डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

साने गुरुजींचे कथालेखन (विशेषांक)

ज्या फडके, खांडेकर, माडखोलकर अथवा त्यांच्या समर्थकांनी गुरुजींवर अगदी निर्दयतेने एकसुरीपणाची टीका केली, त्यांच्या लेखनात वेगळे असे काय होते? फडके यांची तीच प्रणयवर्णने, खांडेकरांचा स्वप्नाळू आदर्शवाद आणि बेगडी समाजवादाच्या आवरणाखाली कामुक गोष्टी सांगणारे माडखोलकर. या उलट साने गुरुजी नैतिक आदर्शाचा काही एक ठोस नमुना, आकार शोधत अत्यंत उत्कटपणे मराठी समाजावर काही संस्कार करण्याचा प्रयत्न करत होते.

साने गुरुजींच्या लेखनात कथा आणि कादंबरी असा फरक करता येत नाही. वाङ्मयीन आकृतिबंध म्हणूनही नाही आणि एकुणातच त्यांचे सारे लेखन एकमेकांशी खूप जोडलेले आहे. उदाहरणार्थ, 'आपण सारे भाऊ', 'दीनबंधू’ आणि 'नया प्रयोग' या कथा व कादंबऱ्यांतून त्यांनी एकाच प्रकारचे स्वप्न पाहिलेले आहे व ते मांडण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न केलेला आहे. वरवरचे काही तपशील सोडले तर नवा भारत कसा असावा, माणसांनी माणसांशी कसे वागावे, यांसंबंधीचे त्याचे स्वप्न या तिन्हींत कमीअधिक फरकाने प्रतीत झालेले दिसते. हे स्वप्न काहीसे भाबडे आहे हे खरेच, पण त्या काळात इतर लिहिणारे असंख्य लेखक चटोर स्वप्ने मांडून वाचकांचा ऐदीपणा वाढवत होते, त्या काळात गुरुजींच्या अशा स्वप्नांचे महत्त्व खासच होते. रचना सांगण्याची-मांडण्याची पद्धत, भाषा या अंगांनीही त्यांची कथा व कादंबरी त्यांच्या समकालीनांशी नाते सांगणारी नव्हती. हे दोन्ही वाङ्मयप्रकार निदान आधुनिक काळात तरी आपण विदेशी संपर्कातूनच आत्मसात केले ते वाईट प्रकारे केले.

अशा प्रवासात आपल्या पूर्वसूरींशी देशी भाषांतील आधीच्या रचनांशी नाते शोधण्याचा या जोडण्याचा प्रयत्न आपल्या भाषेत 1960 नंतर पुरेशा समजदारीने होऊ लागला, त्याची चाहुल वा जाणीव गुरुजींच्या लेखनात दिसते. त्यांनी आधीचे व त्यांच्यां समकालीनांचे लेखन पुरेसे वाचलेले होते, हे त्यांच्या कथात्मक गद्यातून व वैचारिक लेखनातूनही आपल्या लक्षात येते. त्यांनी इंग्रजी भाषेतील बरीच पुस्तके वाचलेली असावीत. तुरुंगात अमराठी भारतीय मित्रांनीही सांगितलेल्य कथाही त्यांनी ऐकल्या. या साऱ्यांचे पडसाद त्यांच्या ‘गोड गोष्टी’त दिसतात. संस्कृत भाषेतील साहित्याचे संस्कार तर त्यांच्यावर होतेच होते. या सगळ्यांसकट लोकसंस्कृती, लोकधारणा, परंपरा, किंवा समजुती यांचा त्यांनी अत्यंत स्वाभाविक ओढीने व्यासंग केलेला दिसतो. 'स्त्रीजीवन' या पुस्तकात त्यांनी गोळा केलेली खेड्यापाड्यांतील स्त्रियांची गाणी त्याची साक्ष देतात. प्रत्येक लिहिणाऱ्याच्या पाठी बरेवाईट असे पुष्कळ सांस्कृतिक संचित असतेच. त्याचा पटही पुष्कळ रुंद असतो. लिहिणारा त्यातील स्वतःसाठी म्हणून काय निवडतो आणि त्यातल्या कशाशी स्वतःला जोडून घेतो, हे फार महत्त्वाचे असते. त्यातून त्याची जीवनविषयक दृष्टी, समाजासंबंधीची धारणा व एकुणात माणूस म्हणून त्याची वृत्तीही प्रकट होत असते. 

सुख-दुःखांशी घट्ट नाते 

गुरुजींनी या साऱ्यांतून स्वतःचे म्हणून काही सांगण्यासाठी शोधलेली भाषा व शैली यांचे नाते लोकभाषेतील कहाणी-परंपरेशी सगळ्यात जास्ती होते, हे ठळकपणे दिसते. साहजिकच व्यापक पटावरील मराठी समाज त्यांच्या आस्थेच्या व्यूहात आला. छोटी छोटी वाक्ये, उत्कटता, कणव,  प्रेम यांनी ओतप्रोत भरलेली अनलंकृत भाषा हे त्यांच्या सांगण्याच्या लिहिण्याच्या पद्धतीचे विशेष भारतीय लोकजीवनाशी, लोकांच्या सुखदुःखाशी अधिक घट्ट नाते सांगतात. गुरुजी कथा सांगत नाहीत वा कादंबरीही लिहीत नाहीत. ते गोष्ट अथवा कहाणी सांगतात. आपल्या साऱ्या कहाण्यांच्या जनक बव्हंशी स्त्रियाच आहेत. गुरुजींच्या कथांत हा कहाण्यांचा बाज जास्ती प्रभावीपणे येतो. एखाद्या इंग्रजी कादंबरीचा परिचय करून देणारी गोष्ट सांगतानाही ते आधी सारी गोष्ट पचवतात व ती आपल्या पद्धतीनेच उभी करतात. त्यांच्याशी आत्मचरित्राच्या अंगाने सगळ्यांत जास्ती नाते सांगणारी 'श्यामची आई'सारखी कादंबरीही कहाणीच्या पद्धतीनेच येते. 'शशी' या कवेता शशी वर्गात सोनसाखळीची गोष्ट सांगतो.

ही टिपिकल कहाणीच आहे. सोनसाखळी नावाची सुस्वभावी मुलगी, तिला छळणारी तिची सावत्र आई आणि जपणारा बाप. मग बाप एके दिवशी परगावी जातो. इकडे सावत्र आईला रान मोकळे. ती सोनसाखळीचा खूप छळ करते व एके दिवशी तिला मारून टाकते. शरीराचे तुकडे जमिनीत पुरून तिथे डाळिंबाचे झाड लावते. बाप परत येतो तर सोनसाखळी गायब. पुढे त्या डाळिंबाच्या झाडाला एक लाल फूल येते. त्याचे पुन्हा एक भले मोठे फळ होते. ते पाहण्यासाठी सारे गाव लोटते. ते कापायला लागतात तेव्हा आतली सोनसाखळी म्हणते, ‘‘हळू कापा. मी आत आहे.’’ बापाला आनंद होतो. सोनसाखळी सारे सांगते. बाप सावत्र आईला मारू लागतो. सोनसाखळी आईला क्षमा करायची विनंती करते. आई तिची क्षमा मागते. नंतर आनंदीआनंद. अशी ही एका कथेतील कहाणी.

एकुणातच नैतिक संस्कारांसाठी कहाणी या फॉर्मची ताकद त्यांनी हेरलेली होती, असे जाणवते. समकालीन व आधीच्या भारतीय व अभारतीय लेखनशैली माहीत असताना इतकी स्वतंत्र शैली, जी लोकसंस्कृतीच्या मौखिक परंपरेत उपलब्ध होती, पण लिखित साहित्यात बव्हंशी नव्हती; ती गुरुजींच्या लेखनात उपजत समजदारीसारखी आली, ही फारच विशेष गोष्ट म्हटली पाहिजे. 

त्यांच्या बव्हंशी साऱ्या कथा नैतिकतेची व प्रेमभावाची शिकवण देणाऱ्या, अंतःकरणाच्या उमाळ्याने सांगितलेल्या व म्हणून त्यांच्या समकालीनांपेक्षा खूपय वेगळ्या आहेत. ‘श्यामची आत्या’ या कथेत ते लिहितात, 'मनुष्याचे मन हे जात्या प्रेमळ आहे. ईश्वराने प्रत्येक प्राणिमात्राच्या हृदयात भरपूर प्रेम ठेवलेले आहे. हृदयात असणारे हे प्रेम कोणाला तरी द्यावे असे मला वाटत असते. हे भरलेले प्रेम पिऊन टाकणारे कोणीतरी पाडस प्रत्येकाला पाहिजे असते. आपण सारे या जगात हंबरत असतो. बायकांना काय किंवा पुरुषांना काय अपत्य पाहिजे असते ते मनातील या निर्मळ व वत्सल प्रेमवृत्तीच्या समाधानासाठी!’ 
‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे,’ हे त्यांचे गीत साऱ्यांना माहीत आहे. एके ठिकाणी ते म्हणतात, ‘नदी म्हणजे परमेश्वराची वाहती करुणा.’ 

माणुसकीचा गहिवर

सारेच प्रतिभावान लेखक आपला हात धरून आपल्याला त्यांच्या प्रतिभेने उभ्या केलेल्या दुनियेत नेत असतात. गुरुजीही आपल्याला त्यांच्या यांच्या कथांच्या विश्वात या प्रकारे नेतात. या जगात वासनांचे तांडव नाही. कोणत्याही प्रकारच्या भुकेचा दाह  नाही. त्यांच्यात सोसणे आहे. इतरांना समजावून घेणे, त्यांचा आदर करणे आहे. या कथांमधील परस्परांवर प्रेम करणारे तरुण व तरुणी हे सारखे असतात एकमेकांशी ते तसेच वागतात. मृदू, सुस्वभावी तरुण वा तरुणी त्याच्यावर वा तिच्यावर येणारी संकटे, त्यांना सामोरे जाताना तो वा ती प्रकट करीत असलेले सत्त्व, देव भल्या प्रवृत्तीचे सत्व पाहतो पण अखेर न्यायही देतो, म्हणून अखेर सारेच गोड होऊन आनंदीआनंद असा काहीसा बाज या कथांना आहे. प्रत्येकाच्या प्रत्येक बऱ्यावाईट कृतीचे समर्थनही त्यात असते. ‘चित्रा आणि वारू’ या कथेत गुंड चित्राला पळवून नेतात आणि डांबून ठेवतात, तेव्हा एकदा ती म्हणते, ‘का मला छळता? गरीब गायीला छळू नका, सोडा मला.’ गुंड म्हणतो, 'बाई, पोटासाठी आम्ही सारे करतो. मी तुमच्या अंगाला हात लावणार नाही. परंतु तुम्हांला आम्ही विकू. त्या पैशांनी आमच्या कुटुंबाचे पोषण करू, तुमचा येथे छळ नाही. खा, प्या.’ 

गुरुजींच्या कथेतला  गुंडही या प्रकारे मोठ्या मवाळपणे आपल्या कृतीचे समर्थन करतो. 'सती’च्या प्रस्तावनेत गुरुजींनी म्हटलेलेच आहे की, मला खलपुरुषाची कल्पनाच करता येत नाही. 
या कथांच्या दुनियेत स्वप्ने अमाप आहेत. दुःख आहे आणि बळकट श्रद्धांच्या आधाराने त्याला सामोरे जाणेही आहे. गुरुजी गांधीजींच्या विचार व आदर्शांचे क्रियाशील प्रवक्ते होते. त्याचे प्रतिबिंब त्यांच्या जगण्यात होते. त्यामुळे ते त्यांच्या व्याख्यानांत, लेखनात अर्थातच होते. स्वातंत्र्य चळवळ, गांधीजींचे विचार, आदर्श यांची मांडणी त्यांच्या लेखनात ठायी ठायी येते. 'आपण सारे भाऊ' या कथेतील कृष्णनाथ म्हणतो, 'स्वातंत्र्य एकच आहे. मनाचे, सदसद्विवेकबुद्धीचे. अन्यायासमोर मी नमणार नाही...’ 'भारतीय नारी’ या छोटेखानी पुस्तकात एके ठिकाणी गुरुजी म्हणतात, 'जोवर दुसऱ्याच्या प्रतिष्ठा आपणांस कळली नाही तर स्वातंत्र्याचा अर्थ आपणांस कळला असे मी तरी म्हणणार नाही.’ 

हा माणुसकीचा गहिवर आहे. दुसऱ्याची प्रतिष्ठा जपण्याची ही वृत्ती गुरुजींच्या कतांत ठायी ठायी दिसते. सत्य, अहिंसा, मानवता, प्रेम, करुणा यांचा संदेश आणि भारतीय संस्कृती, परंपरा यांची व्यापक-समावेशक मांडणी त्यांच्यात आहे. हिंदू-मुसलमानांतील तेढ, त्यामुळे झालेले नुकसान, या शत्रुत्वापाठीचे अडाणीपण यांमुळे जाणवणारी वेदना त्यांच्या लेखनात अनेक ठिकाणी दिसते. ज्या काळात बाकी सारे प्रसिद्ध आणि ज्यांची युगे झाली, असे काही म्हणतात ते लेखक समाजाचा फारच बारका भाग आपल्या आस्थेच्या पर्यावरणात घेऊन लेखन करीत होते. त्या वेळी गुरुजी मात्र मराठी समाज, हिंदू-मुसलमान, त्या दोहोंतील अठरापगड जातींना आपल्या आस्थेच्या व्यूहात घेऊन रचना करीत होते, हे लक्षणीय आहे. 

कथानक, पात्रांमधील परस्परसंबंध, त्यांच्या क्रिया-प्रतिक्रिया, कथात्मक पात्रांचे विकसन, त्यांचे बदलते संबंध, असल्या तंत्रामंत्राच्या गोष्टींपेक्षा आनल्याला नैतिकतेच्या ज्या गोष्टी सांगायच्या आहेत, त्या गुरुजींच्या मनाच्या गाभ्याशी अधिक प्राधान्याने दिसतात. म्हणजे काही एक नैतिक आशय मांडण्यासाठी व शोधण्यासाठी कथा अथवा कादंबरी हे माध्यम अशी गर्भित धारणा त्यांच्या मनाशी दिसते. माणसांविषयी त्यांच्या सुखदुःखांशी आस्था असणारा व त्यांच्या वेदनांशी सहकंप पावू शकणारा लेखक या प्रकारचा प्राधान्यक्रम ठरवत असतो. कलात्मकतेचे खेळ अग्रस्थानी बाळगत बाकी माणसांविषयी, मानवी समूहाच्या  सुखदु:खांविषयी बेफिकीर राहणाऱ्या लेखकांना आणि त्यांच्या सहप्रवाशांना हे समजत नव्हते. किंबहुना ते समजून घ्यायची त्यांची तयारीच नव्हती. म्हणूनच गुरुजींच्या या समकालीन प्रतिष्ठितांनी त्यांची भरपूर हेटाळणी केलेली दिसते. त्यांचे समर्थनही काहींनी केले. पण त्यांना साहित्याच्या त्या वेळी प्रतिष्ठित असणाऱ्या व्यवस्थेत फारसे स्थान नव्हते. साहित्याशी संबंधित प्रतिष्ठित समीक्षेकडून गुरुजींचा हिरीरीने पुरस्कार होण्यासाठी काळ जावा लागला. त्याआधी समीक्षेत प्रतिष्ठित असलेल्या व्यवस्थेला हादरे द्यावे लागतात, हे लक्षात घेतले पाहिजे.' 

बौद्धिकता आणि भावनिता ही मानवी अभिव्यक्तीची महत्त्वाची अंगे होत. तत्त्वज्ञानात बौद्धिकता, बौद्धिक मांडणी जास्ती काटेकोरपणे असते, तरीही गाभ्याशी भावनिकता असतेच. कवितेत वा कथेत याच्या उलटे असते. मानवी जीवनात या ही दोहोंनाही आपापल्या परीने महत्त्व आहे. आणि प्राधान्यक्रम बदलले तरी सत्याकडे जाण्याचा रस्ता या दोन्ही अभिव्यक्तींत खुलाच राहतो. साहित्याचे आशयद्रव्य हे जास्ती फ्लुइड असते व म्हणूनच नव्या मांडणीला, आकलनाला वा अभिव्यक्तीला ते तुलनेने सहज खुले असते. तिथून सत्याकडे जाण्याच्या वाटा अधिक खुल्या असतात. एक प्रकारची लवचिकता असते. तत्त्वज्ञानाचे जग हे काठिण्याचे व सहजी न हलणारे. म्हणून ही कमी खुली वाट जास्ती बिकट असते. विशेषतः जगण्यातल्या संस्काराच्या दृष्टीने साहित्याचे महत्त्व अधिक आहे. आपल्याला काय करायचे आहे हे गुरुजींना उमगले होते. त्यांना आपला स्वभावधर्म कळला होता व म्हणूनच त्यांना ही फ्लुइड वाट निवडली. 

त्यांना सत्याकडे पोहोचण्यापेक्षा आपल्याला दिसणाऱ्या सत्याची मांडणी करण्याची निकड जास्त वाटत होती. तीच ते करीत राहिले. अगदी 'भारतीय संस्कृती’सारखे त्यांचे वैचारिक लेखनही त्यामुळे दर्शनाच्या मांडणीच्या पातळीवर न राहता ते संस्कार करण्याच्या सुबोध पातळीवरच अधिक राहते. गुरुजींनी त्यांच्या साऱ्या वाङ्मयकृतींतून पुन्हा पुन्हा तीच गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ‘आस्तिक’च्या प्रस्तावनेत गुरुजी म्हणतात, ‘‘पुस्तकांची नावे निराळी, आतील पात्रांची नावे निराळी, परंतु ते विचार, त्याच भावना मी निराळे देणार तरी काय? 'अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी- मनात जे असते तेच प्रकट होणार... झाडांना दर वर्षी नवीन नवीन पालवी फुटते, ती का त्यांच्या पूर्वीच्या पालवीपेक्षा निराळी असते है? तशीच असते, तरीही ती आपण कौतुकाने पाहतो व आनंदतो. तसेच माझे; ती विचारांची व भावनांची पालवी सर्वत्र दिसणार.’’ 

एकसुरीपणाची टीका
गुरुजींच्या निवेदनाला त्यांच्यावरच्या 'तेच ते’पणाच्या आरोपांची पार्श्वभूमी आहे. खरे तर झाडांची प्रत्येकी पालवी नवी आणि वेगळी असतेच. कारण दर वर्षी झाडही बरेच बदललेले असते. सारे नवेच असते. प्रत्येक वेळी ते तसे असते. लिहितानाही नवे येते ते जुन्याच्या उजेडातच येते. काही समजावून घेण्याच्या प्रवासाचा; सत्याकडे जाण्याच्या प्रवासाचा तो भाग असतो. वरवर तोच तो खेळ मांडून आणि प्रत्यक्षात प्रत्येक वेळी तो खेळ मांडून आणि प्रत्यक्षात प्रत्येक वेळी तो वेगळ्या प्रकारे वेगळ्या उजेडात मांडून लिहिणारा त्याला ते शोधायचे असते त्याच्या निकट जाण्याच्या प्रयत्नात असतो. स्ट्रिडबर्गने एके ठिकाणी म्हटले आहे, ‘‘उथळ माणसे विविधतेची मागणी करत असतात. परंतु ठसठसणाऱ्या नसेच्या निकट जास्तीतजास्त निकट जाण्याचा प्रयत्न करीत मी आयुष्यभर पुन्हा तीच ती गोष्टी लिहीत आलो आहे. या प्रकारे दुखऱ्या नसेच्या निकट जाणे, तसा प्रयत्न करीत राहणे ही कोणत्याही लिहिणाऱ्याची आकांक्षाच असते. अशा प्रकारची आकांक्षा गुरुजींनी बाळगलेली असावी असे दिसत नाही. सनातन मानवी मूल्यांचा अंगीकार करताना या दुनियेच्या व्यवहारात या दुनियेच्या व्यवहारात अडचणी, संकटे येतातच, तरीही अखेर त्यांच्या बळावर आपण तरून जाऊ शकतो, म्हणून ती महत्त्वाची आहेत.

या प्रकारचा संस्कार करणे गुरुजींनी अधिक महत्त्वाचे मानले. त्यासाठी विविध गोष्टींद्वारे तेच ते विचार पुन्हा पुन्हा मांडून ठसविण्याच्या प्रयत्न केला, मराठी समाजाचा व्यापक पट आस्थेच्या व्यूहात घेऊन त्यांनी ते केले. त्याचे महत्त्व आहेच. आणि ज्या फडके, खांडेकर, माडखोलकर अथवा त्यांच्या समर्थकांनी गुरुजींवर अगदी निर्दयतेने एकसुरीपणाची टीका केली, त्यांच्या लेखनात तरी ते  वेगळे वेगळे असे काय आणत होते? फडके तर वेगवेगळ्या पोशाखांत ती पात्रे, तीच प्रणयवर्णने, तेच सौंदर्याचे गुलाब आणि त्याच त्या धनुष्याकार भुवया आणत होते आणि खांडेकर त्यांच्या स्वप्नाळू बिनबुडाच्या आदर्शवादाला वास्तवतेची भूमी नसल्यामुळे ते पुन्हा पुन्हा तेच धान्य वेगवेगळ्या सुपाने पाखडत हवेत लुप्त होणाऱ्या सुभाषितांची फोलपटे उडवीत होते.

माडखोलकर बेगडी समाजवादाच्या आवरणाखाली कामुक गोष्टी सांगत होते. या साऱ्यांचा प्रवास कोणत्या दुःखाच्या आकलनाची नस शोधत होता? उलट साने गुरुजींनी नैतिक आदर्शांचा काही एक ठोस नमुना शोधत, आकार शोधत अत्यंत उत्कटपणे मराठी समाजावर काही संस्कार करण्याचा प्रयत्न करीत होते. कोणताही लेखक उरतो, टिकतो तो त्याच्या पुढच्या पिढ्यांमधल्या बायकांमध्ये आणि लेखकांमध्ये. यातील लेखकांमध्ये टिकणे अधिक महत्त्वाचे; कारण लेखक हा प्रगल्भ वाचक असण्याची शक्यता नेहमीच जास्त असते. पुढच्या पिढीतल्या उद्धव शेळके ‘धग’सारख्या श्रेष्ठ कादंबरीतील कौतिकचे नाते श्यामच्या आईशी नक्कीच जोडता येईल. पूर्वसुरींचा प्रभाव पचवून पुढे जाण्याचे या प्रकारचे उदाहरण साने गुरुजींनी प्रेरित केल्यातून जसे दिसते, तशी फडके-खांडेकरांची प्रेरणा घेऊन पुढे कोणती श्रेष्ठ कृती आपल्या भाषेत निर्माण झाल्याचे उदाहरण सांगता येत नाही. लेखकाच्या जीवनातील अनुभव वाङ्मयीन पातळीवर जाताना एक प्रकारचा अनुवाद घडत असतो. वाङ्मयीन कृतीत व्यक्त होणारा अनुभव हा प्रत्यक्ष जीवन-अनुभवाचा सर्जनात्मक अनुवादच असतो. या अनुवादावर लेखकाच्या जीवनविषयक दृष्टीचा, त्याच्या वृत्तीचा प्रभाव पडत असल्याने हे सारे कसे होते हे पाहणे बऱ्याच वेळा उद्बोधक असते. संधी असेल तर ते पाहून हाती काही लागू शकते. रामभाऊ जोशी यांनी लिहिलेल्या ‘असा होता सेनानी’ या साने गुरुजीच्या छोटेखानी चरित्रात एक प्रसंग उद्धृत करण्यात आलेला आहे.

जोशी आणि गुरुजी सहाध्यायी. ते इंग्रजी चौथीत असताना त्यांना कृष्णाजी पांडुरंग लिमये ऊर्फ कवी राधारमण संस्कृत शिकवीत. ते उत्तम शिक्षक होते व फार तापट स्वभावाचे होते. त्यामुळे त्यांच्याविषयी विद्यार्थ्यांत फार आदर व दरारा असे. एके दिवशी शाळेच्या मधल्या सुट्टीत वर्गातल्या दोन खोड़कर मुखांनी साऱ्या मुलांच्या वेगवेगळ्या शिव्या एकत्र करून एका ठिकाणी बांधून टाकल्या. साने (गुरुजी) तिथेच होता. त्याने ते पाहिले होते. सुट्टी संपल्यावर सारी मुले वर्गात आली. त्यांनी ते पाहिले होते. जो तो आपली आपली पिशवी ओढू लागला. त्यामुळे पिशव्यांना मारलेल्या गाठी आणखी घट्ट बसू लागल्या. साने त्या मुलांना म्हणाला, चाकूने पिशव्यांच्या नाड्या कापू या. म्हणजे पिशव्या मोकळ्या होतील. चला घाई करा. गुरुजी आता येतील,’’ कोणीही ते ऐकले नाही. पिशव्या फाटल्या. पुस्तके, वह्या सांडल्या. लिमये गुरुजी येताच सारी मुले हाती लागेल तशा फाटक्या पिशव्या, वह्या-पुस्तकांचे गठ्ठे घेऊन आपापल्या जागी जाऊन बसली. साने तिथेच उभा होता. तो सगळ्यांत शेवटी त्याच्या जागेवर जाऊन बसला. लिमयांचा संताप अनावर झाला. त्यांनी सानेला विचारले, तो म्हणाला, ‘‘मी नाही गाठी बांधल्या.’’ लिमये म्हणाले, ‘‘ठीक... कोणी बांधल्या हे तुला माहीत आहे. त्यांची नावे सांग.’’ त्याने ती सांगितली नाहीत. गुरुजींनी निरगुडीचे फोक आणवून साऱ्या (मुलांना) दोन दोन छड्या दिल्या. शेवटी तर त्यांनी अत्यंत क्रोधाने सानेच्या हातावर सपासप मारायला सुरुवात केली. एका हातावर मार मारून छडी तुटली, हाताच्या वळातून रक्त ठिबकू लागले. तरीही साने बोलला नाही त्याने हात मागे घेतला नाही. लिमयांनी दुसरी छडी घेतली. त्यांनी सानेच्या दुसऱ्या हातावर मारायला सुरुवात केली. त्यातून रक्त ठिबकू लागले. तीही छडी मोडली. तरीही साने गप्पच आणि हात तसाच. लिमयांनी निराश होऊन छडीचे थोटूक फेकून दिले आणि बसायला सांगितले. सानेने तोंडातून ‘ब्र’ही काढला नाही. नावे सांगितली नाहीत. सारा वर्ग स्तिमित झाला. कळवळला.

‘आपण सारे भाऊ’ या गोष्टीत एक प्रसंग पुढीलप्रमाणे येतो. बोर्डीच्या शाळेत शिकणारा, वसतिगृहात राहणारा कृष्णनाथ हा सुस्वभावी मुलगा. त्याच्या संदर्भातला प्रसंग. एके दिवशी त्याच्या खोलीतील दोन मुलांनी व दुसऱ्या दोन मुलांनी पिकलेले पोपये न विचारता काढले, कृष्णनाथाला ते पसंत नव्हते.
‘‘कृष्णनाथ, ये खायला!’’ मित्रांनी हाक मारली. 
"मला नको. तुम्ही न विचारता ते काढले आहेत.’’
‘‘मोठा शिष्टच आहेस! झाडावर फुकटच गेले असते. नाहीतर दुसऱ्या कोणी काढून नेले असते!!’’ 
‘‘परंतु आपण विचारले असते तर आपणांला का परवानगी मिळाली नसती?’’
"तू असला डुढ्ढाचार्य असशील हे नव्हते आम्हांला माहीत! आपणच खाऊ या रे!’’
त्या मुलांनी भराभर पोपया खाऊन साली तेथेच टाकून दिल्या आणि ती मुले निघून गेली. कृष्णनाथ एकटाच खोलीत होता. तो उठला आणि त्या साली गोळा करू लागला तोच चालक तिकडून आले. 

"काय रे करतो आहेस?" 
‘‘या साली गोळा करीत आहे.’’ 
‘‘पत्ता लागू नये म्हणून ना?’’ 
‘‘मी नाही खाल्ल्या पोपया. परंतु येथे घाण नसावी म्हणून या साली मी गोळा करीत आहे.’’ 
"कोणी खा पोपये ?" 
‘‘दुसऱ्या मुलांनी. त्यांची नावे सांगणे मी बरोबर नाही. तुम्ही प्रार्थनेच्या वेळेस पोपया खाणाऱ्यांनी उभे राहावे अशी आज्ञा करा. ते मग उभे न राहिले तर मात्र मी नावे सांगेन. परंतु त्यांच्यामागे कशाला सांगू?" 
‘‘कृष्णनाथ, तू शहाणा आहेस,’’ असे म्हणून चालक गेले. रात्री प्रार्थनेच्या वेळेस चालकांनी कृष्णनाथची स्तुती केली. त्याचा प्रामाणिकपणा, मित्रांची नावे त्यांच्या पाठीमागे न सांगण्याची वृत्ती, चुगलखोरपणाचा अभाव, घाण दूर करण्यातील नम्रता व सेवावृत्ती इत्यादी गुणांची प्रशंसा केली. छात्रालयातील आदर्श विद्यार्थ्यास मिळणारे पदक कृष्णनाथास देण्यात येईल, असेही ते म्हणाले. कथेतला कृष्णनाथ बोलणारा आहे. चालकांच्या साऱ्या प्रश्नांना तो व्यवस्थित उत्तरे देतो. अमुक एक गोष्ट आपण का करणार नाही व ती कोणत्या परिस्थितीत हेही तो नीट सांगतो, चालक त्याची स्तुती करतात. छात्रालयातीय आदर्श विद्यार्थ्याला देण्यात येणारे पदक मिळेल असे सांगतात. 

भावनात्मक अनुवादाची प्रेरणा 

प्रत्यक्षातल्या अनुभवात गुरुजी मूकपणे मार सोसतात. हात रक्ताळले तरी तोंड उघडत नाहीत. कथेतला कृष्णनाथ बोलतो. त्याची वाहवा होते. प्रत्यक्ष अनुभवातील सोसणे, दाह यांचे वाङ्मयीन पातळीवर जाताना असे गोड गोड सारे कसे होते? जे होते त्यातून ते जसे व्हावे असे वाटते, तसे ते लेखनात येते. जीवनातला तपशील लिहिणाऱ्याच्या वृत्तीमुळे बदलतो. मूकपणे सोसलेला मार या कडवट बनवत नाही. तो त्याला वेगळ्या भावनात्मक अनुवादाची प्रेरणा देतो. गुरुजींच्या एकूण साहित्याच्या पाठी वस्तुस्थिती कशी असेल आणि साहित्यात ते कसे होऊन येत असेल, याचा अंदाज यातून येतो. प्रत्यक्ष जीवनातील बुजरेपणा, एकाकीपणा, निःशब्दपणे सोसलेल्या यातना यांचा सर्जनात्मक अनुवाद कित्ती वेगळा होऊन येतो! 

गुरुजींच्या गोष्टीत लहान व तरणी मुले / मुली प्रामुख्याने असतात. तरीही त्यांच्या या गोष्टी प्रायः प्रौढ माणसांसाठीच लिहिलेल्या आहेत. प्रौढांनी मुलांशी कसे वागावे, त्यांच्या मनाला जपावे, त्यांची काळजी घ्यावी, त्यांच्या निसर्गाशी संवाद करण्याच्या वृत्तीचे पोषण करावे, कुतूहलाची समंजसपणे पूर्ती करावी या प्रकारची भावना या गोष्टीमध्ये वारंवार दिसते. बालकथा म्हणजे बालांसाठी लिहिलेल्या कथा. गुरुजींच्या कथा या प्रौढांसाठी लिहिलेल्या बालकांच्या गोष्टी आहेत असे फारतर म्हणता येईल. पण हेही सरसकट करता येण्याजोगे विधान नाही. गुरुजींनी गोष्टी सांगितल्या-लिहिल्या त्या साऱ्यापाठी विलक्षण झपाटा व उत्कटता होती. गोष्टींच्या पुस्तकाला प्रस्तावना लिहून ते गोष्टीपाठीच्या गोष्टी त्या ऐकल्यावरच्या प्रतिक्रिया, एवढेच नाही तर या या गोष्टीत हेही सांगितले आहे असेही सांगत. हा भाबडेपणाच म्हणावा लागेल, तरीही त्यापाठीची त्यांची उत्कटता व तळमळ इतकी मोठी असते की त्यात आपल्या मनात उगवणारी अशी भावना सहज विलय पावते. 

'विश्राम' या पुस्तकाच्या प्रस्तावनेत गुरुजी म्हणतात, ‘‘भरलेले हृदय रिकामे होईपर्यंत लिहायचे दुसरे कलातंत्र मला येत नाही व साधत नाही. तंत्रमंत्रमय कलेचा येथे कदाचित खूनही असेल, कोणाला माहीत ?" टॉलस्टॉयच्या पुस्तकाच्या ‘कला म्हणजे काय?’ या त्यांनी केलेल्या अनुवादाच्या प्रस्तावनेत गुरुजी म्हणतात, ‘‘खेड्यापाड्यांतील जनता हाच खरा महाराष्ट्र आहे- लाखो खेड्यांत कोणत्या पुस्तकांचा प्रवेश झाला आहे? महाराष्ट्राचे आवडते कवी व आवडते कादंबरीकार यांचे कोणते काव्य व कोणती कादंबरी त्या खऱ्या महाराष्ट्रात गेली आहे? महाराष्ट्राचे आवडते याचा अर्थ चार सुशिक्षितांचे आवडते, यापेक्षा अधिक नाही. खरा महाराष्ट्र या कादंबरीकारांनी पाहिलेलाच नसतो. त्या खऱ्या कष्टाळू व श्रमी महाराष्ट्राबद्दल यांना आदर नसतो, प्रेम नसते..." 

गुरुजींची वाङ्मयीन भूमिकाच यातून स्पष्ट होते. त्यांच्या आस्थेचा व्यूह लक्षात येतो. महाराष्ट्राचे आवडते कादंबरीकार ज्यांना म्हटले जात होते ते खेड्यापाडयांत तसे पोहोचले होते. पण कष्टाळू, श्रमी महाराष्ट्र त्यांच्या कादंबऱ्यात नक्कीच नव्हता. त्याबद्दलचा आदर तर सोडाच, आस्थाच त्यांच्या ठायी नव्हती. त्यांना तो माहीतच नव्हता. गुरुजींच्या हयातीत त्यांच्या कथांचे व एकूण लेखनाचेच योग्य मूल्यमापन झाले नाही. त्यांची वाङ्मयीन भूमिका किती महत्त्वाची होती हे पुढच्या पिढ्यांतील महत्त्वाच्या लेखकांनी आपल्या वाङ्मयीन कृतीतून व लेखांमधून लक्षात आणून दिले. चटोर कथा प्रतिष्ठित असण्याच्या व होण्याच्या काळात गुरुजी शुद्ध भारतीय नैतिक आदर्शाच्या खेड्यापाड्यांतल्या सनातन प्रामाणिक मूल्यांचा पाया असलेल्या गोष्टी अगदी साध्या सोप्या वाटणाऱ्या भाषेत सांगत होते, अगदी उत्कटतेने सांगत होते. एका अर्थाने ते त्यांच्या काळातील प्रतिष्ठित वाङ्मयीन प्रवाहाचा एकाकीपणे प्रतिकारच करीत होते. ते जगणे आणि लिहिणे यात अंतर नसण्याचा आपल्या उक्ती आणि कृतीतून पुरस्कार करीत होते.  ‘‘कादंबरी लिहून क्रांती होते’’, असे त्यांनी म्हटले आहे. (भारतीय नारी, पृष्ठ 22) ते गांधीवादाच्या मूल्यादर्शांचा हिरीरीने पुरस्कार करीत होते. गांधीजी, त्यांचा विचार, त्यांचे जगणे हा त्या काळातल्या मराठी मध्यम वर्गाच्या टवाळीचा विषय होता. भालाकार भोपटकर, सावरकर, मुंबईथी विविध वृत्तपत्रे, चित्रा ही साप्ताहिके यांतून गांधीजींची टवाळी सतत चाले. 

गुरुजींनी आपले जगणे काही एका मिशनला बांधून घेतलेले होते. त्यांचे लिहिणे हा त्यांच्या जगण्याचा भाग असल्याने, ते त्या मिशनचाही भाग होते. म्हणून लिहिण्यात व जगण्यात विसंवाद नाही, विरोध वा अंतर नाही. त्यांच्या समकालीन प्रतिष्ठितांच्या हेटाळणीनेही त्यांना नाउमेद केलेले दिसत नाही. त्यांना दुःख असेल; पण काही सांगण्याची, मांडण्याची त्यांची ऊर्मीच इतकी प्रबळ होती की, तिने अशा दु:खांवर सहज मात केली. अंगीकृत मूल्यांविषयी इतक्या श्रेष्ठ दर्जाची आस्था, त्यांच्याशी असणारी प्रामाणिकता असाधारण म्हटली पाहिजे. 

समाजवादाच्या सगळ्या भरांना कवेत घेणारी प्रतिमा 
आजच्या वर्तमानात गुरुजींचे लेखन किती समकालीन, किती महत्त्वाचे म्हणायचे आणि का? 
भांडवली अर्थव्यवस्थेच्या वा एकूणातच त्या प्रकारच्या जीवनप्रणालीच्या परमोत्कर्षाच्या आजच्या काळात मानवी संस्कृतीतील सनातन मूल्ये भेदरून वळचणीला गेल्यासारखी दिसतात, त्याग, संयम, वैराग्य, सेवा, प्रेम, ज्ञान, विवेक, अहिंसा, सत्यनिष्ठा, प्रामाणिकता या साऱ्याच बाबी आज अशा अडगळीत जाऊ लागल्या आहेत. आदिम माणसाच्या ठायी स्वाभाविकपणे ती कदाचित नसतीलही; म्हणजे नव्हतीच पण ती प्रतिष्ठित करण्यासाठी माणसांच्या हजारो पिढ्यांनी फार कष्ट घेतलेले आहेत आणि हे सारे कष्ट फार वेगाने मातीमोल होऊ घातले आहेत. एक प्रकारच्या विराट, अतिव्याप्त, अमर्याद, सुजलेल्या भुकेने पृथ्वी दिलेल्या ऊर्जेच्या अमर्याद नासाडीच्या नशेने आपल्याला घेरलेले असताना व प्रमत्त शर्यतीत आपण सारेच भांबावल्यासारखे धावत असताना अगदी अलीकडे होऊन गेलेल्या गांधी यांच्या जीवनादर्शांची आठवण होणे जितके स्वाभाविक तितकेच साने गुरुजींच्या लेखनाचे महत्त्व स्वाभाविक आहे. माणसामाणसांमधल्या संवादांची साधने अमाप वाढली असतानाही माणसाचे एकाकीपण आणखीनच वाढले आहे. माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचे फुटलेपण, विखंडीकरण वाढले आहे. आपल्या लोकांपुरते बोलायचे तर भावनेचा जयजयकार करणाऱ्या प्रवृत्ती आणि त्यांना मिळणारे प्रतिसाद वाढले आहेत. खुनी प्रवृत्तीचे लोक राजकीय सत्तांच्या वर्तुळात आहेत. विद्वेषामुळे माणसांच्या समूहातील दरी वाढते आहे. शत्रू एखाद्या बागुलबुवा सारखा समोर दाखवून नेतृत्व उभे राहत आहे.

माणसाचा माणसाविषयीचा आदर, प्रेम, दुर्मीळ होत चालले आहे. कमीतकमी वेळात सारे काही मिळविण्यासाठी बेदरकारपणे धावणे वाढले आहे. आपली हाव वाढली आहे. आणि सारे कळत असूनही आपण धावतोच आहोत. या साऱ्याचा प्रतिकार करायचा तर गांधीजींकडे वळणे अपरिहार्य आहे. त्याग, संयम, सेवा, प्रेम, माणुसकी या गोष्टींना हृदयाच्या गाभ्याशी ठेवून वत्सलपणे रचना करणाऱ्या समाजाच्या सगळ्या थरांना कवेत घेणाऱ्या साने गुरुजींच्या प्रतिमाविश्वाचे महत्त्व त्यामुळे आहे. माणसाला व मानवी समूहांना या प्रकारे आज धावावे लागत आहे. एकमेकांच्या नाशाची तरतूद करणारी दहशत बसवावी लागत आहे. एकमेकांना भिऊन जगावे लागत आहे. ते सारे फार भयावह व स्फोटक आहे. या भेदरलेल्या धावण्यात मेंदू फुटून मृत्यू येण्याचा अनुभव अगदी नजीकच्या टप्प्यात आहे. ते टाळायचे असेल तर समंजसपणा पाहिजे. विक, संयम पाहिजे, प्रेम, माणुसकी, परस्परांविषयीचा आदर यांची पुनर्ओळख करून घेतली पाहिजे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर यांच्यावर काबू करण्यासाठी या साऱ्या मूल्यांची पुन्हा मांडणी करण्याची, त्यांच्या प्रतिष्ठेची पुनःस्थापना करण्याची, त्यांना जगण्याच्या केंद्रस्थानी आणण्याची फार गरज आहे. मानवी समूह म्हणून आपण सुसंस्कृत राहणार असू, नैतिकता टिकवणार असू तरच आपण टिकू. विशाल मानवतेची शिकवण देणारे साने गुरुजींचे साहित्य म्हणूनच आज सगळ्यांत जास्त समकालीन आहे, महत्त्वाचे आहे. त्याला त्याच्या महत्त्वाच्या जागी आणणे गरजेचे आहे. 

परिशिष्ट :
साने गुरुजींच्या लेखनासंबंधी काही अभिप्राय व नोंदी 

साने गुरुजींच्या लेखनात रडवेपणा आहे व विकृत दु:खप्रियता आहे असे कुसुमावती देशपांडे प्रभृतींनी म्हटले आहे. श्री.के. क्षीरसागर, ना.सी. फडके यांनी असाच सूर लावलेला आहे. आचार्य भागवत यांनी मात्र साने गुरुजींना ‘पहिला सत्याग्रही साहित्यनिर्माता’ म्हटले आहे. साने गुरुजींच्या साहित्याने आदर्श साहित्याकडे तोंड वळविले आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. तरीही प्रतिष्ठित साहित्यकार आणि समीक्षक यांच्या उच्च, दांभिक आणि पांडित्यपूर्ण वजनापुढे आचार्य भागवत प्रभृतींचे वजन फारच कमी पडले असे म्हणावे लागते. अ.ना. देशपांडे (आधुनिक मराठी वाङ्मयाचा इतिहास भाग 2 (1920 ते 1950), व्हीनस प्रकाशन, प.आ. जाने. 1958) यांनी त्या मानाने अधिक बरे मूल्यमापन केलेले आहे. 'स्वार्थत्याग, बंधुभाव, समता इत्यादी सनातन व सर्वसामान्य स्वरूपाच्या सद्गुणांची शिकवण, कादंबऱ्यांचा सोज्ज्वळ प्रकृतीचा आपला स्वतंत्र प्रवाह साने गुरुजींनी निर्माण केला. त्यांना मनोमन पटलेला, पण प्रत्यक्ष व्यवहारात त्यांना उत्तरविता न आलेला उदात्त ध्येयवाद त्यांनी या भावनाप्रधान वृत्तीच्या सर्वगुणसंपन्न अशा आदर्श वाटणाऱ्या कल्पित व्यक्तींच्या जीवनात सफल करून दाखवला आहे. गुरुजींचे कादंबरीलेखन हे एक सात्त्विक प्रकृतीचे स्वप्नरंजन होय. मानवी सद्गुणांविषयीच्या उत्कट जिव्हाळ्यातून आलेले आहे.’ इत्यादी प्रकारचे अभिप्राय देशपांडे यांनी नोंदवले आहेत. साने गुरुर्जीच्या कथांविषयी ते म्हणतात, ‘‘त्यांच्या कथा त्यांच्या इतर वाङ्मयाप्रमाणेच जातिवंत कळकळीने ओतप्रोत भरलेल्या आहेत. पण कलागुणांच्या अपेक्षेने त्या बऱ्याच निराशाजनक आहेत. याची चुणूक 'विश्राम'मधल्या चार पाल्हाळिक कथांवरून येते.’’ 

प्र.न.जोशी (मराठी वाङ्मयाचा विवेचक इतिहास, प्रसाद प्रकाशन, प्र.आ. जाने. 79) यांनी साने गुरुजींचे भाबडे मन, त्यांचा आशावाद, त्यांची हळुवार वृत्ती यांचे दर्शन त्यांच्या कृतीतून घडते, असे म्हटले आहे. प्र.न.जोशी यांच्या या आढाव्यात साने गुरुजींचा कथा लिहिणारा माणूस म्हणून उल्लेखच नाही. याहीपेक्षा आश्चर्याची बाब म्हणजे म. द. हातकणंगलेकर यांनी (मराठीचा इतिहास खंड 2, महाराष्ट्र साहित्य परिषद, संपा. व.दि. कुलकर्णी, गो.म.कुलकर्णी प्र. आ. 1991) लिहिलेल्या 'कथा' या विषयावरील सुमारे बेचाळीस पानांच्या प्रदीर्घ लेखातही साने गुरुजींचा कथा लिहिणारा माणूस म्हणून उल्लेख नाही. गो.म.कुलकर्णी व व.दि. कुलकर्णी यांनी (मराठी वाङ्मयाचा इतिहास खंड 6 भाग 1, महाराष्ट्र साहित्य परिषद, संपा. गो.म. कुलकर्णी, व. दि. कुलकर्णी, प्र. आ. 1988), गुरुजींच्या एकूण साहित्याविषयी व भूमिकेविषयी पुष्कळ सहानुभूतीने नेमकेपणाने लिहिले आहे.

‘‘गुरुजींचे आंतरबाह्य जीवन गांधीविचारांनी, कल्पनांनी उजळून निघालेले होते. त्यांनी कायावाचामने गांधीतत्त्वे प्रसृत करण्याचा आपल्या ललित लेखनातून प्रकट करण्याचा हयातभर अविरत प्रयत्न केला. त्याचा प्रभाव तत्कालीन सुशिक्षितांपेक्षा साक्षरांवरच अधिक पडल्याचे जाणवते. तत्कालीन प्रतिष्ठित साहित्यविश्वाने साने गुरुजींच्या साहित्याची विशेष कदर केली नाही, त्याचे योग्य ते मूल्यमापन झाले नाही. गांधी तत्त्वज्ञानाविषयी सुशिक्षित मनांमधील अढी ही या वस्तुस्थितीला कारणीभूत आहे.’’ ‘‘साने गुरुजींच्या साहित्यात ज्ञान असले तरी दरारा दाखविणारे पांडित्य नसते.’’ ‘‘'गुरुजींचे वाङ्मय बुद्धिवाद्यांना रुचले नाही. विद्यार्थ्यांना मात्र इतकी प्रचंड ओढ कोणत्याच लेखकाने लावली नाही,’’ ‘‘मराठी साहित्यात उन्मादक प्रेमाचा सुकाळ झालेला असताना गुरुजी भावुक, उत्कट, उदात्ततेच्या, ओढीच्या गोष्टी लिहीत होते.’’ ‘‘त्यांनी हिंदू-मुस्लीम संघर्षाची निरर्थकता सांगण्याचा अविरत प्रयत्न केला,‘‘ ‘‘मनाला उदात्ततेचे उमाळे यावेत व आपल्या स्वभावगत हीनत्वाचे विरेचन होऊन अल्प काळ तरी एका उच्च, सात्त्विक मनःस्थितीचा उत्कट प्रत्यय यावा इतके सामर्थ्य त्यांच्या साहित्यात नक्की आहे.’’ ‘‘गुरुजींनी वापरलेली भाषा हे मराठीचे अद्भुत लेणे आहे. खास मराठी मनाचा ठसा असलेली देशी भाषा गुरुजींनी वापरली. साधी, सोपी, सहजपणे प्रकट झालेली छोटी छोटी मराठी संस्कारांनी भिजलेली शब्दकळा, तन्मयता, तळमळ व आंतरिक ओलावा यांनी आर्द्र झालेली भाषा गुरुजींनी दिली.’’ इत्यादी… 

साने गुरुजींच्या लेखनाच्या ताकदीची मांडणी, त्यांच्या लेखनासंबंधीचा आदर जोरकसपणे व दणकट तडफेने भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केलेला आहे. (टीकास्वयंवर, साकेत प्रकाशन, प्र.आ. सप्टे. 1990)  ‘‘साने गुरुजींची ‘श्यामची आई' (1935) पासून समाजाच्या सर्व थरांना स्पर्श करणाऱ्या बहुविध आशयसूत्रांच्या आणि आपल्या सांस्कृतिक तत्त्वांना उजाळा देणाऱ्या कथा-कादंबऱ्यांमधून मराठी देशी अनुबंध अप्रतिम जिव्हाळ्याने मांडून मराठी कादंबरीचे क्षेत्र विस्तारले.’’ ‘‘साने गुरुजींच्या सर्व लेखनाला आधुनिकीकरणाला तोलून धरणारी प्राचीनत्वाची दिशा आहे,’’ असे अभिप्राय नेमाडे यांनी नोंदविले आहेत. एका मुलाखतीत (टीकास्वयंवर, पृष्ठ 267) तुमचे आवडते मराठी कादंबरीकार कोणते, या प्रश्नाच्या उत्तरादाखल बोलताना नेमाडे म्हणाले, ‘‘साने गुरुजी हाच एकमेव मोठा कादंबरीकार वाटत होता. अजूनही तसंच वाटतं. त्यांच्या ‘श्याम’च्या नायकीचा मराठी नायक दुसरा नाही. भटका, निराधार, सर्व सृष्टीची परिमाणे लाभलेला असा नायक. साने गुरुजी असा कादंबरीकार आहे की त्याने स्वतःचं असं विश्व निर्माण केलं. त्यांना स्वतःची जीवनदृष्टी होती. जी इतर कुणाजवळही दिसत नाही. समाजाच्या सर्व स्तरांना मराठी कादंबरीनं खऱ्या अर्थाने स्पर्श केला तो एकट्या साने गुरुजींनीच. या बाबतीत त्यांचा आवाकाही विलक्षण आहे. पण निव्वळ समाजवादी शिष्यांमुळे त्यांची वाईट प्रतिमा मराठीत रुजली.’’

साने गुरुजींचे समकालीन प्रल्हाद केशव अत्रे यांनी साने गुरु साहित्याची, कार्याची तसेच त्यांच्यातील मातृत्व, मांगल्य यांची भरभरून आणि भडभडून स्तुती केली आहे. त्यांनी 'श्यामची आई’वर सिनेमाही केला होता. त्याला राष्ट्रपतिपदक मिळाले होते. परंतु हा सिनेमा ‘पथेर पांचाली’च्या दर्जाला पोहोचू शकला नाही. कारण 'श्यामची आई’चे देशी रूप प्रल्हाद अत्र्यांना कळणे शक्यच नव्हते असा अभिप्राय नेमाडे यांनी व्यक्त केला आहे. (टीकास्वयंवर पृ.200).
 

Tags: दुर्गुणांचे उच्चाटन माणुसकीचा गहिवर भविष्यातील स्वप्ने देशी भाषाशैली भावपूर्ण उत्कट वाङ्मयीन चिकित्सा elimination of vices साने गुरुजी full of humanity future dreams emotional passionate literary critics sane guruji weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

रंगनाथ पठारे

मराठी कथालेखक, कादंबरीकार आणि समीक्षक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके