताना, एकमेकांशी भांडणं नसताना.

पण हादरण्यात एवढंच नव्हतं काही. दुनियेत अनेकदा याच्यापेक्षा कितीतरी जास्त माणसं मेलीत. त्यांची कैक वाताहत आपण पाहिलेली, अगदी परवाच्या आपल्या कच्छच्या भूकंपातही. त्यामुळं माणसांच्या मृत्यूबाबत आपण पुष्कळ सराईत आणि निब्बर झालेले असतो. सगळे लाईव्ह घरात बसून बघायची सोय अमेरिकेनंच दुनियेत आणली. त्यांनी इराकवर हल्ले केले तेव्हा सीएनएननं चोवीस तास असे अनेक दिवस घराघरांत पोहोचवले. 

हादरा कसला होता? त्या क्षणी ते लगेच नाही कळत. बधिर होतं थोडा वेळ. भानावर आले थोडे, की सांगता येतं. उदाहरणार्थ, दुनियेचं आता काय होणार? युद्ध पेटणार? कोणाच्या विरुद्ध कोण? असं काही. पण इतकंच नाही, हे सगळं पाहताना अगदी पॅलेस्टाईनमधल्या लोकांइतकं रस्त्यावर येऊन नाचावं असं नाही वाटलं, तरी मनात जरा बरंच वाटलं! कोणी का होईना, अमेरिकेला असा दणका दिलाय याचा सुप्त आनंद, समोर इतकी माणसे सैरावैरा फोलकट झालेली पाहताना हा सुप्त आनंद? 

नंतर थोडं कुतूहल. आता युद्ध होणार. बुशमहाशय म्हणाले, हे युद्ध आहे. नंतर ते म्हणाले, नाही; हे धर्मयुद्ध आहे. आणखी नंतर त्यांच्या लक्षात आलं की हे जमणारं नाहीये. तेव्हा ते म्हणाले, हे युद्ध आहे. दीर्घकाळ चालणारं, माणुसकीच्या शत्रूंविरुद्ध थेट न दिसणाऱ्या शत्रूंविरुद्ध. मग जगभरच्या हालचाली. नेत्यांच्या गाठीभेटी विचारविनिमय, गर्जना. घोषणा. तापणारी हवा. हे घ्या आणि ते द्या. पाकिस्तानची दुःस्थिती, अंकित देशाची दुर्दशा. व्लादिमीर पुतिनचा चेचेन्या तर चिन्यांचा सिकियांग, कश्मीर तोडून भारत आणि पाकिस्तान. ओसामा बिन लादेन, मुल्ला ओमर, तालिबान, दुर्दशा झालेल्या देशात खंडहर कंदाहर आणि अमेरिकेचा पोलादी विळखा. आरमारी जहाज, विमानवेधी तोफा, ब्रिटिश नौदलाच्या कवायती. अणुशक्तीवरच्या पाणबुड्या. शस्त्राचे  तळ आणि माऱ्याच्या दिशा. 

या दुनियेला झालं काय? ही कोणत्या अंताची सुरुवात? हे संपणारं युद्ध आहे असे अमेरिकेला वाटतंय? किती माणसांना टिपणार? माणसं मारून काय संपणार? दुबळ्याला दुबळ करीत, त्याला टाचेखाली तुडवूनही विसरून जाता येतं, ताकद असते त्याला. दुबळा काय प्रतिकार करणार? प्रतिकाराचे सारे रस्ते कापलेले. आकाशात संरक्षणाचे छत्र तिन्हीत्रिकाल. दिगंतापार करडी नजर तिन्ही त्रिकाळ. आणि अचानक हे झालंय. शक्तिमानाची भळमळती जखम. बेचिराखीचा चिखल. या दुनियेला न जुमानणाऱ्या जनतेच्या दुःखाची प्रतिक्रिया आता काय होणार? बुशमहाशय किती हल्ला करणार? किती काळ आणि कोणाकोणावर? कोणत्या प्रकारचं आणि कशाशी युद्ध केले पाहिजे त्यांनी? आज गांधीजी असते तर त्यांनी काही सांगितलं तरी असतं. ती शक्यता अर्थातच नव्हती. 

गांधीजी काही वारंवार जन्माला नाहीत येत. सारखीसारखी त्यांच्या असण्याची अपेक्षा करण्यात दुनियेचं दुबळेपणसुद्धा आहे. कशाला पाहिजेत लगेच? एकदा होऊन गेलेत ना! आत्ता आत्ता तर होते. ठेवायचे साठवून. निदान काही पिढ्या तरी माणूस उरतोच कोणताही, थोडा का होईना. गांधीजींची गरज असेल तर उरवा त्यांना किंवा आज वाटत असेल तर काढा मनातून बाहेर आणि जा सामोरे! 

हे असं म्हणायला ठीक असतं. प्रत्यक्षात असं कोणी करीत नाही. किंवा ते होत नाही. गांधीजी मनात समजा असतात. म्हणजे, असतातच. पण त्यांना बाहेर काढून उभं करणं आपल्या हाती कुठे असतं? त्यांच्या आपल्या आत असण्यावर आपला तितका ताबा कुठं असतो? आणि असला तरी प्रत्यक्षात मेलेल्या आणि मनात आपल्या उरलेल्या माणसाला बाहेर काढायचं, हे मुळात कल्पनेच्या पातळीवरच असतं. म्हणूनच हे असं म्हणायला ठीक असतं. प्रत्यक्षात असं काही करता येत नाही. 

मग काय करता येतं? या दुनियेत माणसाला आता फक्त पाहता येतं. ऐकता येतं. स्पर्श, वास, चव; ठीक आहे- सारं करता येतं. पण ताबा कशावरच नसतो. युद्ध होतंय ना? बघा. अगदी लाईव्ह बघा. ताबा? कल्पनाही आऊट ऑफ क्वेश्चन. ही दुनियाही इतक्या प्रकारच्या जाळ्यांची स्पंदनशील व्यवस्था. तिथे कशाचाच कशावरही ताबा नसतो. अमेरिकेला वाटतं, आपला आहे, आपण केंद्र. आता तिच्या भ्रमाचा भोपळा फुटलाय. या फुटण्याची वेदना हे अमेरिकेचं दुःख आहे. या व्हायब्रेटिंग नेटवर्कच्या दुनियेत केंद्र, केंद्रगामी प्रेरणा या गोष्टी भाबड्या आहेत बाबा! विश्वाला काही केंद्र असतं का कुठं? व्हायब्रेटिंग नेटवर्कच आहे ना! सारं एकमेकांसाठी, एकमेकांविरुद्ध. पूरक आणि मारक. म्हणूनच कारक. 

एक क्षुल्लक माणूस म्हणून आपल्याला काय करता येतं? आपल्याला साऱ्या चॅनल्सवर सारं बघता येतं. बघत राहायचं, आंधळ्या धृतराष्ट्राला संजय बसल्याजागी भारतीय युद्धाचा क्षणोक्षणीचा अहवाल देत होताच ना! हा संजय केवढं विराट रूप धारण करील, आणि धृतराष्ट्राचा रोलही किती सहज येता जाता लोकांना करता येईल हे व्यासमुनीला माहीत असेल? किंवा आपण लिहिलेलं महाकाव्य पिढ्यानपिढ्या पुन्हा पुन्हा घडत राहणं, हाच 

पृथ्वीवरच्या मानवी वसाहतीच्या जगण्याचा सारांश आहे हे त्यांना जाणवलं असेल?... असो वा नसो. दुनियेतल्या लक्षावधी म्हणा वा कोट्यावधी माणसांसारखा मी चॅनलमागून चैनेल युद्धाचा ज्वर बघत होतो. समोरच्या बारक्या पडद्यावर बदलती हवा. काबूल, कराची, न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, सारं तिथं सारखं दिमतीला. हात उंचावून जॉर्ज बुश आणि भेदरलेला मुशर्रफ, पेन्टंगॉनचा चुराडा आणि हडसनकाठी चिखल. अव्याहत काम करणारी माणसं. झेंडे. जेवण. मुलाखती. खेरीज भूतकाळ, वर्तमानकाळ. सततचा जळणारा टॉवर आणि विमानाची पोटात धडक, सालोमन टॉवरची बसकण आणि उठलेला धुळीचा लोट; त्याचा डोंगर. यांच्यावर सुपर इंपोज्ड वर्तमान सुटकेचं अथक कार्य. या साऱ्यात पारदर्शक काचेइतक्या सहज प्रकट होऊन हळूहळू गांधीजी आकार धारण करत गेले आणि शोधकार्य वा सुटकेचं कार्य चाललं होतं. तिथे दिसले तेव्हा मात्र मला खरोखरीच धक्का बसला.

आता दूरदर्शनच्या पडद्यात, म्हणजे आख्खी दुनिया त्यांना पाहत असणार लाईव्ह, त्याहीपेक्षा भयानक म्हणजे गांधीजी तिथे दोन्ही पायांवर बसून हात पुढे करून चोळत, शेकत होते. वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या आगीचा, नंतरच्या अव्याहत निखाऱ्याचा, हा असा उपयोग आणखी कोणालाही सुचला नसेल!
“गांधीजी तुम्ही हे काय करताय?” न राहवून मी ओरडलो. 
“भयंकर थंडी वाजतेय रे. हुडहुडी भरलीय.”  
“म्हणून काय माणसांच्या चरबीच्या जाळावर शेकताय? सारी दुनिया बघत्येय.” 

“ओरडू नकोस बाबा, ऊब पाहिजे असेल तर काय जळतंय याचा कोण विचार करणार?” 
फारच भयंकर होतं! साऱ्या दुनियेच्या डोळ्यांसमोर प्रत्यक्ष पडद्यावर गांधीजी शेकत होते. दुर्दैवी मृतांच्या सरणावर. तांत्रिकासारखे. आणि त्याच पद्धतीनं त्यांनी तिथून भाजक्या मांसाचा एखादा तुकडा उचलून तोंडात टाकला तर? मनात आलं आणि आणखी हादरलो. त्यांच्या मरणानंतर त्यांच्या प्रतिमेचं या दर्जाचं भंजन आणखी कोणीही केलं नसेल! का करताहेत? 
“गांधीजी, गेले काही दिवस मला तुमची सारखी आठवण होत्येय. माझ्या मनातून उठून असे तुम्ही माझ्यासमोर येता; त्याची विद्या मला अवगत झालीय हे कोणाला सांगितलं तर वेडच काढतील मला. अर्थात मी थोडासा तसा आहे हे मला माहितीये. म्हणूनच तुमचा आत्मा मला असा सहज पकडत असेल. तुमचा मला काहीच ताप होत नाही.. तुम्ही पडद्यावर आणखी कोणाला दिसत नाही आहात, हे आता मला कळलंय. ते फारच भयंकर गिधाडांसारखं किंवा पालीला खाणाऱ्या अळ्यांसारखं होईल...” मी सारखा बोलत होतो. 

“गिधाडं चांगली असतात. त्यांना दिलेले काम कोणतीही किळस न बाळगता कसोशीनं करतात. ती कोणावरही हल्ला करीत नाहीत,” 
“खरंय, खरंय पण मला असं सांगा; आता दुनियेचं काय होणार?” मी विचारले. 

बाकीचं सारं मी गांधीजींना त्या शेकापुढ्न हटवण्यासाठी बोलत होतो आणि ते दिसल्याबरोबर खरं तर हाच प्रश्न त्यांना विचारायचं माझ्या मनात आलं होतं. 
“पालीला खाणाऱ्या अळ्यांचं काय म्हणालास?” त्यांनी मलाच उलट विचारलं.
 
एकदा अशीच घरात मी पाल मारली होती. म्हणजे मी नाही, ती आपोआप द्वार बंद करताना सापटीत अडकून मेली होती. त्याचंही अर्थात् काही नाही, पण एकदा असाच बायरूममध्ये इतका घाणेराडा वास सुरू झाला, की त्याचे काय करायचं ते सुचेना. म्हणजे, काहीतरी मेलंय, सड़तंय हे वासातून कळायचं आणि दिसायचं तर काहीच नाही असं भयंकर. मग तिथ डेटॉल वगैरे नेहमीचं टाकून साफ करून घेतलं. नंतर डिओड्रंट वगैरे. तात्पुरतं बरं वाटायचं पण नंतर वास कायम; उलट अधिक क्रूर आणि नाकातून थेट डोक्यात घुसणारा. वैतागून असाच इकडंतिकडं शोधत होतो, तिथं विजेच्या बारक्या प्लायवुडच्या बेडखाली अगदी बारीक शेपूट दिसलं. मग स्क्रूड्रायव्हरनं बोर्ड ढिला केला तेव्हा वास प्रचंड वाढला आणि अचानक सारी पालच खाली पडली, तर पाल म्हणून तिच्यात फक्त कातडी आणि आपले उरलेले ओलसर शरीरकण आणि इतक्या पुष्ट सुरक्षित अळ्या पालीच्या मृत मांसाला खाण्यात दंग होत्या की त्यांना असं हलवल्यामुळे त्या भयानक चकित झालेल्या दिसल्या. उकिरड्यात अळ्या होतात त्या प्रकारच्या या अळ्यांनी मेलेल्या पालीचा फन्ना उडवला होता. 

हे सारं मी गांधीजींना सांगितलं. 
“निसर्ग काहीच वाया जाऊ देत नाही. याच्यातून ते त्याच्यातून आणखी तिसरं असं सारखं चालू असतं.” गांधीजींनी तात्पर्य काढलं. 
“आता दुनियेचं काय होणार?” मी पुन्हा विचारले. गांधीजी हसले. त्यांचं ते गोड सुप्रसिद्ध हसणं. आपण प्रत्यक्षात न पाहिलेले तरीही आपल्याला परिचित.
“मी तुला कोणी भविष्यवेत्ता वाटलो की काय? आणि भविष्य कळत असतं तर मी मेलोच कशाला असतो? मला तर आणखी जगायचं होतं.” 

“पण तुम्ही तर आपलं भविष्य समोर दिसत असतानाही जाणीवपूर्वक त्याला सामोरे गेलात; असं ऐकलंय मी. तुमचा खून होण्याची शक्यता आहे. असं अनेकांनी तुम्हाला सांगितलं. पण तुम्ही नेहमीसारखे सरळ वागत राहिलात, खरं काय आहे? अर्थात् त्यात मला आता तितका रस नाहीय. पण तुम्ही आज आला आहातच, तर तुम्हाला काय वाटतं हे सांगा की! म्हणजे दुनियेचं काय होईल असं?” मी पुन्हा मुद्यावर आलो. 

“मला काय वाटतं, यापेक्षाही मला काय व्हावंसं वाटतं, याला मी महत्त्व देतो.” 
“काय व्हावंसं वाटतं?”
“अर्थात् युद्ध होऊ नये असं. आज तरी दीर्घकाळ चालणाऱ्या युद्धाच्या दिशेनं दुनिया निघालीय.” 
“तिला कोण कुठं थांबवणार?” 
“कोणी तरी समझदार माणूस निघेल. अमेरिकनच असेल. त्याला दूरचं पाहता येईल. असं कोणीतरी असेलच. नसेल तर तयार होईल. संयमानं वागणं अमेरिकेसाठी फार आवश्यक आहे." 
“दहशतवाद्यांनीसुद्धा याचा विचार करायला पाहिजे होता.” 
“अमेरिकेनं तो जास्ती करायला हवा. सर्वांत जास्ती शक्तिशाली असणाऱ्यानं सर्वांत जास्त जबाबदारीनं वागायला हवं.” 
“असं कसं होईल गांधीजी? बाकीच्यांनी त्याचे मणके ढिले करायचे आणि त्यानं मात्र संयम पाळायचा. तुमचं आपलं काहीतरीच असतं! कोणालाच पटणार नाहीय! अमेरिकेत सारे युद्धाच्या गोष्टी बोलताहेत. पूर्वीही तुम्ही म्हणे, ब्रिटनला सांगितलं होतं, जर्मनांना कितीही बाँबवर्षाव करू देत, ब्रिटिशांनी त्याचा अहिंसेच्या मार्गानं प्रतिकार करावा. माणसांच्या आंतरिक बळाला कोणतेही बाँब संपवू शकत नाहीत....”
 
“आजही मी तेच सांगेन.”
 “कोणाला? आणि  बॉम्बमुळे माणसं मरतात, गांधीजी. आता तर फार शक्तिशाली अस्त्र आहेत. मेल्यावर कुठलं आंतरिक बळ उरणार? उरले तरी त्याचा काय उपयोग?” 
“मी समूहाच्या ऊर्मीसंबंधी, ऊर्जेसंबंधी बोलत होतो. कोणत्याही समूहाची आंतरिक ऊर्जा, भावनिक ताकद संपवता येत नाही, ती त्यांना दिसली तर. माझं म्हणणं आजही कायम आहे.”
“अमेरिकेनं काय करायचं?” 

“अमेरिकेनं स्वतःशी खूप विचार करायला हवा. तिनं तात्पुरते, अर्धवट व स्वतःपुरते निर्णय टाळले पाहिजेत. मुळात त्यांनी दुनियेकडं भयंकर दुर्लक्ष केलंय, तात्पुरत्या फायद्यांसाठी प्यादी म्हणून माणसं उभी केली. ती डोईजड झाली की त्यांना संपवायचं. त्यासाठी आणखी कोणाला तरी उभं करायचं. हे सगळे कुठंच थांबत नाही. थांबवता येत नाही. अमेरिकेने दुनियेला, इतर गरीब देशांना तिथल्या माणसांना माणसांसारखं वागवलं पाहिजे. त्यांना आपल्या उपयोगाच्या वस्तू म्हणून वागवता कामाचे नाही. सगळ्यांच्या किमान गरजा भागतील अशी दुनिया निर्माण करणं अमेरिकेच्या फायद्याचे आहे. दुनिया असली तरच अमेरिकेचं असणं, सुखकारक जगणं उरेल. माणसांच्या स्वाभिमानाला दुखवून कोणालाही, कोणत्याही समुहाला सुखानं जगता येणार नाही. माणसं दहशतवादी होतात. स्वतःच्या जिण्याला क:पदार्थ मानून हल्ले करतात. हे काय आहे? का होतंय? दहशतवादी लक्ष वेधून घेण्यासाठीच काही करत असतात. ते मोठ्यांदा ओरडून आपल्याला सांगतात माझा हा हा प्रॉब्लेम आहे. माझ्याकडे लक्ष द्या. नुसता फायदा-तोटा असं माणसांच्या व्यवहारात पुरत नाही. दहशतवादी माणसाच्या प्रतिष्ठेची मागणी करतो. त्यासाठी स्वतःचा बळी देतो. बाकी निरपराध माणसांना मारतो. त्याचा रस्ता चुकीचाच आहे. पण तो तसा का होतो? याचा विचार अमेरिकेनं सगळ्यात जास्त केला पाहिजे. दहशतवाद्यांचा भावनिक मुद्दा महत्त्वाचा आहे. त्यांना मारून दहशतवाद संपवता यायचा नाही.”
“मग?”
“माणसांना दहशतवादी व्हायला लागू नये अशी परिस्थिती निर्माण करायची.” 
“म्हणजे काय करायचं?” 
“माणसांना माणसांसारखं वागवायचं.”

“हे फार लांब पल्ल्याचे झाले. त्यांचा प्रश्न आजचा; आत्ताचा आहे.” 
“मी म्हणतोय ते आजचं, आत्ताचं आणि लांब पल्ल्याचं असं सगळं आहे.” 
“पण इतकं असं माणसाशी माणसासारखं वागणं- तुम्ही म्हणता ते; आज कोणालाच शक्य नाही. सगळं खूप बदललंय. आता कोणाचंच आतडं कोणासाठी तितकं तुटत नाहीय.” 
“मग माणसाचं माणूस म्हणून काहीच उरणार नाही.” 
“मग होईल काय?” 
“पुन्हा तू मला भविष्यकथन करायला सांगतोहेस.” 
“तुमच्यासारख्या महात्म्याला काय दिसतंय, याचं कुतूहल.” 
“माणसाच्या पाहण्याला ईश्वरानं मर्यादा घातलेल्या आहेत.”
“त्या मर्यादेत?” 

“त्या मर्यादित तर मी कधीचाच मारला गेलोय.” गांधीजी पडद्यातून हसले. ते उठून उबदार उभे राहिले तर त्यांच्यापाठी चिखल, गरम हवा, यंत्रे, माणसे इतकं सारं; आणि तेही पारदर्शक, अपारदर्शक असे मधले झाले. '
“आता निघायच्या बेतात दिसताय.” मी म्हणालो. 
“ह्या वेळेला तू माझं असणं स्वीकारलंस, हे बरं झालं.” 
“'मला माझ्याच असण्यासंबंधी संभ्रम आहे.”
“काही नाही रे! आपण आपलं असणं, नातीगोती, संबंध, आपला भूतकाळ अशासकटच असतो. त्यात कोणाचं कशाचं प्रमाण किती, कोणाला मान्यता किती, याच्यावर आपले बरंवाईट असणं असतं. माणसांची भाषा, संस्कृती, मूल्यं हे सगळे तरी काय असतं? अशीच सगळी माणसं असतात, खुणा ठेवून वाहात आलेली पिढयान् पिढ्या. त्यातली एक खूण मीही. मग मी नसेन कसा?”

“बाकी कोणाला कसं दिसत नाही?” “
“दिसतं दिसतं. प्रत्येकाला दिसतं. प्रत्येकाची नजर वेगळी. उजेड वेगळा. प्रत्येकाचं पाहणं वेगळं. असं अनेकांचं पाहणं एकत्र आलं की समझदारीचा मोठा उजेड प्रकट होतो. तो संस्कृतीचा उजेड. त्यात गांधी वगैरे निमित्तच फक्त. नगण्य म्हण हवं तर.” 
“गांधीजी, नथुरामनं फार चांगली गोष्ट केली. तुम्हांला मारलं. तुमचं असं तत्त्वज्ञ असणं कोणाला फारसं पटलं नसतं.” 
“तुला असं वाटतंय खरंच?" 
“तुम्ही म्हणता ते पटतं. ते मला माझंच म्हणणं वाटतं. तो काही प्रश्न नाही-”
“मग?” संपलं की. हेच उरणं. बुद्ध महावीरांपासून सगळेच असतात आपल्यात. कमी-अधिक प्रमाणात. वेगवेगळ्या प्रकारानं. अमेरिकेतसुद्धा असतील. नावापेक्षाही सत्प्रवृत्तीची प्रतीकं म्हणून. त्यांच्या असण्याचा उजेड आज सगळ्यांत जास्ती आवश्यक.”
“त्यासाठी काय करायचं?”
“भेटायचं. बोलायचं.” 
“पण तुमच्यातली ऊर्जा तर फिकट झाली. तुम्ही पारदर्शक होताय-“ 

“ऊब कमी झालीय. ती घेतली पाहिजे. कलिंगाच्या युद्धात अशोकाला ती मिळाली म्हणूनच ना बदल झाला त्याच्यात! आपण इतिहासातून शिकलं पाहिजे. हिंसेच्या आधीच उब घेतली पाहिजे. अपघातानं हिंसा झाली, तरीही उब घेतली पाहिजे. अहिंसेचं बळ त्यातूनच मिळणार ना!” गांधीजी आणखी पारदर्शक होत म्हणाले, “मी आहेय. मी आहेय हे तुला पटतंय ना?” 

“हो हो.” मी खुळ्यासारखा म्हणालो, पण पटकन् माझ्या मनात आलं, मला पटून काय उपयोग? आणि माझ्यासारख्या नगण्य माणसाला ते कळून काय उपयोग? हे बुशमहाशयांना पटलं पाहिजे. सद्दाम हुसेन, ओसामा बिन लादेन, परवेज मुशर्रफ, मुझा ओमर इजिप्तमधला कोण तो डॉक्टर आणि टोनी ब्लेअर, कॉलिन पॉवेल अशा माणसांना ते पटलं पाहिजे. गांधीजी त्यांच्यासमोर का नाही प्रकट होत? 

हे सगळं विचारण्यासाठी समोर थांबण्याइतके गांधीजी खुळे थोडेच होते? आणि मलाही कुठं नेट धरता येतोय? माझ्या आतूनच ते आले होते; तर मी त्यांना आणखी कुठ थांबवू शकलो? गांधीजींचे आपल्यात असणं जसं आपल्या हाती नसतं तसंच त्यांचं येणं-जाणंही! हे सगळे लोक भ्रमिष्ट झाले पाहिजेत आणि गांधीजी त्यांना दिसले पाहिजेत. मी मनातल्या मनात म्हणालो, आणि खुळ्यासारखा स्वतःशी हसलो. दुनियेच्या वर्तमानाची प्रश्नचिन्हें माझ्याभोवती लपेटून आली होती. त्यांच्या घोंघावत्या गोंगाटातलं नगण्य असण इतकंच उरलं. तरीही आश्वासन होतंच की गांधीजी असतीलच कुठंतरी. दबा धरून बसलेले, दडी मारून आत.
 

Tags: परवेज मुशर्रफ दहशतवाद हल्ले बॉम्ब अमेरिका नथुराम गांधीजी रंगनाथ पठारे parwej musharaf dahashtwad halle bomb amerika nathuram gandhiji rangnath pathare weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

रंगनाथ पठारे

मराठी कथालेखक, कादंबरीकार आणि समीक्षक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके