डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

अनेकदा तर एखाद्या गोष्टीमागे तंत्रज्ञान दडले आहे याची आपल्याला जाणीव नसते. साधे फुलका(पोळी) करण्याचे उदाहरण घ्या. छान गोलगोल, टम्म फुगलेला, उत्तम शेकलेला, पण तरीही अंगावर भाजल्याच्या खुणा न मिरविणारा फुलका बनविणे हे कौशल्याचे काम आहे. कणिक योग्यरीत्या मळणे, त्या ओल्या गोळ्याला पुरेसा ‘वाक’ असणे, तो सर्व बाजूंनी सारखा दाब देऊन लाटला जाणे, योग्य उष्णतेवर योग्य वेळ भाजला जाणे व अखेरीस गरमागरम फुलका त्याला धक्का न लावता हलकेच आगीतून डब्यात घालणे या सर्व क्रियांसाठी आपण क्रमशः परात, पोळपाट-लाटणे, चूलशेगडी-गॅस व चिमटा या उपकरणांचा वापर करत असतो. 

एक क्षण डोळे बंद करा आणि मनात म्हणा- विज्ञान, वैज्ञानिक. तुमच्या डोळ्यापुढे कसल्या प्रतिमा येतात?- चकाचक प्रयोगशाळा व तिथली मोठ-मोठी उपकरणे, चंबूपात्रात उकळणारे रंगीत द्रावण, आकड्यांची गिचमिड, e=mc2 यांसारखी अगम्य समीकरणे, पृथ्वीभोवती गरगरणारे उपग्रह, झाडावरून पडणारे सफरचंद पाहून विचारात पडलेला न्यूटन, आयफोन, पांढऱ्या कोटातले, रुबाबदार किंवा आपल्याच विचारात गर्क असणारे वेंधळे शास्त्रज्ञ ...

आणि मनात कुठले शब्द येतात?- सृष्टीज्ञान, निरीक्षण, प्रयोग, अनुमान, सिद्धांत, प्रमेय, तर्कशुद्ध विचारपद्धती...

हे सारे आपापल्या जागी बरोबर आहे. पण विज्ञान यांच्यापलीकडेही आहे. विज्ञान काय आहे हे थोडक्यात सांगायचे झाल्यास मी म्हणेन-

१. विज्ञान हा परस्परसुसंगत आणि प्रतिक्षणी वाढणारा वैश्विक ज्ञानाचा संचय आहे आणि ती ज्ञान-संपादनाची एक पद्धतही आहे.

२. विज्ञान हा सृष्टीतील रहस्यांचा शोध घेण्याचा व तिच्यातील विविध घटना, प्रक्रिया यांचा अर्थ लावण्याचा एक मार्ग आहे.

३. सृष्टीतील रहस्य उलगडणे म्हणजे सत्याचा शोध घेणे. विज्ञान घेत असलेला सत्याचा शोध हा निरंतर आहे. म्हणजेच ‘काल’चे सत्य हे आजच्या नव्या ज्ञानाच्या निकषावर जुने ठरू शकते व त्याची जागा ‘आज’चे सत्य घेते. (अर्थात त्यामुळे कालचे सत्य हे असत्य ठरत नाही.)

४. विज्ञानाने शोधलेले सत्य हे व्यक्ती, स्थळ, काळ, परिस्थिती-निरपेक्ष असते. ते कोणालाही कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही काळात योग्य ती साधने वापरून तपासून पाहता येते, त्याची प्रचीती घेता येते.

५. सृष्टीची रहस्ये उलगडण्याचा, विसंगतीत सुसंगती शोधण्याचा हा ‘खेळ’ मोठा मजेदार व रोमांचकारक आहे. म्हणूनच कितीतरी शतकांपासून लाखो, करोडो माणसे त्याचा ध्यास घेत आली आहेत व त्यात आपले योगदान देऊन त्याला व स्वतःला समृद्ध करत आली आहेत..

६. हा ‘खेळ’ खेळणाऱ्यांसाठी- ज्यांना आपण वैज्ञानिक म्हणतो- जसा ‘धमाल’ आहे, तसाच समस्त मानवजातीसाठी उपयोगीही आहे. विज्ञानाने शोधून काढलेल्या तत्त्वांचे उपयोजन मानवी जीवनातील काबाडकष्ट कमी करण्यासाठी, ते अधिक सुखकर व समृद्ध बनविण्यासाठी केले जाऊ शकते. त्यालाच आपण तंत्रज्ञान असे म्हणतो.

आता याच मुद्यांचा थोडा खोलात जाऊन विचार करू या.

विज्ञानाची निर्मिती प्रत्येक क्षणी या पृथ्वीवरील लाखो व्यक्तींच्या माध्यमातून होत असते. त्यातील कोणताही तुकडा वेगळा नसतो. तर तो परस्परांशी, विश्वातील एकूण विज्ञान समुच्चयाशी जुळलेला असतो, त्याच्याशी सुसंगत असतो. त्यामुळे ज्ञानाचा हा एकत्रितसाठा निरंतर वाढत असतो. म्हणूनच ज्ञानाच्या या भांडारावर साऱ्या जगाची मालकी असते (किंवा असायला हवी). विज्ञान हे एकाच वेळी ज्ञानसमुच्चय असते व त्याच्या निर्मितीची पद्धतही असते. वैज्ञानिक पद्धतीने जे ज्ञान मिळते, त्यालाच आपण विज्ञान म्हणतो. (वैज्ञानिक पद्धतीचा सविस्तर विचार आपण नंतरच्या लेखांमध्ये करणार आहोत.) विज्ञानाचा मूळ उद्देश सृष्टीची रहस्ये उलगडणे, त्याद्वारे सत्याचा शोध घेणे हा आहे. आपल्या शरीरात, मनात, आसमंतात, त्यापलीकडे जे काही घडते ते तसे का घडते, त्याचा अर्थ शोधणे, इतर घटना वा प्रक्रिया यांच्याशी त्याचे नाते शोधणे याचेच नाव विज्ञान. ते शोधून काढण्याच्या पद्धतीचे नावही विज्ञानच. काय आहे ही पद्धत? सर्वात आधी आपल्याला नेमका काय प्रश्न पडला आहे, हे निश्चित करणे, म्हणजेच आपल्या शोधाचे गंतव्यस्थान निश्चित करणे. नंतर त्याकडे जाण्याचा आरंभबिंदू- गृहितक- ठरविणे. आता या दोन बिंदूंना सांधणारा रस्ता प्रयोग- निरीक्षण- निष्कर्ष यांच्या साखळीतून शोधणे. येणारे निष्कर्ष चुकीचे असतील तर आपले गृहितक व संशोधनपद्धती तपासून पाहणे व नव्याने सुरुवात करणे. ही पद्धत कोणाही व्यक्तीला शिकता येऊ शकते व तिच्या मदतीने आपल्याला पडणारे प्रश्न कोणालाही सोडविता येतात. मात्र तटस्थ वृत्तीने निरीक्षण करणे ही त्यातली पूर्वअट आहे.

नैसर्गिक विज्ञान व सामाजिक विज्ञान

स्थूलमानाने विज्ञानाचे दोन भाग पडतात- नैसर्गिक विज्ञान व सामाजिक विज्ञान. काटेकोरपणे व तटस्थपणे प्रयोग व निरीक्षण करणे हे नैसर्गिक विज्ञानाच्या बाबतीत शक्य होते. त्यातील निष्कर्ष अनेकदा गणिती सूत्रांच्या साच्यात बसविता येतात. कारण निसर्गातील क्रिया-प्रक्रिया नियमबद्ध असतात. परंतु, समाज ही मानवाची निर्मिती असल्यामुळे त्याच्या रचनेत किंवा कार्यपद्धतीत काटेकोरपणा नाही, नेमकेपणा नाही. समूहाचा स्वभाव व व्यवहार यांविषयी नेमकेपणाने सांगणे कठीण असते. सामाजिक शास्त्रांमधील गृहितके, माहिती (डेटा) संकलन व विश्लेषण यांच्या पद्धती, सिद्धांत यांच्याबद्दल सामाजिक वैज्ञानिकांत मोठ्या प्रमाणत मतभेद आढळतात. काही प्रकारचे प्रयोग करणे सामाजिकशास्त्रात शक्य होणार नाही, किंवा नैतिकदृष्ट्या ते इष्ट ठरणार नाही. उदा. समाजात दहशतवाद वाढीला लागला तर त्याचा लहान मुलांवर काय परिणाम होईल हा विषय अभ्यासाला चांगला आहे. पण त्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करण्यासाठी मुलांच्या एका गटाला सतत दहशतवादाच्या दडपणाखाली ठेवणे हे नैतिकतेच्या निकषात बसणार नाही. शिवाय सामाजिक वैज्ञानिकांच्या विश्लेषणाच्या कसोट्या वेगवेगळ्या असू शकतात. कोणी समाजाची वर्गाधारित रचना प्रमाण मानणारी मार्क्सवादी चौकट स्वीकारेल, तर कोणाला जात हे समाजाचे मुलभूत एकक आहे असे मानणारी पद्धत अधिक योग्य वाटेल, तर आणखी कोणी लिंगभाव (जेन्डर) हा आधार धरून समस्येचे विश्लेषण करू पाहील. या सर्वांचे निष्कर्ष अर्थातच वेगवेगळे येतील. म्हणून आपल्या अभ्यासात आपण शक्यतो नैसर्गिक विज्ञानाच्या संदर्भातच बोलू. अर्थात, विज्ञान व समाज यांच्या ‘आंतरपटा’वरील प्रश्नांची चर्चा करताना आपल्याला सामाजिक शास्त्रे, त्यांतील विविध विचारप्रवाह यांची मदत घ्यावीच लागेल. खरे तर आपण जो प्रकल्प हाती घेतला आहे तो (म्हणजे विज्ञान-तंत्रज्ञानाचा आशय, उपयोगिता, आवाका व मर्यादा यांची समीक्षा करणे) मुळात विज्ञानाचे तत्त्वज्ञान या सामाजिक विज्ञानाचा एक भाग आहे. त्यामुळे त्यात मते- मतांतरे मोठ्या प्रमाणावर आहेत. पण त्याचाच अर्थ विषय खूप ‘इंटरेस्टिंग’ आहे असा होत नाही का?

वैज्ञानिक दृष्टिकोन व लोकविज्ञान

विज्ञान म्हणजे जर केवळ तर्कशुद्ध विचारपद्धती, काटेकोर प्रयोग, तटस्थपणे केलेली निरीक्षणे व त्यातून काढलेले निष्कर्ष यांची साखळी असेल, तर ती काही फार कठीण, आपल्या आकलनापलीकडची बाब नाही. ही पद्धत कोणालाही शिकता येणे शक्य असेल तर याचा अर्थ हा की, वैज्ञानिक म्हणजे कोणी आकाशातून पडलेले थोर पुरुष नाहीत, तर ते आपल्यासारखेच मानव आहेत. वेगळ्या शब्दांत सांगायचे तर आपल्यासारखी सामान्य माणसेही आपल्या आयुष्यात वैज्ञानिक पद्धतीने प्रयोग करून वैज्ञानिक बनू शकतात. पृथ्वीची उत्पत्ती नेमकी केव्हा व कशी झाली, आपल्या सूर्यमालेत किंवा त्यापलीकडे  मानवसदृश प्राणी आहेत का, या प्रश्नांचा शोध घेणे हे जसे विज्ञान आहे, तसेच मला रोज ऑफिसात जायला का उशीर होतो, कुंडीत लावलेले फुलाचे रोप जगत का नाही या प्रश्नांचा शोध हे देखील विज्ञानच आहे. आपले शरीर, मन, स्वयंपाकघर, शेत, बाग या साऱ्या गोष्टी म्हणजे विराट प्रयोगशाळा आहेत, कारण त्यांच्यामध्ये प्रत्येक क्षणी अगणित प्रक्रिया घडत असतात, त्या प्रत्येकाचे वेगळे विज्ञान आहे, शास्त्र आहे. आपण त्यांचा डोळसपणे मागोवा घेतला तर आपल्यालाही त्यातील अनेक रहस्ये उलगडू शकतील. ते रहस्य उलगडणारी पहिली व्यक्ती आपण कदाचित नसूदेखील. त्यामुळे आपले नाव काही विज्ञानाच्या इतिहासात अमर वगैरे झाले नाही तरी त्यामुळे आपल्याला स्वतःविषयी, आपल्या भवतालाविषयी काही शोध लागतील, आतापर्यंत न उलगडलेले अनेक अर्थ लागतील व एकूणच खूप मज्जा येईल. हे जेव्हा आपल्याला कळेल तेव्हा विज्ञान म्हणजे घोकंपट्टी, मार्क्स, करियर (म्हणजे पैसा व प्रतिष्ठा हो!), अज्ञानमूलक आदर यांच्या पलीकडे जाऊन आनंदाचा न संपणारा स्रोत बनेल. आपल्या सर्वांचे आयुष्य समृद्ध करणारे ‘लोकविज्ञान’ तेव्हा आकाराला येईल. वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्याचा आणखी एक लाभ आहे. वैज्ञानिक सत्याची ग्राह्यता ते कोणत्या महान व्यक्तीने प्रतिपादित केले, यावरून ठरत नाही. म्हणजे मला आध्यात्मिक सत्याचा शोध घ्याचा असेल तर कोणी गुरु लागतो. अमूक महाराजांच्या अनुग्रहाने मला साक्षात्कार झाला, तमुक स्वामींनी ही क्रिया केली म्हणून मला तमुक प्रचिती आली असे आपण ऐकतो. ते गुरु, महाराज, माता माझ्यावर प्रसन्न नसले तर मला तो अनुभव येणार नाही. मला तसा अनुभव आला नाही, म्हणून मी त्यांना आव्हानही देऊ शकत नाही.’ तसे घडणे हे ‘तुझ्या पूर्वकर्माचे फळ आहे’ असे म्हणून ते मला गप्प करू शकतात. पण विज्ञानाच्या बाबतीत हा अडथळा नाही. हा सिद्धांत अमूक महान शास्त्रज्ञाने सांगितला म्हणून तो मानण्याची सक्ती माझ्यावर नाही. मला त्यात काही त्रुटी आढळली तर मी माझ्या प्रयोगातून तसे सिद्ध करू शकतो. म्हणजे विज्ञानाला (तर्कशुद्ध विचारपद्धतीला) गुरु मानले तर इतर कोणालाही गुरु मानण्याची मला गरज नाही.

तंत्रज्ञान

उपग्रह उडविणे, स्मार्टफोन बनविणे, समुद्रतळाशी किंवा पृथ्वीच्या गाभ्यात असलेल्या खनिजांचा शोध घेणे म्हणजे विज्ञान नव्हे, ते आहे विज्ञानाचे उपयोजन, तंत्रज्ञान. आपण आपल्या रोजच्या आयुष्यात तंत्रज्ञानाचा वारेमाप उपयोग करत असतो. मानवी संस्कृतीच्या विकासात तंत्रज्ञानाने खूप महत्त्वाचे योगदान दिले आहे. चाक, कोयता, कुऱ्हाड ते उपग्रह, टीव्ही, स्मार्टफोन ही सर्व तंत्रज्ञानाचीच कमाल! आपण तंत्रज्ञान वापरतो तेव्हा त्यामागचे विज्ञान समजून घेण्याची आपल्याला आवश्यकता नसते. आपल्याला त्याचा उपयोग करता आला की बस्स! अशीच आपली वृत्ती असते. अनेकदा तर एखाद्या गोष्टीमागे तंत्रज्ञान दडले आहे याची आपल्याला जाणीव नसते. साधे फुलका(पोळी) करण्याचे उदाहरण घ्या. छान गोलगोल, टम्म फुगलेला, उत्तम शेकलेला, पण तरीही अंगावर भाजल्याच्या खुणा न मिरविणारा फुलका बनविणे हे कौशल्याचे काम आहे. कणिक योग्यरीत्या मळणे, त्या ओल्या गोळ्याला पुरेसा ‘वाक’ असणे, तो सर्व बाजूंनी सारखा दाब देऊन लाटला जाणे, योग्य उष्णतेवर योग्य वेळ भाजला जाणे व अखेरीस गरमागरम फुलका त्याला धक्का न लावता हलकेच आगीतून डब्यात घालणे या सर्व क्रियांसाठी आपण क्रमशः परात, पोळपाट-लाटणे, चूल-शेगडी-गॅस व चिमटा या उपकरणांचा वापर करत असतो. तो वापर कसा करायचा हे कळले तर आपल्यालाही असे फुलके करता येतील. (या सर्व क्रियांमागील विज्ञान तर आणखीच मनोरंजक आहे.) एकदा या गोष्टीतली गंमत आपल्याला कळली की मग आपणही आपल्या रोजच्या समस्या सोडविण्यासाठी सुयोग्य तंत्रज्ञान निर्माण करू शकतो.

विज्ञानातली गंमत आपल्याला का गवसत नाही? आपल्याला समृद्ध करणारे व आपले सामर्थ्य वाढविणारे विज्ञान-तंत्रज्ञान यांची निर्मिती का होत नाही? वैज्ञानिक पद्धत शिकणे जर सोपे-सहज आहे तर भारतात थोर वैज्ञानिकांची संख्या इतकी कमी का? लेखाच्या सुरुवातीला मी तुम्हाला डोळे मिटून वैज्ञानिक हा शब्द उच्चारताच तुमच्या डोळ्यांपुढे कोणत्या प्रतिमा तरळतात असे विचारले, तेव्हा किती जणांना स्त्री दिसली? ‘मी तुम्हाला आता तंत्रज्ञ म्हणजे कोण?’ असे विचारले तर स्वयंपाकघरातली गृहिणी, ‘जंगल वाचणारा’ आदिवासी हे आपल्या डोळ्यांसमोर का येत नाहीत?

Tags: रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ विज्ञान म्हणजे काय? विज्ञानविवेक गृहिणी वैज्ञानिक दृष्टिकोन व लोकविज्ञान आदिवासी विश्लेषण सामाजिक विज्ञान नैसर्गिक विज्ञान तटस्थ वृत्ती संशोधनपद्धती गृहितक ज्ञान-संपादनाची एक पद्धत निरीक्षण प्रमेय सिद्धांत अनुमान प्रयोग वैज्ञानिक फुलका तंत्रज्ञान Ravindra Ruukmini pandharinath housewife Science of living things natural sacience socail science indigenous original aborigine assumption hypothesis process of getting knowledge neutrality Observation theorem principle doctrin law theory conjecuter conclusion deduction Experiment scientific Scientist Roti Technology What is science? Rational Science pragmatic outlook towards sicence weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके