डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

जगात जे तंत्रज्ञान विकसित होत आहे आणि जे आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर वापरले जात आहे; ते बहुतांशी अतिशय खर्चिक, यंत्राधारित, तेलासारख्या मर्यादित ऊर्जासाठ्यावर अवलंबून असणारे आहे. त्यामुळे मोठमोठे प्रकल्प उभे राहू शकतील; पण त्यातून बेरोजगारी व पर्यावरणाचे प्रश्न अधिकच बिकट होतील, सामाजिक विषमता व हिंसा वाढेल, अशी ओरड गल्लीपासून आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ संघटनांपर्यंत सर्व पातळ्यांवर स्वीकारली जाते. या समजुतीला लोकविज्ञानाने छेद देत सर्वसामान्य कारागिरांना उपयोगी पडू शकतील आणि त्यांच्या आवाक्यात असतील अशी अनेक तंत्रे व तंत्रज्ञान विकसित केले आहे.  

आपण या लेखमालेतून विज्ञानाची संकल्पना व तिची विविध दृष्टिकोनांतून केली गेलेली समीक्षा समजून घेत आहोत. तिच्या मुळाशी ‘हे सारे काय आहे?’ हा प्रश्न किंवा जिज्ञासा असली; तरी आपली प्रेरणा विशुद्ध ज्ञानवादी नाही, तर ती उपयोजिततावादी आहे. स्थूलमानाने ती जनवादी आहे, असेही म्हणता येईल. म्हणजे, ‘या साऱ्यांचा सर्वसामान्यांच्या दृष्टीने लाभ काय?’ हे आपल्याला जाणून घ्यायचे आहे. विज्ञान-तंत्रज्ञान हे मानवजातीच्या हितासाठी आहे हे मान्य केले तरी, त्यांचा लाभ गरीब-वंचित लोकांना कसा होऊ शकेल, हे आपण शोधत आहोत. आतापर्यंत आपण धर्मवादी व स्त्रीवादी यांच्या विज्ञानावरील आक्षेपांचा विचार केला. धर्मवादी विज्ञानाला संकट मानतात; कारण वैज्ञानिक दृष्टिकोन बळावला तर आपले लोकमानसावरील नियंत्रण धोक्यात येईल, असे त्यांना वाटते. त्यामुळे ते एकीकडे विज्ञानाला विरोध करतात, तर दुसरीकडे विज्ञान जे म्हणते, ‘ते आमच्या धर्मग्रंथात पूर्वीच सांगितले आहे’ अशी शेखीदेखील मिरवू पाहतात. स्त्रीवाद्यांमध्ये विविध प्रवाह असले, तरी त्यांचा विरोध विज्ञानाच्या संकल्पनेला नसून प्रस्थापित पुरुषप्रधान व्यवस्थेमुळे त्याचा आशय कलुषित होतो आणि त्याचे उपयोजन स्त्री-पुरुष विषमता टिकविण्यासाठी होते, असा त्यांचा प्रमुख आक्षेप आहे. आपण आता लोकविज्ञान म्हणजे काय आणि ते प्रस्थापित विज्ञानाहून कसे वेगळे आहे, हे समजून घेऊ.  

लोकविज्ञान किंवा ‘पीपल्स सायन्स’ ही संकल्पना युरोपात विसाव्या शतकात विकसित झाली. जे.बी.एस हाल्डेन, जे.डी. बर्नाल, जोसेफ नीडहॅम यांसारख्या मार्क्सवादी विचारवंतांनी केलेल्या समीक्षेतून तिचा उगम झाला. (विज्ञानाच्या मार्क्सवादी समीक्षेचा विचार आपण स्वतंत्रपणे करणार आहोतच.) आजही युरोप व अमेरिकेत ‘पीपल्स सायन्स’ व ‘सायन्स अँड सोसायटी’ अशा नावांनी मार्क्सवादी समूह कार्यरत आहेत. पण आपण या लेखमालेत ‘लोकविज्ञान’ या संकल्पनेत भारतातील लोकविज्ञान चळवळीने स्वीकारलेल्या विचारधारेचा किंवा दृष्टिकोनाचाच विचार करणार आहोत. त्याचे एक कारण म्हणजे, भारतातील व पाश्चात्त्य जगातील भौतिक परिस्थिती व तेथील (विज्ञानासमोरील) प्रश्न भिन्न स्वरूपाचे आहेत. शिवाय भारतातील लोकविज्ञान हे मार्क्सवादी व गांधीवादी यांच्या संयुक्त प्रभावातून निर्माण झालेले रसायन आहे. लोकविज्ञानाचा आशय आणि त्याने प्रस्थापित विज्ञानाला विचारलेले प्रश्न लक्षात घेण्यापूर्वी आपण लोकविज्ञान चळवळीचा उगम समजून घेऊ या.

लोकविज्ञान चळवळीची सुरुवात : एकोणीसशे सत्तर हे भारतासाठी अस्वस्थ दशकच म्हणायला हवे. भारतात या दशकात लोकविज्ञान, स्त्रीमुक्ती, पर्यावरण अशा अनेक क्षेत्रांतील चळवळींची पायाभरणी झाली. मुंबईतील भाभा अणुशक्ती संशोधन केंद्रातील अनेक संशोधकांनी त्या काळात एकत्र येऊन ‘फेडरेशन ऑफ इंडियन लिटररी सायंटिस्ट्‌स’ या संघटनेची स्थापना केली. यापूर्वी विविध वैज्ञानिक हे आपापल्या मातृभाषांतून विज्ञानासंबंधी लिखाण करीत होते, कुठे कुठे त्यांच्या संघटनादेखील स्थापन झाल्या होत्या; त्यांचीच ही शिखर संस्था. 1973 मध्ये बंगलोरला व सन 1978 मध्ये त्रिवेंद्रमला या संघटनेने विभागीय परिषदा घेतल्या. त्याच सुमारास आसाम, प. बंगाल, कर्नाटक व केरळ या राज्यांत विज्ञान परिषदांची स्थापना झाली. सुरुवातीला या सर्वांचे लक्ष्य केवळ इंग्रजी व अन्य पाश्चात्त्य भाषांमधील विज्ञान हे आपापल्या मातृभाषांमध्ये आणायचे, एवढेच होते. पण त्यानंतर या परिषदांच्या माध्यमातून एकत्र आलेल्या वैज्ञानिकांना इतरही समस्यांची चर्चा करण्याची निकड भासू लागली. उदा.- देशाच्या वैज्ञानिक धोरणाची समीक्षा, विज्ञान-तंत्रज्ञानातील प्रगतीचे लाभ गोरगरिबांपर्यंत का पोहोचत नाहीत इत्यादी. (महाराष्ट्रात मराठी विज्ञान परिषदेची स्थापनाही विज्ञान मराठीत आणण्याच्या दृष्टिकोनातूनच झाली होती व अनेक मान्यवर शास्त्रज्ञ त्यात सक्रिय होते. परंतु प्रस्थापित विज्ञानाला प्रश्न विचारणे, गरज पडल्यास सरकारी धोरणांचा विरोध करणे या मार्गाने जाण्याची तिची तयारी नसल्यामुळे तिचा प्रवास पुढे सांगितल्याप्रमाणे लोकविज्ञानाच्या दिशेने झाला नाही.) भोपाळमध्ये युनियन कार्बाईड या बहुराष्ट्रीय कंपनीच्या ढिसाळपणामुळे 1984 मध्ये हजारो माणसांचा बळी गेला आणि त्यातून विज्ञान-तंत्रज्ञानविषयक अनेक प्रश्न उभे राहिले. त्यातून या सर्व संघटनांना प्रत्यक्ष कृती करण्याची व एका सामाइक विचारपीठाची गरज भासू लागली. केरळमध्ये अनेक वर्षे सक्रिय असणाऱ्या केरळ शास्त्र साहित्य परिषदेचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून महाराष्ट्रासह काही राज्यांत लोकविज्ञान चळवळ उभी राहिली. या सर्व संघटनांनी एकत्र येऊन 1988 मध्ये अखिल भारतीय लोकविज्ञान नेटवर्क उभे केले. आज लोकविज्ञान म्हटले की हे नेटवर्क, तिच्याशी संलग्न संघटना, त्यांची वैचारिक भूमिका व कार्य हे सारे डोळ्यांसमोर उभे राहते.

लोकविज्ञान चळवळीची वैचारिक भूमिका : देशात लोकविज्ञान चळवळ उभी राहण्यात केरळ शास्त्र साहित्य परिषदे (केशासाप)चा सिंहाचा वाटा राहिला आहे. केशासापच्या निर्मितीमध्ये तेथील मार्क्सवादी विचारक व वैज्ञानिकांचे मोठे योगदान आहे. साहजिकच सुरुवातीच्या काळात लोकविज्ञानाची मांडणी प्रामुख्याने विज्ञानाच्या मार्क्सवादी समीक्षेच्या अंगाने करण्यात येत होती; परंतु नंतरच्या काळात गांधीविचाराच्या अंगाने जाणारे शांततावादी, पर्यायी विकासवादी व पर्यावरणवादी प्रवाहही त्यात मिसळले.

मानवी समाजाच्या विकासात विज्ञान व तंत्रज्ञान यांची मोलाची भूमिका आहे, असे लोकविज्ञान मानते. परंतु विज्ञान ही काही तरी कठीण, सर्वसामान्यांना समजू न शकणारी अशी बाब आहे आणि म्हणून तिच्याविषयी फक्त तज्ज्ञ मंडळींनी विचार करावा, त्याबद्दलचे सर्व निर्णय घ्यावेत, हे लोकविज्ञानाला मान्य नाही. विज्ञान हे केवळ प्रयोगशाळेतील संशोधनात आणि वैज्ञानिक नियतकालिके व ग्रंथ यांत अडकून पडू नये; तर ते लोकांपर्यंत पोहोचायला हवे, त्यातून त्यांना नवी दृष्टी मिळायला हवी व त्यांच्या प्रश्नांची उत्तरेही त्यातून गवसायला हवी, ही लोकविज्ञानाची दृष्टी आहे. म्हणून अंधश्रद्धानिर्मूलन हा लोकविज्ञानाच्या कामाचा महत्त्वाचा घटक आहे. उदा. सूर्य किंवा चंद्राला लागणारे ग्रहण ही राहू-केतूच्या प्रभावामुळे घडणारी अनिष्ट, भयसूचक घटना नसून पृथ्वी, सूर्य व चंद्र हे आपापल्या कक्षेत भ्रमण करताना कधी तरी एका सरळ रेषेत येतात, त्यामुळे घडणारी ती नैसर्गिक घटना आहे, हे आपण पाठ्यपुस्तकातून शिकतो. पण एकविसाव्या शतकातही सूर्यग्रहणाच्या दिवशी रस्त्यांवर शुकशुकाट असतो. लोक त्या काळात जेवण करीत नाहीत. गरोदर स्त्रियांना तर घरात डांबून ठेवले जाते. ग्रहण सुटताच ‘दे दान, सुटे गिराण’च्या आरोळ्या सुरू होतात, हे आजचे वास्तव आहे. हे चित्र बदलण्यासाठी महाराष्ट्रात लोकविज्ञान आंदोलनाने ग्रहणाच्या दिवशी जनजागृती यात्रा आयोजित केल्या. ग्रहण ही अतिशय महत्त्वाची खगोलशास्त्रीय घटना आहे; ती सर्वांनी पाहावी व समजून घ्यावी, यासाठी खास गॉगल्स तयार केले व त्यातून लाखोंचे प्रबोधन केले. अशा प्रयत्नातूनच विज्ञान हा आपल्या जीवनाचा एक भाग आहे, अशी जनसामान्यांना खात्री पटू शकेल. सर्व जगात आतापर्यंत झालेला विज्ञानाचा विकास हा अनेक कारागीर, तंत्रज्ञ व वैज्ञानिक यांनी वैयक्तिक व सामूहिकरीत्या केलेल्या प्रयत्नांतून शक्य झाला आहे. तो अधिक चांगल्या पद्धतीने करावयाचा असेल; तर या सर्वांनी परस्परांशी आपापल्या अनुभवाची देवाण-घेवाण करणे, त्यातून सामुदायिकरीत्या शिकणे व पुढे जाणे ही प्रक्रिया सातत्याने चालायला हवी. म्हणजे लोकांचे प्रश्न, त्यांवर वैज्ञानिकांनी शोधलेली उत्तरे आणि ती अमलात आणताना कारागीर व तंत्रज्ञांना जाणवणाऱ्या अडचणी या सर्वांचा एकत्रित विचार व्हायला हवा, जो आजच्या व्यवस्थेत होत  नाही.

विज्ञानाची निर्मिती ही कित्येक पिढ्यांच्या सामूहिक आविष्कारातून झाली असल्यामुळे विज्ञान हा साऱ्या मानवजातीचा सामाईक ठेवा आहे व त्यावर सर्वांचा समान हक्क आहे. त्यामुळे पैशांच्या बळावर त्याच्यावर एकाधिकार प्रस्थापित करून बहुसंख्यांना उपयुक्त तंत्रज्ञानापासून वंचित ठेवणे, हे लोकविज्ञानाला मान्य नाही. वैज्ञानिक पद्धती ही कोणालाही शिकविणे शक्य आहे. म्हणून सर्वसामान्य जनतेला वैज्ञानिक पद्धतीने विचार करायला शिकविणे, त्या आधारावर लोकांनी त्यांच्या आयुष्याशी संबंधित बाबी जाणून घेणे, त्यांच्याशी संबंधित सरकारी धोरणे समजून घेणे आणि आवश्यकता भासेल तिथे निर्णयप्रक्रियेत हस्तक्षेप करून लोकांच्या हिताची धोरणे ठरविण्यास सरकारला बाध्य करणे आवश्यक आहे, असे लोकविज्ञान मानते. म्हणजेच विज्ञान व त्याच्या वापराविषयी होणारे निर्णय या बाबी फक्त प्रयोगशाळेत संशोधन करणारे संशोधक, सरकारचे नोकरशहा व राजकीय नेते यांच्यापुरत्या मर्यादित नाहीत; तर ज्यांच्या आयुष्यावर त्यांचा प्रभाव पडणार आहे, अशी सर्वसामान्य जनताही त्या संपूर्ण प्रक्रियेत सहभागी होऊ शकते, असे लोकविज्ञान मानते.

त्यापलीकडे जाऊन सध्याची भांडवलशाही व्यवस्था जनसामान्यांच्या हिताची नसल्यामुळे याहून अधिक मानवी, समताधारित समाजव्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे. अशा सामाजिक परिवर्तनासाठी विज्ञान महत्त्वाची भूमिका बजावू शकते, असेही लोकविज्ञान मानते. म्हणजेच लोकविज्ञान ही-

- जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात ‘ज्ञानेश्वरी लिहिण्याची’, तज्ज्ञांच्या अधिकारक्षेत्रात अडकून पडलेले ज्ञान लोकांना समजेल अशा पद्धतीने त्यांच्यापर्यंत नेण्याची चळवळ आहे.

 - लोकशाहीकरणाची व जनसामान्यांच्या सबली- करणाची चळवळ आहे.

- विज्ञानाच्या विकासात सर्वसामान्य जनतेचीही भूमिका असू शकते असे मांडणारी, म्हणजेच विज्ञानाचा आशय व्यापक करणारी चळवळ आहे.

- विज्ञान हे केवळ प्रस्थापित व्यवस्था टिकविण्याचे साधन नसून समाजपरिवर्तनाचे, समतामूलक समाजाच्या निर्मितीचे ते हत्यार आहे, असे मानणारा विचारप्रवाह आहे.

आतापर्यंत या चळवळीने सरकारच्या विज्ञानतंत्रज्ञानविषयक धोरणाची समीक्षा करणे, त्यातील उणिवा व अंतर्विरोध स्पष्ट करणे आणि त्यापुढे जाऊन शक्य असेल तिथे त्यांना पर्याय सुचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. सार्वजनिक आरोग्य, औषध, बौद्धिक संपदा अधिकार (पेटंट), ऊर्जा, पर्यावरण, पंचायती राज व सत्तेचे विकेंद्रीकरण, परमाणू शस्त्रसंधी- या व अशा किती तरी महत्त्वाच्या विषयांवरील धोरण ठरविताना देशात ज्या चर्चा झडल्या, त्या सर्वांत लोकविज्ञानाने अतिशय मोलाचे योगदान दिले आहे.

अनेकदा सरकारी धोरणांतील उणिवा दाखवून त्यांना पर्याय सुचविणे हेदेखील अपुरे ठरते. आपण देत असलेला पर्याय व्यवहार्य आहे, हे छोट्या प्रमाणावर (पायलट प्लान्ट) प्रयोग करून सिद्ध करावे लागते. लोकविज्ञानाने साक्षरता, शेती, आरोग्य, पाणलोट विकास, स्थानिक संसाधनांचे व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रांत असे यशस्वी प्रोटोटाइप्स (नमुने/उदाहरणे) उभे केले आहेत.

आज साऱ्या जगात जे तंत्रज्ञान विकसित होत आहे आणि जे आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर वापरले जात आहे; ते बहुतांशी अतिशय खर्चिक, यंत्राधारित (म्हणजेच माणसांचा रोजगार हिरावून घेणारे), तेलासारख्या मर्यादित उर्जा- साठ्यावर अवलंबून असणारे आहे. त्यामुळे मोठमोठे प्रकल्प उभे राहू शकतील; पण त्यातून बेरोजगारी व पर्यावरणाचे प्रश्न अधिकच बिकट होतील, सामाजिक विषमता व हिंसा वाढेल, ही बाब आता गल्लीपासून आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ संघटनांपर्यंत सर्व पातळ्यांवर स्वीकारली जाते. पण त्याला जणू काही पर्यायच नाही, असे मानले जाते. या विचारसरणीला There Is No Alternative (TINA) phenomenon टिना प्रत्यय- असे मानले जाते.

लोकविज्ञानाने या समजुतीला छेद देत सर्वसामान्य कारागिरांना उपयोगी पडू शकतील व त्यांच्या आवाक्यात असतील अशी अनेक तंत्रे व तंत्रज्ञान विकसित केले आहे. ती स्वस्त, कमी ऊर्जा लागणारी, अनेकांना रोजगार पुरविणारी व गावाच्या पातळीवर उभारता येण्याजोगी आहेत. उदा.- गावाच्या पातळीवर मोबाईल फोनसाठी वायरलेस यंत्रणा उभारणे, लोकसहभागातून ग्रामविकासाचे नियोजन करण्यासाठी सॉफ्टवेअर बनविणे, तेलघाणी व हातमाग यांची उत्पादकता वाढविणे, पवनऊर्जेवर आधारित उपकरणे बनविणे, लोहाराच्या कामाला यंत्राची जोड देणे इ. लोकविज्ञानाचा हा अतिशय उपयुक्त विचार आपल्या देशात फारसा फोफावला का नाही, लोकविज्ञानाने लोकांचे कोणते प्रश्न हातील घ्यायला हवेत, असे तुम्हाला वाटते, याबद्दलचे विचार कळवा. पुढच्या लेखात लोकविज्ञानचा विचार व कार्य यांची अधिक खोलात जाऊन चर्चा करू.

Tags: अखिल भारतीय लोकविज्ञान नेटवर्क केरळ शास्त्र साहित्य परिषद लोकविज्ञान रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ लोकविज्ञान विज्ञानविवेक : 6 All India Peoples Science Network Kerala Sasthra Sahitya Parishad Peoples science Ravindra Rukmini Pandharinath Lokvidnyan Vidnyanvivek:6 weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके