डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

१९९०च्या दशकात जाहीर झालेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगात गर्भनिरोधक संशोधनासाठी होणाऱ्या खर्चापैकी ९९टक्के पैसा केवळ स्त्रीगर्भनिरोधकांसाठी खर्चण्यात आला आणि फक्त १ टक्का पैसा पुरुष गर्भनिरोधकांसाठी खर्ची पडला.

गेल्या तीन लेखांत आपण विज्ञानाचा अर्थ एक विशिष्ट ज्ञानभांडार व संशोधनपद्धती या दोन्ही अर्थांनी समजून घेतला. विज्ञान व तंत्रज्ञान ह्यांतील फरक व त्यांचा मानवी जीवनावरील परिणामही आपण पाहिला. असे असले तरी विज्ञानाचा मानवी जीवनावरील अधिकार सर्वांनी मान्य केलेला नाही. विज्ञानावर अनेक प्रकारचे आक्षेप घेण्यात येत आहेत. येत्या काही लेखांमधून आपण सुरुवातीला त्यांचा धावता आढावा घेऊ. त्यानंतर आपण प्रत्येक आक्षेपावर सविस्तर चर्चा करणार आहोत.

वेगवेगळ्या विचारांच्या समर्थकांनी विविध दृष्टिकोनांतून विज्ञानावर आक्षेप नोंदविले आहेत. विज्ञानाची पद्धत ही वस्तुनिष्ठ असते, सर्व प्रकारच्या पूर्वग्रहांपासून मुक्त असते आणि विज्ञानाचा उद्देश मुळात ज्ञानाचा मुक्त शोध हा आहे, असे मानले जाते. पण खरोखर तसे घडते का, नसल्यास त्यामागे कोणती सामाजिक-राजकीय- मनोवैज्ञानिक कारणे आहेत याचा शोध घेणे, ही त्यांमागील प्रमुख प्रेरणा आहे. विज्ञानावर आक्षेप घेणारे लोक प्रामुख्याने दोन प्रकारचे आहेत, एक- मुळात विज्ञानविरोधी आहेत. (उदा. कट्टर धर्मवादी पंथ), तर दुसरे- विज्ञानसमीक्षक आहेत, ज्यांचा भर प्रचलित विज्ञानातील त्रुटी दूर करून ते खऱ्या अर्थाने जनसामान्य व समाजाच्या हितासाठी कसे काम करू शकेल यावर आहे. याशिवाय विविध समाजशास्त्रज्ञ व तत्त्वज्ञ यांनीही आपापल्या शास्त्रांच्या चौकटीत विज्ञानाच्या काही मर्यादा दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.

विज्ञानावरील सर्व प्रकारचे आक्षेप समजून घेण्याआधी आपण या संदर्भात नेहमी वापरल्या जाणाऱ्या काही  संज्ञांच्या व्याख्या समजून घेऊ-

विज्ञानवाद : विज्ञानाचे काही समर्थक विज्ञानाला धर्म मानतात आणि कट्टर धर्मवाद्यांप्रमाणे अतिशय अहमहमिकेने विज्ञानाचे समर्थन करताना दिसतात. त्यांचे विचार, दृष्टिकोन व कृती यांना उद्देशून ही संज्ञा वापरली जाते. ‘धरण’ या विषयावर बोलायचा अधिकार फक्त सिव्हिल इंजिनिअरना आहे किंवा आरोग्यविषयक चर्चांमध्ये डॉक्टरांशिवाय इतर कोणीही बोलू नये, अशी ‘मेरे अंगने मे तुम्हारा क्या काम है’ भूमिका हे विज्ञानवादी भूमिकेचे उदाहरण म्हणता येईल.

विश्लेषणवाद (Reductionism) : एखाद्या गुंतागुंतीची घटना, प्रक्रिया किंवा प्रणालीचा अर्थ तिच्या घटकांच्या व त्यांच्या आंतरक्रियांच्या स्वरूपात समजावून सांगणे. आधुनिक विज्ञानाची दिशा ही स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाण्याची आहे. साहजिकच जीवशास्त्राचा विचार करताना ते अवयवाकडून उती (tissue) कडे व तिकडून पेशी (cell), अणू व परमाणूकडे जाते. पण मानवी शरीर हे केवळ सर्व पेशींची गोळाबेरीज आहे असे मानणे किंवा अख्खे जंगल म्हणजे फक्त त्यातली झाडे-झुडपे, नद्या-नाले एवढेच आहे असे मानणे, हा झाला विश्लेषणवाद.

धर्मवाद्यांचा विज्ञानविरोध : आजच्या काळात विज्ञानाला विरोध करणारा सर्वांत प्रभावशाली गट आहे धार्मिक कट्टरपंथीयांचा. विज्ञानाचा ‘सत्य सांगण्याचा’ दावा चुकीचा आहे; कारण सत्य काय हे फक्त धर्मालाच ठाऊक आहे, असे हे कट्टरपंथीय मानतात. सर्व ब्रह्मांड, त्यातील पृथ्वी, तिच्यावरील सजीव-निर्जीव कसे अस्तित्वात आले, याबद्दल बायबलमध्ये निर्मितीसिद्धांत (Theory of Creation) सांगितलेला आहे. त्यानुसार ईश्वराच्या मनात आले आणि त्याने सहा दिवसांत सर्व सृष्टी रचली. (ईश्वर म्हणाला- प्रकाश येऊ दे आणि प्रकाश अवतीर्ण झाला!)

चार्ल्स डार्विनने मांडलेल्या उत्क्रांतीच्या सिद्धांताने या संकल्पनेला तडाखा बसला. असे असले, तरी अमेरिकेतील अनेक ख्रिश्चन शैक्षणिक संस्थांमध्ये उत्क्रांतीऐवजी बायबलप्रणीत निर्मितीसिद्धांत आजही शिकविला जातो. सूर्य पृथ्वीभोवती फिरत नसून पृथ्वी सूर्याभोवती फिरते, असा ‘धर्मविरोधी’ सिद्धांत मांडल्याबद्दल गॅलिलिओला तुरुंगवास भोगावा लागला, हे सर्वज्ञात आहे. ही बाब केवळ ख्रिश्चन धर्मात आढळते, असे नाही; सर्वच धर्मांतील कट्टरपंथीय विज्ञानाच्या विरोधात असतात. अमेरिकेचे अंतराळवीर चंद्रावर उतरले, तेव्हा एका ज्येष्ठ हिंदू धर्मगुरूंनी असे जाहीर केले की- हे सारे बकवास आहे. शंकराच्या कपाळावरील चंद्र सुरक्षित आहे, कोणीही मर्त्य माणूस तिथे पोहोचलेला नाही. ग्रहणाबद्दल शालेय पाठ्यपुस्तकात काहीही शिकवले जात असले, तरी ग्रहणाच्या दिवशी आपल्या देशात रस्त्यांवर शुकशुकाट असतो आणि ते सुटल्यावर ‘दे दान, सुटे गिराण’चा नारा त्यांवर दुमदुमतो, हे वेगळे सांगायची गरज नाही.

‘आंतरजातीय विवाह केल्यास रक्त अशुद्ध होईल’, अमुक दिवशी केस कापणे निषिद्ध असते, रजस्वला स्त्रीने देवळात जाऊन देवदर्शन घेतले तर देवाचा कोप होतो किंवा तो बाटतो- असे किती तरी अवैज्ञानिक समज धर्माच्या आधारावर अजूनही जनमानसात टिकून आहेत. कारण विज्ञानावर विश्वास ठेवू नका, धर्मावर ठेवा- असे धर्म सांगतो. (त्याला खरा धर्म म्हणायचे की नाही, हा प्रश्न वेगळा; पण असा समज बाळगणारे धर्माचा आधार घेतात, हे निश्चित!) पाकिस्तानमध्ये कडव्या धर्मवाद्यांचा जबरदस्त प्रभाव असल्यामुळे तिथल्या पाठ्यपुस्तकात त्याचे प्रतिबिंब पडलेले दिसते. पाकिस्तानात जेव्हा मोठा भूकंप झाला, तेव्हा तो भूगर्भातील हालचालींचा भूस्तरावरील परिणाम आहे असे न मानता, देशात वाढलेले पाप, अनैतिकता, इस्लामपासून ढळलेले समाजमन यांचा तो परिणाम आहे, असे बहुसंख्यांनी मानले. असे मानणाऱ्यांत भौतिकशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेणारेही होते, हे असेच एक बोलके उदाहरण.

या भूमिकेचा व्यत्यास म्हणजे सर्व विज्ञान हे धर्मातच सामावलेले आहे- किंबहुना, ‘विज्ञान जे आज सांगते आहे, ते ‘आमच्या’ धर्माने पूर्वीच सांगितले आहे’, अशी मांडणी. या बाबतीत हिंदूधर्मीय कट्टरपंथीय इतरांच्या खूप पुढे आहेत. प्राचीन भारतात रस्त्यांवरून अनेश रथ (म्हणजे मोटारगाड्या) व आकाशातून पुष्पक विमानासारखी विमाने उडत होती. विष्णूचे दशावतार म्हणजे उत्क्रांतीची कथाच आहे. गणपतीचा जन्म हा प्लॅस्टिक सर्जरीतून झाला...

असे अनेक शोध अलीकडच्या काळात लागत आहेत. सायन्स काँग्रेससारख्या विज्ञानाच्या प्रतिष्ठित पीठांवरूनही ते प्रसारित केले जात आहेत आणि काही राज्यांच्या पाठ्यपुस्तकांत त्यांचा समावेशही झाला आहे. ऋग्वेद, बायबल व कुराण यांतून आधुनिक विज्ञान शोधण्याचे कार्यही विविध देशांत जोरात सुरू आहे. याव्यतिरिक्त इतरही वैचारिक भूमिकांवरून प्रचलित विज्ञानावर आक्षेप घेण्यात आले आहेत.

भांडवलशाही विज्ञान, मार्क्सवादी विज्ञान : मार्क्सवाद हा मानवी समाजाला समजून घेण्याचा एक महत्त्वाचा दृष्टिकोन आहे किंबहुना, मार्क्सवाद आपल्याला साऱ्या मानवी व्यवहारांकडे पाहण्याची एक विशिष्ट संदर्भचौकट पुरवतो. विज्ञान हे मानवी समाजाचे महत्त्वाचे योगदान असल्यामुळे मार्क्सवादाने अनेक दशके विज्ञानाची ठोस समीक्षा केली आहे. मार्क्स व एंगल्स यांनी त्यांच्या सिद्धांताला ‘सामाजिक जगाचा वैज्ञानिक अन्वयार्थ’ असे संबोधिले.

आपला समाजवाद हा ‘वैज्ञानिक समाजवाद’ आहे, असाही अनेक मार्क्सवाद्यांचा दावा असतो. त्यावरून मार्क्सवादी हे विज्ञानाचे प्रखर व उत्साही समर्थक असल्याचे एकीकडे दिसते. पण त्याच वेळी कोणत्या भौतिक परिस्थितीत विज्ञान विकसित झाले, त्या ऐतिहासिक प्रक्रियेला व तिच्या सामाजिक-भौतिक स्वरूपाला वगळून विज्ञानाचा विचार करता येणार नाही, असेही मार्क्सवाद मानतो. ज्या भांडवली अर्थव्यवस्थेत विज्ञानाचा विकास झाला, त्याची मूल्यव्यवस्था व विचाराची चौकट प्रस्थापित विज्ञानाने स्वीकारली, असा महत्त्वाचा आक्षेप मार्क्सवाद्यांनी घेतला आहे.

भांडवलशाहीत समूहाचा विचार केला जात नाही, तर व्यक्तिवादाला महत्त्व असते. विज्ञानानेही असाच विचार करणे हे विश्लेषणवादाचे द्योतक आहे, असे मार्क्सवाद मानतो. मूठभर भांडवलशहांच्या आर्थिक लाभासाठी विज्ञानाचा उपयोग न होता सर्वसामान्य जनसमूहांच्या व्यापक हितासाठी तो व्हावा, असा मार्क्सवाद्यांचा आग्रह आहे. पुढील लेखात या दृष्टिकोनाची अधिक व्यापक मांडणी  आपण लोकविज्ञानाच्या संदर्भात समजून घेणार आहोत.

स्त्रीवादी समीक्षा : अनेक स्त्रीवादी विचारवंतांनी विज्ञानाची भाषा व आशय यांच्यावर पुरुषप्रधान विचारसरणीचा प्रभाव असल्याची टीका केली आहे. एमिली मार्टिन, रुथ हबार्ड व एव्हेलीन फोकस केलर ही त्यांपैकी काही अग्रगण्य नावे. विज्ञान हे तटस्थ व वस्तुनिष्ठ असल्याचा दावा करते; पण त्याच्या गाभ्यात जो लिंगभेद दडला आहे, त्याकडे ते दुर्लक्ष करते, असा त्यांचा मुख्य आक्षेप आहे. विशेषतः जीवशास्त्र व त्याच्याशी संबंधित विद्याशाखा (उदा. जैव अभियांत्रिकी) यांच्या संदर्भात त्यांनी आपले प्रतिपादन ठाशीव पद्धतीने केले आहे. ’ Women look at Biology looking at women’ (सं. रुथ हबार्ड, मेरी स्यू हेनिफिन व बार्बरा फ्रीड, ट्रॅन्झॅक्शन पब्लिकेशन, १९७९) हे पुस्तक स्त्रीवादी समीक्षेचा वस्तुपाठ म्हणावा अशा प्रकारचे आहे. प्रचलित जीवशास्त्र हे पुरुषाच्या शरीराला प्रमाण मानते आणि स्त्रीशरीर हे जणू त्याची बिघडलेली आवृत्ती (aberration) आहे असे मानते. विज्ञानाने नैसर्गिक घडामोडीकडे वस्तुनिष्ठपणे पहिले पाहिजे; पण त्याऐवजी समाजात प्रचलित असणारे स्त्रीपुरुष भेदाविषयीचे भ्रम बळकट करण्याचे कार्य ते करते, असा दावा या स्त्रीवादी समीक्षकांनी (ज्यांतील बहुसंख्य ख्यातनाम जीवशास्त्रज्ञ आहेत) केला आहे. कारण स्वतः शास्त्रज्ञ हे पूर्वग्रहांपासून मुक्त नसतात, पुरुषप्रधान मूल्यांचा खोल ठसा त्यांच्यावर उमटलेला असतो आणि तो त्यांच्या वैज्ञानिक कामातही उमटलेला दिसतो. याबद्दल काही उदाहरणे देता येतील.

स्त्री व पुरुष यांच्या पुनरुत्पादक संस्थेतील फरक हा की, पुरुषांची पुनरुत्पादनसंस्था ही तुलनेने साधी-सरळ आहे; याउलट स्त्रियांची पुनरुत्पादन संस्था अतिशय गुंतागुंतीची आहे आणि त्यात अनेक संप्रेरक चक्रे एकात एक गुंतलेली आहेत. त्यामुळे पुरुषांच्या पुनरुत्पादक संस्थेत हस्तक्षेप करून त्यांच्यासाठी गर्भनिरोधके बनविणे हे सोपे तर आहेच, पण पुरुषांसाठी बरेच निर्धोकही आहे.

याउलट स्त्रीपुनरुत्पादक संस्थेत एका विशिष्ट टप्प्यावर हस्तक्षेप केला, तर त्याचा एकूणच मासिक पाळीवर व पुनरुत्पादन प्रक्रियेवर काय परिणाम होईल, हे सांगता येत नाही; त्या गर्भनिरोधकांचे तीव्र व दीर्घकालीन विपरीत परिणाम होण्याची शक्यता जास्त असते. असे असले, तरी १९९०च्या दशकात जाहीर झालेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगात गर्भनिरोधक संशोधनासाठी होणाऱ्या खर्चापैकी ९९टक्के पैसा केवळ स्त्रीगर्भनिरोधकांसाठी खर्चण्यात आला आणि फक्त १ टक्का पैसा पुरुष गर्भनिरोधकांसाठी खर्ची पडला. याचे समर्थन करताना (पुरुष) शास्त्रज्ञ म्हणाले की गुंतागुंतीच्या स्त्रीपुनरुत्पादनसंस्थेत हस्तक्षेप करणे हे त्यांना संशोधक म्हणून अधिक आव्हानात्मक वाटते, त्याचा हा परिणाम आहे. त्यांना आव्हानात्मक वाटणाऱ्या वैज्ञानिक कार्याचे स्त्रियांवर काय परिणाम झाले, हे काही वर्षांतच समोर आले.

स्त्रियांसाठी गर्भनिरोधके शोधण्याच्या प्रक्रियेत अनेक रसायनांची चाचणी घेण्यात आली होती. त्यापैकी काही रसायने ही प्रभावी व बिनधोक आहेत, असे अनेक वैज्ञानिक चाळण्या पार करून शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आणि मग ती जागतिक बाजारपेठेत आणली गेली. ही सर्व दीर्घकालीन परिणाम करणारी, म्हणजे ३ महिने ते ५ वर्षे कालावधीपर्यंत उपयुक्त ठरणारी अशी होती. परंतु, प्रत्यक्ष उपयोग करताना या गर्भनिरोधकांचे अनेक घातक परिणाम स्त्रियांच्या लक्षात आले व त्यांच्यावर बंदी यावी म्हणून भारतासहित अनेक देशांत आंदोलने सुरू झाली. तेव्हा स्त्रीवादी कार्यकर्ते व विचारकांना असे आढळून आले की, वैज्ञानिक चाचणी घेत असतानाही यातील अनेक दुष्परिणाम समोर आले होते. उदा. महिन्यातून दोन आठवडे किंवा अधिक काळ रक्तस्राव होणे, कमी दिवस पण अतिशय मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होणे, मासिक पाळीच्या काळातही अजिबात रक्तस्राव न होणे किंवा सुरतेच्छा (संभोगाची इच्छा) नष्ट होणे. पण पुरुष संशोधकांनी (त्या काळात या विषयावर अभ्यास करणाऱ्या स्त्री-संशोधक संख्येने विरळ होत्या) हे सर्व किरकोळ साईड इफेक्ट्‌स आहेत, असे मानून त्यांकडे दुर्लक्ष केले.

याउलट, खूप वर्षांनी जेव्हा पुरुषांसाठी गॉसिपॉल नावाचे गर्भनिरोधक चाचणीसाठी घेण्यात आले; तेव्हा त्याचे साईड इफेक्ट्‌स पुरुषांसाठी धोकादायक असल्यामुळे त्याला परवानगी देण्यात येऊ नये, असे वैज्ञानिकांनी सांगितले. त्यातील सर्वांत महत्त्वाचा साईड इफेक्ट होता- पुरुषांची कामेच्छा कमी होणे.

विज्ञानावरील आणखी आक्षेप व त्यातून आपल्या मनात उभे राहणारे प्रश्न यांची चर्चा आपण पुढील काही लेखांत करू.

Tags: Theory of Creation रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ आरोग्य संघटना पुरुष गर्भनिरोधक स्त्रीगर्भनिरोधक गर्भनिरोधक side effect woman health Reproduction system ravindra rukmini pandharinath Female Contraceptive Men Contraceptive weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके